माँ के लिए वक्त-ए-जुदाई है
रस्मे तआम जबसे निकाह में आयी है
इस रस्म ने बडी तबाही मचाई है
ये जो बिर्याणी आपने दबाके खाई है
दुल्हन के वालीद की उम्रभर की कमाई है.
लॉकडाऊन संपताच इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाचेही लग्नसोहळे सुरू झालेले आहेत. ऐपतीपेक्षा जास्त केला जाणारा खर्च माणसाला कंगाल बनवितो. तसाच खर्च विकृत निकाह व्यवस्थेत होत असल्याने मुस्लिम समाजाचा प्रवास कंगालीकडे सुरू आहे. ज्या समाजाच्या वस्त्यांमध्ये दर्जेदार शाळा कमी आणि दर्जेदार शादीखाने जास्त असतील त्यांच्या भविष्याविषयी काय बोलावे? हा लाख मोलाचा सवाल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिकन, मटन, बिर्याणी, गोड पदार्थांची रेलचेल सध्या निकाहच्या सोहळ्यामध्ये प्रचूर मात्रेत दिसत आहेत. निकाह सोहळ्यामध्ये डीजे आणि व्हिडीओ ग्राफीला जेवढा तीव्र विरोध धर्मगुरूंकडून केला जातो तेवढा निकाहच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या महागड्या जेवणावळ्यांचा केला जात नाही. काहीतरी तांत्रिक कारण देऊन या ’दावतीं’ना योग्य ठरवून प्रचंड अनुत्पादक खर्च केला जात आहे. त्यामुळे समाजात मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. लॉकडाऊन नंतर निकाह सोहळ्यांचा थाट बघून श्रद्धावान मुस्लिमांचे हृदय पिळवटून निघत आहेत म्हणूनच या आठवड्यात इस्लामी निकाह बद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.
इस्लाममध्ये निकाहची संकल्पना
रोज-रोज दावतें आती हैं पर जाने का नई
गए भी तो निकाह की बिर्याणी खाने का नई
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी 1443 वर्षापूर्वीच सावधान केलेले आहे की, ’’औरतों से उनकी खूबसूरती की वजह से शादी न करो, हो सकता है के उनकी खूबसूरती उनको तबाही के रास्ते पर डाल दे. माल दौलत (उर्वरित पान 7 वर)
की वजह से भी उनसे शादी न करो, हो सकता है के उनका माल उनको गुनाह और सरकशी (अवज्ञाकारी) में डाल दे. बल्के तुम दीन की बुनियाद पर उनसे शादी करो. एक नकटी या कानकटी हुई काली मगर दीनदार औरत उनके मुकाबले में ज्यादा अच्छी है.’’ (इब्ने माजा).
आजकाल सौंदर्य आणि संपत्ती याकडेच लक्ष देऊन मुलींची निवड करण्यात येते. मात्र लग्न झाल्यावर ती फेसबुकवरच तासन्तास असते, सतत व्हॉटस्अॅप करत असते, सारखी मोबाईल फोनला चिटकून राहते, अशा तक्रारी सुरू राहतात. म्हणजे अगोदर, ’सुरत’ पाहून लग्न केले जाते आणि लग्नानंतर तिच्या ’सीरत’ म्हणजे चारित्र्याची चौकशी सुरू होते. वर नमूद हदीसचे पालन न केल्यामुळे पहा अनेक जोडप्यांचे लग्न नरकासमान झालेले आहेत.
विवाह सोपा करा
ताख़ीर का मौक़ा ना तज़बज़ुब का अमल है
ये वक्ते अमल, वक्ते अमल, वक्ते अमल है
विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली दिसत आहे. भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य हिंदू बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही. निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे स्वरूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ च्या नावाखालील अनेकजण हुंडा आणि हजरत फातेमा रजि. यांच्या नावाखाली, ’दहेज-ए-फातमी’ च्या नावाने दहेजमध्ये फ्लॅट, उंची फर्निचर पासून ते कार वगैरे देण्याचे प्रकार, तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेल्या चालीरीति आहेत आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे.
मुस्लिमांचे निकाह ही आता सोहळे बनत चाललेले आहेत. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! ... प्रेषित सल्ल. गावात हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो. इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. इतर धर्मांमध्ये अध्यात्मिकतेची उंच पातळी गाठण्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो. साधू बनावे लागते, नन् किंवा फादर बनावे लागते. मात्र संसारी जीवन जगून सुद्धा अध्यात्मिकतेची अत्युच्च पातळी गाठता येते, जगाला याचे प्रात्यक्षिक मुहम्मद सल्ल. यांनी दाखवून दिले.
भारतीय मुस्लिमांमध्ये अगोदरच गरीबांची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची हीच सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे. मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिकरित्या इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे. ज्या ठिकाणी प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन होते त्या ठिकाणी बिर्याणी खाणे तर लांबच राहिले अशा सोहळ्यामध्ये हजर राहणे सुद्धा अवज्ञा आहे. प्रेषित सल्ल. यांनी कधीच कोणाच्या निकाहमध्ये जेवण केलेले नाही मग आम्ही कसे करू शकतो? याचे उत्तर कोणाला देता येत असेल तर त्यांनी द्यावे.
अल-मारूफ वल-मशरूत
एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीतीमध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूतमध्ये झालेले आहे.
निकाह सोपा करा
इस्लाममध्ये निकाह इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे (कुबूल), दोन साक्षीदार, एक वकील, एक काझी, माफक महेर काही छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होऊन जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. अनेक चुकीच्या गोष्टी मारूफ झालेल्या आहेत.
इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्रे आणि दागदागिन्यात खर्च केले जात आहेत.
काही ठिकाणी लोक लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागत नाहीत मात्र मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशाच ठिकाणची स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाहमध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की -
एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारही मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकारी या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे. याचा पुरावा हा आहे की, मुस्लिमेत्तर वस्त्यांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या वस्त्यांमध्ये मोठमोठी महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस, मुला-मुलींचे आलीशान हॉस्टेल यांची संख्या वाढत आहे तर मुस्लिम वस्त्यांमध्ये आलीशान शादीखान्यांची संख्या वाढत आहे. कोणत्याही शहरातले हेच चित्र आहे.
एक अनाहुत संकट
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना महेफूज उमरैन रहेमानी यांनी उर्दूमध्ये एक लेख लिहून समाजाचे लक्ष एका वेगळ्याच समस्येकडे वेधलेले आहे. मौलाना म्हणतात 2016-17 या एका वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये 44 मुस्लिम मुलींनी इतर धर्मीय मुलांशी नोंदणी पद्धतीने विवाह केलेले आहेत. एकट्या पुण्याची ही आकडेवारी आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाची काय परिस्थिती असेल, याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. निःसंशयपणे दिवसेंदिवस महाग होणारे निकाह हे सुद्धा या पलायनामागचे एक प्रबळ कारण असल्याच्या मौलानांच्या मताचा प्रतिवाद करणे शक्य नाही.
केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, हे एकच कारण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे.
एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते. असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील.
आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट किंवा घरदार, शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाकीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.
काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून मुंबई, पुणे, हैद्राबादला जावून मजूरी करत आहेत. ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही. लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप असेल आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.
मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.
लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील. एक - वर्गकलह वाढेल. दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील). हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह को आसान बनाओ’ हे सुत्र आज या क्षणापासूनच आपण सर्वांनी मिळून स्वतःवर लागू करावे लागेल. प्रेषित सल्ल. यांच्या याच वचनाची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण सर्व निकाहला सोपे करण्यासाठी आपापल्या ठिकाणी प्रयत्नशील रहाल.
शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करण्याची समज दे.’’ (आमीन.)
- एम. आय. शेख
ह. अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात, एका व्यक्तीने प्रेषितांकडे इस्लामच्या बाबतीत विचारणा केली असता प्रेषित (स.) म्हणाले, ‘तुम्ही ज्या लोकांना ओळखता आणि ज्यांच्याशी तुमची ओळख नसेल तर अशांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हा उच्चतम इस्लाम आहे.’
ह. हुरैरा यांनी म्हटले आहे की रात्री रस्ता दिसण्यासाठी जसे गावात, शहरांमध्ये प्रकाशाची सोय करण्यासाठी लाईटचे खांब असतात. तसेच इस्लामची वाट दाखवण्यासाठी अल्लाहची भक्ती, त्याच्याबरोबर कुणाला भागीदार न जोडणे, नियमित नमाज अदा करणे, जकात देणे, रोजे ठेणे या सर्व गोष्टी इस्लामचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाशाचे दिवे आहेत. याचबरोबर भल्या गोष्टी लोकांना सांगत राहाणे, वाईटापासून त्यांना रोखणे. आदम (अ.) यांच्या सतती (सबंध मानवजातीतील लोकांना) सलाम करणे, घरात गेल्यावर घरच्या लोकांना सलाम करणे हे सर्व इस्लामचे दीपस्तंभ आहेत. मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा बंधू आहे. एकमेकांनी दुसऱ्यावर अत्याचार करू नये. त्याला अपमानित करू नये. जर कुणी दुसऱ्या मुस्लिमाचा अपमान करत असेल तकर त्याला वाईट समजण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. प्रत्येक मुस्लिमावर दुसऱ्या मुस्लिमाचे रक्त सांडणे, त्याची मालमत्ता हडप करणे आणि त्याची मानहानी करणे निषिद्ध आहे.
ह. उमरो बिन अतबा (र.) म्हणतात की मी प्रेषितांना विचारले, इस्लाम म्हणजे काय? त्यांनी उत्तर दिले, ‘सभ्य बोलणे आणि लोकांना जेवू घालणे.’ मी परत विचारले, ईमान (श्रद्धा) काय आहे? ‘संयम ठेवणे आणि मनाची उदारता.’ कोणता इस्लाम उच्चतम आहे? मी पुन्हा विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘ज्याच्या बोलण्यापासून आणि हातापासून लोक सुरक्षित असतील. तसेच उदार मनाने लोकांशी संभाषण करणे.’ (हदीस : मुस्नद अहमद)
सर्वांत श्रेष्ठ मुस्लिम तो जो चारित्र्यसंपन्न असेल. प्रेषित म्हणतात, सर्वश्रेष्ठ ईमान (श्रद्धा) ही आहे की तुम्ही जिथे कुठे असाल अल्लाह तुमच्या संगे आहे याची जाणीव ठेवणे होय.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा असा उच्चा केला की ‘अल्लाहची शपथ, ती व्यक्ती श्रद्धावंत होऊच शकत नाही ज्याच्या वाईट वृत्ती आणि इजा पोहोचण्यापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल.’
ती खूप आनंदात होती. तिला बाबांसोबत बाहेर जायचे होते ना. आईने तिला छान तयार केले होते. बाबांचा हात धरून बाहेर पडताना तिला व तिच्या आईला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार? कदाचित थोडाही संशय आला असता तर तिच्या आईने तिला बाबांसोबत जावू दिले नसते. बाबांसोबत चालता-चालता ती एका सुनसान रानात आली होती. तेथे बाबांनी माती खणायला सुरुवात केली. ते खणत असताना जी माती बाबांच्या कपड्यांवर, तोंडवर लागत होती ते तिला बघवत नव्हते. आपल्या लहानशा हातांनी ती बाबांच्या अंगावरची माती झटकत, तोंडावर लागलेली माती आपल्या चिमुकल्या हातांनी साफ करत. हे करत असताना तिचे प्रश्न चालू होते की बाबा आपण कोठे आलो आहोत ? आपल्याला तर फिरायला जायचे होते ना? ही मध्येच आपण काय काम काढलात? बाबा ! हा खड्डा कशासाठी? बाबा लवकर चला ना कधी जायचंय? पण बाबा काही न सांगता आपल्या कामातच मग्न होते. खड्डा पूर्ण करून झाल्यावर त्यांनी त्या चिमुकलीला खड्ड्याच्या कडेला उभी करून त्यात तिला ढकलून दिले. ती ओरडत होती परंतु, बाबा तिच्या अंगावर सरसर माती टाकत होता, ती रडत होती, ओरडत होती बाबा हे काय करता, मला वाचवा ना! बाबा असे करू नका म्हणत तिने आपले प्राण सोडले. अशा सत्य घटना प्रेषित सल्ल. जगात येण्याच्या पूर्वी सतत होत असत.
स्वतःच्या मुलीला खड्डा खणून जिवंत पुरणे किती ही क्रूरता? त्या माणसाला दया नाही का आली? एवढे निर्दयी कसे होऊ शकते कोणी? ही सत्य घटना त्या इसमाने येऊन प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सांगितली. तेव्हा प्रेषित मुहम्मद सलम् यांच्या डोळ्यांत अश्रू आले. आपल्यालाही डोळ्यांत आले असेल अश्रू नसेल आले तर आणण्याचा प्रयत्न करा, तरी येत नसतील तर रडल्यासारखा चेहरा करून आपले संवेदनशीलतेचे पुरावा द्या, स्त्री जातीसाठी. स्त्रीची अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. काही कबिले आपल्या मुलींना जिवंत पुरून टाकायचे तर काही प्रसूतीच्या वेळेस एक खड्डा तयार ठेवायचे. मुलगी जन्मल्याबरोबरच तिला पुरून टाकायचे. आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे खंडा खाण्याची गरज नाही नऊ महिने वाट पहायची सुद्धा गरज नाही. चौथा महिना झाला की तपासणी करून स्त्री भ्रून हत्या करण्यात येते. यावर कायदेशीर प्रतिबंध असले तरी हे कुकर्म थांबत नाही. केवळ आपल्या भारतातच दरवर्षी पाच लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात आणि जगात याबाबतीत भारत सर्वप्रथम येतो. लग्नाच्यावेळी भली मोठी भीक (हुंडापद्धती) मुळे लोक लेकीला ओझे समजतात व या जगात येण्याचा त्यांचा अधिकार देत नाहीत. भारताच्या मागे चीन आणि पाकिस्तान चा नंबर येतो. भारतातही आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. त्यातही परळी वैजनाथ ते गर्भपात केंद्राचे गाव म्हणून कुख्यात आहे.
महाराष्ट्रातील सहा वर्षाखालील बालिकांचे दरहजारी प्रमाण 913 मुली असे होते. 2001 साली हे प्रमाण 883 पर्यंत घसरले. गेल्या दहा वर्षात 4 लाख 68 हजार 480 स्त्री भ्रूणहत्या झाल्याचे नमूद केले आहे. 1994 मध्ये गर्भलिंगनिदान करणे हे फौजदारी कृत्य म्हणून घोषित केले गेले. व सोनोग्राफी करतांना लिंग सांगणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी तरतूद केली गेली. पीसीपीएनडीटी अॅ्नट गर्भधारणापूर्वी व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध करणारा कायदा 1994 असे म्हणतात. केंद्र सरकारचा निर्णय 1 जानेवारी 1996 पासून हा कायदा अस्तित्वात आला तरी आजही स्त्रीला अशक्त तुच्छ समजलं जातं. जावईचे नखरे उचलणे पसंत करत नाही. अरबमध्ये रोजच्या युद्धामध्ये लेकिला कैदी बनविले जायचे. स्त्रीची सुरक्षा करावी लागते आणि ती सुरक्षित नव्हती म्हणून तिला पसंत नाही करायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार बंद झाला. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’ आणि स्मरण करा ती वेळ जेव्हा जीवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली.’’ (सुरे अलत्नवीर आयत क्र.9). एकीकडे मुलीसोबत अत्याचार करण्यास नरकाचे यातनामय जीवन तर दूसरीकडे त्या लोकांना आनंदाची वार्ता देण्यात आली ज्यांनी मुलीवर अत्याचार न करता सद्व्यवहार केला आणि मुला-मुली दोघांनाही समान वागणूक दिली. त्यांच्याशी वागतांना कुठलाही भेदभाव केला नाही किंवा करत नाही. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास रजि. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे कथन कथित करतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले, ज्या माणसाला मुलगी झाली त्याने न तिला जीवंत पुरावे न गाडावे न तिला अपमानास्पद वागणूक द्यावी न तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे तेव्हा ईश्वर त्याला जन्नतमध्ये दाखल करेल. (अबु दाऊद)
म्हणजेच 1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही. इस्लाममध्ये मुलीच्या पालनपोषणास विशेष प्रोत्साहन दिले आहे व या कामाला एक पवित्र कर्तव्य घोषित केले आहे. बुखारी व मुस्लिमच्या हदीसमध्ये आलेले आहे की, कन्या देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमाविले आणि त्या माणसाने आपल्या मुलीशी सद्व्यवहार केला तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार त्याच्या नरकाग्नीपासून बचावाचे साधन होईल.’’ जो माणूस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरूण होईपर्यंत करील निवाड्याच्या दिवशी मी आणि तो असे असतील हे सांगतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली दोन बोटे जोडली. (मुस्लिम)
ज्ञान नसेल तर जगून काय उपयोग
स्त्री म्हणजे निम्मी मनुष्य जात. मानव समाजाचा अर्धा वाटा तिचाच. स्त्री ज्ञानी तर पुढची पीढिही ज्ञानी. म्हणून इस्लाममध्ये स्त्री शिक्षणावरही जोर देण्यात येतो. स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी महिलांना दीन आणि दुनिया दोघांचेही ज्ञान शिकण्यास प्रवृत्त केले. ज्ञानाशिवाय, आचरण अशक्य असते. म्हणून धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे स्त्री पुरूष दोघांवरही अनिवार्य आहे. ज्ञान प्राप्त करणे स्त्रीचा कायदेशीर हक्क आहे. स्त्री जर अज्ञानी असेल तर लग्नाआधी तिच्या पित्याचे व लग्नानंतर तिच्या पतीचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी तिला ज्ञान द्यावे. अथवा अशी व्यवस्था करावी की तिला शिक्षण मिळावे. नैतिक मर्यादांचे पालन करून शिक्षण मिळविण्यासाठी ती घराबाहेरही पडू शकते आणि तिच्यावर कोणी बंधनं लादू शकत नाही. प्रेषित सल्ल. यांच्या काळात एकीकडे मुलांना कुरआन तोंडपाठ असायचे तर दूसरीकडे घुडस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजीतही त्या तज्ञ असायच्या. एवढेच नव्हे तर वैद्यकीय ज्ञानही मुलींना अवगत होते. इलिझाबेथ ब्लॅकवेल ह्या 1847 मध्ये जगातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आनंदीबाई जोशी कल्याण या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून 1886 मध्ये पुढे आल्या. हजरत आएशा रजि. यांच्या विवाहावर आक्षेप घेणाऱ्यांना माहीत असायला हवे की, आनंदीबाईचा विवाह ही वयाच्या 9 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे गोपाळरावांशी झाला होता. असो त्या एकच वर्षे डॉ्नटर म्हणून जगल्या. 1887 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
रूफैदा अल असलमिया या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉ्नटर. खरं तर जगातल्याच पहिल्या महिला डॉ्नटर म्हटले तरी बरोबर होईल. कारण त्या आजपासून 1400 वर्षापासून मस्जिदे नबवीजवळ आपली वैद्यकीय सेवा देत. शिक्षणाच्या क्षेत्रात माननीय आएशा रजि. माननीय सफिया रजि., माननीय आसमा बिन बिन्ते अबुबकर रजि., माननीय फातेचा बिन कैस रजि., माननीय उम्मे हबीबा रजि., माननीय खौला रजि. यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
शिक्षणानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो स्त्रिचा विवाह. अनादी काळापासून स्त्रीला विवाहाच्या बाबतीत तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिच्या परिवारातील आई-वडिल आणि बुजूर्ग मंडळी ज्या व्यक्तीबरोबर विवाह करवून देतील निमुटपणे तिला तो निर्णय स्वीकारावा लागेल. त्याविरूद्ध एक शब्दही बोलण्यास तिला अधिकार नव्हता. कोणत्याही मुलीचे आईवडिल तिच्यापेक्षा जास्त अनुभवी असतात आणि मुलीचे शत्रू नसतात आणि शुभचिंतक असतात. मुलींपेक्षा मुलीच्या चांगल्या-वाईटाची त्यांना जास्त काळजी असते. म्हणून तिच्या चांगल्या भविष्याचे निर्णय तेच घेऊ शकतात ही धारणा काही प्रमाणात सत्य असली तरी ही गोष्ट कधीच योग्य नाही की स्त्रीवर तिच्या आवडीविरूद्ध विवाहाचा निर्णय थोपवावा. इस्लाममध्ये विवाहाच्या बाबतीत पालकाच्या मर्जीला महत्व जरूर दिलेले आहे परंतु, विवाहासारख्या महत्त्वाच्या घटनेमध्ये मुलींच्या पसंतीचीही नोंद घेण्यास -(उर्वरित आतील पान 7 वर)
समाजाला बाध्य केलेले आहे. माननीय अबु हुरैरा रजि. प्रेषितांचे कथन करतात की, त्यांनी एकवेळेस सांगितले, ’’ विधवा आणि तलाकपीढित स्त्रीचा विवाह त्यांचे मत माहित होईपर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगीशिवाय होवू शकत नाही. (बुखारी व मुस्लिम). यावर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सोबती (रजि.) यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तीची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, तीचे मौन धारण करणे हीच तिची परवानगी समजण्यात येईल. जर एखाद्या स्त्रीच्या पालकाने तिचा विवाह केला व त्यास स्त्रीने या विवाहास मान्यता दिली नाही तर हा विवाह रद्दबातल ठरणार. माननीय खन्सा (रजि.) यांचा विवाह त्यांच्या मर्जीविरूद्ध वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी तो रद्दबातल ठरविला.
आपल्याला कोणी भेट वस्तू दिली तर काय होते? खूप आनंद होतो आणि भेट देणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात आपुलकी निर्माण होते. मग आपणही त्याला काही भेट द्यावी, असे वाटते. महेर एक सुंदर भेट आहे. जी पती आपल्या पत्नीला देतो. नवीन जीवनाची सुरूवात या प्रकारे एका सुंदर पद्धतीने होते.
’’ आणि स्त्रीयांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता’’ महेर हा केवळ स्त्रीचाच अधिकार आहे. शरियतद्वारे महेर किती असावे याची काही मर्यादा निश्चित केलेली नाही. ती माणसाच्या आर्थीक कुवतीच्या प्रमाणात कमी जास्त असू शकते. इस्लामने महिलांवर पैसा कमाविण्याची जबाबदारी अजिबात टाकली नाही. लग्नाआधी पिता व लग्नानंतर पती यांच्यावर तिच्या खर्चाची जबाबदारी टाकलेली आहे. घराचे काम करणे बंधनकारक नाही. उलट जर कोणती स्त्री ते करत असेल तर तर हे तीचे कुटुंब प्रमुखावर उपकार समजण्यात येईल व तिलाही पुन्य मिळेल. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य व संपत्ती बाळगण्याचा अधिकार तिला आहे. आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क आहे. हा अधिकार इस्लामने 1443 वर्षापूर्वी दिला. तर भारतात आपल्या घटनेद्वारे 1956 मध्ये तो महिलांना मिळाला.
स्त्रीच्या अब्रूवर दोन प्रकारे हल्ले होतात. एक तिच्यावर व्याभीचाराचा आरोप लावून तिच्यावर मानसिक हल्ला केला जातो आणि दूसरे म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून शारीरिक अत्याचार दिला जातो. आपल्या देशात दररोज साधारणपणे 77 बलात्काराच्या घटना होतात. एखाद्या स्त्रीवर व्याभीचाराचा आरोप सिद्ध झाला तर तिला 80 फटक्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. जबरी लैंगिक अत्याचार केल्यास बलात्काराला तो अविवाहित असेल तर 100 फटके व विवाहित असेल तर रजम म्हणजे दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा शरियतने दिलेली आहे. जी शिक्षा नैसर्गिक आहे. याचा अंदाज अनेक धर्मनिरपेक्ष लोकांनी याच शिक्षेची मागणी निर्भया, जैनब, डॉ. प्रियंका रेड्डी, आसिफा इत्यादींच्या वेळी केली होती. या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास बलात्काराचे प्रमाण निश्चित कमी होणार हे एक सत्य आहे. ज्या देशात या शिक्षेची अंमलबजावणी होते त्या देशाचे बलात्काराचे प्रमाण शुन्यवत आहे. प्रेषित सल्ल. यांच्या काळात तर एक महिला अंगभर सोन्याचे दागिने घालून प्रवास करीत होती. तेव्हा तिला जनावराव्यतिरिक्त कोणाची भीती नव्हती.
प्रेषित सल्ल. यांचे स्त्री जातीवर खूप उपकार आहेत. त्यांना अल्लाहच्या आदेशावरून जे बदल समाजामध्ये घडवून आणले त्याचे दूसरे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच मिळणार नाही.
घडस्फोटाला भयानक समजणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवे की, कोणत्याही दाम्पत्याच्या जीवनात अगदी शेवटच्या टोकाचा क्षण येतो. जेव्हा पती व पत्नीच्या स्वभावात अनुकूलता व समन्वय नसल्याने संसाराची गाडी चालविणे अवघड होते. दररोजच्या भांडणामुळे बळजबरीने एकत्र राहून जीवन नरकासारखे होते. तेव्हाच शरियतने घडस्फोटाची परवानगी दिली. जेणेकरून दोघांना वेगळे होवून नवीन जोडीदार निवडून शांतीने जगता यावे. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाबद्दल किती जरी लिहिले तरी मन भरत नाही एवढे त्यांचे उपकार आहेत. वाचकांनी त्यांच्या जीवनाबद्दल सखोल अभ्यास केल्याशिवाय, त्यांनी स्त्रीयांवर केलेले उपकार कळू शकत नाहीत. तरी माझी कळकळीची विनंती आहे की वाचकांनी प्रेषित सल्ल. यांच्या चरित्राचा खोल अभ्यास करावा. अल्लाह सर्व पुरूषांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून स्त्रीयांचे अधिकार देण्याची सद्बुद्धी देवो, आमीन.
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, कोणत्याही सत्कर्मास तुच्छ समजू नका. कुणाला रस्सीचा एक तुकडा दिला, एखादा खिळा दिला असेल, कुणाचे भांडे पाण्याने भरून दिले. आपल्या भावाशी आपुलकीने भेटणे किंवा त्यास नुसते जरी सलाम केला असेल तरी या सर्व गोष्टी सत्कर्म आहेत. प्रेषित नेकीची बरीच कार्ये आपल्या अनुयायींना सांगत असताना म्हणतात की तुमच्या हातून कसलेही सत्कर्म होत नसेल तर कमीतकमी कुणाला इजा पोहोचवू नका. असे करणेदेखील सत्कर्मच आहे. प्रेषितांना विचारण्यात आले की जर एखादा माणूस लोकांना लाजून एखाद्याच्या अंतिम यात्रेत सहभागी होत असेल तर त्याला मोबदला मिळणार का? प्रेषित म्हणाले, “त्यास दुप्पट मोबदला मिळेल. एक अंतिम यात्रेत सहभागी होण्याचा आणि दुसरा आपल्या गल्ली-मोहल्ल्यातील लोकांच्या भावनांचा विचार करून त्यात सहभागी झाल्याचा.”
नेकी ही आहे की अल्लाह, परलोक, पवित्र कुरआन, अल्लाहचे देवदूत आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा ठेवून आपल्या आवडीची संपत्ती आपल्या नातलगांना, गरजवंतांना, अनाथांना, प्रवाशांना आणि गुलामांना देणे. नमाज अदा करत राहाणे आणि जकात देणे, कुणाला वचन दिल्यास ते पूर्ण करणे ही सर्व नेकीची कर्मे आहेत. (संदर्भ – पवित्र कुरआन, २:१७७)
संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत.
जफर आदमी उसको न जानीएगा
हो वो कितना ही साहेबे फहम व जका
जिसे ऐश में यादे खुदा न रही
जिसे तैश में खौफ-ए-खुदा न रहा
जकाल ’’मानवी गरजां’’मध्ये लोकांच्या ’इच्छा-आकांक्षा’ ही सामील झाल्याने लोकांचे आर्थिक वर्तन बिघडले आहे. यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या असून, अनेक लोकांना अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा जणू मॅनिआच झालेला आहे. त्यामुळे बाजारात कृत्रिम मागणी वाढते आहे. रात्रंदिवस जाहिरातींचा मारा करून अशी मागणी सातत्याने वाढत राहील, याची काळजी कार्पोरेट जगताकडून घेतली जात असल्यामुळे आदर्श आर्थिक वर्तन कसे असावे, यावर विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.
संपत्ती गोळा करण्याची इच्छा
मुफलिसी हिस-ए-लताफत को मिटा देती है
भूक आदाब के सांचे में ढल नहीं सकती
प्रत्येक माणसाला संपत्ती गोळा करण्याची नैसर्गिक इच्छा असते. त्यासाठी तो रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो. त्यातून प्राप्त केेलेल्या संपत्तीचा उपयोग करण्यासाठी तो स्वतंत्र असतो. यातूनच माणसाचे आर्थिक वर्तन ठरत असते. मात्र वर म्हटल्याप्रमाणे आधुनिक काळात, ’’गरज’’ या शब्दात चंगळवादी इच्छा आकांक्षांची सरमिसळ झाल्यामुळे बाजाराचे मागणी आणि पुरवठ्याचे गणित सातत्याने बिघडत आहे. श्रीमंत माणसे वाट्टेल ती किंमत देऊन त्यांच्या मनाला येईल त्या वस्तू मग गरज असो की नसो खरेदी करत असतात. त्यामुळे गरजेच्या अनेक वस्तू विनाकारण महाग होत जातात. याचा परिणाम कमी उत्पन्न गटातील लोकांवर होतो. त्यांच्यापर्यंत त्या वस्तूही पोहोचणे दुरापास्त होवून जातात ज्या जीवनावश्यक असतात. जी गत वस्तूंची तीच गत अत्यावश्यक सेवांची. उदा. शिक्षण किंवा आरोग्य सेवा. संपत्ती कमावण्यावर कुठलेही नैतिक बंधन नसल्याकारणाने व कायदेशीर बंधन झुगारण्याजोगे असल्याकारणाने अनेक लोक भ्रष्ट मार्गाने अमाप संपत्ती कमावतात व त्यातून दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा खरेदी करतात. साहजिकच मग या दोन्ही जीवनावश्यक सेवा कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या हाताबाहेर जातात आणि ’आहे-रे’ आणि ’नाही-रे’ या दोन सामाजिक गटातील दरी अधिकाधिक रूंद होत जाते.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या विषमतेवर उपाय नाही. म्हणूनच जगात दिवसागणिक विषमता वाढत आहे. श्रीमंतांची डोळे दिपवणारी आर्थिक वर्तणूक पाहून गरीबांची मानसिक स्थिती बिघडत आहे. त्यातूनच गुन्हेगारीचा जन्म होत आहे. म्हणूनच आज संघटितरित्या केली जाणारी गुन्हेगारी आधुनिक जगाची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. ’गन कल्चर’ वाढत आहे. माणसं किड्यामुंग्यासारखी मारली जात आहेत. नैतिकता रसातळाला जाऊन पोहोचली आहे. अमाप संपत्तीतून राजकीय पदे व प्रसंगी न्याय खरेदी करून स्वतःला मजबूत करण्यात श्रीमंतांना यश मिळत असल्याने लायक परंतु गरीब लोकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे.
आर्थिक वर्तणुकीचे इस्लामी नियम
भूक में इश्क की तहेजीब भी मिट जाती है
चाँद आकाश में थाली की तरह लगता है
नवश्रीमंतांच्या चमकदार चंगळवादी जीवन शैलीपासून नैसर्गिकरित्या गरीबांना इर्ष्या होत असते. त्या इर्षेतून जागतिक स्तरावर गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक वर्तन बिघडल्या कारणाने सर्वत्र आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झालेले आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये यावर उपाय नाही. उलट हे आर्थिक वर्तन बिघडण्यासाठी हीच व्यवस्था कारणीभूत असल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. माणसाची आर्थिक वर्तणूक नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक व्यवस्था कुरआनमध्ये दिलेली आहे. परंतु हा एवढा दुर्लक्षित विषय आहे की, बहुसंख्य मुस्लिम लोकांमध्ये सुद्धा यासंबंधीची पुरेशी जागरूकता नाही.
कुरआनच्या शिकवणींचा सार असा आहे की, पृथ्वीच नव्हे तर सर्व सौर मंडलाचा मालक ईश्वर आहे. त्यातील सर्व संपत्तीचा मालक ईश्वर आहे. माणसं जन्माला येतात आणि आपल्या ईश्वरदत्त कौशल्यातून त्या ईश्वरीय संपत्तीचा काही भाग हस्तगत करतात त्याचा वापर करतात व सर्व संपत्ती येथेच ठेवून मरून जातात. कुरआनने माणसाच्या संपत्ती कमावण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत व खर्च करण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत. हे प्रतिबंध, ’’हलाल आणि हराम’’ या सज्ञेच्या माध्यमातून जगाला परिचित आहेत. कुरआनमध्ये हराम गोष्टी कोणत्या आहेत याची यादीच दिलेली आहे. त्या वगळता बाकी सर्व गोष्टी हलाल आहेत. इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा हा पहिला नियम आहे. कुरआनमध्ये असे म्हटलेले आहे की, ’’आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले आणि तुमच्यासाठी तेथे जीवनसामुग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता.’’ (सुरे आराफ : आ.क्र.10)
या आयातीच्या शब्दरचनेवर गांभीर्याने विचार केला असता खालील गोष्टींचा बोध होतो. यात सुरूवातीलाच ईश्वराने मानवाला संबोधित करत म्हटलेले आहे की, आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले. याचा अर्थ मूळ अधिकार माणसाचे नसून ते ईश्वराने प्रदान केलेले आहेत. स्पष्ट आहे मुळात अधिकार ज्याने प्रदान केलेले आहेत त्याच्याच मर्जीप्रमाणे त्या अधिकारांचा वापर केला जावा. तसा तो केला जात नसेल तर यात माणसाचा कृतघ्नपणा दिसून येतो. म्हणून आयातीच्या दूसऱ्या भागामध्ये ईश्वर म्हणतो की आम्ही तुम्हाला अधिकार दिले पण तुम्ही लोक माझ्याप्रती कमी कृतज्ञ आहात. म्हणजे या ठिकाणी ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. फार महत्त्वाचे मत नोंदवितात ते खालीलप्रमाणे,
’’ इन्सान को दुनिया में जिंदगी बसर करने के लिए जिस हिदायत व रहेनुमाई की जरूरत है, अपनी और कायनात की हकीकत और अपने वजूद की गर्ज व गायत समझने के लिए जो इल्म उसे दरकार है, और अपने अख्लाक (चांगल्या सवयी), तहेजीब (सभ्यता), मुआशरत (सामाजिक) और तमद्दुन (संस्कृती) को सही बुनियादों पर कायम करने के लिए जिन उसूलों का वो मोहताज है, उन सबके लिए उसे सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन को अपना रहेनुमा तस्लीम करना चाहिए और सिर्फ उसी हिदायत की पैरवी (अनुसरण) इख्तीयार करनी चाहिए जो अल्लाहने अपने रसूलों के जरीये से भेजी है. अल्लाह को छोडकर किसी दूसरे रहेनुमा की तरफ हिदायत के लिए रूजू करना और अपने आपको उसके रहेनुमाई के हवाले कर देना इन्सान के लिए बुनियादी तौर पर एक गलत तरीकेकार है. जिस का नतीजा हमेशा तबाही के सूरत में निकला है और हमेशा तबाही की सूरत ही में निकलेगा.’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन : खंड 2, पान क्र . 7, अनुच्छेद क्र. 4).
या आयातीचा अर्थ असाही घेतला जाऊ शकतो की, जीवन जगण्यासाठी ईश्वराने मानवाला जे अधिकार आणि वस्तू प्रदान केलेले आहेत ही त्याची केवळ, ’’कृपा’’ आहे. म्हणून त्यांचा वापर आवश्यक तेवढा व न्याय पद्धतीने करावा, असे केल्यास कोणालाच कधीही कसल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. परंतु भ्रष्ट पद्धतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी जी पद्धत जागतिक स्तरावर रूढ झालेली आहे व भांडवलशाही ने त्या पद्धतीला वैधता प्रदान केेलेली आहे त्यातून माणसाचे आर्थिक वर्तन बिघडले असून, त्याची शिक्षा माणसाला या जीवनातही मिळणार व मरणोपरांतही मिळणाार एवढे नक्की. चुकीच्या सामाजिक आणि आर्थिक वर्तनातून जगामध्ये जी अव्यवस्था माजलेली आहे त्यामुळे, ’’नाही रे ची’’ जी हानी होत आहे तिची भरपाई संसाधनांचा दुरूपयोग करणाऱ्यांनाच करावी लागणार आहे. म्हणूनच आपण पाहतो भ्रष्ट मार्गाने अनेकजण गडगंज संपत्ती कमवूनही समाधानी व आरोग्यदायी जीवन जगताना दिसून येत नाहीत. उलट मृत्यूपरांत जीवनामध्ये सुद्धा त्यांना ईश्वरासमोर खजील व्हावे लागेल. तो त्रास वेगळाच. कारण ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा दूसरा नियम आहे. न्याय एक असा ईश्वरी गुण आहे ज्याला माणसाच्या प्रवृत्तीमध्येच ईश्वराने सामील केलेले आहे. म्हणूनच माणसाला न्याय आवडतो व अन्यायाची चीड येते. यावरूनच वाचकांच्या लक्षात एक गोष्ट येईल की जगात चुकीचे आर्थिक व सामाजिक वर्तन करून ज्यांनी संपत्तीच्या बळावर येथून कशीबशी सुटका जरी करून घेतली तरी मरणोपरांत त्यांची गाठ ईश्वराशी आहे, हे सत्य कोणालाच नाकारता येण्यासारखे नाही. कारण जीवनापेक्षा जास्त शास्वत सत्य मृत्यू आहे.
आर्थिक वर्तणुकीचा तीसरा सिद्धांत वैध मार्गाने संपत्ती कमाविणे आहे. हे प्रत्येकावर फर्ज (अनिवार्य) आहे. त्यामुळे योग्यता असूनही जर कोणी वैध मार्गाने काम न करता निरूद्देश जीवन जगत असेल तर तो ही ईश्वराच्या नजरेत गुन्हेगार आहे आणि आपल्या, ’’योग्यते’’चा दुरूपयोग करून भ्रष्ट पद्धतीने जीवन जगत असेल तर तो ही गुन्हेगार आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’ मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादाचा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त होईल.’’ (सुरे जुमआ : आयत नं. 10)
या ईश्वरीय आदेशातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक अजानची आवाज झाल्याबरोबर मुस्लिमांनी आपल्या सर्व व्यावसायिक गतीविधी तात्काळ थांबवायला हव्यात व नमाजसाठी मस्जिदीकडे जावयास हवे. याचा अर्थ व्यावसाय करणे आवश्यक आहे मात्र नमाज सोडून व्यावसाय करणे प्रतिबंधित आहे. जरी यात शुक्रवारचया नमाजाचा विशेष उल्लेख आहे तरी अजान होताच व्यवसाय थांबविण्याचा हा आदेश सर्वच नमाजांसाठी लागू असल्याचे मत इस्लामी विद्वानांचे आहे. हा आर्थिक गतीविधींचा चौथा सिद्धांत आहे. आपल्या कुवतीप्रमाणे संपत्ती गोळा करण्यासाठी काम धंदा करणे, व्यावसाय करणे हे प्रत्येकावर अनिवार्य करण्यात आले आहे. याचा दूसरा अर्थ असा जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा त्याग करणे (संन्यास घेणे) हराम आहे. तसेच जीवनावश्यक संसाधने गोळा करण्यामध्ये कुचराई करणे हे सुद्धा ईश्वराला नापसंत आहे. म्हणून मुस्लिमांमधील एक वर्ग जो जीवनावश्यक आर्थिक गतिविधींपेक्षा धार्मिक गतिविधींनाच अधिक महत्त्व देतो. त्याचे वर्तनही या आयातीमध्ये नमूद ईश्वरीय आदेशाविरूद्ध आहे. थोडक्यात माणसाची आर्थिक वर्तणूक ही संतुलित असावी. आर्थिक संसाधने गोळा करताना ईश्वर आणि त्याच्या आदेशांची हर हाल जपणूक केली जावी. संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत. हा इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा पाचवा नियम आहे. थोडक्यात आर्थिक वर्तणुकीच्या ईश्वरीय नियमांचा परिचय देशबंधू तसेच बिगर इस्लामी जगाला करून देण्याची मुख्य जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे. दुर्दैवाने मुस्लिम समाजातील बहुतेकांचे स्वतःचेच आर्थिक वर्तन या नियमांउलट असल्याने एवढ्या सुंदर व्यवस्थेचा परिचय आज जगाला नाही. म्हणून ही योग्य वेळ आहे, आता मुस्लिमांनी आपल्या वर्तनात सुधारणा करून ईश्वराला अपेक्षित आर्थिक वर्तणुकीच्या नियमांचा सर्वांना परिचय करून द्यावा. त्याशिवाय, आर्थिक शिस्त राखली जाणार नाही व आर्थिक शोषण कमी होणार नाही. पर्यायाने ’नाही रे’ गटातील शोषण असेच सुरू राहील. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आमचे आर्थिक धोरण तुला आवडत असलेल्या नियमांप्रमाणे सुधारण्याची व जगाला त्याचा परिचय करून देण्याची संधी व शक्ती प्रदान कर.’ आमीन.