Latest Post

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
इस्लामी दृष्टिकोनानुसार समाजात कोणीही व्यक्ती अविवाहित राहू नये, विवाहामधे साधेपणा असायला हवे, प्रेषित ह़जरत मुहम्मद (स.) यांच्या वेळेस त्यांचे अतिप्रिय सोबती ह़जरत  अब्दुल रहमान विन औ़फ ऱिज यांनी आपला विवाह खूप साध्या पद्धतीने केला होता, या विवाहात त्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांनासुद्धा आमंत्रित केले नव्हते. मुहम्मद (स.) यांनी  स्वत: आपले आणि आपल्या मुलींचे लग्न खूपच साध्या पद्धतीने केले, असे विचार जमा़अत ए इस्लामी हिंद नागपूर पश्चिम महिला विभागाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी  मोहिमेअंतर्गत ‘निकाह आसान करो’च्या ‘ओपन डिस्कशन’मधे ज़ेबा खान यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम पश्चिम नागपूर स्थित वेलकम सोसायटीच्या इकरा ग्राउंड येथे आयोजित  करण्यात आलेला होता.
त्यांनी सांगितले की आज समाजात खूप वायफळ खर्च आणि रुढीपरंपरानी विवाह संपन्न केले जात आहेत. श्रीमंत लोक आपल्या मुलींच्या लग्नात खूप जास्त पैसा खर्च करतात. गरीब  लोक हे दृश्य पाहून अशा प्रकारचे लग्न करण्यास कर्ज घेऊन मुलींचे लग्न करतात. श्रीमंत लोकांनी आपल्या लग्न समारंभात साधेपणा आणायला पाहिजे जेणेकरून समाजात असे  उदाहरण तयार होईल की गरीब लोक कर्ज घेण्यापासून वाचतील.
विवाहच्या रितीरिवाज ‘विदअत’मधे सामील होतात आणि ‘विदअत’ हा भटकण्याचा मार्ग आहे. महिला विभागच्या शहर अध्यक्षा डॉ सबिहा हाशमी यांनी राज्यव्यापी ‘निकाह आसान  करो’च्या संबंधात राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या मोहीमबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की विवाहाच्या बाबतीत लोक चिंतीत आहेत आणि त्याच्या समाधानाचे प्रयत्न  करीत आहेत. पॅनल डिस्कशनमधे सरळसोप्या लग्नाची पद्धत समोर आली. यामध्ये स़िफया खान, इऱफाना कुलसुम, ज़ेबा खान, रोमा खान, साजिदा परवीन, सादिया खान व अस़िफया  इऱफान यांनी भाग घेतला. ज्यांनी शरियतनुसार साधारण विवाह केला होता त्यांचा सत्कार करण्यात आला. या सेशनमधे ४५ वर्षीय पीएचडी अस़िफया इऱफान यांनी आपल्या साध्या  विवाहाची महत्ता आणि सफलता यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात सानिया फ़ातेमा यांनी नात पठण केले. सूत्रसंचालन साजिदा परवीन व आभारप्रदर्शन सुमय्या शे़ख यांनी केले.  कुरआन पठण अ़जरा परवीन यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मुली उपस्थित होत्या.

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
वर्तमान लग्न समारंभात होणारे निरर्थक खर्च आणि हुंडा या चलनाने मुलीच्या नातलगांवर मानसिक आणि आर्थिक ओझे वाढले आहे. या कारणाने वैवाहिक संबंध अडचणीत येऊन  मुलीचे आईवडील जास्तच चिंता करण्यास विवश होतात. समाजात वाढत असलेल्या अशा कुरीतींविरुद्ध आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. विवाह अशा प्रकारे सोपा करायला पाहिजे  जसा प्रेषित मुहम्मद स.अ.व. च्या काळात होत होता, असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या शहर अध्यक्षा डॉ सबिहा हाशमी यांनी  अविष्कार कॉलनीतील संघटनेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. त्यांनी सांगितले की जो पैसा आम्ही लग्न  आणि हुंडा यावर खर्च करतो, त्याला मुलींचे शिक्षण  आणि त्यांचे भविष्य सुधारण्यास खर्च करायला हवा.
विवाहच्या नावावर आज मुस्लिम समाजामधे ज्या काही रीति परंपरा अवलंबिल्या जातात, त्या इस्लामी नाहीत. आम्हाला वायफळ खर्च न करता या पैशाला गरजू लोकांची मदत करण्यास उपयोग केला पाहिजे. त्यांनी सांगितले की विवाहासारखे पवित्र संबंध सोपे बनवून लग्न वेळेवर होऊ शकते, तरूण पिढीला रेप (सर्व प्रकारचे लैंगिक शोषण) सारख्या  पापांपासून स्वत:ला वाचवू शकतो.
त्यांनी सांगितले की जमा़अत ए इस्लामी हिंद समाजातून अशा प्रकारची दुष्कृत्ये संपविण्यासाठी प्रयत्न करत असते. ज़ेबा ख़ान यांनी प्रश्नांची योग्य व समाधानकारक उत्तरे दिली.  सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या प्रतिभावंतांमध्ये अ़फरो़ज अंजुम, फ़िरदौस खान, तुबा समरीन यांना बक्षीस देण्यात आले.
चिल्ड्रन सर्कलच्या बालकांनी 'शरई निकाह'वर नाटक प्रस्तुत केले.
‘तुटत असणारे नाते, विखुरलेले कुटुंब, त्याचे कारण आणि समाधान’ यावर पीपीटीद्वारे ‘प्री मॅरेज काउन्सिलिंग वर्कशॉप’मध्ये ओसीडब्लूच्या सीनियर मॅनेजर फ़रहत क़ुरैशी यांनी  विवाहाच्या सफलतेचे रहस्य सांगितले. त्यांनी सांगितले की अनेक कामे, जबाबदारीचे ओझे, राग, बॉडी लँग्वेज, फिल्मी स्टाईलचे अनुकरण, आपसातील मतभेद अशा साध्या गोष्टीची  तक्रार वैवाहिक जीवनावर संकटे उभी करतात. इस्लामी शिक्षणाच्या अनुपालनासोबत परस्पर वार्तालाप, ऐकणे -समजण्याची योग्य क्षमता ठेवून कुठल्याही वैवाहिक समस्येचे समाधान  निघू शकते. वैवाहिक जीवनाच्या सफलतेकरिता नातलग लोकांनी सकारात्मक विचारांना प्रोत्साहित करावे. यानंतर इ़र्फाना कुलसुम यांनी सुखी परिवारच्या इस्लामी व्हॅल्यूवर प्रकाश टाकला.
हा कार्यक्रम जा़फरनगरच्या मर्क़जे इस्लामी सभागृहामधे आयोजित करण्यात आला होता. याची प्रस्तावना बुशरा जावेद यांनी केली. कार्यक्रमाच्या समाप्तीवर ओसीडब्ल्यू आणि  महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या हितार्थ येणाऱ्या उन्हाळ्यात आम्हाला पाण्याचा एक-एक थेंब वाचविला पाहिजे, याबाबत उपस्थितांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमात कुरआन  पठण राहिल परवीन, आयशा कुरैशी यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ़िरदौस अंजुम, सुमैया शे़ख यांनी केले.

माननिय अब्दुल्लाह इब्ने अब्बास (रजी.) कथन करतात की, इस्लामचे अंतीम प्रेषित हजरत मुहम्दम (स.) यांनी सांगितले आहे की,  ‘‘जेव्हा एखाद्या समाज वा वस्तीमध्ये व्यभिचार आणि व्याजखोरी स्पष्टपणे व उघडरित्या बळावते, तेव्हा असे समजावे की लोकांनी  स्वत:ला ईश्वराच्या कोपास जाहिरपणे आमंत्रित केले. (हाकीम; तरगीब व तरहीब)
व्याज खाणाऱ्याची निर्भत्सना
माननिय अब्दुल्ला बिन मसअुद (रजी.) द्वारे उल्लेखित आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी निर्भत्सना केली व्याज खाणाऱ्याची,  व्याज खाऊ घालणाऱ्याची, त्याच्या दोन्ही साथीदारांची आणि व्याज लिहिणाऱ्याची. (बुखारी, मुस्लीम) भावार्थ- प्रेषित ह. मुहम्मद (स.)  ज्या गोष्टीमुळे धिक्कार करतात, तो अपराध किती मोठा अपराध असेल, याचा अर्थ असा होतो की, कयामतच्या (प्रलय काळी)  प्रेषित (स.) अशा लोकांकरीता (जर ते तौबा, क्षमा-याचना) न करता मरतील, अल्लाहजवळ शिफारस नव्हे तर त्यांचा धि:कार  करतील.(निसई)

कर्जदारांस संधी द्या
व्याजाची निषिद्धता व त्याबद्दलची कायदेशीर मनाई
ह. मुहम्मद (स.) यांनी आपल्या शेवटच्या हजप्रसंगी अत्यंत कडक शब्दात स्पष्ट केली आहे. ‘‘अज्ञान काळातील व्याज रद्द केले गेले आहे. सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबियातील अब्बास इब्ने अब्दुल मुत्तलिब यांचे व्याज पूर्णपणे रद्द करीत आहे. (मुस्लिम : किताबुल हज)

कर्जदारांशी नरमीचा व्यवहार
प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, एक मनुष्य लोकांना कर्ज देत असे, नंतर आपल्या कारकुनास कर्जवसूली करण्यास पाठवित असे. आणि त्याला ताकीद देत असे की, जर  तू एखाद्या तंगीत असलेल्या कर्जदाराजवळ पोहोचशील तर त्याला माफ कर. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘हा मनुष्य जेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहशी भेटला, तेव्हा अल्लाहने  त्याच्याशी माफीचा व्यवहार केला. माननीय अबु. कतादा (रजी.) कथन करतात की, ‘‘मी आदरणीय प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले की, ‘‘ज्या माणसाला वाटत  असेल की, कयामतच्या (प्रलय काळाच्या) दिवशी, शोक, दु:ख आणि पश्चात्तापापासून त्यास मुक्ती मिळावी, तर त्याने गरीब कर्जदारास सवलत द्यावी किंवा माफ करावे.’’ (मुस्लिम)

सात ‘महापाप’
मा. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, सात महापापापासून स्वत:ला वाचवा. ही सात महापाप -
१) कोणालाही ईश्वराचा भागीदार ठरविणे,
२) जादू करणे,
३) कोणाला हकनाक ठार मारणे.
४) व्याज खाणे,
५) अनाथांची संपत्ती हडपणे
६) जिहादच्या वेळी पळ काढणे आणि
७) शीलवंत स्त्रियांवर व्यभिचाराचे आळ घेणे.
(बुखारी, मुस्लिम)

  • एका अल्लाह वर ईमान (श्रद्धा) 
  • इस्लामच्या प्रमुख संदेशपैकी महत्त्वाचे संदेश म्हणजे एका अल्लाह वर ईमान (श्रद्धा) आणणे हे आहे. फक्त अल्लाह आहे व तो एक आहे या गोष्टीवरच नव्हे तर तर तो एकटा या सृष्टीचा निर्माता, स्वामी, शासक व व्यवस्थापक आहे या वस्तुस्थितीवर देखील ईमान आणणे आवश्यक आहे. त्याच्याचमुळे ही सृष्टी अस्तित्वात आहे. आणि सृष्टीमधील प्रत्येक वस्तू अस्तित्वात ठेवण्यासाठी या उपजीविकेची (Subsistence) वा शक्तीची (Energy) आवश्यकता आहे ती उपलब्ध करून देणारा अल्लाह आहे. सार्वभौमत्वाचे सर्व गुण फक्त त्याच्याच ठायी आहेत आणि याबाबतीत दुसरा कोणीही त्याचा थोडा सुद्धा भागीदार नाही. ईशत्वाच्या सर्व गुणांनी फक्त तोच संपन्न आहे. आणि त्यापैकी कोणताही गुण इतरांजवळ नाही. साऱ्या सृष्टीला आणि त्यामधील प्रत्येक वस्तूला तो एका दृष्टिक्षेपात पाहतो, प्रत्यक्ष जाणतो. न केवळ वर्तमान परंतु त्याच्या भूत भविष्यालाही! अशी ही दृष्टी व ज्ञान त्याच्याशिवाय इतर कोणास नाही. तो सदैव आहे व राहील. त्याच्या शिवाय इतर सर्व काही नाशवंत आहे. तो स्वतःहून जिवंत व अस्तित्वात आहे. न तो कोणाची संतती आहे, न त्याला संतती आहे. त्याच्याशिवाय या जगात जे काही आहे ते त्याची निर्मिती आहे आणि जगामध्ये सृष्टीच्या पालनकर्त्यासमान किवा त्याचा पुत्र वा कन्या म्हणता येईल अशा दर्जाचा कोणी नाही. तोच लोकांचा उपास्य आहे. उपासनेत त्याच्याबरोबर दुसऱ्या कोणास सहभागी करणे हा सर्वात मोठा गुन्हा व सर्वात मोठा द्रोह आहे. तोच प्रार्थना याचना ऐकणारा आहे. त्याचा स्वीकार करणे वा न करणे हे त्याच्याच हाती आहे. त्याची प्रार्थना न करणे हा अनाठायी गर्व आहे आणि त्याच्याशिवाय इतरांसमोर हात पसरणे अज्ञान आहे. त्याच्याबरोबर इतरांचीही प्रार्थना करणे म्हणजे ईशत्वामध्ये त्याच्याबरोबर इतरांनाही सहभागी ठरविणे होय.

इस्लामच्या अल्लाह संबंधीच्या या दृष्टिकोनामुळे काही गोष्टी स्वाभाविकपणे अपरिहार्य होतात.
  • फक्त एकटा ईश्वरच मानवाचा खरा उपास्य आहे. भक्ती व आज्ञापालन फक्त एकट्या ईश्वराचेच होऊ शकते. मानवाने भक्ती व आज्ञापालन करावे अशी योग्यता त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची नाही.
  • फक्त तोच एकटा सृष्टीतील सर्व शक्तींचा अधिपती आहे आणि माणसाचे मागणे पुरे करणे त्याच्याच अधिकारात आहे. माणसाने फक्त त्याच्याजवळ याचना केली पाहिजे आणि त्याच्याशिवाय इतर कोणाजवळ याचना केली जाऊ शकते हा विचार देखील केला जाऊ नये.
  • तोच एकटा माणसाच्या भाग्याचा स्वामी आहे. माणसाचे भाग्य चांगले वा वाईट करण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्येही नाही. माणसाचे आशास्थान तोच आहे व त्याचेच भय बाळगले पाहिजे. त्याच्या शिवाय इतर कोणाकडूनही आशा-अपेक्षा करू नये व त्याच्याशिवाय इतर कोणाचे भय बाळगू नये.
  • तोच एकटा माणसाचा व जगाचा निर्माता व स्वामी आहे. माणसाची व साऱ्या जगाची वास्तविकता याचे प्रत्यक्ष व संपूर्ण ज्ञान फक्त त्यालाच आहे. फक्त तोच जीवनाच्या गुंता-गुंतीच्या व्यवहारात माणसाचे योग्य मार्गदर्शन करू शकतो व योग्य आचार संहिता देऊ शकतो.
  • माणसाचा निर्माता व स्वामी ईश्वर आहे आणि तोच या जमिनीचाही, ज्यावर माणूस वसतो, स्वामी आहे, म्हणून माणसावर इतर कोणाची व त्याची स्वतःची सत्ता असणे हा उघड उघड ईशद्रोह आहे. त्याचप्रमाणे माणसाने स्वतः कायदे करणे किवा दुसऱ्या व्यक्तीच्या अगर संस्थेच्या कायदे करण्याच्या अधिकारास मान्य करणे हाही द्रोह आहे.
  • सर्वश्रेष्ठ सत्तेचा खरा स्वामी अल्लाह असल्याने त्याचा कायदा हा वस्तुतः सर्वश्रेष्ठ कायदा आहे. अल्लाहने दिलेल्या परवानगीनुसार सर्वश्रेष्ठ कायद्याच्या आधीन राहून व त्या अनुषंगाने कायदे करण्याचा अधिकार माणसास आहे.
  • प्रेषितत्व
प्रेषित म्हणजे ती व्यक्ती जिच्यामार्फत ईश्वर आपला कायदा लोकांना देतो, हा कायदा आम्हाला प्रेषितांच्याकडून दोन प्रकारे प्राप्त होतो. एक, अल्लाहची वाणी जी प्रेषितांवर अवतरित होत असते, ती म्हणजे पवित्र कुरआन. दुसरी, प्रेषितांनी आपल्या अनुयायींना ईश्वराच्या मार्गदर्शनासाठी आपल्या उक्ती, कृती व आदेशाने दिलेली शिकवण. ती म्हणजे सुन्नत (प्रेषितांची आचरण पद्धती)
प्रेषितांवरील श्रद्धेचे महत्व हे आहे की ही श्रद्धा नसेल तर ईश्वरावरील ईमान हा निव्वळ एक तात्विक विचार बनतो. ईशभक्तीच्या श्रद्धेला एक संस्कृती, एक सभ्यता आणि एक जीवन पद्धतीचे स्वरूप देण्याचे काम प्रेषितांचे वैचारिक व व्यावहारिक मार्गदर्शन करीत असते. त्याच्याद्वारे आम्हाला कायदा प्राप्त होतो आणि या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून एकेश्वरवादानंतर (तौहीद) प्रेषितत्वावर ईमान (श्रद्धा) आणल्याखेरीज कोणीही प्रत्यक्षात श्रद्धावंत होऊ शकत नाही.
  • ‘आखिरत’ (परलोक)
इस्लामचे तिसरे संदेश ‘आखिरत’ (परलोक) हे असून याचे महत्व हे आहे की याचा इन्कार करणारा नास्तिक बनतो आणि ईश्वर, प्रेषित आणि पवित्र कुरआन यांना मानणे देखील त्याला नास्तिकतेपासून वाचवू शकत नाहीत. ‘आखिरत’ वरील ईमान खालील सहा घटकांवर आधारलेले आहे. जगामध्ये माणसाला बेजबाबदार बनवून सोडून देण्यात आलेले नाही. महत्व हे आहे की याचा इन्कार करणारा नास्तिक बनतो आणि ईश्वर, प्रेषित आणि पवित्र कुरआन यांना मानणे देखील त्याला नास्तिकतेपासून वाचवू शकत नाहीत. ‘परलोक’ वरील ईमान खालील सहा घटकांवर आधारलेले आहे.
  • जगामध्ये माणसाला बेजबाबदार बनवून सोडून देण्यात आलेले नाही. माणसाला त्याच्या निर्मात्यासमोर जाब द्यावयाचा आहे. जगातील हे जीवन त्याची परीक्षा व चाचणी घेण्यासाठी आहे. या जगाच्या समाप्तीनंतर माणसाला आपल्या जीवनकृत्यांचा हिशेब आपल्या निर्मात्या अल्लाह समोर द्यावयाचा आहे.
  • या हिशेबासाठी ईश्वराने एक वेळ निश्चित केलेली आहे. ईश्वराने मानवजातीसाठी या जगात कार्य करण्यासाठी जी कालमर्यादा ठरविली आहे ती समाप्त होताच कियामत (जगाचा शेवट) होईल. जगाची प्रचलित व्यवस्था विस्कटली जाईल आणि एक दुसरी जागतिक व्यवस्था नवीन पद्धतीने अस्तित्वात येईल. त्या नव्या जगात या जगातील सुरूवातीपासून शेवटपर्यंत जन्मास आलेल्या सर्व माणसांना पुन्हा जिवंत केले जाईल.
  • त्यावेळी त्या सर्वांना अल्लाहच्या न्यायालयात हजर केले जाईल आणि प्रत्येकाला आपापल्या वैयक्तिक कृत्याबद्दल जाब द्यावा लागेल.
  • तेथे अल्लाह निव्वळ आपल्या ज्ञानाच्या आधारावर निर्णय देणार नाही तर न्यायाच्या सर्व अटी पुऱ्या केल्या जातील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनकृत्यांचा पुरा अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल आणि माणसाने उघडपणे व गुप्तपणे काय काय केले आणि कोणत्या हेतूने केले या संबंधीचा निरनिराळ्या प्रकारचा साक्षीपुरावा न्यायासनासमोर सादर केला जाईल.
  • अल्लाहच्या न्यायालयात कोणत्याही प्रकारची लाचलुचपत, कोणतीही अनुचित शिफारस व सत्याविरोधी वकिली चालणार नाही. एकाचा भार दुसऱ्यावर घातला जाणार नाही. अत्यंत निकटचा नातलग अगर दोस्त पुढारी वा धार्मिक नेता वा कपोलकल्पित दैवतं कोणाच्याही मदतीसाठी पुढे सरसावणार नाहीत. माणूस तेथे एकटा, निराधार असेल व त्याला आपला जाब द्यावा लागेल आणि निर्णय फक्त अल्लाहच्या अधिकारात असेल.
  • माणसाने जगामध्ये प्रेषितांनी दाखवून दिलेल्या सत्याचा स्वीकार करून आणि आखिरतच्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून योग्य प्रकारे अल्लाहचे आज्ञापालन केले किवा नाही, या गोष्टीवर निर्णय अवलंबून असेल. त्याने तसे आज्ञापालन केले असल्यास त्याला निरंतरचे सुख व समाधान (जन्नत) लाभेल आणि त्याने तसे केले नसल्यास त्याला निरंतरचे दुःख व यातना (दोजख) भोगाव्या लागतील.
पहिल्या प्रकारचे लोक - आखिरतवरील (परलोकावरील) ही श्रद्धा तीन प्रकारच्या लोकांच्या जीवन पद्धतीना एक-दुसऱ्यापासून अगदी अलग करते. लोकांमधील एक प्रकार असा आहे की, जे आखिरतवर (परलोक) विश्वास ठेवीत नाहीत व या जगातील जीवनालाच जीवन समजतात आणि म्हणून चांगल्या व वाईट आचरणाच्या फक्त त्या परिणामांनाच ते जाणू शकतात जे या जगामध्ये प्रकट होतात. त्यांच्या दृष्टीने ज्या आचरणाचा परिणाम या जगात चांगला व फायदेशीर ठरेल ते आचरण चांगले आहे. ज्याचा परिणाम वाईट व नुकसानकारक होतो ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे. इतकेच नव्हे तर परिणामाच्या दृष्टीने एखादी गोष्ट एखाद्या वेळेस चांगली ठरते तर तीच गोष्ट दुसऱ्या वेळी वाईट ठरते.
दुसऱ्या प्रकारचे लोक - आखिरतवर (परलोक) विश्वास तर ठेवतात. परंतु त्यांना असा भरवसा असतो की कोणान कोणाची शिफारस त्याना अल्लाहच्या न्यायालयात वाचवू शकेल, कोणीन कोणी त्यांच्या अपराधाबद्दल प्रायश्चित घेतलेले असेल वा मोबदला दिलेला असेल. ते अल्लाहचे आवडते असल्यामुळे त्यांना मोठ्यात मोठ्या अपराधाची शिक्षा मिळाली तरी ती नावापुरती असेल. ही गोष्ट आखिरतवरील (परलोक) श्रद्धेच्या सर्व फायद्यांना नाहीशी करते आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांना पहिल्या प्रकारच्या लोकांच्या पंक्तीत नेऊन बसविते.
तिसऱ्या प्रकारचे लोक - आखिरतच्या (परलोक) तत्वाला अगदी त्या स्वरूपात मानतात ज्या स्वरूपात त्याला इस्लामने सादर केलेले आहे. ते प्रायश्चित्त, अनुचित शिफारस किवा अल्लाहबरोबरचे विशिष्ट संबंध वगैरे भ्रामक समजुतींच्या आहारी गेलेले नसतात. त्यांच्यासाठी ही श्रद्धा म्हणजे एक मोठे नैतिक सामर्थ्य आहे. ज्या माणसाच्या मनात आखिरत (परलोक) बद्दलची खात्री योग्य स्वरूपात रुजलेली असते त्याची स्थिती अशी असते की त्याच्या बरोबर नेहमी एक संरक्षक असतो, जो वाईटाच्या प्रत्येक इच्छेच्या वेळी त्याला सावध करीत असतो. प्रत्येक कृतीच्या वेळी त्याला प्रतिबंध करीत असतो आणि वाईट आचरणाबद्दल त्याची निर्भर्त्सना करीत असतो. बाहेर पकड करणारे पोलिस, साक्ष देणारा साक्षीदार, शिक्षा देणारे न्यायालय, निर्भर्त्सना करणारे लोकमत असो वा नसो, त्याच्यासाठी त्याला सदैव सावध ठेवणारा संरक्षक असतो. त्याच्या भयाने माणूस जंगलात असो वा अंधारात, ओसाड जागेत असो वा एकान्तात, तो अल्लाहने त्याच्यावर टाकलेल्या जबाबदार्यांपासून विन्मुख होण्याचे आणि अल्लाहने हराम ठरविलेल्या गोष्टींना करण्याचे धाडस करीत नाही. यदाकदाचित चुकून त्याच्या हातून असे घडते तर त्याला त्याबद्दल लाज वाटेल व तो पश्चात्ताप करील. याहून अधिक चांगले, माणसाची नैतिक सुधारणा करणारे व त्याला चारित्र्यावान बनविणारे दुसरे साधन नाही. ईश्वराचा श्रेष्ठ कायदा जी चिरंतन मूल्ये माणसाला देतो, त्याबरहुकूम निर्धाराने आचरण करीत राहणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यापासून परावृत्त न होणे या गोष्टी आखिरतच्या (परलोक) श्रद्धेवर अवलंबून आहेत आणि म्हणून इस्लाममध्ये याला इतके महत्व दिले गेले आहे की ही श्रद्धा नसेल तर ईश्वरावरील व प्रेषितावरील श्रद्धा सुद्धा निरर्थक ठरते.
वर स्पष्ट केल्याप्रमाणे, इस्लाम एक संपूर्ण संस्कृती, एक परिपूर्ण सभ्यता आणि एक सर्वव्यापी जीवन पद्धती आहे आणि तो मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिक मार्गदर्शन करतो. इस्लामची नीती संसारत्यागी, वैरागी, संन्यासी लोकांच्यासाठी नाही तर, ती अशा लोकांसाठी आहे, जे जीवनाची निरनिराळी क्षेत्रे चालवितात. व प्रत्यक्ष त्यामध्ये कार्य करतात. लोक नैतिकतेची उच्चता, आश्रम, मठ, विहार व खानकाहमध्ये शोधीत होते. इस्लाम त्यांना जीवनाच्या ऐन प्रवाहात आणू इच्छितो. त्याचा उद्देश हा आहे की राज्याचे शासक, प्रदेशांचे राज्यपाल, न्यायालयांचे न्यायाधीश, पोलीस व सैन्याचे अधिकारी, पार्लमेंटचे सभासद, उद्योगपती व निरनिराळे व्यवसाय चालक, अध्यापक व विद्यार्थी, आई-बाप, मुले-मुली, पती-पत्नी, शेजारी वगैरे सर्वजण या नीतिमत्तेने अलंकृत असावेत. इस्लामची इच्छा आहे की प्रत्येक घरात ही नीतिमत्ता जोपासली जावी आणि प्रत्येक मोहल्ल्यात, पेठेत व बाजारात सुद्धा तिचेच चलन असावे. प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात आणि शासनाच्या साऱ्या विभागात तिचेच पालन केले जावे आणि राजकारण सत्य व न्यायावर आधारित असावे. निरनिराळ्या समाजांनी परस्परांबद्दल आदर बाळगून व सत्याचा अंगिकार करून व्यवहार करावा. युद्ध झाले तरी त्यामध्ये सौजन्य व सभ्यता पाळली जावी. पशूतुल्य आचरण नसावे. माणसाच्या ठायी जेव्हा ईश्वराचे भय निर्माण होईल. ईश्वराच्या कायद्याला जेव्हा तो सर्वश्रेष्ठ कायदा मानेल, ईश्वरासमोर आपल्याला जाब द्यायचा आहे याची जाणीव ठेवून जेव्हा तो चिरकालीन मूल्यांचे पालन करील तेव्हा त्याचे हे आचरण प्रार्थना गृह अथवा उपासना स्थळा पर्यंतच मर्यादित राहात नाही. जीवनाच्या ज्या क्षेत्रात तो काम करीत असेल त्या सर्व क्षेत्रात त्याने अल्लाहच्या प्रामाणिक व एकनिष्ठ दासाप्रमाणे काम करावे.

इस्लाम हे अशा एखाद्या जीवन पद्धतीचे नाव नव्हे जी प्रेषित मुहम्मद (स) यांनी प्रथम सादर केली. म्हणूनच त्यांना इस्लामचे संस्थापक समजणे योग्य नाही. पवित्र कुरआन या सत्याचे स्पष्टीकरण करीत आहे की, ईश्वराने मानवजातीसाठी नेहमी एकच जीवन पद्धती पाठविली आणि ती म्हणजे इस्लाम! अल्लाहसमोर आज्ञाधारकता स्वीकारुन नतमस्तक होणे म्हणजे इस्लाम. निरनिराळ्या भागात व निरनिराळ्या समाजांमध्ये ईश्वराकडून जे प्रेषित पाठविण्यात आले होते ते वेगवेगळ्या जीवन पद्धतीचे संस्थापक नव्हते आणि म्हणून त्यांनी आणलेल्या जीवनपद्धतीला त्यांच्या नावावरून ओळखले जाऊ शकत नाही. प्रत्येक येणाऱ्या प्रेषिताने त्याच एका जीवन पद्धतीला सादर केले, जिला त्याच्यापूर्वी आलेले प्रेषित सादर करीत आले होते.
अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स) यांच्याद्वारे मानवजातीला खऱ्या व शुद्ध इस्लामची शिकवण दिली.
ईश्वराला त्यांच्यानंतर पुन्हा प्रेषित पाठविणे नव्हते. म्हणून त्यांना जो ग्रंथ देण्यात आला, त्यापासून माणसाला प्रत्येक काळात मार्गदर्शन प्राप्त करता यावे या हेतूने त्या ग्रंथाचा शब्दनशब्द मूळ भाषेत सुरक्षित करण्यात आला. अल्लाहने नेमून दिलेली जीवनपद्धती खरोखरच काय आहे, त्यात कोणते मार्गदर्शन आहे आणि आमच्या पासून ती काय इच्छित आहे हे जाणण्याचे एकमेव विश्वासपात्र साधन झाले आहे.
ईश्वराकडून मानवाला अशा कोणत्या विशेष ज्ञानाची आवश्यकता आहे जे फक्त प्रेषितांच्या द्वारे दिले गेले आहे?
जगामध्ये एक प्रकारच्या अशा वस्तू आहेत ज्यांना आपण आमच्या ज्ञानेंद्रियामार्फत जाणतो अगर शास्त्रीय उपकरणें वापरून त्यांच्याकडून माहिती मिळवू शकतो. अशाप्रकारे मिळणारी माहिती निरीक्षण, प्रयोग, विचार व युक्तीवाद यांच्या साहाय्याने क्रमबद्ध करून नव्या नव्या परिणामापर्यंत पोहोचू शकतो. अशा वस्तूचे ज्ञान ईश्वराकडून यावयाची आवश्यकता नाही. हे आमच्या स्वतःच्या शोध, प्रयत्न व चितन-मननाचे क्षेत्र आहे. तरीपण या बाबतीतही आपल्या निर्मात्याने आपल्या अगदी वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. निरनिराळ्या काळात अगम्य पद्धतीने एका ठराविक क्रमानुसार आपल्या निर्माण केलेल्या जगाशी तो आमचा परिचय घडवीत आला आहे. ज्ञानाचे मार्ग आमच्यासाठी खुले करीत आला आहे. वेळोवेळी प्रेरणेद्वारे कोणत्या न कोणत्या माणसाला अशी एखादी गोष्ट सुचवीत असतो, ज्याद्वारे तो माणूस एखादा नवा शोध अगर एखादा नवा नैसर्गिक नियम प्रस्थापित करतो. असे असले तरी वास्तविक हे मानवी ज्ञानाचेच क्षेत्र आहे. त्याच्यासाठी ईश्वराकडून एखादा प्रेषित अगर ग्रंथ येण्याची आवश्यकता नाही. या क्षेत्रात ज्या माहितीची आवश्यकता आहे ती प्राप्त करण्याची साधने माणसाला दिली गेली आहेत.
दुसऱ्या प्रकारच्या वस्तू त्या आहेत ज्या आमच्या ज्ञानेंद्रियांच्या आणि शास्त्रीय उपकरणांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. ना आम्ही त्या तोलू शकतो ना त्याचे मोजमाप घेऊ शकतो. माहिती प्राप्त करण्याचे कोणतेही साधन वापरून त्यांच्यासंबंधी आम्हाला ती माहिती मिळू शकत नाही जिला ‘ज्ञान’ म्हणता येईल. तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ त्यांच्या बाबतीत जेव्हा एखादे मत कायम करतात तेंव्हा तो त्यांचा तर्क व अंदाज असतो. त्याला ज्ञान म्हणता येणार नाही, ही अंतिम सत्ये आहेत. या बाबतीत जे लोक युक्तिवादावर आधारित असे दृष्टिकोन मांडतात ते स्वतः त्यांच्या खरेपणाबद्दल खात्री देऊ शकत नाहीत. त्यांना त्यांच्या ज्ञानांच्या मर्यादेची जाणीव असेल तर स्वतः ते त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत व इतरांना विश्वास ठेवा असे सांगू शकत नाहीत.
हेच ते क्षेत्र आहे ज्याची वास्तविकता जाणण्यासाठी माणसास सृष्टीच्या निर्मात्याने दिलेल्या ज्ञानाची गरज भासते. निर्मात्याने हे ज्ञान एखाद्या पुस्तकात छापून ते एखाद्या माणसास दिलेले नाही. त्याला हे सांगितले गेले नाही की हे वाचून या सृष्टीची व स्वतः तुझी वास्तविकता काय आहे हे तू जाणून घे. त्या वास्तविकतेच्या आधारावर या जगाच्या जीवनात तुझे आचरण कसे असावयास हवे ते ठरव. हे ज्ञान लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी अल्लाह ने नेहमी प्रेषितांना माध्यम बनविले. आपल्या आदेशाद्वारे (वही) त्यांना वास्तविकतेची जाणीव करून दिली आणि हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यावर त्यांची नियुक्ती केली.
पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुरुवातीपासूनच आपले संबोधन सर्वासाठी खुले ठेविले आहे. लोकांपैकी ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे, त्यांना ईमानधारक या नात्याने संबोधिले आहे. पवित्र कुरआनचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यास केल्यास आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या भाषणाचे व संभाषणाचे सर्व संग्रह पडताळून पाहिल्यास याचे समर्थन होईल. पवित्र कुरआनने किवा ते आणणाऱ्या प्रेषित मुहम्मद (स) यांनी कधीही व कोठेही एखाद्या विशेष वंश, वर्ण, जात व वर्गाला किवा एखादी विशिष्ट भाषा बोलणाऱ्या लोकांना उद्देशून सांगितलेले नाही. प्रत्येक ठिकाणी ‘आदमच्या मुलांनो’ वा ‘लोकहो’ असे संबोधन करून साऱ्या मानवजातीला इस्लामचा स्वीकार करण्याचे आवाहन केले गेले आहे. इस्लामचा स्वीकार केलेल्यांना आदेश व उपदेश देण्यासाठी ईमान आणलेल्या लोकांनो! असे संबोधन केले गेले आहे. यावरून आपोआप ही गोष्ट स्पष्ट होते की इस्लामचे आवाहन वैश्विक आवाहन आहे आणि जो माणूस या आवाहनाचा स्वीकार करतो तो पूर्ण समान हक्कासह समान दर्जाचा विश्वासधारक-मुस्लिम बनतो.
कुरआन सांगत आहे की, ‘‘विश्वासधारक एक दुसऱ्याचे भाऊ आहेत.’’
प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की, ‘‘जे लोक इस्लामचा स्वीकार करतात आणि इस्लामीजीवनाचरण पद्धती अंगिकारतात, त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या आमच्यासारख्याच आहेत. ’’
याहूनही अधिक स्पष्टपणे प्रेषित मुहम्मद (स) यांनी विशद केले आहे की, ‘‘ऐका! तुमचा पालनकर्ताही एक आहे आणि तुमचा मूळ पुरूष-बाप सुद्धा एक आहे. कोणत्याही अरबेतराला अरबावर प्राधान्य नाही. ना काळ्याला गोऱ्यावर प्राधान्य आहे, ना गोऱ्याला काळ्यावर प्राधान्य आहे तर ते ईशपरायणतेच्या आधारावर तुमच्यापैकी अल्लाहच्या दृष्टिने अधिक प्रतिष्ठित तो आहे, जो सर्वाधिक संयमी, विवेकी व सदाचारी आहे.’’

हिजरी सन सातमध्ये ‘मुहर्रम’ महिन्याच्या एक तारखेस गुरुवारच्या दिवशी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे सर्व अनुयायी मस्जिदमध्ये जमा झाले. प्रेषितांनी सर्व अनुयायांना संबोधित करताना म्हटले,
‘‘लोकहो! मला ईश्वराने संपूर्ण विश्वासाठी दया व कृपेचा प्रेषित बनवून पाठविले आहे. लक्षात ठेवा! येशू ख्रिस्त या प्रेषितांच्या अनुयायांप्रमाणे आपसात मतभेद करू नका. माझ्यातर्फे सत्यसंदेशाचा प्रचार करण्याचे कर्तव्य पूर्ण करा.’’
प्रेषितांचे हे भाषण मुळात मदीनावरून सुरु होणार्या आंतरराष्ट्रीय प्रसार व प्रचाराच्या नवीन आंदोलनाची प्रस्तावना होती. सत्यधर्माच्या या क्रांतिकारी आंदोलनामध्ये आतापर्यंत स्थानीय संघर्षांमुळे मानवजातींच्या विशाल क्षेत्रात कार्य करण्यात बाधा येत होती. कोणतेही आंदोलन सुरुवातीस स्थानीय आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असते आणि मग आपली यशस्वी वाटचाल करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचते.
‘हुदैबिया’ समझोत्यामुळे ‘कुरैशां’च्या हल्यांपासून प्रेषित आणि इस्लामी आंदोलनास रक्षण मिळाले असल्याने प्रेषितांना संपूर्ण जगात ईश्वरी कृपाशील सत्यधर्माचा प्रचार करण्याची संधी मिळाली. या कार्याची सुरुवात विविध देशांतील बादशाहांना आणि राष्ट्रप्रमुखांना पत्र लेखनाने झाली.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या अनुयायांच्या सल्ल्याने पत्रावर मारण्याचा एक ठसा (मोहर) तयार केला, ज्यावर ‘मुहम्मदुर्रसूलुल्लाह’ (मुहम्मद ईश्वराचे प्रेषित) असे लिहिण्यात आले.
एकाच ईश्वराच्या उपासनेच्या आधारावर स्थापन होणार्या क्रांतीपूर्ण राज्याचे संस्थापक आणि सत्यधर्माचे आवाहन करणारे प्रेषित मुहम्मद(स) यांनी रोमन सम्राट, इजिप्शियन राजा, इराकचा सम्राट आणि अरबच्या सरदारांच्या नावे पत्र पाठविले. रोमन सम्राट ‘हिरकल’च्या नावे पाठविण्यात आलेल्या पत्राचा काही महत्त्वाचा मजकूर खाली देत आहोत.
‘‘असीम दयाळू व कृपाळू ईश्वराच्या नावाने, हे पत्र ईश्वराच्या दास आणि प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडून रोमन सम्राट ‘हिरकल’च्या नावे आहे. ईश्वराचे त्यास रक्षण लाभो जो सत्याचा मार्ग स्वीकारेल.
या प्रस्तावनेनंतर मी तुम्हास इस्लाम धर्माकडे हाक देत आहे. इस्लामचा स्वीकार केल्यास. तुम्हास संरक्षण लाभेल आणि ईश्वर तुम्हास या कर्माचे द्वीगुणित फळ देईल. आणि जर तुम्ही हे निमंत्रण स्वीकारले नाही, तर संपूर्ण राष्ट्राचा इस्लाम न स्वीकारण्याचा अपराध तुमच्या माथी असेल.’’
‘बैतुल मक्दिस’ (पवित्र भूमी यरुशलेम) येथे ज्या वेळी रोमन सम्राटास हे पत्र मिळाले, तेव्हा त्याने आदेश दिला की, एखादा अरब म्हणून या भागात असल्यास त्यास हजर करण्यात यावे. योगायोगाने मक्कातील ‘कुरैशचा सरदार ‘अबू सुफियान’ व्यापारी उद्देशाने तेथे आलेला होता. त्यास त्याच्या सहकार्यांसहित सम्राट दरबारी हजर करण्यात आले. रोमन सम्राटाने ‘अबू सुफियान’ ला विचारले, ‘‘तुम्ही या माणसास (प्रेषितांना) ओळखता काय?’’
‘‘होय! ओळखतो, परंतु आमचे त्याच्याशी वैर आहे.’’ अबू सुफियानने उत्तर दिले.
‘‘हा माणूस पप्रेषित मुहम्मद(स)ब कधी खोटे बोलताना तुम्ही ऐकले काय?’’ रोमन सम्राटाने प्रश्न केला. ‘‘नाही! मुळीच नाही.’’ अबू सुफियान उत्तरला. ‘‘जो माणूस कोणाशीही कधीच खोटे बोलत नाही, तो ईश्वराविषयी देखील कसे काय खोटे बोलणार!’’ रोमन सम्राट बोलत गेला.
‘‘हाच तर प्रेषिताचा विशेष गुणधर्म असतो. तो नमाज, ईशपरायणता आणि क्षमा करण्याची शिकवण देतो. हा मनुष्य निश्चितच ईश्वराचा प्रेषित आहे. आम्ही खूप पूर्वीपासून वाट पाहात होतो की, एक प्रेषित प्रकट होणार आहे. परंतु आम्हास याची कल्पना नव्हती की, ते अरब राष्ट्रात उदयास येतील. त्यांचे दर्शन झाले असते, तर आमचे सुदैवच म्हणावे लागले. मी त्यांच्याजवळ असतो, तर त्यांचा अनुयायी झालो असतो. एके दिवशी त्यांचे शासन इथपर्यंत पोहोचेल ज्या ठिकाणी मी उभा आहे.’’
एवढे बोलून त्याने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना पत्र पाठविले की, ‘‘मी तर मुस्लिम आहे!’’ प्रेषितांना पत्र मिळाल्यावर ते म्हणाले, ‘‘तो चक्क खोटे बोलतो. तो तर अजूनही येशू ख्रिस्ताच्या धर्मावरच आहे.’’
पर्शियाचा सम्राट ‘खुसरो परवेज’ ला जेव्हा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडून इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रणपत्र मिळाले, तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि संतापाच्या भरात पत्र फाडून टाकून तो म्हणाला, ‘‘माझी सत्ता संपूर्ण प्रदेशावर असून हा माणूस पप्रेषित मुहम्मद(स)ब माझ्या रयतेपैकी असून माझ्यावर आदेश गाजवितो!’’
ईश्वराची करणी अशी झाली की, अगदी अल्पकाळातच पर्शियन साम्राज्याचे तुकडे विखुरले. ‘खुसरो परवेज’ने प्रेषित मुहम्मद(स) चे पत्र फाडून ‘येमेन’चा गव्हर्नर ‘बाजान’ यास आदेश दिला की, ‘प्रेषितत्वाचा दावा करणार्या या माणसास तत्काळ अटक करून सम्राटदरबारी हजर करावे. आदेश मिळताच ‘बाजान’ने प्रेषितांना अटक करण्यासाठी दोन शिपायांना पाठविले. दोन्ही शिपाई प्रेषितदरबारी हजर होऊन म्हणाले, ‘‘आपण सम्राटाचा आदेश मान्य केला नाही तर तो तुमच्या देशाला उद्ध्वस्त करील.’’ प्रेषितांनी त्या शिपायांना स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘‘तुम्ही परत जाऊन माझा निरोप सांगा की, इस्लामचे शासन किसरा (खुसरो परवेज)च्या राजधानीपर्यंत पोहोचणारच! तुम्हीसुद्धा तुमच्या डोळ्यांनी पाहा, किसराच्या पुत्रांनी त्याची हत्या केली आहे.’’ प्रेषितांचा निरोप ‘बाजान’पर्यंत पोहोचला आणि त्याला मुहम्मद (स.) यांच्या प्रेषितत्वावर विश्वास बसला. कारण तिकडे खरोखरच ‘खुसरो’च्या मुलांनी त्याचा वध केला होता. तेव्हा त्याने इस्लामचा स्वीकार केला, त्याच्याबरोबर त्याच्या दरबारींनी आणि त्यांच्या देशातील बर्याच जणांनी इस्लाम स्वीकारला.
आंतरराष्ट्रीय धर्मप्रसारात इस्लामला मिळालेले हे पहिले आणि मोठे यश होय.
‘इजिप्त’ देशाचा राजा ‘मकूकस’ने प्रेषित मुहम्मद(स) यांचे इस्लामनिमंत्रणाचे पत्र वाचून चांगले विचार व्यक्त केले. त्याने मोठ्या आदराने प्रेषितांचे पत्र हस्तीदंताच्या एका डब्यात सुरक्षित ठेवले. उत्तरादाखल एक आदरयुक्त पत्रही पाठविले. सोबत काही वस्तू भेट म्हणून पाठविल्या. प्रेषितांचे पत्रवाहक ‘माननीय हातिब(र)’ यांनाही काही वस्त्र आणि सोने भेट म्हणून दिले.
‘अॅबीसिनिया’ या देशाचा राजा ‘नेगूस’ हा पूर्वीपासूनच प्रेषित मुहम्मद(स) यांचा खूप आदर करीत असे. त्याने मागील काळात प्रेषितांच्या अनुयायांना आपल्या देशात आश्रय दिला होता. प्रेषितांचे पत्र मिळताच त्याने अत्यंत आदराने प्रेषितांना उत्तर पाठविले की, ‘आपण एक ईश्वर आणि प्रेषितांवर श्रद्धा बाळगली आहे आणि इस्लामचा स्वीकार करीत आहे.’
‘यमामा’चा सरदार ‘हौजा बिन अली’ यानेसुद्धा प्रेषितांचे पत्र खूप आदरपूर्वक वाचले आणि इस्लाम स्वीकारण्याची तयारी दर्शविली, परंतु त्याने एक अट ठेवली की, अधिकांरामध्ये त्याचाही वाटा ठेवावा. प्रेषितांनी त्याची अट मान्य केली नाही आणि काही काळानंतर तो मरण पावला. अशा प्रकारे बर्याच सरदारांनासुद्धा प्रेषितांनी पत्रे पाठविली.
प्रेषित मुहम्मद(स) यांच्या या लेखन प्रचारप्रणालीमुळे त्यांचा परिचय सभोतालच्या लहान मोठ्या दरबारांत झाला. प्रेषितांची शिकवण आणि प्रेषित्वाची विभिन्न क्षेत्रांमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली. बाह्य प्रदेशातील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी आणि इतर बर्याच जणांनी इस्लामचा स्वीकार केला. तसेच काहींनी विरोधी भूमिका घेतली. तरीदेखील या विरोधी भूमिकेमुळेसुद्धा प्रेषितांचा परिचय होत गेला. त्याचबरोबर सभोवताली असणार्या शासनांस या गोष्टीची जाणीव झाली की, ज्या प्रदेशात लोक कबिल्यांच्या स्वरुपात गटागटाने राहात होते आणि आपसात लढत होते, त्या प्रदेशात एक नवीन अनुशासनबद्ध राज्य स्थापन झाले आहे.
सारांश असा की, काही दिवसांतच प्रेषित मुहम्मद(स) यांचा सुख-शांतीचा संदेश आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दाखल झाला.

इस्लाममध्ये ईश्वराचे-अल्लाहचे स्वरुप अत्यंत स्पष्ट, पवित्र आणि बुद्धीला व आत्म्याला पटणारे आहे. त्यामध्ये कुठलीही अस्पष्टता, भेसळ, संदिग्धता किंवा बुद्धीविरुद्ध गोष्ट नाही. ईश्वर एक आणि एकमेव आहे. त्याच्या ईश्वरतत्वामध्ये कोणीही भागीदार नाही. तो या सृष्टीचा एकमेव निर्माता, पालनकर्ता, मालक, शासक, अन्नदाता आणि आदेश देणारा आहे. त्याच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये कोणीही सहभागी नाही. तो स्वयंभू आहे, कायमस्वरुपी आहे आणि कायमस्वरुपी राहील. त्याला मृत्यु नाही, तो तहान-भूक, आसक्ती, सकल मानवी इच्छा, आकांक्षा आणि प्रत्येक प्रकारचे मानवी दोष आणि कमतरता यांपासून पवित्र आहे. त्याला कधी झोप अथवा थकवा येत नाही. त्याला पश्चात्ताप होत नाही किंवा त्याला कोणी धोका देऊ शकत नाही. कुठल्याही कामाकरिता त्याच्यावर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्याला कोणत्याही गोष्टीची लालसा नाही. मानव, संपूर्ण सृष्टी, विश्व व प्रत्येक वस्तू त्याच्या आज्ञेत आहेत. ईश्वर आणि सृष्टी एक नाही. त्यांचे स्वतंत्र वेगवेगळे अस्तित्व आहे. ईश्वराने सृष्टीला निर्माण केले आहे, वाढविले व सजविले आहे. त्याच्या या निर्माणकार्यामध्ये त्याला त्याग करण्याची किंवा बळी अगर बलिदान देण्याची गरज नाही. सृष्टीची निर्मिती, देखभाल किंवा आदेश देणे हे ईश्वराचे अगदी सोपे काम आहे. (तो मानवाकरिता मार्गदर्शन, त्याच्या पापाची, गुन्ह्याची क्षमा किंवा अन्यायकर्त्याची शिफारस अथवा दुसऱ्या कोणत्याही हेतूने मानवी किंवा प्राण्यांच्या रुपामध्ये येत नाही.) त्याला कोणताही पुत्र नाही, की जो त्याच्या मदतीकरिता पृथ्वीवर जन्मावा. या सर्व विकृत भावनांपासून तो पवित्र आणि समर्थ आहे. कोणतीही गोष्ट किंवा वस्तू ईश्वराची बाजू घेत नाही आणि ईश्वरदेखील कोणाच्याही बाजूने नाही. तसेच त्याला त्याच्या बरोबरीचा जोडीदार नाही. तो अजोड, अतूल व अदृश्य आहे. त्याला खालपासून वरपर्यंत कोणी पाहू शकत नाही. तो सर्वव्यापी आहे. सर्व वस्तूंना पाहणारा आहे. तो प्रत्येकाचे म्हणणे ऐकणारा, एवढेच नव्हे तर मानवाच्या हृदयामध्ये, मनामध्ये येणारे विचार, हेतू, इच्छा, आकांक्षासुद्धा जाणणारा अंतर्ज्ञानी आहे. त्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. त्याचे ज्ञान प्रत्येक गोष्टींनी व्यापलेले आहे. तो प्रत्येक माणसाच्या अगदी जवळ आहे. त्याला कोणाच्या मध्यस्थीची किंवा कोणाच्या शिफारशींची गरज नाही व तो मानवाची प्रार्थना, भक्ती कोणत्याही माध्यमाविना अगर शिफारशींशिवाय ऐकतो. संकटग्रस्त माणसाची फिर्याद ऐकतो व प्रत्येकाच्या मदतीस येतो. तो सर्वश्रेष्ठ, सर्वाधीश आहे.
याउलट सर्वजण ईश्वराचेच लाचार व आज्ञाधारक आहेत. सर्व सत्कर्माची गुणवैशिष्ट्ये त्याचीच व त्याच्याचसाठी आहेत. सामर्थ्य, मोठेपणा, उत्कर्षाचा उगमसुद्धा ईश्वरामध्येच आहे. तो न्यायी व न्यायदाता आहे. अन्यायाच्या प्रत्येक वाईट पैलूंपासून पवित्र आहे. तो जे काही कार्य करतो ते आपल्या ज्ञानाने आणि बुद्धिकौशल्याने करतो. त्याचे कायदे व आदेश सृष्टीच्या, विश्वाच्या कणाकणांमध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यांचे पालन केले जाते. पृथ्वी आणि त्यावरील निर्मिती या सर्व गोष्टी त्याच्या अधिपत्याखाली आहेत. मानवाच्या ऐच्छिक व अनच्छिक जीवनामध्ये सुद्धा त्याचेच आदेश व आज्ञा पाळल्या जातात. ईश्वरच या सृष्टीचा आणि मानवाचा योग्य व सत्य स्वामी आहे.
म्हणूनच मानवाच्या वस्तुनिष्ठ जीवनाकरितादेखील त्याचेच आदेश, कायदे-कानून आहेत. तो कृपावान व अत्यंत दयाळू आहे. त्याची दया, कृपा सर्व चराचरामध्ये सामावलेली, व्यापलेली आहे. संपूर्ण मानवजातीवर त्याची असीम दया, अनंत कृपा व देणग्या आहेत. या जगामध्ये सर्वांत मोठी कृपा आणि देणगी ‘ईश्वरीय धर्म’ (इस्लाम) आहे, जो मानवतेकरीता, मानवाच्या मार्गदर्शनाकरीता या ऐहिक आणि पारलौकिक जीवनामध्ये यश प्राप्त करण्याकरिता दिला आहे. त्याचे जे सेवक व भक्त त्याची भक्ती करतात, त्याच्या आज्ञेचे पालन करतात, त्याच्या धर्माचे पालन निःस्वार्थपणे करतात आणि त्याच्या सन्मार्गामध्ये आपले प्राण, संपत्तीची आहुती देतात, संकटकाळामध्ये त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कायम दृढ राहतात; अशांना सर्वशक्तिमान, सर्वसंपन्न आणि बुद्धिमान ईश्वर मदत करतो, त्यांना साथ देतो आणि त्यांना आपल्या निकट करुन प्रसन्न करतो आणि प्रसन्न होतो. सर्वज्ञानी ईश्वर त्यांना पारलौकिक जीवनात प्रामाणिक निवडक भक्तांमध्ये, सेवकांमध्ये सामील करुन स्वर्गामध्ये उच्चस्थान देईल व अनंत, अगणित देणग्यांचा, भेटींचा, कृपेचा वर्षाव करील. ऐहिक जीवन असो की पारलौकिक जीवन दोन्ही जीवनांमध्ये, त्याच्याच आदेशांचे व आज्ञांचे पालन केले जाते. त्याची मदत असेल तर कोणी त्याला अंकित व अधीन करू शकणार नाही. त्याने आपली दया, कृपा नाकारली तर त्या मनुष्याला वाचविणारा कोणी असणार नाही. मानवांना या जगामध्ये तोच पाठवितो आणि तोच त्यांना अन्न-पाणी देतो. व्यक्ती व समाज आणि त्यांचा उत्कर्ष, उन्नती व अधोगती त्याच्याच हातामध्ये आहे. त्याच्या कौशल्याने जाती-वंशसुद्धा अवकर्षाला व अधोगतीला पोहोचतात आणि व्यक्तीलादेखील मृत्यु येतो. मृत्युनंतर मानवाला परत त्याच्याच जवळ जायचे आहे. इहलोक व परलोक दोन्हींमध्ये त्याचा ईश्वराशी संबंध येणार आहे आणि त्यालाच प्रसन्न करुन त्याचीच भक्ती करुन दोन्ही लोकांमध्ये मनुष्य यशस्वी आणि सफल होणार आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget