अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही

अम्र बिन अनसा (रजी.) यांचे निवेदन आहे की, मी प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याजवळ मक्का येथे प्रेषित्वाच्या सुरूवातीच्या काळात गेलो. मी विचारले की, आपण काय आहात. ह.  मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, मी अल्लाहचा प्रेषित आहे. मी म्हणालो, प्रेषित काय असतो? प्रेषितांनी (स.) यांनी सांगितले, अल्लाहचा संदेश त्याच्या भक्तांपर्यंत पोहोचविणारा  प्रेषित असतो. मी विचारले, कोणता संदेश देऊन अल्लाहने आपणास पाठविले आहे? प्रेषित (स.) यांनी सांगितले, मला सर्वश्रेष्ठ अल्लाहने या हेतूने पाठविले आहे की, मी लोकांना नातेवाईकांशी सद्वर्तन करण्याची शिकवण द्यावी, मुर्तीपूजा नष्ट करावी आणि अल्लाहची एकेश्वरता अंगिकारली जावी, त्याच्यासह दुसऱ्या कोणास सहभागी न केले जावे. (हदीस - मुस्लीम)

भावार्थ-
हे हदीस वचन प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या आवाहनाचे मुलभूत तत्त्व दर्शविते. आवाहन हे आहे की ईश्वर आणि दासांच्या संबंधांना उचीत आधारावर कायम केले जावे. अर्थात  ईश्वराच्या सत्ताधिकारात कोणाला सहभागी न केले जावे, आणि फक्त ईश्वराचीच उपासना केली जावी. फक्त त्याचेच आज्ञापालन केले जावे. मानवांच्या दरम्यान उचीत संबंधांचा  आधार विश्वबंधुत्व आहे. म्हणजे समस्त मानव एकाच मातापित्याची संतती आहे, आणि सत्यार्थाने हे सर्व आपसात बांधव आहेत. सख्ये भाऊ यास्तव सर्वांनी एकमेकांशी सहानुभूती  राखली पाहीजे. एकमेकांचे दु:ख दूर केले पाहीजे. निराधार व लाचार बांधवांची मदत केली पाहीजे. एखाद्यावर अन्याय, अत्याचार होत असेल तर सर्वांनी मिळून अत्याचाऱ्याविरूद्ध उठून  उभे राहिले पाहीजे. कोणी अचानक संकटात सापडल्यास इतरांच्या हृदयात वेदना उठली पाहीजे, त्याच्या संकटाचे निवारण करण्यासाठी धाव घेतली पाहीजे.
प्रेषित आवाहनाचे दोन मुलाधार आहेत. एक म्हणजे ‘एकेश्वरवाद’ अर्थात एका ईश्वराची उपासना, आज्ञापालन करणे. दुसरे ‘सार्वत्रीक दया’. इथे ही गोष्ट दृष्टीआड होता कामा नये की  मूळ तत्त्व ‘एकेश्वरवाद’ आहे. दुसरा आधार तर एकेश्वरवादाची आवश्यक निकड आहे. जो ईश्वरांशी प्रेम करेल, तो त्याच्या दासांशी (मानवांशी) ही प्रेम राखेल. कारण ईश्वरानेच आपल्या दासांशी (अर्थात सर्व मानवांशी) प्रेम राखण्याचा आदेश दिला आहे.
अर्थात इस्लामचा आधार व मध्यवर्ती बिंदू, ज्याविना धर्माचा कोणताही भाग उत्तम स्थितीत राहू शकत नाही, तो हा की माणसाने साक्ष द्यावी की, अल्लाहखेरीज कोणीही उपास्य नाही  (म्हणजे एकेश्वरवाद) आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहे. (प्रेषितत्त्व). आणि अल्लाहतर्फे आलेल्या विधी नियमाला (अर्थात पवित्र कुरआनला) आत्मसात करणे. ईश्वराची मूळ शिकवण आहे की, माणसाला माणसाच्या दास्यत्वातून मुक्त करून, ईश्वराच्या दास्यत्वात आणले जावे. अन्याय, अत्याचारपूर्ण जीवन व्यवस्थेतून बाहेर काढून इस्लामच्या न्यायपूर्ण छत्रछायेखाली आणावे. तात्पर्य, अल्लाहने आम्हाला आपला जीवनधर्म (इस्लाम) प्रदान करून जगात पाठविले आहे. यासाठी समस्त मानवांना ईश धर्माकडे, जीवन पद्धतीकडे बोलवावे.

Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget