इस्लामचे आधारस्तंभ

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि अल्लाहु तआला अनहु) (रजि.) निवेदन करतात, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
इस्लामचे आधारस्तंभ पाच आहेत. १. अल्लाहशिवाय दुसरा कुणी ईश्वर नाही व मुहम्मद (स.) हे त्याचे दास व प्रेषित आहेत, या वस्तुस्थितीची साक्ष देणे.
“अशहदु अला ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलूहु."
(मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि प्रेषित आहेत.) २. नमाज कायम करणे. ३. जकात देणे. ४. हज करणे. ५. रमजानचे रोजे करणे.
(बुखारी-मुस्लिम) प्रेषितांनी इस्लामला इमारतीची उपमा देऊन तिचे आधारस्तंभ कोणते हे येथे स्पष्ट केले आहे.
इस्लाममध्ये सर्वप्रथम श्रद्धेला महत्त्व आहे. अल्लाह एक आहे, त्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही आणि प्रेषित मुहम्मद (स.) हे त्याचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत, या सत्याचा स्वीकार करून तशी प्रतिज्ञा करणे म्हणजे श्रद्धा बाळगणे. माणसाच्या आचार, विचार व उच्चारावरून ही गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे की, तो अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासही ईश्वर मानीत नाही. त्याचप्रमाणे तो प्रेषित मुहम्मद (स.) यांना अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित मानतो.
अल्लाहला एकमेव ईश्वर मानणे याचा अर्थ अल्लाह हा एकटा साऱ्या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता, नियंता, शास्ता, त्राता आहे. तोच जीवन-मृत्यूचा आणि शेवटच्या निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे. त्याचीच उपासना, प्रार्थना, स्तुती व याचना केली पाहिजे. भक्ती व आज्ञापालन त्याचेच केले पाहिजे. त्याशिवाय कोणीही भक्ती व आज्ञापालनास पात्र नाही.

आदरणीय मुहम्मद (स.) हे अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत यावर श्रध्दा ठेवणे म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणे. अल्लाहने मानवाच्या शिकवण व मार्गदर्शनासाठी जी एक जागतिक व्यवस्था केली आहे त्यामधील ते शेवटचे प्रेषित आहेत. त्यांची शिकवण व त्यांचे मार्गदर्शन माणसावर बंधनकारक आहेत. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्यानुसार आचरण करणे इस्लाम आहे.
इस्लाममध्ये दिवसातून पाच वेळची नमाज (प्रार्थना) माणसावर बंधनकारक आहे. १. पहाटेची-फज्र २. दोनप्रहरची -जोहर ३. सायंकाळपूर्वीची-असर ४. सूर्यास्तावेळची-मगरिब व ५. रात्रीची-इशा. नमाज कायम करणे म्हणजे नमाजची व्यवस्था कायम करणे. स्वत: नियमितपणे जमाअतीबरोबर पाच वेळा नमाज अदा करणे आणि इतरांना नमाज अदा करण्यास प्रवृत्त करणे. नमाजीसाठी मसजिदींची व अन्य व्यवस्था करणे होय.
त्यागाशिवाय माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनत नाही. मालमत्तेबद्दल वाटणारे प्रेम व तिची हाव माणसाला सदाचारापासून दूर ठेवते आणि म्हणून अल्लाहने 'जकात' देणे माणसावर बंधनकारक ठरविले आहे. ठरविण्यात आलेल्या हिशोबाप्रमाणे माणसाने आपल्या मालमत्तेवर दरवर्षी जकात दिली पाहिजे. त्याचप्रमाणे ईशकार्यात सढळ हाताने खर्च केला पाहिजे. गोरगरिबांना व दीनदुबळ्यांना दानधर्म केला पाहिजे. माणसाने या सत्याचे स्मरण ठेवले पाहिजे की, त्याला जे काही लाभते ते अल्लाहच्या कृपेमुळेचलाभते.
प्रवासखर्चाची ऐपत असणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने आयुष्यातून एकदा हिजरी सनाच्या जिल्हज महिन्यात अरबस्थानातील मक्का शहरी जाऊन बैतुल्लाहचे-अल्लाहच्या काबागृहाचे दर्शन घेतले पाहिजे. त्याची जियारत करून सई, तबाफ करणे, अरफातला जाणे, कुरबानी करणे वगैरे विधी केले पाहिजेत. याला हज करणे म्हणतात.
पाचवे कर्तव्य हे आहे की, प्रत्येक स्त्री-पुरुषाने दरवर्षी रमजान महिन्यात महिन्याचे पुरे रोजे केले पाहिजेत. भल्या पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी वगैरे काहीही न घेता केला जाणारा उपवास म्हणजे रोजा.
अल्लाहने श्रद्धा बाळगल्यानंतर नमाज, जकात, हज व रमजानचे रोजे व चार धार्मिक जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. ही कर्तव्ये योग्यप्रकारे व जाणीवपूर्वक पार पाडली तर ती माणसाला आज्ञाधारक व सदाचारी बनवितात.
नमाज अल्लाहचे सतत स्मरण घडविते व त्यामुळे माणसास सरळमार्गावर राहण्यास मदत होते. जकात त्यागाची शिकवण देते. माणूस ईश्वराने दिलेले धन ईशकार्यात खुशीने खर्च करतो आणि त्याचे धन व मन निर्मळ होते. हजमध्ये माणसाला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. त्याला खर्चही करावा लागतो. आपल्या मुलाबाळांपासून व कारभारापासून निव्वळ अल्लाहच्या आज्ञेवरून तो दूर जातो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला दिव्यत्वाची प्रचिती घडते. रोजा, मनोनिग्रह घडवितो व अल्लाहचे भय बाळगून माणूस वाईट आचारविचारापासून दूर राहतो.
Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget