कष्टाची कमाई

आदरणीय मिकदाम इब्ने मअदी करब (रजि.) म्हणतात, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या अन्नापेक्षा श्रेष्ठ अन्न कधी कोणी खाल्ले नाही. प्रेषित  दाऊद (अ.) सुद्धा स्वत:च्या कष्टाच्या कमाईतून खात असत.’’ (बुखारी)

निरुपण
चरितार्थासाठी प्रत्येकाला कमावणे अपरिहार्यच आहे. मात्र ही कमाई कष्टाने आणि इमानेइतबारे कमावलेली असावी. ही स्पष्ट ताकीद इस्लामने दिली आहे. माणसासाठी श्रेष्ठतम आहार  तो आहे जो त्याने स्वत: कष्टाने व इमानदारीने कमाविलेला असावा. त्यापेक्षा श्रेष्ठ आहार दुसरा कुठलाच नाही. संसार करण्यासाठी कमावणेसुद्धा उपासनाच आहे. बऱ्याच लोकांचा  गैरसमज आहे की संसार करणे, कमावणे इ. धार्मिक कामे नव्हेत. हा गैरसमज दूर करण्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदरणीय प्रेषित दाऊद (अ.) यांचे उदाहरण दिले की  अल्लाहचे महान प्रेषित असूनही तेसुद्धा कष्टाची कमाई करत असत. ते लोहारकाम करून अर्थार्जन करत असत.
माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यासंबंधी इस्लामने सर्वाधिक प्राधान्य कष्टाच्या कमाईला दिले आहे. ‘हरामच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेच सत्कर्म अल्लाह  स्वीकृत करणार नाही.’ अशी पैगंबर (स.) यांची ठाम भूमिका आहे.
मात्र सध्या लोक कष्टाची कमाई की हरामाची याची यत्किंचितही पर्वा करत नाहीत. नव्हे, नंबर एक व नंबर दोन यात फरकही करायला तयार नाहीत! पैसा हवा, मग तो नंबर एकचा  असो की नंबर दोनचा! हे सद्य समाजमन आहे.
शाकाहार आणि मांसाहाराचेच उदाहरण घेतले तर कष्टाचा आणि हरामाचा हा विचारच लोक करत नाहीत. इस्लामने शाकाहारालाही मान्यता दिली आहे आणि मांसाहारालाही! मात्र  कुठल्याही परिस्थितीत तो आहार कष्टाचा, मेहनतीचा, इमानेइतबारे कमावलेला असावा, हे अनिवार्य ठरवले आहे.
एका शाकाहारी कुटुंबात चर्चा करताना मी हा मुद्दा उपस्थित केल्यावर त्या कुटुंबाने प्रांजळपणे मान्य केले की, हो! सध्या समाजाचा, विशेषकरून तरुण पिढीचा कल हरामाच्या  कमाइकडेच अधिक आहे. हराम आणि हलालची चिंता कुणालाच नाही. कमाईच जर हरामाची, लबाडीची, बेइमानीची असेल तर अशा शाकाहाराला काय अर्थ आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘जोडोनिया धन। उत्तमची व्यवहारे।
उदास विचारे। वेच करी।’’


- संकलन : डॉ. सय्यद रफीक
Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget