Latest Post

- मौ. अबुल आला मौदूदी
या पुस्तकामध्ये इस्लाममध्ये मानवी अधिकारांची मूळस्थिती विषयी विवेचन करतांना पाश्चिमात्य देशात मानव-अधिकाराच्या कल्पनेविषयी चर्चा करण्यात आली आहे. इस्लाममध्ये मानवी अधिकारांची व्यापकता सिद्ध करताना इस्लामनेच मनुष्याला जिवंत राहण्याचा अधिकार बहाल केला, यावर स्पष्टिकरण आले आहे. 
युद्धात शत्रूचे अधिकार, युद्ध करण्याचे अधिकार, इस्लामी राज्यात नागरिकांचे अधिकार या विषयांवर इस्लामी दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. 

आयएमपीटी अ.क्र. 43     -पृष्ठे - 36   मूल्य - 18  आवृत्ती - 4 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/x370799gz293dyheddnnm00wdd8uvl75


- डॉ. जमीला अ. जाफरी
या पुस्तकात इस्लाम धर्म व तत्त्वज्ञानाची वास्तववादी ओळख करून देण्यात आली आहे. कोणत्याही क्षेत्रात अज्ञानशाप बनते आणि अल्पज्ञान याहीपेक्षा अधिक घातक सिद्ध होते. धर्म आत्मशांतीचा मार्ग आहे. परंतु त्यासंबंधीच्या विकृती सहाराचे कारण बनते.
इस्लाम रूपरेषा व सिद्धान्त, इस्लाम धर्म व तत्त्वज्ञान, राजनैतिक, सामाजिक व आर्थिक विषयक इस्लामचा मौलिक दृष्टिकोन विषयी विवेचन आहे.

आयएमपीटी अ.क्र. 42    -पृष्ठे - 24    मूल्य - 10    आवृत्ती - 2 (2001)



डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ypge9auejlrcukjk1ffu5cmxqd3rekem



- सय्यद अबुल आला मौदूदी
मनुष्यशरीराचे निरीक्षण केल्यास कळते की यात शक्तीचा मोठा साठा ठेवला आहे. त्यात जीवनशक्ती, कार्यशक्ती आणि कामशक्ती एकाच वेळी उपलब्ध आहेत. याच ग्रंथी मनुष्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उपलब्ध करतात.
संस्कृतीची मूळ समस्या, शुद्ध संस्कृतीसाठी आवश्यक उपाय, कुटुंबाचा पाया, दुराचार व व्यविभचाराला आळा, दांपत्यजीवनाचे शुद्धरूप इ.विषयी चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 41     -पृष्ठे - 48      मूल्य - 22            आवृत्ती - 3 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/exz9ztq9e53pyw7rpvht3228dzw52ut7


माननीय अबू हुरैरा (र.) कथन करतात की एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘हे अल्लाहेच प्रेषित (स.)! एक भगिनी नफील (अनिवार्य नसलेली) नमाज अदा  करण्यात, नफील रोजे ठेवण्यात आणि दानधर्म करण्यात खूप प्रसिद्ध आहे. मात्र ती वाचाळपणाने शेजाऱ्यांना त्रास देते. तिच्याविषयी आपली काय भूमिका आहे?’’
पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘ती जहन्नममध्ये (नरकाग्नीत) टाकली जाईल.’’ 
मग त्या व्यक्तीने विचारले, ‘‘दुसरी एक भगिनी नफील नमाज कमी अदा करते, नफील रोजे (उपवास) सुद्धा कमीच ठेवते आणि दानधर्मही कमीच करते. पनीरचे काही तुकडे गरिबांना  देते. मात्र ती आपल्या वाचेने शेजाऱ्यांना त्रास देत नाही. (शेजाऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होते.) तिच्याविषयी आपण काय म्हणाल?’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ती जन्नतमध्ये (स्वर्गात) जाईल.’’ (मिश्कात)
निरुपण
या हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चारित्र्यसंपन्नतेची महत्ता खूप स्पष्टपणे विषद केली आहे. नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्म याबरोबरच शेजाऱ्यांशी व्यवहार कसा  हे, ही बाब फार महत्त्वाची आहे. एक भगिनी पाच वेळच्या अनिवार्य नमाजीव्यतिरिक्त नफील नमाजही खूप अधिक अदा करते. रमजानच्या अनिवार्य उपवासांव्यतिरिक्त नफील रोजेही  खूप ठेवते आणि दानधर्मही खूप करते. मात्र तिच्यात एक दुर्गुण आहे तो हा की ती आपल्या वाचाळतेने शेजाऱ्यांना त्रास देते. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत नाही. या दुर्गुणामुळे  तिची नफील नमाज, नफील रोजे व दानधर्म तिला जहन्नम अर्थात नरकाग्नीत जाण्यापासून रोखणार नाहीत.
मात्र दुसरी भगिनी नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्मात जरी पहिलीपेक्षा कमी असली तरी शेजाऱ्यांशी असलेल्या सद्व्यवहारामुळे ती जन्नत अर्थात स्वर्गात जाईल! 
बोध हा आहे की माणसाची चारित्र्यसंपन्नता ठरविण्यासाठी केवळ नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्मच पुरेसे नाहीत तर शेजाऱ्यांशी त्याचा प्रत्यक्ष व्यवहार खूप खूप महत्त्वाचा  आहे.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


मा. अबू हुरैरा (र.) कथन करतात की, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही, अल्लाहची  शपथ! तो मोमिन नाही, अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही!’’ लोकांनी आश्चर्याने विचारले, ‘‘कोण? हे पैगंबर (स.)’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तो माणूस कदापि ईमानधारक नव्हे जो शेजाऱ्यांना त्रास देत असेल वा छळत असेल.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरूपण
माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची एक ओळख त्याचा शेजाऱ्यांशी व्यवहारसुद्धा आहे. जो शेजाऱ्यांना, मग ते कुठल्याही जातिधर्माचे असोत, त्रस्त करीत असेल, छळत असेल तो मुळीत  ईमानधारकच नाही अशी ठाम भूमिका पैगंबर (स.) घेतात. ईमानच नसेल तर चारित्र्य ते कुठले?
पैगंबर मुहम्मद (स.) एकदा म्हणाले, ‘‘अल्लाहची शपथ! तो मोमिन अर्थात मुस्लिम नाही जो स्वत: तर पोटभर जेवतो मात्र त्याचा शेजारी उपाशी झोपतो.’’ (मिश्कात)
‘ईमान’ खरे तर माणसाच्या मनात वास करतो. त्याचे उदाहरण असे आहे जणू मनात एक बीज रोवावे, ज्याचे एका महान वृक्षात रूपांतर व्हावे, ज्यापासून मानवजातीला गोड फळे  लाभावीत, सावलीही लाभावी आणि इतरही लाभ व्हावेत.
शेजाऱ्यापाचाऱ्यांशी सद्व्यवहार करणे, त्यांच्या सुखदु:खात सहकार्य करणे ही ‘ईमान’ची लक्षणे आहेत. या उलट शेजाऱ्यांना त्रास देणे, छळणे ही ‘ईमान’ नसल्याची लक्षणे आहेत. आपल्या  देशात जवळपास वीस कोटी मुस्लिम राहातात. उर्वरित ऐंशीनव्वद कोटी मुस्लिमेतर बांधव त्यांचे शेजारी आहेत. पैगंबरांचा शेजारधर्माचा हा एक उपदेश जरी मुस्लिमांनी अंमलात आणला  तरी इतर धर्मीयांमध्ये त्यांच्याविषयी  द्वेष, घृणा, मत्सर राहील का?
म्हणून कवीने म्हटलंय,
‘‘जुबां से कह भी दिया ला इलाह तो क्या हासिल?
दिलो निगाह जो मुसलमाँ नहीं, तो कुछ भी नहीं।’’
अर्थात- निव्वळ इस्लामचा उच्चार
करण्याला काहीच अर्थ नाही. आचारविचार, चारित्र्यात
इस्लाम नसेल तर सारे व्यर्थ आहे.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


मा. अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात की, आम्हाला पैगंबरांनी उपदेश केला, ‘‘तरुणांनो, वैवाहिक पात्रता असणाऱ्यांनी जरूर विवाह करावा. त्यामुळे दृष्टी-संयम प्राप्त होतो आणि  माणूस चारित्र्यसंपन्न होतो. मात्र पात्रता नसणाऱ्यांनी रोजे (उपवास) ठेवावेत. रोजा वासनांवर नियंत्रण ठेवण्यात गुणकारी आहे.’’ (मुस्लिम व बुखारी)
निरुपण-
वैवाहिक पात्रता असणाऱ्याने अविवाहित राहणे कदापि योग्य नव्हे. त्याने जरूर विवाह करावा. वैध मार्गाने लैंगिक गरजेची परिपूर्ती केल्याने माणूस व्यभिचारापासून सुरक्षित होतो. अविवाहित व्यक्ती सदैव सैतानाच्या जबड्यात असते. विषयसुखाची भूक माणसाला वाममार्गाकडे नेऊ शकते. 
तरुण मुलामुलींना अधिक काळ वैवाहिक जीवनापासून वंचित ठेवल्याने समाजात अनेक घृणास्पद व अनैतिक समस्या फोफावतात. विषयसुखाचा एकमेव वैध मार्ग म्हणजे विवाह आहे. मानवजातीची जोडप्याच्या स्वरूपात निर्मिती ही अल्लाहची महान कृपाच आहे, असे कुरआन म्हणतो. पती-पत्नी एकमेकांच्या पोषाखासमान आहेत, असेही कुरआनात वर्णन आहे.  इस्लाम माणसाला चारित्र्यसंपन्नतेच्या उच्चतम शिखरापर्यंत पोहचवू इच्छितो. त्यासाठी विवाह अनिवार्य आहे. चारित्र्यसंपन्न व्यक्ती, चारित्र्यसंपन्न कुटुंब व चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीमध्ये विवाहाला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र काही लोक विवाह करणे, संसार करणे इ. बाबींना अध्यात्मापासून वेगळे समजतात. हे कदापि योग्य नव्हे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा स्पष्ट सांगितले की, पत्नीशी संभोग करणेदेखील पुण्यच आहे. त्यावर एकाने आश्चर्याने विचारले की, ते कसे? पैगंबरांनी त्याला प्रतिप्रश्न केला की  जर तो व्यभिचार करत असेल तर ते पाप नव्हे काय? तो म्हणाला होय, ते पापच! मग पैगंबर म्हणाले की जर व्यभिचार करणे पाप असेल तर पत्नीशी संभोग करणे पुण्य का नसावे?
खरे तर अविवाहित माणसाची नीतिमत्ता कधी ढासळेल याचा नेम नाही. म्हणूनच आपण पाहतो आज समाजात तथाकथित चांगली वाटणारी माणसे, अगदी बुवा-बापूदेखील  व्यभिचारामुळे तुरुंगात खितपत आहेत.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला अल्लाहने यासाठी पाठविले आहे की मी चारित्र्यसंपन्नतेला उच्चतम शिखरावर पोहचवावे.’’ (मुअत्ता इमाम मालिक)
निरुपण
चारित्र्यसंपन्नता हाच धर्माचा उद्देश आहे. ईश्वराने तमाम पैगंबरांकरवी अखिल मानवजातीला चारित्र्यसंपन्नतेचीच ताकीद केली आहे. चारित्र्यहीन माणूस जीवनाचे सार्थक करू शकत  नाही. उलट तो जीवनाचा सत्यानाश करतो. इस्लाममध्ये ‘तकवा’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तकवा अर्थात ईशभीरूता असेल तरच चारित्र्यसंपन्नता निर्माण होईल. 
कुरआनात नमाजसंबंधी म्हटले आहे, ‘‘नि:शंक, नमाज माणसाला वाईट कृत्यांपासून आणि निर्लज्जतेपासून दूर करते.’’
(कुरआन, २९ : ४५)
तद्वतच रोजांचा उद्देश विषद करताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले,
‘‘रोजा म्हणजे केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी सोडणे नव्हे! रोजा जिव्हेचा पण आहे, डोळ्यांचासुद्धा आहे, कानांचाही आहे आणि हातापायांचासुद्धा!’’
अर्थात खोटारडे न बोलणे, शिवीगाळ न करणे, निंदानालस्ती न करणे हा जिव्हेचा रोजा आहे. अश्लीलता व नग्नतेपासून दूर राहणे व जगाकडे वाईट नजरेने न पाहणे हा डोळ्यांचा रोजा  आहें. कोणावर अन्याय-अत्याचार न करणे, भ्रष्ट आचार न करणे हा हातांचा रोजा आहे.
जकातचाही वास्तविक उद्देश माणसाच्या चित्ताचे शुद्धीकरणच आहे.
सार्थक हज्ज (हज्जे मबरूर) संबंधी म्हटलेले आहे की त्यामुळे हाजीचे चारित्र्य अधिकाधिक शुद्ध व्हावे त्याने हर वाईट कृत्यापासून स्वत:ला रोखावे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘आता तरी पुढे हाची उपदेश! नका करू नाश आयुष्याचा!
सकळांच्या पाया माझे दंडवत! आपुलाले चित्त शुद्ध करा!’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चारित्र्यसंपन्नतेचा केवळ उपदेशच केला नाही तर त्यांचे स्वत:चे जीवनच आता अखिल मानवजातीसाठी जगाच्या अंतापर्यंत सर्वांगांनी चारित्र्यसंपन्नतेचे एक  श्रेष्ठतम व आदर्श उदाहरण आहे.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget