अवैध मृत्युपत्र

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्या पुरुषाने आणि त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीने आपल्या वयाची साठ वर्षे अल्लाहच्या  उपासनेत व्यतीत केली, मग त्यांच्या मृत्यूची घटिका जवळ येते तेव्हा मृत्यूपत्राद्वारे वारसांना नुकसान होत असेल तर त्या दोघांकरिता नरक निश्चित होते.’’ त्यानंतर हदीसचे  कथनकार अबू हुरैरा (रजि.) यांनी हदीसच्या समर्थनार्थ या आयतचे पठण केले, ‘मिम्बअदि वसिय्यतिन’ पासून ‘ज़ालिकल फ़ौजुल अ़जीम’पर्यंत. (हदीस : मुसनद अहमद)

स्पष्टीकरण
सदाचारी मनुष्यदेखील आपल्या नातेवाईकांवर नाराज होतो आणि त्याला वाटू लागते की संपत्तीपैकी त्याच्या नातेवाईकांना काहीही मिळू नये. त्याच्या मृत्यूसमयी संपूर्ण संपत्तीमधून  एकाही नातेवाईकाला काहीही प्राप्त होऊ नये असे मृत्यूपत्र तयार करून घेतो. खरे तर अल्लाहचा ग्रंथ आणि पैगंबरांनी सांगितलेल्या उपदेशानुसार त्या नातेवाईकांना संपत्तीमधून त्यांचा  वाटा मिळायला हवा होता. अशाप्रकारच्या पुरुष आणि स्त्रीबाबत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते साठ वर्षांपर्यंत अल्लाहची उपासना करूनदेखील शेवटी नरकावासी बनतात.’’

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांनी हदीसच्या कथनाच्या समर्थनार्थ ज्या आयतीचे पठण केले ती ‘सूरह निसा’च्या दुसऱ्या रुकूमध्ये आहे. यात अल्लाहने नातेवाईकांचा वाटा निश्चित  केल्यानंतर सांगितले, ‘‘हे वाटे मयत व्यक्तीच्या मूत्यूपत्रानुसार संपत्तीचे वाटप आणि कर्जफेड केल्यानंतर वारसांना देण्यात येतील.’’ त्यानंतर अल्लाह म्हणतो, ‘‘खबरदार! मृत्यूपत्र  करून वारसांना नुकसान पोहोचवू नका, हा अल्लाहचा आदेश आहे आणि अल्लाह ज्ञान व बुद्धी बाळगतो. त्याने बनविलेला हा कायदा चुकीचा नसून ज्ञानावर आधारित आहे आणि त्यात  बुद्धिमत्ता कार्यरत आहे. अन्याय व अत्याचाराचा थांगपत्ताही नाही, म्हणूनच हा कायदा मन:पूर्वक मान्य करा.’’ यानंतर अल्लाह म्हणतो, ‘‘या अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादा आहेत  आणि जे लोक अल्लाह व पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकतील त्यांना अल्लाह अशा नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल करील ज्याच्या खालून झरे वाहत असतील आणि ज्यात ते निरंतर  वास्तव्य करतील आणि हीच मोठी सफलता आहे आणि जे लोक अल्लाह आणि पैगंबरांची अवज्ञा करतील आणि अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन करतील त्यांना नरकात  दाखल करील, ज्यात ते कायमस्वरूपी राहतील आणि त्यांच्यासाठी अपमानित करणारी शिक्षा असेल.’’ माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,  ‘‘जो आपल्या वारसाला संपत्तीपासून वंचित करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला स्वर्गाच्या संपत्तीपासून वंचित करील.’’ (हदीस : इब्ने माजा)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कोणा एका वारसाच्या नावे करण्यात आलेले मृत्यूपत्र दुसऱ्या वारसांच्या इच्छेविरूद्ध जारी होणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय सअद बिन  अबू वक्कास (रजि.) यांच्या कथनानुसार, मी आजारी होतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मला पाहण्यासाठी आले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही मृत्यूपत्र केले आहे काय?’’  मी म्हटले, ‘‘होय!’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘किती संपत्तीचे मृत्यूपत्र केले आहे?’’ मी म्हणालो, ‘‘अल्लाहच्या मार्गात मी आपल्या संपूर्ण संपत्तीचे मृत्यूपत्र केले आहे.’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘मग तुम्ही आपल्या मुलांसाठी काय ठेवले आहे?’’ मी म्हणालो, ‘‘ते श्रीमंत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘नाही! असे करू नका. अल्लाहच्या मार्गात  आपल्या संपत्तीच्या दहाव्या भागाचे मृत्यूपत्र करा.’’ सअद बिन अबू वक्कास (रजि.) म्हणतात की मी एकसारखे सांगत होतो की हे पैगंबर! हे खूपच कमी आहे, त्यात आणखी वाढ  करावी.’’ शेवटी पैगंबर म्हणाले, ‘‘बरे! आपल्या संपत्तीच्या एक तृतियांश भागाचे मृत्यूपत्र करा आणि हे खूप आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget