Latest Post

- विजय गोपाल मंगल
   
    या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत.
    कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण आणि मृत्यूनंतर काय होईल याविषयी सावध करण्यात आले आहे. हे पुस्तक भ्रष्टाचार समाप्त करण्यास, सांप्रदायिक तणाव नष्ट करण्यास आणि विश्वबंधुत्व वाढीस लागण्यास उपयुक्त असे आहे. अट हीच आहे की वाचकाने या पुस्तकाचे पूर्णत: निरपेक्षपणे अध्ययन करावे.

आयएमपीटी अ.क्र. 186     -पृष्ठे - 16     मूल्य - 10                आवृत्ती - 2 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/nwjurk1evv1e3b9ndt82ejfhgyr3j8d1

काही दिवसांपूर्वी ‘निकाह-हलाला’ आणि इतर बाबींची संवैधानिक वैधता ठरवण्याकरिता प्रकरण संवैधानिक खंडपीठाकडे वर्ग केले होते. त्याबाबत वृत्तपत्रांत ही  बातमी प्रकाशित झाली   होती. सदर बातमी प्रकाशित करताना ‘निकाहहलाला’बद्दल जसा उल्लेख करण्यात आला त्यावरून असे दिसून येते की समाजात ‘निकाह-हलाला’बद्दल बरेच गैरसमज आहेत. मुस्लिम  पर्सनल लॉ (शरियत अप्लिकेशन) अधिनियम, १९३७ नुसार विवाह / घटस्फोटाबद्दल भारतातील सर्व न्यायालये इस्लामी शरियतप्रमाणे न्यायनिवाडा करतात.

गैरसमज
समाजात ‘निकाह- हलाला’ एक प्रकारची विवाहपद्धती असल्याचा चुकीचा समज आहे. ‘निकाह-हलाला’ या प्रकारच्या कोणत्याही विवाहपद्धतीचे इस्लामी शरियतमध्ये अस्तित्व नाही. असाही गैरसमज आहे  की मुस्लिम पुरूषाने आपल्या पत्नीला तलाक  दिल्यानंतर जर त्या पतीला त्याच स्त्रीशी पुन्हा लग्न करायचे असेल तर तिला एखाद्या परपुरुषाशी निकाह (विवाह) करून त्याच्याशी  शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतरच त्याच्याकडून घटस्फोट झाल्यानंतर तिचा पहिला पती तिच्याशी पुन्हा विवाह करू शकतो. पत्नीची इच्छा नसतानाही बळजबरीने ‘निकाह-हलाला’  या नावाने तिला एका परपुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावा लागतो, परंतु हे सर्व समज अत्यंत चुकीचे आहेत. पहिल्या पतीशी विवाह करण्याच्या उद्देशाने ही पद्धत इस्लामी  शरियतमध्ये वर्ज्य आहे. हा गैरसमज मुस्लिम पुरुषांच्या तलाक कायद्याच्या अपूर्ण ज्ञानामुळे निर्माण झालेला आहे.

‘निकाह-हलाला’ची वास्तविकता
‘निकाह-हलाला’बद्दल गैरसमज व  त्याचे वास्तव समजावून घेण्याकरिता इस्लामी शरियतप्रमाणे दांपत्य जीवनशैली, तलाक/घटस्फोटबद्दल तरतुदींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. इस्लामी शरियतप्रमाणे मुस्लिम  पती-पत्नीला आपली जीवनशैली पवित्र कुरआन व हदीस (पैगंबर मुहम्मद स. यांची जीवनशैली) प्रमाणे जगणे अपेक्षित आहे. पती-पत्नी दोघांना समान हक्क आहेत. (कुरआन, २:२२८)  इस्लामी शरियतप्रमाणे पत्नीचा निर्वाह करण्याची जबाबदारी पूर्णत: पतीवर आहे. स्वयंपाक करण्याची जबाबदारी पत्नीची नाही. पतीची जबादारी आहे की तयार जेवण पत्नीस उपलब्ध  करून द्यावे. तसेच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पूर्णत: पतीवर आहे. (कुरआन, २:२३३) पत्नी जन्मलेल्या बाळाला दूध पाजण्यास बाध्य नाही. जर  पत्नीने बाळाला दूध पाजले तर विशिष्ट परिस्थितीत ती दूध पाजल्याबद्दलचा मोबदला मागू शकते. (कुरआन, ६५:६) पती-पत्नीने आपसात प्रेमाने राहाणे हे इस्लामी शरियतला अपेक्षित  आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, ‘‘सर्वांत उत्तम व्यक्ती ती आहे जिचा व्यवहार आपल्या कुटुंबाशी चांगला आहे.’’

पती-पत्नींमध्ये जर वाद झाल्यास पतीला असे सुचविले आहे की त्याने आपल्या पत्नीची चूक माफ करावी व तिच्यात काही कमतरता आढळून येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे,  कारण अल्लाहने (ईश्वराने) तिच्यात इतर काही चांगले गुण, संस्कार प्रदान केले आहेत त्या आधारे पतीने आपले वैवाहिक जीवन सुरळीत चालवावे. (कुरआन, ४:१९) जर वाद वाढतच  जात असेल तर त्या वेळेस पतीने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दोघांनीही आपसात भांडण मिटवून घेतले पाहिजे. (कुरआन, ४:१२८) त्यानंतरही वादाचे निवारण  होत नसेल तर इस्लामी शरियतप्रमाणे असे अपेक्षित आहे की पती व पत्नीने त्यांचे वाद संपुष्टात आणण्याकरिता त्यांनी त्यांच्याकडून एक एक मध्यस्थ नेमला पाहिजे आणि त्या  मध्यस्थामार्फत आपला वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (कुरआन, ४:३५) मध्यस्थामार्फत वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सफल होत नसेल तर पतीने तलाक /  घटस्फोटाबद्दल विचार करावा. जर पतीच्या मताप्रमाणे त्याला पत्नीला घटस्फोट देणे आवश्यक झाले असेल तर अशा परिस्थितीत त्याने आपल्या पत्नीस तिची मासिक पाळी संपून ती  पवित्र झाल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध न ठेवता एक तलाक द्यावा. अशा प्रकारच्या तलाकला ‘तलाक-ए-रजई’ म्हणतात. सदर तलाक दिल्यानंतरही पतीला तो तलाक पुढी तीन  मासिक पाळीच्या काळात किंवा चांग्रमासाच्या आत रद्द करता येतो. त्या काळात पतीने आपल्या पत्नीस घराबाहेर काढू नये. सदर काळात पत्नी आपल्या पतीच्या घरातच राहील. अशा  परिस्थितीत तिला असे सूचित केले आहे की तिने चांगला बनाव शृंगार करावा जेणेकरून पती तिच्याकडे आकर्षित व्हावा आणि त्याने दिलेला तलाक रद्द करण्यास तो प्रेरित व्हावा. पती  दिलेला तलाक जाहीरपणे रद्द करू शकतो किंवा त्याने जर आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर दिलेला तलाक आपोआप रद्द होतो. (कुरआन, २:२२९ व सूरह अल तलाक मध्ये याबद्दल सविस्तर उल्लेख आहे.) कदाचित पतीने दिलेला एक तलाक परत न घेतल्यास तीन मासिक पाळीच्या काळात किंवा चांग्रमासानंतर ती तलाक कायम होईल.  म्हणजेच ती तलाक ‘तलाक-ए-बायन’मध्ये परिवर्तीत होईल, या तलाक पद्धतीला ‘तलाक-ए-अहेसन’सुद्धा म्हणतात.
आता तलाक कायम झाल्यानंतर पती पत्नीपासून स्वतंत्र झाली. ती कोणाशीही लग्न करू शकते. त्याचबरोबर आपल्या पहिल्या पतीशी लग्न करण्याची तिला मुभादेखील आहे. पती  स्वत: होऊन पुन्हा आपल्या पत्नीशी लग्न जुळवू शकत नाही. पत्नीच्या संमतीने दोघे पुन्हा लग्न नवीन महर रक्कम ठरवून करू शकतो. जर पत्नीने होकार दिला आणि त्यांचे पुन्हा  लग्न झाले तर हे त्यांचे दुसरे लग्न होईल. गैरसमजुतीप्रमाणे त्यांच्या या पुनर्विवाहाला ‘हलाला’ करण्याची बाधा नाही. पुनर्विवाह झाल्यानंतरही पतीपत्नीला वरीलप्रमाणे जीवनशैली अमलात आणावी लागेल आणि पुन्हा वाद झाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे पद्धत वापरावी लागेल. दुर्दैवाने त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि तो वरीलप्रमाणे संपुष्टात आला नाही तर  उपरोक्त पद्धत वापरून पती आपल्या पत्नीस दुसऱ्यांदा एक तलाक-ए-रजई देऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट काळात तलाक रद्द न केल्यास पत्नी पुन्हा आपल्या पतीपासून  स्वतंत्र होईल. परंतु पहिल्या तलाकप्रमाणे ही दुसरी तलाक दिल्यानंतरही पती-पत्नी पुन्हा नवीन महर रक्कम ठरवून पुन्हा लग्न करू शकतात. अशा प्रकारे हा आपसात तिसऱ्यांदा  विवाह (दुसरा पुनर्विवाह) होईल, ज्याला ‘हलाला’ची आवश्यकता राहाणार नाही. तिसऱ्यांदा विवाह (दुसरा पुनर्विवाह) झाल्यानंतरही असे अपेक्षित आहे की पती-पत्नीने आपली जीवनशैली  इस्लामी शरियतप्रमाणे चालवावी व दुदैर्तवाने पुन्हा वाद झाल्यास वरीलप्रमाणे निवारण करण्याचा प्रयत्न करावा. जर वाद संपुष्टात आला नाही तर पतीने तलाक देण्यासाठी  वरीलप्रमाणेच पद्धत अमलात आणावी. परंतु पतीने तिसऱ्यांदा तलाक दिली त्याच क्षणी ती तलाक म्हणजे ‘तलाक-एमुगल्लजा’मध्ये परिवर्तीत होईल. त्यांचे पती-पत्नीचे नाते संपुष्टात  येईल आणि पत्नी पतीपासून कायमची स्वतंत्र होईल. आता तो पती आपल्या पत्नीशी पुन्हा लग्न करू शकत नाही. त्याचे सर्व हक्क संपुष्टातयेतील. (कुरआन, २:२३०)
आता पत्नी तिच्या इच्छेनुसार कोणासोबतही लग्न करू शकते, परंतु आपल्या पहिल्या पतीशी लग्न करू शकत नाही. वरीलप्रमाणे तीन वेळा तलाक झाल्यानंतर पत्नी आपल्या  इच्छेनुसार इतर व्यक्तीशी लग्न केले तर तिला व तिच्या दुसऱ्या पतीला आपले जीवन वरील पद्धतीनेच जगावे लागेल. वादविवाद झाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे त्यांनी आपले  वादविवाद संपुष्टात आणावेत, अशीच इस्लामी शरियतची अपेक्षा आहे.  वाद संपुष्टात न आल्यास वरील पद्धतीप्रमाणे दुसरा पती तिला तलाक देऊ शकतो. दोन वेळा तलाक देऊन परत  घेऊ शकतो व तिसऱ्या वेळेस तलाक दिल्यास तिला परत घेता येणार नाही. दोन वेळा ‘तलाक-एरजई’ तीन मासिक पाळीच्या काळात किंवा तीन चांद्रमासाच्या काळात परत घेऊ  शकतो. परंतु न घेतल्यास ती तलाक ‘तलाक-ए-बायन’मध्ये परिवर्तीत होईल. अशा प्रकारे नैगसर्गिकरित्या ‘तलाक-ए-बायन, ‘तलाक-ए-अहसन’ किंवा ‘तलाक-एमुगल्लजा’ होताच ती  आपल्या दुसऱ्या पतीपासूनसुद्धा कायमची स्वतंत्र होईल. आता ती आपल्या दुसऱ्या पतीशी पुन्हा लग्न करू शकत नाही. आता ती इतर कोणा व्यक्तीसोबत लग्न करण्यास स्वतंत्र होईल.  परंतु ती इच्छेनुसार आता आपल्या पतीसोबतच्या लग्नाला होकार देऊ शकते. (कुरआन, २:२३०, २३२) अशा प्रकारे पहिला पती पुन्हा तिच्याशी लग्न करू शकतो. या सर्व प्रसंगाला  ‘हलाला’ म्हणतात. परंतु हे सर्व नैसर्गिकरित्या घडले पाहिजे. जर कोणी ठरवून असे करत असेल तर ते धर्मात वर्ज्य, अमान्य व निषिद्ध आहे. इस्लामी शरियतप्रमाणे विवाह उभय  पक्षांत एक दिवाणी स्वरूपाचा करार आहे. स्त्री त्या करारास एक स्वतंत्र पक्ष आहे. तिच्यावर बळजबरी करून कोणी विवाह करू शकत नाही अथवा पुनर्विवाहाकरिता बळजबरी करू  शकत नाही. निश्चितच कोणतीही पत्नी असा तीन वेळा पुनर्विवाह करून तीन तीन वेळा तलाक देणाऱ्या पतीशी पुन्हा लग्न करणार नाही. वर नमूद सर्व बाबींचा विचार करून आपण  समजू शकतो की कोणी स्त्री ठरवून अशा प्रकारचा अमल करून आपल्या पहिल्या पतीशी लग्न करावयास तयार होणार नाही. हा गैरसमज आहे की, इस्लाम धर्मात स्त्रीला स्वातंत्र्य   नाही व तिच्या संमतीशिवाय तिचा विवाह किंवा पुनर्विवाह केला जातो. वस्तुत: स्त्रीला आपले निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. परंतु वरील इस्लामी शरियत पद्धतीची माहिती न  घेता या पद्धतीबाबत भरपूर गैरसमज करण्यात आलेले आहेत.
जुन्या काळात अरब देशात अमलात असलेली तलाक पद्धत व नियमवरील सर्व तलाक व पुन्हा विवाह पद्धती समजून घेण्याकरिता पैगंबर मुहम्मद (स.) या जगात आले त्या वेळेस  असलेली परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. त्या वेळेस कोणत्याही धर्मात किंवा कायद्यात विराह झाल्यानंतर घटस्फोट घेण्याची पद्धत किंवा नियम अस्तित्वात नव्हता. परंतु अरब  देशात घटस्फोट/तलाकची पद्धत विचित्र स्वरूपात अस्तित्वात होती. त्या वेळेस अरब देशात पती आपल्या पत्नीवर खूप अन्याय करत होते. छळ करण्याचे स्वरूप त्यांनी असे निवडले  होते की अरब समाजातील पती आपल्या पत्नीस एक तलाक द्यायचे व पुढील तीन मासिक पाळीच्या काळात किंवा चांद्रमासाच्या आत ती तलाक रद्द करून टाकायचे. अशी तलाक  देऊन तलाक रद्द करण्याचा अमल आपल्या पत्नीबरोबर ते हजारो वेळा करायचे. आपल्या पत्नीस विवाहसंबंधाच्या सुखापासून कायमचे वंचित ठेवायचे आणि तिला आपल्यापासून स्वतंत्र   पण होऊ देत नसत. त्या वेळच्या तलाक नियमाप्रमाणे ती रद्द केल्यामुळे पत्नी आपल्या पत्नीच्या लग्नसंबंधात अडकून राहायची व तिचा छळ होत राहायचा. अशा प्रकारे ती आपल्या  पतीपासून स्वतंत्र व्हायची नाही आणि पती तलाक नियमाचे खेळ करत राहायचे. त्या काळात इस्लामी शरियतप्रमाणे पतीचे तलाक रद्द करण्याचे अधिकार फक्त दोनदा मर्यादित  करण्यात आले आणि पत्नी तिसऱ्या वेळेस तलाक देताच आपल्या पतीपासून आपोआप स्वतंत्र होऊन जायची. अशा प्रकारे स्त्रियांचा छळ संपुष्टात आला.
मुस्लिम समाजाला आवाहनउपरोक्त तलाक पद्धत (‘तलाक-ए-रजई’ म्हणजेच ‘तलाक- ए-अहेसन) हीच पद्धत सर्वोत्त तलाक पद्धती आहे. जर वर नमूद पद्धत न अवलंबता तलाक दिली  तर त्याचा अमल होत असला तरीही आणि इतर तलाक पद्धती जरी इस्लामी शरियतप्रमाणे मान्य असेल किंवा त्याचा अमल लागू होत असेल तरीही सर्व इस्लाम धर्मीयांनी वरीलप्रमाणे  एकच तलाक पद्धत अंमलात आणावी व इतर तलाक पद्धती आपल्या स्मरणातून वगळून टाकाव्यात. अशा प्रकारे सर्व समाजाचे इस्लामी शरियत नियम व पद्धतीबद्दल गैरसमज दूर होतील आणि सर्व भारतीय समाजाला याची जाणीव होईल की ठरवून ‘निकाह-हलाला’ करण्याची कोणतीही पद्धत इस्लाम धर्मात नही आणि असे ठरवून करणे इस्लामी शरियतप्रमाणे
वर्जित, अमान्य व निषिद्ध आहे.

- शेख अकबर शेख जाफर
(न्यायाधीश व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी)

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी व्याज खाणाऱ्याची, व्याज देणाऱ्याची, त्याच्या दोन्ही साक्षीदारांची आणि व्याजव्यवहार लिहून  ठेवणाराची निर्भत्सना केली आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी निर्भत्सना केली आहे ते पाप किती मोठे असेल हे आपल्या लक्षात येते. इतकेच नव्हे तर निसाई हदीसकथनानुसार जाणूनबुजून व्याज घेणे, देणे, साक्ष देणे   आणि लिहून ठेवणाऱ्यांची अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) निर्भत्र्सना करतील. अर्थात अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा लोकांसाठी (जर पश्चात्ताप न करता मरण  पावले) पापमुक्ती नव्हे तर निर्भत्सना करतील.

लाच
माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यांचा आणि लाच घेणाऱ्यांचा धिक्कार असो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यावर आणि ती घेणाऱ्यावरदेखील अल्लाहचा धिक्कार असो. (हदीस : मुन्तका)

स्पष्टीकरण
लाच दुसऱ्यांच्या हक्काधिकारांचे हनन करून स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी शासनाच्या लिपिकांना आणि अधिकाऱ्यांना दिली जाणाऱ्या वस्तू किंवा रकमेस ‘लाच’ म्हणतात. आपला  वैध हक्क प्राप्त करण्यासाठी खोटारड्या राज्य प्रशासनाच्या धोकेबाज कमचाऱ्यांना, मनाच्या पूर्ण द्वेषासह आपल्या खिशातून ठराविक रक्कम काढून देणे भाग पडते, त्याशिवाय आपला  हक्क प्राप्त होत नाही. या कारणास्तव हा आज्ञाधारक (मोमिन) अल्लाहने इच्छिले तर त्याच्याकडून धिक्कारला जाणार नाही. अशा स्थितीत आणखीन अधिक मागणी करतात की  अल्लाहच्या ‘दीन’ला वर्चस्व व प्रभुत्व प्राप्त होवो.

संदिग्धतेपासून दूर राहणे
माननीय नुअमान बिन बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘वैधही स्पष्ट आहे आणि निषिद्धही, परंतु या दोन्हींदरम्यान काही गोष्टी अशा आहेत  ज्या संदिग्ध (संशयास्पद) आहेत. जो मनुष्य संदिग्ध गोष्टांपासून स्वत:चा बचाव करील तो त्यापेक्षा अधिक उघड पापांपासून वाचेल. तसेच जो मनुष्य संदिग्ध पापकृत्ये करण्यात  बहादुरी दाखवील तर उघड पापकृत्यांमध्ये तो मागे पडण्याची शक्यता आहे आणि पापकृत्ये करण्यापासून अल्लाहने त्याला रोखले आहे. (ज्यात कोणाला जाण्याची परवानगी नाही आणि  त्यात परवानगीशिवाय घुसणे अपराध आहे.) जे जनावर मनाई करण्यात आलेल्या विभागाभोवती चरते, त्याचे मनाई करण्यात आलेल्या विभागात जाऊन पडण्याची शक्यता खूपच  अधिक आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की जी वस्तू निषिद्ध असल्याचे अजिबात माहीत होत नाही आणि वैध असल्याचे स्पष्टपणे कळत नाही, अशा वस्तूचे काही पैलू  वैध वाटत असतील आणि काही निषिद्ध दिसत असतील तर त्याच्याजवळ न फिरकणे हेच मोमिनचे (अल्लाहच्या आज्ञाधारकाचे) काम आहे. जो संदिग्ध वस्तूंपासून दूर जातो, तो उघड  निषिद्ध कर्म कसे करू शकतो? जर एखादा मनुष्य संदिग्ध वस्तूंना निषिद्ध समजूनदेखील त्या घेत असेल तर त्याचा परिणाम असा होईल की मन उघड निषिद्ध वस्तू घेण्यात बहादूर व  धाडसी बनेल आणि ही  मनाची अतिशय भयानक स्थिती आहे, हे उघड आहे. माननीय अतिय्या सअदी (रजि.) यांच्या कथनानुसार,

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखादा मनुष्य अल्लाहच्या सदाचारी दासांच्या यादीत येऊ शकत नाही जोपर्यंत पापकृत्य घडण्याच्या भीतीने ती गोष्ट सोडत नाही ज्यात कसलेही  पाप नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)

इस्लामी शिकवणींच्या आधारे माणसाने स्वतः प्रेरित होऊन अपराधी कर्मांपासून दूर राहण्यासाठी होय. आपण अशा उपायांसंबंधी चर्चा करू या, जे इतरांतर्फे होणार्या संभावित गुन्हेगारींचे निर्मूलन करतात. निश्चितच माणूस हा स्वतःही अपराध करतो आणि इतरांकडून होणार्या गुन्हेगारींचेही भोग भोगतो. या दोन्ही स्वरुपांच्या समस्यांचे समाधान झाले तरच खर्या अर्थाने गुन्हेगारीचे पूर्णतः निर्मूलन शक्य आहे. म्हणजेच माणसाने स्वतःही अपराध करू नये आणि इतरांनाही अशी संधी उपलब्ध होऊ देऊ नये. या ठिकाणी प्रत्यक्ष इस्लामी कायद्याने दिलेल्या गुन्हेगारी निर्मूलनाचे उपाय आपण पाहणार आहोत.
आक्रमक हल्ल्यापासून बचावाचे उपाय
जणू हा काळच आक्रमक हल्ले आणि रक्तपाताचा दिसतो. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रश्न असा आहे की एखादा गुन्हेगार हा अतिरेकी पद्धतीचा अवलंब का करतो? इतरांच्या रक्ताची आणि प्राणाची त्याच्याकडे काहीच किंमत नसावी काय? याचे एक मूळ कारण द्वेष, वैरभाव, क्रोधाग्नी, ईर्ष्यालूवृत्ती व मत्सर असल्याचे दिसते. या अतिरेकी भावनांचे मूळ विभिन्न प्रकारच्या सामाजिक आणि मानसिक समस्यांत दडलेले आहे. याच समस्यांतून या भावना जन्मास येतात. म्हणूनच इस्लामने अशी प्रेरणाद दिली आहे की, माणसाने स्वतःहून अशा अपराधी कर्मांपासून दूर राहावे. त्याचप्रमाणे क्रोध, क्षोभ, हेवा, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, वैरभावासारख्या भावना इतरांतही निर्माण करणारी परिस्थिती उद्भवू न देण्याचे उपायसुद्धा योजले आहेत.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की, ‘‘तुम्ही श्रद्धावंत(अर्थात सच्चे मुस्लिम) होऊ शकत नाहीत, जोपर्यंत(मानवजातीप्रति) प्रेम आणि स्नेहाची भावना ठेवत नाहीत. तुम्हाला असा उपाय दाखवू का, ज्यामुळे आपसात प्रेम व स्नेहाची भावना निर्माण होईल?‘‘
‘‘होय! अवश्य दाखवा!‘‘ अनुयायांनी म्हटले.
‘‘तर तुम्ही आपसात एक दुसर्यांना ‘सलाम‘(शुभ चिंतनाची प्रार्थना) करा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
सलाम करणे म्हणजे आपल्या मानवबंधुविषयी ईश्वरदरबारी शांती व सुरक्षेची प्रार्थना करणे होय. त्याचप्रमाणे याचा अर्थ असाही होतो की ज्याला तुम्ही सलाम करता, त्याच्याविषयी तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा वैरभाव नसल्याचे जणू प्रमाणपत्रच आहे. म्हणजेच दोघेही एकमेकांचे हितचिंतक आहेत. बर्याच वेळा प्रेषित मुहम्मद(स.) यांनी सलाम करण्याबरोबरच एकदुसर्यांना भोजन देण्याची, भेटवस्तु देण्याचीसुद्धा शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा माणसातील स्नेहसंबंध वाढीस लागतात, मनातील मळ नाहीसा होतो. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुका प्रत्येकाकडून होतच असतात. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी आपल्या मानवबंधुच्या चुका माफ करून उदारपूर्ण वर्तन करण्याचीही शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा द्वेश, मत्सर, हेवा आणि वैरभावाने प्रदूषित झालले वातावरण निवळते.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी, मौत्ता)
कधीकधी माणूस अशी चूक करून बसतो की ती सहसा कोणी माफ करायला तयार होत नाही. म्हणूनच इस्लामने माणसाला संयम आणि धीर राखण्याची शिकवण दिली. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयमाबरोबरच न्यायपूर्ण वर्तनाचीसुद्धा शिकवण दिली. त्यांनी म्हटले की,
‘‘तुम्ही एखाद्यावर प्रेम करताना इतकेही भावूक होता कामा नये की सत्य आणि न्यायाचे भान हरवून बसावे. त्याचप्रमाणे तुमचा क्रोध इतका अविवेकी असू नये की तुम्ही एखाद्यास त्याच्या अपराधापेक्षाही जास्त शिक्षा द्यावी.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
अर्थातच या दोन ओळींमध्ये प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयम आणि धैर्याची परिपूर्ण व्याख्या मानवजगतासमोर मांडली.
अतिरेकी भावनांचे एक मोठे कारण शोषण आणि मानवाधिकारांची पायमल्ली आहे. म्हणूनच मामसाला असे वाटत असेल की आपणाला इतरांपासून त्रास होऊ नये, इतरांच्या अतिरेकास आपण बळी पडू नये तर यासाठी त्याने इतरांचे वैध अधिकार देऊन टाकावे. इतरांचे अधिकार पूर्ण करणे म्हणजे काही इतरांवर उपकार करणे नव्हे. ते सानंद पूर्ण करावेत आणि इतरांचे शोषण करू नये. म्हणजेच आपण इतरांकडून सुरक्षित राहू शकतो.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्या पुरुषाने आणि त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीने आपल्या वयाची साठ वर्षे अल्लाहच्या  उपासनेत व्यतीत केली, मग त्यांच्या मृत्यूची घटिका जवळ येते तेव्हा मृत्यूपत्राद्वारे वारसांना नुकसान होत असेल तर त्या दोघांकरिता नरक निश्चित होते.’’ त्यानंतर हदीसचे  कथनकार अबू हुरैरा (रजि.) यांनी हदीसच्या समर्थनार्थ या आयतचे पठण केले, ‘मिम्बअदि वसिय्यतिन’ पासून ‘ज़ालिकल फ़ौजुल अ़जीम’पर्यंत. (हदीस : मुसनद अहमद)

स्पष्टीकरण
सदाचारी मनुष्यदेखील आपल्या नातेवाईकांवर नाराज होतो आणि त्याला वाटू लागते की संपत्तीपैकी त्याच्या नातेवाईकांना काहीही मिळू नये. त्याच्या मृत्यूसमयी संपूर्ण संपत्तीमधून  एकाही नातेवाईकाला काहीही प्राप्त होऊ नये असे मृत्यूपत्र तयार करून घेतो. खरे तर अल्लाहचा ग्रंथ आणि पैगंबरांनी सांगितलेल्या उपदेशानुसार त्या नातेवाईकांना संपत्तीमधून त्यांचा  वाटा मिळायला हवा होता. अशाप्रकारच्या पुरुष आणि स्त्रीबाबत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते साठ वर्षांपर्यंत अल्लाहची उपासना करूनदेखील शेवटी नरकावासी बनतात.’’

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांनी हदीसच्या कथनाच्या समर्थनार्थ ज्या आयतीचे पठण केले ती ‘सूरह निसा’च्या दुसऱ्या रुकूमध्ये आहे. यात अल्लाहने नातेवाईकांचा वाटा निश्चित  केल्यानंतर सांगितले, ‘‘हे वाटे मयत व्यक्तीच्या मूत्यूपत्रानुसार संपत्तीचे वाटप आणि कर्जफेड केल्यानंतर वारसांना देण्यात येतील.’’ त्यानंतर अल्लाह म्हणतो, ‘‘खबरदार! मृत्यूपत्र  करून वारसांना नुकसान पोहोचवू नका, हा अल्लाहचा आदेश आहे आणि अल्लाह ज्ञान व बुद्धी बाळगतो. त्याने बनविलेला हा कायदा चुकीचा नसून ज्ञानावर आधारित आहे आणि त्यात  बुद्धिमत्ता कार्यरत आहे. अन्याय व अत्याचाराचा थांगपत्ताही नाही, म्हणूनच हा कायदा मन:पूर्वक मान्य करा.’’ यानंतर अल्लाह म्हणतो, ‘‘या अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादा आहेत  आणि जे लोक अल्लाह व पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकतील त्यांना अल्लाह अशा नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल करील ज्याच्या खालून झरे वाहत असतील आणि ज्यात ते निरंतर  वास्तव्य करतील आणि हीच मोठी सफलता आहे आणि जे लोक अल्लाह आणि पैगंबरांची अवज्ञा करतील आणि अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन करतील त्यांना नरकात  दाखल करील, ज्यात ते कायमस्वरूपी राहतील आणि त्यांच्यासाठी अपमानित करणारी शिक्षा असेल.’’ माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,  ‘‘जो आपल्या वारसाला संपत्तीपासून वंचित करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला स्वर्गाच्या संपत्तीपासून वंचित करील.’’ (हदीस : इब्ने माजा)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कोणा एका वारसाच्या नावे करण्यात आलेले मृत्यूपत्र दुसऱ्या वारसांच्या इच्छेविरूद्ध जारी होणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय सअद बिन  अबू वक्कास (रजि.) यांच्या कथनानुसार, मी आजारी होतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मला पाहण्यासाठी आले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही मृत्यूपत्र केले आहे काय?’’  मी म्हटले, ‘‘होय!’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘किती संपत्तीचे मृत्यूपत्र केले आहे?’’ मी म्हणालो, ‘‘अल्लाहच्या मार्गात मी आपल्या संपूर्ण संपत्तीचे मृत्यूपत्र केले आहे.’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘मग तुम्ही आपल्या मुलांसाठी काय ठेवले आहे?’’ मी म्हणालो, ‘‘ते श्रीमंत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘नाही! असे करू नका. अल्लाहच्या मार्गात  आपल्या संपत्तीच्या दहाव्या भागाचे मृत्यूपत्र करा.’’ सअद बिन अबू वक्कास (रजि.) म्हणतात की मी एकसारखे सांगत होतो की हे पैगंबर! हे खूपच कमी आहे, त्यात आणखी वाढ  करावी.’’ शेवटी पैगंबर म्हणाले, ‘‘बरे! आपल्या संपत्तीच्या एक तृतियांश भागाचे मृत्यूपत्र करा आणि हे खूप आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)

Book
भांडवलवादी साम्राज्याजवळ स्त्रियांच्या शोषणाचे आणखी एक क्षेत्र, सौंदर्य वाढविणारे उत्पादन आणि फॅशन आहे़ यामुळे जगभराच्या भांडवलदारांना दरवर्षी 19 अब्ज डॉलरचा नफा होतो़ यासाठी ते जुलूम, अत्याचार, छल-कपटाच्या सर्व मार्गांचा उपयोग करतात़  सौंदर्य स्पर्धा, फॅशन परेड, ख्यातनाम व्यक्तींची संस्कृती, इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन क्रमांकाचे पृष्ठ (पेज 3), स्त्रियांची असंख्य नियतकालिके, टी़व्ही़शोज्, रियालिटी) शोज् इत्यादी त्या चलाखीचे लबाडीचे काही प्रकार आहेत़ वर्तमानपत्र आणि टी़व्ही़ वरील जाहिरातींतील एक मोठा भाग या फायदेशीर उद्योगाला समर्पित असतो़ या फसवाफसवीने भरलेल्या खेळास बळी पडून स्त्रिया आपले आरोग्य, शांती आणि समाधान या सर्वांचा नाश करतात़ प्रसिद्ध मानसशास्त्रीय नियतकालिक ‘सायकॉलॉजी टूडे’ ने एक मानसिक रोग ‘बॉडी मानिया’ची ओळख केली आहे़ या रोगाला स्त्रिया बळी पडत आहेत़ ज्या (स्त्रिया) आपल्याला सुंदर बनविण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होतात़
     भांडवलदारवर्ग सर्वप्रथम सौंदर्य स्पर्धा, प्रख्यात व्यक्ती आणि ‘पेज थ्री’ मार्फत काही सुंदर स्त्रियांना मॉडेलच्या स्वरूपात प्रस्तुत करून जगभराच्या तरूण स्त्रियांना, त्यांच्यासारखे बनण्याचे वेड आणि उन्माद निर्माण करतो़ हे वेड भांडवलदार वर्गाची सर्वांत मोठी कार्यसिद्धी असते़ या वेडाच्या आधारावर भांडवलदारांच्या अब्जावधी डॉलरच्या उद्योगाची भांडवलवादी इमारत उभी राहते़ सुरूवातीला स्पष्ट स्वरूपात हानिकारक असल्याची जाणीव न होणारे क्रीमस्, जेली इत्यादी सौंदर्य वाढविणारी उत्पादने होत़ असंख्य प्रकारचे लोशन, तेल, क्रीम, पावडर, लिपीस्टिक, फाउंडेशन्स, पॉलिश, शॅम्पू, डी़ओ़, कन्डीशनर, वॅक्स इत्यादी उत्पादने स्त्रियांना विकली जातात़ फक्त अमेरिकेमध्ये 8 अब्ज डॉलरच्या कॉस्मेटिक्सची (सौंदर्य प्रसाधने) विक्री होते़ या रकमेच्या तीन चतुर्थांश भागाद्वारे (6 अब्ज डॉलर) जगातल्या सर्व अशिक्षित लोकांना शिक्षण देण्याची व्यवस्था करता येऊ शकते़ ही सौंदर्य प्रसाधने बनविणार्‍या भांडवलदारांना स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्या प्राणांची असुरक्षितता यांच्याशी काही देणे घेणे नसते़
    अमेरिकेहून येणार्‍या वस्तूंची कोणतीही परीक्षा किंवा तपास न करता त्या आपल्या देशात स्वीकारल्या जातात़ अमेरिकेमध्ये सौंदर्यप्रसाधनांची परीक्षा करण्याचे आणि त्यांचा आरोग्यावर होणार्‍या प्रभावाचा शोध घेण्याचे कोणतेही तंत्र अस्तित्वात नाही़ फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जी औषधांची परीक्षा व तपास करते तिच्या कार्यक्षेत्रात ही उत्पादने (सौंदर्य प्रसाधने) येत नाहीत आणि त्यांची परीक्षा आणि तपास करण्याची कोणतीही वैकल्पिक व्यवस्था नाही़
    अमेरिकेचीच एक संस्था इ़डब्ल्यू़ जी़ च्या अहवालानुसार या सौंदर्यप्रसाधनांमध्ये कित्येक विषारी घटक असतात़ एवढेच नसून कॅन्सर निर्माण करणारे रासायनिक पदार्थसुद्धा त्यात आढळले आहेत़
     या संस्थेने अमेरिकेच्या निरनिराळ्या शहरांतील तरूण मुलीचे सर्वेक्षण केले, त्यानुसार त्या मुलींच्या रक्तात आणि लघवीमध्ये सौंदर्यप्रसाधनात उपयोग केले जाणारे विषारी रासायनिक घटक (मस्कस, पॅराबेन्स, ट्रिकलोसन, पॅथालेटस) असून या घटकामुळे कॅन्सर होतो, तसेच हार्मोन्समधील बदल असे गंभीर रोग निर्माण करतात़ या मुली दररोज सरासरीने 17 सौंदर्य प्रसाधने वापरत असत. त्यांच्या शरिरात हार्मोन्स परिवर्तन करणारे सरासरी 13 रासायनिक घटक आढळून आले आहेत़ हे रासायनिक घटक, तारूण्यात हार्मोन्समध्ये परिवर्तन, मानसिक आरोग्य, जननक्षमता, हाडे वाढणे यासारख्या बाबींवर प्रभाव पडतो़
अमेरिकेच्याच एका दुसर्‍या संस्थेने ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी हानिकारक रासायनिक घटकांनी बनलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा एक डेटाबेस तयार केला आहे़ या डेटाबेसमध्ये ज्या कंपन्यांची नावे आहेत त्यात ले ऑरेल, प्रॉक्टेट अँड गॅम्बल, कॉम्बी आयएनसी इ. यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे, त्यांची उत्पादने आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर विकली जातात़

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget