Latest Post

इस्लामला अभिप्रेत खरी नमाज कोणती आहे. प्रत्येकजण जो माणसासारखा दिसतो तो खऱ्या अर्थाने मनुष्य नसतो. त्याच प्रमाणे नमाज सारखी दिसणारी प्रार्थना ही खरी नमाज आहे असे नाही. नमाज जी अल्लाहने दिलेली आहे आणि जे स्तंभ नव्हे तर अत्यंत महत्त्वाचे इस्लामचे स्तंभ आहे, तिला पूर्णपणे तिच्या स्वरूपात औचित्यपूर्ण अदा करणे आवश्यक आहे. नमाजला व्यवस्थित अदा करण्यासाठी कुरआनने एक विशिष्ट शब्द वापरला आहे. ‘इकामत’ याचा अर्थ होतो सरळ उभे राहणे. हा शब्दप्रयोग (इकामत) कुरआन आणि हदीसीमध्ये अनेक वेळा आलेला आहे. नमाज त्याच्या बाह्य शिष्टाचारानुसार आणि अंतरंगातील गुणांनुसार अदा करणे आवश्यक आहे. याबद्दलचा तपशील दिव्य कुरआन, हदीसी आणि धर्मग्रंथातून सहज प्राप्त होतो. म्हणून मान्यताप्राप्त नमाज ती आहे, ज्यास तिच्या वेळेत सामुदायिकरित्या अदा केली जाते. ही नमाज तिच्या आकर्षकपणामुळे, शिस्तबध्दतेमुळे आणि एकाग्रतेमुळे ओळखली जाते. अशा नमाजमध्ये पाठांतर हळूहळू केले जाते आणि प्रत्येक भाग म्हणजे उभे राहणे, वाकणे, नतमस्तक होणे इ. अधिक अधिक वेळ घेतात. ही नमाज ती प्रार्थना आहे ज्यात अल्लाहचे स्मरण भरभरून असते आणि अल्लाहबद्दलचा आदर नितांत भरलेला असतो. ही ती प्रार्थना नमाज असते ज्यात व्यक्ती अल्लाहची नितांत कदर आणि परम आदरशीलतेचा मूर्त स्वरूप बनते. अशी व्यक्ती अल्लाहच्या भीतीने आणि स्वतःच्या तुच्छ दर्जाच्या विचारांनी भरलेली असते. अशा प्रकारची नमाज हीच खरी नमाज म्हणून ओळखली जाते. या गुणांमध्ये जी नमाज जास्तीतजास्त उच्च दर्जाची असेल तशी ती नमाज त्याप्रमाणे मान्यताप्राप्त म्हणून ओळखली जाते. या गुणांपैकी एखाद्या नमाजमध्ये ज्यांचा काहीच लवलेश नसेल तर ती नमाज बाह्यरूपी असते. तिचे आध्यात्मिक दृष्टीने काहीच महत्त्व नसते. अशी नमाज फायदेशीर नसून इस्लामचे तथा श्रध्देचे स्तंभसुध्दा तिला संबोधणे चुकीचे आहे. ती नमाज म्हणजे वाळूची भिंत आहे.
वर नमूद केलेले नमाजचे आकर्षक गुण आणखी वैशिष्टपूर्ण आहे. त्या गुणांचा उपयोग आपल्या नमाजचे मूल्यमापन करण्यासाठी होतो. आपण यावरून आपली स्वतःची नमाज कोणत्या स्वरूपाची आहे हे ठरवू शकतो. आपण जेव्हा जेव्हा आपल्या नमाजचे आत्मपरीक्षण करतो तर आपण या निष्कर्षापर्यंत सहज पोहोचू शकतो की आपली नमाज त्या दर्जाची आहे का जिला इस्लामचे आणि इस्लामी श्रध्देचे स्तंभ संबोधले गेले आहे? जर तुमचे मन ग्वाही देत असेल हो म्हणण्यासाठी, तर मग पुढे काय?

जगातील लोक कोणत्या ना कोणत्या धर्माचा स्वीकार करतात, मात्र त्यांना विश्वनिर्मात्याबाबत योग्य ते ज्ञान प्राप्त नसते व त्यांच्या आराधनेचा मार्गही योग्य नसतो. इस्लामच असा एकमेव धर्म आहे जो विश्व व मानवजातीची निर्मिती करणाऱ्या ईश्वराचे खरे स्वरुप एकेश्वरवादाद्वारे प्रस्तुत करतो. इस्लाम योग्य ते आचरणाचे पाठ देतो. त्यामुळे मुस्लिमांना जगात विशेष स्थान प्राप्त होते. मुस्लिम केवळ एकाच सर्वशक्तिमान ईश्वराची उपासना करतात. म्हणूनच त्यांची समाजात वेगळीच छाप पडते. मात्र ही अत्यंत विचित्र व खेदजनक बाब आहे की, मुस्लिम आपल्या विशेष सामाजिक स्थानाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी स्वतःला फार मोठ्या ईश्वरीय कृपेपासून वंचित करून घेतले आहे. एकेश्वरत्व समजून घेणे व आपल्या अपत्यांना समजावून देऊन त्यांचे मन एकेश्वरवादाच्या ज्ञानाने प्रकाशित करणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत हे मौलिक ज्ञान प्राप्त होत नाही, इतर कोणत्याच उपायाने मानवी आचार-विचार सुधारणार नाहीत.
‘तौहीद’ म्हणजे केवळ ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे असा अर्थ होत नाही. जगात असा कोणताच समाज नव्हता व आजही नाही जो ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करतो. जगात फार पूर्वीपासून नास्तिक अस्तित्वात आहेत. रशियाचे नास्तिकत्व तर सर्वांना माहीतच आहे. पण रशियाचे नास्तिक शासक एक पंचमांश नागरिकांनासुद्धा ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करण्यास राजी करू शकले नाहीत. आश्चर्य म्हणजे ते गेले चाळीस-पन्नास वर्षे नास्तिकतेचा प्रचार करीत आहेत व या प्रचारासाठी शक्ती व संपत्तीचा बेछूट व्यय करीत आहेत. गंमतीची गोष्ट अशी की, मागच्या जागतिक युध्दात जेव्हा जर्मन फौजा विजयी होत रशियात शिरु लागल्या तेव्हा स्टालिनने स्वतः जनतेस आवाहन केले की, मस्जिद व चर्चमध्ये जाऊन ईश्वराची प्रार्थना करा की, त्याने आमची रक्षा करावी. याचाच अर्थ असा की, जे लोक ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करतात, तेच वेळ पडल्यास ईश्वरासमोर हात पसरून दयेची याचना करतात. सारांश मानव कधीही ईश्वराच्या अस्तित्वाचा इन्कार करू शकला नाही.
‘तौहीद’ (एकेश्वरत्व) म्हणजे एकमेव ईश्वराचीच उपासना करणे असे होते. जगातील कोणताही समाज सर्व शक्तींना (आराध्यांना) ईश्वर मानत नाही. भारतातील अनेकेश्वरवादी परमात्मा हाच ईश्वर आहे असे मानतात. भूतकालीन झरतुश्ती (इराणी अग्निपूजक) ईश्वर एक आहे असे मानत असत. कुरआन मक्कावासी अश्रध्दावंताना विचारतो की, त्यांना कोणी जन्म दिला ? ते उत्तर देतात ‘ईश्वराने !’ त्यांना पुन्हा विचारले जाते की, धरती व आकाश कोणी निर्माण केले ? ते पुन्हा म्हणतात, ‘ईश्वराने!’ पुरातन कालापासून आजपर्यंत माणूस दिशाभूल करणाऱ्यांमुळे गोंधळला गेला आहे. सर्वांना माहीत आहे की, ‘ईश्वर एक आहे’, तरीही ते अनेक शक्तींची (ईश्वरांची) पूजा करण्याची चूक करीत असतात.

अबु शरीह खजाही (र.) म्हणतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘कुरआनची एक बाजू तर ईश्वराच्या हाती आहे, आणि   दुसरी बाजू तुमच्या हाती आहे. तेंव्हा कुरआनास मजबूतीने धरल्यास, तुम्ही सरळ मार्गापासून कधीच भटकणार नाहीत. तसेच नष्ट पण होणार नाहीत.’’ (हदीस – तऱगीब व तरहीब) 

भावार्थ
ही ‘हदीस’ ‘वाअतसिमु बि हब्लिल्लाही जमीआ’ (ईश्वराच्या दोरीस मजबूतीने पकडा) चे उत्तम वर्णन आहे. अल्लाहने त्याच्या ग्रंथास ‘हब्लिल्लाह’ म्हंटले आहे, म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचणे, त्याची प्रसन्नता मिळविणे आणि वर्तमान जग व परलोक, दोन्हीमध्ये त्याची कृपा मिळविण्याचे एकमेव साधन कुरआन हेच आहे.

रमजानचे रोजे आणि तराविह
माननिय अबु हुरैरा (र.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने रमजान महिन्याचे रोजे (उपवास) फर्ज (अनिवार्य) केलेत, आणि मी स्वत:  तुमच्याकरीता ‘तरावीह’च्या नमाजची तजवीज केली. अर्थात जे लोक रमजानचे रोजे धरतील आणि तरावीहची नमाज श्रद्धापूर्वक आणि पारलौकीक मोबदल्याच्या उद्देश्याने पढतील, ते  लोक त्यांच्या पापापासून असे पवित्र होतील जणू ते आजच जन्मलेत व त्यांच्यावर कोणतेही पाप नाही.’’ (संदर्भ : तरगीब)

भावार्थ
उपरोक्त हदीसमध्ये ‘कयाम’चा शब्दप्रयोग झाला ज्यापासून तरावीहची नमाज अभिप्रेत आहे. जो कोणी मोमीन (श्रद्धावंत) असेल व पुण्यकर्माच्या उद्देश्याने रोजा आणि तरावीह नमाज, हे  दोन्ही कर्म रमजानमध्ये करेल, त्याचे सर्व पाप (गुन्हे) धुतले जातील. मात्र मानवांचे व इतरांचे जे आपणांवर अधिकार आहेत (हुकुकूल इबाद) ज्याची आपणाकडून पायमल्ली होण्याचे  पातक घडले असेल, ते मात्र अधिकार दिल्याशिवाय, हे पातक माफ होणार नाही. कमीत कमी ज्याचा हक्क आपण गिळंकृत केला आहे, त्याने स्वखुषीने तो माफ करावा.

रमजानचे महत्त्व

ह. सलमान फारसी (रजी.) द्वारे उल्लेखित आहे की शाबान महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी प्रवचन दिलं. प्रेषित म्हणाले, ‘‘हे लोकांनो! एक मोठा महान  समृद्धशाली महिना (रमजान) जवळ येऊन ठेपला आहे. तो असा महिना आहे की, ज्यामध्ये एक रात्र हजार महिन्यापेक्षा उत्तम आहे सर्वश्रेष्ठ अल्लाहने या रमजानमध्ये रोजा राखणे  फर्ज कर्तव्य ठरविले आहे. तसेच या रमजानच्या रात्रीमध्ये तरावीह नमाज पढणे नफ्ल (अनिवार्य नसलेले) ठरविले आहे. (अर्थात ‘सुन्नत’ आहे, ज्यास अल्लाह पसंत फर्मावितो). जो  मनुष्य या महिन्यात एखादे सत्कर्म आपल्या राजीखुषीने करेल तर रमजानव्यतिरिक्त इतर महिन्यातील फर्ज अदा केल्याप्रमाणे आहे. जो या महिन्यात फर्ज अदा करेल तर रमजान  व्यतिरिक्त इतर महिन्यातील फर्जपेक्षा सत्तरपट फर्ज अदा केल्याचे पूण्य लाभेल. रमजान हा धीर, संयमाचा महीना आहे. सब्र (सबूर) चा मोबदला जन्नत आहे. हा महिना गोरगरीब व  गरजवंत लोकांशी सहानुभूती दाखवण्याचा महिना आहे. (हदीस - मिश्कात)

भावार्थ
‘धीर संयमाचा महिना’ म्हणजे श्रद्धावंतांला अल्लाहच्या मार्गात अढळ राहण्याचे व आपल्या इच्छा अभिलाषांवर काबू प्राप्त करण्याचे प्रशिक्षण या महिन्यात दिले जाते. मनुष्य ठराविक  वेळेपासून, दुसऱ्या ठराविक वेळेपर्यंत सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या आदेशानुसार न खातो, न पितो, ना आपल्या पत्नीशी सहवास करतो. अशाने त्याच्या अंगी अल्लाहची आज्ञापालनाची सवय निर्माण होते. अशाने मनुष्य अभ्यस्त होतो की प्रसंग पडल्यास तो आपल्या भावना, इच्छा, तहान व भुकेवर किती नियंत्रण राखू शकतो. जगात श्रद्धावंताचे उदाहरण युद्धभूमीवरील  सैनिकासमान आहे. ज्याला सैतानी इच्छा, अभिलाषा (अपप्रवृत्ती) आणि दुराचारी शक्तीशी लढावयाचे आहे. जर त्याच्या अंगी संयमाचा गुण नसेल तर हल्ल्याच्या सुरूवातीलाच तो  स्वत:ला शत्रुच्या हवाली करील.

दिवाळी हा भारतीय उपखंडात साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण. अगदी दिवाळी एवढेच महत्त्व मुस्लिम बांधव रमजानला देतात. पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वीपासूनच  सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. रमजान हे हिजरी कालगणनेतील नवव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे स्थान अगदी तसेच  रमजानला हिजरी कालगणनेत महत्त्व दिले गेले आहे. हिजरी कालगणना संपूर्णत: चांद्रभ्रमणावर अवलंबून आहे. म्हणून हिजरीतील महिना हा चंद्रदर्शनावर बदलत असतो. चंद्रदर्शनानेच  रमजानची सुरवात होते. ‘चांद नजर आ गया...’ असं म्हणत प्रत्येक जण एकमेकाला शुभेच्छा देतो. इस्लामचे कलमा, नमाज, रोजा, हज आणि जकात हे पाच प्रमुख घटक (अरकान)  आहेत. कलमा हा महामंत्र जपाप्रमाणे सदोदित म्हणत राहिले पाहिजे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली पाहिजे, तर वर्षातून एक महिना उपवास (रोजा) ठेवायला हवे. आर्थिक  सक्षम व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा हज करावा तर ज्याची आर्थिक संपत्ती चांगली आहे त्याने गरजवंताला वेळोवेळी दान देत राहिलं पाहिजे. असे या अरकानांचे महत्त्व सांगितले  आहे.
दररोज पाचवेळा नमाज अदा करण्याचा इस्लाममध्ये आदेश आहे. रात्रीची  नमाज ‘इशा’ म्हणून ओळखली जाते. या इशाच्या नमाजसोबत रमजान महिन्यात जास्तीची २० रकात नमाज  अदा करावी लागते. तिला तरावीह असे म्हणतात. या नमाजमध्ये इमाम (नमाजचे नेतृत्व करणारा) कुरआनच्या श्लोकांचे (सूरहचे) सलग पठण करतात. अशा प्रकारे प्रत्येक  मुस्लिमाच्या कानावर वर्षातून किमान एक वेळा कुरआनचा पवित्र संदेश पडत असतो. प्रत्येक मस्जिदीमध्ये तरावीहच्या नमाजची विशेष व्यवस्था केली जाते.
‘रोजा’ हा रमजानचा आत्मा होय. रोजा म्हणजे उपवास असा ठळक अर्थ आपल्याला घेता यईल. पण उपवास एवढा मर्यादित अर्थ रोजाचा नाही. जो कोणी रोजा म्हणजे फक्त उपवास  असा मोघम अर्थ घेऊन रोजा ठेवत असेल त्याला अल्लाह फक्त ‘फाका’ (उपाशी राहणे) मानेल. रोजा ही एक जीवनपध्दती आहे. ती एक आचारसंहिता आहे. रमजान एक प्रशिक्षण  आहे. जगावे कसे? वागावे कसे? सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे असावे? याचा घालून दिलेला वस्तूपाठ म्हणजे रमजान. माणूस जीवन जगत असताना बराच वेळा बिनधास्त  होऊन जगत असतो. या बिनधास्त जगण्याला वेसण घालणे म्हणजे रमजान होय. देशाचा सैनिक जसा अतिशय कठीण प्रशिक्षणातून स्वत:ला सिध्द करीत असतो अगदी तसेच  इस्लामचे आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती या वार्षिक प्रशिक्षणातून तावून सुखावून निघावा आणि एक चांगला माणूस म्हणून त्याने जीवन जगावे अशी यामागे धारणा आहे.
रोजा धारण करणे म्हणजे त्या दिवसापुरती एक आचारसंहिता स्वीकारणे होय. त्यासाठी भल्या पहाटे उठून न्याहरी करावी लागते. त्याला सेहरी म्हणतात. सेहरीचा थेट संबंध सूर्योदयाशी  असतो. सुर्योदयापूर्वी काही काळ आधी सेहरी समाप्त करावी लागते. सेहरी संपली की सूर्यास्तापर्यंत खाणेपिणे बंद असते. दिवसभर रोजा ठेवणाऱ्यांना केवळ खाणेपिणे थांबविणे एवढेच  नव्हे तर आपल्या आचरणात मूलभूत बदल करावे लागतात. जसे वाईट पाहू नये, वाईट बोलू नये, वाईट करु नये. शिव्या देऊ नये. भांडण करु नये. एकमेकांची चुगली करु नये. चुकीचे, फसवणुकीचे व्यवहार करु नये. सत्कृत्य मात्र जरुर करावे असे सांगणारी आचारसंहिता म्हणजे रोजा होय. रोजाच्या शेवट ‘इफ्तार’ने होतो. इफ्तार सूर्यास्तानंतर लगेचच करावा  लागतो. या वेळी खजूर खाऊन उपवासाचे पारणे करतात. सायंकाळची म्हणजेच मगरिबची नमाज अदा करुन अन्न सेवन करता येते.
या वर्षीचे रोजे हे परीक्षा पाहणारेच आहेत. सर्वाधिक काळ अन्न व पाण्याविना या वेळी रोजेदारांना राहावे लागणार आहे. यावर्षी तब्बल पावणे पंधरा तास उपवासात राहावे लागले. दर  वेळी १३ ते १४ तास उपवासाचा काळ असतो. या वर्षी रमाजान महिना मे आणि जून महिन्यात वाटला गेला आहे. २१ जून या वर्षातल्या सर्वात मोठ्या दिवसाच्या पूर्वी रमजान महिना  आल्याने रोजे तब्बल १४ तास ४५ मिनिट एवढ्या दीर्घकाळ चालत आहेत. त्यातल्या त्यात या वर्षीचा कमी पाऊस, वाढलेली गर्मी, तापते ऊन यामुळे या वर्षीचा रमजान खऱ्या अर्थाने  परीक्षा घेणाराच ठरला आहे. १४ तास ४५ मिनिटे हा उपवासाचा कालावधी ही एक दोन दिवस नव्हे तर तब्बल १९ दिवसपर्यंत कायम असणार आहे. ७ मे ते ५ जूनपर्यत दीर्घ रोजे सुरु  राहतील. यापूर्वी १९७९ साली असे दीर्घ रोजे आले होते. ४० वर्षांपूर्वी आलेले जून महिन्याचे रोजे पुढील वर्षीही एप्रिल आणि मे महिन्यात येतील. दरवर्षी रमजान गेल्या वर्षीच्या १०   दिवस आधी येतो. अशा प्रकारे १० दिवसाने रमजान मास दरवर्षी मागे सरकतो. त्यामुळे कुण्या एका विशिष्ट ऋतुपुरता मर्यादित न राहता रमजान वर्षाच्या प्रत्येक महिन्यात, प्रत्येक  ऋतुत अनुभवता येतो. जसा तो सध्या उन्हाळ्यात येतो आहे तसा तो पुढे काही वर्षांनी थंडीतसुध्दा असेल आणि त्याही पुढे काही वर्षांनी तो पावसाळ्यात पण यईल. ३५ ते ४०  वर्षांनी  रमजानचे हे चक्र पूर्ण होते. प्रत्येक महिन्यात आणि प्रत्येक ऋतुत रमजानचे असे फिरणे हे त्याचे अद्वितीय असे वैशिष्ट्य होय.
रमजानमधील सर्वांत महत्त्वाची आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण शिकविणारी गोष्ट म्हणजे जकात होय. जकात म्हणजे ‘टॅक्स’. तुम्हाला समाजात जगायचे असेल तर  समाजातील बऱ्यावाईट प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल अशी शिकवण रमजान देतो. समाजातील प्रत्येक लहानमोठा घटक समजासाठी महत्त्वाचा असून समाजातील  लहानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी समाजातील मोठ्यांची असते असा स्पष्ट आदेश कुरआनात आहे. येथे लहान, मोठे हे शब्द आर्थिक स्थिती दर्शविणारे आहेत. म्हणजेच समाजातील गरीबांचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी अल्लाहने श्रीमंतावर टाकली आहे. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २.५ टक्के जकात काढण्याचा  स्पष्ट आदेश कुरआनात आहे. आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करुन शिल्लक असलेल्या सोने, चांदी, रुपये वा इतर मालमत्तेवर अडीच टक्के जकात लावली जाते. ही जकात कपडे,  अन्नधान्य, रुपये वा खाण्यापिण्याच्या वस्तू या रुपात वाटता येते. किंबहुना ती वाटावीच लागते. आपल्यापेक्षा गरीब नातेवाईक, शेजारी वा गरजवंताला अशी जकात वाटप केली जाते.  जकात ज्याला दिली जाते त्याचा धर्म, लिंग, जात असा कोणताही भेद न मानता गरजवंताला ती दिली जाते.
अशा प्रकारे खऱ्या अर्थाने सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचे कार्य पवित्र रमजान करीत असतो. रमजान ईदने या पवित्र पर्वाचा शेवट होतो. हा गोड शेवटच परत पुढील रमजानसाठी  लोकांना तयार करीत असतो. शिरखुर्मा हा विशेष पदार्थ या वेळी बनविला जातो. तसेच रमजान महिन्यात इफ्तार तसेच सेहरीचे आयोजन अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या केले जाते.  चला, आपणही अशाच इफ्तार किंवा सेहरीत सहभागी होवू या. त्या निमित्ताने आपल्या मुस्लिम मित्राकडून रमजान व इस्लाम समजून घेऊ या...!

- आमीन चौहान
यवतमाळ, ९४२३४०९६०६

’’माझ्या एका पेशंटचा सुंदर बुरखा पाहून मी तिला विचारले, ’ कुठे ग घेतला हा बुरखा?’ ती म्हणाली, ,’ मी ज्यांच्या घरी घरकाम करते त्यांनी मला बुरखा हा भेट म्हणून दिला आहे.  मी हा बुरखा जीवापाड जपते. हा बुरखा माझ्या गरिबीस श्रीमंताचे रूप देतो, माझी लाज राखतो.’ तिच्या या उत्तराने मी भारावून गेले. डोक्यात विचारांचे अनेक चक्रे फिरली आणि मी  तिलाच माझ्यासाठीही तुझ्याच सारखा एक बुरखा आण असे सांगितले. आज या बुरख्यामुळे मी दिवसाचे दोन तास ज्यादा विधायक कार्यासाठी खर्च करू शकते.

प्रत्येक धर्माची धारणा, शिकवण व जीवनपद्धत मानवी प्रवृत्तीस अनुकूल अशी असते. इस्लाम हा एक शक्तीशाली धर्म आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रियांची एक  महत्त्वाची भूमिका असते. इस्लामने पुरूषांसह स्त्रियांच्या उन्नतीवर भर दिला आहे. स्त्रियांचे सगळे प्रश्न पुरूष सत्तेने निर्माण केलेले प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये मुस्लिम स्त्रीचा बुरखा  जसा येतो तसाच घुंघटही येतो. जसा तलाक येतो तसा बाईला न सांगता सोडून देणे हे ही येते. सगळ्या धर्मावर पुरूषांचा कब्जा असल्यामुळे धर्मांनी स्त्रीला दिलेल्या स्वातंत्र्याचा संकोच  पुरूषसत्ता आपापल्या सोयीने करत असते. ’हिजाब’ हा अरबी शब्द आहे. त्याचे उर्दू भाषांतर ’परदा’ असे आहे. हिजाब हा शब्द कुरआनोक्तीतून घेण्यात आला आहे. त्या आयातीत  अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या घरात निःसंकोचपणे ये-जा करणाऱ्यांना मनाई केली आहे. घरातील महिलांकडून काही हवे असेल तर ते पडद्याआडून मागावे असे आदेश देण्यात  आले आहेत. याच आदेशाच्या अनुषंगाने बुरखा पद्धत अस्तित्वात आली आहे. तद्नंतर बुरख्या संबंधात आलेल्या इतर आदेशांना बुरख्याचे आदेश (अहकामे हिजाब) असे संबोधण्यात  आले आहे.
नश्तर मेडिकल कॉलेज मुलतान येथे ऑल इंडिया इंटरकॉलिजिएट चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चे चा विषय होता, बुरखा देशाच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे का?  या चर्चासत्रात सर्वोत्तम पारितोषिक मिळालेल्या श्रीमती सय्यद परवीन रिजवी यांचे विचार मला येथे मांडावेसे वाटतात. या चर्चासत्रात उपस्थित श्रोत्यांची मते आजमावण्यात आली  आणि लक्षात आले की, 99 टक्के लोकांनी बुरखा पद्धतीच्या पक्षात मतदान केले आहे.
श्रीमती सय्यदा परवीन म्हणतात, ’बुरख्या बाबतचा तपशिलवार वर्णन कुरआनच्या चोवीस व तेहतीस या दोन अध्यायात (सूरहमध्ये) दिले गेले आहे. ज्यात म्हटले आहे की, महिलांनी  आपल्या घरात मोकळेपणाने व थाटाने वावरावे. इस्लाम धर्माच्या प्रसारापूर्वीचे असभ्य राहणीमान सोडून द्यावे व नटून थटून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करत फिरू नये. संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्त्र धारण करावे. पुरूषांना पवित्र कुरआनने आदेश दिला आहे की, त्यांनी आपल्या आई,बहिणीच्या खोलीत जाताना परवानगी घ्यावी, जेणेकरून अचानक  प्रवेशाने बेसावध बसलेल्या महिलांवर खजील होण्याची पाळी येणार नाही.’
बुरख्यामध्ये हल्ली बरीच विविधता दिसून येते. मात्र बुरख्याबाबतच्या मूळ तत्वात व उद्देशात फारकत झालेली नाही. असे सांगण्यात येते की बुरखा स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतो ते दुतोंडीपणाचे धोरण प्रगट करीत आहेत. त्यांचे वक्तव्य अल्लाह व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विरोधात आहे जे स्त्रियांनाही आवडणार नाही. बुरखा  पद्धतबाबत थोडे बारकाईने अभ्यास केल्यास तीन महत्त्वाचे उद्देश लक्षात येतील.
1. पहिला उद्देश असा की पुरूष व स्त्रियांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यात यावे व अशा दुवर्तनापासून त्यांना अलिप्त ठेवावे जे स्त्री-पुरूषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होतात.
2. दुसरा उद्देश असा की स्त्री-पुरूषाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात यावे. नैसर्गिकरित्या जी कर्तव्ये स्त्रियांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्चितपणे पार पाडावीत व ज्या जबाबदाऱ्या पुरूषांच्या वाट्यास येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्यात.
3. तिसरा उद्देश कुटुंब व्यवस्था मजबूत व सुरक्षित करावी हा आहे. कुटुंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक महत्वाची बाब आहे. इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकार देऊ पाहतो, त्याच बरोबर घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेऊ इच्छितो. हे केवळ बुरखा पद्धतीचा अवलंब केल्यानेच शक्य होऊ शकते.
समाजात सहजीवनाची प्रथा जितकी जास्त वाढत जात आहे तितकाच जास्त स्त्रियांच्या शृंगारिक प्रसाधनाचा खर्च वाढत जात आहे. हा वाढता खर्च काबाडकष्ट करून मिळालेल्या रास्त  कमाईने पूर्ण होत नाही म्हणून लाच, अफरातफर व इतर भ्रष्ट मार्गांनी हा वाढता खर्च पुरा केला जात आहे. त्यामुळे पूर्ण समाज पोखरला जात आहे. कोणत्याच कायद्याची योग्यरित्या  अंमलबजावणी होऊ शकत नाही. जे लोक आपल्या स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाही, जे लोक आपल्या स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाहीत ते दुसऱ्यावर शिस्तीचे  नियम कसे लागू करू शकतील? जो आपल्याच कौटुंबिक जीवनात विश्वासपात्र नसेल तो समाज व देशाशी एकनिष्ठ कसा राहू शकेल?
स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र वेगळे असावे ही एक नैसिर्गक व्यवस्था आहे. स्त्रीला मातृत्वपद देऊन तिचे कार्यक्षेत्र दाखवून देण्यात आले आहे. पुरूषाला पितृत्वाचा अधिकार देऊन इतर जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. स्त्रीपुरू षांच्या शरीर रचनेत आवश्यक ते फरक निर्माण करून, दोहोंना वेगळी मानसिकता, शारीरिक क्षमता व गुण प्रदान करण्यात  आले आहेत. मातृत्वाची जबाबदारी कौशल्याने पार पाडता यावी म्हणून तिला अधिक संयम व सहनशील प्रवृत्ती प्राप्त झाली आहे. तिच्या ममत्व व कोमल भावनांमुळे बालकांचे  संगोपन व पालनपोषण अत्यंत सहृदयपणे पार पाडले जाते. पुरूष त्या मानाने कणखर वृत्तीचा असतो. त्याच्यावर कुटुंबाच्या रक्षणाच्या व उदरनिर्वाहाच्या कठीण जबाबदाऱ्या टाकण्यात  आल्या आहेत. स्त्री पुरूषांचे नैसर्गिक कार्यक्षेत्र वाटप जर आपणास अमान्य असेल तर जगास मातृत्वाला मुकावे लागेल व परिणामतः संपूर्ण मानव समाज हायड्रोजन वा अणुबॉम्बविना  संपुष्टात येईल. स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारी बरोबरच पुरूषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर  अन्याय व अत्याचार करणे आहे. मानवजातीच्या उत्पत्ती व सेवाशुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडीत असते. या उलट पुरूषांच्या जबाबदारीत ही तिने सहभागी व्हावे हे  कितपत न्याय ठरेल?
स्त्रियांनी परिस्थितीनुरूप अन्यायकारक जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला आहे. एवढेच नव्हे आता तर अधिकाधिक सामाजिक स्वातंत्र्य व अधिकार मिळविण्याकरिता त्यांनी सामुहिक  चळवळी सुरू केल्या आहेत. आपल्या मातृत्वाचा ’उपहास’ केला आहे. गृहिणीचा अपमान केला आहे. महिलांनी घरात राहून केलेल्या सेवा सुश्रुसेला तुच्छ लेखले आहे. तिच्या सेवाकार्याचे  महत्व पुरूषांचे राजकारण, उद्योगधंदे व युद्धाच्या जबाबदाऱ्यापेक्षा कमी मानता येणार नाही. बिचाऱ्या स्त्रियांनी विवश होऊन पुरूषांच्या जबाबदाऱ्या स्विकारल्या आहेत. पुरूषांची कामे न  केल्यास तिला सन्मानजनक वागणूक देण्यास पुरूष तयार होत नव्हता. इस्लामने महिलांना घरगुती स्त्री सुलभ जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आदेश दिला होता. मातृत्व व बालकांच्या  संगोपनाच्या उदात्त कार्यामुळे तिला समाजात सन्मानजनक स्थान प्राप्त होते. मात्र आता कुटुंब व्यवस्थेबाबतचा आपला दृष्टीकोणच बदलत गेले आहे. आपला आग्रह आहे की स्त्रियांनी  मातेची कर्तव्ये पार पाडावीत, त्या बरोबरच तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेटसारखे पद भूषवावे, पुरूषांच्या मनोरंजनासाठी नृत्य व संगीताच्या मैफिली ही सजवाव्यात. अशा  अनेक प्रकारच्या कामाचे ओझे तिच्यावर लादले गेल्यामुळे ती एकही जबाबदारी पूर्णतः समाधानकारकपणे पार पाडू शकत नाही. ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या  शरीराला पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणार नाही अशी कामे तिच्यावर सोपवण्यात आली आहेत. मात्र तिचे कौतुक केलेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळेच
होते!
सुज्ञ व चारित्र्यवान नागरिक निर्माण करणाऱ्या कुटुंबव्यवस्थेला आपण गौणस्थान देत आहोत. कुटुंबसंस्था निश्चित श्रेष्ठ आहे. स्त्रियांना चारित्र्य घडविण्याची आवश्यक क्षमता व कोमल  मानसिकता निसर्गाने देऊ केली आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्तव्यनिष्ठ महिला घरात सदैव कार्यमग्न असतात. त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे व नैपुण्याने पार  पाडाव्यात म्हणून त्यांना उच्च शिक्षण व योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कुटुंब संस्थेचे संचालन तिने आत्मविश्वासाने, निश्चितपणे, संतोषजनकरित्या अमलात आणावेत म्हणून  बुरखापद्धत अवलंबण्यात आली होती. त्यामुळे स्त्रिया विचलित न होता आपली कर्तव्ये कौशल्याने पार पाडू शकत होत्या. गृहिणी सक्षम आणि सुरक्षित असून घरकारभार व्यवस्थितपणे  पार पाडीत आहेत. या विश्वासाने पुरूष ही निश्चितपणे आपल्या घराबाहेरील जबाबदाऱ्या पार पाडू शकत होते. आता आपण या प्रकारच्या गृहव्यवस्थेस नवयुगाच्या प्रगतीसाठी नाकारू  पाहत आहोत. हा चुकीचा मार्ग आहे.
मला वाटते की बुरखापद्धत नष्ट करून आणि इस्लामने महिलांना दिलेले कायदेशीर व आर्थिक अधिकार नाकारून कुटुंब व्यवस्था सुरक्षित ठेवता येणार नाही. आपणास नवयुगाची प्रगती  हवी आहे, कुटुंब व्यवस्था सुरक्षित ठेवायची आहे याबाबत शांतपणे विचार करून निर्णय घेतला पाहिजे. प्रगती ही फार विस्तृत संज्ञा आहे. या संज्ञेची कोणतीच निश्चित परिभाषा नाही.  एकेकाळी बंगालच्या आखातापासून थेट अटलांटिक महासागरापर्यंत मुस्लिमांचे राज्य पसरले होते. ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात ते अग्रेसर होते. सांस्कृतिक व वैचारिक पात्रतेच्या बाबतीत  त्यांची बरोबरी करणारा कोणीही नव्हता. मात्र त्या काळात बुरखापद्धत अस्तित्वात होती. इस्लामी इतिहासाचे अध्ययन केल्यास लक्षता येईल की त्या काळात मोठमोठे नावाजलेले  मुस्लिम संत, विचारवंत, विद्वान, राज्यकर्ते, लेखक व शूरवीर होऊन गेलेत. ते सर्व महापुरूष अशिक्षित व अडानी असूनही अनेक महिलांनी ज्ञान व विद्वतेच्या क्षेत्रात स्थान प्राप्त केले होते. विज्ञान, कला, वाड्.मय आदि क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केले होते. तत्कालीन मुस्लिमांच्या प्रगतीच्या मार्गात बुरखा पद्धतीने कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. आजही बुरखा पद्धतीचा अवलंब करून मुस्लिम समाजास प्रगती करणे शक्य आहे. आजच्या नवयुगाच्या प्रगतीस बुरखा पोषक आहे.
माझी एक डॉक्टर मैत्रीण अचानक मला बुरख्यात दिसली. तिने हाक मारल्यामुळे मी तिला ओळखू शकले. घरातच दवाखाना थाटणाऱ्या या माझ्या मैत्रिणीला बुरखा घालण्याची का गरज  भासली? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती मला म्हणाली ’’माझ्या एका पेशंटचा सुंदर बुरखा पाहून मी तिला विचारले, ’ कुठे ग घेतला हा बुरखा?’ ती म्हणाली, ,’ मी ज्यांच्या घरी  घरकाम करते त्यांनी मला बुरखा हा भेट म्हणून दिला आहे. मी हा बुरखा जीवापाड जपते. हा बुरखा माझ्या गरिबीस श्रीमंताचे रूप देतो, माझी लाज राखतो.’ तिच्या या उत्तराने मी  भारावून गेले. डोक्यात विचारांचे अनेक चक्रे फिरली आणि मी तिलाच माझ्यासाठीही तुझ्याच सारखा एक बुरखा आण असे सांगितले. आज या बुरख्यामुळे मी दिवसाचे दोन तास ज्यादा  विधायक कार्यासाठी खर्च करू शकते. शिवाय पवित्र कुरआनची शिकवण अवलंबविल्याचा आनंद वेगळाच! माझे बघून सर्व घरच्या महिला आज बुरखा घालू लागल्या आहेत. बुरख्याचा  आनंद, सुख वेगळंच आहे पण त्याचा अतिरेक मात्र घातक आहे. मी प्रत्येक बुरखाधारी महिलेस विचारले की बुरख्याची तुम्हास सक्ती आहे का? उत्तर नाही असे आहे. बुरख्यामुळे  आम्ही बिनधास्त बाहेर पडू लागलोत आणि कामे करू लागलोत. आमच्या प्रगतीचे कारणच आमचा बुरखा आहे.

प्रा. फातिमा मुजावर
अध्यक्षा : 11 वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी
साहित्य संमेलन, पनवेल

सर्वच प्रेषितांच्या काळात ‘रोजा’ अनिवार्य स्वरुपात होता आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावरसुद्धा ही उपासना अनिवार्य करण्यात आली. दिव्य कुरआनात म्हटले आहे की,
‘‘रोजा तुमच्यावर अनिवार्य करण्यात आला, जसा तुमच्या पूर्वीच्या लोकांवर करण्यात आला होता.’’ (संदर्भ : दिव्य कुरआन)
यावरून हे आपोआपच स्पष्ट होते की, इस्लामच्या स्वभावाशी या (रोजामुळे होणाऱ्या) प्रशिक्षणाचा विशेष संबंध आहे.
नमाज, जकात आणि हजप्रमाणेच रोजासुद्धा सारख्याच स्वरुपाचा स्तंभ आहे. ‘रोजा’ या उपासनेमुळे जो प्रभाव पडतो, तो नमाजमुळे मानवी जीवनावर होणाऱ्या प्रभावांना बळ आणि शक्ती प्रदान करतो. नमाज ही रोजची प्रशिक्षण व्यवस्था आहे. थोड्या-थोड्या वेळाने ‘नमाज’चा उत्तम प्रभाव दररोजच मानवी स्वभावात सुधारणा घडवून आणतो. अर्थात स्वभाव आणि वर्तन सुधारण्याचे दररोजचे पाच वेळचे औषधच जणू. परंतु ‘रोजा’ ही उपासना वर्षभरात एकच महिन्याची जबरदस्त प्रशिक्षण व्यवस्था आहे. रोजच्या प्रशिक्षणामध्ये निर्माण होणाऱ्या थोड्याफार त्रुटींची भरपाई करण्याकरिता वर्षभरात जवळपास सातशे वीस तासांचे हे अखंड प्रशिक्षण आहे. यात माणूस अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्थेचा पुरेपूर लाभ घेतो. या प्रकरणात आपण हेच पाहणार आहोत की ‘रोजा’च्या स्वरुपात मिळणारे प्रशिक्षण मानवीय स्वभावात आणि आचरणात कशा प्रकारे सुधारणा घडवून आणते.
‘रोजा’ चे परिणाम
‘रोजा’ या उपासनेचे नियम असे आहेत की, यासाठी रात्रीच्या उत्तरार्धात आणि सूर्य उगवण्याच्या जवळपास दोन-अडीच तासांपूर्वी ‘सहेरी’ खावी लागते, अर्थात जेवण करावे, पाणी प्यावे, वगैरे, यानंतर सहेरी खाण्याची वेळ संपण्यापासून ते सूर्य मावळेपर्यंतच्या या दिवसभराच्या काळात खाणे, पिणे आणि आपल्या पत्नींशी जवळीकता साधणे निषिद्ध ठरविण्यात आले आहे. मग सूर्य मावळताच या बाबीं अर्थात जेवण-खाण आणि पती-पत्नींचे संबंध ‘वैध’ होतात. अर्थात दिवसभरात लावण्यात आलेले बंधन तुटते, तसेच दुसऱ्या दिवशीची ‘सहेरी’ खाण्यापर्यंत या बाबींची परवानगी असते. मग सहेरी खाल्ल्यानंतर परत अन्न-पाणी वर्ज्य होते आणि पती-पत्नी संबंध करणेही वर्ज्य ठरते. रमजान महिण्याच्या पहिल्या तारखेपासून सतत एक महिना हे चालू असते. याचा अर्थ असा की, जोपर्यंत परवानगी आहे तोपर्यंत माणसाने अन्न खावे, पाणी प्यावे, वैवाहिक संबंध प्रस्थापित करावे आणि जेव्हां याच कर्मांची मनाई झाली, या कर्मांपासून स्वतःस रोखावे.
दासत्वाची जाणीव
या प्रशिक्षण व्यवस्थेवरून सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की, इस्लाम या प्रशिक्षणाच्या माध्यमाने मानवामध्ये अथवा मानवाच्या विवेकबुद्धीमध्ये ईश्वराचे स्वामित्व आणि सार्वभौमत्वाची जाणीव निर्माण करतो. तसेच ही जाणीव एवढी भक्कम स्वरुपात प्रदान करण्यात येते की, मानव हा आपले स्वातंत्र्य आणि अधिकारसुद्धा ईश्वरास समर्पित आणि स्वाधीन करतो. ईश्वराचे हे सार्वभौमत्व आणि स्वामित्व मान्य करणे हाच इस्लामचा आत्मा आहे आणि याच मान्यतेच्या आधारावर माणूस हा मुस्लिम असतो. केवळ ईश्वराचे अस्तित्व मान्य केल्याने इस्लामची मागणी पूर्ण होत नाही. केवळ वैचारिकरीत्या तो मुस्लिम असून चालत नाही, वैचारिकदृष्ट्या हे मान्य करून चालणार नाही की, या सृष्टीचा निर्माता आणि ही सृष्टी चालविणारा केवळ ईश्वरच आहे, तर या वैचारिक दृष्टिकोनास कृतीची जोड असणे आवश्यक आहे. या विचारसरणीचा मूळ उद्देश हा आहे की, माणसाने ही वास्तविकता मान्य करण्याबरोबरच तिच्या तात्त्विक आणि स्वाभाविक परिणामांचा स्वीकार करावा. म्हणजे ज्याअर्थी माणूस ही गोष्ट मान्य करतो की, त्याचा स्वतःचा आणि या संपूर्ण विश्वाचा निर्माता आणि पालक तसेच आदेशक हा केवळ ईश्वरच असून संपूर्ण विश्व आणि विश्वातील प्रत्येक बाब त्याच्याच इशाऱ्यावर चालते, तो हेही मान्य करतो की, ईश्वराचा कोणीही भागीदार नाही, त्याअर्थी त्याने स्वतःस ईश्वराच्या स्वाधीन करावयास हवे, आत्मसमर्पण करावयास हवे, म्हणजेच त्याचे दासत्व स्वीकारावयास पाहिजे. यालाच वस्तुतः ईश्वराची उपासना असे म्हणतात. माणसाने ईश्वराप्रती तेच वर्तन आणि नाते अंगीकारावे, जे स्वामीप्रती त्याच्या दासाचे असते. हीच बाब ‘इस्लाम’ आणि ‘इस्लामचा इन्कार’ या दोन अवस्थांना विभक्त करते. इस्लामचा इन्कार यालाच म्हणतात की, मानव ईश्वराच्या मुकाबल्यात स्वतःचे सार्वभौमत्व आणि स्वामित्व प्रस्थापित करण्याचा गैरसमज करून घेऊन अगदी बेजबाबदारपणे वागतो, मनमानी जीवन जगतो, आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाटेल त्याचा बळी देतो, आपलेच आदेश आणि कायदे लागू करण्यासाठी चांगले-वाईट न पाहता पृथ्वीवर उपद्रव माजवितो. त्याच्या या स्वैर वर्तनामुळे सर्वचजण संकटात सापडतात. याच्या अगदी उलट ‘मुस्लिम’ या शब्दाची परिभाषा आहे. म्हणजेच माणसाने स्वतःस ईश्वराचा दास आणि आपल्या प्रत्येक कर्मास जवाबदार समजावे. तसेच याच दासत्वाच्या आणि जवाबदारीच्या जाणीवेसह या जगात जीवन जगावे. ईशद्रोहाच्या अवस्थेतून निघून इस्लामच्या अवस्थेत येण्यासाठी ज्याप्रकारे अल्लाहचे स्वामित्व अथवा प्रभुत्व सच्चा अंतःकरणाने मान्य करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इस्लाममध्ये राहण्यासाठीसुद्धा याची नितांत आवश्यकता आहे की, माणसाच्या मनात आणि विचारबुद्धीत आपल्या दासत्वाची जाणीव प्रत्येक क्षणी जिवंत आणि कृतीशील असावी. कारण की, ही जाणीव आणि विवेकता संपताच माणसात स्वतःच्या सार्वभौमत्व आणि स्वामित्वाच्या भावनेचा तसेच बेजाबदारपणाचा शिरकाव होतो. त्याचप्रमाणे ईशद्रोहाची ती अवस्था निर्माण होते, ज्यात माणूस असे समजून काम करतो, त्याचा प्रभू अल्लाह तर नाहीच शिवाय अल्लाहसमोर त्यास आपल्या बुऱ्या-भल्या कर्मांचा जाबसुद्धा द्यावा लागणार नाही.
वर उल्लेख केल्याप्रमाणे, ‘नमाज’चा सर्वप्रथम हेतु मानवामध्ये इस्लामच्या याच अवस्थेचे वारंवार नुतनीकरण होणे हा आहे. त्याचप्रमाणे रोजाचा हेतुसुद्धा हाच आहे. परंतु या दोन्हींत फरक असा आहे की, नमाज दररोज थोड्या-थोड्या वेळाने ही जाणीव जिवंत करते आणि रमजान महिण्यातील रोजे वर्षभरात एकदाच सातशे वीस तासांपर्यंत मानवास या अवस्थेत बांधील ठेवते. यामुळे माणसाचे संपूर्ण मन व विचारबुद्धी प्रभावीत करते व हा प्रभाव वर्षभर राहतो. रोज्यांचे एवढे कडक नियम पाळण्यासाठी अथवा हे नियम आपल्यावर लागू करून घेण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे की, त्याने ईश्वरास आपला स्वामी वा प्रभू जाणावा. तसेच आपले स्वातंत्र्य आणि अधिकार ईश्वराच्या स्वाधीन करावे. ज्याअर्थी तो ईश्वरीय आज्ञापालन करण्यासाठी दिवसभर बारा-बारा आणि तेरा-तेरा तास अन्न व पाण्यावाचून राहतो, वैवाहिक संबंधांपासून दूर राहतो, ईश्वराच्या मर्जीनुसार जगतो आणि संध्याकाळी ईश्वराच्या आज्ञेचे पालन करून रोजा सोडतो. असे सतत एक महिनाभर करीत असतो. याचाच अर्थ असा की, त्याने आपले जीवन ईश्वरीय आज्ञेच्या स्वाधीन केले. आपल्या इच्छा-आकांक्षा, विचारधारा, कृती, अधिकार ईश्वराच्या स्वाधीन केले. आपल्या सर्वस्वावर ईश्वराचे प्रभुत्व आणि स्वामित्व लागू केले. आपल्या दासत्वाचा ठोस पुरावा दिला. तसेच याची त्यास कायमस्वरुपी जाणीव राहिली. अगदी एका क्षणासाठीही तो गाफील राहिला नाही व ईश्वराचा नियम तोडला नाही.
आदेशपालन
दासत्वाच्या जाणीवेबरोबरच जी बाब परिणामस्वरुपात समोर येते ती ही की, माणूस स्वतःला ज्याचा दास समजतो, त्याच्या आदेशाचे त्याने पालन अवश्य करावे.
या दोन्ही बाबींत असा नैसर्गिक आणि तात्त्विक संबंध आहे की, हे दोन्ही एकमेकांपासून कधीच विभक्त होऊ शकत नाहीत. कारण दासत्वाच्या जाणीवेचा हा परिणामच आहे की, दास हा आपल्या स्वामीच्या आदेशांचे पालन करतो. एखाद्यास जोपर्यंत स्वामी स्वीकारण्यात येत नाही, तोपर्यंत त्याच्या आदेशांचे पालन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर खरोखरच एखाद्यास स्वामी स्वीकारले असेल तर त्याच्या दासत्वापासून मुक्त राहण्याचा प्रश्नच नाही.
अशाप्रकारे रोजाच्या माध्यमाने माणूस आपल्या सर्वस्वांवर ईश्वरीय कायदा लागू करतो. या प्रशिक्षणात केवळ दोन प्रकारच्या इच्छा निवडण्यात आल्या आहेत. अर्थात अन्नपाणी ग्रहण करण्याची इच्छा आणि पती-पत्नींच्या समागमाची इच्छा, याशिवाय या काळात विश्रांती करण्याचीही पाहिजे तशी संधी मिळालेली नाही. कारण संध्याकाळी ‘तरावीह’ची नमाज या महिन्यात अदा करावी लागते.
असुरी इच्छांच्या याच प्रमुख तीन मागण्या असल्याने यावर चांगलीच गदा येते. जीवन जगण्यासाठी अन्न-पाण्याचे सेवन, शरीरसुखासाठी विरुद्धलिगी समागम आणि विश्रांती याच तीन गरजा समस्त असुरी मागण्या पूर्ण करण्याचे मूळ स्त्रोत आहे. या मागण्या एवढ्या शक्तीशाली असतात की, यांच्यासमोर माणूस विवश होतो. मानवास जे शरीर प्रदान करण्यात आले आहे, त्याच्यासुद्धा याच तीन प्रमुख मागण्या आहेत. मानव हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाचा जीव असल्यामुळे त्याच्या मागण्यासुद्धा भरमसाठ वाढलेल्या असतात. फक्त जगण्यापुरते अन्न मिळाल्यावरही त्याचे समाधान होत नसते, तर त्याला चांगल्या प्रतीच्या भोजनाची इच्छा असते. विरुद्धलिगी समागमासाठीसुद्धा त्याच्या मागण्या भयंकर असतात. मग पुरुष असो वा स्त्री असो, त्यातील त्याची आवड-निवड आणि इतर छंद कमालीचे असतात. या सर्व इच्छा प्रत्येक पुरुष आणि स्त्री पूर्ण करून घेऊ इच्छिते. अर्थात या इच्छा व कामनांना मर्यादाच नसते. शरीर जोपासण्यासाठी केवळ झोप म्हणून चालत नाही. यातसुद्धा त्याचे कितीतरी नखरे असतात. त्याला वाटते की, कमीत-कमी श्रमामध्ये जास्तीतजास्त लाभ व्हावा, यासाठी तो तऱ्हेतऱ्हेच्या युक्त्या काढतो. आता खरे म्हणायचे तर माणसाच्या याच त्या तीन प्रकारच्या असुरी इच्छा आणि कामना आहेत, ज्यांच्यासाठी तो जीवनभर धडपडत असतो, एवढेच नव्हे, तर वाटेल ते करून या तिन्ही इच्छा पूर्ण करण्याची धडपड करीत असतो. येथेच माणसास पराजय पत्करावा लागतो. याच तीन इच्छांसमोर तो आपले सर्वस्व अर्पण करतो, याच तिन्ही इच्छांचा तो गुलाम बनतो आणि या तिन्ही इच्छा माणसाला आपल्या तालावर जीवनभर नाचवीत असतात. माणसाने जर या तिन्ही असुरी इच्छांवर ताबा मिळविला नाही आणि त्यांची वेसन ढिली सोडली, तर मात्र तो या इच्छांचा दास व त्या त्याच्या स्वामी होतात. ईश्वराने माणसाला जी विवेकशक्ती आणि इतरांना समोहित करण्याची पात्रता व क्षमता दिली आहे, या सर्व प्रकारच्या पात्रता आणि क्षमता या तिन्ही इच्छांच्या पूर्ततेत माणूस खर्च करीत असतो. उच्चकोटीच्या मानवी उद्दिष्टांच्या ठिकाणी नीच प्रकारचे हेतु साधण्यात जीवन खर्च होते. रात्रंदिवस केवळ एवढेच काम त्याला असते व नवनवीन साधनांचा यासाठी तो वापर करीत असतो. परिणामी माणूस हा माणूस न राहता असुर बनतो. त्याच्या अमर्याद इच्छांची भूक, लैंगिक तृष्णा कधीच संपत नाही.
या संकटापासून वाचण्यासाठी केवळ एवढे पुरेसे ठरत नाही की, त्याच्यासमोर मानवी जीवनाचे मूळ उद्दिष्ट ठेवण्यात यावे आणि त्यास मानवीय शक्तींचा योग्य वापर करण्याचा उपदेश द्यावा. त्याला या उपदेशाबरोबरच या गोष्टीचीसुद्धा गरज आहे की, त्याच्या या असुरी इच्छांचा त्याच्याशी जो नैसर्गिक आणि स्वाभाविक संबंध आहे, त्यास वास्तविक स्वरुप द्यावे आणि योग्य सराव करून घेऊन माणसाला एवढे शक्तिशाली आणि चपळ व तापट बनवावे की, त्यास या तिन्ही इच्छांवर सहजपणे ताबा मिळविता यावा. या इच्छांचा तो दास नव्हे स्वामी व्हावा आणि या असुरी इच्छा त्याच्या दासी व्हाव्यात. वास्तविकता अशी आहे की, या इच्छांवर केवळ ताबा मिळविणे हे आपले उद्दिष्ट नाहीच व त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या अधीन व्हावे, हेसुद्धा आपले उद्दिष्ट नाही. याचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की, या इच्छा पूर्णही व्हाव्यात, परंतु त्या ईश्वरीय आज्ञेनुसार पूर्ण व्हाव्यात. ईश्वराने नेमून दिलेल्या मार्गावर या इच्छांची पूर्तता व्हावी. हाच मूळ उद्देश यामागे आहे. ‘रोजा’ च्या अवस्थेमध्ये माणूस याकरिता आपल्या या तिन्ही इच्छांचे लाड पुरवीत नाही की, त्याला ईश्वराचा असा आदेश असतो. ईश्वराचा आदेश असल्यामुळेच तो सकाळ होण्यापूर्वीची ‘सहरी’ खातो, ईश्वराच्या आदेशानेच तो दिवसभर अन्न-पाणी वर्जित करतो, ईश्वराच्या आज्ञापालनासाठीच तो वैवाहिक समागमापासून दूर राहतो आणि ईश्वराची आज्ञा पूर्ण करण्यासाठीच तो संध्याकाळी सूर्य मावळताच रोजा सोडतो, अन्न-पाणी ग्रहण करतो, वैवाहिक संबंध प्रस्थापित करतो. अशा प्रकारे चोवीस तास माणसाच्या संपूर्ण इच्छा-आकांक्षा आपल्या नव्हे तर ईश्वराच्या ताब्यात येतात. हा सराव दरवर्षी महिनाभर असतो. यामुळे या इच्छांची मुस्कटदाबीही करण्यात येत नाही आणि त्यांना स्वैरही सोडण्यात येत नाही, तर त्यांना योग्य वळण लावण्यात येते.
या जगात अशा लोकांचीसुद्धा भरमसाठ संख्या आहे, जे आपल्या इच्छांची मुस्कटदाबी करण्याचे अघोरी कृत्य करतात आणि यालाच पुण्यकर्म समजतात. वैराग्य, संन्यास, ब्रह्मचर्य याच रकाण्यात मोडतात. अन्न-पाणी न घेता आपले शरीर वाळविणे, ब्रह्मचर्याच्या नावावर स्वतःवरच अत्याचार करणे व या प्रकारच्या ना-ना तऱ्हेने अनैसर्गिक कृत्य करणे हे कोणत्या पुण्यकर्मात बसते? हा एक संशोधनाचा विषय आहे. यामुळे आत्मिक विकासाची आशा बाळगणे हा केवळ कल्पनाविलास आहे. या अनैसर्गिक विचारसरणीच्या आधारावरच आपल्या आत्मा व शरीराचे नैसर्गिक अधिकार हिरावून घेण्याचे महापाप घडले आहे. ईश्वराने या सृष्टीत अन्न, पाणी, फळे, स्त्री-परुष संबंध आणि यासारख्या अनेक बाबी मानवाच्या उपजीविकेसाठी आणि रंजनासाठीच निर्माण केल्या आहेत. मात्र आपण याच ईश्वराच्या अमूल्य देणग्या नाकारून अनैसर्गिक कृत्य करतो, ही विचित्र बाब आहे. ईश्वराने प्रदान केलेली ही सुख-साधने ईश्वराच्या कायद्यानुसार वापरणे हाच ‘रोजा’चा उद्देश होय.
माणसाने वैराग्य आणि ब्रह्मचर्याच्या नावावर आपल्या आत्मा व शरीरावर कशासाठी एवढे अत्याचार करावे? माणसाचे शरीर व आत्मा आणि त्याच्या इच्छा व आकांक्षा, तसेच त्याच्या भावना व आवडीनिवडी या सर्व ईश्वराची अनामत आहेत. मग आपल्याला या अनामतीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार दिलाच कोणी? ईश्वराने प्रदान केलेल्या शरीरावर अन्याय आपण का म्हणून करावा? त्याच्या वैध इच्छांची एवढी निर्दयीपणे कशासाठी मुस्कटदाबी करावी? आणि खरे सांगायचे असेल तर, या सर्व उचापती केवळ आपले वर्चस्व इतरांवर प्रस्थापित करण्यासाठी आहेत, ही एक उघड वास्तविकता आहे. माणूस संन्यासी झाला, माणूस वैरागी झाला, माणसाने ब्रह्मचर्य पत्करले, माणसाने संसारत्याग केला, अर्थात संसाराच्या जवाबदाऱ्यांतून पळ काढला, ईश्वराने घालून दिलेल्या सामाजिक बांधिलकी आणि जवाबदाऱ्यांना पाठ दाखविली, ईश्वराने प्रदान केलेल्या शारीरिक आणि आत्मिक इच्छा-आकांक्षावर घोर अन्याय केला, एवढेच नव्हे तर आपण मोठे धार्मिक, धर्मात्मा, संन्यासी आणि ब्रह्मचारी भासवून वर्चस्व गाजवून त्यांच्या धार्मिक भावनांशी खेळ खेळला. हे सर्व काय आहे ? याला कसली धार्मिकता म्हणता येईल?
नैसर्गिक धर्माची तर ही मागणी आहे की, माणसाने पोटाला खावे. चांगले अन्न ग्रहण करावे. ईश्वराच्या कृपाफळांचा स्वाद घ्यावा. लग्न करून संसार थाटावा. आई-वडिलांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी. वैध धंदा-व्यापार वा नोकरी करून पत्नीचे वैध लाड पुरवावे. तिला शरीरसुख द्यावे. तिच्याकडूनही शरीरसुख घ्यावे. मुलांबाळांना योग्य शिक्षण-प्रशिक्षण द्यावे. समाजात सद्वर्तनाने जगावे. गरजवंतांच्या गरजा पूर्ण कराव्यात. भुकेल्यांना अन्न द्यावे, विवस्त्रांना वस्त्र द्यावे, अत्याचारपीडितांचे अश्रू पुसावेत, योग्य आणि समर्थपणे आपल्यावर असलेले इतरांचे अधिकार पूर्ण करावेत, अशारीतीने समर्थपणे जीवन जगावे, अशी असेल धार्मिकता तर ठिक, नसता काय उपयोग त्या धर्माचा आणि भक्ती व पूजापाठाचा आणि त्या कर्मकांडाचा! ज्या धार्मिकतेमुळे भुकेल्यास अन्न मिळत नसेल, वस्त्रहीनास वस्त्र मिळत नसेल, अनाथ व दुर्बलांना आश्रय मिळत नसेल, अन्याय व अत्याचार दूर होत नसेल, तर असा धर्म आणि अशी व्यवस्थाच काय उपयोगाची, जो धर्म मानवांत समता, न्याय आणि बंधुत्व प्रस्थापित करू शकत नसेल, ज्या धर्माच्या नावावर माणसांत आणि माणसांच्या मनात दुरावा निर्माण होत असेल, धर्माच्या नावावर माणसांचे मुडदे पडत असतील, ज्या धर्माच्या नावावर स्त्रियांचे शोषण होत असेल, त्या धर्माचा उपयोगच काय?
ईश्वराने मानवासाठी त्याचा अधिकार निश्चित केला. त्यासाठी उपजीविकेची वैध साधने उपलब्ध केली. त्याच्या नैसर्गिक इच्छा आणि भावना पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी निर्माण केल्या आणि त्या ईश्वरीय नियमांवर पूर्ण करण्यास पुण्यकर्म आणि ईश्वरप्रसन्नता ठरविले. मात्र आपल्या इच्छा अनावर होऊन जेव्हा निषिद्ध वस्तुंची मागणी करतात आणि यासाठी माणूस जगात उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ईश्वराने त्यासाठी कडक निर्बंधसुद्धा लावले आहेत. परंतु ज्या ठिकाणी मानव आपल्या गरजा वैधरीत्या आणि ईश्वराच्या मर्जीनुसार पूर्ण करू इच्छित असेल तर, ईश्वराने याकरिता आपली दारे सदैव उघडी ठेवली आहेत. याच बाबींचा सराव रमजान महिण्यात करून घेण्यात येतो. या सरावांमुळे माणसात धर्मपरायणता निर्माण होते.
रोजाचा सामुदायिक लाभ
इस्लामचा मूळ उद्देश हा सद्वर्तन आणि सज्जनांचा असा समुदाय निर्माण करणे आहे की, जो मानवसंस्कृतीची निर्मिती भलाई आणि चांगुलपणाच्या व नैतिकतेच्या आधारावर करतो. परंतु हे उद्दिष्ट साधण्यासाठी केवळ सामुदायिक नियमांची निर्मिती करुन ठेवण्यावर इस्लामने समाधान मानले नसून यासाठी तो एक परिपूर्ण नागरी व्यवस्था उभी करण्यासाठी अशा व्यक्तींना तयार करतो ज्यांचे विचार, आचरण, जीवनशैली आणि योग्य भूमिका इस्लामी व्यवस्थेशी समरुप असते. त्याचप्रमाणे मनावर कसलेही ओझे न ठेवता, विवशतेने ईश्वराच्या मर्जीवर न जगता अगदी आत्मसमाधानाने, आत्मप्रसन्नतेने, प्रामाणिकपणाने, तसेच आत्मप्रेरणेने ईश्वराच्या आज्ञेचे त्या (भूमिका) पालन करणाऱ्या असतात. या योजनेत रोजाचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य पुढीलप्रमाणे आहे -
  • १) ‘रोजा’ च्या माध्यमाने होणाऱ्या प्रशिक्षणामुळे समुदायाच्या प्रत्येक व्यक्तीस अल्लाहच्या प्रभुत्वासमोर आपले स्वातंत्र्य आणि अधिकार समर्पित करण्यासाठी तयार करण्यात येते, जेणेकरून आपले समस्त जीवन ईश्वरीय आदेशांच्या अधीन व्हावे.
  • २) प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरण व विचारबुद्धीत ईश्वराच्या अमर्याद ज्ञानाची आणि परलोकी जाब देण्याची जाणीव अशारीतीने निर्माण व्हावी की, ती स्वतः आपल्या व्यक्तिगत जवाबदारीच्या जाणिवतेच्या आधारावर ईश्वरीय आज्ञेचे पालन करील.
  • ३) प्रत्येक व्यक्तीमध्ये ही प्रेरणा निर्माण करण्यात यावी की, ईश्वराशिवाय कोणीही दासत्वास पात्र नाही, उपासना केवळ त्याचीच करावी, ही बाब श्रद्धात्मक आणि कार्यात्मक या दोन्ही पैलुंनी सिद्ध व्हावी. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने केवळ ईश्वराचेच स्वामित्व, प्रभुत्व आणि आदेश स्वीकारावेत, एखादा आदेश, नियम वा कायदा समोर आल्यास तो ईश्वरीय प्रमाणानुसार असेपर्यंत त्याचे पालन करू नये.
  • ४) प्रत्येक व्यक्तीचे नैतिक प्रशिक्षण अशारीतीने व्हावे की, तिला आपल्या इच्छा व आकांक्षा आणि भावना व अभिलाषांवर पूर्ण ताबा मिळावा. तिला आपला लोभ, इच्छा आणि अभिलाषांवर एवढे प्रभुत्व अथवा पकड असावी की, आपली श्रद्धा, विवेक आणि विचारबुद्धीनुसार त्यांचा योग्य वापर करणे शक्य व्हावे. तिच्यामध्ये संयम, त्याग, ईश्वरावर श्रद्धा आणि स्थैर्य, यासारखे गुणधर्म निर्माण व्हावेत. त्याच्या वर्तनात एवढी शक्ती व क्षमता निर्माण व्हावी की, तिच्यावर कोणताही दबाव आला तरी ईश्वरीय आदेशपालनात ती डगमगता कामा नये.
हीच ती प्रमुख उद्दिष्टे आहेत, जी साध्य करण्यासाठी इस्लामने रमजानचे रोजे प्रत्येकावर अनिवार्य केले आहेत. मग ती पुरुष असो वा स्त्री, ही उद्दिष्टे साधण्यासाठी इस्लामशिवाय अख्ख्या जगात कोणतीच व्यवस्था अस्तित्वात नाही व येणारही नाही.
‘रोजा’ चा सामुदायिक पैलू
नमाजप्रमाणेच रोजासुद्धा एक व्यक्तिगत कर्म असले तरी, ज्याप्रमाणे नमाजकरिता सामुदायिकतेची अट लावून या कर्मास सामुदायिकतेचे स्वरुप देण्यात आले आहे, त्याचप्रमाणे ‘रोजा’लासुद्धा सामुदायिक उपासनेचे स्वरुप देऊन याच्या फायद्यांना अमर्याद स्वरुपात वाढविण्यात आले. याकरिता ईश्वराने ही योजना आखली की, यासाठी एका विशिष्ट महिन्याची निवड करण्यात आली. तसेच सर्वांसाठी वेळापत्रक ठरवून देण्यात आले. ईश्वराने नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसारच सर्वांवर रोजे ठेवण्याचे बंधन टाकून या उपासनेत सामुदायिकतेचा आत्मा फुंकला.
सामूहिकतेची भावना
या सामुदायिकतेचा दुसरा लाभ हा आहे की, यामुळे लोकांत नैसर्गिक आणि मौलिक ऐक्य निर्माण होते. कारण यामध्ये सर्वांनाच रोजा असतो, सर्वांच्या श्रद्धा, भावना एकच असतात, सर्वांचा ध्यास एकच असतो, सर्वांचे विचार एकच असतात.
ज्या समुदायात या बाबी सारख्याच अथवा एकच असतात, तेथेच खरे ऐक्य आणि सौख्य नांदत असते. कोणीच स्वतःस वेगळा, पृथक वा अजाण समजत नाही. सर्वजण आपले आणि आपण सर्वांचे असल्याची वास्तविकता समोर येते. सर्वांनाच तहाण व भूक लागलेली असते. सर्वांचेच दुःख सारखे असते. संध्याकाळी सर्वचजण रोजा सोडतात, तेव्हा सर्वांनाच एकाच वेळी आनंद होतो. याच सर्व बाबी सर्वांना सामायिक असतात आणि यामुळेच असामान्य ऐक्य निर्माण होते.
रोजाचा आत्मिक प्रभावसुद्धा सर्वांवरच सारखा पडतो. कारण सर्वांनाच ईशप्रसन्नतेची आत्मिक तृष्णा लागलेली असते. ईशप्रसन्नतेची आस सर्वांची एकच असते. दिवसभर अन्न-पाण्यावाचून राहणे हे केवळ ईशप्रसन्नेसाठीच असते. तेव्हा याचा सामुदायिक स्थैर्यावर जबरदस्त परिणाम होतो.
याच एकत्रित कर्मांमुळे लोकांत ऐक्य, प्रेम, बंधुत्व निर्माण होते. म्हणून प्रत्येकजण नेकी आणि चांगुलपणात एक-दुसऱ्याची साथ देतात. प्रत्येकजण ईशपरायणतेच्या अथांग सागरात बुडालेले असतात. यापेक्षा उत्तम प्रकारचे ऐक्य भूतलावर कोठेच सापडणे शक्य नाही
सहकार्याचा आत्मा
या सामूहिक उपासनेचे आणखीन एक जबरदस्त कार्य हे अस्थायी स्वरुपात सर्व लोकांना एका स्थानावर संघटित करते. श्रीमंत हा श्रीमंत जरी असला आणि गरीब हा गरीब राहिला तरीसुद्धा श्रीमंतांवरसुद्धा रोजाचा असा प्रभाव पडतो की, त्याला उपासमार झेलणाऱ्याची जाणीव होते. कारण तोसुद्धा दिवसभर अन्न-पाण्यावाचून राहात असल्याने भुकेल्या आणि तहाणलेल्या दीन-दलित आणि पामरांच्या उपासमारीच्या परिस्थितीची प्रखर जाणीव होते. ईश्वराची प्रसन्नता मिळविण्याखातर तो या भुकेल्या व तहाणलेल्या लोकांच्या मदतीसाठी सरसावतो, यामुळे गरिबांना श्रीमंताविषयी असलेला हेवा आणि द्वेषाची भावना नष्ट होते आणि या ठिकाणी कृतज्ञता, प्रेम आणि बंधुत्वाची भावना निर्माण होते. तसेच समाजातील सामुदायिक मतभेद नष्ट होतात. ज्या राष्ट्रात अगर समूहात अशा प्रकारची सहकार्याची भावना नसते, त्या राष्ट्र अगर समुदायाची शकले पडतात. ज्या समुदायाच्या लोकांना भूक आणि तहाण काय असते हेच माहीत नसेल तर त्यांना दीन-दुबळ्यांच्या पोटाची आग कशी असते, याची जाणीव होणारच कशी? परंतु ‘रोजा’मुळे प्रत्येक सक्षमास अक्षमाच्या अंतःकरणाचा टाहो स्पष्टपणे ऐकू येतो आणि त्याला गरिबांची मदत केल्याशिवाय समाधान व सुख लाभत नाही. शिवाय ‘रोजा’सारखी कडक आणि कठीण उपासना स्वीकार करण्याची स्वतः ईश्वरानेच आज्ञा केली आहे ती अशी की,
‘‘ज्यांनी सदका आणि फित्र (दान-धर्म) दिला नाही, त्यांचे रोजे माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत.’’ (दिव्य कुरआन)
अर्थात गरिबांना आणि भुकेल्यांनासुद्धा आपल्या अन्न-पाण्यात सामील करून घेतल्याशिवाय आणि त्यांना अन्नदान केल्याशिवाय ईश्वर ‘रोजा’ सारखे पुण्यकर्म स्वीकार करीत नाही. या उच्चतम कर्मासाठी ईश्वराने ताकीद तर केलीच, शिवाय रोजामध्ये श्रीमंतास होणाऱ्या भुकेच्या वेदना आपोआपच त्याला यासाठी प्रेरित करतात. ज्या श्रीमंतांनी कधीच भुकेचा आणि तहाणेचा अनुभव घेतलेला नसतो आणि जेव्हा जनता दुष्काळाने ‘भूक-भूक भाकरी द्या’ सारख्या घोषणा देत राज्यकर्त्यांसमोर केविलवाणा टाहो फोडतात, तेव्हा त्यांना याचे खूप आश्चर्य होते, ते त्या गरिबांना उत्तर देतात,
‘‘भाकरी काय मागता? भाकरी नसेल तर केक खा!’’
ही विदारक अवस्था इतिहासाने पाहिलीच आहे. एवढेच नव्हे, तर या भूतलावरील श्रीमंताचे अंतःकरण एवढे निर्धास्त आणि मृत झालेले आहे की, त्यांच्या पाळीव कुत्र्यांना खाण्यासाठी लक्षावधींचा खर्च येतो, मात्र त्यांना उकिरड्यावर कचरा वेचून पोटाची खळगी भरणाऱ्यांची जाणीव होत नाही. या असमतोलतेवर लिहिण्यासाठी येथे वाव नाही.
‘रोजा’ ही उपासना इस्लामचा क्रमांक दोनचा स्तंभ आहे. याच्या माध्यमाने इस्लाम हा व्यक्तींना व्यक्तिगत प्रशिक्षण देऊन त्यांना सामाजिक बांधिलकीच्या दोऱ्यात मोत्यांप्रमाणे गुंफतो. त्यांची एक संघटना निर्माण करतो, एक विशेष समुदाय तयार करतो. इस्लामचे अंतिम लक्ष्य हे आहे की, या जगाच्या पाठीवर सत्य, न्याय, समानता आणि बंधुत्वाची स्थापना व्हावी. याच हेतुपूर्तीस्तव इस्लामने नमाज आणि रोजाच्या माध्यमाने सत्य स्थापण्याच्या व्यवस्थेसाठी लागणारे शिपाई, लष्करप्रमुख आणि विविध पदाधिकारी त्याचप्रमाणे शिक्षक, प्रशिक्षक, न्यायाधीश, व्यापारी, मजूर, कारागीर, उद्योजक, शेतकरी, सल्लागार, प्रतिनिधी आणि नागरिक तयार करण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. यामुळेच एक सुशील आणि प्रमाणिक शासन व्यवस्था अस्तित्वात येऊ शकते.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget