Latest Post

हजरत अली बिन अबु तालीब यांचा जन्म इ.स.599/600 मध्ये झाला. त्यांच्या आई हजरत फातेमा ह्या काबागृहाचा तवाफ करत असतांनाच त्यांची प्रसुती झाली व त्यांनी एका बाळाला जन्म दिला. काबागृह म्हणजे अल्लाहचे घर व अल्लाहच्या घरी जन्मलेल्या बाळाचे नाव अल्लाहची सातत्याने आठवण देणारे असावे, यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्या बाळाचे नाव अली ठेवले. ज्याचा शब्दकोशीय अर्थ उदार / उदात्त असा होतो.
    अबु तालीब हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वडील अब्दुल्लाह यांचे सख्खे भाऊ होते व अब्दुल्लाह हे प्रेषित सल्ल. यांच्या जन्माअगोदरच वारल्याने अबु तालीब यांनीच प्रेषित (सल्ल)यांचा प्रतीपाळ केला होता. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. आणि अली रजि. हे चुलतभाऊ होत. हजरत अली रजि. हे प्रेषित सल्ल. पेक्षा 30 वर्षांनी धाकटे होते. मात्र इस्लाम स्वीकारण्यामध्ये जगात त्यांचा चौथा तर मुलात पहिला क्रमांक होता. इस्लाम स्विकारतांना ते अवघे 8 वर्षांचे होते. हजरत अली हे प्रेषित सल्ल. यांचे विश्‍वासू साथीदार व जावाई होते. प्रेषित सल्ल. यांच्या कन्या फातीमा ह्या त्यांच्या सुविद्य पत्नी होत. प्रेषित सल्ल. यांचा त्यांच्यावर एवढा विश्‍वास होता की, मदीनाला हिजरत करताना आपल्या स्थानी त्यांनी अंथरूनावर हजरत अली रजि. यांना झोपविले होते.

हजरत अली रजि. यांचे शौर्य
    शौर्याच्या बाबतीत हजरत अली रजि. व हजरत खालीद इब्ने वलीद रजि. हे इस्लामी इतिहासात सुप्रसिद्ध आहेत. त्यातही हजरत अली रजि. यांचे शौर्य अतुलनीय असे होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण अशी दुधारी तलवार होती, जिचे नाव ’जुल्फेखार’ होते. त्या तलवारीपुढे भले-भले गुडघे टेकत. आजकाल प्रसिद्धीच्या झोतात असलेली तुर्की मालिका अर्तुर्गुल गाजी मधील प्रमुख पात्र असलेल्या नायकाच्या तोंडी जो संवाद आहे, त्याबाबतीत अशी अख्यायिका आहे की, ह. अली रजि. संबंधी तो संवाद जन्नतमधील फरिश्ते एकमेकांना बोलताना करत. तो संवाद म्हणजे, ’हजरत अलीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि जुल्फेखारपेक्षा चांगली तलवार कोणतीच नाही’ याच तलवारीने हजरत अली यांनी इ.स.624 मध्ये बदरच्या युद्धात कुरैशच्या 30 लोकांना कंठस्थान घातले होते. त्यांच्या या शौर्यामुळेच प्रेषित सल्ल. यांनी त्यांना ’हैदर’ (न हरनारा) ही पदवी प्रदान केली होती. मुस्लिमांच्या सोबत राहून मुस्लिमांविरूद्धच कागाळ्या करणार्‍या मदिना येथील ज्यूंच्या दोन टोळ्या बनू कैनुका यांना इ.स. 625 व बनू कुरैजा यांना 626 मध्ये मदिनाबाहेर घालविण्याची कामगिरीही हजरत अली रजि. यांचीच.
    इ.स.625 मध्ये झालेल्या ओहदच्या लढाईत जरी मुस्लिमांना यश आले नव्हते तरी एकट्या अली रजि. यांनी आपल्या झुल्फेखारने 200 कुरैशींचा खात्मा केला होता. हे ऐतिहासिक सत्य अनेक इतिहासकारांनी मान्य केलेले आहे. त्या दरम्यान त्यांच्या शरीरावर 16 जखमा झाल्या होत्या. मदिनातून पिटाळून लावलेल्या ज्यूंनी खैबरमध्ये वस्ती करून तेथील भक्कम असा किल्ला ताब्यात घेऊन मुस्लिमांविरूद्ध पुन्हा कागाळ्या सुरू केल्या होत्या. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्या किल्ल्याचा पाडाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. हजरत अबुबकर रजि. व हजरत उमर रजि. यांनासुद्धा तो किल्ला सर करण्याच्या मोहिमेवर पाठविले होते. पण त्यांनाही तो किल्ला सर करता आली नाही. उलट अनेक बिनीचे शिलेदार त्या मोहिमांमध्ये मृत्युमुखी पडले होते. शेवटी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना या मोहिमेसाठी बोलाविलेे. त्यावेळी त्यांची तब्येत ठीक नव्हती. दोन्ही डोळे सुजून लाल झाले होते. अंगात ताप होता. तशाही परिस्थितीत ते हजर झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांची स्थिती पाहून आपल्या तोंड्यातील लाळ त्यांच्या डोळ्यांत लावली आणि मोहिमेवर रवाना केले. हजरत अली रजि. यांचे डोळे बरे झाले व ते मोहिमेवर रवाना झाले. त्यांनी संपूर्ण ताकदीशी खैबरवर हल्ला चढविला. अनेक धडका देऊन खैबरचे मुख्य दारच उखडून टाकले. यात अली रजि. यांनी तीन पराक्रमी ज्यूंना आपल्या जुल्फेखारने कंठस्थान घातले. येणेप्रमाणे खैबर किंण्याची अशक्यप्राय कामगिरी त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे खैबर जवळील ’फिदक’ येथील सुपीक जमीन लढाई न करता अली रजि. यांच्या ताब्यात आली. लढाई न करता किंल्यामुळे ही जमीन शरीयतच्या नियमाप्रमाणे प्रेषित सल्ल. यांची मालमत्ता बनली.
    इ.स.630 मध्ये मक्का विजयानंतर काबागृहात ज्या 360 मुर्त्या होत्या त्या फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांची मदत घेतली होती. उंचस्थानी विराजमान मुर्त्यांना तोडण्यासाठी विशेषत: हुबल नावाची मुर्ती फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना आपल्या खांद्यावर उभे करून ती मूर्ती फोडून टाकली होती. इतिहासामध्ये प्रेषितांच्या खांद्यावर पाय ठेवण्याचे सौभाग्य फक्त दोन लोकांच्या वाट्याला आले आहे. उपरोक्त प्रसंगी हजरत अली रजि. यांच्या वाट्याला व काबागृह किंल्यानंतर काबागृहाच्या वर चढून अजान देण्यासाठी हजरत बिलाल यांना आपल्या खांद्यावर पाय ठेऊन वर चढण्याचा आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी चढून काबागृहावर उभे राहून अजान दिली होती. इ.स.631 पर्यंत अरबस्थानातील बहुतेक लोकांनी इस्लाम स्विकारलेला होता. न स्विकारणारे जे मुठभर लोक होते त्यांना त्या पवित्र भूमीतून निघून जाण्याचा आदेश कुरआनमध्ये आला होता. ते घोषणापत्र वाचण्याची जबाबदारीही हजरत अली रजि. यांनी पूर्ण केली होती.

हजरत अली रजि. व प्रेषित सल्ल. यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड
    इ.स. 632 मध्ये हज आटोपून मदिनेला परत येतांना खुम-ए-़गदीर येथे प्रेषित सल्ल. यांनी बोलताना सर्वांसमक्ष असे उद्गार काढले होते की, ”अली हे माझ्यासाठी तसे आहेत जसे हजरत हारून अलै. हे प्रेषित मुसा अलै. साठी होते. जो कोणी मला, ”मौला” (मार्गदर्शक) म्हणून स्विकारत आहे त्याने हजरत अली रजि. यांना सुद्धा, ” मौला” म्हणून स्विकारले पाहिजे. हे अल्लाह ! हजरत अलींच्या मित्राचा तू मित्र बन आणि शत्रूंचा शत्रू. ते ज्याला मदत करतील तू त्यांना मदत कर आणि जे त्यांना कमी लेखतील त्यांच्या आशा निष्फळ बनव”. प्रेषित सल्ल. यांच्या या म्हणण्यामुळे मुसलमानांमध्ये एक सामान्य विचार असा दृढ झाला होता की, हजरत अली रजि. हेच प्रेषित सल्ल. यांचे उत्तराधिकारी असतील. शिवाय ते प्रेषित सल्ल. यांचे जावाई असल्यामुळे व प्रेषितांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा दावा हा दावा नसून हक्क आहे, असाही लोकांचा समज होता. त्यातूनच प्रथम खलीफा म्हणून हजरत अबुबकर रजि. यांच्या निवडीला काही लोकांनी विरोध केला होता. नव्हे हजरत अबुबकर रजि. यांच्याविरूद्ध बंड करण्यासाठी उम्मैय्या कुळ गटातील अबु सुफियान सारख्या सरदारांनी हजरत अली रजि. यांना प्रोत्साहित केले होते. पण हजरत अली रजि. हे अत्यंत संयमी व्यक्तीमत्व होते. त्यांनी अशा सर्व सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर खलीफा पदाने तीन वेळेस हुलकावणी दिल्यावरही ते शांत राहिले. त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हजरत फातीमा रजि. यांचा ठाम विश्‍वास होता की जनता हीच त्यांना खलीफा म्हणून निवडेल. तीन्ही वेळेस खलीफा निवडताना हजरत अली रजि. यांचे नाव हे प्रामुख्याने विचारात घेतले गेले होते. तरी परंतु, खलीफा पदाने तीन्ही वेळेस त्यांना हुलकावणी दिली होती. तरी सुद्धा हजरत अली रजि. हे विचलित झालेले नव्हते. तिन्ही खलीफांनी त्यांचा उचित सन्मानसुद्धा राखला होता. पहिल्या दोन खलीफांनी तर त्यांना देशाचे प्रमुख काझी (न्यायाधिश) आणि प्रमुख सल्लागार म्हणून नेमले होते. तथापि, हजरत उस्मान रजि. यांनी त्यांचे काझी पद कायम ठेऊन सल्लागारपदी दुसर्‍याची नेमणूक केली होती.

चौथ्या खलीफा निवडीची प्रक्रिया
    हजरत उस्मान रजि. यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कुफा, बसरा आणि सिरीयाच्या दोन हजार मुस्लिमांनी मदिनामध्ये घुसून खलीफा उस्मान रजि. यांची हत्या करून मदिना शहर ताब्यात घेतले होते. मदिना मस्जिदीमधील सामुहिक प्रार्थनेचे नेतृत्वही तेच करू लागले. सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. लोक आपापल्या घरात बसून होते. त्यांचा सामना करता येत नसल्या कारणाने हजरत उस्मान रजि. यांचे नातलग उमय्यी लोक सिरीयातील अमीर मुआविया रजि. यांच्याकडे निघून गेले होते. अराजक माजल्यामुळे मदिना शहराबाहेरच्या टोळ्यांनी सुद्धा मदिनेत येऊन लुटमार करण्यास सुरूवात केली होती. त्यात पर्शियन व रोमन साम्राज्यातून आलेल्या गुलामांची संख्या मोठी होती. इस्लामी साम्राज्याला राज्यप्रमुखच उरला नव्हता. तीन दिवस झाले तरी खलीफाचे नाव जाहीर झालेले नव्हते. बंडखोरांना परत जावयाचे होते. हजरत अली रजि., हजरत तल्हा रजि. व हजरत जुबेर रजि. यांच्यापैकी एक त्यांना खलीफा म्हणून पाहिजे होता. कारण बंडखोरांमध्येही तीन गट होते. इजिप्तचे, कुफाचे आणि बसराचे तीन गट होते. कुफाच्या बंडखोरांना हजरत जुबेर रजि. तर बसराच्या बंडखोरांना हजरत तल्हा रजि. हवे होते. मात्र इजिप्तच्या बंडखोरांना हजरत अली रजि. हवे होते. चौथ्या दिवशी बंडखोरांचा नेता मलिक बिन अश्तर याने खलीफा निवडीच्या प्रक्रियेची सुत्रे आपल्या हातात घेतली. हजरत अली रजि. यांना त्याने राजकीयदृष्ट्या तुम्हीच खलीफा होणे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हजरत अली रजि. यांनी स्पष्टपणे नकार दिला. शेवटी पाचव्या दिवशी मलिक बिन अश्तर याने मदिनातील लोकांना मस्जिद-ए-नबवीमध्ये बोलावून खलीफा निवडा नसता अधिक रक्तपात होईल व त्यात तुमच्या सरदारांना उदा. हजरत अली, हजरत तल्हा, हजरत जुबेर रजि. सह अनेक प्रतिष्ठांना ठार केले जाईल, अशी धमकी दिली. तेव्हा लोकांनी मस्जिद-ए-नबवीमध्ये जमा होऊन अली रजि. यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्यांच्या नावाच्या जयघोष ऐकूण हजरत अली रजि. हे स्वत: मस्जिद-ए-नबवीमध्ये हजर राहिले. हजर लोकांपैकी सर्वांनी त्यांना खलीफा म्हणून जबाबदारी उचलण्याची गळ घातली. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”मला क्षमा करा, जर तुम्ही अन्य व्यक्तीला खलीफा म्हणून निवडले तर. एकनिष्ठ नागरिक म्हणून मी त्यांच्या आज्ञा पाळण्यास बांधिल आहे. पण जर तुम्हाला मीच हवा असेल तर मी अधीच सांगून ठेवतो की, मी कोणाचे ऐकणार नाही. अल्लाहच्या ग्रंथानुसार व माझ्या न्याय बुद्धीनुसार प्रशासन करेन. सर्वांनी ही अट मान्य केली. तेव्हा हजरत अली रजि. यांनी खलीफा बनण्यास होकार दिला.
हजरत उस्मान रजि. यांच्या हत्येनंतर सातव्या दिवशी म्हणजे 24 जून 656 रोजी हजरत अली रजि. यांनी सार्वजनिक रित्या झालेल्या एका कार्यक्रमात खलीफा म्हणून सुत्रे स्विकारली. शपथविधी पार पडल्यानंतर हजरत अली रजि. यांनी सर्वांना उद्देशून जे छोटेखानी भाषण केले ते खालीलप्रमाणे - ,” अल्लाहने आपल्याला एक असा ग्रंथ दिलेला आहे की, ज्यात लोकांना मार्गदर्शन व सर्व चांगला व वाईट गोष्टींबद्दल सांगितलेले आहे. अल्लाहने बेकायदेशीर गोष्टी कोणत्या आहेत, हे ही त्यात नमूद केलेले आहे. त्यांच्यापैकी सर्वात मोठी बेकायदेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिमांचे रक्त सांडणे ही होय. अल्लाहने मुस्लिमांना बंधू म्हणून राहण्याचा आदेश दिलेला आहे. मुस्लिम तोच होय जो की इतर मुस्लिमांना हाताने व जिभेने हानी पोहोचवत नाही. अल्लाहच्या आज्ञा पाळा. (संदर्भ : चार आदर्श खलीफा, शेषेराव मोरे, पान क्र. 485. )

- एम.आय.शेख

Madina
पूर्ण विश्व स्वयं अल्लाहने निर्माण केले, त्यानेच याची रचना केली. तोच एकटा या समस्त विश्वाचा स्वामी आहे. त्याच्याच मर्जी व आदेशाने समस्त कार्य सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरू आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू ज्या कार्यासाठी तयार करण्यात आली ते कार्य ती करीत आहे. प्रत्येक वस्तूचे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत. त्या ठराविक नियमांचे पालन प्रत्येक वस्तू विनातक्रार करीत आहे. पाणी वाहण्याचे, त्याचे बाष्पीभवन होण्याचे, बर्फ बनण्याचे विशेष नियम ठरवून देण्यात आले आहेत ते या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचे, ग्रह आणि नक्षत्रांचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांचे किंचितही उल्लंघन कोणी करू शकत नाही. या नियमांबाहेर तसूभरही सरकण्याचे कोणातही सामर्थ्य नाही. आकाशातून पर्जन्यवृष्टी होते, जमिनीतून फळे, फुले आणि धान्य मिळते. मात्र ही समस्त वनस्पती-सृष्टी स्वत:च्या मर्जीने काहीही करू शकत नाही. अर्थातच या विश्वातली प्रत्येक निर्मिती ज्या कामासाठी तयार करण्यात आलेली आहे ती तेच नेमून दिलेले काम नेमून दिलेल्या नियमानुसार सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पाडीत आहे. विश्वातील सर्वच वस्तू ज्याप्रमाणे अल्लाहची निर्मिती आहेत, त्याचप्रमाणे मानवदेखील अल्लाहची निर्मिती आहे, उत्कृष्ट रचना आहे. मानवाची निर्मिती, त्याचे जीवित राहणे, मरणे वगैरे सर्वकाही निश्चित करून देण्यात आले आहे. याच नेमून दिलेल्या कायद्यानुसार जन्मापासून अर्थात मातेच्या गर्भातील निर्मितीपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्य मानवाकडून होत असते. मानवसुद्धा या नियमांचे तसूभरही उल्लंघन करू शकत नाही. जन्माचे जे नियम आहेत, त्याच नियमानुसार तो जन्म घेऊ शकतो.डोळ्यांनी ऐकण्याचे, कानांनी बोलण्याचे, पायांनी खाण्याचे, तोंडाने चालण्याचे काम करू शकत नाही. तो निश्चितच आपले पूर्ण कार्य अल्लाहने नेमून दिलेल्या निसर्ग-नियमांनुसार करू शकतो. या नियमांच्या किंचितही बाहेर जाऊ शकत नाही.
मानवाचा आणखीन एक पैलू आहे आणि तो असा की मानवाचा दर्जा आणखीन इतर वस्तूंपेक्षा विशेष आहे. मानव हा या सृष्टीची विशेष निर्मिती आहे. अल्लाहने इतर निर्मितींना प्रदान न केलेले विवेकसामर्थ्य आणि बुद्धी केवळ मानवालाच प्रदान केली आणि याबरोबरच त्याला कार्यस्वातंत्र्य प्रदान केले, विचारस्वातंत्र्य प्रदान केले, भूमिकास्वातंत्र्य प्रदान केले. चांगला आणि वाईट या दोन्ही मार्गांपैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. ईशप्रदत्त शक्ती व सामर्थ्यचा चांगल्या आणि वाईट या दोन्ही पद्धतीने वापर करू शकतो. अशाप्रकारे अल्लाहने मानवास एका पैलूने कार्यस्वातंत्र्य दिले.
अल्लाहने मानवास जे कार्यस्वातंत्र्य दिले आहे, त्याचा वापर कसा करावा हा एक सर्वांत मूळ प्रश्न आहे. कारण याच स्वातंत्र्याचा वापर करण्यावर त्याच्या जीवनाचे यश आणि अपयश अवलंबून आहे. याच आधारावर जगाच्या व्यवस्थेचा सुधार आणि बिघाड अवलंबून आहे. तुम्ही कदाचित असेही म्हणू शकता की मानवास जे विवेकसामर्थ्य अल्लाहने प्रदान केलेले आहे, त्याचा वापर करून तो आपल्या कार्यस्वातंत्र्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. मात्र तुम्हाला हेदेखील स्वीकारावे लागेल की मानवाचे विवेकसामर्थ्यसुद्धा मर्यादित स्वरूपाचे आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीची विवेकशक्ती भिन्न असून तो आज घेतलेला निर्णय तीच व्यक्ती उद्या आपल्या अनुभवाच्या आधारावर आपला निर्णय बदलते. घेतलेला निर्णय आजच्या अनुभवाच्या आधारावर चुकीचा ठरविते. एकजण जो निर्णय योग्य ठरवितो, तोच निर्णय दुसराजण चुकीचा ठरवितो. भूतकाळातील घेण्यात आलेले निर्णय ज्याप्रमाणे आज आपण चुकीचे ठरवितो त्याचप्रमाणे आज आपण घेतलेला आणि योग्य वाटणारा निर्णय उद्या येणारी पिढी चुकीचा व अयोग्य ठरवू शकते. यावरून हेच सिद्ध होते की मानव हा केवळ आपल्या स्वत:च्या विवेकसामर्थ्यच्या आधारावर आपला जीवनमार्ग निश्चित करू शकत नाही. त्याला निश्चितच बिनचूक आणि कोणत्याहीत्रुटीपासून मुक्त असलेल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा प्रकारचे परिपूर्ण आणि बिनचूक मार्गदर्शन, जे माणसाच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातही योग्य असावे, प्रत्येक वृत्तीच्या आणि भिन्न स्वभावाच्या व्यक्तीसाठी योग्य ठरावे.
आपण पाहतो की मानवास हे जीवन जगण्यासाठी असंख्य बाबींची आवश्यकता असते. श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, पोषाख, निवारा आणि इतर बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्याचप्रमाणे मानव हा या सृष्टीत जन्मला असून त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त गरजांची मोठ्या कौशल्याने निर्मिती करून देण्यात आलेली आहे. हवा, अन्न, पाणी, निवारा, स्वारी, कपडालत्ता आणि यासारख्या ना-ना वस्तू पुरविण्यासाठी पूर्णपणे प्रबंध अल्लाहने करून ठेवले आहेत. याचाच अर्थ असा की अल्लाहने मानवाची निर्मिती केली, जीवन प्रदान केले आणि त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त वस्तुंची योग्य प्रकारे व्यवस्था केली. म्हणजेच मानवास जीवन व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शनाचीसुद्धा गरज आहे. आपले स्वातंत्र्य, आपली शक्ती आणि सामर्थ्यचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन त्यास नितांत आवश्यक आहे. कारण मार्गदर्शनाशिवाय मानव आपल्या स्वातंत्र्य, शक्ती आणि सामर्थ्यचा गैरवापर करू शकतो आणि अशा प्रकारे त्याचे जीवन विध्वंसाच्या मार्गावर जाऊ शकते. अर्थातच जीवन जगण्यासाठी भौतिक पदार्थ, अन्न, पाणी, निवारा वगैरेची ज्याप्रमाणे गरज आहे अगदी त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शनाचीसुद्धा मानवास नितांत गरज आहे. परमदयाळू आणि कृपाळू अल्लाहने मानवास जगण्याकरिता अन्न, पाणी, हवा आणि इतर वस्तूंची ज्याप्रमाणे पूर्णत: व्यवस्था केली, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या मार्गदर्शनासाठीदेखील पूर्ण व्यवस्था केली आहे आणि यात नवल वाटण्यासारखेसुद्धा काहीही नाही. कारण हे तर मुळीच शक्य नाही की जो अल्लाह भावनांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या विश्वात मातीच्या प्रचंड विशाल ग्रह-तारे, समुद्र, हवा, चंद्र व सूर्याला कामाला लावून अन्न, पाणी, निवारा आणि यासारख्या ना-ना अद्भूत वस्तूंची निर्मिती केली, तो दयाळू आणि कृपाळू अल्लाह मानवाच्या मार्गदर्शनाची गरज पूर्ण करणार नाही.
मानव इतिहास आपल्या समोर आहे. देश आणि राष्ट्रांत मानवास जीवन जगण्यासाठी काही असे कायदे आहेत ज्याविषयी असा दावा करण्यात येतो की हे अल्लाहचे कायदे आहेत. प्रत्येक राष्ट्रात असे बरेचजण होऊन गेले ज्यांचा असा दावा होता की त्यांच्याकडे मानवाच्या योग्य मार्गदर्शनासाठी ईशसंदेश आहे. या महामानवांनी प्रत्येक काळात हे दाखविले की अल्लाहची मर्जी काय आहे आणि त्याने मानवास जे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले आहेत, त्यांचा वापर कशा पद्धतीने व्हावा. या महामानवांनी प्रत्येक काळात सांगितले आहे की चांगले काय आहे नि वाईट काय आहे, सत्य काय आहे नि असत्य काय आहे, पुण्य काय आहे नि पाप काय आहे. ही वेगळी गोष्ट आहे की या बाबतीत बऱ्याच लोकांकडून मूळ सत्य अस्पष्ट होत गेले. उदा.- (१) काही लोकांनी या महामानवाच्या मूळ शिकवणीत इतर काहीजणांच्या शिकवणी समाविष्ट केल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या आज मूळ शिकवणींना भेसळमुक्त करणे अशक्य होऊन बसले. (२) बऱ्याच लोकांनी या महामानवांच्या मूळ चारित्र्यास कथा-दंतकथा आणि साहित्याचा मुलामा दिला. यामुळे आज हे जाणून घेणे अशक्य झाले की कोणत्या महामानवाची शिकवण कोणती आहे. (३) काहीजणांनी या महामानवांना मानव म्हणून न स्वीकारता अल्लाहच्याच स्थानावर स्थानापन्न करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचजणांना भ्रम झाला की साक्षात ईश्वरच मानवाचा अवतार घेऊन पृथ्वीवर अवतरला आणि या जगातून असत्य व अन्यायाचा नाश केला. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहचे मानवरूपात प्रकट होणे हे कोणत्याही प्रकारे शोभणीय नसून तो आपल्या काही नेक भक्तांना मानवाचे मार्गदर्शन करण्यासाठी निवडतो.
ज्या नेक भक्तींची अल्लाहने मानवजातीस सत्यमार्ग दाखविण्याकरिता निवड केली, त्यांनाच मुळात पैगंबर असे म्हणतात. अल्लाह त्यांना प्रत्येक दुराचारापासून मुक्त ठेवतो. त्यांना आपला संदेश देतो जेणेकरून अल्लाहचा हा संदेश त्यांनी मानवजातीपर्यंत पोचवावा. जी व्यक्ती अल्लाहवर तर श्रद्धा ठेवते आणि मान्य करीत नसेल की अल्लाहकडून काहीजण धर्ममार्ग, सत्यमार्ग अथवा न्यायाचा मार्ग दाखविण्यासाठी पैगंबर पाठविण्यात आले, तर तो त्याला मान्य असलेल्या धार्मिक शिकवणी वा ईशमार्गदर्शन हे अल्लाहकडूनच प्राप्त असण्याचा दावा कशाच्या आधारे करू शकतो? पैगंबर हे तर अल्लाह आणि त्याचे दास अर्थात मानवजात या दोहोंदरम्यान एक दुवा आहे. अर्थात असा प्रामाणिक पुण्यकर्मी माणूस जो अल्लाहचा संदेश मानवजातीपर्यंत पोचवितो यालाच पैगंबर अथवा पैगंबर असे म्हणतात.

लेखक
मुहम्मद जैनुल आबिदीन मन्सुरी
डॉ. मुहम्मद अहमद
डॉ. सय्यद शाहिद अली

अनुवादक
सय्यद जाकिर अली

मानवासमोर असे काही प्रश्न आहेत, ज्यांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे मिळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- जीवन काय आहे? जीवनाचा दााष्टा कोण आहे? आपल्याकडून त्यास  काय अभिप्रेत आहे? त्याने आपल्याला हे जीवन कशासाठी दिले? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू हाच जीवनाचा अंत आहे काय? की मृत्यूनंतरही जीवन आहे? जर जीवन आहे तर यात सफल  होण्याचा कोणता मार्ग आहे? अथवा या पारलौकिक जीवनात यश मिळविण्यासाठी या ऐहिक जीवनात काय करावे लागेल?
वाचकगणांस पुस्तकाच्या अध्ययनामुळे जीवनाच्या या मूळ आणि महत्त्वपूर्ण सत्याला समजण्यासाठी तसेच त्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासंबंधी पूर्ण मदत मिळेल.

आयएमपीटी अ.क्र. 200      पृष्ठे - 40    मूल्य - 20                आवृत्ती - 2 (Jan 2016)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vuvnwe6wkofsoxi7wax6eolw5pd4ltj1

Muhammad
मुहम्मद (स.) यांचे आगमन केवळ अरबस्तानापुरते नव्हते, ते सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात सर्वत्रच धार्मिक अवनती झाली होती. झरतुष्ट्र, मोझेस, खिस्त यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणात श्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडे माजली होती. सत्य धर्म लोपला होता. खिश्चन धर्म आपापसातील मतभेदांनी कत्तली करीत होता. शांती देणारा धर्म रक्तस्नात होत होता! हिंदुस्तानाकडेही निराशाच होती. बुद्धांनी दिलेला नीतिधर्म पुन्हा नष्ट झाला. पुन्हा हिंदूधर्माने उचल केली. अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला. नाना देवतांची पुराणे रचिली जाऊ लागली. निरनिराळ्या देवतांचे उपासक आपसात झगडत होते. शाक्तमते पुढे येत होती. उपनिषदांतील थोर धर्म मूठभर लोकांजवळ होता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! स्पृश्य-अस्पृश्य, श्रेष्ठनिष्ठपणा यांना सीमा राहिली नाही. निर्गुण, निराकार ब्रह्म शून्य झाले. कर्मकांड वाढले. सतराशे देवदेवतांचा बुजबुजाट झाला. उच्चनीचपणाला ऊत आला. आणि बौद्धधर्म हिंदुस्तानाबाहेर सर्वत्र होता. त्याचे शुद्ध स्वरूप राहिले नाही. बुद्धांचे अनेक अवतार झाले. नाना बुद्ध निर्माण झाले. त्या त्या देशांनी आपले रंग बौद्धधर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बौद्धधर्म कोणास पटणार?बुद्धालाच त्यांनी देव केले!

स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिती होती. गरिबांना मान नव्हता. सर्वत्र दु:ख होते. अपमान होते. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोपला होता. अशा काळात मुहम्मद (स.) आले. त्यांचे येणे आकस्मिक नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धिशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले. मुहम्मद (स.) यांचे आगमन जगाच्या इतिहासाशी संबद्ध होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितीतून नवश्रद्धेचा जन्म होणे अपरिहार्य होते. अशा चिखलातून नवीन सहस्रदल सुंदर कमळ मुहम्मद (स.) यांच्या रूपाने फुलले. जगभर त्याचा गंध गेला. आर्तांस त्यातील अनंत मकरंद मिळाला.
कोठे जन्मला हा महापुरुष? अरबस्तानात जन्मणाऱ्या पैगंबर मुहम्मद (स.) यांस दोन अनुकूलता हव्यात. अरबी धर्माच्या पुण्यक्षेत्री, परंपरागत स्थानी जन्मलेला तो असावा आणि अरब रक्ताच्या थोर कुळात तो जन्मलेला असावा. मुहम्मद (स.) यांना या दोन्ही अनुकूलता मिळाल्या. ते मक्केत जन्मले. काबागृहाची पूजा करणारे श्रेष्ठ कुरेश, त्यांच्या घराण्यात जन्मले.

मक्का शहर अरबस्तानचे वेंâद्र होते. धर्माचे व व्यापाराचे उत्तर-दक्षिण दरीत ते वसले होते. पश्चिमेकडे उंच टेकड्या. पूर्वेकडेही उंच दगड. मक्केच्या मध्यभागी काबागृहाचे पवित्र प्रार्थनागृह, प्रार्थनागृहाजवळच सार्वजनिक दिवाणखाना. घरे तटबंदी केलेली. रस्ते नीटनेटके व फरसबंदी. असे हे भरभराटलेले, समृद्ध व बळवंत शहर होते.
अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यातून एक शांततापूर्ण व्यक्ती हिंडताना दिसे. विचारमग्न व गंभीर अशी ती व्यक्ती दिसे. डोक्यावरील पागोट्यावरून एक रूमाल टाकलेला असे. त्याचे एक टोक उजवीकडून गळ्याखालून डाव्या खांद्यावर टाकलेले असे. कोण ती व्यक्ती? कोण तो पुरुष? मध्यम उंचीचा, रुंद खांद्याचा, दणकट मनगटाचा कोण तो पुरुष? काळेभोर दाट केस खांद्यावर आले आहेत आणि डोके कसे आहे पाहा. भव्य विशाल डोके! आदरणीय डोके! तोंड जरा लांबट, पिंगट रंगाचे, तांबुस छटेचे आणि भुवया बघा कशा सुंदर कमानदार आहेत! आणि दोन भुवयांच्या मध्ये ती पाहा एक ठसठशीत शीर आहे. भावनोत्कट प्रसंगी ती थरारे आणि डोळेही काळेभोर, मोठे. ते डोळे काहीतरी शोधीत आहेत. कोठेतरी पाहत आहेत. अस्वस्थ आहेत ते डोळे! जाड व लांब पापण्यांमधून ते डोळे चमकत. नाकही बाकदार व मोठे आहे आणि दात पहा किती स्वच्छ शुभ्र! दातांची फारच काळजी घेतो वाटते हा?आणि ती साऱ्या बाजूने असलेली सुरेख दाढी. किती रुबाबदार, सुंदर, सामर्थ्यसंपन्न चेहरा हा! कोणाचा हा? काय याचे नाव? कातडी मऊ आहे, स्वच्छ आहे. मुद्रा शुभ्र व लाल आहे आणि हात पाहा, रेशमासारखे, मखमलीसारखे मऊ आहेत. पोशाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु दृढ. जणू वरून खाली येत आहे. देवाकडून मानवांकडे येत आहे. गंभीर मुखावरही रस्त्यात मुले भेटताच हास्य फुलते आहे पाहा. वाटेत मुले भेटली तर त्यांच्याजवळ प्रेमाने बोलल्याशिवाय हा पुरुष राहत नसे. मुलांचा प्रेमी होता. कारण मुलांजवळ देवाचे राज्य असते. अद्याप स्वर्गाच्या जवळ ती असतात. मुलांचेही त्याच्यावर प्रेम होते. ती त्यांच्याभोवती गोळा होत. आपल्या विचारात मग्न होऊन जरी हा पुरुष जात असला तरी वाटेत कोणी सलाम केला तर लगेच तो सलाम परत करी. मग तो सलाम अगदी हीनदीनाचा का असेना.

कोण होता तो? लोक त्याला ‘अल्-अमीन’ म्हणत. आपण होऊन लोकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल्-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्याचे जीवन इतके आदर्शरूप, सचोटीचे, कष्टाचे, सन्माननीय असे होते की सर्वांना त्याच्याविषयी आदर व विश्वास वाटे. परंतु लोक असे का पाहत आहेत त्याच्याकडे? अल्-अमीनाकडे साशंकतेने का पाहत आहेत? हा मनुष्य नवीन धर्म सांगू लागला होता. लोक त्याला वेडा म्हणू लागले. समाजाची जुनी बंधने तो नष्ट करू पाहत होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतीरिवाज सोडा असे सांगत होता. हा हट्टी, माथेफिरू क्रांतिकारक आहे, असे आता लोक म्हणत व तो जाऊ लागला म्हणजे संशयाने बघत.
कोण होता तो? ते का पैगंबर मुहम्मद (स.)? होय. होय, तेच ते शांतपणे रस्त्यातून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहम्मद (स.) होते. कुरैशांच्या कुळात, काबागृहाच्या उपाध्यायांच्या कुळात जन्मले होते.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि अल्लाहु तआला अनहु) (रजि.) निवेदन करतात, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
इस्लामचे आधारस्तंभ पाच आहेत. १. अल्लाहशिवाय दुसरा कुणी ईश्वर नाही व मुहम्मद (स.) हे त्याचे दास व प्रेषित आहेत, या वस्तुस्थितीची साक्ष देणे.
“अशहदु अला ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलूहु."
(मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि प्रेषित आहेत.) २. नमाज कायम करणे. ३. जकात देणे. ४. हज करणे. ५. रमजानचे रोजे करणे.
(बुखारी-मुस्लिम) प्रेषितांनी इस्लामला इमारतीची उपमा देऊन तिचे आधारस्तंभ कोणते हे येथे स्पष्ट केले आहे.
इस्लाममध्ये सर्वप्रथम श्रद्धेला महत्त्व आहे. अल्लाह एक आहे, त्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही आणि प्रेषित मुहम्मद (स.) हे त्याचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत, या सत्याचा स्वीकार करून तशी प्रतिज्ञा करणे म्हणजे श्रद्धा बाळगणे. माणसाच्या आचार, विचार व उच्चारावरून ही गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे की, तो अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासही ईश्वर मानीत नाही. त्याचप्रमाणे तो प्रेषित मुहम्मद (स.) यांना अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित मानतो.
अल्लाहला एकमेव ईश्वर मानणे याचा अर्थ अल्लाह हा एकटा साऱ्या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता, नियंता, शास्ता, त्राता आहे. तोच जीवन-मृत्यूचा आणि शेवटच्या निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे. त्याचीच उपासना, प्रार्थना, स्तुती व याचना केली पाहिजे. भक्ती व आज्ञापालन त्याचेच केले पाहिजे. त्याशिवाय कोणीही भक्ती व आज्ञापालनास पात्र नाही.

आदरणीय मुहम्मद (स.) हे अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत यावर श्रध्दा ठेवणे म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणे. अल्लाहने मानवाच्या शिकवण व मार्गदर्शनासाठी जी एक जागतिक व्यवस्था केली आहे त्यामधील ते शेवटचे प्रेषित आहेत. त्यांची शिकवण व त्यांचे मार्गदर्शन माणसावर बंधनकारक आहेत. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्यानुसार आचरण करणे इस्लाम आहे.
इस्लाममध्ये दिवसातून पाच वेळची नमाज (प्रार्थना) माणसावर बंधनकारक आहे. १. पहाटेची-फज्र २. दोनप्रहरची -जोहर ३. सायंकाळपूर्वीची-असर ४. सूर्यास्तावेळची-मगरिब व ५. रात्रीची-इशा. नमाज कायम करणे म्हणजे नमाजची व्यवस्था कायम करणे. स्वत: नियमितपणे जमाअतीबरोबर पाच वेळा नमाज अदा करणे आणि इतरांना नमाज अदा करण्यास प्रवृत्त करणे. नमाजीसाठी मसजिदींची व अन्य व्यवस्था करणे होय.
त्यागाशिवाय माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनत नाही. मालमत्तेबद्दल वाटणारे प्रेम व तिची हाव माणसाला सदाचारापासून दूर ठेवते आणि म्हणून अल्लाहने 'जकात' देणे माणसावर बंधनकारक ठरविले आहे. ठरविण्यात आलेल्या हिशोबाप्रमाणे माणसाने आपल्या मालमत्तेवर दरवर्षी जकात दिली पाहिजे. त्याचप्रमाणे ईशकार्यात सढळ हाताने खर्च केला पाहिजे. गोरगरिबांना व दीनदुबळ्यांना दानधर्म केला पाहिजे. माणसाने या सत्याचे स्मरण ठेवले पाहिजे की, त्याला जे काही लाभते ते अल्लाहच्या कृपेमुळेचलाभते.
प्रवासखर्चाची ऐपत असणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने आयुष्यातून एकदा हिजरी सनाच्या जिल्हज महिन्यात अरबस्थानातील मक्का शहरी जाऊन बैतुल्लाहचे-अल्लाहच्या काबागृहाचे दर्शन घेतले पाहिजे. त्याची जियारत करून सई, तबाफ करणे, अरफातला जाणे, कुरबानी करणे वगैरे विधी केले पाहिजेत. याला हज करणे म्हणतात.
पाचवे कर्तव्य हे आहे की, प्रत्येक स्त्री-पुरुषाने दरवर्षी रमजान महिन्यात महिन्याचे पुरे रोजे केले पाहिजेत. भल्या पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी वगैरे काहीही न घेता केला जाणारा उपवास म्हणजे रोजा.
अल्लाहने श्रद्धा बाळगल्यानंतर नमाज, जकात, हज व रमजानचे रोजे व चार धार्मिक जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. ही कर्तव्ये योग्यप्रकारे व जाणीवपूर्वक पार पाडली तर ती माणसाला आज्ञाधारक व सदाचारी बनवितात.
नमाज अल्लाहचे सतत स्मरण घडविते व त्यामुळे माणसास सरळमार्गावर राहण्यास मदत होते. जकात त्यागाची शिकवण देते. माणूस ईश्वराने दिलेले धन ईशकार्यात खुशीने खर्च करतो आणि त्याचे धन व मन निर्मळ होते. हजमध्ये माणसाला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. त्याला खर्चही करावा लागतो. आपल्या मुलाबाळांपासून व कारभारापासून निव्वळ अल्लाहच्या आज्ञेवरून तो दूर जातो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला दिव्यत्वाची प्रचिती घडते. रोजा, मनोनिग्रह घडवितो व अल्लाहचे भय बाळगून माणूस वाईट आचारविचारापासून दूर राहतो.

इस्लाम हा निसर्गाचा धर्म आहे. इस्लामने मानवतेला नैसर्गिक गरजा आणि उद्दिष्टांमध्ये मूलभूत तत्त्वांद्वारे मार्गदर्शन केले आहे. त्याच जीवनावश्यक गरजांमध्ये पर्यावरण हेदेखील आहे, ज्यावर जैवविविधतेचे अस्तित्व अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्तीच्या विनाशामुळे पर्यावरण प्रदूषित होते. यामागील प्रमुख कारण म्हणजे अज्ञान आणि ईश्वराची भीती नसणे होय. अज्ञानामुळे पर्यावरणाला हानिकारक बाबींची ओळख पटत नाही, पर्यावरणाचा Nहास झाल्याने कोणती हान्ी होते हे माहीत होत नाही, याची कारणमीमांसा करून त्यावर उपाययोजना करणे अतिशय आवश्यक आहे. स्वार्थ आणि मनात ईशभय नसल्याकारणाने एखादी व्यक्ती समाजहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देतो. जे काही तो करीत आहे त्यामुळे जैवविविधता आणि पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे माहीत असूनसुद्धा वैयक्तिक हितांचा पाठलाग करताना तो त्यांच्यावर खूश असतो, अशी परिस्थिती आहे.
जर मनामध्ये ईशभय असते तर स्वार्थापोटी इतरांना हानी पोहोचविली नसती. खरे तर दुदैवाने प्रदूषणाला लोकांनी वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण, माती प्रदूषण आणि घाणेरडेपणापर्यंतच मर्यादित करून ठेवले आहे. नैतिक प्रदूषण, धार्मिक प्रदूषण, आर्थिक प्रदूषण, राजकीय प्रदूषण, शैक्षणिक प्रदूषण आणि सामाजिक प्रदूषण याकडे फारच थोड्या लोकांचे लक्ष आहे. विशेषत: काही लोकांनी त्यात फक्त पहिल्या भागाचाच समावेश केला आहे, मात्र ते तसे नाही. पर्यावरणावरणाला हानी मानसिक व नैतिक आणि दुसरा शारीरिक. जेव्हा आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आणि असमान असते, घरची परिस्थिती चांगली नसते, मानवाला मूलभूत गरजांची पूर्तता होत नसते, समाजाची नैतिक स्थिती ढासळते तेव्हा मानसिक आणि नैतिकदृष्ट्या मनुष्यावर वातावरणाचा नकारात्मक परिणाम होतो. चोहीकडे आढळणाऱ्या घाण व प्रदूषणामुळे माणसाला जीवन असह्य होऊन बसते. जेथे योग्य आहार उपलब्ध नाही, जेथे योग्य अशा कपड्यांची उपलब्धता नाही, राहाण्यासाठी छत उपलब्ध नाही, स्वच्छतेची व्यवस्था नाही, सर्वत्र घाणीचे ढीगच ढीग आढळतात आणि दुर्गंधयुक्त पाण्याचे तलाव आणि घाणीने भरलेले नाले दिसतात अशा परिस्थितीत मानवावर शारीरिक व मानसिकदृष्ट्या वाईट परिणाम होतो.
म्हणूनच इस्लामने सर्व प्रकारचे वातावरण स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा आदेश दिला आहे, जेणेकरून माणूस त्यात मानसिक, नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या आनंदी दिसू शकेल आणि ही काही वर्षे सुखात जगेल.
इस्लाम (जो स्वाभाविक स्वरूपात कुरआन आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आचरणपद्धतींचा आहे) ने मानवास एक शांत आणि सुखमय वातावरण प्रदान करण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. परंतु इस्लामने आंतिरक आणि मानसिक शुद्धतेसह पर्यावरणाच्या स्वच्छतेची सुरूवात केली आहे. त्याला प्रथम मनुष्याचे हृदय आणि मन सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून मुक्त पाहू इच्छितो आणि त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे मानवी हृदय आणि मन सकारात्मक व नकारात्मक विचारांचे मिश्रण आहे. जर हे चांगल्या कल्पाना व सद्विचारांचे पालन करीत असतील तर चांगले आणि सत्कर्म मनुष्यांच्या हातून होत राहातील, परिणामत: हृदयाची व मनाची शांतता लाभेल. म्हणूनच इस्लामने मानवी मन व हृदय चांगल्या व पवित्र विचार आणि कल्पनांमध्ये व्यस्त ठेवण्यासाठी योग्य अशी व्यवस्था केली आहे आणि असे करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वासाची आवश्यकता असते. जी माणूस खरी श्रद्धा व विश्वास योग्यरित्या बाळगतो त्याला ‘मोमीन’ (श्रद्धावंत) म्हणतात. आणि जो एकमेव अल्लाहवर श्रद्धा व विश्वास बाळगतो तोच खरोखरच श्रद्धावंत असतो. अर्थात तो एकच ईश्वर आहे, संपूर्ण सृष्टीचा तो निर्माणकर्ता, मालक आणि पालनकर्ता आहे. मृत्यू आणि जीवन त्याच्याच हातात आहे. तो मान आणि अपमान देतो. ज्याला एक कठीण गरज आहे. तोच इच्छा पूर्ण करणारा ईश्वर आहे.
(भाग १) - क्रमश:

- शाहजहान मगदुम
मो. : ८९७६५३३४०४

व्यापारात इस्लामी नैतिकतेचा परिचय करून देणारे व इस्लामसाठी सर्वाधिक संपत्ती खर्ची करणारे तीसरे खलीफा
सरे खलीफा हजरत उस्मान बिन ति अफ्फान रजि. यांचा जन्म इ.स.576 मध्ये मक्का शहरात झाला. त्या काळी  मक्का शहरात कुरैश जमातीचे एकूण 10 कूळ गट होते. त्यापैकी दोन कुळ गट एक बनू हाशम व दोन बनू उम्मैय्या हे मातब्बर म्हणू ओळखले जात. ह. उस्मान रजि. यांचा जन्म बनू उम्मैय्या कुळ गटात झाला होता. त्यांचे वडील हजरत अफ्फान हे मक्का शहरातील मूठभर साक्षर लोकांपैकी एक होते. ते मक्का शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी होते. आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबात जन्म होवूनही हजरत उस्मान रजि. हे अतिशय नम्र स्वभावाचे होते. वयात येताच त्यांनी वडिलांचा व्यापार सांभाळण्यास सुरूवात केली. आपल्या मधूर स्वभावामुळे ते अल्पावधीतच एक लोकप्रिय व प्रामाणिक ताजीर (व्यापारी) म्हणून नावारूपास आले.  त्यांचे व्यापार कौशल्य एवढे जबरदस्त होते की, ते कोणत्याही वस्तूंचा व्यापार लिलया करत. म्हणून त्यांची श्रीमंती इतकी वाढली  की लोक त्यांना  ’गनी’ (धनाढ्य)  म्हणून ओळखू लागले. त्याकाळी
श्रीमंत अरबांमध्ये असणाऱ्या  मदीरा आदी छंदापासून ते चार हात लांब राहत. त्यांनी कधीही मद्य प्राशन केले नाही, मात्र ते अनेकेश्वरवादी होते आणि मूर्तीपूजा करत. व्यापारा निमित्त अबेसिनीया, सिरीया, यमन इत्यादी देशात त्यांचे दौरे होत असत. इ.स. 610 मध्ये सिरीयामध्ये असताना  एका रात्री त्यांना दृष्टांत झाला की, मक्कामध्ये एक नवे प्रेषित उदयास आलेले आहेत तुम्ही त्यांचे शिष्यत्त्व पत्करा. त्यावरून त्यांनी आपला दौरा आटोपता घेत मक्का शहर गाठले. मक्का येथे येताच त्यांनी  शहरातील दूसरे प्रसिद्ध व्यापारी हजरत अबुबकर रजि. यांची भेट घेऊन इस्लामसंबंधी माहिती जाणून घेतली व आपल्याला झालेल्या दृष्टांताचा त्यांच्यासमोर खुलासा केला. तेव्हा ह. अबुबकर रजि. त्यांना इस्लामबद्दल  सविस्तर माहिती देऊन त्यांना इस्लाम स्विकारण्याचा सल्ला दिला. ह.अबुबकर रजि. यांच्याशी झालेल्या चर्चेवरून समाधान झाल्याने त्यांनी थेट प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे जाऊन त्यांच्या  हातावर हात ठेऊन इस्लाम स्विकारला.

इस्लाम स्विकारल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती
त्यांच्या सारख्या श्रीमंत व्यक्तीने इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मक्का शहरामध्ये एकच गहजब उडाला. त्यांचासारखा व्यक्ती इस्लाम स्विकारतो म्हणजे इस्लाम हाच सत्य धर्म असावा, असा एक प्रबळ विचार आम जनतेत पसरला. सर्वात तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या स्व:च्या बनी उम्मैय्या या कुळ गटातून उमटली. त्याचे कारण प्रेषित मुहम्मद सल्ल. हे त्यांच्या प्रतिस्पर्धी कुळ गटातील म्हणजे बनी हाशम मधून येत होते. हजरत उस्मान रजि. यांनी इस्लाम स्विकारून बनी हाशम गटाचे वर्चस्व मान्य केले असा समज बनी उम्मैय्यामध्ये पसरला. त्यांना आपल्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या आईसहीत अन्य नातेवाईकांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचे चुलते व बनी उम्मैय्या कुळाचे कुलपती हकम बिन आस यांनी तर ह. उस्मान रजि. यांचे हातपाय बांधून त्यांना जबर मारहाण सुद्धा केली. परंतु ते आपल्या निश्चयापासून जरासुद्धा विचलित झाले नाहीत. उलट आपल्याच कुळ गटातील दोन मातब्बर घराण्यातील आपल्या दोन पत्नींना त्यांनी इस्लाम स्विकारण्यास नकार दिल्याने घटस्फोट देऊन आगीत तेल ओतल्यासारखी कृती केली. त्यामुळे तर बनी उम्मैय्या कुळातील लोक अधिकच खवळले. परंतु हजरत उस्मान रजि. यांना कशाचीच परवा नव्हती. त्यांचे चित्त इस्लामवर स्थिर झालेले होते व त्यांना त्यातून उर्जा मिळत होती. म्हणून त्यांना स्व:च्या जीवाचीही परवा नव्हती.
इस्लामी श्रद्धेश्वर दृढ निश्चय असेल तर सुरूवातील भरपूर त्रास होतो. परंतु त्रास सहन केला व श्रद्धेवर ठाम राहीला की प्रत्येकाला अल्लाहची छुपी मदत येते व श्रद्धावान व्यक्ती यशस्वी होतो हा प्रत्येक मुसलमानाचा अनुभव आहे. हजरत उस्मान रजि. चेही असेच झाले. हर प्रकारे प्रयत्न करूनही जेव्हा हजरत उस्मान रजि. हे इस्लामपासून मागे फिरणे तर दूर साधे विचलितही होत नाहीत, हे पाहून अल्पावधीतच बनू उमैय्यावाल्यांनी त्यांचा नाद सोडला.
त्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली कन्या हजरत रूकैय्या रजि. यांचा विवाह हजरत उस्मान रजि. यांच्याशी करून दिला. त्यानंतर इ.स.615 मध्ये प्रेषित सल्ल. यांच्या आदेशावरून या जोडप्याने अबेसेनिया येथे हिजरत करून तेथे स्थायिक झाले. पुढे प्रेषित सल्ल. यांनी हिजरत करताच हे जोडपेही मदीना येथे पोहोचले व इस्लामीक पद्धतीने मदीना शहरात व्यापार सुरू केला.

इस्लामी व्यापाराचा एकाधिकार
हजरत उस्मान रजि. यांनी मदीनाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी बाजारपेठेवर ज्यू व्यापाऱ्यांचा एकाधिकार होता. ते मनाला येईल तेव्हा दुकाने उघडत मनाला येईल तेव्हा बंद करीत. मनाला येईल त्या किमती ठेवत. कायम चढ्या दराने माल विकत. लोकांच्या गरजा पाहून किमती वाढवत. वजन काट्यामध्ये सुद्धा फरक ठेवत. मालाची गुणवत्ता सुद्धा लपवून ठेवत. खोट्या शपथा घेऊन हलका माल भारी असल्याचे ग्राहकांना पटवून देत. बाजारपेठेतील सर्व व्यवहार व्याजावर आधारित होते. मोठे व्यापारी छोट्या व्यापाऱ्यांना व्याजावर माल देऊन त्यांची पिळवणूक करीत होते. त्यामुळे छोटे ज्यू व्यापारीसुद्धा मोठ्या ज्यू व्यापाऱ्यांच्या या वर्तणुकीमुळे वैतागून गेले होते.
हजरत उस्मान रजि. यांनी बाजारेपेठेतील ज्यू व्यापाऱ्यांच्या वागणुकीचा अभ्यास करून शुद्ध इस्लामी पद्धतीने व्यापार सुरू केला. मालाची गुणवत्ता स्पष्ट करण्याची पद्धत सुरू केली. हलका माल व भारी माल वेगवेगळा ठेवला. सुका माल आणि ओला माल वेगवेगळा ठेवला व त्यांच्या किमतीही गुणवत्तेप्रमाणे कमी अधिक ठेवल्या. तसेच मक्काहून येतांना त्यांनी स्व:ची प्रचंड अशी संपत्ती सोबत आणलेली असल्यामुळे त्यांचे मूळ भांडवल बिनव्याजी असल्यामुळे त्यांनी ठेवलेल्या किमती ज्यू लोकांच्या व्याजी किमतीच्या पेक्षा तुलनेने कमी राहू लागल्या. खोट्या शपथा खाणे इस्लाममध्ये निषिद्ध असल्याने खरे तोलून त्यांनी व्यापार सुरू केला. दुकान उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या आदेशाप्रमाणे मुस्लिमांचा व्यापार प्रामाणिकपणे सुरू झाला. प्रेषित सल्ल. यांनी सुचविलेल्या अशाच अनेक सुधारणांमुळे व त्यांना हजरत अब्दुरहेमान बिन औफ रजि. व इतर मुस्लिम व्यापाऱ्यांची मोलाची साथ लाभल्याने अल्पावधीतच मदिनाच्या बाजारपेठेचा नूर पालटला व ज्यू व्यापाऱ्यांच्या एकाधिकाराला हादरे बसू लागले. हजरत उस्मान रजि. यांनी मक्क्याहून आणलेल्या आयत्या संपत्तीचा ओघ मदिनाच्या बाजारपेठेत वाढल्याने व ती संपत्ती बिनव्याजी बाजारात फिरू लागल्याने त्याचा फायदा मुस्लिम व्यापाऱ्यांसह छोट्या ज्यू व्यापाऱ्यांना व सर्वधर्मीय ग्राहकांनाही मिळू लागला. येणेप्रमाणे अल्पावधीतच मदिनाच्या बाजारपेठेची सुत्रे ज्यू व्यापाऱ्यांकडून स्थलांतरित होऊन आपसुकच ह.उस्मान यांच्याकडे आली. हजरत उस्मान रजि. यांचे दातृत्व त्यांचे दातृत्व सर्व विधित होते. त्यांनी अनेक छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन बाजारपेठेत उभे केले. प्रेषित सल्ल. यांच्या मस्जिदीसाठी हजरत अबुबकर रजि. यांनी जो जमिनीचा तुकडा खरेदी केला होता त्यावर मस्जिदीच्या बांधकामाचा सर्व खर्च व त्यानंतर सहा वर्षांनी तिच्या विस्ताराचा सर्व खर्च त्यांनी स्व:उचलला. अनेक लढायांमध्ये त्यांनी सढळ हाताने संपत्ती खर्च केली. एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, ’’इस्लामच्या विस्तारामध्ये ह. उस्मान रजि. यांच्या संपत्तीचा मला जेवढा उपयोग झाला तेवढा कोणाच्याच संपत्तीचा झाला नाही.’’ यावरून त्यांच्या दातृत्वाची वाचकांना कल्पना यावी.
मदिनामध्ये एक विहीर अशी होती की जीचे पाणी गोड होते व ती कधीच आटत नव्हती. मात्र तिच्यावर मुस्लिमांना मुक्त प्रवेश नव्हता. ती विहीर एका ज्यू व्यापाऱ्याच्या खाजगी मालकीची होती. हजरत उस्मान रजि. यांनी लोकांच्या पाण्याची अडचण पाहून ती विहीर 10 हजार दिरहम घेऊन खरेदी करून सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच प्रसिद्ध झाले.

प्रेषित सल्ल. यांच्या दोन मुलींशी विवाह
इसवी 624 मध्ये हजरत रूकैय्या रजि. यांचे अल्प: आजाराने निधन झाले तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी आपली दूसरी कन्या उम्मे कुलसूम रजि. ज्या विधवा झाल्या होत्या त्यांचा विवाह हजरत उस्मान रजि. यांच्याशी करून दिला. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. यांच्या दोन कन्यांशी विवाह करण्याचे अपवादात्मक सौभाग्य लाभलेले ते पृथ्वीवरील एकमेव पुरूष होत.

तृतीय खलीफा पदी निवड
द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. यांनीही आपल्या पूर्वीचे खलीफा हजरत अबुबकर रजि. यांच्याप्रमाणेच आपल्या पुत्राला खलीफा न बनविता आपल्या हयातीतच सहा लोकांची एक निवड समिती गठित केली होती जिच्यावर तृतीय खलीफाच्या निवडीची जबाबदारी टाकली होती. आपसात सल्लामसल्लत करून या सहापैकी कोणा एकाला त्यांनी आपल्यानंतर खलीफा म्हणून निवडावे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. हे सहाही सहाबी रजि. आशरा-ए-मुबश्शरा (जीवंतपणीच ज्यांना स्वर्ग मिळणार असल्याची भविष्यवाणी  अल्लाहकडून झाली होती.) पैकी होते. एकापेक्षा एक विद्वान आणि सरस आणि :स्पृह असे हे सहाबी होते. एवढेच नव्हे तर ह. उमर रजि. यांनी हे ही म्हटले होते या सहा व्यतिरिक्त कोणी सातवा व्यक्ती खलीफा बनण्यासाठी पुढे आला तर त्याचे मुंडके छाटून टाकावे. त्या सहा सहाबींची नावे खालीलप्रमाणे होत -
1. ह.उस्मान रजि. 2. हजरत अली रजि. 3. हजरत जुबैर रजि. 4. हजरत तलहा रजि. 5. हजरत सआद बिन वकास रजि. आणि 6. हजरत अब्दुरहेमान बिन औफ रजि.
या समितीने आपसात विचार विनिमय करून हजरत उस्मान रजि. यांची तृतीय खलीफा म्हणून निवड केली. ज्या दिवशी ते खलीफा झाले त्या दिवशी त्यांचे वय 70 वर्षे होते. ते सन 24 हिजरी ते सन 35 हिजरी म्हणजे 12 वर्षे खलीफा म्हणून राहिले. त्यांच्या काळात इस्लामी राज्याच्या सीमांचा बराच विस्तार झाला. एकंदरित अतिशय यशस्वी खलीफा म्हणून ते गणले जात. परंतु दुर्दैवाने त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत बसरा आणि कुफा (इरान) व सीरिया मधून आलेल्या दोन हजार मुस्लिमांच्या एका बंडखोर गटाने मदिनामध्ये घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना शहीद केले. इन्नलिल्लाही व इन्ना इलैही राजेऊन.

- एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget