माणसाला माणूस बनविण्यासाठीच सामाजिक ऐक्य सोहळा –डॉ. सय्यद

देहूगाव (वकार अहमद अलीम)-
आज सर्वत्र चंगळवाद बोकाळला आहे. माणसाला माणसाची ओळख राहिली नाही. आज देवधर्माच्या नावाखाली द्वेष पसरविला जात आहे. वास्तविक पाहता हिंदू, मुस्लिम, शीख,  खिश्चन व बौद्धांचा मालिक एकच आहे. समस्त मानवजात एकाच ईश्वराची लेकरे आहेत, पण ही वस्तुस्थिती माणूस विसरत चालला आहे. त्यामुळे सर्वत्र द्वेष, हिंसाचार बोकाळला  आहे. माणसाला माणूस बनविण्यासाठीच सामाजिक ऐक्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे भावपूर्ण कथन प्रसिद्ध इस्लामी विद्वान तसेच संत साहित्याचे अभ्यासक डॉ.  रफीक सय्यद पारनेरकर यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देहूगाव येथे गुरुवार दि. २१ मार्च २०१९ रोजी सायं. ६ वा. जगद्गुरू तुकोबाराय बिजेनिमित्त सामाजिक ऐक्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या  वेळी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. रफीक सय्यद बोलत होते. आळंदी येथील ह.भ.प. डॉ. नारायण जाधव महाराज यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. येथील अभंग मंगल कार्यालयासमोर ऐक्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहूगाव, राष्ट्रीय संत गुरुवर्य शेलारमामा प्रतिष्ठान देहूगाव, जमाअत-ए-इस्लामी  हिंद पिंपरीचिंचवड शहर शाखा, ह. अनगढशाहबाबा (रह.) उर्स कमिटी देहूगाव, अष्टविनायक मित्रमंडळ देहूगाव, आई प्रतिष्ठान देहूगाव, निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर, श्रीसंत भगवान व  संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळा समिती देहू, मुस्लिम जमात हेदू, संत सावता माळी प्रतिष्ठान माळीनगर, धनगर समाज युवा मंच देहूगाव, संत सेना महाराज युवामंच, देहूगाव, संत  गोरोबा देहूगाव, प्रज्ञा बुद्धविहार कमिटी देहूगाव, वाघेश्वर विकास प्रतिष्ठान वाघोली, वाघेश्वर मुस्लिम वेल्फेअर वाघोली आदि विविध संघटनांद्वारा संयुक्तरित्या सामाजिक ऐक्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्रमुख वक्ते म्हणून फादर एनटीटीएच कॅथॉलिक चर्च आकुर्डी रेल्वे स्टेशनचे रेव्हरेंट सुखानंद डोंगरदिवे, त्रिरत्न बौद्ध महासंघ देहूरोडचे धम्माचारी अनोमकिर्तीजी, ह.भ.प. सोपान  औटी महाराज, गुरुग्रंथी द्वशापितसिंग पंजवाणी, मानसरोवर गुरुद्वार वाल्हेकरवाडीचे हशमतसिंग भगतसिंग पंजवाणी इत्यादी मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. सय्यद यांनी तुकोबांचे अनेक अभंग सादर करीत अफाट श्रोत्यांसमोर ऐक्याची गरज स्पष्ट केली.
‘‘अवघी एकाचीच वीण। तेथे कैचे भिन्नाभिन्न।।
भेदाभेद  भ्रम अमंगळ।
कोणाही जिवाचा न घडो मत्सर।
वर्म सर्वेश्वरा पुजनाचे।। (संत तुकाराम महाराज)’’

इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, ‘‘मानवजात एकाच मातापित्याची संतान असून सर्व समाज बंधुभगिनी आहेत. ईश्वराजवळ श्रेष्ठ तो आहे जो सर्वाधिक   ईशभीरू (चारित्र्यसंपन्न) आहे. विविध धर्मीय संतांचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. सय्यद म्हणाले, समुद्राचे पाणी हजारो वर्षांपासून आहे. पण ते कधीही सडत नाही. कारण त्यात मीठ  आहे. मानवजात ही सडू नये म्हणून विविध संत हे मिठासारखे कार्यरत आहेत. आजारी मुस्लिम व्यक्तीला हिंदूचे रक्त चालते, किडनीग्रस्त बौद्धाला खिश्चनाची किडनी चालते,  गरजवंताला शीख बांधवांचे काळीज प्रत्यारोपण चालू शकते, रक्त कुणाचेही कोणालाही चालू शकते तर एखाद्याचा स्पर्श का चालत नाही? असा मर्मभेदी प्रश्न विचारून डॉ. सय्यद  म्हणाले, जनावरेही आपापल्यात भेदाभेद करीत नाहीत, तर माणसाने भेदाभेद का करावा? भेदाभेद संतांनी संपुष्टात आणला. त्यांच्या महान कार्याची आठवण करण्याचे काम आज या  सामाजिक ऐक्य सोहळ्याद्वारे होत असल्याचे सांगून डॉ. सय्यद यांनी उपस्थित जनसमूहास सद्गदीत केले.
कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष म्हणून थोर समाजसेवक पद्धभूषण अण्णा हजारे तब्बेत अचानक बिघडल्याने येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी पाठविलेल्या संदेशात या ऐक्य सोहळ्याद्वारे सर्वधर्मीयांचे प्रेम जोपासण्याचे अत्यंत मंगलमय कार्य महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आणि आपण उपस्थित न राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. राजकारणी लोकांमुळेच सामाजिक  ऐक्य लोप पावत आहे, असा घणाघाती हल्ला चढवून कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ह.भ.प. नारायण जाधव महाराज यांनी मरणोत्तर जीवनातील यशासाठी सर्वांचे एकच मत असणे  जरुरी असल्याचे सांगून आज कार्यक्रमासाठी विविध धर्मीय वक्ते व श्रोते, वेगवेगळे नसून सर्वजण एकच आहोत. सर्वांची शरीरे जरी भिन्न असली तरी आत्मा एकच आहे. संत तुकाराम  महाराज आणि ह. अनगढशाह (रह.) यांची मैत्री, प्रेम जगजाहीर आहे. या दोन्ही संतांप्रमाणेच आम्ही सर्वांनी परस्पर प्रेम, विश्वास आणि सामंजस्य राखणे हे जरुरीचे आहे. ‘एकमेका  साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असा आशावाद व्यक्त करताना जाधव महाराजांनी सामाजिक ऐक्य काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जमाअत- ए-इस्लामी हिंद वाल्हेकरवाडी  शाखेचे सदस्य अजिमोद्दीन शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना विषयाच्या गांभीर्याला सुबोध वाणीमुळे वेगळ्याच उंचीवर नेले.
Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget