Latest Post

सुबह होती है शाम होती है 
उम्र यूं ही तमाम होती है
माणसाचे अर्धे जीवन नशीबावर आधारित असते तर अर्धे शिस्तीवर. शिस्तीवर आधारित जीवन अधिक महत्त्वाचे असते, कारण त्याच्याशिवाय माणूस नशिबाने मिळालेल्या संधींचा पूरेपूर उपयोग करून घेऊ शकत नाही. जगात आज जगण्याचे दोन सर्वमान्य उद्देश आहेत. एक जीवनाचा स्तर उंचवणे, दोन मनोरंजन. या दोन्ही उद्देशांच्या प्राप्तीसाठी पैशांची गरज असते. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी अधिकाधिक खर्च करण्यासाठी प्रेरित केले जाते. तर मनोरंजनामध्ये कोट्यावधी डॉलरची अनुत्पादक गुंतवणूक केली जाते. 
जगातील बहुतेक मुस्लिम लोक पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. त्यामुळे पश्चिमेने दिलेले जीवन जगण्याचे वर नमूद दोन्ही उद्देश्य त्यांनी नकळत स्विकारलेले आहेत व ते साध्य करण्यासाठी ते रात्रं-दिवस कष्ट करीत आहेत. वस्तूंवर प्रेम करीत आहेत तर माणसांचा उपयोग करीत आहेत. वास्तविक पाहता माणसांवर प्रेम करून वस्तूंचा उपयोग करणे अपेक्षित होते. 
पूर्वीच्या काळी जगात सर्वत्र गुलामगिरीची पद्धत रूढ होती. गुलामांची खरेदी-विक्री होत असे. त्यासाठी बाजार भरत असत. गुलाम हे शरिरानेच नव्हे तर मनाने सुद्धा गुलाम असत. अत्यंत दयनीय अवस्थेत जगावे लागत असले तरी स्वतंत्र होण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नसे. कोणी धाडस केलेच तर त्याचा अमानुष छळ करून कत्तल करण्यात येई, म्हणून गुलाम लोक स्वतंत्र होण्याची संधी मिळूनही प्रयत्न करत नसत. अपवादात्मकरित्या एखादा गुलाम कधीकाळी गुलामगिरीतून पळून जावून स्वतंत्र झालाच तर तो इतर गुलामांच्या नजरेत नायक ठरत असे व ही घटना इतर गुलामांसाठी उत्सवाची घटना मानण्यात येत असे. 
आजचे मुस्लिम सुद्धा पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. म्हणूनच एखाद्या मुस्लिमाने पाश्चिमात्य विधीमागे एखादे उच्चस्थान पटकाविले. उदाहरणार्थ ऑस्कर किंवा नोबेलसारखे पुरस्कार मिळविले, क्रिकेट किंवा टेनिसच्या रँकिंगमध्ये उच्च मानांकन मिळविले, चित्रपटामध्ये व्यावसायिक यश मिळविले तर बाकी मुस्लिमांना आनंदाचे भरते येते. त्यांच्यात उत्साह संचारतो. शाहरूख खान, सलमान खान, ए.आर. रहमान यांच्याबद्दल मुस्लिमांच्या मनामध्ये जो अभिमान आहे तो याच मानसिकतेतून आलेला आहे. कोणीही हा विचार करीत नाही की हे नाचे समाजामध्ये अनैतिकतेला प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे वर्तन इस्लामविरोधी आहे. ते आपले नायक होवूच शकत नाहीत. 
पाश्चिमातीकरण म्हणजे आधुनिकीकरण अशी आमची धारणा झालेली आहे, जी की चुकीची आहे. आज भारतीय मुस्लिमांची परिस्थिती अशी आहे की, 10 आशरा-ए-मुबश्शीरा (ते दहा भाग्यवान व्यक्ती ज्यांना अल्लाहने जीवंतपनी जन्नतची शुभवार्ता दिली होती) ची नावे एक टक्का मुस्लिमांना सुद्धा माहित नसतील. मात्र शाहरूख खान, सलमान खान सारख्यांची नावे त्यांच्या चित्रपटांच्या बारीक-सारीक तपशीलासहित बहुसंख्य मुस्लिमांना पाठ आहेत. 
जीवनमान उंचावणे गैर नाही. मात्र ते उंचावण्यासाठी, ” काही पण” करणे गैर आहे. भ्रष्ट पद्धतीने जीवनमान उंचावणे इस्लामला मान्य नाही. आज कुठले ना कुठले अनैतिक कृत्य केल्याशिवाय माणसाला गबर बनता येत नाही, हे कटू सत्य आहे. अमेरिका आणि युरोपची प्रगती जगातील गरीब देशांचे रक्त (अर्थ) शोषण करून झालेली आहे. भारतातही शहरांचा विकास ग्रामीण भागावर अन्याय करून झालेला आहे. आपल्या देशातच नव्हे तर जगात सुद्धा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता प्रस्थापित झालेली नाही. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ती शक्यही नाही. 
जीवनमान उंचावणे आणि मनोरंजन या प्रक्रिया सतत चालू असतात. त्यातून अनुत्पादक गोष्टींना अकारण महत्व प्राप्त होत जाते तर जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे महत्त्व कमी होत जाते. मुठभर लोकांच्या हाती त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पैसा जमा होतो. तर बहुसंख्य लोकांच्या वाट्याला फार कमी पैसा येतो. यातूनच अगोदर विषमता व नंतर वर्गकलह निर्माण होतो. समाजात नेहमी असे लोक मोठ्या संख्येने असतात जे आपल्या पोषणासाठी श्रीमंतांकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात. मात्र श्रीमंतांना त्यांची दया येत नाही. समाजात गरीबी कायम राहणे त्यांच्या हितासाठी आवश्यक असते. कारण त्यांच्या कारखान्यांना स्वस्तात मजूर मिळत असतात. याच मानसिकतेतून बहुसंख्यांना कायम गरीबीत ठेवण्याचे षडयंत्र रचले जाते. 
जीवन जगण्याचे खरे उद्देश्य
जीवनाचा स्तर सतत उंचवत ठेवणे व सतत मनोरंजनात व्यस्त राहणे हे मानवी जीवनाचे उद्देश्य असूच शकत नाही. ही बाब किमान साहेब-ए-शरियत (मुस्लिम) लोकांच्याही लक्षात येवू नये, यासारखे दुर्देव नाही. कुरआनने मानवजातीसाठी जगण्याचे जे उद्देश्य ठरवून दिलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे. 
1. ”मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी” (कुरआन : सुरे अज्जजारियात आयत नं. 56).  
या आयातीवरून स्पष्ट होते की, माणसाच्या जीवनाचे उद्देश्य अल्लाहची भक्ती हेच आहे. या ठिकाणी वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून स्पष्ट करू इच्छितो की, भक्ती या शब्दाचा अर्थ केवळ कलमा, नमाज, रोजा, जकात, हज इथपर्यंतच मर्यादित नाही तर या ठिकाणी जीवन जगण्याची अल्लाहला मान्य असलेली पद्धती अशा व्यापक अर्थाने भक्ती हा शब्द उपयोगात आणलेला आहे. जीवन जगताना अल्लाहने शरियाच्या माध्यमातून दिलेल्या आदेशांची अवहेलना होणार नाही याकडे लक्ष दिल्यास दुसऱ्यांना त्रास होत नाही व आदर्श समाजाची रचना होते. आदर्श समाजाच्या रचनेपेक्षा दूसरे कोणते महान उद्देश असूच शकत नाही. 
2. ”तुम्हा लोकांना जास्तीत जास्त आणि एकमेकापेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहाने बेसावध करून टाकले आहे. इथपावेतो की (याच चिंतेत) तुम्ही थडग्यापर्यंत पोहोचा. कदापि, नाही! लवकरच तुम्हाला कळून येईन. पुन्हा (ऐकून घ्या) कदापि नाही! लवकरच तुम्हाला कळून येईल. कदापि नाही! जर तुम्ही खात्रीचे ज्ञान म्हणून (या चालीच्या परिणामाला) जाणत असता तर (तुमचे वर्तन असे नसते). तुम्ही नरक पाहणारच. पुन्हा (ऐकून घ्या) तुम्ही अगदी खात्रीने नरक पहाल. मग नक्कीच त्या दिवशी या देणग्यां (जीवनात मिळालेल्या गोष्टीं) संबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल” (सुरे अत्तकासूर : आयत नं. 1 ते 8). 
या आयातींमध्ये कुठल्याही मार्गाने जास्तीत जास्त धन प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनैतिक उठाठेवी संबंधी सावध करण्यात आलेले आहे. या आयातींच्या शब्दरचनेमध्ये पुन्हा-पुन्हा ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून देण्यात आलेली आहे की, तुम्ही जीवनमान उंचवण्यासाठी उलट-सुलट मार्गाने आज जरी धन गोळा करण्यामध्ये यशस्वी झालात तरी एक दिवस तुम्हाला नक्कीच त्याच्या बदल्यात नरकात जावे लागेल. इमानधारकांच्या मनाचा थरकाप उडविण्यासाठी या आयाती पुरेशा आहेत. 
3. ”ऐहिक जीवन तर एक खेळ-तमाशा आहे. वास्तविक पाहता मरणोत्तर जीवनाचे ठिकाणच त्या लोकांकरिता अधिक उत्तम आहे जे दुराचारापासून अलिप्त राहू इच्छितात. मग काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करणार नाही? (सुरे अल्अनाम : आयत नं. 32).
या आयातींचा अर्थ सांगताना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”जीवनाला जरी खेळ-तमाशा म्हणून संबोधिले आहे तरी याचा अर्थ असा बिल्कुल नाही की जीवनामध्ये कुठलेही गांभीर्य नाही आणि जीवन फक्त खेळ-तमाशासाठी बनविले गेले आहे. वास्तविक पाहता या आयातीचा अर्थ असा आहे की, आखिरत (मृत्यूनंतरच्या जीवना)च्या असीमित जीवनाच्या तुलनेत या पृथ्वीवरील जीवन असे आहे जसे एखादा व्यक्ती काही वेळा करिता मनोरंजनासाठी एखादा खेळ खेळतो आणि परत आपल्या वास्तविक जीवनामधील गंभीर गोष्टींकडे वळतो.” (तफहिमुल कुरआन खडं 1 - आयत नं.32, पान क्र. 533).  
शेवटी एवढेच सांगू इच्छितो की, मानवी जीवन अत्यंत सुंदर आहे व जबाबदारीने जगण्यासाठी देण्यात आलेले आहे. हे जीवन एकदाच मिळालेले आहे. या जीवनात आपण कसे वागतो यावरच मृत्यूनंतर आपली काय गत होईल हे अवलंबून आहे. बुद्धीमान माणसासाठी एक तर्क सादर करत आहे की, आपल्या जन्माअगोदरच्या जीवनावर आपला काहीच अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावरही काहीच अधिकार राहणार नाही. मग या 60-70 वर्षाच्या जीवनावरच आपल्याला अमर्याद अधिकार कसा मिळू शकतो की आपण कसेही वागलो तरी काहीही फरक पडणार नाही. क्षणभर डोळे मिटून याचा विचार केल्यास आपल्याला साक्षात्कार होईल की हे जीवन अल्लाहने दिलेल्या मार्गदर्शनाशिवाय व्यतीत केल्यास त्याचे वाईट परिणाम  मृत्यूनंतरच्या जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मृत्यूनंतरच्या असीमित जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे जीवन जबाबदारीने, काटेकोरपणे आणि नैतिक पद्धतीने जगणे आवश्यक आहे. जगण्यासाठी मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात कुरआन आणि हदीसमध्ये उपलब्ध आहे. त्यातूनच हस्तगत केलेल्या संहितेला शरिया असे म्हणतात. नैतिक जीवन जगण्याचा एकमेव मार्ग शरिया हाच आहे. मग तो कोणाला आवडो किंवा न आवडो.

- एम.आय.शेख
9764000737

3. नमाज कायम करणे
    आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु व त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया तिसरी  गुणवत्ता ‘ नमाज कायम करणे’ ज्याची कुरआनात ईश्वर वारंवार आपणास आठवण करुन देत आहे.  नमाज कायम करणे म्हणजे आपल्या मनाला वाटेल तेव्हा अदा करणे नव्हे तर ती वेळेवर अदा करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा अजान होते तेव्हा एका मुस्लिम पुरुषाने आपले सर्व काम बाजूला सारून मस्जिदीकडे प्रस्थान करावे व त्याचबरोबर एका मुस्लिम स्त्रीने घरची सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या मुलाबाळांना सोबत घेवून नमाज अदा करावी. असे का? कारण ही एक अशी प्रार्थना आहे जी आपल्यासाठी  ईश्वर आणि आपल्यामधे संबंध ठेवण्याचे काम करते. आणि आपल्यासाठी ईश्वराविषयी प्रेम, निष्ठा आणि नम्रता व्यक्त करण्याचे हे साधन आहे. हे नाते कधीही तुटू नये हीच अल्लाहची इच्छा आहे. म्हणून अल्लाहने आपल्याला सर्व परिस्थितीत दररोज प्रार्थना चालू ठेवण्याचा आदेश दिला आहे. आपण उभे राहून आपली प्रार्थना करण्यास असमर्थ असल्यास, अल्लाह तुम्हाला खाली बसून प्रार्थना करण्यास सांगतो. आपण तसे करण्यास असमर्थ असल्यास, आपण अंथरूणावर पडल्या-पडल्या प्रार्थना करावी, किंवा आवश्यक असल्यास डोळ्यांच्या हालचालीने देखील प्रार्थना करावी. जर तुम्हाला ईश्वराचे विशेष मार्गदर्शन पाहिजे असेल आणि ऐहिक जीवन व परलोक जीवनात यश हवे असेल तर जोपर्यंत आपण मृत्यूच्या पुढे जात नाही तोपर्यंत दररोजच्या प्रार्थनांचे पालन करण्याच्या कर्तव्यातून मुक्त होऊ शकत नाही. अल्लाहला तुमच्या प्रार्थनेची गरज नाही तर तुम्हाला त्याची गरज आहे जेणेकरून तुम्ही सरळ मार्गाने चालावे. परिणामत: आज काही मुस्लिम पाच वेळेची नमाज कायम करतात परंतु आजही ते अशांत का? का त्यांच्या कामात यश येत नाही? का तो अल्लाहचा गुलाम न बनता दुनियावी पशाचा गुलाम बनला आहे? कारण तो मस्जिदमध्ये नमाज तर पढतो परंतु  घरच्यांशी व बाहेरच्यांशी चांगली वर्तणूक ठेवत नाही, गोरगरिबांना दान करत नाही, कधी जकात दिली तर बँकेत ठेवलेल्या पैशाच्या व्याजाला जकातचे नाव देवून मनाची समजूत घालतो की मी ईश्वराच्या आज्ञेेचे पालन करतो पण एवढे  असून त्याच्या  कामात यश नाही. असे का?कधी डोळसपणे मनाशी खोलवर जाऊन विचार केला का? आपण नमाजमधे ईश्वराशी काय संवाद करतो? त्याला काय मागतो?  त्याचबरोबर  काही मुस्लिमांची विचारधारणा अशी  आहे की जुम्मा ते जुम्मा नमाज पडायची. कारण त्याना आज नमाज दुय्यम दर्जाची वाटते व पैसा प्रथम दर्जाचा वाटतो. मग तो कसाही येवो. मग तो हलाल असो वा हराम; त्यांना काही फरक पडत नाही. मुस्लिमांना हे समजत नाही आहे की जो संपत्ती देणारा आहे, जो खऱ्या यशाच्या मार्गाकडे अजानद्वारे आपणास वारंवार बोलावत आहे, त्या पालनकर्त्याची वाट ठोकरून तो नकळतपणे मनुष्याचा गुलाम बनत आहे. कारण त्याला भीती असते की मी नमाज कायम केली तर ह्या दुनियावी स्थान मला गमवावे लागेन आणि अगदी कहर म्हणजे घरातील कुणी व्यक्ती  कुरआनचे नियम सांगत असेल तर त्या व्यक्तीला कुरआन वाचण्यास प्रवृत्त करत नाही. आज तर बोटावर मोजण्याचे इतके  मुस्लिम पुरुष पाच वेळा नमाज पढत असतील व त्यातूनही तुरळक स्त्रीया नमाज पढत असतील. कारण त्यांचे प्रमुख कर्तव्य टीव्ही पाहणे, एकमेकांना जेवण्याची दावत देणे व लग्नात अगदी जोराने स्पर्धा लावून नटणे-थटणे ,एकमेकांची निंदा करणे हे समजून बसलेल्या आहेत. त्यांचे हे विचार आचरण कळत-नकळत पणे हेच सांगत आहेत की नमाज ने काहीच होत नाही. बरं मग पैशातूनच आपण सर्वकाही प्राप्त करु शकतो तर आज मुस्लिम समाज अधोगतीवर का? जेव्हा की पैगंबरांनी सगळीकडे  इस्लाम संबंधी जागृती केली होती तेव्हा मुस्लीम समाजाने सर्वात जास्त राज्य प्रस्थापित केले होते व ते पैगंबरानंतर सतत 600-800 वर्ष कायमही राहीले होते. पण तो आज प्रत्येक क्षेत्रात मागे का? जसे शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा तुम्ही  नजर टाकाल तर तुम्हाला तिथे खालच्या दर्जाचे शिक्षण घेणारे मुस्लिमच दिसतील. आज परिस्थिती थोडीफार सुधारलेली आहे परंतु ती आधीच सुधारायला हवी होती. मुस्लिमांनी मुलांना शिक्षणात पुढे आणनाऱ्या स्त्रीला कधी शिकविलेच नाही! जेव्हा की फक्त इस्लामम सर्वप्रथम शिक्षणाचा हक्क स्त्रीलाच देण्यात आला. पण आचरणात याउलट आहे. कारण तिचे कमी वयात लग्न करुन द्यायचे मग शिकवायचेही नाही. कारण तिला सांगण्यात आले चुल आणि मुल हेच तिचे जीवन आहे. परिणामत: आज आईला मुलाला ळलीश इेरीव चा अभ्यासक्रम शिकविता येत नाही म्हणून ती त्यांना ीील बोर्ड च्या शाळेत टाकते. आणि मग ती या भौतिक दुनियेला आकर्षित होवून फक्त त्याला पैसा कमविण्याचे शिकविते. जर मुले बिघडली तर इंग्रजी भाषेला नाव ठेऊन स्वत:च्या चुकांना आवरण घालते पण खरे कारण तिच्यामधील धार्मिक शिक्षण व तांत्रिक शिक्षणाच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच मुस्लिम समाज शिक्षण क्षेत्रात मागासलेला आहे . तसेच सामाजिकरित्या पाहिले तर मुस्लिम आचरणात सर्वात  कमी दर्जाचे आहेत असे इतर समाजातील लोकांचा दृष्टीकोण आहे म्हणूनच इतर कुठल्याही समाजात त्यांचे विशेष स्थान नाही. सतत स्वार्थ, बंडखोरी, एकमेकांना शिविगाळ, पैशाचे लोभी हे  त्यांचे गुणविशेष सांगण्यात येतात. जेव्हा की याउलट इस्लाम न्यायाची शिकवण देतो व प्रत्येक मनुष्याला नैतिक कर्माने माणूस बनायला शिकवितो. बाकी समाजात सोडा त्यांनी स्वत: मध्येच विघटन केले आहे जसे सुन्नी, शिया, अहले हदीस, दर्गेवाले अजून बरेच काही. ते इस्लामची एकात्मता आचरणात आणण्याऐवजी ते एकमेकांना खाली खेचण्यामधे व्यस्त आहेत. अगदी तसेच आज अरब देश दुसऱ्या अरब देशाशी भांडण्यात व्यस्त आहेत. मात्र कधी देशाच्या पंतप्रधानाने यांच्यावर अत्याचार दर्शविला असता तेव्हा मात्र काही क्षणाला मुस्लिम संघटित असल्याचा दावा करतात. त्याशिवाय अगदी कहर म्हणजे मुस्लिम समाजाने ईश्वराच्या प्रार्थनेमधे (नमाज) विघटन केले आहे जसे ते एकदम गुर्मीने म्हणतात जमातनुसार नमाज पडायची असते . काय खरंच ईश्वराने तुम्हाला वेगवेगळी नमाज पडण्याची आदेश दिला आहे? काय पैगंबराने तशी शिकवण दिली? सत्याची पडताळणी करण्यासाठी कधी कुरआन वाचन्याचे धाडस केले आहे का? ही प्रश्‍नावली ऐकून तुमचे मन अगदी सहज उत्तर देते- नाही! !!! याचे कारण म्हणजे आपणास यासाठी मौलाना/इमाम  यांनी कधीच प्रोत्साहित केलेच नाही. कुरान सामान्य मुस्लिमांनी वाचले व समजले तर  त्यांची मक्तेदारी कमी होईल. मौलाना/इमाम यांचा हा विचार आणि  मंदिरातल्या  पुरोहितांच्या विचारांमधे फारसा फरक दिसून येत नाही. तसे असले असते तर प्रत्येक मुस्लिमाला अरेबी भाषा समजली असती व कुरान समजून घेण्यात गोडी निर्माण झाली असती आणि मुस्लिम पुरुष मस्जिदीमध्ये मोमिन व मस्जिदीबाहेर आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनला असता. त्याचबरोबर मुस्लिम स्त्री घरामध्ये आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनली असती. तुम्ही पहाल कोणताही मनुष्य जेव्हा पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे जेव्हा जीवन चरित्र वाचतो तेव्हा अगदी मनातून उद्गारतो मनुष्य असावा तर असा. मी जेव्हा-जेव्हा इस्लामची सत्यता मुस्लिमेत्तर लोकांना सांगते तेव्हा ते एकच प्रश्‍न घेवून बसतात इस्लाम एवढा सुंदर असताना मुसलमान वागणुकीत खराब का? मित्रांनो! मी इथे आपण किती खराब झालो हे सांगत नाही आहे तर मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण असे का झालो?  आपणच अधोगतीवर का? आपल्यासोबतच अन्याय का? याचे कारण म्हणजे तुम्ही दिवसा पाचवेळा जेव्हा ईश्वराला प्रार्थना करता तेव्हा त्याच्याशी काय संवाद करता? त्याला काय मागता?  तो तुम्हाला काय देतो आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे? हे कधी समजून घेतले आहे का? जसे आपण ईश्वराला नमाजमधे सरळ मार्गदर्शन (हिदायत) मागतो तेव्हा ईश्वर म्हणतो तुला माझे मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते कुराणात आहे मग त्यातून आत्मसात कर व आचरणात आण. मग पुन्हा अजानद्वारे यशाकडे ये. पुन्हा मला माग. मी तुला विशेष मार्गदर्शन (तौफिक) देईन. विचार बदला परिस्थिती बदलेल. पहा आपण विचार उत्पन्न करु शकत नाही तर ते अल्लाहच आपल्या मनामध्ये  उत्पन्न करतो मात्र ते निवडण्याचे स्वातंत्र्य त्याने आपणास दिले आहे. मग कोणता विचार निवडायचा? कुठल्या मार्गावर ठाम राहिल्यास माझे कर्म आचरण सात्विक बनेल. ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहुया . एकदा जर आपणासमोर दारू  पिण्याची परिस्थिती निर्माण झाली असता आपल्या मनात तीन विचार येतात पहिला दारु पिली तर या दुनियेत उच्च स्थान मिळते  दुसरे आज पिऊन घेवुया उद्यापासून पिणार नाही आणि तिसरे मी पिणार नाही. कारण मला माझ्या ईश्वराने सांगितले आहे. मग दुनियेतील स्थान माझ्यासाठी दुय्यम दर्जाचे  आहे.  तुम्ही तिसऱ्या विचारावर तेव्हाच ठाम राहाल जेव्हा तुम्ही कुराण वाचाल आणि कुराण तेव्हाच वाचाल जेव्हा याचे मार्गदर्शन तुम्ही ईश्वराला मागाल. जेणेकरून तुम्ही तोच मार्ग निवडाल ज्याने तुमचे आचरण सात्विक बनेल आणि या दुनियेतील तुमचे यश जणूकाही एका वाळवंटात गुलाबाचे फुल उमलल्यासारखे असेल. आणि परलोकातील यश तुमची वाट पाहत असेल. कारण ही सात्विकता नैतिक आचरण व यश हे तुम्हाला ईश्वराने दिलेले असेल. मग तिथून तुम्हाला कोणीही खाली खेचू शकत नाही. पण तुमची श्रद्धा चुकली तर विचार चुकतात आणि विचार चुकले तर आचार चुकतात मग निश्चितच अधोगाती, अन्याय, अत्याचार याचा सामना या दुनियेत व मृत्युनंतरही करावा लागेल. यावरुन तुम्ही म्हणाल इतर लोक तर ईशमार्गावर नसून यश प्राप्त करत आहेत मग आम्हीच अपयशी का? याचे उत्तर अगदी सोपे आहे, असे की, अल्लाह आपल्याला या दुनियेत व परलोकात कायमस्वरूपी यश देऊ इच्छित आहे. मात्र ईश्वराने आपणास यशाचा मार्ग सांगूनही आपण जाणूनबुजून  अपयशी मार्ग स्वीकारतो आहे. या यशाची चव तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल आणि ती वाट दुसरी कुठलीही नाही तर नमाज आहे. ती समजून पठण केली तर तुमचे ईश्वराशी नाते अतूट बनेल. तुमच्यात कुराणविषयी गोडी निर्माण होईल. ईश्वराच्या प्रेमापोटी तुमचे आचरण सात्विक बनेल त्याच्या विशेष मार्गदर्शनाने तुम्हांला ईशमार्गावर ठाम राहण्यास मदत होईल.”श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एकमेकांचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतूर व बुद्धिमान आहे.”(कुरआन 9:71-72). ”या श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचा वायदा आहे की त्यांना अशा बागा प्रदान करील ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील, त्या सदाबहार बागांत त्यांच्याकरिता स्वच्छ निवासस्थाने असतील, आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठे यश आहे.  (कुरआन 9:71-72). हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही नमाजमधील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्याल. चलातर नमाजमधील प्रत्येक श्‍लोकाचा सविस्तर अर्थ पाहूया पुढील भागात

- सीमा देशपांडे
7798981535

 - इनामुर्रहमान खान
फेब्रुवारी 1964 मध्ये वयोवृद्ध लेखकाचा हा लेख उर्दु मासिक `जिंदगी' मध्ये प्रकाशित झाला होता. या लेखाचे देशव्यापी महत्त्व त्या काळीही होते आणि आज तर त्याचे महत्त्व आणखीन वाढले आहे. उग्र राष्ट्रवाद आणि भौतिकवादी नैतिकतेची पाश्चिमात्यांनी दिलेली देणगीने आपला देश नरक करून टाकल आहे.
जातीय दंगलीचे ऐतिहासिक व तात्कालिक कारण सांगून तात्कालिक व स्थानिय उपाय सांगितले गेले आहेत आणि या भीतीच्या व दहशतीच्या परिस्थितीतून एक आशेचा प्रकाश किरण हा काळोख दूर करण्यास सक्षम आहे.

आयएमपीटी अ.क्र.37    -पृष्ठे - 24     मूल्य - 10  आवृत्ती - 3 (2012)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/x5cftzduvpoj0bgut7kwz9haptgmfgil

जमाअत-ए- इस्लामी हिंदची पार्श्‍वभूमी

कुव्वते फिक्रो अमल पहले फना होती है, 
तब किसी कौम के शौकत का जवाल आता है
सहाव्या शतकामध्ये अरबस्थानातील मक्का शहर म्हणजे एक मोठी बाजारपेठ होती. तेथे एक काबागृह होते. ज्यात 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक कबिल्याची एक देवता होती. रोज एक कबिल्याचे लोक काबागृहात येवून आपल्या कुलदैवतीची पूजा करत. त्यांच्याकडून बकऱ्यापासून ते ऊंटापर्यंतचे रोज बळी दिल्या जायचे. मक्काच्या लोकांची जनावरे विकली जायची. मोफत मांस खायला मिळायचे. या कबिल्याचे लोक जेंव्हा मक्केत यायचे तेंव्हा भरपूर खरेदी करायचे. या उलाढालीतून मक्काची अर्थव्यवस्था वर्षागणिक सुदृढ व्हायची. सर्व काही सुरळीत चालू असतांना अचानक एका दिवशी त्यांच्यातील बनी हाशम कबिल्यातील एका तरूणाने गार-ए-हिरामधून बाहेर येऊन सबाची टेकडी गाठली व घोषणा केली की, ’ईश्‍वर एक आहे त्याचे नाव अल्लाह आहे. मी त्याचा प्रेषित (संदेश देणारा) आहे. मला जिब्राईल अलै. नावाच्या एका देवदूताने हा संदेश दिला आहे की यापुढे जगात मी दिलेला संदेश हाच अंतिम संदेश मानला जाईल व कयामत पर्यंत याच संदेशाप्रमाणे लोकांना जगावे लागेल. जे माझे म्हणणे मान्य करतील ते आपल्या या जीवनातही यशस्वी होतील व मृत्यू नंतरच्या जीवनातही यशस्वी होतील.’ 
झाले! या घोषणेनंतर मक्कामध्ये एक सामाजिक भुकंप झाला. काही लोकांनी हजरत मुहम्मद सल्ल. वर तात्काळ विश्‍वास ठेवला मात्र बहुसंख्यांकांनी त्यांच्या ’एक ईश्‍वर’च्या संदेशाचा विरोध केला. हळू-हळू प्रेषित सल्ल. यांच्यावर नवीन-नवीन आयतींचा नुजूल (अवतरण) सुरू झाला व एक-एक गोष्ट हराम (निषिद्ध) होत गेली. दारू निषिद्ध झाली, व्याज निषिद्ध झाले, काय करावे व काय करू नये?, काय खावे, काय खाऊ नये? पासून तर काय चांगले काय वाईट, इथपर्यंतची एक आचार संहिताच प्रेषितांंनी लोकांसमोर मांडली. महिलांचे मोकळे (विनापरदा) फिरणे निषिद्ध झाले. थोडक्यात मानवी जीवनाला कलंकित करणाऱ्या सर्व गोष्टी निषिद्ध होत गेल्या. त्यांच्या या संदेशाची गोडी सदप्रवृत्तीच्या लोकांना लागू लागली व त्यांच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
सुरूवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मक्काच्या प्रस्थापितांना फार काळ दुर्लक्ष करणे परवडले नाही. जस-जशी प्रेषित सल्ल. यांच्याकडे लोकांची रीघ वाढू लागली तस-तशी मक्काची अर्थव्यवस्था ढासळू लागली. ऐकेश्‍ववादी व अनेकेश्‍वरवादी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. म्हणून सर्व कबिल्यांची एक संयुक्त  बैठक झाली व त्यात असे ठरले की प्रत्येक कबिल्याचा प्रतिनिधी असलेल्या सरदारांचे एक प्रतिनिधी मंडळ अबु तालीब (प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चुलते) यांचेकडे जाईल व त्यांच्या समक्ष आपले म्हणणे सादर करील. जेणेकरून प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना त्यांच्या मिशनपासून रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांना विश्‍वास होता की जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झाल्यामुळे प्रेषित सल्ल. यांचे लालन-पालन त्यांचे चुलते अबु तालिब यांनीच केले होते. प्रेषित सल्ल. त्यांचे म्हणणे कधीच टळणार नाहीत. 
ठरल्याप्रमाणे मक्कातील सरदारांचे एक प्रतिनिधी मंडळ संयुक्तरित्या अबु तालीब यांच्या भेटीला गेले व त्यांच्यासमोर कथन केले की, ”तुमचा पुतण्या मुहम्मद सल्ल. यांनी हे काय चालवले आहे? ते ईश्‍वर एक असल्याचे सांगत आहेत. स्वतःला प्रेषित म्हणून घेत आहेत. त्यांच्या कच्छपी लागून मक्कातील अनेक लोक धर्मभ्रष्ट होत आहेत. त्यांच्या या संदेशामुळे घरा-घरात भांडणे लागलेली आहेत. अनेक लोक आपल्या कुलदैवतांचा इन्कार करत आहेत. त्यामुळे मक्कामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या घटत आहे. असेच सुरू राहिले तर आपली अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल. तुम्हाला माहित आहे की, आपल्या कमाईचे प्रमुख स्त्रोत काबागृह आहे. आपल्या पुतण्याने त्याचाच विरोध सुरू केला आहे. हे असेच सुरू राहणे आपल्याला परवडणारे नाही. तुम्ही त्यांना आवरा नसता आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. 
अबु तालीब एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. पण सर्व काबिल्यांचे मिळून एक संयुक्त प्रतिनिधीमंडळ आल्याने त्यांचाही नाईलाज झाला. त्यांना काही बोलता आले नाही. त्यांनी सरळ प्रेषित सल्ल. यांना बोलावून घेतले व प्रतिनिधी मंडळाची थेट भेट घालून दिली. प्रतिनिधी मंडळाने त्यांच्या समोर तीन मुद्दे ठेवले. 
1. तुम्हाला आम्ही आपला सरदार माणण्यास तयार आहोत. 2. तुम्हाला जर पैसा हवा असेल तर आम्ही सर्वजण तुम्हाला एवढे धन देवू की तुम्ही अरबमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हाल. 3. तुम्हाला कुठली स्त्री हवी असेल तर आमच्या कबिल्यातील कोणत्याही स्त्रीयांशी लग्न करू शकाल. आम्ही त्यांना तुमच्या स्वाधीन करू पण तुम्ही ईश्‍वर एक आहे आणि तुम्ही त्याचे प्रेषित आहात असे म्हणणे सोडून द्या. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, ” माझ्या एका हातात चंद्र आणि दुसऱ्या हातात सूर्य जरी दिला तरी मी माझ्या मिशनपासून ढळणार नाही. कारण मी जो संदेश देतोय तो माझ्या मनाप्रमाणे देत नाही तर अल्लाहच्या आदेशानुसारच देत आहे व यातच मानवतेचे कल्याण आहे.”
हे विवेचन यासाठी मी वाचकांसमोर मांडलेले आहे की इस्लामी व्यवस्था ही कंपाऊंडेबल (तडजोडी योग्य) नाही. हे वाचकांच्या लक्षात यावे. ही व्यवस्था व्यक्तीगत व सामुहिक जीवनात अंगिकारल्याशिवाय मानवी कल्याण शक्य नाही. इस्लामच्या या मूळ शिकवणीचा भारतीय मुस्लिमांना विसर पडलेला आहे. शुद्ध इस्लामी व्यवस्थेचे जे महत्व जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांच्या लक्षात 20 व्या शतकाच्या सुरूवातीला आले होते ते आजही बहुतेक मुस्लिमांच्या लक्षात आलेले नाही. म्हणून कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज या इबादतींनाच भारतीय मुस्लिम इस्लाम समजतो. निःसंशय ह्या पाचही बाबी इस्लामी व्यवस्थेच्या मुलभूत बाबी आहेत. पण इस्लाम इथेच संपत नाही तर या बाबीचा अंगिकार करून एक आदर्श समाजाची रचना करावी, समाजात चालू असलेल्या कुरीती संपवाव्यात, त्यांच्या जागी सुरीतींची प्रतिष्ठापणा करावी, वाईट गोष्टींचे उच्चाटण करावे व चांगल्या गोष्टी रूजवाव्यात, जेणेकरून एक नीतिमान समाज निर्माण होईल. हा इस्लामचा मूळ उद्देश आहे. यालाच कुरआनने ’अम्रबिल माअरूफ व नही अनिल मुनकर’ म्हटलेले आहे. 
हे काम कठीण आहे म्हणून साधारणपणे मुस्लिम समाज वर नमूद पाच तुलनेने सोप्या गोष्टींचेच पालन करतो. यामुळे इस्लाम ही फक्त त्यांची धारणा बनलेली आहे, श्रद्धा नव्हे. श्रद्धा असती तर त्यांनी कुरआन समजून घेऊन त्यानुसार आचरण केले असते. लग्न साध्या पद्धतीने केले असते, व्याज सोडून दिले असते, अश्‍लीलतेपासून दूर राहिले असते, दारूचा त्याग केला असता. इस्लामचा संदेश आपल्या देशबांधवांपासून लपवून ठेवला नसता. आपल्या वाणी, लेखीन आणि आचरणातून इस्लामचे कल्याणकारी रूप देशबांधवांसमोर मांडले असते. जमाअते इस्लामीच्या स्थापनेमागे इस्लामची स्थापना (अकामते दीन) हाच उद्देश होता. भारतीय मुस्लिम हे करण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून बहुसंख्य बांधवामध्ये मुस्लिमांबद्दल ठीक तसाच तिरस्कार निर्माण झालेला आहे जसा सातव्या शतकात प्रेषित मुहम्मद सल्ल. ) आणि त्यांच्या सोबत्यां (सहाबा रजि.) बद्दल सुरूवातीच्या काळात निर्माण झाला होता. जोपर्यंत मुस्लिम म्हणून आपण अल्लाहचा संदेश देशबांधवांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहचविणार नाही व त्याचे लाभ त्यांना ’याची देही याची डोळा’ दाखवून देणार नाही, त्यांचा तिरस्कार सहन करूनही त्यांच्यावर प्रेम करणार नाही, त्यांच्या हितासाठी यथाशक्ती निरंतर प्रयत्न करणार नाही, त्यांच्या हिंसक तिरस्काराचे उत्तर अहिंसक प्रेमाने देणार नाही तोपर्यंत ते आपल्याला एक प्रतिस्पर्धी धार्मिक गटच नव्हे तर शत्रू स्थानी समजतील व मुस्लिमांचे अधिकाधिक नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. 
आज 21 व्या शतकातही आपल्या समोर परिस्थिती तशीच आहे जशी सातव्या शतकात प्रेषित (सल्ल.) व त्यांच्या सहाबा (रजि.) समोर होती. ज्याप्रमाणे त्या काळातही बहुसंख्यांक लोकांकडून अल्पसंख्यांक मुस्लिमांची मॉबलिंचिंग केली जात होती तशीच आजही केली जात आहे. 
अशा परिस्थितीही सब्र (संयम) ठेऊन, बहुसंख्यांकाडून होणारे अत्याचार सहन करूनही, प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या विषयी करूणा बाळगून त्यांना सत्यमार्ग दाखविला होता. अनेक सहाबा रजि. यांची शहादत पचवून, पावलो-पावली होणारा तिरस्कार सहन करूनही आपल्या प्रिय प्रेषित सल्ल. यांनी जसे मक्काच्या बिगर मुस्लिमांवर प्रेम केले होते, तसेच प्रेम आपल्याला आपल्या देशातील बहुसंख्य बांधवावर करावे लागेल. त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या प्रती करूणेचा भाव मनात ठेवावा लागेल. त्यांच्याशी सामाजिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. त्यांच्या सुख-दुःखात फक्त सामिल होऊनच चालणार नाही तर त्यांचे दुःख निवारण करण्यासाठी सर्वशक्तीनिशी झटावे लागेल. फक्त मुस्लिम समाजाच्या कल्याणाची नव्हे तर समस्त भारतीय समाजाच्या कल्याणाची चिंता करावी लागेल. या खऱ्या इस्लामी अख्लाकचा परिचय मुस्लिम्मेतरांना करून द्यावा या उद्देशाने जमाअत-ए-इस्लामीच स्थापना करण्यात आली. एवढा व्यापक विचार साधारणपणे कुठल्याच मुस्लिम संस्थे, संघटनेकडून व्यक्त केला जात नाही. केला गेला तरी अमलात आणला जात नाही. हाच फरक इतर मुस्लिम संघटना आणि जमाअते इस्लामी हिंदमध्ये आहे.
जमाअते इस्लामी हिंद आपल्या स्थापनेपासूनच बहुसंख्य बांधवांशी आपले संंबंध टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जमाअतचे विचार प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मूळ शिकवणीवर आधारित आहेत. ज्यात कृष्णवर्णीय आदिवासी ह.बिलाल रजि. यांनाही तेवढेच महत्व आहे जेवढे कुलीन हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना आहे. ह्याच समतेच्या विचारसरणीला देशबांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी जमाअते इस्लामी आपल्या स्थापनेपासून प्रयत्नशील आहे. जमाअतची रचना व कार्य या संबंधी माहिती इन्शाअल्लाह पुढील अंकी समजून घेऊ. क्रमशः

एम.आय. शेख 
9764000737

गुण २ : परोक्षावर श्रद्धा ठेवणे -  (कुरआन 2: 3)
आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्‍वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु, त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया दुसरी गुणवत्ता ‘ परोक्षावर  श्रद्धा’ म्हणजे अदृश्य ईश्‍वरावर विश्‍वास ठेवणे. शब्दश:, अदृश्याचा संदर्भ असा होतो की अश्या गोष्टी ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित (अनुपस्थित) आहेत. ’ अल्लाहने त्याचे मार्गदर्शन व संरक्षण प्राप्त करण्यासाठी याला प्रमुख अट का बरे ठरविले आहे? अदृश्य काय आहे? जसे मनुष्यात प्रामुख्याने, पाच मुख्य इंद्रिय असतात   ( ऐकणे, दृष्टी, गंध, चव आणि स्पर्श ) ज्या  गोष्टी  आपल्या या इंद्रियांपासून कळतात, अश्या गोष्टीं बद्दल कोणतेही वाद नाही, कारण आपण त्या वस्तू पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, स्वाद घेऊ शकतो आणि गंध करू शकतो. अगदी तसेच आपण अदृश्य भावनांना सामोरे जाऊ शकत नाही व त्याची अनुभुती करु शकत नाहीत. 
    याव्यतिरिक्त आपल्याकडे  ज्ञानेंद्रियांच्या  क्षमतेशिवाय  अनेक अशा क्षमता आहेत ज्या आपल्याला गोष्टी समजून घेण्यास, अनुभुती करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ,जेंव्हा तुम्हाला भूक लागते तेंव्हा तुम्ही भुकेले आहात हे तुम्हांला कोणते इंद्रीय  सांगत आहे? कोणता इंद्रीय आपल्याला झोपेतून जाग आणतो? तसेच, स्त्रीला गर्भ राहिल्यास तो गर्भ तिच्या शरिराचा भाग असूनदेखील ती जाणू शकत नाही की तिच्या गर्भात काय वाढत आहे? म्हणून एक अदृश्य शक्ती जी आपल्या पाच इंद्रीयांना समजत नाही व दिसत नाही म्हणून ती उद्भवत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. म्हणून या (आयात) वचनात ज्या अदृश्य शब्दांचा उल्लेख आहे ते सर्व आपल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमते पलीकडचे आहे. 
    चला एक पाऊल पुढे जाऊया. जर एखाद्या विद्यार्थ्याला बीजगणितचे समीकरण सोडवण्यासाठी दिले गेले, आणि नंतर तो किंवा तीने सोडवून उत्तर काढले, तर आपण म्हणतो की या विद्यार्थ्याने अदृश्य शोधून काढले आहे? अजीबात नाही, कारण विद्यार्थ्यांनी ठराविक नियम आणि तत्त्वे यावर आधारित उपाय योजले व उत्तर काढले. त्याचप्रमाणे, हवामानशास्त्राच्या केंद्राने उद्या पावसाळा घोषित केला असेल, तर हवामानशास्त्रज्ञांनी अनदेखीचा खुलासा केला आहे का? पुन्हा, उत्तर नाही असेच आहे, कारण त्यांनी ज्ञान आणि संशोधनावर त्यांचे निष्कर्ष काढले आहेत. तसे नसल्यास कुठल्या मनुष्य /प्रेषित /अवताराने सूर्य पूर्वेकडुन पश्‍चिमेकडे उगविन्याचे धाडस दाखविले?  पृथ्वीवर पाऊसच पडला नाही तर मनुष्य समुद्र, विहीर, तलाव, नदी याची निर्मिती करु शकतो का? हे प्रश्‍न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात की मनुष्य यासाठी असमर्थ आहे. म्हणून या कुरआनच्या (आयात) वचनात उल्लेख केलेल्या अदृश्य शब्दांचे अर्थ निष्कर्ष आणि संशोधन या ज्ञानाने काढता येत नाही. 
    आणि अखेरीस, जर एखाद्या मित्राने आपल्याला सूचित केले की आपला चोरीस गेलेला मोबाईल फोन अमक्याकडे  आणि अमूक ठिकाणी आहे, याचा अर्थ आपल्या मित्राला अदृश्य गोष्टीची माहिती आहे का? उत्तर नाही असेच आहे. तसे नसल्यास मनुष्य स्वत: व इतरांचे जन्म-मृत्यू सांगू शकतो का? अर्थातच नाही. कारण अदृश्य तुम्हाला किंवा तुमच्या सारख्या कोणालाही ज्ञात नाही. म्हणून या आयात (वचनात)मधील उल्लेखित ‘ अदृश्य’ शब्द आपल्यासाठी ज्ञात नाही. या अर्थानेच घ्यावा लागेल. 
    त्याचप्रमाणे, अगदी संदेष्टे (प्रेषित) आणि दूत यांना देखील अदृश्याबद्दल  ज्ञान व जाणिव नसते. खरं तर, अदृश्याचे ज्ञान अल्लाह  सर्वशक्तिमान वगळता कोणालाही नाही. आणि फक्त अल्लाहच स्वत: निवडतो ज्यास त्याला याचे ज्ञान द्यायचे आहे. कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो,”तो परोक्षाचा(अदृश्य) ज्ञाता आहे, आपले परोक्ष कोणावरही उघड करीत नाही” ( कुरआन 72:26).
    ’ त्या प्रेषिताखेरीज ज्याला त्याने (परोक्ष ज्ञान देण्यासाठी) पसंत केले असेल. तर त्यांच्या पुढे व मागे तो रक्षक ठेवतो’ (   कुरआन 72:27)
    ईश्‍वर त्याच्या ज्ञानापैकी काही  अंश आपल्या प्रेषितांना  सामायिक (शेअर) करतो आणि ते त्यांच्यासाठी पाठोपाठ जगात एक चमत्कार बनते. याचा अर्थ असा होत नाही एखाद्या प्रेषितांना परोक्षाचे पूर्ण ज्ञान आहे व आपण त्यांची उपासना करावी. कदापि नाही! !! ईश्‍वर पैगंबर मुहम्मद (स.) यांना कुरआनात म्हणतो, ”हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती पुनरुत्थानाची घटका अवतरणार तरी कधी? सांगा.” ”त्याचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळच आहे, तिला तिच्या वेळेवर तोच जाहीर करील. आकाशात व जमिनीत ती अत्यंत कठीण वेळ असेल, ती तुमच्यावर अकस्मात येईल.” हे लोक त्यासंबंधी तुम्हाला अशाप्रकारे विचारतात जणू काही तुम्ही तिच्या शोधात लागला आहात. सांगा, ”त्याचे ज्ञान तर केवळ अल्लाहला आहे पण बहुतेक लोक या सत्यापासून अनभिज्ञ आहेत.” ( कुरआन 7:187)
    ” हे पैगंबर (सल्ल.), यांना सांगा की, मी (अर्थात पैगंबर सल्ल.) स्वत:करिता कोणत्याही नफा तोट्याचा अधिकार बाळगत नाही, अल्लाहच जे काही इच्छितो ते होते आणि जर मला परोक्षाचे ज्ञान असते तर मी पुष्कळसे लाभ स्वत:साठी प्राप्त करून घेतले असते व मला कधीही एखादे नुकसान पोहचले नसते. मी तर केवळ एक खबरदार करणारा व खुषखबर ऐकविणारा आहे, त्या लोकांसाठी  जे  माझे  म्हणणे  मान्य  करतील. ”(कुरआन 7:188)
    अल्लाहवर विश्‍वास म्हणजे अदृश्य गोष्टींवर विश्‍वास ठेवण्याचे सर्वात उच्च स्वरूप, म्हणजे त्याचे स्वर्गदूत, ग्रंथ आणि न्यायाचा दिवस ह्यांवर विश्‍वास. जरी या सर्व गोष्टी आपल्यापासून पड्द्याआड ठेवल्या आहेत. तरी, आपण देवदूतांच्या उपस्थितीवर विश्‍वास करतो कारण अल्लाहने  त्यांच्या अस्तित्वाविषयी आपणास प्रेषित व ग्रंथाद्वारे सांगितलेले आहे. आम्ही पुनरुत्थानाच्या दिवसावरही(स्वर्ग-नर्क) विश्‍वास करतो कारण अल्लाहने याची पण माहिती आपणास दिलेली आहे.
    आता आणखी एका जिव्हाळ्याच्या गोष्टीचे उदाहरण बघूया. जे तुम्हाला अदृश्य ईश्‍वर कळण्यास मदत होईल. तुमच्या शरीरातील  आत्मा तुम्हाला जीवन प्रदान करतो. मग विचार करा तुम्ही तुमचे प्राण पाहीलेले आहे का? किंवा आपण त्याची चव घेउन पाहिली किंवा सुगंध घेतला किंवा त्याला स्पर्श करुन पाहिले आहे का? नक्कीच नाही! परंतु ईश्‍वराने आपल्या शरीराला जीवन देण्याच्या त्याच्या प्रभावामुळे आपल्याला आपल्या आत्म्याबद्दल कळणे शक्य झाले. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या  शरीरातल्या काही गोष्टी शोधणे आणि समजून घेणे कठीण व अशक्य  आहे, तर तुम्ही  तुमच्या इंद्रीयांमार्फत ईश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव कशा प्रकारे करू शकता? विचारात पडलात ना! परंतु, अल्लाहने आपण सर्वाना  असेच सोडून दिलेले नाही. आपणास विवेकशील मन  दिले आणी अनेक संकेत दिलेत जेणेकरून आपण त्यावर विचार करावा. अल्लाहने आपल्यासाठी (परिसरात) आजूबाजूला अशी चिन्हे मांडली व दर्शविली आहेत. त्यांचे बारकाईने निरक्षण करा, जाणीव करा आणी निष्कर्षावर पोहोचा. या विश्‍वाचा एक निर्माणकर्ता आहे. इतके तंतोतंत व काटेकोरपणे निर्माण केलेली  निर्मिती योगायोगाने स्वत:हून निर्माण होऊ शकली असती का? उलट योगायोगाने स्वत:हून तयार झालेल्या  गोष्टी यादृच्छिक असंगठित अल्पायुषी असतात. जर विश्‍वाची निर्मिती आणि परिरक्षणामागे ब्रह्मरुप शक्ती नसली असती तर सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी एकमेकांपासून दुभंगले असते आणि एक निर्मात्या विना, जीवन आणि संपूर्ण प्रणाली नष्ट झाली असती.
    वरील उदाहरणांवर विचार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा पूर्ण उपयोग केलेला आहे आणि मी या निष्कर्षावर पोहचले आहे की या विश्‍वाची तंतोतंत व काटेकोर निर्मिती, त्यातले जीवन आणि सौंदर्य फक्त आणि फक्त अल्लाह/परमेश्‍वर  मुळेच आहे व फक्त तोच या विश्‍वाचा निर्माता आहे. म्हणून जर प्रेषित सल्ल. यांनी  आपल्याला सांगितले की अल्लाह (एकेश्‍वरत्व) हाच विश्‍व निर्माण करणारा आहे आणि  चमत्कारांचा दावा करीत आहे तर आपण त्याच्यावर विश्‍वास ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या मनात ही निश्‍चितता कायम होते तेव्हा तुमची श्रद्धा, तुमचे आचार-विचार सुद्धा हाच दावा करतात की अल्लाहकडून मिळणारे सर्वस्व हेच अंतिम सत्य आहे, आणि मी त्याच्याच नियमावलीच्या मार्गानुसार जीवन व्यतीत करेन. मग मला पर्वा नाही आपल्या संवेदनांना (नफ्स) ते समजून घेऊ शकते किंवा नाही. पण आज मनुष्य त्याच्या हृदयावर  आपल्या संवेदनांचे आपल्या वाडवडिलांच्या विचारांचे व या दुनियावी आकर्षकतेचे आवरण घातले आहे व तो कळतनकळत पणे आपल्या अदृश्य ईश्‍वराला विसरून गेला आहे. कारण तो आज सर्वात जास्त भीती बाळगतो त्याच्या मृत्यूची. त्यामुळे तो याच संभ्रमात पडलाय की हेच अंतीम जीवन आहे. पण हे जीवन तर क्षणभंगुर आहे. ईश्‍वर म्हणतो ’ आणि हे लौकिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते (कुरआन 29:64.) 
    जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना सोडून दूर राहतो तेव्हा आपल्याला पदोपदी त्याना भेटण्याची आस लागते व त्यांच्या गैरहजेरीत आपण त्यांची आठवण व त्यांचा आदर म्हणून त्यांच्या नियमांचे पालन करतो. हेच प्रेमाचे आवरण आपण आपल्या पालनकर्त्याविषयी का बाळगत नाही? का आपण मृत्युला घाबरतो? आपण का बरे विचार करत नाही की माझा मृत्यु हा शेवट नसून त्यानंतर माझ्या जीवनाची खरी सुरुवात आहे आणि तिथे मला माझ्या ईश्‍वराला भेटायचे आहे. ही विचारसरणी आपणास मृत्युची भीती बाळगू देत नाही तर ईश्‍वराविषयी प्रेम निर्माण करते व त्याच्या नियमाचे पालन करण्यास भाग पाडते . ईश्‍वराची सदैव इच्छा हीच आहे की त्याचे भक्त श्रद्धा-विचार-आचारणाने चांगले बनावेत व मृत्युनंतर स्वर्गात जावेत. 
    अशाप्रकारे, जोपर्यंत कुठलाही मनुष्य परोक्षावर श्रद्धा ठेवत नाही व न्यायाच्या दिवसाचे भय बाळगत नाही तोपर्यंत तो मोमीन बनू शकत नाही. ईश्‍वर म्हणतो, ’ त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.’  ( कुरआन 2:281)
    उर्वरित गुण पाहूया पुढील लेखात.


- सीमा देशपांडे
7798981535

माननीय मुआविया बिन हकम सुलमी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर नमाज अदा करीत होतो, इतक्यात एका मनुष्याला शिंक आली तेव्हा मी  नमाज संपताच ‘‘यरहमुकल्लाह’’ म्हटले तेव्हा लोक माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणालो, ‘‘अल्लाह तुम्हाला आयुष्य प्रदान करो. तुम्ही सर्वजण मला का पाहात आहात?’’ त्या लोकांनी  मला गप्प राहण्यास सांगितले तेव्हा मी गप्प झालो. जेव्हा पैगंबरांची नमाज पूर्ण झाली, (माझे माता-पिता पैगंबरांवर कुर्बान) मी पैगंबरांपेक्षा उत्तम शिक्षण-प्रशिक्षण करणारा न भूतो न  भविष्यती पाहिला. पैगंबर मला रागावले  नाहीत, त्यांनी मला मारले नाही की मला वाईट बोललेही नाहीत, फक्त इतकेच म्हटले, ‘‘ही नमाज आहे, यात बोलणे योग्य नाही. ‘नमाज’  नाव आहे अल्लाहचे पावित्र्य वर्तविण्याचे, त्याचे श्रेष्ठत्व सांगण्याचे आणि कुरआनचे पठण करण्याचे.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका खेडुताने मस्जिदमध्ये लघुशंका केली तेव्हा लोक त्याला मारण्यासाठी धावले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्याला सोडून  द्या. त्या ठिकाणी एक डोल पाणी ओतून स्वच्छ करा. दीनला लोकांसाठी सोपे बनविण्यासाठी आणि त्यांना दीन (इस्लाम) कडे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात आले आहे.  आपल्या अभद्र पद्धतीने लोकांसाठी दीनकडे येण्याचा मार्ग खडतर करावा, यासाठी तुम्हाला यासाठी अल्लाहने पाठविलेले नाही.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अबू मूसा (अ.) आणि मुआज यांना यमनला पाठविताना असा उपदेश केला होता की ‘‘यस्सिरा वला तुअस्सिरा व सक्किना वला  तुऩिफ्फरा.’’ तुम्ही दोघांनी तेथील लोकांसमोर ‘दीन’ (इस्लाम धर्म) इतक्या आकर्षकपणे सादर करा की तो त्यांना सोपा वाटावा. अशा पद्धतीचा अवलंब करू नका की लोकांना ‘दीन’  अवघड वाटावा आणि लोकांना तुमचा स्वभाव प्रेमळ वाटावा, त्यांना कसल्याही प्रकारची इजा पोहोचवू नका आणि त्यांना भडकवू नका.’’

माननीय मालिक बिन हुवैरिस (रजि.) यांच्या कथनानुसार,
आम्ही काही समवयस्क तरुण ‘दीन’ (इस्लाम धर्म) चे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आलो होतो. येथे आम्ही वीस दिवस राहिलो. पैगंबर अतिशय दयाळू व  मृदु स्वभावाचे होते. पैगंबरांना वाटू लागले की आम्ही सर्वजण घरी जाऊ इच्छित आहोत. तेव्हा पैगंबरांनी आम्हाला विचारले, ‘‘तुमच्या मागे (कुटुंबात) कोण कोण आहेत?’’ आम्ही  उत्तर दिले तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘आपल्या मुलाबाळांमध्ये परत जा आणि जे काही तुम्ही ज्ञान प्राप्त केले आहे त्यांना शिकवा. त्यांना चांगल्या गोष्टी सांगा आणि समृद्ध व्हा, नमाज  वेळेवर अदा करा आणि अमुक नमाज वेळेवर अदा करा.’’ (एका हदीसमध्ये असेही आढळून येते की ‘‘आणि तुम्ही मला ज्या पद्धतीने नमाज अदा करताना पाहिले आहे त्याच पद्धतीने  तुम्हीदेखील अदा करा.’’) आणि जेव्हा नमाजची वेळ होईल तेव्हा तुमच्यापैकी एकाने अजान द्यावी आणि जो तुमच्यापैकी ज्ञान व चरित्राच्या दृष्टीने श्रेष्ठ असेल त्याने ‘इमामत’  (नमाजचे नेतृत्व) करावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

 - डॉ. इल्तिफात अहमद
मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. समाज त्याची गरज आहे. समाजाला संघटित करण्यासाठी काही कायदे व नियम आवश्यक आहेत, त्यांना मराठी व हिंदीत `जीवन सिद्धान्त' इग्रंजीत `वे ऑफ लाईफ' आणि अरबीत `दीन' म्हणतात.
जीवनमार्ग (दीन) समाजाची सर्वात मोठी आवश्यकता आहे. चांगला असेल तर पूर्ण समाज चांगला असतो. चांगला जीवनमार्ग म्हणजे काय आणि तो कोण बनवितो या विषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तिकेत आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 35      -पृष्ठे - 24         मूल्य - 10           आवृत्ती - 4 (2012)



डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/ij4ctjm5esnww0bcre8wnow7v1n3al44

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget