Latest Post

कुरआनोक्ती आहे,
‘‘तो आपल्या इच्छेने बोलत नाही, हा तर एक दिव्यबोध आहे जो त्याच्यावर अवतरला जातो. त्याला जबरदस्त बलशालीने शिकविले आहे.’’ (कुरआन ५३: ३-५)
जेव्हा असे म्हटले जाते की प्रेषित जे काही शिकवतात ते सर्व अल्लाहकडून असते. हे म्हणण्याला विस्तृत अर्थ आहे.
ही शिकवण दोन प्रकारची आहे.
१) अल्लाह प्रत्यक्ष अथवा दूताकरवी प्रेषितांना देतो.
२) प्रेषित दिव्य प्रकटनानुसार अथवा दिव्यबोधनुसार काही नीतिनियम तयार करीत असत.
पहिल्या प्रकारची शिकवण मूळ स्वरुपाची आणि अल्लाहने प्रत्यक्ष अवतरित केलेली आहे तर दुसरी अप्रत्यक्ष आणि प्रेषितांनी दिव्यबोधच्या प्रकाशात तयार केलेली आहे. परंतु हेतु आणि पावित्र्यात दोन्ही शिकवणी सारख्या आहेत.
निष्पापपणा आणि प्रेषित
प्रेषित निष्पाप आहेत. त्यांच्या हातून धार्मिक-प्रकारची चूक न होणे अटळ आहे. त्यांची इच्छा, आकांक्षा, वागणूक, विचार, आचार हे सर्वप्रकारच्या वाईटांच्या विरोधातील पुरावेच होत. ते धर्मबाह्य बाबतीत चूक करणे शक्य आहे, परंतु याचा त्यांच्या प्रेषित्वावर काहीच परिणाम होत नाही. त्यांचा निष्पापपणा दर्शवितो की दिव्य प्रकटनाचा अर्थबोध घेताना त्यांच्याकडून चूक होणे अशक्य आहे. तसेच दिव्यबोधाच्या प्रकाशात नीतिनियम तयार करताना अथवा ईशादेश आचरणात आणताना त्यांच्याकडून हलगर्जीपणा अथवा एखादी चूक अजिबात होणार नव्हती. म्हणून त्यांच्या इतर बाबींसाठी (धर्मबाह्य) त्यांच्या निष्पापपणावर काहीच परिणाम होणार नव्हता.
प्रेषित हे विचार करीत नाहीत अथवा चूक करीत नाहीत म्हणून निष्पाप होते असे मुळीच नाही तर वस्तुस्थिती वेगळी आहे. इतर मानवांसारखेच प्रेषितांच्या हातून चूक होणे सहाजिक आहे. परंतु प्रेषितांची ही चूक करण्याची पात्रता कधीच घडून येत नसे, कारण त्यांचे विचार आणि दृष्टी त्यांच्या नैतिकतेइतकीच परिपूर्ण अशी होती. एकीकडे प्रेषित मुहम्मद (स) दिव्य प्रकटनाचा उद्देश जाणून होते आणि त्या प्रकाशात ते नीतिनियम बनवित असत. दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांच्या ‘स्व’वर पूर्ण नियंत्रण होते. त्यांचे नैतिक अधिष्ठान, अल्लाहचे भय आणि परलोकाविषयीचे ज्ञान अतिउच्च दर्ज्याचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या हातून पापकर्मे घडतील अशी कधीच भीती नव्हती. हे त्यांच्या निष्पापपणाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते.
पण हे फक्त एकमेव वैशिष्ट्य प्रेषित मुहम्मद (स) यांच्या निष्पापपणाचे नाही. त्यांना निष्पापपणाचा उच्च दर्जा प्राप्त होण्यास दिव्यबोध आणि त्यांचे आत्मिक निरीक्षण हेसुध्दा कारणीभूत आहे. खरे तर हे दिव्य निरीक्षणच त्यांना बौध्दिक आणि नैतिक चुकांपासून दूर ठेवत होते. प्रेषितांच्या हातून चूक अशी होतच नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यांच्या हातून चुका घडत होत्या, परंतु जेव्हा असे घडत तेव्हा त्यांना अल्लाहकडून सावधानतेचा इशारा त्वरित मिळत असे. दुसऱ्यापर्यंत ही चूक पोहचण्याअगोदर त्यास दिव्यबोधाद्वारे अगदी दुरूस्त केले जात असे. जेव्हा त्यांना काही विपरीत (चूक) आपल्या हातून घडावे असे मनोमन वाटे तेव्हा त्यांची अतिउच्च दर्ज्याची नैतिकशक्ती त्या अइच्छेला गाडून टाकत असे. कुविचार आणि अनाचाराबरोबर दोन हात करताना त्यांची उच्च दर्ज्याची नैतिक शक्तीच फक्त मुकाबला करीत नसे, तर त्याबरोबर दिव्यबोधसुध्दा लढाईत सामील होत असे आणि त्या कुविचाराचा तथा दुष्टकर्माचा कायमचाच नाश करीत असत.
प्रेषितांचा निष्पापपणा हा प्रेषितशृंखलेच्या महान कार्यासाठी अत्यावश्यक होता. प्रेषित जर खोटे बोलत असतील. पूर्वग्रहदूषितता आणि दिव्यप्रकटनाचे चुकीचे अर्थ लावत असतील तर त्यांच्यावर कोण वेडा विश्वास ठेवणार होता? लोक अशा व्यक्तीवर विश्वास तरी कसा ठेवणार की तो अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत ढवळाढवळ करून पोहोचवित आहे? असा मनुष्य मानवी चारित्र्याचा अनुकरणीय असा आदर्श जगापुढे ठेऊ शकत नाही कारण त्याचे स्वतःचेच चारित्र्य हे हीन दर्जाचे आणि दुसऱ्याला उपदेश करण्यालायक नसते. प्रेषित्व पूर्णतः असफल ठरते जर ते प्रेषित या महान कार्यासाठी दिव्यप्रकटनापुढे पूर्णपणे आज्ञाकित होण्याचे उदाहरण जगापुढे ठेवण्यास असमर्थ ठरणार होते.
प्रेषित हे निष्पाप होते म्हणजे ते व्यक्ती म्हणूनसुध्दा निष्पाप होते. बौध्दिक आणि शारीरिक भ्रष्ट आचारांचा (भ्रष्टाचार) तिटकारा त्यांना होता. हे अशामुळे की ते अल्लाहचे खास उफत केलेले दास होते. दुसऱ्या कोणाला हा दर्जा प्राप्त होऊच शकत नाही. भले तो कितीही धार्मिक, नैतिक का असेना. मनुष्याचे विचार आणि आचार हे निष्पापपणाला पोहचू शकतील, पण हे अशक्य आहे की त्याची नैतिकता चूक करण्यापलीकडील आणि विचाराने दैवी बोधाचा अचूकपणे अर्थ काढण्याचे बौध्दिक सामर्थ्य प्राप्त करणारी आहे, हे अशक्य कोटीचे आहे. म्हणून हा शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत व्यक्ती हे जाणून घेत नाही की प्रेषित मुहम्मद (स) हेच फक्त निष्पाप आहेत आणि हे सत्य त्या व्यक्तीच्या हृदयात खोलवर जाऊन पोहोचत नाही, तोपर्यंत ही व्यक्ती प्रेषितांवर मनापासून प्रेम करूच शकत नाही आणि त्यांचा खरा अनुयायी आणि अज्ञांकित बनून राहू शकत नाही. अशा स्थितीत प्रेषितांबरोबर कोणी भागीदार ठरविण्याचे पाप त्या व्यक्तीकडून अनायासे घडून जाते.

अल्लाहने नेहमीच मानवाच्या मार्गदर्शनासाठी मानवाचीच नियुक्ती केलेली आहे. हे प्रेषित दूत नव्हते की जिन्न (पवित्रयोनि) नव्हते. असेही कधी घडले नाही की या कार्यासाठी अल्लाहने मानवी रूप धारण केले अथवा इतर रूप धारण केले. जेव्हा जेव्हा या भूतलावर प्रेषित पाठविले गेले ते सर्व मानव होते. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे,
‘‘हे पैगम्बर (स) तुमच्या अगोदर आम्ही जे प्रेषित पाठविले होते, ते सर्व देखील माणसेच होते, आणि जे याच वस्त्यांच्या निर्वासितांपैकी होते आणि त्यांच्याकडे आम्ही दिव्य-प्रकटन पाठवित राहिलो होतो.’’ (कुरआन १२: १०९)
कुरआन धर्मांच्या आणि राष्ट्रांच्या घटनांचा उल्लेख करून स्पष्ट करतो की अल्लाहच्या प्रेषितांवर त्यांच्या विरोधकांनी अविश्वास ठेवला होता तो यामुळे की ते (प्रेषित) त्यांच्यासारखे होते. ते प्रश्न विचारीत की आमच्यासारखा मनुष्य प्रेषित कसा बरे बनू शकेल? कुरआनोक्ती आहे,
‘‘त्यांच्या पैगम्बरांनी त्यांना सांगितले, ‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्या सारखे मानव.’’ परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला उफत करतो, आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादे प्रमाण आणून द्यावे.’’ (कुरआन १४: ११-१२)
म्हणून हे खरे आहे की प्रेषित मानवातूनच अल्लाहने वेळोवेळी नियुक्त केले आहेत. आपल्यासारखे त्यांना शरीर होते, मने होती, इच्छा आकांक्षा होत्या. त्यांना बायका आणि मुले होती. त्यांचा जन्म आपणासारखाच झाला आणि संगोपण नैसर्गिकरित्या झाले. ते खात आणि पित होते. झोपत आणि जागे होत असत. हसत आणि रडत असत. आपल्यासारखेच सुखी आणि दुःखी बनत असत. त्यांना मृत्यू आपल्यासारखाच येत असे. थोडक्यात ते सर्व प्रेषित मानव होते आणि त्यांच्यात मानवाची ती सर्व गुणवैशिष्ट्ये होती. या सत्यतेला कुरआन स्पष्ट करीत आहे,
‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्या सारखे’’ (कुरआन १४ :११)
इतर अनेक ठिकाणी कुरआन या सत्यतेला स्पष्ट करीत आहे,
‘‘हे पैगम्बर (स) तुमच्यापूर्वीजे कोणतेही पैगम्बर आम्ही पाठविले होते, ते सर्व ही अन्न खाणारे आणि बाजारात हिडणारे, फिरणारे लोकच होते.’’ (कुरआन २५: २०)
एके ठिकाणी कुरआन या सत्यतेला आणखी स्पष्ट करून देत आहे,
‘‘तुमच्या पूर्वीदेखील आम्ही अनेक पैगंबर पाठविले आहेत आणि त्यांना आम्ही पत्नी व मुलेबाळे असलेलेच बनविले होते. आणि कोणत्याही पैगंबराचे हे सामर्थ्य नव्हते की अल्लाहच्या आज्ञेशिवाय एखादा संकेत त्याने स्वतःच आणून दाखविला असता.’’ (कुरआन १३: ३८)
अल्लाहने मानवालाच प्रेषित म्हणून का नियुक्त केले, याचे सविस्तर कारण आणि खुलासा कुरआन देत आहे. जे लोक आदरणीय मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वास विरोध करीत होते ते लोक आपल्या विरोधाच्या समर्थनार्थ सांगत की अल्लाहला जर प्रेषित आमच्यासाठी पाठवायचा होता तर त्याने दूत पाठविला असता, आमच्यासारखा मनुष्य पाठविला नसता. या लोकांच्या विरोधाला खोडून काढताना कुरआन स्पष्ट करतो,
‘‘यांना सांगा, जर पृथ्वीवर ईशदूत समाधानाने वावरू लागले असते, तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या ईशदूतालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनवून पाठविले असते.’’ (कुरआन १७: ९५)
वरील संकेतवचन प्रेषित्वाच्या दैवी आदेशित नियमांना प्रदर्शित करीत आहे. म्हणजे प्रेषित हा ज्यांच्यासाठी पाठविला गेला तो त्यांच्यापैकीच (सजातीय) असतो. हे अगदी साधे वाक्य आहे, परंतु विद्वतापूर्ण आहे. ही विद्वता सत्यता पटवून देत आहे. प्रेषितांची नियुक्ती मनुष्यातून केली गेली नसती तर प्रेषित्वाच्या उद्देशालाच तडा गेला असता. हे निर्विवादित सत्य आहे की समस्त मानवांसाठी प्रेषित हे अल्लाहचे संदेशवाहक होते. परंतु याचा असा मुळीच अर्थ नाही की ते पोस्टमनसारखे होते ज्याचे काम फक्त संदेश पोहचविणे आहे. प्रेषित संदेशवाहक होते परंतु ते प्रचारक, शिक्षक, मार्गदर्शक आणि समजविणारे होते, सावध करणारे होते. त्यांनी समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न, काबाडकष्ट केले. त्यांनी ईशसंदेश आपल्या जीवनव्यवहारात आत्मसात करून लोकांपुढे आदर्श ठेवला आहे. प्रेषित हा प्रथम मानव आहे, ज्याने दिव्य प्रकटनाद्वारे मिळालेले आदेश आणि मार्गदर्शनानुसार आपले जीवन कंठीले जे अनुकरणीय आहे. प्रेषिताच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे की, त्याने सर्वांसाठी आदर्श बनावे. जोपर्यंत तो आपले सर्व जीवनकार्य तडीस नेत नाही तोपर्यत प्रेषितांची ही शृंखला परिपूर्ण होतच नाही. प्रेषिताव्यतिरिक्त इतरांना हे मदतकार्य पार पाडणे शक्य आहे का? निश्चितच उत्तर नकारार्थीच आहे. एखाद्याला अंशतः हे महतकार्य पार पाडणे शक्य होईल, परंतु प्रेषितकार्य पूर्णपणे कोणी इतर पार पाडूच शकत नाही. आपण दूतांचे उदाहरण घेऊ या. ते सर्वप्रथम या कामासाठी आपण अपेक्षित धरू या. दूतांना मानवांमध्ये प्रेषित म्हणून पाठविले असते तर स्थिती काय असती? दूतांनी अल्लाहचे संदेश (दिव्य प्रकटन) मनुष्यापर्यंत जरूर पोहचवले असते. परंतु दूत म्हणून त्यांनी इच्छा-आकांक्षा, भावना इ.बद्दलचे ईशादेश कसे पाळले असते? माणसाच्या विशिष्ट प्रश्नाबद्दलचे आदेश दूतांनी कसे व्यवहारात आणले असते? दूत दिव्य प्रकटनाचा बहुतांश भाग जर अंगिकारात नसेल तर त्यांच्याकरवी अनुकरणीय असे आदर्श स्थापित होऊच शकत नाही. दूतांना मनुष्याच्या इच्छा आणि भावनांबद्दल अज्ञान असल्याने ते मानवांना मार्गदर्शन करुच शकत नाहीत. मानवांच्या समस्या सोडविणे दूतांच्या कक्षेबाहेरील कार्य आहे. दूत मनुष्यापुढे आदर्श दैवी जीवनप्रणाली ठेवू शकतच नाही. मनुषत्वाबद्दलचे अज्ञान त्यांना त्यांच्या प्रेषितकार्यात मोठा अडथळा असल्याने मनुष्याचे चारित्र्य घडणकार्य अशक्य आहे.
दिव्य कुरआननुसार प्रत्येक प्रेषित हा त्या त्या लोक समुदायांमधून नियुक्त केला गेला होता. त्याचप्रमाणे दिव्य प्रकटनसुध्दा त्याच स्थानिक भाषेत अवतरित होत होते.
कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आम्ही आपला संदेश देण्यासाठी जेव्हा कधी एखादा प्रेषित पाठविला आहे, त्याने आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्याने त्यांना चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे मांडावे. मग अल्लाह ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो, तो प्रभुत्वसंपन्न व बुध्दिमान आहे.’’ (कुरआन १४: ४)
दिव्य प्रकटन अशा प्रकारे स्थानिक भाषेत अवतरित करून त्यांना (लोकांना) स्पष्ट करून सांगण्याची गरज मनुष्यच भागवू शकतो, दूत नाही.
‘‘त्याने (प्रेषिताने) त्यांना (लोकांना) चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे (दिव्यप्रकटन) मांडावेत.’’ (कुरआन १४: ४)
वरील कुरआन संकेत स्पष्ट आहे की प्रेषितकार्यासाठी मानवातूनच एक मनुष्य नियुक्त करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे ईशसंदेश अगदी स्पष्टपणे त्यांच्याच भाषेत मांडला जाण्यासाठी अल्लाहने परिपूर्ण अशी व्यवस्था केली होती. ईशसंदेश समजण्यासाठीचे जे अडथळे होते त्यांना दूर करण्यासाठी अतिमहत्त्व देण्यात आले होते. म्हणून प्रेषित ज्या ठिकाणी नियुक्त केला अल्लाहने त्या लोकातूनच नियुक्त केला. म्हणूनच प्रेषित हे मनुष्यच असणे अत्यावश्यक होते हे वरील विवेचनावरून अगदी स्पष्ट होते.
प्रेषित्वाचे स्वरूप: प्रेषित्व हे काही असे काम नव्हे की ते मेहनतीने प्राप्त केले जावे. प्रेषितांची नियुक्ती अल्लाह करत असे आणि प्रेषित्व ही अल्लाहची खास कृपा आहे. अल्लाह प्रेषित त्यांनाच नियुक्त करीत ज्यांना तो या कार्यासाठी निवडत असे. मनुष्याची इच्छा अथवा त्याचे परिश्रम या कामी म्हणजे प्रेषित्व प्राप्तीसाठी कुचकामी आहेत. अल्लाह स्वतः या महान कार्यासाठी एखाद्याची नियुक्ती करीत असे. कुरआनच्या पारिभाषिक शब्दावलीत यास ‘‘इस्तफा’’ असे संबोधले गेले आहे. म्हणजे अनेकातून एक उत्तम माणसाची निवड करणे होय. या शब्दाने अभिप्रेत अशी व्यक्ती ज्यास प्रेषित म्हणून निवडले गेले ती व्यक्ती या दिव्य कामासाठी अतियोग्य आहे. प्रेषित नियुक्त करण्याची ही पध्दत तार्किकदृष्ट्यासुध्दा योग्य आहे आणि महत्त्वाची आहे. कुरआन यास अनेक वेळा स्पष्ट करून सांगत आहे. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वावर आक्षेप घेण्यात आले आणि इतरांनीसुध्दा तसा दावा केला तेव्हा अल्लाहने स्पष्ट केले,
‘‘अल्लाह उत्तम प्रकारे जाणून आहे की दिव्य प्रकटन कोणावर अवतरित करावे.’’ (कुरआन ६: १२५)
प्रेषित्व हे शिकून आणि कष्ट करून आत्मसात करता येणे अशक्य आहे किबहुना त्याचे खरे महत्त्व आपल्या दृष्टीपलीकडील गोष्ट आहे.
कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात सांगा, ‘‘हा आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना अल्पज्ञान मिळाले आहे.’’ आणि हे पैगंबर (स) आम्ही इच्छिले तर ते सर्वकाही तुमच्याकडून हिरावून घेऊ जे आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनाद्वारे प्रदान केले आहे. मग आमच्याविरुध्द तुम्हाला कोणी समर्थक मिळणार नाही, जे ते परत मिळवून देऊ शकेल. हे तर जे काही तुम्हाला प्राप्त झाले आहे तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने मिळाले आहे, वस्तुस्थिती अशी आहे की त्याची कृपा तुम्हावर फार मोठी आहे. सांगून टाका की मानव आणि जिन्न (अदृश्य निर्मिती) सर्वच्या सर्वजनांनी मिळून जरी या कुरआनसारखी एखादी वस्तू आणण्याचा प्रयत्न केला तरी आणू शकणार नाही, मग ते सर्व एकदुसऱ्याचे सहायक का असेनात.’’ (कुरआन १७: ८५-८८)
मनुष्याची बुध्दी आणि आकलनशक्ती अगदी मर्यादित आहे. मनुष्य आत्मा आणि त्याचे स्वरुप जाणून घेण्यास असमर्थ आहे. आत्मा जाणून घेण्याची असमर्थता हीच खरी प्रेषित्वाला जाणून घेण्याची असमर्थता आहे. खरे तर प्रेषित्वाचा हा गाभा आहे ज्याला ते प्राप्त झाले तोच प्रेषित होतो.
प्रेषित्वाचे वैश्विक स्वरूप
प्रेषित प्रत्येक लोकसमूहात पाठविले गेले आहेत. याविषयी कुरआन सविस्तरपणे माहिती करून देत आहे,
‘‘परंतु (हे पैगंबर (स)), तुम्ही लोकांना ऐकवू शकत नाही जे कबरीत दफन आहेत. तुम्ही तर केवळ एक सावध करणारे आहात. आम्ही तुम्हाला सत्यानिशी पाठविले आहे. शुभवार्ता देणारा व सावधान करणारा बनवून. आणि कोणताही लोकसमुदाय असा होऊन गेला नाही ज्यात सावध करणारा आला नाही. आता जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवित असतील, तर यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीदेखील खोटे लेखले आहे. त्यांच्या पाशी त्यांचे पैगंबर, स्पष्ट प्रमाण, संदेश आणि उज्वल आदेश करणारा ग्रंथ घेऊन आले होते. मग ज्या लोकांनी मान्य केले नाही. त्यांना मी पकडले आणि पाहून घ्या माझी शिक्षा किती कठोर होती.’’ (कुरआन ३५: २३-२६)
कोणताही लोक समुदाय (राष्ट्र) या पृथ्वीवर असा नाही जिथे लोकांना सावध करणारा आला नाही. याचे एकमेव कारण हे आहे की पृथ्वीवरील सगळी माणसे एकसारखी आहेत. ते सर्व एका हेतुपोटी निर्माण केले गेले. अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारणे हा प्रत्येकाचा उद्देश आहे. परलोकात याविषयी प्रत्येकाला विचारणा होणारच आहे. अशी जर परिस्थिती आहे, तर मग अल्लाहने काहींना जबाबदाऱ्यांचे स्मरण करून द्यावे आणि इतरांना दुर्लक्षित करावे हे कसे शक्य आहे? काहींना अल्लाहने आपले मार्गदर्शन द्यावे आणि इतरांना त्यापासून वंचित ठेवावे हे कसे शक्य आहे? हे अशक्य आहे. कारण अल्लाह सर्वांचा आणि या सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, मालक आणि शासक आहे. त्याची दया सर्वांसाठी सारखी आहे आणि त्याचा न्याय खरा न्याय आहे.
येथे हे स्पष्ट लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा असे म्हटले जाते की प्रेषित प्रत्येक लोक समुहात-राष्ट्रात पाठविले गेले आहेत, याचा अर्थ ते (प्रेषित) राष्ट्राच्या एका विशिष्ट पिढीदरम्यान पाठविले गेले होते.

प्रेषित्वाची गरज: इस्लामचे तिसरे मूलतत्त्व प्रेषित्व आहे. अरेबिक भाषेत यासाठी ‘रिसालत’ हा शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ प्रेषित्व आहे. पारिभाषिक व्याख्येत अल्लाहने मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी पाठविलेले प्रेषित असा अर्थ आहे. अरेबिक भाषेत दुसरा शब्द ‘नबूवत’ हा वापरला जातो. प्रेषितांची एक साखळी ईश्वराने का निर्माण केली? याची गरज का भासली होती आणि प्रेषित्वावर श्रध्दा ठेवणे आवश्यक का आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपणास थोडे सविस्तर चितन करावे लागेल. प्रथमतः आपल्याला पाहावे लागले की मनुष्याच्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी कोणती कार्यप्रणाली आहे?
मनुष्य निर्मितीचा उद्देश आणि त्याची जबाबदारी इस्लाम नुसार ही आहे की त्याने अल्लाहची उपासना करावी आणि अल्लाहला शरण जावून अल्लाहच्या आज्ञांकित राहावे. मनुष्याचे पारलौकिक जीवनातील यश हे जीवनउद्देश प्राप्त करण्यातच आहे. अल्लाहची उपासना आणि त्याचे आज्ञांकित होणे म्हणजे त्याच्या आदेशांचे पालन जीवनव्यवहारात करणे आणि त्याद्वारे अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून घेणे होय. आज्ञाधारकता दिव्य प्रकटनासाठी आहे. दिव्य प्रकटनाशिवाय आपण अल्लाहबद्दल विचारसुध्दा करू शकत नाही. जेव्हा मनुष्य अल्लाहचा आज्ञाधारक सेवक बनून जीवन कंठण्याचे ठरवितो तेव्हा तो आपल्या स्वामीच्या दिव्य प्रकटनाला जाणून घेण्यास आतूर होतो आणि जीवनात अल्लाहचा आज्ञांकित बनून राहातो. तो हे जाणून घेण्यास आतूर होतो की अल्लाहची प्रसन्नता कशात आहे आणि अप्रसन्नता कशात! तो तत्परतेने हे जाणून घेण्यास तयार होतो की त्याने काय करावे की जेणेकरून तो अल्लाहचा विश्वासु सेवक गणला जाईल आणि कोणत्या कृत्यापासून त्याने आपला बचाव करून घ्यावा जेणेकरून अल्लाहची अप्रसन्नता आणि शिक्षेपासून दूर राहता येईल. अल्लाहची आज्ञा न पाळल्यास अल्लाहचा क्रोध आणि कोप होतो याची जाण त्याला सतत असते. हे न जाणता तो अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या मार्गात एक पाऊलसुध्दा पुढे जाऊ शकत नाही.
प्रश्न स्वाभाविकतः निर्माण होतो की आपण कसे जाणून घ्यावे की अल्लाहची इच्छा आणि आदेश काय आहेत? अल्लाहने कोणते कार्य करण्याचे आणि कोणते कार्य न करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे आपण कसे जाणून घ्यावे? एक मार्ग आहे तो आपल्या बुध्दीने त्याची खात्री करून घ्यावी. पण हे पर्याप्त नाही. मानवी बुध्दीच्या पलीकडील हे कार्य आहे. कोणीही आपल्या बुध्दीविवेकानेच फक्त आपले आणि या सृष्टीचे सत्य ओळखू शकत नाही. त्याच्या निर्मात्याचे आणि पालनकर्त्याची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेणे अशक्य आहे. मनुष्यावर या गुणवैशिष्ट्यांचा कोणता परिणाम होतो? त्याचे कोणते आदेश आहेत? मर्यादित बुध्दी या सत्याला जाणून घेण्यास अपात्र ठरते.
दुसरा मार्ग आहे स्वतःच्या अंतर्ज्ञानाचा आणि इच्छाशक्तीचा! परंतु दुसरा मार्गसुध्दा तसा पहिल्यामार्गाप्रमाणेच अपुरा आहे. स्वअस्तित्वाला संपविण्याचे हे अविरत प्रयत्न या उद्देशाला प्राप्त करू शकत नाहीत. अंतर्ज्ञान याने पवित्र जरूर होईल, परंतु असा मनुष्य दिव्य प्रकटन आणि ईश्वरेच्छेला पाहू अथवा अनुभवू शकत नाही. आरशाला जर एखाद्याला प्रतिबिंबित करावयाचे असेल तर आरसा फक्त शुभ्र आणि स्वच्छ असून चालत नाही, हेसुध्दा आवश्यक आहे की ज्याला प्रतिबिबित करावयाचे आहे ते आरशासमोर जवळ असणे आवश्यक आहे. जोपर्यंत अल्लाह दिव्य प्रकटन निश्चित करून त्याला एखाद्याच्या हृदयावर अवतरित करीत नाही तोपर्यंत, अल्लाहचा संदेश परिवर्तीत होणार नाही. परंतु आजपर्यंत हा दावा कोणी केलेला नाही की अल्लाहने दिव्य प्रकटन अंतर्ज्ञानाने आयोजित केले आहे. म्हणून हा दुसरा प्रकारसुध्दा दिव्य प्रकटन जाणून घेण्यासाठी असमर्थ ठरतो.
तिसरा मार्ग अल्लाहचे दिव्य प्रकटन आणि प्रसन्नता प्राप्त करण्याचा सामुदायिक चितन मनन हा आहे. व्यक्तिगत चितनच्या विरोधात जसा आंधळा मनुष्य म्हणजेच दृष्टीहीन मनुष्य दृष्टीवान मनुष्याची बरोबरी करू शकत नाही, तसेच माणसांची गर्दी दिव्य प्रकटन जाणून घेण्यास असमर्थ आहे. ही गर्दी अशा माणसांची असते जे व्यक्तिगतरित्या दिव्य प्रकटन आपल्या बुध्दीनुसार जाणून घेण्याससुध्दा असमर्थ ठरतात. म्हणून हा मार्गसुध्दा वरील दोन्ही मार्गांप्रमाणे अपूर्ण आणि अपर्याप्त असा आहे. म्हणून असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही की वरील तिन्ही मार्ग मनुष्याची ही निकड पूरी करण्यास असमर्थ आहेत.
आपण हे सत्य नाकारू शकत नाही की आपण स्वतः अनेक बाबतीत वाईटापासून चांगले ओळखू शकतो. अशा प्रसंगी आपली बुध्दी, अंतरात्मा, दिव्य मार्गदर्शन आणि आपला विवेक आपणास साहय्य करीत असतात. हे दुसरे तिसरे काही नसून चांगले आणि वाईट यांची पारख करणे होय. पण असा अनुमान काढणे हे योग्य होणार नाही की मनुष्य जर लहानातील लहान बाबींना वेगळे करू शकतो अथवा ओळखू शकतो तर तो दिव्य प्रकटनाला जाणून घेण्याससुध्दा पात्र आहे. काही बाबींचे ज्ञान असणे म्हणजे सर्व बाबींचे ज्ञान आहे असे समजणे चुकीचे आहे. आपण जर धावता दृष्टीक्षेप जगाकडे टाकला तर कळून येते की येथे जीवनमूल्यांबद्दल एकवाक्यता नाही. अनेक बाबींना वाईट किवा चांगले म्हणून सर्वमान्यता अद्याप मिळालेली नाही. अशा अनेक बाबींची लांबलचक यादीसुध्दा सौम्य दृष्टीने साकार होणे अशक्य आहे? अतिसूक्ष्म पडताळणी केल्यास ही यादी आणखी निराशाजनक दिसेल. स्वाभाविकपणे आपण हा दावा करूच शकत नाही की हा पुरावा तकलादू आहे. जर मानवाने ठरविले की लहान वस्तूंचा गट आपणास कशाचीच खात्री देऊ शकत नाही की ते चांगल्या आणि वाईटाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पणती प्रकाशमान आहे परंतु ती सूर्यांची जागा घेऊ शकत नाही, जो समस्त सृष्टीला प्रकाशमान करतो.
म्हणून मनुष्याची असमर्थता याबाबतीत मान्य करणे स्वाभाविक आहे. बुध्दी किवा अंतर्ज्ञानसुध्दा याला आवाहन देऊ शकत नाही. अशा परिस्थितीला दिव्य मार्गदर्शनाचीच गरज भासते. एकीकडे मनुष्याची बुध्दी आणि आंतर्ज्ञान दिव्य प्रकटन जाणून घेण्यास असमर्थ आहेत. तर दुसरीकडे दिव्यप्रकटनाची गरज ही अन्न आणि पाण्यासारखी निकडीची आहे. अशा परिस्थितीत दुसरा पर्यायच शिल्लक राहत नाही आणि तो म्हणजे अल्लाहने बाह्य रूपाने एखादी व्यवस्था दिव्य प्रकटनासाठी करावी.
म्हणून एका बाजूला माणसाची असमर्थता आणि दिव्य प्रकटनाची तीव्र आणि मौलिक निकड, तसेच दुसऱ्या बाजूला अल्लाहचे प्रभुत्व, कृपाळु, दयाळु आणि सर्वज्ञ न्यायप्रियता, या सर्व ईशगुणांच्या परिणामामुळे मनुष्याला अंधारात चाचपडत ठेवणे हे अशक्यप्राय आहे. मानवाला अशा वेळी मदतीची गरज होती आणि दिव्य मार्गदर्शनाची निकड होती, ज्यामुळे त्याला सरळ मार्गक्रमण व आज्ञाधारकता आपल्या जीवनात अंगीकारता आली. हे कसे शक्य आहे की सर्व विश्वांचा स्वामी अल्लाह हा आपल्या निर्मिती (मानवतेसाठी) मार्गदर्शनाची बाह्य व्यवस्था करून दिव्य संदेश मानवांपर्यंत पोहोच करणार नाही? अल्लाहने यासाठी एक दिवसाचासुध्दा उशीर केलेला नाही. अल्लाह एकीकडे मानवासाठी भौतिक गरजा भागविण्यासाठी विस्तीर्ण अशी व्यवस्था करून ठेवतो आणि दुसरीकडे मानवासाठी त्याच्या नैतिक आणि धार्मिक गरजांची व्यवस्था करून ठेवणार नाही, असे होणे नाही! अल्लाहने मनुष्यावर ही जबाबदारी टाकली आहे की त्याने सत्यमार्गावर आपले जीवन कंठावे, अल्लाहच्या कृपेच्या आणि न्यायप्रियतेच्या विरोधात असते जर मानवाच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहने आवश्यक ती व्यवस्था केले नसती. अल्लाहने तशी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेला पारिभाषिक शब्दात ‘‘प्रेषित्व’’ असे म्हणतात. ज्या मनुष्याद्वारे दिव्य मार्गदर्शनाची ही व्यवस्था केली जाते त्यांना ‘प्रेषित’ असे म्हणतात.
हे अगदी स्पष्ट आहे की मनुष्य दिव्य प्रकटनाबद्दल प्रेषिताशिवाय जाणू शकत नाही. हेसुध्दा तितकेच स्पष्ट आहे की प्रेषित्वावरील श्रध्दा (ईमान) मुस्लिमासाठी अत्यावश्यक आहे. हे इतके गरजेचे आहे जसे स्पष्ट पाहण्यासाठी दोन डोळ्यांची आवश्यकता आहे. जर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग असेल तर त्या मार्गालाच त्या ठिकाणी पोहचण्यासाठी स्वीकारावे लागते.
ही बाब येथे संपत नाही तर प्रेषित्वाचे व्यावहारिक महत्त्व यापेक्षा अधिक स्पष्ट आहे. प्रेषित्वाविना अल्लाहला व पारलौकिक जीवनास समजणे उमजणे अशक्य आहे. मग दिव्य प्रकटनाबद्दल तर विचारू नका! प्रेषित्व हे एक माध्यम आहे, ज्याद्वारे आपणास अल्लाह आणि पारलौकिक जीवनाचे ज्ञान मिळते. स्पष्टपणे सांगायचे तर प्रेषित्वामध्ये श्रध्दा ठेवण्याशिवाय अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर श्रध्दा ठेवणे शक्य नाही. म्हणून प्रेषितांवरील श्रध्दा ही इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी एक आहे. श्रध्देचे हे एक मौलिक अंग आहे.

ईश्वराने मानवाला जे आचार-विचारांचे स्वातंत्र दिले आहे, त्याचा गैरवापर करुन मानव ईश्वराची अवज्ञा करुन बंडाचा मार्ग अनुसरु शकतो. परंतु मानवाकरिता योग्य, वैध, नैतिक आणि इहलोक व परलोक जीवनामध्ये यशाचा व चांगल्या साफल्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ईश्वराला प्रसन्न करणे, त्याची भक्ती करणे आणि त्याच्याच कायदे-कानून व आदेशपालनाचा मार्ग स्वीकारणे होय.
सर्व विश्व, सृष्टी फक्त ईश्वराची भक्ती आणि त्याच्याच आदेशाच्या पालनाकरिता आहे. ईश्वराचा भक्त, उपास्य, गुलाम म्हणजेच विश्वमानवसुद्धा ईशनिर्मितीचे एक अंग असल्यामुळे त्यानेदेखील ईश्वराच्या कायद्याचे आणि आदेशाचे पालन केले पाहिजे. याच अवस्थेत तो विश्वाशी, सृष्टीशी एकरूप होऊन सफलतेच्या मार्गावर जाऊ शकतो. ईश्वराशी बंड, त्याची अवज्ञा म्हणजे लोक-परलोक या दोन्ही जीवनांमध्ये अयशस्वी होऊन आपले जीवन बरबाद करण्याचा मार्ग आहे. आणखी दुसऱ्या दृष्टीकोनातून विचार केला तर माणसाची सर्वांत मोठी गरज आहे की, त्याला समजले पाहिजे की, ईश्वराने त्याला जीवन बहाल केलेले आहे. त्याने दिलेल्या कर्तृत्वाचा आणि सामर्थ्याचा वापर अशा प्रकारे करावा की, लोक व परलोक या दोन्ही जीवनांमध्ये यशस्वी व्हावे. त्याचा मालक, पालनकर्ता आणि बुद्धिमान असा ईश्वर त्याच्यावर संतुष्ट व प्रसन्न व्हावा. ही फक्त व्यक्तिगत बाब नसून ती सर्व जाती, समाज आणि संपूर्ण मानवतेशी संबंधित आहे. मानवाला एका अशा कायद्याची नितांत आहे, ज्यामध्ये काळे-गोरे, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, कामगार-भांडवलदार, पौर्वात्य-पाश्चिमात्य सर्वांना समान न्याय मिळेल! सर्वांना कायमस्वरुपी समान संधी असेल. सर्व मानवजातीच्या समस्यांचे एकमेव आणि समाधानकारक निराकरण असेल अशा प्रकारचे कायदे-कानून मनुष्य आजपर्यंत बनवू शकला नाही किंवा तो कधीही बनवू शकत नाही. त्याच्याजवळ ते ज्ञान, समज, बुद्धी, दृष्टी आणि ते कतृत्वच नाही जे नैतिक धर्म व शाश्वत कायदे-कानून बनविण्याकरिता जरुरीचे आहे. अशा प्रकारचे धर्म, जीवनपद्धती आणि कायदा फक्त ईश्वरच बनवू शकतो, जो सर्वज्ञानी असून सर्व मानवजात आणि निसर्गाचा निर्माता आहे. व्यक्तीचे नशीब, उत्कर्ष व अवकर्ष, यश व अपयश यांच्या कारणांचा माहीतगार आहे. अज्ञानापासून पवित्र, ज्ञान आणि विद्वत्तेचा उगम, अन्याय आणि जबाबदारीच्या प्रत्येक भागाबद्दल ज्ञानी आणि न्यायी आहे. त्याच्या दृष्टीत सर्व मानव एकसारखे, एकरुप व समान आहेत. सर्व त्याचीच निर्मिती, सेवक व भक्त आहेत. तो सर्वांकरिता कृपाळू व दयाळू आहे. त्याने मानवाच्या सर्व लहान-मोठ्या गरजांच्या पूर्ततेची व्यवस्था केली आहे. तोच संपूर्ण मानवजातीच्या सर्वांत मोठ्या आणि मूलभूत गरजांची पूर्तता करु शकतो. विचारांती ईश्वराशिवाय कोण ठामपणे सांगू शकतो की, त्याची मर्जी, आशा-आकांक्षा, इच्छा काय आहे ? ईश्वराशिवाय ईश्वरी कायदा-व्यवस्था कोण प्रदान करू शकतो? परलोकाची कायमस्वरुपी मुक्ती, सफलता आणि यशाचा मार्ग कोण दाखवू शकतो ? आणि म्हणूनच अशा न्यायी दयाळू, कृपाळू, ज्ञानी ईश्वरावर पूर्णतः श्रद्धा ठेवली पाहिजे. त्याने मानवाच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण गरजांच्या पूर्ततेकरिता व्यवस्था केलीच असेल आणि त्यांची पूर्तता तो आणि फक्त तोच ईश्वर करू शकतो.
आम्ही पाहतो की, वस्तुतः ईश्वराने मानवाच्या सर्वांत मोठ्या गरजेच्या पूर्ततेची व्यवस्था केली आहे. त्याने प्रत्येक काळामध्ये निरनिराळ्या समाजांमधून, जातींमधून अशा व्यक्ती निवडल्या आहेत की, ज्या उत्तमोत्तम बुद्धिमत्ता, सदाचारी आणि सन्मार्गी होत्या. त्या व्यक्तींना आपल्या देवदुतांमार्फत आपल्या मर्जीप्रमाणे आपला धर्म आणि कायदे-कानून याविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांना या गोष्टींची जवाबदारी दिली की, हा ईशधर्म सर्वसामान्य, अज्ञानी, मार्गभ्रष्ट, अन्यायी, कुकर्मी, सामान्य माणसांपर्यंत पोहचवावा. त्यांना सुधारण्याचे अथक प्रयत्न त्यांनी (अर्थात प्रेषितांनी) करावे. या ईशधर्मामध्ये ईश्वराने सरळ स्पष्ट केले होते की, ईश्वराचे सेवक, भक्त, दास यांनी कोणत्या रीतीने ईश्वराची भक्ती करावी, कोणते कर्म ईश्वराच्या दृष्टीने चांगले आहे ते त्यांनी करावे, कोणते कर्म ईश्वराच्या दृष्टीने वाईट आहे की ज्यापासून त्यांनी दूर राहावे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या मार्गाने ते कार्यरत राहतील ज्यामुळे सर्वांचा मालक व शासक ईश्वर प्रसन्न होईल. ईशधर्माने अशा कायद्यांची देणगी दिली, ज्यांमध्ये सर्व मानवजातीकरिता न्याय, जीवनातील सर्व बाबी, व्यवस्था, कर्तव्य, सदाचार, सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी घडामोडींमध्ये सार्वजनिक समस्यांचे समाधान आहे. त्यांच्या इहलोक जीवनाची सफलता आणि कायमस्वरुपी विकास व यशाची हमी, त्याचबरोबर परलोकाची कायमस्वरुपी मुक्ती आणि यशाची खात्री व हमी दिलेली आहे.
ईश्वराने निवडलेले प्रेषित हे ईश्वर नाहीत किंवा ईश्वराचे अपत्य, अवतार नसून ते ईश्वराच्या सृष्टीमध्ये, ईशरत्वामध्ये कणभर सुद्धा ढवळाढवळ करीत नाहीत. तेही मानवच आहेत. ईश्वराचे सेवक, भक्त व दास आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, क्षेत्रामध्ये सामान्य मानवाप्रमाणेच लाचार आहेत. तेदेखील ईश्वरीय कोपापासून, अवज्ञापासून स्वतःचा बचाव करतात आणि ईश्वर त्यांना पापांपासून वाचवीत असतो. त्यांचे जीवन म्हणजे पवित्र जीवन असते. ते ईश्वराचे उत्तम दास, उपासक व भक्त असतात. ते ईश्वरीय धर्माचा, जीवनपद्धत्तीचा प्रचारक आणि सदाचाराचा एक आदर्श नमुना असतात. प्रेषितांचे शुद्ध जीवन म्हणजे उत्तम जीवनाचा एक आदर्श नमुना आहे.
अल्लाहचे हे निवडक दास ईश्वरीय कायदे-कानून, नीती-नियम सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवीत असतात. मार्गभ्रष्ट झालेले मानव त्यांचा (प्रेषितांना) विरोध करत, त्यांना शिवीगाळ करत आणि त्यांची थट्टामस्करी करत असत व त्यांच्यावर दगडफेकही करीत असत. त्यांच्यावर अन्यायाचे डोंगर कोसळत असत व त्यांना देशांतर करण्यास भाग पाडण्याच्या किंवा ठार मारण्याच्या योजना बनवत असत. परंतु ते मनुष्याला किंवा संकटास भिऊन स्वार्थापोटी आपल्या ईश्वरीय धर्म आणि जीवनपद्धतीमध्ये कणभरही बदल करीत नसत. उलट तेच विरोधकांना क्षमा करून त्यांचीसुद्धा स्वच्छ मनाने सेवा करत असत आणि ईश्वराकडून त्यांना (विरोधकांना) सन्मार्ग मिळावा यासाठी प्रार्थना करावयाचे. त्यांना प्रसिद्धीची किंवा ऐहिक फायद्यांची लालसा नव्हती. त्यांच्या जीवनाचा उद्देश व जीवनकार्य एकच असे की, ईश्वरीय धर्म, जीवनपद्धती सतत व निःस्वार्थपणे आचरणे, त्यांचा प्रचार करुन ईश्वराच्या दासांमध्ये सुधारणा घडवून आणणे, ईश्वरीय नियम, कायदे व ईशवाणी त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि ईश्वराच्या भूमीवर त्यास प्रस्थापित करणे, या उद्देशाकरिता, मिशनकरिता प्रेषित आणि त्यांचे खरे अनुयायी प्रचारक आपले संपूर्ण जीवन आणि आपले कर्तव्य पणास लावतात. प्रत्येक प्रकारची संकटे सहन करून आपल्या प्राणांची, संपत्तीची आहुती देऊन आपल्या ईश्वराला जाऊन भेटतात.
इस्लामी दृष्टीकोनातून प्रथममानव माननीय आदम (अ.) यांच्यापासून प्रेषितत्वाचा उगम होतो आणि शेवटचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापर्यंत येऊन पूर्ण होतो. हे सर्व प्रेषित एकाच समुहाशी संबंधित आहेत. ईश्वराचे सर्व प्रेषित आणि त्यांच्यावर अवतरित ईशग्रंथ यांवर विश्वास, श्रद्धा ठेवणे हे मुक्तीकरिता जरुरीचे आहे. एखाद्या प्रेषिताला नाकारणे म्हणजे सर्व प्रेषितांना नाकारण्यासारखे आहे. तसेच कोणताही ईश्वरीय ग्रंथ नाकारणे म्हणजे सर्व ईशग्रंथांना नाकारण्यासारखे आहे.
ईश्वराचे हे प्रेषित निरनिराळ्या काळांमध्ये, युगांमध्ये समाजांमध्ये, जातींमध्ये, परिस्थितींमध्ये झाले. या फरकामुळे व विविधतेमुळे त्यांनी आणलेल्या नियमांच्या, कायद्यांच्या तपशीलामध्ये स्थानपरत्वे, काळपरत्वे काही फरकसुद्धा दिसून येतो. परंतु सर्वांचे मूलभूत तत्त्व एकच होते. सर्व प्रेषितांचा मूलभूत संदेश एकच होता की,
‘‘ईश्वराचीच-अल्लाहचीच भक्ती, आराधना, पूजा-अर्चा करा. अल्लाहशिवाय भक्ती व उपासनेयोग्य दुसरा कोणी नाही.’’
अल्लाहच्या (ईश्वराच्या) भक्तीशिवाय इतर दुसरा कोणताच मार्ग नाही की ज्यानुसार ईशधर्माचे, जीवनपद्धतीचे अनुसरण व पालन करता येईल. दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल की, प्रेषितांच्या आज्ञेचे पालन केले जावे. कारण प्रेषितांचे आज्ञापालन हे ईश्वराचे आज्ञापालन आहे आणि ईश्वराचे आज्ञापालन म्हणजे ऐहिक व पारलौकिक जीवनामध्ये सफलतेचे, यशाचे मानचिन्ह आणि प्रतीक आहे. प्रेषितांची अवज्ञा म्हणजे ईश्वर (अल्लाह) आणि त्याच्या आदेशांची, कायद्यांची अवज्ञा आहे आणि ईश्वराची अवज्ञा करणे म्हणजे ऐहिक व पारलौकिक जीवनामध्ये अयशस्वी होणे आणि विनाशाला कवटाळण्यासारखे आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) पृथ्वीतलावर अवतरले तेव्हा अनेक ईश्वरीय ग्रंथ उदा. तौरात, जबुर व बायबलमध्ये लोकांनी बदल करुन टाकले होते. आजसुद्धा हीच परिस्थिती आहे. पवित्र कुरआनशिवाय कोणताच ईश्वरीय ग्रंथ खऱ्या स्वरुपात आणि सुरक्षित अवस्थेत अस्तित्वात नाही. मानवी फेरफार व बदल यामुळे सत्य व असत्य यांत संभ्रम निर्माण होतात. ईश्वरीय आदेश व कायदे- व्यवस्था यामध्ये मानवी कायदेव्यवस्थाची भेसळ झाली होती. ऐहिक व भौतिक यशाचा मार्ग ऐहिक मायाजालामध्ये जोखडून गेला होता. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआन अवतरले. कुरआनची शिकवण काही नवी नाही. कुरआनने प्रेषितांच्या शिकवणींमधील मानवी फेरबदलाला वेगळे केले, असत्यापासून सत्याला उजेडात आणले, ईश्वराशी नाते आणि मुक्तीच्या खऱ्या मार्गाची ओळख निर्माण केली, ईश्वरीय कायदे-कानून, नियम यांचे खऱ्या व ठोस पद्धतीने स्पष्टीकरण केले, सर्व मानवांच्या व जगाच्या अंतापर्यंत एक सन्मार्ग आणि मार्गदर्शनामध्ये कायमस्वरुपी आधुनिकता निर्माण केली. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) जरी अरब देशातील मक्का शहरामध्ये जन्मले किंवा जगाच्या इतर कोणत्याही ठिकाणी जन्मले असते तरी इस्लामचा संदेश आणि इस्लामी संविधान संपूर्ण मानवजाती, सर्व देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाकरिता प्रलयकाळापर्यंत लागू झाले असते. प्रेषित मुहम्मद (स.) समस्त मानवांकरिता ईश्वराचे अंतिम प्रेषित आहेत.
आता आपण प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांचा ईशधर्म म्हणजेच (जीवन-व्यवस्थेला) आजच्या युगामध्ये किती महत्त्व आहे हे समजण्याचा प्रयत्न करू या.
ही गोष्ट बायबल, कुरआन आणि धर्मांच्या इतिहासामध्ये अगदी स्पष्ट आहे की, पूर्वीचे प्रेषित (मुहम्मद पैगंबराच्या आधीचे) हे संपूर्ण मानवजाती आणि प्रलयकाळापर्यंतच्या सर्व मानवांच्या मार्गदर्शनाकरिता आलेले नव्हते, तर ते ठराविक अशा विशिष्ट समूह, जातीकरिता, विशिष्ट अशा देशासाठी, राष्ट्रासाठी पाठविण्यात आले होते. याउलट पवित्र कुरआनबद्दल ईश्वराने प्रत्येक वेळी स्पष्ट शब्दांमध्ये जाहीर केले आहे की, ते संपूर्ण विश्वाच्या आणि अंतिम दिवसापर्यंतच्या सर्व मानवांकरिता, सर्व युगांमध्ये, सर्व काळांमध्ये मार्गदर्शनासाठी अवतरले आहे. आपण पाहतो की, आज देशाला, मानवतेला ठराविक कालखंडामध्येच मार्गदर्शनाची गरज नाही तर विश्वाला, मानवतेला सर्व युगांमध्ये, सर्वकाळ मार्गदर्शनाची गरज आहे आणि ती फक्त प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या शिकवणीद्वारेच आपणाला प्राप्त झाली आहे.
दुसरी गोष्ट आपण पाहतो की, ईश्वरीय ग्रंथांमध्ये पवित्र कुरआन कोणताही बदल न होता मूळ स्वरुपात, स्थितीत सुरक्षित आहे. इतर ईश्वरीय ग्रंथ सुरक्षित स्थितीत नाहीत. म्हणूनच ईश्वरीय मार्ग प्राप्त करण्याकरिता पवित्र कुरआनाकडेच निर्देश करावा लागतो आणि (आम्हाला) दुसऱ्या कोणामार्फत हे ईश्वरीय मार्गदर्शन मिळू शकत नाही.
तिसरी गोष्ट ही आहे की, पवित्र कुरआनविषयी जो तपशील प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिला आणि त्यांनी संपूर्ण जीवनभर स्वतः त्याप्रमाणे आचरण केले. हे हदीस (प्रेषिताचरण) आणि मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रामध्ये तपशीलवार नमूद केलेले आहे. जगातल्या कोणत्याही महात्म्याचा, महान नेत्याच्या जीवनाचा तपशील प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाप्रमाणे सुरक्षित नाही. हेच एकमेव असे कृतीशील आणि व्यावहारिक उदाहरण आहे, जे सर्व मानवतेच्या मार्गदर्शनाकरिता उपलब्ध आहे.
चौथी गोष्ट ही आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून अरबांच्या अत्यंत बिघडलेल्या समाजाचे एका उत्तम सजग समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. या परिवर्तनाचा व समाजसुधारणेचा हा एकमेव प्रयत्न आणि या एकमेव आदर्श नमुना बनलेल्या समाजाचा तपशील इतिहासामध्ये एक आदर्श उदाहरण आहे. सामाजिक सुधारणा आणि रचनात्मक समाजकार्याकरिता आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो.
पाचवी बाब लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वरीय धर्म (इस्लाम) प्रस्थापित करण्यासाठी एक महान क्रांती घडवून आणली आणि एका आदर्श राष्ट्राची व राज्याची स्थापना केली. त्यांच्या पश्चात खलीफांनी आणि त्यांचे सहकारी व अनुयायी यांनी त्यास विशाल करुन त्यामध्ये दृढता आणली. या एकमेव आंतरराष्ट्रीय, मानवतेचा दृष्टीकोन असणारे धार्मिक, सदाचारी आणि आदर्श राज्याच्या प्रस्थापनेचा तपशील इतिहासात सुरक्षित आहे. आपण निरंतर क्रांतिकारक देश आणि नमुनेदार आदर्श राज्याची प्रस्थापना करण्यासाठी याची मदत घेऊ शकतो.
सहावी गोष्ट ही आहे की, संपूर्ण मानवता आज महान समस्यामध्ये गुरफटलेली आहे. त्या समस्या सोडविण्यास हल्लीचे सर्व धर्म आणि ‘इझम’ (वाद) अपयशी ठरले आहेत. परंतु इस्लाम धर्मामध्ये या सर्व समस्यांचे कायमस्वरुपी उत्तर व मार्ग अस्तित्वात आहेत. दुसरा कोणताही धर्म आणि व्यवस्था अशी नाही की, सर्व मानवतेच्या समस्यांचे निराकरण करु शकेल. हाच खरा चमत्कार व महत्त्व प्रेषित मुहम्मद (स.) आणि इस्लामचे आजच्या युगामध्ये आहे!

अल्लाहच्या आज्ञांचे पालन करणारा व ते आचरणात आणणारा, असा अर्थ मुस्लिम या शब्दाचा आहे. पण अल्लाहचे अस्तित्व व त्याची सत्ता, गुणवत्ता तसेच त्याच्या इच्छेनुसारची जीवनपद्धत व पारलौकिक जीवनामधील पुरस्कार व शिक्षा याविषयीचे यथार्थ ज्ञान केवळ अल्लाहच्या प्रेषिताद्वाराच कळू शकते. म्हणून इस्लाम धर्माची अचूक व्याख्या ही आहे की, प्रेषितांनी दिलेल्या शिकवणींशी दृढ श्रद्धा व निष्ठा बाळगणे व त्यांनी दाखविलेल्या पद्धतीने ईश्वराची उपासना व त्याचे दास्यत्व करणे. जी व्यक्ती प्रेषितांचे माध्यम सोडून देऊन ईश्वराशी आज्ञाधारकतेचे व आज्ञापालनाचे थेट नाते जोडल्याचा दावा करते ती कदापिही मुस्लिम नाही.
प्राचीन काळी वेगवेगळ्या जाती-वंशासाठी वेगवेगळ्या प्रेषितांचे आगमन होत असे. तसेच एकाच जाती-वंशात एका पाठोपाठ असे अनेक प्रेषित येत असत. त्याकाळी इस्लाम म्हणजे प्रत्येक जाती-वंशांना, त्यांच्या प्रेषितांनी दिलेला विशिष्ट धर्म व दिलेली शिकवण असा असे. प्रत्येक देशात व प्रत्येक काळात इस्लामचा मूळ गाभा व त्याची वास्तवता जरी एकमेवच होती तरी त्यांच्या उपासनांच्या पद्धती, त्यांचे नियम व आचारसंहिता किंचित विविध प्रकारचे होते. याचसाठी एका जाती-वंशास दुसऱ्या जाती-वंशाच्या प्रेषिताचे अनुयायीत्व आवश्यक नव्हते, तरीसुद्धा त्यांच्याशी दृढश्रद्धा (ईमान) मनात बाळगणे हे सर्वांना अनिवार्य होते.
प्रेषित मुहम्मद (स.) यांना जेव्हा प्रेषित्व देण्यात आले तेव्हा त्यांच्याकरवी इस्लामी शिकवणीची परिपूर्णता केली गेली. संपूर्ण जगासाठी एक नियमावली व आचारसंहिता अवतरीत झाली. आता हे प्रेषित्व कोणाही एका विशिष्ट देशापुरते अगर एखाद्या जाती-वंशापुरतेच मर्यादित राहिलेले नसून ते समस्त मानवजातीसाठी आहे व ते चिरकालीन आहे.
पूर्वीच्या प्रेषितांनी इस्लामची जी शरिअत (नियम व आचारसंहिता) सादर केली होती ती सर्वच्या सर्व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनानंतर रद्दबातल केली गेली. आता ‘कयामत’ (प्रलयकाळ) पर्यंत अन्य कोणत्याही प्रेषिताचे आगमन होणार नाही,
तसेच ईश्वराकडून दुसरी एखादी शरिअतही अवतरणार नाही. तात्पर्य हे की, इस्लाम म्हणजेच प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायित्व करणे व त्यांचे आज्ञापालन करणे होय. त्याचप्रमाणे त्यांचे प्रेषित्व श्रद्धापूर्वक मानणे व ज्या बाबीवर श्रद्धा बाळगण्याची शिकवण त्यांनी दिली त्या सर्व बाबींवर विश्वासपूर्वक दृढश्रद्धा बाळगणे व त्यांनी दिलेल्या सर्व आज्ञा व आदेश यांना ईश-आज्ञा व आदेश मानून त्यांचे पालन करणे, हाच इस्लाम आहे. आता ईश्वरातर्फे अशा कोणाही व्यक्तीचे आगमन होणार नाही ज्याच्याशी निष्ठापूर्वक श्रद्धा बाळगणे आवश्यक होईल व मुस्लिम होण्यासाठी आवश्यक व तसे न केल्याने मनुष्य काफिर ठरेल.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कोणकोणत्या गोष्टीवर ‘ईमान’ (दृढश्रद्धा) बाळगण्याची शिकवण दिली त्या गोष्टी कशा खऱ्या आहेत व त्यांच्याशी दृढश्रद्धा बाळगण्याने माणसाचा दर्जा किती उंचावतो हे आता आपण पाहू या.
ईश्वरावरील श्रद्धा (ईमान) अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणीतील सर्वप्रथम महत्त्वाची शिकवण आहे ‘ला इलाहा इल्लल्लाह’ (अल्लाहखेरीज कोणीही ईश्वर नाही) हे इष्टवचन म्हणजे इस्लामचा इष्ट आधारस्तंभ आहे. एका काफिर (अश्रद्ध) पासून (सत्याचा इन्कार करणारा) एका अनेकेश्वरवाद्यापासून (मुश्रीक) तसेच एका नास्तिकापासून (Atheist) एका मुस्लिमास वेगळे करून फरक दर्शविणारे हेच ‘इष्टवचन’ आहे. याच वचनाचा स्वीकार करण्याने व अस्वीकार करण्याने माणसामाणसांत एक मोठा फरक निर्माण होतो. त्याचा स्वीकार करण्याऱ्यांचा एक समुदाय (Community) होतो व त्याचा इन्कार करणाऱ्यांचा दुसरा समुदाय होतो. त्याचा स्वीकार करणाऱ्यांना या जगापासून ते पारलौकिक जीवनापर्यंत प्रगती, सफलता व प्रतिष्ठा प्राप्त होते तर त्यास नकार देणाऱ्यांना नैराश्य, तिरस्कार व अवमान मिळतो. माणसामाणसांत जो इतका प्रचंड फरक घडून येतो तो या छोट्याशा वचनाचा तोंडाने केवळ उच्चार करण्यानेच होत नाही. जिभेने ‘क्रोसिन’चाच फक्त घोष केल्याने तुमचा ज्वर कमी होणार नाही. त्याचप्रमाणे तोंडाने ‘ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणून त्याचा अर्थ काय निघतो हे समजून न घेता तसेच उच्चारत राहाणे आहे. किती महान गोष्टीची कबुली दिली आहे व त्या कबुलीनुसार तुमच्यावर किती मोठी जबाबदारी येऊन पडते, हे जाणून न घेतल्याने व अर्थ न जाणता केवळ अशा उच्चारानेच काहीही लाभ होणार नाही. खरेतर वर नमूद केलेला फरक तेव्हाच दृष्टीस पडेल जेव्हा ‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ चा अर्थ तुमच्या रक्तात भिनेल, त्याच्या अर्थावर तुमची गाढ श्रद्धा व दृढ विश्वास बसेल आणि त्याविरुद्ध जितक्या विचारधारणा व श्रद्धा आहेत त्यापासून तुमचे मन निर्मळ होईल. अग्नि जाळणारा आहे, विष ही मृत्यूदायक वस्तू आहे. या विधानाच्या परिणामाचा जितका खोलवर ठसा तुमच्या मनावर उमटतो, कमीतकमी तेवढाच खोलवर ठसा या वचनाचाही तुमच्या मनावर उमटलेला दिसेल. अग्निच्या गुणधर्मावरील विश्वास तुम्हाला निखाऱ्यास स्पर्श करण्यापासून परावृत्त करतो. तसेच विषाच्या गुणधर्मावरील विश्वसनीय ज्ञान तुम्हाला विषापासून दूर ठेवते. अगदी त्याचप्रमाणे ‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ वरील ईमान, श्रद्धेच्या व आचरणाच्या बाबतीत सत्याच्या इन्काराचा (कुफ्र) अनेकेश्वरत्वाचा (शिर्क) व नास्तिकपणाच्या लवलेशाचासुद्धा शिरकाव करण्यापासून तुम्हाला परावृत्त करणारा होईल.
‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ चा अर्थ सर्वप्रथम आपण ‘‘इलाह’’ म्हणजे काय हे समजून घेऊ या. अरबी भाषेत ‘इलाह’चा अर्थ ‘‘उपासना करण्यास पात्र’’ व ‘‘भक्ती करण्यास पात्र’’ असा आहे. म्हणजे अशा एका महासत्तेचे अस्तित्व जे त्याच्या सर्वश्रेष्ठतेमुळे, वैभवामुळे व त्याच्या महाप्रकोपामुळे त्याची योग्यता व पात्रता अशी आहे की ज्याची उपासना केली जावी. त्याची उपासना करताना व त्याचे दास्यत्व पत्करताना मानवाने त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे. ती सत्ता अमर्याद शक्तिशाली असून तिची भव्यता समजून घेताना मानवी बुद्धी थक्क होऊन जाते, असा अर्थही ‘इलाह’ शब्दात अंतर्भूत आहे.
तसेच ‘इलाह’चा एक अर्थ असाही होतो की, ती सत्ता कोणावरही विसंबून व अवलंबून नाही व उलट सर्व चराचर सृष्टी आपल्या जीवनातील सर्व बाबतीत तिच्या दयाकृपेवर अवलंबून आहे व सहाय्यार्थ तिची करूणा भाकित असते. ‘इलाह’ या शब्दात ‘गूढता’ असाही अर्थ समाविष्ट असलेला आढळतो, म्हणजे जी शक्ती गूढ व रहस्यमय आहे तिला ‘इलाह’ म्हणतात. पर्शियन भाषेतील ‘खुदा’, हिंदी भाषेतील ‘देवता’, इंग्रजीतील ‘गॉड’ या शब्दांचे अर्थसुद्धा ‘इलाह’ शब्दाच्या अर्थाशी जुळणारे असेच आहेत. जगातील अन्य विविध भाषेमध्येही या अर्थाचे काही विशिष्ट शब्द आढळतात. (१) १) उदा - ग्रीकमध्ये ‘डेओस’ (Deo’s), लॅटिनमध्ये ‘डेऊस’ (Deus), गोथिक (Gothic) मध्ये ‘गुथ’ (Guth), डॅनिशमध्ये ‘गुड’ (Gud) जर्मनमध्ये ‘गाट’(Gott).) ‘अल्लाह’ हा शब्द वास्तवात ईश्वराचे व्यक्तीवाचक नाव आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह’ चा शाब्दिक अर्थ असा आहे की, कोणी दुसरा ‘इलाह’ (पूज्य) नाही शिवाय त्या विशेष सत्ताधीशाच्या ज्याचे नाव ‘अल्लाह’ आहे. ‘अल्लाह’ हा शब्द एका अशा अस्तित्वाचे नाव आहे की, जे एकमेव असून त्याचा कोणीही सहभागी नाही. ‘ला इलाहा इल्लल्लाह’ चे शब्दशः भाषांतर असे की ‘अल्लाह’च्या एकमेव व वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्वाखेरीज अन्य कोणीही ‘इलाह’ (ईश्वर) नाही. दुसऱ्या शब्दांत समस्त, ब्रह्मांडामध्ये ‘अल्लाह’खेरीज कसलेही असे अस्तित्व नाही जे उपासनेस पात्र असावे. ‘अल्लाह’खेरीज अन्य कोणीही अशी पात्रता धारण करणारा नाही की ज्याच्यासमोर उपासनेत दास्यत्वात व आज्ञापालनात, मानवाने नतमस्तक व्हावे. केवळ तोच एकमेव सत्ताधीश सर्व ब्रह्मांडाचा धनी व शासक आहे. सर्व चराचर सृष्टी त्याच्या कृपेवर विसंबून असून त्याचीच करूणा भाकण्यास व सहाय्याची याचना करण्यास विवश आहेत. तो ज्ञानेद्रिंयांच्या कार्यमर्यादेपलीकडे असून त्याचे अस्तित्व जाणून घेताना मती कुंठित होते इलाहा इल्लल्लाह’’ ची वास्तवता ‘ला इलाहा इल्लल्लाह’ चा केवळ शाब्दिक अर्थ आपण पाहिला. आता त्याची वास्तवता समजून घेण्याचा प्रयत्न करू या. आम्हास ज्ञात असलेला अतिप्राचीन मानवी इतिहास व अतिप्राचीन मानवी संस्कृतीचे अवशेष स्पष्टपणे दर्शवितात की मानव प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या शक्तीची उपासना व भक्ती करीत आला आहे. आजसुद्धा जगात जितके जाती-वंश आहेत मग ते अतिमागासलेले व रानटी असोत व अतिप्रगत असोत ते कशालातरी ईश्वर मानतात व त्याची उपासना करतात. यावरून हे स्पष्ट होते की, माणसाच्या स्वभावधर्मातच ईश्वरासंबंधीची कल्पना समाविष्ट आहे. मानवाच्या अंतःकरणात अशी कसलीतरी प्रेरणा उपजतच असते जी त्याला अगतिक व विवश बनविते की त्याने कोणालातरी ईश्वर मानून त्याची उपासना करावी. प्रश्न असा उद्भवतो की ती शक्ती व प्रेरणा काय आहे? तुम्ही स्वतःवर व समस्त मानवजातीच्या अवस्थेवर दृष्टीक्षेप टाकून या प्रश्नाचे उत्तर जाणू शकता. वास्तविकपणे मानव दास्यत्व घेऊनच जन्माला आला आहे आणि तो नैसर्गिकपणे लाचार व दुर्बल तसेच निर्धन आहे. ज्या अगणित वस्तू त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक आहेत त्या सर्व त्याच्या नियंत्रणाबाहेर आहेत. त्या वस्तू त्याला आपोआप प्राप्तही होत असतात व त्याच्याकडून त्या हिरावून घेतल्याही जातात. अनेक वस्तू मानवाला हितकारक आहेत. त्या सर्व वस्तू तो प्राप्त करू इच्छितो. काही वेळा त्या प्राप्त होतात तर कधी त्या मिळत नाहीत कारण त्या प्राप्त करणे बिलकुल त्याच्या आवाक्याबाहेर असते. अनेक वस्तू मानवाला हानिकारक असतात. त्याच्या उभ्या आयुष्याचे श्रम काही क्षणात ते नष्ट करून टाकतात. त्याच्या आकांक्षाना धुळीस मिळवून टाकतात, त्याला रोगराईत व मृत्यूशय्येवर आणून टाकतात. तो त्यांचे निवारण करू इच्छितो. निवारण कधी होते तर कधी होत नाही. त्यावरून त्याला कळून चुकते की या घटना घडणे व न घडणे, तसेच संकटाचे निवारण होणे अगर न होणे, हे त्याच्या नियंत्रणात व आवाक्यात नाही. अनेक वस्तू अशा आहेत की ज्यांचे वैभव, शान व भव्यता पाहून मानव प्रभावित होतो. तो पर्वत पाहतो, महासागर पाहतो, भयप्रद आक्राळविक्राळ प्राणी पाहतो. तसेच वादळे, महापूर व धरणीकंप पाहतो, काळेकुट्ट मेघ पाहतो. मेघगर्जना ऐकतो, विजांचा कडकडाट व लखलखाट तसेच मुसळधार पावसाचा वर्षाव पाहतो. चंद्र, सूर्य, तारे यांचे भ्रमण पाहतो. या सर्व गोष्टी किती भव्य किती शक्तिशाली व किती शानदार आहेत आणि त्यांच्या तुलनेत तो किती दुर्बल व क्षुल्लक आहे, याची त्याला अनुभूती होते. ही सर्व दृश्ये पाहून व आपली स्वतःची अगतिक व विवश अवस्था पाहून, त्याच्या मनात आपोआपच अगतिकतेची, दुर्बलतेची, लाचारीची व दास्यत्वाची भावना निर्माण होते. जेव्हा अशी भावना अंतःकरणात उत्पन्न होते तेव्हा ईश्वरासंबंधीची कल्पनाही आपोआपच अंकुरते. अपार शक्ती असलेल्या त्या महान अस्तित्वाचा तो विचार करतो. त्यांची भव्यता माणसाला त्यांच्या समोर नतमस्तक होण्यास व त्यांची उपासना करण्यास विवश करते. त्यांच्या सामर्थ्याची जाणीव माणसाला त्यांच्यासमोर लीन दीन करून सोडते. त्याला हितकर असणाऱ्या शक्तीची जाणीव, माणसाला त्यांची याचना करण्यास भाग पाडते. त्याचप्रमाणे हानिकारक शक्तींची जाणीव व त्यांचे भय बाळगून त्यांचा प्रकोप टाळण्यास त्याला विवश करते. अज्ञानी माणसाला ज्या वस्तू शक्तिशाली व वैभवशाली दिसतात अथवा हितकारक अगर हानिकारक वाटतात त्याच देव आहेत, अशी माणसाची समजूत असते. म्हणूनच तो पशूंची, नद्यांची, पर्वतांची त्याचप्रमाणे भूमीची, अग्नीची, पावसाची, वायूची व चंद्र, सूर्याची पूजा व उपासना करू लागतो.
हे अज्ञान जेव्हा थोडेसे कमी होत जाते व थोडासा ज्ञानरूपी प्रकाश पडू लागतो तेव्हा त्याला असे कळून चुकते की, या सर्व गोष्टीसुद्धा त्याच्या स्वतःप्रमाणेच परावलंबी, दुर्बल व लाचार आहेत. एखादा अजस्त्र प्राणीसुद्धा क्षुल्लक चिलटासारखा मृत्यू पावतो. मोठमोठ्या नद्या सुकून जातात, त्यांची पात्रे लहान मोठी होतात. पर्वतराजींना तोडून फोडून माणूसच भंग करतो. पीक कमी जास्त प्रमाणात येणे, हे खुद्द जमिनीच्या मर्जीवर असत नाही तर जेव्हा तिला पाण्याची साथ लाभत नाही तेव्हा ती सुकून जाते. पाऊससुद्धा स्वतंत्र नसून तो वाऱ्यावर विसंबून असतो, त्याचप्रमाणे हवासुद्धा स्वतंत्र नाही. ती हितकारक असणे वा हानिकारक असणे, हे अन्य काही बाबींवर अवलंबून असते. चंद्र, सूर्य ग्रह व तारेसुद्धा विशिष्ट नियमांच्या नियंत्रणाखाली असून त्या नियमांविरुद्ध ते किंचितही हालचाल करू शकत नाहीत. आता माणसाची जिज्ञासा व त्याचे लक्ष, गूढ व रहस्यमय शक्तीकडे वळते. त्याला असे वाटते की त्या सर्व दृश्य वस्तूंच्या मागे काही अदृश्य व गूढ शक्तीचे नियंत्रण आहे. त्याच शक्तीचा त्यांच्यावर शासन व अधिकार आहे. येथूनच माणसाची देव-देवतांबद्दलची श्रद्धा जन्म घेते. हवा, पाणी, प्रकाश, आरोग्य, रोगराई व विविध इतर गोष्टींचे वेगवेगळे देव मानले जातात आणि त्यांची काल्पनिक रूपे निर्माण करून त्यांची भक्ती व उपासना केली जाते.
त्यानंतर ज्ञानप्रकाश जेव्हा आणखी वाढतो तेव्हा एकूण सृष्टीव्यवस्था एका भक्कम नियमाखाली चाकोरीबद्ध रीतीने कार्यान्वित असलेली माणसाला दिसून येते. वाऱ्यांचा रोख, पावसाचे आगमन, ग्रहांचे भ्रमण, ऋतंचा क्रम या सर्वांच्या बाबतीत किती नियमबद्ध काटेकोरपणा असतो. अगणित शक्ती कशा एकमेकाबरोबर कार्य करीत असतात. ज्या कार्यासाठी जो काळ निश्चित केला गेला आहे नेमके त्याचवेळी ब्रह्मांडातील सर्व पंचमहाभूते एकत्र येऊन एकमेकांशी मिसळून कार्य करतात. सृष्टीक्रमातील विविध पंचमहाभूतांचे असे सहकार्य पाहून अनेकेश्वरवादी मनुष्य अशी श्रद्धा बाळगण्यास व मानण्यास विवश होतो की या सर्व लहान सहान देवांच्यावर एका सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे अधिपत्य आहे. तसे जर नसते व प्रत्येक देव स्वतंत्र व वेगळा असता तर ब्रह्मांडाच्या या कार्यशालेचे तीन तेरा वाजले असते. त्या सर्वश्रेष्ठ ईश्वराला तो ‘‘परमेश्वर’’, ‘‘अल्लाह’’, ‘‘देवाधिदेव’’ वगैरे नावाने संबोधितो. परंतु भक्ती व उपासना करताना तो या सर्वश्रेष्ठ परमेश्वराबरोबरच अन्य लहान देव-देवतांनाही सहभागी व समाविष्ठ करतो. त्याची अशी समजूत असते की ईशसत्ता (Divine Kingdom of God)सुद्धा जगातील राज्यसत्तेप्रमाणेच आहे. जगात जसे राजे त्यांचे प्रधानमंत्री व शासकीय अधिकारी असतात त्याचप्रमाणे ब्रह्मांडातही एक सर्वश्रेष्ठ परमेश्वर असून त्याच्या नियंत्रणाखाली अनेक लहानमोठे देव आहेत. जोपर्यंत छोट्या देवांची प्रसन्नता प्राप्त केली जात नाही तोपर्यंत परमेश्वरापर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही, असे त्याला वाटत असते. म्हणून त्यांची भक्ती व उपासना करावी, त्यांची करूणा भाकावी व याचना करावी. त्यांच्या कोपाचे भय बाळगावे, परमेश्वरापर्यंत पोहोचण्यास त्यांना माध्यम बनवावे, त्यांना नैवेद्य व देणग्या अर्पण करून प्रसन्न करून घ्यावे, असे त्याला वाटत असते. मानवी ज्ञानामध्ये जेव्हा आणखी अधिक भर पडली तेव्हा या देव-देवतांच्या संख्येत घट होऊ लागली. अज्ञानी मानवांनी काल्पनिक देव केलेले आहेत. त्यांतील प्रत्येकाबद्दल विचार-चिंतन केले असता ते देव असूच शकत नाहीत अशी जाण माणसाला होत जाते. आपल्याप्रमाणेच ते ईश्वराचे दास असून आपल्यापेक्षाही ते जास्त अगतिक व असहाय्य आहेत हे त्याला उमगते. अशा तऱ्हेने तो एक एक देव वगळत राहातो व सरतेशेवटी एकच एक ईश्वर उरतो. परंतु त्या एकमेव ईश्वरासंबंधीही बरेचसे अज्ञान त्याच्या कल्पनाविचारांत राहिलेले असते. काहींना असे वाटते की ईश्वराला मानवासारखा देह व आकार असून तो एका स्थानावर बसून आपली अधिसत्ता गाजवीत आहे. अन्य काहींची अशी समजूत आहे की, माणसासारखेच ईश्वराचीही बायकामुले असून माणसासारखीच त्याची वंशावळ आहे. इतर काही जणांचा असा समज असतो की ईश्वर माणसाचे रूप धारण करून पृथ्वीवर अवतरतो. काही लोक असे म्हणतात की ईश्वराने त्याच्या ब्रह्मांडाची निर्मिती करून व ते कार्यान्वित करून आता तो विश्रांती घेत आहे. काहींना असे वाटते की ईश्वराच्या दरबारात अन्य मातब्बर आत्म्यांचा व महापुरूषांचा वशिला असणे व त्यांच्याद्वारा शिफारस केली जाणे अगत्याचे आहे. काही लोक भक्तीसाठी ईश्वराचे एक रूप कल्पितात व तशी प्रतिकृती बनवून ती समोर ठेवणे आवश्यक मानतात. अशा रीतीने एकेश्वरत्वावर श्रद्धा बाळगूनसुद्धा अनेक प्रकारचे गैरसमज व अपसमज त्यांच्या मनात वसलेले असतात व त्यांच्यामुळेच तो अनेकेश्वरत्वात व सत्याचा इन्कार करण्यात गुरफटला जातो. हा सर्व अज्ञानाचाच परिणाम आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह’ चा दर्जा सर्वांत वरचा आहे. हे असे ज्ञान आहे जे खुद्द अल्लाहने आपल्या प्रेषितांद्वारा सर्व युगात माणसांना पोहोचविले आहे. हेच ज्ञान देऊन सर्वप्रथम मानव आदरणीय आदम (अ.) यांना पृथ्वीवर पाठविण्यात आले होते. आदरणीय आदम (अ.) यांच्या पश्चात हेच ज्ञान आदरणीय नूह (अ.), आदरणीय इब्राहीम (अ.), आदरणीय मूसा (अ.) व अन्य सर्व प्रेषितांना दिले गेले होते. सर्वांत शेवटी हेच ज्ञान प्राप्त करून प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले. हे शुद्ध ज्ञान असून त्यामध्ये अज्ञानाचा लवलेशही नाही. वर आम्ही अनेकेश्वरत्वाचे, मूर्तिपूजेचे व ‘कुफ्र’ च्या प्रकारांचे विवरण केले आहे. त्या सर्वामध्ये मानव याच कारणामुळे गुरफटला गेला की, त्याने प्रेषितांच्या शिकवणींना अमान्य करून स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर, अनुभव तसेच आपल्या ज्ञानावर तो विसंबून राहिला. ‘ला इलाहा इल्लल्लाह’ या इष्टवचनात किती अथांग वास्तवता वर्णिली गेली आहे, ते आता आपण पाहू या.
1. यामध्ये सर्वात अग्रेसर ईशत्वाची (Divinity) कल्पना आहे. हे अतिविशाल ब्रह्मांड ज्याच्या प्रारंभाविषयी, ज्याच्या विस्ताराविषयी व ज्याच्या भवितव्याविषयी विचार करून आपली बुद्धी शिणते. हे ब्रह्मांड अज्ञात-काळापासून अस्तित्वात आहे व ते अनभिज्ञ काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहे. त्यामध्ये अगणित चराचर वस्तू व जीव निर्माण झाले आहेत व निर्माण होत आहेत. त्यामध्ये अशा प्रकारचे विस्मयकारक व अद्भूत चमत्कार घडत आहेत ज्यांना पाहून माणसाची मति गुंग होते. जो स्वतः अमर्याद सत्ताधीश असेल केवळ तोच या विशाल ब्रह्मांडावर अधिपत्य करू शकतो. तो चिरकालपासून असलेला व चिरकालापर्यंत अस्तित्वात राहणारा असावा, तो कोणाचाही लाचार नसावा व तो निरक्षेप असावा. तो सर्वशक्तिमान जगनियंता असावा. सर्वज्ञानी व चातुर्यपूर्ण असावा. तो प्रत्येक वस्तूसंबंधी जाण व ज्ञान बाळगणारा असून कोणतीही गोष्ट त्याच्यापासून दडलेली नसावी. त्याचे सर्व चराचर सृष्टीवर प्रभुत्व असून कोणीही त्याच्याशी शिरजोरी करू शकणारा नसावा. तो अमर्याद शक्तीचा स्वामी असावा व सर्व चराचर सृष्टीला त्याच्याकडूनच जीवनपोषणाच्या सर्व वस्तू अव्याहतपणे पुरविल्या जाव्यात. कोणताही दोष, कसलीही उणीव व कमतरता व सर्व त्रुटींपासून तो निर्मळ असावा व त्याच्या कार्यात कोणाचाही हस्तक्षेप नसावा
2. ईशत्वाची वरील वर्णन केलेली वैशिष्ट्ये एकमेव शक्तीमध्येच एकवटलेली असणे अगत्याचे आहे. दोन भिन्न शक्ती व वैशिष्ट्ये समसमान धारण करीत असतील हे केवळ अशक्यप्राय आहे. याचे कारण असे की, सर्वांवर प्रभुत्व करणारी व प्रभावशालीपणे अधिपत्य करणारी तर एकच शक्ती असू शकते. या वैशिष्ट्यांची विभागणी होऊन तिचे अनेक देवदेवतांमध्ये वाटप व्हावे ही गोष्टसुद्धा अशक्य आहे. कारण जर शासनकर्ता एक असेल, ज्ञान व जाण धारण करणारा दुसरा असेल, अन्नदाता व पोषण करणारा आणखी वेगळा असेल तर प्रत्येक देव इतर देवांवर अवलंबून व विसंबून राहील. तसेच जर त्यांनी एकमेकांशी सहकार्य केले नाही तर एकाच क्षणी संपूर्ण सृष्टी नष्ट होईल. त्याचप्रमाणे या वैशिष्ठ्यांचे एकापासून दुसऱ्याकडे येणेसुद्धा शक्य नाही. कधी ती एका देवात आढळून येतील तर कधी दुसऱ्यात कारण असे की स्वतः चिरकाल राहण्याची क्षमता ज्या ईश्वरात नसेल तो सर्व ब्रह्मांडाला जीवन प्रदान करू शकत नाही. तसेच जो ईश्वर आपल्या ईशत्वाचे रक्षण करू शकत नाही तो इतक्या विशाल ब्रह्मांडावर अधिपत्य कसे करू शकणार? तात्पर्य, ज्ञानरूपी प्रकाश तुम्हाला जितक्या अधिक प्रमाणात प्राप्त होईल तितक्याच प्रमाणात तुमची खात्री अधिकाधिक दृढ होत जाईल की ही सर्व वैशिष्ठ्ये व गुणवत्ता एकाच शक्तीत सामावलेली व एकवटलेली असणे आवश्यक आहे.
ईशत्वाच्या स्वयंपूर्णतेची व यथार्थपणाची जाणीव नीट लक्षात ठेवून नंतर संपूर्ण विश्वावर दृष्टी टाका. जितक्या वस्तु तुम्ही पाहता व ज्ञानेंद्रियाद्वारा जितक्या गोष्टींची अनुभूती प्राप्त करता तसेच जितक्या वस्तु तुमच्या ज्ञानमर्यादेत
3. आहेत या सर्व वस्तूंपैकी एकसुद्धा अशा वैशिष्ट्यांनी व गुणवत्तेने युक्त नाही. चराचर सृष्टीतील प्रत्येक वस्तु परावलंबी, पराधीन व लाचार आहे. ती निर्माण होत असते व नष्ट होत असते. जगत असते व मरण पावते. कोणाही वस्तुची एकच शाश्वत स्थिरतेची अवस्था नसते. कोणालाही स्वेच्छेनुसार काहीही अघटित घडवून आणण्याची कुवत नसते. सर्वोच्च व सर्वंकश नियमाविरुद्ध किंचितही हालचाल करण्याचा वाव नाही. या वस्तूंची अवस्थाच अशी असते की, त्यापैकी कोणीही ईशत्व धारण करणारे नाही. कोणातही ईशत्वाची किंचित छटासुद्धा आढळत नाही. कोणाचाही ईशत्वामध्ये अगदी कणभरसुद्धा हस्तक्षेप नाही. ‘ला इलाह’ चा हाच अर्थ आहे.
4. ब्रह्मांडातील सर्व वस्तूमधून ईशत्व हिरावून घेतल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट मान्य करणे भाग पडते की, या सर्व वस्तूंव्यतिरिक्त एका सर्वोच्च शक्तीचे अस्तित्व आहे. तीच शक्ती ईशत्वाची सर्व वैशिष्ट्यें व गुणवत्ता बाळगते. त्या शक्तीखेरीज कोणीही ईश्वर नाही ‘इल्लल्लाह’ चा हाच अर्थ आहे.
हेच सत्य ज्ञान आहे. जितक्या प्रमाणात तुम्ही शोध घ्याल व प्रयत्न कराल तर तुम्हास हेच कळून येईल की ज्ञानाचा हाच आरंभ असून तेच ज्ञानाचे अंतिम टोक आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, जंतूशास्त्र, प्राणीशास्त्र, वंशशास्त्र इ. ब्रह्मांडातील गूढ सत्याचा शोध घेणाऱ्या विद्या व शास्त्रे आहेत, त्यापैकी कोणत्याही शास्त्राचे अध्ययन जितके खोलवर कराल तितक्याच जास्त प्रमाणात ‘ला इलाहा इल्लल्लाह’ ची वास्तवता व सत्य तुमच्यासमोर प्रकट होईल. त्यावरील तुमचा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाईल. ज्ञानप्राप्तीच्या व शास्त्रांच्या व्यासंग करण्याच्या क्षेत्रात तुम्हाला पावलोपावली अशी प्रचिती येत राहील की या सर्वांत मोठ्या सत्याचा इन्कार केल्याने ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तु अर्थहीन ठरते.

- स. हामिद अली
या जगात मनुष्याला विचार व आचार स्वातंत्र्य आहे. सत्कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांच्या मोबदल्यात स्वर्ग प्राप्ती होईल आणि कुकर्म करणाऱ्यांना नरक मिळेल. 
इस्लामच्या दृष्टीने हे जग परीक्षा स्थळ आहे आणि परलोक परिणाम स्थळ परलोक ध्यास मनुष्यात अल्लाहचे भय निर्माण करतो आणि ईशपरायण मनुष्य चारित्र्यवान बनतो. या उलट अल्लाहचे भय नसणाऱ्याच्या हृदयात दानवतेचा वास असतो. आज सर्वत्र दानवी प्रवृत्तीचे लोक मानवी मूल्यांना अत्यंत क्रूरतेने पायाखाली तुडवित आहेत. म्हणुन लोकांमध्ये परलोक ध्यास निर्माण करण्याची नितांत गरज या पुस्तिकेत सांगितली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 45              -पृष्ठे - 32                  मूल्य - 12            आवृत्ती - 2 (2008)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/3g6kwqao1ym0m15cgvwcxb72vmgiltsh



-  व्यंकटचलम अडियार
या पुस्तकात लेखकांचे विविध विषयांवरील लेखांचा संग्रह आहे. आणीबाणीच्या काळात दीड वर्ष नजरकैदेत असताना व्यंकटचलम अडियार यांनी इस्लामचा गाढा अभ्यास केला आणि सुटकेनंतर त्यांनी ``इस्लाम ज्यावर माझे प्रेम आहे'' शीर्षकाखाली निरंतर लेखमाला वर्तमानपत्रात सुरू केली.
``संपूर्ण जग निकट भविष्यकाळात प्रत्यक्षपणे अथवा परोक्षरूपाने इस्लामचा स्वीकार करील.'' हा अडियार यांचा दृढ विश्वास आहे.

आयएमपीटी अ.क्र. 44     -पृष्ठे - 64      मूल्य - 30            आवृत्ती - 4 (2013)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/wshgecj9wnq1jpvh3nh7ijptvperi2yw

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget