Latest Post

‘सवीक’च्या युद्धानंतर मक्का सरदार ‘अबू सुफियान’ची मुस्लिमांचा वचपा काढण्याची शपथदेखील वरवर पूर्ण होताना दिसत असली तरी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या हातून व्यापारी काफिल्याशी लढाई होऊन एक लाख दिरहमचे जे नुकसान झालेले होते आणि ‘बद्र’च्या युद्धात कैदी सोडविण्यासाठी जे अडीच लाख दिरहम मोजावे लागले होते, त्यामुळे मक्का शहरात प्रेषित मुहम्मद(स) आणि मुस्लिमांविरुद्ध संताप धुमसत होता. अबू सुफियानवर मदीनावर हल्ला करण्यासाठी सतत दबाव येत होता. त्यामुळे अबू सुफियानने मदीनावर हल्ला करण्याची घोषणा केली.
‘बद्र’च्या युद्धप्रसंगी सीरिया देशातून आणलेले-व्यापारी सामान आणि त्या व्यापारातून मिळालेला नफा हा मुस्लिमांविरुद्ध लढण्यात येणार्या युद्धासाठी सामरिक कोशात जमा होता. या शिवाय लोकांकडून भरपूर प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आली. या युद्धाच्या तयारीसाठी मक्कावासीयांनी एक हजार उंट केवळ युद्ध सामग्रीच्या दळणवळणासाठी तयार ठेवले होते. प्रचंड संपत्ती खर्च करून युद्धाची जय्यत तयारी करण्यात आली होती. तीन हजार सशस्त्र सैनिक जमविण्यात आले. ‘अम्र जोम्ही’ आणि ‘मुसाफिह’ या दोन कवीनी संपूर्ण मक्का शहराचा दौरा करून सर्वांना युद्धासाठी प्रेरित केले. मक्कातून लष्कर रवाना करतेवेळेस स्त्रियांनीसुद्धा सैनिकांचा स्वाभिमान जागृत केला. या सैन्याने ‘उहुद’ पर्वताजवळील ‘ऐनैम’ या ठिकाणी पडाव टाकला.
‘बद्र’च्या युद्धानंतर प्रेषितांचे काका माननीय अब्बास(र) यांनी इस्लाम स्वीकारला होता. आदरणीय प्रेषितांच्या आदेशाने ते मदीनाऐवजी मक्केतच राहिले. त्यांनी आपल्या इस्लाम स्वीकृतीस गुप्त ठेवले होते. ते मक्कातील इस्लामद्रोह्यांवर गुप्त पाळत ठेवून त्यांचे इस्लाम व प्रेषिताविरुद्धचे कटकारस्थान प्रेषितांना खबर्यामार्फत कळवीत. त्यांनी ‘अबू सुफियान’च्या सामरिक योजनेची खबर द्रुतगती खबर्यामार्फत प्रेषितांना कळविली.
खबर मिळताच आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय अनस(र)’ आणि ‘माननीय मुनिस(र)’ या दोघांना शत्रूसेनेचा तपास करण्यासाठी पाठविले. त्यांच्याकडून खबर मिळाली की, शत्रूचे सैन्य ‘मदीना’ राज्याच्या सीमेत दाखल झाले आणि आसपासच्या परीसरात गुराख्यांची हत्या करण्याचा सपाटा लावला. इकडे आदरणीय प्रेषितांनी आपल्या अनुयायांच्या सल्लामसलतीने सैन्य तयार करून आणि स्वतःही सामरिक पोषाख धारण करून ‘मदीना’ शहराबाहेर शत्रूंचा समाचार घेण्यासाठी बाहेर आले.
तो हिजरी सन ३ च्या ‘शब्वाल’ महिन्याचा सहा तारखेचा शुक्रवारचा दिवस होता. ‘माननीय इब्ने मक्तम(र)’ यांच्यावर ‘मदीना’ शहराची जवाबदारी सोपवून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एक हजार मुजाहिदीन (धर्मयोद्धे) ची फौज घेऊन मदीनाहून ‘उहुद’कडे कूच केले. वाटेतच ‘शौत’ या ठिकाणी पोहोचताच ‘इब्ने उबई’ हा तीनशे दांभिकांना घेऊन इस्लामी सैन्यातून वेगळा झाला. सैन्याची साथ सोडण्याचे एवढेच निमित्त सांगितले की, त्याचा सल्ला प्रेषितांनी मान्य केला नाही. ‘इब्ने उबै’ हा दांभिकांचा सरदारच होता. वरवरून इस्लाम स्वीकारण्याचे सोंग घेऊन छुप्यारीतीने इस्लामी आंदोलनात संकटे आणणेच त्यांचा हेतु असे. याकरिता ऐनवेळेवर त्याने तीनशे दांभिक सैन्यातून वेगळे केले. आता प्रेषितांसोबत केवळ सातशे सैनिकांचीच फौज शिल्लक राहिली. या सातशेजणांना घेऊन प्रेषितांनी या ठिकाणीच पडाव घातला.
उत्तरार्ध्या रात्री आदरणीय प्रेषितांनी सैन्य घेऊन ‘उहुद’च्या मैदानाच्या जवळ आपल्या सैन्यासह ‘फज्र’ची (सूर्योदयापूर्वीची) ‘नमाज’ अदा केली. ही जागा मदीना शहरापासून चार मैल अंतरावर होती. आदरणीय प्रेषितांनी योजनेनुसार ‘उहुद’ च्या पर्वतामागे ‘माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र)’ यांच्या नेतृत्वाखाली पन्नास धनुर्धारी सैनिकांची तुकडी नियुक्त केली. प्रेषितांना या तुकडीस आदेश दिला की, कोणत्याही परिस्थितीत हे स्थान सोडू नये.
आदरणीय प्रेषितांनी लष्कराचा झेंडा ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांना सोपविला. ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांनी इस्लाम स्वीकारण्यापूर्वी अतिशय श्रीमंतीत आणि वैभवसंपन्न परिस्थितीत जीवन व्यतीत केले होते. इस्लाम स्वीकारण्यामुळे त्यांना आपल्या सुखसंपत्तीचा त्याग करावा लागला होता. या युद्धामध्ये त्यांनी आपल्या जबरदस्त युद्ध कौशल्याचे प्रदर्शन केले. डाव्या बाजूला ‘माननीय जुबैर(र)’ आणि उजव्या बाजूला ‘माननीय मुंजिर(र)’ यांना सैन्याचे नेतृत्व सोपवून आपली तलवार ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांना प्रदान केली. ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांनी याच तलवारीने शत्रूंचा जबरदस्त समाचार घेतला.
इकडे इस्लामद्वेष्टे कुरैशजणांनी मक्कावरून तीन हजारांचे बलाढ्य लष्कर तयार केले होते. या लष्करात सातशे कवचधारी, दोन हजार घोडे आणि तीन हजार उंट आणि सोबत सैनिकांना युद्धप्रेरणा देण्यासाठी सरदारांच्या स्त्रियादेखील होत्या. या स्त्रिया योद्ध्यांना प्रेरित करण्यासाठी काव्य करीत सर्वप्रथम युद्ध मैदानात दाखल झाल्या. मग शत्रूफौजेतून ‘तलहा बिन अबी’ आपली तलवार उंचावत आणि मुकाबला करण्यासाठी आवाहन देत मैदानावर आला. त्याचा मुकाबला करण्यासाठी इस्लामी लष्करातून माननीय अली(र) पुढे आले. दोघांची लढत चांगलीच रंगली. माननीय अली(र) यांनी त्याचा फड्शा पाडला. माननीय हमजा(र) यांनी ‘उस्मान बिन अबी तलहा’ यास तलवारीच्या एकाच वारात यमसदनी धाडले. मग ‘मा. साअद बिन अबी वकास(र)’ यांनी बानाचा निशान साधून ‘अबी तलहा’ यास कंठस्नान घातले. त्यानंतर शत्रूकडून ‘मुसाफीह बिन तलहा’ मैदानात उतरला आणि ‘माननीय आसिम बिन साबित(र)’ यांनी त्याचा खातमा केला.
आता लढाईने जोर धरला ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांनी तलवार घेऊन शत्रूच्या फौजेत घुसून त्यांची दानादान उडविली. ‘माननीय हमजा(र)’ यांनी आपल्या तलवारीने ‘सिबाअ बिन अब्दुल उज्जा’ यास ठार करून तलवारीची तृष्णा भागविली.
‘वहशी बिन हर्ब’ हा ‘जुबैर बिन मुतईम’ चा दास होता. त्याच्या मालकाने (जुबैर बिन मुतईमने) त्याच्याशी करार केला होता की, ‘माननीय हमजा(र)’ यांची हत्या केल्यास तो त्यास स्वतंत्र करील. त्याने दगडाच्या आडोशात दडी मारून अचानक ‘माननीय हमजा(र)’ यांच्या पोटात भाला आरपार केला. ‘माननीय हमजा(र)’ धरतीवर कोसळले. ईश्वराचे स्मरण करीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लढाईने उग्र रुप धारण केले. मुस्लिमांच्या जोरदार हल्ल्यामुळे ईशद्रोही ‘कुरैश’ सैन्याची दानादान उडाली. मुस्लिम लष्कर विजयाकडे वाटचाल करीत होते. युद्ध जिकण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले. लढाई अजून संपलेली नव्हती. तरीसुद्धा इस्लामी लष्कर गनीमतची संपत्ती (युद्धातील शत्रुची संपत्ती) समेटू लागले.
धनाचा लोभ आणि अनुशासनाच्या बेपरवाईमुळे हातात आलेले यश मुस्लिमांच्या हातून निसटले. प्रेषितांनी नियुक्त केलेल्या ठिकाणाहून काही सैनिक आपली जागा सोडून गनीमतची संपत्ती समेटू लागले. याच ठिकाणी आदरणीय प्रेषितांनी सैनिकांना जागा न सोडण्याचा आदेश दिला होता. यावरून आदरणीय प्रेषितांच्या युद्धनेतृत्व कौशल्याची कल्पना येते. मुस्लिम लष्कराने जागा सोडताच शत्रूसैनिकांच्या एका सेनापती ‘खालिद बिन वलीद’ (यांनी नंतर इस्लामचा स्वीकार करून इस्लामी शासच्या सीमा विस्तारित केल्या.)यांनी इस्लामी लष्करावर मागून जोरदार हल्ला चढवून इस्लामी लष्कराच्या अकरा सैनिकांना शहीद केले. पाठीमागून झालेल्या अकस्मात हल्ल्यामुळे ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ या मुस्लिम सेनापतीचा बळी गेला. ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ हे दिसायला प्रेषितांसारखेच होते. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स) शहीद (हुतात्मे) झाल्याची अफवा उडाली. या अती भयानक अफवेमुळे मुस्लिम सैनिकांचा मानसिक समतोल ढासळला. त्यांना मित्र आणि शत्रूंतील फरक समजेनासे झाले. समोर येईल तो तलवारीचा बळी चढत गेला. त्यात मुस्लिम सैनिकांच्या तलवारीस मुस्लिम सैनिकच बळी पडले.
‘खालिद बिन वलीद’च्या अचानक जोरदार हल्ल्याने मुस्लिम सैन्य विचलित झाले असले तरीही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जागेवरून किचितही हल्ले नाहीत. प्रेषितांच्या रक्षणार्थ ‘माननीय जियाद बिन सकन(र)’ हे पाच सैनिकांसह शहीद (हुतात्मे) झाले. माननीय साद बिन वकास(र) यांचा एक भाऊ ‘उत्बा’ ईशद्रोही लष्कराकडून मुस्लिमांविरुद्ध लढत होता. त्याने प्रेषितांच्या चेहर्यावर दगडाचा वार केल्यामुळे प्रेषितांचा खालचा दात पडून चेहरा रक्तबंबाळ झाला. प्रेषितांना बर्याच गंभीर जखमा झाल्याने ‘माननीय अली(र)’ आणि ‘माननीय तलहा(र)’ यांनी त्यांना हात देऊन पर्वतावर चढविले. प्रेषितांच्या रक्षणार्थ ‘माननीय तलहा(र)’ यांची बोटेदेखील कापली गेली. त्यांच्या शरीरावर सत्तर जखमा झाल्या. कारण प्रेषितांवर होणारा प्रत्येक वार त्यांनी आपल्या शरीरावर झेलला.
अशा भयानक संकटसमयी सर्वप्रथम ‘माननीय काब बिन मालिक(र)’ यांनी प्रेषितांना जीवित असल्याचे ओळखून उंच पर्वतावर जाऊन सैरावैरा पळणार्या मुस्लिम सैनिकांना मोठ्याने साद घातली आणि प्रेषित मुहम्मद(स) जीवित असण्याची सूचना दिली. ही सूचना मिळताच मुस्लिम सैनिकांचे आत्मिक बळ वाढले आणि ते प्रेषितांभोवती जमा होऊ लागले. ‘माननीय काब बिन मालिक(र)’ यांची सूचना शत्रू लष्करानेसुद्धा ऐकली आणि मुस्लिम लष्करास प्रेषितांच्या नेतृत्वात परत गोळा होताना पाहताच त्यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरु केला. तेवढ्यातच ‘उबई बिन खल्फ’ हा घोड्यावर स्वार होऊन प्रेषितांवर चालून आला. प्रेषितांनी तत्काळ त्याच्या मानेवर भाल्याचा वार करून त्यास नरकाग्नीत पाठविले.
शत्रूसैनिकांनी इस्लामी लष्कराच्या मृत शरीरांची विटंबना केली. मृतांच्या नाका आणि कान कापले. ‘अबू सुफियान’ या शत्रूसरदाराची पत्नी ‘हिन्दा’ हिने तर ‘माननीय हमजा(र)’ यांचे काळीज कापून चावले. त्यांची हत्या करणार्या ‘वहशी’ यास आपल्या शरीरावरील सोन्याचे सर्व दागिने बक्षीस दिले. मुस्लिम लष्कराच्या मृत शरीराचे नाक कान कापून त्यांचा हार करून गळ्यात टाकला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपल्या सोबत्यांना घेऊन घाटीत पोहोचले. युद्ध सपले होते. माननीय अली(र) यांनी त्यांच्या चेहर्यावरील रक्त पाण्याने धुतले. मग प्रेषितांनी वुजू केला. (चेहरा व हात पाय धुतले) आणि बसल्याबसल्याच सर्वांसमवेत जुहर (दुपार) ची नमाज अदा केली.
शत्रूलष्कराने जेव्हा परत जाण्याचा विचार केला तेव्हा त्याचा सरदार ‘अबू सुफियान’ पर्वतावर चढून म्हणाला, ‘मुहम्मद(स) जीवित आहे काय?’ प्रेषितांनी सोबत्यांना उत्तर न देण्याची सूचना दिली. मग परत ओरडला ‘अबू बकर(र) जीवित आहे काय?’ मग परत ओरडला, ‘उमर(र) जीवित आहे काय?’ परंतु कोणतेही उत्तर न मिळाल्याने तो आसुरी आनंदाने आपल्या सैनिकांना उद्देशून म्हणाला, ‘सर्वजण ठार झाले. जिवंत असते तर उत्तर दिले असते.’ आता मात्र माननीय उमर(र) यांना राहावले नाही आणि प्रत्युत्तर दिले,
‘‘हे ईशद्रोह्या! ईश्वराची शपथ, तू खोटे बोललास. तू स्वतः साठी शोकसामग्री तयार करून ठेवली आहेस!!’’ मग परत ‘अबू सुफियान’ किचाळला,
‘‘हे ‘हुबल’ (देवतेचे नाव)! तुझा विजय असो!’’
‘‘ईश्वर सर्वांत महान आहे!’’ माननीय उमर(र) यांनी प्रेषितांच्या आदेशाने प्रत्युत्तर दिले.
‘‘उज्जा देवी’ आमची आहे, तुमची नव्हे!’’ अबू सुफियान
‘‘ईश्वर आमचा सहाय्यक आहे, तुमचा नाही!’’ माननीय उमर(र)
‘‘‘उहुद’चे युद्ध हे ‘बद्र’च्या युद्धाचा बदला आहे! आता तुमचा आमचा हिशोब बरोबर झाला!’’ अबू सुफियान
‘‘मुळीच नाही! आमचे सैनिक स्वर्गात गेले, तुमचे नरकाग्नीत!’’ माननीय उमर(र).
‘‘आता तुमचा आमचा सामना पुढील वर्षी ‘बद्र’च्या मैदानात होईल!’’ अबू सुफियान.
लढाई संपल्यावर आदरणीय प्रेषितांनी मृतांवर नजर टाकली. प्रेषितांनी आपले काका माननीय हमजा(र) यांचे मृत शरीर हुडकून काढले. आदरणीय प्रेषितांनी रडतरडत ईश्वराशी प्रार्थना केली, ‘‘हे हमजा(र)! तुमच्यावर ईश्वराची कृपा असो.’’ संपूर्ण हुतात्म्याचा तेथेच दफनविधी करण्यात आला.
‘उहुद’चे युद्ध मुस्लिमांसाठी दुःख, शोक आणि अरिष्टांचा दिवस ठरला. या युद्धात मोठमोठ्या दर्जाचे सोबती शहीद झाले. या युद्धात चाळीस मुस्लिम सैनिक शहीद झाले आणि शत्रुचे तीस सैनिक ठार झाले.
‘कुरैश’ ‘उहुद’च्या युद्धावरून परत जाताना ‘रौहाअ’ ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्या मनात एक विक्षिप्त विचार आला. त्यांना वाटले की, प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांचे सैनिक अतिशय गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे अशा जखमी अवस्थेत त्यांच्यावर हल्ला चढविल्यास नेहमीची खटखट एकदाच संपून जाईल. शत्रूच्या या कारस्थानाची खबर खबर्यामार्फत प्रेषितांना समजताच मदीना शहरात सर्वांनी युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश त्यांनी जारी केले. तत्काळ सर्वांना घेऊन ‘शव्वाल’ महिन्याच्या आठ तारखेस प्रेषित मुहम्मद(स) यांनी मदीनावरून कूच केले आणि आठ मैल दूर असलेल्या ‘हमराऊल असद’ या ठिकाणी सैन्यासह पडाव टाकला. परंतु ‘खुजाआ’ कबिल्याचा सरदार ‘माअबद खुजाई’ याने प्रेषितांच्या सामरिक योजनेची ‘अबू सुफयान’ ला खबर देताच त्याने आपल्या सैन्यासह तेथून पळ काढला.
प्रेषित मुहम्मद(स) ‘हमराऊल असद’ या ठिकाणी तीन दिवस वास्तव्यास होते. वातावरण निवळल्यावर प्रेषित मुहम्मद(स) आपल्या लष्करासह मदीना शहरी परत आले. या प्रसंगी प्रेषितांवर जीव ओतणार्या सोबत्यांची स्तुती करणारी कुरआनाची ही आयत अवतरली,
‘‘ज्यांनी जखमा झेलूनही ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांच्या आदेशाचे पालन केले, आणि जे लोक सदाचारी व पापभीरु आहेत, त्यांच्यासाठी (ईश्वराजवळ) मोठा मोबदला आहे.’’(संदर्भ : दिव्य कुरआन, ४:१७२

- सय्यद अबुल आला मौदूदी
या पॉकेट साईज् पुस्तिकेत मुस्लिम कोणास म्हणतात? याचे तपशीलवार वर्णन आले आहे. मुस्लिम होण्याकरिता कमीत कमी कोणत्या शर्थी व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मनुष्य खरा व योग्य मुस्लिम होण्यास पात्र ठरेल.
या पुस्तिकेत मुस्लिम, इस्लाम, कुफ्र इ.चे अर्थ समजावून दिले आणि मनुष्याच्या मार्गभ्रष्टतेचे तीन मार्ग विशद करण्यात आले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 81   -पृष्ठे - 12        मूल्य - 10            आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ypnlvusp6y99hy8w2ym2ibvff8i5cala

‘बद्र’च्या युद्धापासून ‘उहुद’च्या युद्धापर्यंत
या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या परिस्थितीचा संक्षिप्तपणे आढावा घेऊ या. परंतु यापूर्वी ‘ज्यू’जणांनी निर्माण केलेल्या एका अप्रिय स्थितीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यावरून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या आणि इस्लामी इतिहास समजण्यास मदत होईल.
तसे पाहता ‘ज्यू’ समाजात पूर्वी बरेच प्रेषित येऊन गेले. ‘ज्यूं’ च्या प्राचीन धर्मग्रंथात प्रेषितांचे आज्ञापालन आणि अवज्ञा करण्याची चांगली व वाईट फळे चाखण्याची बरीच उदाहरणे आहेत. ईश्वरी ग्रंथधारक आणि प्रेषितांचे अनुयायी असल्याचा त्यांना मान होता. त्यामुळे त्यांनी प्रेषित मुहम्मद(स) यांना अंतिम प्रेषित स्वीकारून सहकार्य करावयास हवे होते. परंतु ‘ज्यू’ जणांनी प्रेषित मुहम्मद(स) यांचा विरोध केला.
‘मक्का’तील कुरैश समुदायात दंभ किवा स्वश्रेष्ठत्वाची भावना होती. परंतु ‘ज्यूं’मध्ये प्रेषितांविरुद्ध द्वेष होता. द्वेषाची भावना ही नेहमी हीन भावनेचे स्वरुप धारण करीत असते. धार्मिक मंडळी जेव्हा खालच्या स्तरावर येतात तेव्हा या स्तराच्या खालच्या पातळीची मर्यादाच नसते.
एका उच्च दर्जाच्या ‘ज्यू’ विद्वानाची मानसिकता कशी आहे ते या एका छोट्याशा घटनेवरून लक्षात येते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची एक पत्नी माननीय सफया(र) या ‘हुय्या बिन अखतंब’ या ‘ज्यू’ विद्वानांची अतिशय लाडकी कन्या होती. एकदा ‘हुय्या बिन अख्तब’ आपल्या धाकट्या भावासह आपल्या कन्येस भेटण्यासाठी ‘कुबा’ या ठिकाणी आले. ते दोघे प्रेषितांना पाहून खूप चितातूर झाले. धाकट्या बंधुने ‘हुय्या बिन अखतब’ ला विचारले की, ‘‘आपल्या धर्मग्रंथात ज्या प्रेषितांची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे, ते हेच आहेत काय?’’ ‘हुय्या बिन अख्तब’ उत्तरला, ‘‘होय! ईश्वराची शपथ!’’
‘‘मग विचार काय आहे?’’ धाकट्या बंधुने विचारले, ‘हुय्या’ म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत मी या माणसाचा (प्रेषितांचा) वैरी व शत्रूच असेन.’’
या घटनेवरून स्पष्ट होते की, ‘ज्यू’ समाजाच्या धर्मग्रंथात प्रेषित मुहम्मद(स) यांच्या बाबतीत भविष्यवाणी करण्यात आली असून आणि धर्मपंडितांनी मुहम्मद(स) यांना प्रेषित असल्याचे ओळखले असूनसुद्धा केवळ हट्टापायी त्यांच्या प्रेषितत्वाचा स्वीकार न करण्याचे दुर्भाग्य ओढवून घेतले. हीच मानसिकता संपूर्ण ‘ज्यू’ समाजात होती.
आदरणीय प्रेषितांच्या उपदेशसभेत असताना उपहासात्मक शैलीत टर उडविण्याचा ‘ज्यू’ ना छंदच होता. बिनबुडाचे प्रश्न विचारून सभेतील उपदेशकार्यात बाधा आणायची, काहीजण मुस्लिम होण्याचे नाटक रचून प्रेषितांच्या अनुयायांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करून इस्लामी आंदोलनात बाधा आणण्याचे प्रयत्न करीत. याशिवाय प्रेषितांच्या गरीब अनुयायांना अगदीच अल्प मोबदला देऊन कष्टाची कामे करवून घेत. त्यांना कर्ज देऊन कर्जवसुलीच्या वेळी त्यांचा अपमान करीत. एकदा प्रेषितांचे एक अनुयायी माननीय हदरद यांनी एका ‘ज्यू’ सावकाराकडून कर्ज घेतले. कर्ज फेडण्याच्या निर्धारित वेळेवर त्यांच्याकडे शरीरावरील कपड्याशिवाय एक कवडीदेखील नव्हती. माननीय हदरद(र) यांनी कर्ज फेडण्याची मुदत वाढवून मागितली. परंतु ‘ज्यू’ सावकाराने मुदत वाढवून देण्याचे नाकारले. शेवटी हे प्रकरण प्रेषितांपर्यंत आले. प्रेषितांनी मुदतवाढीची विनंती करूनही ‘ज्यू’ सावकाराने मुदत वाढवून तर दिली नाही आणि माननीय हदरद(र) यांच्या अंगावरील वस्त्र काढून घेण्याचे दुर्दैवी कर्म केले.
अगदी नाजुक वेळेवर ‘ज्यू’ समाजाने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी केलेला सहकारकरार कित्येकदा मोडून इस्लामी आंदोलनास संकटात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी गद्दारी केली. कित्येक वेळा प्रेषितांना ठार करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. प्रेषितांच्या जेवणात विष कालवले. अशा प्रकारच्या अगदी हीन दर्जाच्या व अतिशय खालच्या पातळीच्या कुकर्मांच्या वातावरणातसुद्धा प्रेषितांनी न डगमगता ‘बद्र’ या पहिल्या युद्धापासून ते ‘मक्का’वर ऐतिहासिक विजय मिळविण्यापर्यंत इस्लामी आंदोलन मोठ्या यशस्वीपणे राबविले.
‘बद्र’ आणि नंतर होणार्या ‘उहुद’ या दोन पहिल्यावहिल्या युद्धांदरम्यान घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकू या.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जेव्हा ‘महीन’वरून ‘बद्र’ स्थळावर पोहोचले तेव्हा त्यांना सूचना मिळाली की, ‘सुलैम’ कबिला हल्ला करण्याच्या तयारीत आहे. प्रेषित मुहम्मद(स) रमजान महिन्याच्या २५ तारखेस ‘माऊल कद्र’ या स्थानावर पोहोचले, परंतु शत्रूचा थांगपत्ता लागला नसल्याने तेथून परत आले. ‘रमजान’ महिना संपण्यास दोन दिवसांचा अवधी असताना ‘सदकतुल फित्र’ (दान धर्म)आणि ‘ईद’ ची नमाज अदा करण्याचा ईश्वरी आदेश अवतरला. हिजरी सन दोनमध्ये जकात (कमाईचा चाळीसावा भाग जनकल्यानास्तव देणे) चा आदेश आला. हे कर्म ‘नमाज’नंतर अतिशय महत्त्वाचे आहे. याच काळामध्ये प्रेषितकन्या माननीय फातिमा(र) यांचा माननीय अली(र) यांच्याशी विवाह झाला.
ज्या वेळी प्रेषित मुहम्मद(स) ‘बद्र’च्या युद्धासाठी मदीनाबाहेर गेलेले होते, त्या वेळी ‘कैनुकाअ’ या ‘ज्यू’ परिवाराने मदीना शहरात उपद्रव माजविण्यास सुरुवात केली. ते मुस्लिमांना त्रास देऊ लागले. एक अनसारी महिला एका ‘ज्यू’ च्या दुकानापर्यंत सामान घेण्यासाठी गेली असता तिची छेड काढली. हे पाहताच एका मुस्लिमाने त्या उपद्रवी ‘ज्यू’ ला जागीच ठार केले आणि येथूनच मुस्लिम आणि ‘ज्यू’ चे चांगलेच बिनसले. आदरणीय प्रेषित युद्धावरून परत आल्यावर ‘कैनुकाअ’ परिवाराने आपल्या दुष्कृत्यावर खेद व्यक्त करण्याऐवजी प्रेषितांना सांगितले,
‘‘आम्हाला ‘कुरैश’ लोकांसारखे भ्याड समजू नका! युद्ध काय असते, ते आम्ही तुम्हास दाखवून देऊ!’’ या ठिकाणी ‘‘कैनुकाअ’ परिवाराने प्रेषितांशी केलेला ‘सहकारकरार’ भंग केला. प्रेषितांनीही या वेळी शव्वाल महिन्यात त्यांचा घेराव केला. पंधरा दिवसांच्या घेरावानंतर त्यांचा हेकेखोरपणा आणि उन्माद पार वितळून गेला आणि आपला पराभव स्वीकारून त्यांनी अभयदानाची भीक मागितली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना जीवदान देऊन शहराबाहेर काढले.
‘बद्र’च्या युद्धभूमीवर इस्लामद्रोही ‘कुरैश’जणांना मुस्लिमांकडून जो अपमानास्पद पराभव पत्करावा लागला, त्यामुळे मक्कावासीयांत मुस्लिमांविरुद्ध संतापाची तीव्र लाट आली. त्याचबरोबर बदल्याची तीव्र भावना व जळफळाटामुळे ते अक्षरशः फणफणत होते. या वेळी मक्कावासीयांचा सरदार हा ‘अबू सुफियान’ होता. (मक्केवर प्रेषितांनी विजय मिळविला तेव्हा अबू सुफियानने इस्लामचा स्वीकार करून इस्लामची खूप सेवा केली) म्हणून ‘बद्र’च्या युद्धात ठार झालेल्यांचा बदला घेण्याची त्याच्यावरच जवाबदारी होती. त्याने पूर्ण तयारीनिशी दोनशे सत्तर जणांची सशस्त्र टोळी घेऊन ‘जिल हज्जा’ महिन्याच्या पाच तारखेस मदीनावर चाल करून आला. मदीनापासून तीन मैल अंतरावर असलेल्या ‘अरीज’ नावाच्या वस्तीवर त्याने हल्ला चढवून आपला राग शमविण्याचा प्रयत्न केला. तेथे त्याने प्रेषितांचे खंदे समर्थक माननीय ‘साद बिन अम्र(र)’ यांना ठार केले. काही घरांना आग लावली. तेथील मुस्लिम चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार होण्याच्या आधीच त्याने तेथून पळ काढला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना घटनेची सूचना मिळताच सैनिकांची एक तुकडी घेऊन त्याचा पाठलाग केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेस ‘गजवा-ए-सवीक’ असे म्हणतात. प्रेषित मुहम्मद(स) जलहिज्जा महिन्याच्या नऊ तारखेस मदीना परत आले आणि दहा तारखेस ‘ईदुल अजहा’ (बकर ईद) ची नमाज अदा केली. तसेच दोन बोकडांची ‘कुरबानी’ (ईश्वराच्या नावावर बलिदान) देऊन संपूर्ण मुस्लिम समुदायास कुरबानीचा आदेश दिला. ही पहिली ‘बकरईद’ होय.
‘जिलहज्जा’चा महिना संपताच ‘इस्लामी राज्य मदीना’चे सर्वेसर्वा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना आपल्या खबर्यामार्फत सूचना मिळाली की, ‘सालबा’ आणि ‘नज्द’ कबिल्याच्या लोकांनी मदीना आणि सभोवतालच्या वस्तींमध्ये लुटमार करण्याची योजना आखली आहे. आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय उस्मान(र)’ यांना मदीनाची जवाबदारी सोपवून साडेचारशे मुजाहिदीन (धर्मयोद्धे) घेऊन ‘नज्द’कडे निघाले. प्रेषितांच्या या आक्रमक पवित्र्याची ‘नज्द’वासीयांना खबर मिळताच त्यांनी पळ काढून डोंगरदर्यांमध्ये आश्रय घेतला. शेवटी आदरणीय प्रेषित ‘सफर’चा संपूर्ण महिना प्रवासात व्यतीत करून मदीना शहरी परतले.
इस्लामी राज्याचा एक अतिशय कट्टर शत्रू ‘काब बिन अश्रफ’ होता. तो ‘ज्यू’ समाजाचा होता. तो ‘मदीना’ आल्यावर तेथील ‘ज्यू’ जणांना इस्लामविरुद्ध चिथावणी देत आणि मक्का शहरी जाऊन तेथील लोकांनादेखील मुस्लिमांविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करीत, अशा प्रकारे चिथावणीखोर दौरा आटोपून तो मदीना सीमेबाहेर मजबूत तटबंदी असलेल्या आपल्या किल्ल्यात दबा धरून बसायचा. त्याला जेव्हा ‘बद्र’च्या युद्धाचा परिणाम कळाला, तेव्हा मुस्लिमांच्या विजयामुळे त्याचा मुस्लिमद्वेष अनावर झाला. त्याने सरळ मक्का शहर गाठले. ठार झालेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना मुस्लिमांविरुद्ध भडकावले. शोकगीत तयार करून मक्कावासीयांच्या बदल्याच्या आगीत तेल ओतले. त्यांच्या भावना उत्तेजित केल्या. अशा प्रकारे संपूर्ण मक्का शहराला चिथावणी देऊन ‘मदीना’ शहरी आला. तेथे प्रेषित आणि इस्लामी आंदोलनाविरुद्ध चिथावणीखोर व मानहानीकारक काव्य रचून मोठे कुभांड रचले.
या शत्रूचा नायनाट आणि बिमोड करण्यासाठी ‘माननीय इब्ने मुसलमा(र)’ यांनी एक तुकडी घेऊन ‘काब बिन अश्रफ’ या उपद्रवी माणसास ‘रब्बिउल अव्वल’ महिन्याच्या चौदा तारखेस ठार केले. ‘ज्यू’ समाजास या घटनेची खबर मिळताच त्यांना घाम फुटला. त्यांनी घाबरून तत्काळ प्रेषितांची भेट घेतली. प्रेषितांनी त्यांच्याकडून इस्लामविरोधी कुभांड न रचण्याचे एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतले.
‘कुरैश’जण बद्रच्या पराभवाने इतके विचलित आणि भयभीत झालेले होते की, त्यांनी सीरियाचा व्यापारी मार्गच बदलला. मदीनाऐवजी ते ‘इराक’कडून सीरिया जाऊ लागले. ‘जुमादिल उखरा’च्या महिन्यात प्रेषित मुहम्मद(स) यांना या व्यापारी काफिल्याची खबर मिळाली आणि त्यांनी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या नेतृत्वाखाली शंभर सैनिकांची तुकडी रवाना केली. पहिल्याच हल्ल्यात काफिल्याचे सरदार आणि इतर जण पळून गेले. परंतु काफिल्याचा प्रमुख ‘फरात बिन हय्यान’ कैदी बनविण्यात आला. त्याने मदीना आल्यावर इस्लाम स्वीकारला. या काफिल्याकडून हस्तगत झालेली ‘गनीमत’ची संपत्ती जवळपास एक लाख दिरहम होती. तिचा एक पंचमांश भाग म्हणजेच वीस हजार दिरहम सरकारी खजिण्यात जमा करण्यात आला.
‘माननीय उमर फारुक(र)’ यांची कन्या ‘माननीय हफसा(र)’ या विधवा झाल्या होत्या. त्यांचे पती ‘बद्र’च्या युद्धात हुतात्मे झाले होते. माननीय उमर(र) यांना आपल्या विधवा कन्येची चिता होती. हिजरी सन तीनमध्ये ‘शाबान’च्या महिन्यात त्यांचा प्रेषितांशी विवाह झाला.
वरील घटनांवर दृष्टिक्षेप टाकल्यास आपल्याला कळून चुकते की, ईश्वराचे प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर ‘बद्र’च्या घटनेनंतरसुद्धा जवाबदार्यांचे किती मोठे ओझे होते. रक्षणात्मक गरजांसाठी त्यांना सतत प्रवास करावा लागला. या घटनांवरून हे स्पष्ट होते की, सत्य धर्माची सीमा उपासना आणि उपदेशापर्यंतच मर्यादित नव्हती. तसेच हेदेखील स्पष्ट होते की, ‘सत्यधर्म’ व्यवस्थेस ईशद्रोहावर आधारित व्यवस्थेवरील समाजावर लागू करून जनकल्यानाचे आंदोलन चालू ठेवणे काही पोरखेळ नव्हे. ही एक क्रांतिकारी चळवळ असून त्यासाठी प्रत्येक पावलावर त्याग आणि बलिदानाची गरज असते.

माननीय अबु हुरैरा (र.) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘माझ्या पालनकत्र्या ईश्वराने मला नऊ गोष्टींचा आदेश दिला आहे.
(१) दर्शनीय आणि अदर्शनीय - प्रत्येक स्थितीत ईश्वराचे भय बाळगणे.
(२) सत्य, रास्ती व समानतेवर टिवूâन रहावे, मग श्रीमंती असो वा गरीबी.
(३) कोणावर मेहरबानीच्या व संतापाच्या दोन्ही स्थितीत न्यायपूर्ण बोलावे.
(४) ज्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत, त्यांच्याशी संबंध जोडावेत.
(५) ज्यांनी मला वंचित केले त्यांना त्यांचा हक्क द्यावा.
(६) माझ्यावर अत्याचार करणाऱ्यास क्षमा करावी.
(७) माझे मौन राहणे विचार करण्यासाठी असावे.
(८) माझी दृष्टी बोध घेण्यासाठी असावी.
(९) माझ्या बोलचाल व चर्चेमधून ईश्वराचे महीमत्व स्मरण व्हावे.
यानंतर प्रेषितांनी सांगितले की, इस्लामचा प्रचार करणाऱ्यांच्या स्वभावात उपरोक्त गुणधर्म असावेत. क्षमा केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते
ह. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘सदका (दान) देण्याने संपत्तीचा ऱ्हास होत नाही. आणि एखादी व्यक्ती क्षमाशील असेल तर अल्लाह त्याच्या सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ करतो. आणि एखादी व्यक्ती केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी विनम्रता बाळगत असेल तर, ईश्वर अशा व्यक्तीस उच्चपदावर  पोहोचवितो. (हदीस : मुस्लीम शरीफ)

स्पष्टीकरण  
सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की, सदका (दान) दिल्याने, संपत्तीचा ऱ्हास होतो. संपत्ती कमी होते. त्याचप्रमाणे लोक असेही विचार करतात की आम्ही इतरांना क्षमा करण्याचे ठरविले आणि लोकांसमोर विनयशिलतेने वर्तुणूक ठेवली तर लोक यास आमची दुर्बलता आणि मजबूरी समझतील. विनम्रताबाबत लोकात असा गैरसमज आहे की हे आमच्या स्वाभिमान आणि प्रतिष्टेच्या विरूद्ध आहे. उपरोक्त हदीसमध्ये लोकांच्या गैरसमजुतीला आणि त्यांच्या कुशंकाला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्पष्ट करण्यात आले आहे की  सदका देण्याने संपत्तीमध्ये कमतरता येत नाही. वास्तविकता अशी आहे की सदका देवून भक्त, ईश्वराच्या कृतज्ञभक्तांमध्ये सामील होत असतो. ईश्वर आपल्या कृतज्ञभक्तास  आपल्याकडील अतिरिक्त अनुग्रहाने (कृपेने) सन्मानित करतो, असे ईश्वराचे वचन आहे. ‘‘जर तुम्ही माझे कृतज्ञ दास व्हाल, तर तुम्हांला मी अधीक देईन.’’ (कृपा करीन) तसेच  क्षमाशिल होण्यासाठी (हृदय) मनाचे मोठेपण, उदारपण होणे आवश्यक आहे. कोत्या मनाच्या माणसाच्या आवाक्यातील ही गोष्ट नव्हे. म्हणून या गैरसमजामध्ये राहू नका की,  क्षमाशिल आणि विनयशिल वृत्तीमूळे आपल्या सन्मानाला आघात पोहोचेल. क्षमा केल्याने प्रतिष्ठामध्ये कमीपणा येत नाही, तर त्यामध्ये वाढच होते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती  विनम्रता अंगीकारते तेव्हा ईश्वर त्याचा दर्जा उंचावत असतो. विनयशिलता ही मानवाच्या नैतीकतेच्या अस्तित्वाचे सौंदर्य आहे. सौंदर्य जिथे जिथे आढळेल, तिथे तो स्वत:चे महत्व  स्विकारण्यास भाग पाडेल. 

ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन



इस्लामने परमेश्वराच्या एकत्वाचा मांडलेला सिध्दांत हा केवळ आधिभौतीक स्वरुपाचा नसून, सामाजिक स्वरुपाचा देखील आहे. कारण हे सर्व विेईश्व आणि सृष्टी यांना एकत्रित ठेवणारे  सुत्र आहे आणि ते म्हणजे अल्लाह होय. हे जसे खरे आहे. तसेच सर्वसृष्टीचा निर्माता एकच आहे. तेंव्हा हा मानवी समाज देखील एकत्वाच्या आणि समानतेच्या धाग्याने जोडला गेला  आहे. हे इस्लामचे तत्व आहे. म्हणून सर्व मानवी समाज हा एकच असून कालांतराने माणसांमाणसात भेद निर्माण झाले. असा इस्लामचा सिध्दांत आहे. म्हणूनच कुरआनात म्हटले आहे की, ’’प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदायी होते. नंतर त्यांनी विविध श्रद्धा व पंथ बनविले. (सुरह युनूस आयत क्र. 19)’’ म्हणजे परमेश्वराच्या एकत्वाच्या आधारे इस्लाम मानवी  एकतेचाही विचार मांडतो आणि म्हणूनच इस्लामच्या परमेश्वरविषयक चिंतनात ज्ञात आणि अज्ञात अशा सर्वच प्रेषितांचा आणि सर्व जमातींना परमेश्वरांकडून केल्या गेलेल्या  मार्गदर्शनाचा विचार केला गेला आहे. म्हणूनच इस्लामचे प्रतिपादन आहे की, अल्लाह आणि त्याचे कुरआन यांचे स्वरुप प्रादेशिक नसून सर्वसमावेशक आहे म्हणून त्या अर्थाने माणसाला  परमेश्वरासंबंधीची होणारी जाणीव ही परमेश्वराच्या आणि या विेशाच्या एकत्वाची आणि अखंडत्वाची जाणीव आहे व ती जाणीव आद्य व सनातन आहे. इस्लामच्या मते परमेश्वराची ही  सारी किमया माणसाच्या लक्षात आल्यानंतर त्याला परमेश्वराचे गुणविशेष स्पष्ट होत जातात. म्हणून माणसाच्या मनात परमेश्वरासंबधी जागृत होणारी भावना केवळ भीतीयुक्त आदराची नसून त्याच्या परमदयाळुपणाची सुद्धा असते. म्हणून दयाळू व परमकृपाळू हे परमेश्वराचे गुणविशेष दिलेले आहेत. इस्लामच्या प्रतिपादनानुसार या विेशामध्ये जे-जे सत्, सुंदर  व चिरंतन आहे. ते अल्लाहच्या रहमतचे व्यक्त रुप आहे. म्हणूनच कुरआनात ठिकठिकाणी परमेश्वराच्या कृपाप्रसादाचे वर्णन येते.
त्याचबरोबर या कृपाळू ईेशराचे संदेश ग्रहण करण्याची क्षमता माणसाकडेच असल्याने विवेकी माणसाला ते कळू शकतात. म्हणूनच कुरआनात जागोजागी मनुष्याच्या बुध्दीला आवाहन  करण्यात आले आहे. किंबहुना देवदुत जिब्राईलकडून प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना दिला गेलेला संदेश ज्ञानप्राप्तीचा होता. विचार करण्याचाच होता. म्हणजे इस्लाममध्ये केवळ  परमेश्वरविषयक श्रध्देचे तत्व नाही तर परमेश्वराचे स्वरुप ज्ञानाच्या प्रकाशातून माणसाला कळते, हा इस्लामचा सिध्दांत आहे. ‘मी सांगतो त्यासाठी विेश्वास ठेव’ असे कुरआनात  म्हटलेले नाही. उलट असे म्हटले गेले आहे की, ‘ज्यांना स्वर्ग व पृथ्वी दिवस व रात्र यांच्यामधील खुणा ओळखता येतात. त्यांना ईश्वराची जाणीव होउ शकते.’ पुढे असेही म्हटले आहे  की, ‘ परमात्मा ज्याला इच्छिल त्याला या प्रकाशाचा मार्ग दाखवितो. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना परमेश्वर प्राप्तीचा झालेला दिव्य प्रवास हा प्रकाशाचा प्रवास होता, असे म्हटले आहे. अशाप्रकारे कुरआनातून मांडलेला इस्लाम पोथीनिष्ठ आणि अंधश्रध्दावादी नव्हता आणि नाही. कुरआनातून दैवी चमत्कार किंवा नियतीचे अटळ चक्र यांची मांडणी केलेली नाही. उलट  ज्ञान, श्रध्दा आणि व्यवहार यांची सांगड घालीत असताना प्रेषित (सल्ल.) यांनी बुध्दीवादी आणि वैज्ञानिक पध्दती स्विकारलेली दिसून येते. विज्ञानाचा इतिहास लिहित असताना  प्राध्यापक जॉर्ज सार्टोन व रॉबर्ट ब्रिफॉल्ट यांनी म्हटले आहे की, प्रेषित मुहम्मद (सल्ल) यांनीच प्रथम अनुभवसिध्द ज्ञान, बुध्दीवाद आणि मानवी प्रज्ञेचा स्विकार या वैज्ञानिक कसोट्या वापरात आणल्या. प्रेषित (सल्ल.) यांनी प्राप्त झालेल्या सुरुवातीच्या संदेशातून उदा. सुरतुल-अलक (96) मध्ये लेखणीद्वारे लिहिलेल्या पुस्तकातुन आणि विेश्वनिर्मात्याने जग कसे  निर्माण केले आहे. या प्रक्रियेचा विचार करुन ज्ञान प्राप्त करुन घ्या. असे म्हटले आहे. म्हणून कुरआनात जवळजवळ 300 आयातींमधून अल्लाहच्या कृपेची उदाहणे देत असताना प्रत्येक ठिकाणी अल्लाहने केलेले निसर्गनियम समजून घेण्याचा सिध्दांत मांडला आहे. 
माणसाने आपली बुध्दी आणि श्रध्दा यांच्या माध्यमातून निसर्गाचे अवलोकन करुन विेशाचे रहस्य समजून घ्यावे असे म्हटले आहे. म्हणूनच प्रेषित (सल्ल.) हे नेहमी अशी प्रार्थना  करीत असत की, ‘हे अल्लाह मला ज्ञानी कर.’’ म्हणून कुरआन शरीफमध्ये अल्लाहचा उल्लेख करीत असताना 750 वेळा ‘ज्ञान’ या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. या प्रक्रियेतून  इस्लामच्या तत्वज्ञानातील चौथे महत्त्वाचे सुत्र स्पष्ट होते. ते म्हणजे ज्ञानाचे सुत्र होय. इस्लामच्या तत्वमिमांसेत परमेश्वराचे एकत्व, अखंडत्व आणि अलौकीकत्व हे पहिले सुत्र आहे.  दुसरे सुत्र माणसाच्या सर्व श्रेष्ठत्वाचे व समतेचे आहे. तिसरे तत्व हे माणूस रुपातील प्रेषिताचे आहे. प्रेषित, मानव आणि परमेश्वर यांना जोडणे हे माध्यम आहे. परंतु इस्लाममधील साक्षात्काराची तत्व केवळ श्रध्देवर आणि व्यक्तीगत अनुभुतीवर आधारीत नाही, तर त्यामध्ये मानवी प्रज्ञेचा विकास व ज्ञानातून सत्य व परमेश्वरासंबंधी होणारी जाणीव अभिप्रेत आहे. आणि यासर्व तात्विक आणि वैचारिक मांडणीचा मुख्य आधार ज्ञान हाच आहे. इस्लाममधून येणारा हा ज्ञानविषयक सिध्दांत गुढ प्रमेयाच्या स्वरुपात येत नाही तर अनुभवसिध्द आणि  व्यवहारिक चिंतनाच्या स्वरुपात तो व्यक्त होतो. 
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास असे दिसून येते की, कुरआनमधून इस्लामने केलेली मांडणी अत्यंत आधुनिक स्वरुपाची आहे. त्यात कुठेही पोथीनिष्ठता किंवा शब्दप्रामाण्य नाही. परंतु  ‘क्रुसेड’ नंतरच्या काळात खिस्ती आणि मुस्लीम देशात टोकाचे राजकीय संघर्ष निर्माण झाले. तसेच औद्योगिक क्रांतीनंतर प्रबळ झालेल्या युरोपीयन राष्ट्रांच्या साम्राज्यवादी प्रवृत्तीमधून  इस्लामसंबंधी केले गेलेले लिखाण हेतुपुर्वक विपर्यास करणारे होते. त्यामूळे बहुसंख्य पाश्चात्य अभ्यासकांनी इस्लाम आणि त्याच्या कुरआनच्या तत्वज्ञानाचे विकृत स्वरूप सादर केल्याचे  दिसते. एडवर्ड सैद यांनी ‘ओरिएंटॅलिझम’ या पुस्तकातून पाश्चात्यांच्या अशा मनोभुमिकेचे विश्लेषण केले आहे. भारतात इस्लामसंबंधी केले जाणारे लिखाण हे पाश्चात्यांनी लिहिलेल्या  ग्रंथांवर किंवा पोथिनिष्ठ धर्मगुरुंनी लिहिलेल्या ग्रंथावर आधारीत असते. त्यामुळे इस्लाममधील मुळची तत्तमिमांसाच वाचकांसमोर येत नाही. 

- मरहूम प्रा. फकरूद्दीन बेन्नूर
(संक्षिप्त : सरफराज अहमद)

संदर्भग्रंथ -
1) तर्जुमानुल कुरआन - भाग पहिला - मौलाना आझाद
2) रिलिजन ऑफ इस्लाम - मौलाना मोहम्मद अली.
3) मुस्लीम वर्ल्ड - प्रा. ताराचंद रस्तोगी
4) ए हिस्ट्री ऑफ मुस्लीम फिलॉसॉफी - प्रा. एम.एम. शरीफ

इस्लामी राज्य ‘मदीना’चे प्रमुख आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे लष्करी तयारीबरोबरच परिस्थितीवर नजर ठेवून अनुमान लावीत होते की, कधी काय घडेल. प्रेषितांचा दृष्टिकोन गतीहीन नव्हता की, ते शत्रूच्या हल्ल्याची केवळ वाट पाहात बसतील आणि शत्रूने हल्ला केल्यावर त्याचे प्रत्युत्तर देतील. अगदीच प्रतिरक्षणात्मक दृष्टिकोनातून जरी विचार केला, तर हेच योग्य होईल की, शत्रूने म्याना बाहेर तलवार काढताच ती तलवार नष्ट करावी. युद्ध रोखण्यापेक्षा युद्धाची तयारीच रोखलेली बरी.
ज्या क्षणी आदरणीय प्रेषितांना कुरैशच्या त्या व्यापारी काफिल्याची खबर मिळाली, त्याच क्षणी त्यांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे या काफिल्याचा सरदार ‘अबू सुफियान’ याने गुपचुपपणे सीरियाच्या मार्गाने जाण्याऐवजी मदीनाच्या सामरिक परिस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय दक्षतेने एक एक पाऊल पुढे टाकू लागला. त्यास संकटाची चाहूल लागताच त्याने लष्कर पाचारण करण्यासाठी ‘मक्का’ शहराकडे दूत पिटाळला. दूताने मक्का शहरी जाऊन जनतेला कळकळीने विनंती केली की, ‘हे मक्कावासीयांनो! आपला व्यापारी काफिला मुहम्मद(स) यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी निघा.‘तीव्र भावूक मनोदशासह एक जबरदस्त सशस्त्र फौज हा हा म्हणता निघाली. ‘अबू लहब’ वगळता सर्वच मोठमोठे सरदार या फौजेत सहभागी होते. प्रेषितांना याची गुप्त सूचना मिळाली. निर्णयाची वेळ समोर होती. जर पुरेशी शक्ती असती तर व्यापारी काफिला आणि शत्रूचे लष्कर, दोघांना लक्ष्य बनवीता आले असते. परंतु दोन्हीपैकी एकालाच लक्ष्य करण्याचा निर्णय घेणे शक्य होते.
आदरणीय प्रेषितांनी ‘जफीरान’च्या घाटीमध्ये आपल्या सोबत्यांना सल्लामसलत करण्यासाठी बोलावले. बर्याचजणांनी काफिल्यावर हल्ला चढविण्याचा सल्ला दिला. माननीय अबू बकर(र), उमर(र), मिक्दाद(र) यांनी प्रेषितांना सांगितले की, आपण जे सांगाल आणि आपली ज्या दिशेला पावले पडतील तिकडे आम्हीसुद्धा आपल्याबरोबरच असू आणि अंतिम श्वासापर्यंत लढू. आम्हाला इस्त्राईलचे वंशज (‘ज्यू’ समाज) समजू नका की, ज्यांनी त्यांचे प्रेषित माननीय मूसा(अ) यांना सांगितले होते की, ‘‘तुम्ही आणि तुमचा ईश्वर मिळून शत्रूंशी लढा. आम्हाला काय देणेघेणे!’’ आदरणीय प्रेषितांनी परत एकदा या प्रकरणी लोकांचा सल्ला मागितला की, ‘या प्रसंगी आपण काय करावे?’ प्रेषित मुहम्मद(स) यांचा हेतु असा होता की, अनसार (मदीनातील प्रेषितांचे समर्थक) समुदायाची या प्रकरणी भूमिका काय आहे. कारण ‘अकबा’च्या ठिकाणी ज्या वेळी अनसार- समुदायाने प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेतली होती त्या वेळी त्यांनी अनसारकडून अशी प्रतिज्ञा घेतली होती की, मदीनावर हल्ला झाल्यास अनसार प्रेषित मुहम्मद(स) यांची साथ देतील. अर्थातच या प्रसंगी केवळ कुरैशच्या काफिल्यास रोखण्याची योजना होती. त्यामुळे अनसार समुदायावर या लष्करी कारवाईत सामील होणे अनिवार्य नसून केवळ ऐच्छिक होते. आदरणीय प्रेषितांना उत्तर देण्यासाठी अनसार समुदायाकडून माननीय साद बिन मुआज(र) उठले आणि म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! ज्याअर्थी आम्ही तुमच्या हातावर इस्लामची दीक्षा घेऊन प्रतिज्ञा केली की आमचे प्राण, संपत्ती आणि सर्वकाही आपल्या आदेशावर अर्पण करू, तेव्हा याचा प्रश्नच उद्भवत नाही की, या लष्करी कारवाईत आम्ही आपल्यासोबत असू की नसू. आपण जर आदेश दिला की, पर्वतावर चढून जीव द्या किवा समुद्रात बुडून जीव द्या तर आम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षणी तयार आहोत. कारण आम्ही आपल्यावर श्रद्धा बाळगली आहे. आपल्या प्रेषितत्वाच्या सत्यतेस मनापासून स्वीकारले आहे. ईश्वराची शपथ की, ज्याने आपणास प्रेषित म्हणून आमच्याकडे पाठविले आहे, आमचा एकही माणूस मागे सरकणार नाही. प्रत्येकजण युद्धभूमीवर आपले प्राण पणाला लावून लढेल आणि ईश्वर आमचे हे कर्म पाहून आपल्या नयनांना शीतलता प्रदान करेल.’’
अशा प्रकारे मुहाजिरीन (स्थलांतरित मक्कावासीय मुस्लिम) प्रमाणेच अनसारजणांनी सुद्धा आदरणीय प्रेषितांवरील आपल्या अमर्याद श्रद्धा आणि आपले सर्वस्व अर्पण करण्याचा पुरावा सादर केला आणि मुहाजिरीन व अनसारच्या पूर्ण सल्लामसलतीनंतर प्रेषितांनी लढाईचा निर्णय घेतला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) रमजान महिन्याच्या बारा तारखेस हिजरी सन दोनमध्ये मदीनाहून निघाले. ईश्वराकडून रमजान व रोजे (उपवास) आनिवार्य होण्याचे हे पहिलेच वर्ष होते. या युद्धात मुस्लिम सैनिकांची संख्या केवळ तीनशे तेरा होती. ‘सफरा’ या ठिकाणी प्रेषितांनी वीस अनुयायांना याकरिता पाठविले की, कुरैशच्या व्यापारी काफिल्याची संपूर्ण माहिती मिळवावी. त्यांच्यामार्फत प्रेषितांना खबर मिळाली की, कुरैश काफिला ‘बद्र’च्या पारंपरिक मार्गावरून न जाता समुद्रतटाच्या दीर्घ मार्गाने निघाला आणि दूरवर पोहोचला.
अर्थात हा काफिला प्रेषित व त्यांच्या अनुयायांच्या तावडीतून बाहेर निघून गेल्यावर काफिल्याचा सरदार ‘अबू सुफियान’ याला वाटले की, आता मात्र संकट टळले. त्यामुळे त्याने कुरैशच्या सामरिक सरदारांना मक्का शहरी परत जाण्याचा सल्ला दिला. परंतु इस्लामचा कट्टर द्रोही असलेला अबू जहलचा पारा खूप चढलेला होता. त्याने ‘अबू सुफियान’चा सल्ला धुडकावून लावला आणि ‘नखला’वरील झालेल्या झडपेत मुस्लिमांकडून ठार झालेल्या ‘हजरमी’चा भाऊ ‘अला बिन हजरमी’ यास आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यास्तव चिथावले या चिथावणीखोर सल्ल्यामुळे ‘अला बिन हजरमी’च्या भावना भडकल्या आणि ‘अबुजहल’शी सहमत होऊन ‘कुरैश’चे संपूर्ण लष्कर ‘बद्र’च्या किनार्यावर पोहोचले.
इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या जीवाभावाच्या सवंगड्यांच्या सल्लामसलतीतून पूर्ण विचाराअंती सामरिक योजना आखली. शत्रूंची संख्या आणि प्रमुख योद्ध्यांच्या बाबतीत गुप्त अहवाल मिळविला आणि मग आपल्या लष्करास उद्देशून म्हणाले,
‘‘मक्का शहराने त्याचे सुपुत्र तुमच्या समोर टाकले आहेत.’’
अर्थात या उपद्रवीजणांचा नाश करण्याची ही अगदी सुवर्णसंधी आहे. जवळपास एक हजाराच्या संख्येत शत्रूची फौज होती. त्यात सहाशे कवचधारी सैनिक आणि शंभर स्वार होते. सोबत मोठ्या संख्येत उंट होते. मोठ्या प्रमाणात हत्यारे होती. मुबलक प्रमाणात रसद आणि सैनिकांना खूश करण्यासाठी मदीरा व गीत गाणार्या व नाचणार्या सुंदर ललना होत्या.
दुसरीकडे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांची संख्या केवळ तीनशे तेरा होती. ईशधारणेने त्यांची मने ओतप्रोत वाहात होती. लढण्यासाठी मुबलक हत्यारे नसली तरी त्यांचे श्रद्धा, ईश्वर व प्रेषितांवरील धारणा, आंदोलनकारी प्रेरणा, संयम, ईशपरायणता, पवित्र चारित्र्य आणि संगठनकौशल्य हीच त्यांची सामरिक शक्ती होती. प्रेषितांनी तयार केलेल्या मुस्लिम फौजेसमोर केवळ एक लढाई जिकण्याचे उद्दिष्ट नसून ते इस्लामी आंदोलनास यशाच्या शिखरापर्यंत नेऊ इच्छित होते. त्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्य हे ‘बद्र’च्या युद्धावर अवलंबून होते.
तिकडे शत्रुपक्षसुद्धा याच युद्धाच्या माध्यमाने प्रेषितांच्या आंदोलनास कायमस्वरूपी चिरडण्याच्या तयारीत होते. इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी ईश्वरासमोर याचनास्वरुप प्रार्थना केली, ‘‘हे ईश्वरा, हे कुरैशजण आहेत! हे गर्व आणि दंभाच्या उन्मादात येथे आलेले आहेत. त्यांचा मूळ हेतूच हा आहे की, तुझ्या दासांनी तुझी उपासना बंद करावी. तुझ्या प्रेषिताचा इन्कार करावा, जेणेकरून त्यांना त्यांची अमानवी, अन्यायी व अत्याचारी व्यवस्था चालू ठेवणे शक्य व्हावे. लोकांनी ईश्वरास सोडून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे. त्यांनी तयार केलेल्या विभूतींची पूजा करावी. म्हणून हे यशदात्या ईश्वरा! तू मला मदतीचे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण कर!! तुझी मदत पाठव!!! तू जर या प्रसंगी मदत केली नाहीस तर तुझे नाव तुझ्या जगातून नष्ट होईल. हे लष्कर जर नष्ट झाले तर तुझे नाव घेणारा या पृथ्वीतलावर कोणी राहणार नाही!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ईश्वरासमोर केलेल्या प्रार्थनेबाबत ईश्वराकडून ईशबोध झाला की, ‘‘आपली प्रार्थना स्वीकारण्यात आली आहे. पुढच्या दिवशी म्हणजेच रमजान महिन्याच्या सतरा तारखेस दोन्ही फौजा समोरासमोर आल्या. प्रेषितांनी इस्लामी फौजेस पंक्तीबद्ध केले. युद्धाची सुरुवात आवाहनाने झाली. मुस्लिम सैन्याने एकूण बावीस जणांचे प्राण ईश्वराच्या नावे अर्पन करून शत्रूसैन्याच्या सत्तर जणांना कंठस्थान घातले. या युद्धामध्ये ‘शैबा’, ‘उत्बा’, ‘अबू जहल’, ‘आस बिन हिश्शाम’ ‘उमैया बिन खल्फ’ आणि ‘अबुल बख्तरी’सारखे दिग्गज आणि क्रूर ईशद्रोही ठार झाले. शिवाय शत्रू फौजेतील सत्तरजणांना बंदी बनविण्यात आले. ‘बद्र’च्या युद्धातील काही बाबीं लक्षणीय आहेत.
  1. ‘बद्र’ची लढाई ही या गोष्टीची साक्ष आहे की, सैन्याच्या संख्येत आणि शस्त्रांच्या संख्येत श्रद्धात्मक प्रेरणाशक्ती प्रदान करते. त्याचप्रमाणे सत्य आणि असत्याची लढाई दिव्य कुरआनची ही व्याख्या सत्य असल्याचे सिद्ध करते की, ‘‘विजय तर केवळ ईश्वरातर्फेच आहे!’’(संदर्भ : दिव्य कुरआन ८:१०, ३:१२६)
  2. ही घटना या गोष्टीची मार्गदर्शक आहे की, संख्या आणि शक्तीच्या अभावाच्या जाणिवा इस्लामी मोर्चावर प्रकट असूनही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘मक्का’वरून येणार्या दोन मुस्लिम तरुणांची सेवा यासाठी नाकारली की, रस्त्यात शत्रूंनी त्यांना कैद केले व या अटीवर सोडले की, प्रेषितांच्या समर्थनार्थ युद्धात सहभागी होणार नाही. आदरणीय प्रेषितांनी त्या दोघांना बजावले की, ‘‘तुम्ही जे वचन त्यांना (शत्रूंना का असेना) दिले आहे, त्याचे पालन करणे तुमचे कर्तव्य आहे. हीच होती ती नैतिक श्रेष्ठता. हीच नैतिक श्रेष्ठता मानवांपर्यंत पोहोचविण्याचा इस्लामचा उद्देश आहे.
  3. तसेच आदरणीय प्रेषितांनी शत्रूपक्षाच्या ठार झालेल्या सैनिकांच्या शवांचा अनादर केला नाही. उलट त्यांच्यासाठी एक मोठा खड्डा तयार करून सर्वांना एकत्रित दफन केले.
  4. युद्धामध्ये पराभूत शत्रूंची संपत्ती आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ईश्वरी आदेशानुसार सर्वांना वाटप केली.
  5. जगामध्ये पराभूत पक्षाच्या कैद झालेल्या सैनिकांवर अमानुष अत्याचार करण्यात येतात. पीडादायक कष्ट देण्यात येते. त्यांचे शील नष्ट करण्यात येते. परंतु या ठिकाणी परिस्थिती मात्र खूप उलट आहे. आदरणीय प्रेषितांनी लढाईत कैदी बनविलेल्या शत्रूंचा उत्तमरीत्या पाहुणाचार केला.त्यांच्याशी मानवतेस शोभणारे वर्तन केले. त्यांच्या शील व प्रतिष्ठा जोपासल्या. ‘मदीना’च्या बर्याच घरांमध्ये त्यांना ठेवण्यात आले. प्रेषितांनी मदीनावासीयांना ताकीद केली की, त्या कैद्यांना चांगले अन्न पुरवावे. त्यांच्याकडे वस्त्र नसल्यास त्यांना वस्त्रे द्यावीत. प्रेषितांच्या आदेशाच्या पालनास्तव काही अनुयायांनी स्वतःचे पोट मीठ-मिरची व खजुरींवर भागवून कैद्यांना चांगला आहार पुरविला. त्यांना वस्त्रे दिली. मस्जिद-ए-नबवीमध्ये जे कैदी ठेवण्यात आले होते, त्यांच्या कन्हन्याच्या आवाजामुळे प्रेषितांची झोप उडाली. प्रेषितांनी आदरपूर्वक त्यांची विचारपूस केली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावरच प्रेषितांना झोप मिळाली.
  6. कैद्यांच्या सुटकेसाठी प्रेषितांनी प्रत्येकी चार हजार दिरहम (तत्कालीन नाणी) दड लावला. काही श्रीमंत कैद्यांना यापेक्षाही जास्त दंड आकारण्यात आला. या दंडाची एकूण रक्कम अडीच ते तीन लाखांच्या घरात होती. एवढा दंड लावणे म्हणजे कुरैशजणांची सामरिक शक्ती विस्कळीत करणे होय.
  7. महत्त्वाची बाब अशी आहे की, ईश्वराचे उपासक असलेल्या मुस्लिम विजेत्यांनी पहिल्याच युद्धात एवढे जबरदस्त विजय संपादन करूनसुद्धा कोणत्याच प्रकारचा जल्लोष साजरा केला नाही, तर प्रेषितांनी घडविलेले हे मुजाहिदीन (धर्मयोद्धे) आपला आनंद ईश्वराच्या स्तुतीगानाने साजरा करीत होते. शिवाय असेदेखील घडले नाही की, मुस्लिमांना विजयाचा कैफ चढला आणि ते असे समजू लागले की, ‘‘आता आपणास एखादे खूप उंच स्थान प्राप्त झाले.’’ या बाबीविरुद्ध दिव्य कुरआनने त्यांना त्यांच्यातील त्रुटी स्पष्टपणे दाखवून दिल्या आणि त्यांत सुधारणा आणण्याचे आदेश दिले.
  8. अंतिम प्रकारचे सत्य हे आहे की, ईश्वराने ‘बद्र’च्या या दिवसास ‘फुरकान’चा दिवस घोषित केले. अर्थात या लढाईतून हे स्पष्ट झाले की, सत्य कोणते आणि असत्य कोणते आहे व कोणती शक्ती विकास पावणारी व कोणती शक्ती नष्ट होणारी आहे.

त्यानुसारच त्यांची उत्पत्ती व त्यांचा क्षय होत असतो. त्यानुसारच ते जगतात व मृत्यू पावतात. खुद्द मनुष्यप्राण्याच्या अवस्थेवर चिंतन केल्यास असे आढळून येते की तोसुद्धा निसर्गनियमांच्या अधीन आहे. जो नियम त्याच्या उत्पत्तीसाठी निहित केला गेला आहे, त्यानुसारच श्वासोच्छवास करतो, अन्नपाणी, उष्णता व प्रकाश ग्रहण करतो. त्याच्या हृदयाची हालचाल, त्याचे रक्ताभिसरण, त्याच्या स्नायू व पेशी, त्याचे हात, पाय, जीभ, डोळे, कान, नाक व त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग व अवयव त्याच्यासाठी निश्चित केलेले कार्य करीत आहे आणि ते कार्य तो त्याला ठरवून दिलेल्या पद्धतीनेच करीत आहे.
मोठमोठ्या ग्रहापासून ते पृथ्वीवरील अतिसूक्ष्म अणूरेणूपर्यंत सर्वांना बद्ध करणारा हा भक्कम व अटळ नियम एका महान शासकाने निर्माण केलेला आहे. सर्व ब्रह्मांड व त्यातील प्रत्येक वस्तू त्याच शासकाच्या अधीन आहेत, कारण त्याने निर्माण केलेल्या नियमांचे ते पालन करीत आहेत. या अर्थाने सर्व चराचर सृष्टीचा धर्म ‘इस्लाम’च होय. कारण आम्ही वर दर्शविल्याप्रमाणे अल्लाहला संपूर्ण आत्मसमर्पण, त्याची संपूर्ण शरणागती पत्करून त्याचे आज्ञापालन करणे, यालाच इस्लाम असे म्हणतात. चंद्र, सूर्य व तारे हे सर्व मुस्लिम आहेत, पृथ्वीही मुस्लिम आहे. वायू, पाणी व प्रकाशही मुस्लिमच आहेत. वृक्ष, पाषाण व जनावरेसुद्धा मुस्लिम आहेत आणि जो मनुष्य ईश्वराला जाणत नाही किंवा त्याचे अस्तित्व नाकारतो, जो अल्लाहखेरीज इतरांची उपासना करतो, जो अल्लाहशी इतरांना सहभागी करतो, तोसुद्धा आपल्या प्राकृतिक व स्वाभाविक नियमानुसार मुस्लिम आहे. याचे कारण असे की त्याचा जन्म, जिवंत राहणे-मरणे सर्वकाही ईश नियमाच्या अधीन आहेत. त्याच्या शरीरातील रोमरोमाचा धर्म इस्लामच आहे, कारण ते सर्व ईशनियमानुसार निर्माण होतात, विकास पावतात. कार्यशील असतात इतकेच नव्हे तर ज्या जिभेने अज्ञानापोटी तो शिर्क (अनेकेश्वरत्व) व कुफ्र (अधर्म) संबंधी आपल्या भावना व विचार प्रकट करतो, ती जीभदेखील वस्तुतः मुस्लिम आहे. त्याचे मस्तक जे अल्लाहखेरीज इतरापुढे तो जबरदस्तीने झुकवितो ते मस्तकसुद्धा उपजत मुस्लिम आहे. अज्ञानापोटी अल्लाहखेरीज इतरांचा आदर व प्रेम ज्या हृदयात तो बाळगतो ते हृदयही स्वभावतः मुस्लिम आहे कारण या सर्व वस्तू ईशआज्ञेचे पालन करीत असतात व त्यांची प्रत्येक हालचाल ईशनियमानुसार होत असते. आता एका दुसऱ्या पैलूतून पाहा.
मनुष्याचा एक दर्जा असा आहे की, सृष्टीतील अन्य वस्तूंप्रमाणेच तोही प्रकृतीच्या प्रबल नियमांत सर्वस्वी बद्ध असून त्या नियमांचे पालन करण्यास बांधिल आहे.
त्याचा दुसरा दर्जा असा आहे की त्याला बुद्धी असते, तो विचारशक्ती आकलनशक्ती व निर्णयशक्ती बाळगतो आणि आपल्या मर्जीनुसार एका गोष्टीला पसंत करतो तर दुसरी गोष्ट नाकारतो. एका पद्धतीला पसंत करतो तर दुसरीला नापसंत करतो. जीवनव्यवहारात आपल्या इच्छेनुसार स्वतःच नियम ठरवतो, किंवा इतरांनी ठरविलेल्या नियमांचा अंगीकार करतो. अशा अवस्थेमध्ये तो इतर वस्तूंप्रमाणे कोणत्याही निहित नियमांचे पालन करण्यास बद्ध केला गेलेला नाही. उलट त्याला आपल्या विचारांची, निर्णयाची व आचारांची मोकळीक दिली गेली आहे.
माणसाच्या जीवनात या दोन अवस्था वेगवेगळ्या आढळतात.
पहिल्या अवस्थेमध्ये तो सृष्टीतील अन्य वस्तूंप्रमाणे उपजत मुस्लिम आहे आणि मुस्लिम असण्यावर विवश आहे; हे नुकतेच आपण पाहिले आहे.
दुसऱ्या अवस्थेमध्ये मुस्लिम राहणे अगर न राहणे सर्वस्वी त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे आणि याच आधारावर माणसे दोन गटांत विभागली जातात.
एक मनुष्य असा आहे जो आपल्या निर्मात्याला ओळखतो, त्याला आपला स्वामी व धनी मानतो व त्याच्या जीवनातील ऐच्छिक कार्यातसुद्धा अल्लाहच्या नियमांचे पालन करतो, तो परिपूर्णतः मुस्लिम आहे. त्याचा इस्लाम पूर्णत्वास पोहोचला आहे कारण त्याचे संपूर्ण जीवन प्रत्यक्षपणे इस्लाम आहे. ज्याचे आज्ञापालन तो न समजता करीत होता, आता समजून उमजून तो त्याचा आज्ञाधारक बनला. आता तो स्वेच्छेने त्याच अल्लाहचा आज्ञाधारक आहे ज्याचा तो अनैच्छिकपणे आज्ञाधारक होता. आता त्याचे ज्ञान सत्य आहे कारण ज्या अल्लाहने विद्या संपादन करण्याची व ज्ञानार्जनाची क्षमता प्रदान केली, त्याला त्याने जाणले आहे. आता त्याची बुद्धी व त्याची निर्णयशक्ती उचित आहे कारण ज्या अल्लाहने त्याला विचाराची, निर्णयाची व आकलनाची क्षमता प्रदान केली, त्या अल्लाहचे आज्ञापालन करण्याचा त्याने विचारपूर्वक व स्वेच्छेने निर्णय घेतला. आता त्याची जीभ सत्यावर आहे कारण ज्या अल्लाहने तिला बोलण्याची क्षमता प्रदान केली, त्याचीच ती स्वीकृती देत आहे. आता त्याचे संपूर्ण जीवन हे केवळ सत्यमय आहे कारण ऐच्छिक तसेच अनैच्छिक या दोन्ही अवस्थेत तो अल्लाहच्या नियमांचे पालन करणारा आहे. आता संपूर्ण विश्वाशी तो एकरूप झाला आहे कारण संपूर्ण चराचर सृष्टी ज्याचे दास्यत्व करीत आहे त्याचीच तोही उपासना करीत आहे. आता तो पृथ्वीतलावर अल्लाहचा प्रतिनिधी (खलीफा) आहे. संपूर्ण विश्व त्याचे आहे व तो अल्लाहचा आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget