धर्मात जिहादचे महत्व

जिहादवर धर्माचे आयुष्य अवलंबून आहे. जिहाद इस्लामसाठी स्वाभाविक आहे. धर्मात जिहादचे स्वरुप साधारण नाही. कुरआन ज्या वेळी श्रध्दावंताची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करतो त्या वेळी जिहाद त्यापैकी एक महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘ज्या लोकांनी श्रध्दा ठेवली आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरादारांचा त्याग केला, संघर्ष केला (जिहाद) व ज्यांनी आश्रय दिला व मदत केली तेच खरे श्रध्दावंत आहेत, त्यांच्यासाठी अपराधांची क्षमा व सर्वोत्तम उपजीविका आहे.’’ (कुरआन ८: ७४)
‘‘हे लोकहो, ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे, मी दाखवू तुम्हाला तो व्यापार जो तुम्हाला यातनादायक प्रकोपापासून वाचवील? श्रध्दा ठेवा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर आणि प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करा अल्लाहच्या मार्गात आपल्या द्रव्यांनिशी आणि आपल्या प्राणानिशी. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही समजून घेतले.’’ (कुरआन ६१: १०-११)
कुरआनच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी श्रध्दा जिहादशिवाय अशक्य आहे. पारलौकिक जीवनात मुक्ती जिहादव्यतिरिक्त प्राप्त होऊ शकत नाही. वरील कुरआनोक्ती फक्त सशस्त्र जिहादचाच उल्लेख करीत आहे. परंतु इतर प्रकारच्या जिहादचासुध्दा उल्लेख कुरआनात आलेला आहे. परिस्थितीनुरूप संघर्ष हे श्रध्देचे प्रमाण आहे.
आंतरिक जिहाद: कुरआनने आंतरिक जिहादला श्रध्दा आणि अश्रध्देदरम्यानची सीमारेषा ठरवले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आंतरिक जिहादला श्रध्देची ओळख म्हटले आहे. ज्या हृदयात सदाचाराचा फैलाव करण्याची आणि दुराचाराचा नायनाट करण्याची प्रकट इच्छा शिल्लक नसेल तर असे हृदय हे अश्रध्देच्या अंधकाराने काळेकुट्ट झालेले असते. ही खऱ्या श्रध्दावंताची ओळख आहे की त्याला दुराचार सहन होत नाही. तो वाणीने त्याचा धिक्कार करू शकत नसेल तर मनाने त्यास वाईट समजून धिक्कार करतो. अर्थातच ही श्रध्देची शेवटची पायरी आहे. मुस्लिमांमध्येही शेवटच्या पायरीची श्रध्दासुध्दा नसेल तर अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या नजरेत तो मुस्लिम नाही.
आंतरिक जिहाद हा श्रध्देशी निगडीत अशा प्रकारे आहे की त्याला श्रध्दावंताचे, श्रध्दावंत लोकसमूहाचे आणि राष्ट्राचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. ज्या राष्ट्राचे धार्मिक लोक सदासर्वकाळ त्यांच्या धर्मनिष्ठेचाच विचार करतात आणि दुराचाराकडे त्यांचे डोळे बंद करून ठेवतात तेव्हा त्यांची धर्मनिष्ठा मूल्यहीन ठरते. असे राष्ट्र वाळलेल्या गवताच्या जंगलासारखे जळत राहाते. जेव्हा अशा राष्ट्रावर प्रकोप येतो तेव्हा दुष्ट आणि धार्मिक लोक दोन्ही नष्ट होतात. थोडे काही यासाठी बचावतात की त्यांनी त्यांच्या परिने दुराचाराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना विनाशापासून वाचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले होते. या दिव्योक्तीची साक्ष मानवी इतिहास देत आहे. कुरआन या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन करीत आहे,
‘‘त्या लोकांत जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत, असली भली माणसे का शिल्लक राहिली नाहीत ज्यांनी लोकांना जमिनीत हिसाचार माजविण्यापासून प्रतिबंधित केले असते? असले लोक निघाले तरी फारच थोडे ज्यांना आम्ही त्या लोकांमधून वाचविले.’’ (कुरआन ११: ११६)
प्रेषित मुहम्मद (स.) यानी मुस्लिमांना बजावून सांगितले आहे,
‘‘शपथ आहे त्याची ज्याच्या मुठीत माझा प्राण आहे तुम्ही सदाचाराचा आदेश द्या आणि दुराचाराचा नाश करा अन्यथा अल्लाह निश्चितच कठोर शिक्षा देईन आणि तुम्ही प्रार्थना करा तर ती कबूल होणार नाही.’’
वरील हदीस (प्रेषित कथन) आणि इतर आणखी काही प्रेषितवचने खालील दिव्योक्तीला अधिक स्पष्ट करतात.
‘‘आणि सावध राहा त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम प्रामुख्याने फक्त त्याच लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही. ज्यांनी तुमच्यापैकी पाप केलेले असेल आणि जाणून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.’’ (कुरआन ८: २५)
कठोरतम शिक्षा इस्राइलच्या संततीवर कोसळली जेव्हा ते त्यांच्या आंतरिक जिहादच्या कर्तव्याला पूर्ण विसरले. त्यांचा समाज इतक्या खालच्या स्थितीला जाऊन पोहचला की दुराचार तेथे काँग्रेस गवतासारखा फोफावत गेला आणि दुराचाराचा नाश करण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाही. दिव्य कुरआन त्यांच्या स्थितीला स्पष्ट करीत आहे,
‘‘इस्राईलपैकी ज्या लोकांनी अश्रध्देचा मार्ग अवलंबिला ते दाऊद (अ.) आणि मरयमपुत्र येशू यांच्या वाणीद्वारे धिक्कारले गेले कारण ते दुराचारी झाले होते व मर्यादा भंग करू लागले होते, त्यांनी एकमेकांना अफत्यापासून परावृत्त करण्याचे सोडून दिले होते, वाईट आचरण होते त्यांचे जे त्यांनी अंगिकारले.’’ (कुरआन ५: ७८-७९)
या प्रकारचा जिहाद (आंतरिक जिहाद) अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे श्रध्दा (ईमान) टिकून राहते. धर्माची साक्ष ही साक्ष देण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यावर अवलंबून असल्याने आंतरिक जिहादवर त्याची सफलता अवलंबून आहे. जर इस्लामची साक्ष देण्यास असफल ठरलात आणि दुसरीकडे इस्लामवर प्रेम प्रदर्शित करण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले तर त्यांची अशी साक्ष परिणामहीन ठरते. अशा प्रकारचे अनुयायी इस्लामचे नव्हे तर अश्रध्देचे साक्षी बनून राहतात. अशा स्थितीत जगाला वाटते की हा इस्लामच्या श्रेष्ठत्वाचा आणि अभिमानाचा फक्त देखावा आहे. जगाची इस्लाम आणि त्याच्या अनुयायींबद्दलची हीच धारणा बनते. म्हणून जगाला इस्लामची साक्ष देण्याअगोदर त्याने आपला आंतरिक जिहाद स्वतःशी करून प्रथमतः आपल्यातील दुष्प्रवृत्तींचा नाश करून जगापुढे इस्लामी आदर्श बनले पाहिजे.

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget