उपासना

उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला नियंत्रित केले नाही, तर हा संबंध तुटूही शकतो. प्रारंभिक काळातील पुरुषांप्रमाणे महिलावर्गातसुद्धा उपासनेची फार आवड होती. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सर्व पत्नीं या बाबतीत विशेष उल्लेखनीय होत.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश यांच्या बाबतीत माननीय उम्मे सलमा (र) म्हणतात -
‘‘त्या एक पुण्यशील, फार अधिक उपवास करणाऱ्या आणि रात्री खूप उपासना करणाऱ्या महिला होत्या.’’ (तब्काते इब्ने साद - ८ : १०८)
माननीय आयेशा (र) म्हणतात -
‘‘मी धर्माच्या बाबतीत ईशभीरूतेत, खरेपणा, सुसंबंधात आणि दान-धर्मात त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कोणतीही स्त्री पाहिली नाही.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१६)
एका प्रसंगी खुद्द प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुद्धा त्यांच्या पुण्यशीलता व ईशभीरूतेची साक्ष दिली आहे. जसे त्यांनी माननीय उमर (र) यांना सांगितले -
‘‘जैनब बिन्ते जहश एक चित्त, एकाग्र व अल्लाहचे भय बाळगणाऱ्या आहेत.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१७)
नमाजचा इतमाम
उपासना प्रकारात नमाजचे फार महत्त्व आहे. त्याच्या काही अटी व शिष्टाचार आहेत. त्याकडे लक्ष दिल्याशिवाय नमाजचा हक्कही अदा होऊ शकत नाही आणि त्याचा पूर्ण लाभही घेणे शक्य नाही. या अटीपैकी एक अट अशी आहे की नमाज योग्य वेळेतच अदा केली जावी.
माननीय अनस (र) यांच्या आईने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, रात्री इशाच्या नमाजपूर्वीच मला झोप येऊ लागते. (त्यामुळे नमाज जाण्याचे भय राहते.) प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘अनसच्या आई ! नमाज लवकर अदा करीत जा. जेव्हा रात्रीचा अंधार सर्वत्र पसरतो तेव्हा इशाची वेळ होते. त्यावेळी तुम्ही अदा करीत जा. तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही.’’ (असदुलगाबा - ५ : ४६६)
यावरून कल्पना येते की, त्या नमाजचा किती इतमाम करीत असत. त्यांना याची चिता होती की, एखादेवेळी त्यांची नमाज अवेळी होता कामा नये.
मैमून बिन मेहरान म्हणतात की, ‘‘नमाजच्या वेळी जेव्हा जेव्हा मी माननीय उम्मे दर्दा (र) यांना भेटण्यास गेलो, तेव्हा त्यांना नमाजच्याच स्थितीत पाहिले.’’ (तहजीबुल असमा वल्लुगात - २ : ३६१)
जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये सम्मिलित होणे
स्त्रियांनी मस्जिदमध्ये जमाअतसह नमाजमध्ये सामील होणे आवश्यक नाही. त्यांच्यासाठी अधिक श्रेयस्कर हेच आहे की, त्यांनी घरीच नमाज अदा करावी. परंतु जमाअतसह नमाज अदा करण्याचे फार मोठे लाभ आहेत. जर परिस्थिती अनुकूल असेल आणि कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल, तर त्या मस्जिदमध्ये जाऊ शकतात. याच कारणास्तव शरीअत (इस्लामी धर्म-कायदा) ने एकीकडे त्यांना घरीच नमाज अदा करण्याची प्रेरणा दिली, तर दुसरीकडे परुषांना सांगितले की, ‘‘त्यांनी इच्छिले तर मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका.’’ माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
‘‘तुमच्यापैकी कोणालाही त्याच्या पत्नीने मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागितली तर तिला मनाई करू नये.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन या शब्दांतदेखील आलेले आहे -
‘‘मस्जिदमध्ये महिलांचा जो भाग आहे त्यापासून त्यांना रोखू नका.’’ (मुस्लिम - किताबुस्सलात)
आणखी एका कथनाचे शब्द असे आहेत,
‘‘आपल्या स्त्रियांना मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका; परंतु त्यांची घरेच त्यांच्यासाठी अधिक चांगली आहेत.’’ (अबू दाऊद, किताबुस्सलात)
ही परवानगी जास्त करून रात्रीच्या (इशा) व पहाटेच्या फजरच्या नमाजसंबंधी आहे. कारण असे की, हे कथन खालील शब्दांसमवेत उद्धृत केले गेले आहे.
‘‘जेव्ह तुमच्या स्त्रिया रात्री मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागतील तेव्हा त्यांना परवानगी द्या.’’ (बुखारी, किताबुलअजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
यावरून हे लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात विशेषतः इशा आणि फजरच्या नमाजमध्ये स्त्रियांना सामील होण्याची परवानगी होती. कथनावरून हे देखील कळते की, वास्तविकतः त्या या नमाजमध्ये सामील होत असत. खाली काही कथन उद्धृत केले जात आहेत -
  1. माननीय आयेशा (र) म्हणतात -
    ‘‘प्रेषित मुहम्मद (स) हे फजरची नमाज इतक्या अंधारात अदा करीत असत की, स्त्रिया चादरी गुंडाळून आपल्या घरी परत येत असत आणि अंधारामुळे ओळखल्या जात नसत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम किताबुल मसाजिद)
  2. माननीय उम्मे सलाम (र) म्हणतात -
    ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात स्त्रिया फर्ज नमाजचा सलाम फेरताच उभ्या राहत असत आणि प्रेषित मुहम्मद (स) व त्यांच्या समवेत जे पुरुष नमाज अदा करीत, ते आपल्या जागी जोपर्यंत अल्लाह इच्छील तोपर्यंत बसून राहत (जेणेकरून स्त्रियांनी मस्जिदमधून प्रथम निघून जावे) आणि जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) उठत, तेव्हा ते सुद्धा उठत असत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुल मसाजिद)
  3. माननीय अबू कतादा अन्सारी (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
    ‘‘मी नमाजसाठी उभा राहतो आणि इच्छितो की, त्यात कुरआनचे दीर्घ पठन करावे. इतक्यात एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकतो, तेव्हा नमाज संक्षिप्त करतो. ही गोष्ट चांगली वाटत नाही की, मी त्याच्या आईला त्रासात घालावे.’’ (पूर्वीचे प्रमाण)
  4. एकदा इशाच्या नमाजमध्ये असाधारण विलंब झाला. प्रेषित मुहम्मद (स) नमाज पढविण्यासाठी खोलीतून बाहेर आले नाहीत. माननीय उमर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना सूचना मिळावी म्हणून मोठ्या आवाजात सांगितले की, स्त्रिया व मुले झोपी गेली. हे ऐकून प्रेषित मुहम्मद (स) नमाजसाठी आले. (प्रमाण मागील)
    जैनबुस्सकफया कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
    ‘‘जेव्हा तुमच्यपैकी एखादी स्त्री इशाच्या नमाजमध्ये सामील होईल, तर तिने त्या रात्री सुगंधाचा वापर करू नये.’’ (मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन माननीय अबू हुरैरा (र) द्वारेदेखील झालेले आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या स्त्रीने सुगंधाचा उपयोग केला असेल तिने आमच्या समवेत इशाच्या नमाजमध्ये सामील होऊ नये.’’ (प्रमाण मागील)
या कथनावरून असे कळते की, स्त्रिया इशा आणि फजरच्या नमाजसाठी मस्जिदमध्ये सुद्धा जात असत, जेणेकरून त्यांना जमाअतसमवेत नमाज अदा करता यावी. असे शक्य आहे की, या नमाजमध्ये तरुण व वयस्कर हर प्रकारच्या स्त्रिया सामील होत असाव्यात. अन्य नमाजमध्ये विशेषकरून वयस्क स्त्रिया सामील होत असाव्यात. माननीय उम्मे सलमा बिन्ते अबू हकीम म्हणतात की,
‘‘मी पाहिले की म्हाताऱ्या स्त्रिया प्रेषित मुहम्मद (स) समवेत फर्ज नमाज अदा करीत असत.’’ (अलइस्तीआब - ४ : ३१७

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget