जन्नत आणि जहन्नम

माननीय अबू हुरैरा (र.) कथन करतात की एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘हे अल्लाहेच प्रेषित (स.)! एक भगिनी नफील (अनिवार्य नसलेली) नमाज अदा  करण्यात, नफील रोजे ठेवण्यात आणि दानधर्म करण्यात खूप प्रसिद्ध आहे. मात्र ती वाचाळपणाने शेजाऱ्यांना त्रास देते. तिच्याविषयी आपली काय भूमिका आहे?’’
पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘ती जहन्नममध्ये (नरकाग्नीत) टाकली जाईल.’’ 
मग त्या व्यक्तीने विचारले, ‘‘दुसरी एक भगिनी नफील नमाज कमी अदा करते, नफील रोजे (उपवास) सुद्धा कमीच ठेवते आणि दानधर्मही कमीच करते. पनीरचे काही तुकडे गरिबांना  देते. मात्र ती आपल्या वाचेने शेजाऱ्यांना त्रास देत नाही. (शेजाऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होते.) तिच्याविषयी आपण काय म्हणाल?’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ती जन्नतमध्ये (स्वर्गात) जाईल.’’ (मिश्कात)
निरुपण
या हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चारित्र्यसंपन्नतेची महत्ता खूप स्पष्टपणे विषद केली आहे. नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्म याबरोबरच शेजाऱ्यांशी व्यवहार कसा  हे, ही बाब फार महत्त्वाची आहे. एक भगिनी पाच वेळच्या अनिवार्य नमाजीव्यतिरिक्त नफील नमाजही खूप अधिक अदा करते. रमजानच्या अनिवार्य उपवासांव्यतिरिक्त नफील रोजेही  खूप ठेवते आणि दानधर्मही खूप करते. मात्र तिच्यात एक दुर्गुण आहे तो हा की ती आपल्या वाचाळतेने शेजाऱ्यांना त्रास देते. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत नाही. या दुर्गुणामुळे  तिची नफील नमाज, नफील रोजे व दानधर्म तिला जहन्नम अर्थात नरकाग्नीत जाण्यापासून रोखणार नाहीत.
मात्र दुसरी भगिनी नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्मात जरी पहिलीपेक्षा कमी असली तरी शेजाऱ्यांशी असलेल्या सद्व्यवहारामुळे ती जन्नत अर्थात स्वर्गात जाईल! 
बोध हा आहे की माणसाची चारित्र्यसंपन्नता ठरविण्यासाठी केवळ नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्मच पुरेसे नाहीत तर शेजाऱ्यांशी त्याचा प्रत्यक्ष व्यवहार खूप खूप महत्त्वाचा  आहे.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget