Latest Post


अलाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी अर्थशास्त्रावर आधारीत असल्याचे म्हटले आहे. इस्लामी तत्त्वज्ञानामुळेच या नव्या संकल्पनेने जन्म घेतल्याची पुष्टीही त्याने आपल्या लिखाणाला जोडली आहे. प्रेषित मुहम्मद (स.) मदीनेत असताना त्यांनी ‘दारुल अदल’ सारख्या आर्थिक शोषण नाकारणाऱ्या बाजाराची स्थापना केली होती. हे बाजार मस्जिद ए नबवीच्या शेजारी होते. या बाजाराविषयी प्रेषितांनी त्या वेळी भूमिका मांडताना म्हटले होते, ‘हा तुमच्या स्व:चा बाजार आहे. इथे कुणीच तुमच्याशी जबरदस्ती अथवा फसवणूक करणार नाही. कुणीच तुमच्याकडून जुलमी करदेखील घेणार नाही.’ या बाजाराच्या आधारे प्रेषितांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावला होता.

मदीनेतील बाजारस्थापनेमागची कारणमिमांसा

प्रेषितांनी मदीना शहरात स्थापन केलेल्या बाजारामागची पार्श्वभूमी कथन करताना डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, ‘या बाजाराची स्थापना करुन प्रेषितांनी इस्लामच्या अर्थव्यस्थेची मूलभूत तत्त्वेच सांगितली. प्रेषितांनी म्हटले होते की, बाजारात जे लोक व्यापार करतील त्यांना पुर्ण: स्वातंत्र्य असावे. त्यांना कोणत्याही बाह्य प्रभावाने आपल्या इशाऱ्यावर चालण्यासाठी बाध्य करु नये. अनैसर्गिक पध्दतीने वस्तूंच्या दरांमध्ये चढ-उतार होऊ नये. साठेबाजी होऊ नये. आणि कोणत्याच व्यक्तीला बाजारात आपला माल आणण्यापासून रोखले जाऊ नये.’ ही घोषणा करण्यामागे एक मुलभूत कारण होते. 

 ‘मक्का शहरात कातडीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असे. कातडे विकण्यासाठी मदीना शहरातील बाजारात मक्केतील व्यापारी येत असत. ज्यू सावकारांना याची माहिती मिळाल्यानंतर ते मदीना शहराच्या बाहेर जाऊन त्या व्यापाऱ्याला रोखत. त्याला बाजारातील दराची माहिती मिळू देत नसत. त्याच्याकडून संपूर्ण माल खरेदी करत. त्यामुळे या सावकारांना बाजारातील दरांवर नियंत्रणही ठेवता येई. या प्रकाराने माल विकणाऱ्या संबधित व्यापाऱ्याला बाजारातील दरामुळे मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागे. प्रेषितांनी या प्रकाराला निषिध्द ठरवले. आणि बाजारातील स्वातंत्र्याची घोषणा केली.’ त्याशिवाय प्रेषितांनी ग्रामीण उत्पादनव्यवस्थेला शहरी प्रभावापासून रोखण्याचे प्रयत्नही केले. त्यांनी ग्रामीण भागातील उत्पादक घटकांकडून शहरी व्यक्तींवर माल खरेदी करण्यासाठी निर्बंध लादले. शहरी व्यापारी ग्रामीण भागातील उत्पादक घटकाकडून वस्तू खरेदी करुन शहरातल्या बाजारपेठेत मनमानी दरावर विकत होते. या नव्या नियमामुळे ग्रामीण उत्पादक घटकाला थेट बाजारपेठेत प्रवेश मिळाला. आणि शहरी व्यापाऱ्यांच्या दलालीलाही लगाम लागले.’

इब्ने खल्दून हे इस्लामप्रणित प्रगत अर्थशास्त्राचे व्याख्याता मानले जातात. त्यांच्या मते, ‘बाजारातील शोषण संपवून इस्लामने सामान्यांच्या जगण्याला आधार दिला. बाजारात श्रमाचे मुल्य, वस्तूंचे मुल्य आणि नफ्याविषयी इस्लामने मांडलेला सिध्दांत शोषणव्यवस्थेला संपवणारा ठरला. इस्लाम हा नव्या जगातील माणसांसाठी माणूसकीचा संदेश घेऊन आला होता. कारण त्याने जीवनासाठी गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देणारी बाजारपेठ त्याच्यासाठी सुकर केली होती.’ इस्लामने मांडलेला श्रममूल्याचा सिध्दांत हा बाजारातील मुजोर व्यापारी आणि उत्पादन करणाऱ्या धनदांडग्यांना उघड आव्हान होते. श्रमिकांना सन्मान देण्यासाठी इस्लामने सक्तीची धर्मकर्तव्ये म्हणून काही नियम केले. नफा ठरवणारी अनियंत्रित व्यवस्था मोडीत काढण्यासाठी इस्लामने नफ्याचे प्रमाण ठरवून दिले. 

हल्फुल फुदूल करार आणि शोषणाला आव्हान

प्रेषितांनी मक्का शहराच्या समाजजीवनात इस्लामच्या स्थापनेआधी केलेला पहिला हस्तक्षेप हा बाजारातील शोषणाविरोधात होता. प्रेषितत्वापूर्वी मुहम्मद (स.) यांनी ‘हल्फुल फुदूल’ हा करार मक्का शहराच्या बाजारात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी घडवून आणला होता. मक्का हे शहर व्यापारीकेंद्र होते. आंतरराष्ट्रीय मसाला मार्गावर वसलेले हे शहर अरबांची सांस्कृतिक राजधानी म्हणून इतिहासात ओळखले जायचे. व्यापाऱासाठी भटकणाऱ्या इथल्या नागरीकांना भटकंतीमुळे आणि शहरात येणाऱ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांमुळे उर्वरीत जगातल्या सांस्कृतिक घडामोडी ज्ञात व्हायच्या. 

मक्केतील काही व्यापाऱ्यांकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले होते. ते त्यांच्या हिताची व्यवस्था लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरुन जन्माला घालत. त्यामूळे कित्येक व्यापारी भिकेला लागत. शहरात श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण झाली होती. व्यापारी मार्गावरील शहर म्हणून बाहेरील अनेक उद्योजक मक्का शहरात यायचे. नव्या उद्योगांची सुरुवात करायचे. तेथील कनिष्ठ वर्गीय मजूरांमुळे आणि भिकेला लागलेल्या लहान व्यापार्यांमुळे मजुरांची संख्या मोठी होती. व्यापारी तांड्यासोबत हे मजूर शेकडो मैल चालून जात. सातत्याने होणाऱ्या आर्थिक शोषणातून या मजुरांची स्थिती दयनीय झाली होती. त्यातच व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या सावकरांनी आर्थिक शोषणाची सीमा ओलांडली. शोषणाचे हे चक्र मक्का शहराच्या अर्थकारणाला वेठीस धरत होते. 

आर्थिक शोषण सामाजिक अराजकतेला आमंत्रण देते. अरबांना प्रिय असणाऱ्या मक्का शहरात माजलेली ही अराजकता अरबी मनाला अस्वस्थ करणारी होती. म्हणून कालांतराने ‘हल्फुल फुदूल’ सारखे करार करुन अरबी युवकांनी आर्थिक शोषणाच्याविरोधात एल्गार केला. तारुण्यात प्रेषित मुहम्मद (स.) हे त्या करारातील एक महत्त्वाचा दुवा होते. प्रेषिततत्वाची घोषणा केल्यानंतर देखील प्रेषितांनी पुढे आयुष्यात कधीही ‘हल्फुल फुदूल’ सारख्या सामंजस्य करारात सहभागी होण्याची संधी मिळाली, तर आपण त्यासाठी सिध्द असल्याचा पुनरुच्चार अनेकदा केला. 

यामुळेच प्रेषितांना मक्का शहरातील धनिकांचा सर्वाधिक विरोध सहन करावा लागला. कारण या विरोधाच्या मुळाशी प्रेषितांद्वारे होऊ घातलेल्या आर्थिक बदलांची भिती होती. आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना त्याच्या अर्थकारणाला आव्हान नको होते.  एच. आर. गिब या मताची पुष्टी करताना म्हणतात, ‘मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना (इस्लामने) आव्हान दिले म्हणून नव्हता. किंबहूना त्यांच्या धार्मिक अंधश्रध्देमुळे देखील तो विरोध नव्हता. मात्र त्या विरोधाच्या मुळाशी आर्थिक आणि राजकीय कारणे होती. मुहम्मद (स.) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृध्दीला प्रभावीत करण्याची शक्यता आधिक होती. नवस्थापित इस्लाम त्यांच्या मूर्तीप्रणित अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करु पाहत होता.  प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते.’  ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांना जपण्याचे तत्त्व सांगत होते. 

ज्या गटाचे शोषण उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे झाले होते. त्यांना इस्लामी अर्थव्यवस्थेची ही नवी तत्त्वे आकर्षित वाटत होती. धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेले आव्हान मक्का शहरातील कनिष्ठ व मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होते. त्यातही शोषित युवकांना इस्लामी परिवर्तनाने आपल्या बाजूला वळवले. असगर अली इंजिनीयर युवकांच्या सहभागाविषयी माहिती देताना लिहीतात, ‘ सुरुवातीच्या काळात इस्लामी आंदोलन समाजातील दुर्बल व पीडित व्यक्तींच्या विचारांना अभिव्यक्त करत होते. त्यामुळेच हे संशोधन रुचीपूर्ण ठरेल  की, (इस्लामचे) आरंभीचे समर्थक कोण होते? अब्दुल मुतअल अस्सईदी नावाच्या एका इजिप्शीयन लेखकाने याविषयी संशोधन केले आहे. ते म्हणतात, नवस्थापित इस्लाम मुळात युवकांचे आंदोलन होते. ज्या लोकांच्या वयांची नोंद आढळते त्यामध्ये हिजरतच्या वेळी (मक्काहून मदीनेत स्थलांतर करताना) मोठी संख्या ४० हून कमी वयाच्या व्यक्तींची होती. त्यांनी आठ ते दहा वर्षापूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केतील भांडवलदारांना इशारा दिला होता की, त्यांनी साठेबाजी करु नये, श्रीमंतीचा अहंकारी अभिमान बाळगू नये. हेच पीडित, गुलाम आणि अनाथांना अधिक आकर्षक वाटायचे.’ 

बाजाराचे नियमन

सामान्य माणसांच्या शोषणाचे केंद्र बाजार होते. बाजारातून मक्केतील अर्थकारण चालायचे. त्यामुळेच बाजारातील अर्थकारण, व्यवस्था, व्यवहार हा प्रेषितांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.  प्रेषितांनी केलेल्या बाजाराच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. यासीन मजहर सिद्दीकी लिहीतात, ‘बाजाराचे व्यवस्थापन हे शासनव्यवस्थेचा प्रमुख म्हणून इस्लामी राज्याच्या प्रमुखाचे कर्तव्य होते. प्रेषित वचनसंग्रहातून हे सिध्द होते की, प्रेषित स्व: बाजारांचा दौरा करायचे. व्यापऱ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करीत. वस्तूंच्या दरातील चढ-उतार, श्रमिकांची स्थिती वगैरेंची माहिती घेत. ‘तिरमिजी’ या प्रेषित वचनसंग्रहात एक प्रसंग नोंदवला आहे. प्रेषित एकदा बाजारातून जात होते. त्यांनी एकेठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाचे ढिग पाहिले. प्रेषितांनी त्या ढिगाऱ्यात हात घातला. गव्हू ओलसर असल्याची त्यांना जाणीव झाली. प्रेषितांनी त्या व्यापाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. आणि ग्राहकांशी धोकेबाजी करण्यास मनाई केली.’

प्रेषितांनी बाजारात दलाली आणि दरांमधील कृत्रिम चढउतार रोखण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात एकाच ठिकाणी उत्पादक व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करण्यास मनाई केली होती. खरेदीची ठिकाणे व विक्रीची ठिकाणे अलग करण्यात आली होती. व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या धोकेबाजी, मनमानीला लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे काही इस्लामी विद्वानांचे मत आहे. याकरीता प्रेषितांनी बाजाराचा प्रमुख म्हणून आधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.  मक्केवरील विजयानंतर तत्काळ प्रेषितांनी बनु उमैय्या वंशाच्या सईदी घराण्यातील सआबद बिन सईद यांना मक्का शहराच्या बाजारात आधिकारी म्हणून नियुक्त केले. मक्का शहराचे अर्थकारण, बाजारपेठेवरील नियंत्रणासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्वाची होती. यापध्दतीनेच हजरत उमर यांना मदीनेच्या बाजाराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्याकाळात व्यापारी मदिनेच्या बाजाराला अतिशय महत्त्व देत.

मदीनेची बाजारपेठ त्याकाळात अनियंत्रीत होत चालली होती. देश-विदेशातील व्यापारी तेथे व्यापारास येत होते. त्यामूळे मदीनेच्या बाजारावरील उमर यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. ज्या शहरातल्या बाजारात प्रमुखाची नियुक्ती केलेली नव्हती, त्याचे व्यवस्थापन त्या प्रदेशाच्या प्रमुखाकडे दिले होते.

साठेबाजारी आणि तोलन मापन

बाजारात सट्टेबाजारीवर प्रतिबंध घालण्यात आले होते. मदीनेच्या बाजाराची सुरुवात करताना प्रेषितांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते, ‘आमच्या या बाजारात कुणी साठेबाजारी करु नये. असे करणाऱ्याला तीच शिक्षा दिली जाईल जी अल्लाहच्या संदेशात प्रक्षेप करणाराला दिली जाते.’ बाजारातल्या तोलन-मापनातली अनियमितताही प्रेषितांनी दूर केली होती. कुरआननेच याविषयी स्पष्ट आदेश दिला आहे. सूरह अल्मुतअफीन मध्ये काटा मारणाऱ्या आणि वस्तूंचे वजन कमी तोलणाऱ्यांची निंदा करण्यात आली आहे. याविषयी कुरआनमध्ये अनेक नियम सांगितले आहेत.

प्रेषितांनी बाजारात तोलन-मापनाची व्यवस्था एकसारखी असावी यासाठी काही नियम केले होते. डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, ‘बाजाराला चांगल्या पध्दतीने चालवण्यासाठी बाजारातील तोलन मापनाची पध्दत एकसारखी असणे गरजेचे असते. जर प्रत्येक व्यक्ती तोलन-मापनासाठी वेगवेगळे परिमाण वापरायला लागला की, बाजारातील वजन तोलनाची प्रक्रिया न्यायी राहणार नाही. प्रेषितांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला. वजन मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या परिमाणांचे परीक्षण करुन त्याला बाजारात लागू केले. आणि सर्वांना हेच परिमाण वापरणे बंधनकारक केले होते.’  दुसऱ्या शहरांमध्ये तोलन मापनाच्या या प्रक्रियेत काहीसे बदलही केलेले होते. 

समारोप

इस्लाम हे जीवनवादी तत्त्वज्ञान आहे. जीवनाला आधिकाधीक निकोप करण्यासाठी इस्लामने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. आणि काही नियम सांगितले आहेत. इस्लामने जीवनातल्या सर्वप्रकारच्या शोषणाला नाकरून नव्या व्यवस्थेची संकल्पना समोर ठेवली आहे. बाजार हे जीवनाची गरज पूर्ण करणारे माध्यम आहे. त्यामुळे बाजाराचे नियमन ही त्याकाळातील अपरिहार्य गरज होती. इस्लामने अर्थकारण आणि बाजाराचे नियमन सांगून आर्थिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.

-सरफराज अहमद

(लेखक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत.)



- प्रा. अब्दुर्रहमान शेख (संकलक)

पैगंबर मुहम्मद (स.) हे दिव्य प्रकाशाकडे नेणारा प्रकाश होते. त्यांच्या पवित्र जीवनाचा चिकित्सक अभ्यास करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांची शिकवण कशी कालातित आहे, हे सत्य उलगडते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनोदि्दष्टांची भव्यता, साधनसामग्रीची कमतरता आणि धर्मप्रचाराच्या अल्पशा कालावधीत त्यांनी महानतम यश संपादन केले. याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येते.

पैगंबर (स.) यांनी धर्म वेदी, देवी-देवता, धर्मकल्पना, विचारप्रणाली, श्रद्धा तसेच तत्कालीन एकतृतीयांश लोकांचे आत्मेसुद्धा हलवून सोडले, याचे विवेचन या ग्रंथात आले आहे. एका वेगळया प्रकारे या पुस्तकाची मांडणी केली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 225   -पृष्ठे - 304     मूल्य - 150        आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/wzgip9tu8xyluoxpt8h4l8ohjv7vxtco


माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे,

तुफैल बिन अम्र (रजि.) अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाले आणि सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दौस कबिल्याच्या लोकांनी अवज्ञा केली आणि नाकारले म्हणून  तुम्ही त्या लोकांना शापित करावे, असा लोकांचा विचार आहे.’’ यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह! दौसच्या लोकांना मार्गदर्शन प्रदान कर आणि त्यांना माझ्याजवळ पाठव.’’ (हदीस :  बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे हे अल्लाह, मी प्रार्थना करतो की दौस कबिल्याच्या लोकांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे आणि ते सर्व तुझे आज्ञाधारक मुस्लिम बनून जावेत आणि त्या लोकांनी माझी अवज्ञा करू नये.   पैगंबरांची सर्वश्रेष्ठ अभिलाषा हीच असते की मार्गभ्रष्ट लोकांनी सन्मार्गावर मार्गस्थ व्हावे आणि मार्गदर्शनरुपी संपत्ती त्यांच्या नशिबी यावी जी मानवी जीवनाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.  ईशदासांचा कल्याणभाव पैगंबर व नबींच्या हृदयात सामावलेला असतो. खरे तर हे ईशप्रेमाचे प्रतीक तसेच ईशप्रेमाची अपेक्षा असते की ईशदासांशी घनिष्ट संबंध तुमचा असावा. त्यांच्याशी  प्रेम करावे आणि त्यांच्या भल्यासाठी व कल्याण करण्यासाठी सतत कार्यरत राहावे.


माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा दुराचाऱ्याची स्तुती केली जाते तेव्हा अल्लाह रागावतो आणि त्यामुळे सिंहासन हलू लागते.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण : असे यासाठी की जो मनुष्य अल्लाहच्या आदेशांचा आदर करीत नाही आणि त्याच्या आदेशांना उघडपणे नाकारतो तेव्हा  तो अब्रू व प्रतिष्ठेस पात्र राहात नाही. त्याच्याकडे घृणेनेच पाहिले जावे हाच त्याचा अधिकार आहे. आता जर मुस्लिम समाजात  त्याला प्रतिष्ठा प्राप्त असेल तर याचा अर्थ हा आहे की लोकांमध्ये आपल्या ‘दीन’ (जीवनधर्म), अल्लाह व पैगंबरांवर प्रेम बाकी  राहिलेले नाही अथवा असेल तर फारच क्षुल्लक प्रमाणात आहे. अशा स्थितीत अल्लाहला राग येणारच, हे उघड आहे. त्याची कृपा  त्या जनसमुदायावर कशी होऊ शकेल.
माननीय अबू बकरा (रजि.) यांच्या कथनानुसार, ते म्हणतात, एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या  उपस्थितीत स्तुती केली, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तू आपल्या बंधुची मान कापली याचा मला खेद वाटतो. (हे वाक्य पैगंबरांनी तीन  वेळा म्हटले.) तुमच्यापैकी जो मनुष्या एखाद्याची स्तुती करीत असेल आणि असे करणे आवश्यक असेल तर अशाप्रकारे म्हणावे,  ‘मला अमुक मनुष्याच्या बाबतीत असे वाटते आणि अल्लाहला हे माहीत आहे.’ या अटीवर की वास्तवात त्याला तसे वाटत असावे  की तो मनुष्य अशाप्रकारचा आहे आणि एखाद्या मनुष्याची स्तुती अल्लाहच्या तुलनेत करू नका.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सभेत एक मनुष्याचा संयम व त्याच्या चांगल्या स्थितीची स्तुती करण्यात आली होती.  अशा परिस्थितीत मनुष्य धोक्यात पडण्याची भीती होती, त्यामुळे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मनाई केली आणि म्हटले, ‘‘तू  आपल्या बंधुचा गळा कापला.’’ मग पैगंबरांनी उपदेश दिला की जर एखाद्या मनुष्याच्या बाबतीत काही सांगणे भागच असेल तर  अशाप्रकारे म्हणा, ‘‘मी अमुक मनुष्याला सदाचारी समजतो’’ आणि असे म्हणू नका की अमुक मनुष्य अल्लाहचा मित्र (वली) आहे  अथवा अमुक व्यक्ती निश्चितच स्वर्गात जाणार आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करण्याचा कोणा अल्लाहच्या दासाला अधिकार नाही,  कारण हे सांगणे कठीण आहे की ज्याला तो स्वर्गवासी म्हणत आहे तो अल्लाहच्या दृष्टीतदेखील स्वर्गवासी आहे किंवा नाही? पर्यंत  मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत तो ‘ईमान’च्या परीक्षास्थळात आहे. कधी मनुष्याचे मन बदलेल आणि तो सरळमार्ग सोडून दुसरीकडे  जाईल हे सांगता येत नाही. म्हणून एखाद्या जिवंत सदाचारी मनुष्याच्या बाबतीत खात्रीपूर्वक एखादा दृढ निर्णय घेतला जाऊ नये आणि मृत्यूनंतरदेखील एखाद्याच्या बाबतीत ‘‘तो स्वर्गवासी आहे’’ असे म्हणू नये.
इस्लामी धर्मपंडितांच्या मते जर एखाद्या मनुष्याने बंडखोरी करण्याचे भय नसेल आणि सद्यस्थिती पाहता त्याच्यादेखत त्याचे ज्ञान  व संयम वगैरेची स्तुती केली जाऊ शकते. परंतु असहाय व्यक्तीने यापासून अलिप्त राहिले पाहिजे, कारण बंडखोरी करणे अथवा न  करण्याबाबतचा निर्णय अल्लाहच करू शकतो. कोणाच्या अंतर्गत स्थितीबाबत सर्वसाधारणपणे बरोबर अंदाज येऊ शकत नाही.
खोटी साक्ष
माननीय खरीम बिन फातिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सकाळच्या नमाजचे नेतृत्व केले आणि जेव्हा  लोकांकडे वळले तेव्हा बसून राहण्याऐवजी पैगंबर सरळ उभे राहिले आणि तीन वेळा म्हणाले, ‘‘खोटी साक्ष देणे आणि अनेकेश्वरत्व  अवलंबिणे दोन्ही सारखेच पाप आहे.’’ मग पैगंबरांनी पुढीलप्रमाणे उच्चार केला, ‘‘फज्तनिबुर्रिजसा आखीर तक.’’ (तुम्ही अपवित्रता म्हणजे मूर्तींपासून दूर राहा आणि खोटे बोलण्यापासून दूर राहा आणि अल्लाहकडे लक्ष वेंâद्रित करा, अनेकेश्वरत्व सोडून  एकेश्वरत्वाचा अवलंब करा.) (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘सूरह हज’ची ज्या आयतीचे पठण केले त्यात ‘कौल़ज़्जूर’ हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ  आहे खोटे म्हणणे आणि खोटे बोलणे प्रत्येक ठिकाणी वाईट आहे, मग ते न्यायालयात न्यायाधीशासमोर बोललेले असो की एखाद्या  दुसऱ्या ठिकाणी.
पाहा, खोटी साक्ष किती मोठे पाप आहे, परंतु मुस्लिमांच्या दृष्टीत हे पाप आता पाप राहिले नसून ती एकप्रकारची ‘कला’ बनली  आहे. आम्ही न्यायालयात आपल्या ‘ईमान’च्या दबावाखाली खरी साक्ष देण्याचे धाडस करतो, म्हणून आम्ही त्यांच्यादरम्यान मूर्ख  समजले जात आहोत.

मानवी शरीर अनेक अवयवांचे मिळून बनले असले तरी त्याच्या प्रत्येक अवयवाचे महत्त्व एकसारखे नाही. त्याचप्रमाणे भक्तीचे अनेक अंग आहेत आणि त्यांच्यापैकी प्रत्येक भागाचे महत्त्वसुध्दा एकसारखे नाही. जसे मानवी शरीरात मेंदू, हृदय यांचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भक्तीमध्येसुध्दा इस्लामनुसार, नमाज, रोजा, हज यांचे विशेष महत्त्व आहे. हे इस्लामचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या विशेष महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१) त्यांचा संबंध प्रत्यक्ष निर्मात्याशी आहे. ते सर्व अल्लाहसाठीच आहेत. या भक्तीत एकीकडे अल्लाह आणि दुसरीकडे मनुष्य (भक्त) असतात. दुसरीकडे मात्र परिस्थिती याविरुध्द असते. यातसुध्दा अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच भक्ती असते तरीपण अल्लाह आणि मनुष्याच्या दरम्यान दुसरा कुणीतरी (दलाल) असतो. त्या दलालांविना ती भक्ती अथवा पूजा पूर्ण होऊच शकत नाही. मनुष्य जेव्हा इस्लामचे आधारस्तंभ असलेले उपासनाविधी (नमाज, रोजा, हज, जकात) इ. पार पाडताना त्याचा अल्लाहशी प्रत्यक्ष संबंध येतो. जेव्हा तो न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो तेव्हा इस्लामी आदेशांचे पालन आणि अल्लाहची प्रसन्नता त्याद्वारे प्राप्त करणे हेच ध्येय असते. हाच व्यवहार इतर ठिकाणीसुध्दा असतो. त्याच्या जीभेद्वारे, हात, पाय याद्वारे अशाच प्रकारचे कृत्य घडत असते.
२) इस्लामचे या आधारस्तंभांचे स्वतंत्र असे स्वरूप आहे आणि त्यांच्यावर भक्तीचा शिक्का मारला गेला आहे. प्रथमदर्शनी असे वाटते की या उपासनापध्दती म्हणजे फक्त भक्ती (पूजा, उपासना) आहेत इतर काहीच नाही. इतर व्यवहार हे या प्रकारात मोडत नाहीत. कारण त्यांच्यावर तो भक्तीचा शिक्का मारलेला नसतो आणि याचमुळे अशा या इतर कृत्यांना अल्लाहची भक्ती म्हणून संबोधले जात नाही.
३) इस्लामच्या आधारस्तंभाचे स्वतःचे असे स्वरुप आहे आणि विशेष गुण आहेत ज्यामुळे आज्ञाधारकता आणि विनम्रता हे गुण मनुष्यात जोपासले जातात. परंतु दुसऱ्या कृतींमध्ये हा गुण त्या प्रमाणात नाही. इतर सदाचारांमध्ये हे गुण आहेत त्यांच्यामुळे स्वतःचे अंतकरण निर्मळ बनते. प्रार्थनेसाठीची इच्छा उत्कट बनते आणि अल्लाहच्या संबंधांना बळकटीसुध्दा प्राप्त होते. या इस्लामच्या आधारस्तंभाद्वारे आध्यात्मिक शक्ती जशी प्राप्त होते तशी इतर कृतींनी प्राप्त केली जाऊ शकत नाही. इस्लामच्या आधारस्तंभाव्यतिरिक्त ती आध्यात्मिक शक्ती प्राप्त होऊच शकत नाही ज्याद्वारे आपण खरी भक्ती करू शकू. याच कारणांमुळे इस्लामच्या या आधारस्तंभांना (नमाज, रोजे, जकात, हज इ.) अनिवार्य ठरविले आहे. आणि त्याचे स्वरुप आणि नियमांना स्पष्ट करण्यात आले आहे जेणेकरून सर्व मुस्लिमांनी खरी भक्ती पार पाडून शक्तीस्रोत प्राप्त करून घ्यावा. इस्लामचे आधारस्तंभ निर्विवादपणे भक्तीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्यावर इतर घटकांचे अस्तित्व अवलंबून आहे.
इस्लाम आधारस्तभांचे हे महत्त्व लक्षात ठेवले तर आढळून येते की त्यांचा आणि अल्लाहच्या भक्तीचा विशेष संबंध आहे. हे संबंध त्याना विशेष महत्त्व देते ज्यामुळे प्रथमतः त्यांना भक्ती रूप फक्त दिले जाते आणि भक्तीचे दुसरे रूप इस्लामच्या या आधारस्तंभांना समजले जाते. हे काही अयोग्य आणि असंबंधित असे मुळीच नाही. हे मान्यताप्राप्त परिभाषा नियामांनुसारच आहे. इस्लाम ईशधर्म आहे आणि त्याच्या पूर्वीचे सर्व ईशधर्म इस्लाम होते. हे तत्त्व येथे कार्यान्वित आहे. धर्माच्या प्रत्येक कृत्याला पार पाडणे ही भक्ती आहे. जसे नमाज, रोजा, जकात आणि हज इ. उपासनाविधींना पार पाडणे होय. हे समजणे अयोग्य आहे की भक्ती म्हणजे फक्त नमाज, रोजा, जकात आणि हज आहेत आणि इतर कृती भक्ती बाह्य आहेत.

प्रेषितांना ओळखण्याचे पुरावे कोणते आहेत व प्रेषिताची वास्तवता काय आहे.? तुम्ही हे पाहता की जगात माणसाला ज्या ज्या वस्तूंची गरज असते. अल्लाहने त्या सर्वांची व्यवस्था स्वतःच केलेली आहे. मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला किती साधनसामग्री देऊन जगात धाडण्यात येते. बघण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, वास घेण्यासाठी तसेच श्वासोच्छवासासाठी नाक, स्पर्शज्ञानासाठी शरीराच्या त्वचेतील स्पर्शाची संवेदना, चालण्यासाठी पाय, काम करण्यासाठी हात, विचारचिंतन करण्यासाठी मेंदू आणि अशाच प्रकारच्या इतर अगणित बाबी, पूर्वयोजनेनुसार त्याच्या सर्व गरजांचा साकल्याने विचार करून त्या चिमुकल्या देहात समाविष्ट केलेल्या असतात. नंतर जेव्हा तो जगात येतो तेव्हा त्याच्या जीवनास आवश्यक असलेल्या गोष्टी इतक्या विपुल प्रमाणात त्याला उपलब्ध होतात ज्यांची मोजदादही तुम्ही करू शकत नाही. हवा, पाणी, प्रकाश, उष्णता, जमीन व मातेचे वक्षस्थळात आधीच निर्माण झालेले दूध, माता पित्यांच्या नातेवाईकांच्या व इतरांच्या अंतःकरणातही त्याच्याबद्दल उत्पन्न होणारी माया व प्रेम, निर्माण केले जाते, ज्यांच्याद्वारा त्याचे पालनपोषण व संगोपन केले जाते. मग जसजसा तो वाढत जातो तसतसे त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी हरप्रकारच्या वस्तू त्याला प्राप्त होत जातात. असे वाटते की, जणू काय पृथ्वीवरच्या व आकाशातील सर्व शक्ती त्याच्या संगोपनासाठी व सेवेसाठी कार्यरत आहेत.

यानंतर आणखी पुढे चला. जगात कार्य करण्यासाठी ज्या क्षमता आवश्यक असतात त्या सर्व माणसाला दिल्या आहेत. शारीरिक शक्ती, बुद्धी व आकलनशक्ती, वाक्शक्ती व अशाच प्रकारच्या इतर अनेक क्षमता प्रत्येक माणसात कमीजास्त प्रमाणात असतात. परंतु या बाबतीत ईश्वराची व्यवस्था एक अजब प्रकारची आढळते. त्याने सर्व प्रकारच्या क्षमता सर्व माणसांना सारख्या प्रमाणात दिलेल्या नाहीत. जर असे झाले असते तर कोणीही कोणाचा गरजू राहिला नसता व कोणीही कोणाची पर्वा केली नसती. म्हणून अल्लाहने सर्व माणसांच्या एकूण गरजांसाठी सर्व क्षमता माणसामध्येच निर्माण केल्या असल्या तरी अशा रीतीने एका माणसाला एक विशिष्ट क्षमता अधिक प्रमाणात दिली तर दुसऱ्या माणसाला वेगळी क्षमता अधिक प्रमाणात दिली. तुम्ही हे पाहता की काही माणसांमध्ये शारीरिक श्रम करण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक असते. काही माणसात एखाद्या विशिष्ट कलेची अगर विशिष्ट व्यवसायाची उत्पन्न क्षमता असते व बाकीचे त्यापासून वंचित असतात. काही माणसे इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. काही माणसे उपजत सेनापती असतात. काही माणसात विशिष्ट शासकीय योग्यता असते. काही माणसे असामान्य वक्तृत्वाची क्षमता घेऊन जन्माला येतात. काही माणसांमध्ये लेखन कलेचे अचाट सामर्थ्य स्वाभाविकतःच असते. एखादा मनुष्य असा जन्मतो की त्याची बुद्धी गणितशास्त्रात अत्यंत तीक्ष्ण असते. ती इतकी की, या शास्त्रातील अत्यंत कठीण प्रश्न व समस्यांची तो अशी चुटकीसारखी सोडवणूक करतो जी इतरांच्या आवाक्याबाहेर असते. दुसरा एखादा मनुष्य असा होऊन जातो जो अद्भूत वस्तु निर्माण करतो व त्यांना पाहून सर्व जग आश्चर्याने थक्क होऊन जाते. आणखी एखादा मनुष्य अशी अपूर्व कायदेविषयक निपुणता बाळगतो की वर्षानुवर्षे कायद्यातील एखाद्या समस्येवर चिंतन केल्यानेही ती सुटू शकत नाही, अशा समस्येवर त्याची दृष्टी आपोआपच पडते. या सर्व ईश्वरी देणग्याच होत. कोणीही आपल्यामध्ये अशा प्रकारच्या क्षमता स्वतः निर्माण करु शकत नाही. शिक्षण व संस्काराने या गोष्टी उत्पन्न होऊ शकत नाहीत. खरे तर या सर्व उपजत क्षमता असून ईश्वर आपल्या चातुर्यानेच त्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीलाच त्या प्रदान करतो.

ईश्वराच्या या देणग्यांवरही विचार व चिंतन केल्यास असे आढळून येते की, मानवी संस्कृतीसाठी ज्या योग्यता व क्षमतांची गरज जास्त प्रमाणात असते, त्या जास्त माणसात निर्माण होतात आणि ज्या क्षमतेची गरज कमी प्रमाणात असते त्या क्षमता कमी लोकांत आढळून येतात. शिपाई जास्त तयार होतात. किसान, सुतार, लोहार व अशाच प्रकारची इतर कामे करणारी माणसे बहुसंख्येने तयार होतात. परंतु विद्वान व बौद्धिक सामर्थ्य असणारे कमी असतात. तसेच सेनापतित्व व राजकीय थोर योग्यता असणारे थोड्या प्रमाणांत जन्माला येतात. जे एखाद्या कलेत व शास्त्रात अत्यंत व असामान्य ज्ञान व क्षमता बाळगतात ते अत्यंत दुर्लभ असतात. कारण त्यांच्या कर्तृत्वाने मानवजातीला शतकानुशतकापर्यंत त्यांच्यासारख्या विद्वानांची गरज उरत नाही.

जनमानसातून इंजिनियर, गणितज्ञ, वैज्ञानिक व कायदेपंडित, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व भिन्न भिन्न व्यवस्थांची क्षमता बाळगणारे लोकच जन्माला यावेत; केवळ हीच एक गरज मानवजातीला या जगात यशस्वी व सफल होण्यासाठी नाही, याचाही विचार व्हायला हवा. या सर्वांहून मोठी आणखी एक गरज आहे व ती अशी की माणसांना ईश्वराचा मार्ग दाखविणाराही कोणीतरी हवा. इतर लोक तर केवळ इतकेच दाखविणारे आहेत की, जगात मनुष्यासाठी काय काय आहे व त्यांचा कशारीतीने वापर व उपयोग केला जाऊ शकतो. परंतु खुद्द माणसाचे अस्तित्व जगात कशासाठी आहे, हे सांगणारा व दाखवून देणाराही कोणीतरी पाहिजेच. तसेच मनुष्याला विश्वातून ही सर्व साधन-सामग्री कोणी प्रदान केली? त्या प्रदान करणाऱ्याची इच्छा काय आहे? हे ही सांगणारा पाहिजेच, जेणेकरून मनुष्याने त्यानुसार आचरण करून निश्चित व शाश्वत सफलता प्राप्त करावी. ही मनुष्याची वास्तविक व सर्वांत मोठी गरज आहे. ज्या ईश्वराने आमची लहानसहान गरज पुरी होण्याची परिपूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे, तो ईश्वर इतक्या महत्त्वपूर्ण गरजेची पूर्तता करण्याबाबत बेसावध असेल; ही गोष्ट मान्य करण्यास बुद्धी नकार देते. असे कदापिही नाही. ज्या प्रकारे ईश्वराने प्रत्येक विद्येची प्रत्येक कलेची व विज्ञानाची योग्यता व क्षमता बाळगणारी माणसे जन्माला घातली त्याचप्रमाणे अशा माणसांनाही जन्माला घातले ज्यांच्यात खुद्द ईश्वरालाच ओळखण्याची सर्वोच्च पात्रता होती. ईश्वराने त्यांना ‘‘दीन’’ (जीवनधर्म), नैतिकता व आचारशास्त्र (शरिअत) चे ज्ञान आपल्याकडून दिले व इतरांना त्यानी या गोष्टींची शिकवणूक द्यावी या सेवा कार्यासाठी त्यांना नियुक्त केले. हेच ते लोक होत ज्यांना आमच्या भाषेत ‘‘नबी’’ अथवा ‘‘रसूल’’ किंवा ‘‘प्रेषित’’ (ईशदूत, संदेष्टा) असे म्हटले जाते.

प्रेषितांची ओळख
ज्याप्रमाणे अन्य विद्या व कलांमध्ये नैपुण्य व कौशल्य असणाऱ्या व्यक्तीमध्ये विशेष प्रकारची बुद्धी व विशिष्ट प्रकारची मनोवृत्ती उपजतच असते, अगदी त्याचप्रमाणे प्रेषितसुद्धा एक विशिष्ट मनोवृत्ती घेऊनच जन्माला येतात.
एखाद्या जन्मजात कवीचे काव्य ऐकल्यावर आमच्या चटकन लक्षात येते की त्याच्यामध्ये उपजतच काव्यप्रतिभा आहे, कारण इतरांनी हवा तितका प्रयत्न करूनही तशी काव्यरचना त्यांना साधत नाही. त्याचप्रमाणे एखादा जन्मजात वक्ता, एखादा जन्मजात प्रतिभासंपन्न लेखक, एखादा जन्मजात संशोधक, एखादा उपजत नेतृत्वगुण असणाऱ्याची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे स्पष्टपणे पटते. कारण हे सर्व त्यांच्या अंगी असलेल्या अनन्यसाधारण योग्यतेची चमक प्रकट करतात जी इतर लोकांत नसते. ठीक अशीच स्थिती प्रेषितांचीही असते. त्यांची बुद्धिमत्ता अशा गोष्टींची उकल करते जी इतरांच्या कल्पना-विचारातही नसते. तो अशा विषयांचे विवरण करतो ज्याचे विवरण व विश्लेषण त्यांच्याखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही. त्यांची दृष्टी अशा सूक्ष्म बाबीपर्यंत खोलवर जाते जेथे इतरांची दृष्टी वर्षानुवर्षाच्या चिंतनानंतरही पोहोचू शकत नाही. तो जे काही सांगतो त्याचा आपली बुद्धी स्वीकार करते आणि आपले मन अशी ग्वाही देते की, अवश्य हेच सत्य आहे. जगातील अनुभवावरून व ब्रह्मांडातील निरीक्षणावरून त्यांची प्रत्येक गोष्ट खरी असल्याचे सिद्ध होते. परंतु आपण स्वतःच तशा गोष्टी सांगण्याची इच्छा करू लागलो तर आम्ही ते सांगू शकत नाही. यानंतर त्याची मनोवृत्ती इतकी सोज्वळ, सात्विक व पवित्र असते की तो प्रत्येक व्यवहारात सचोटीचा सद्वर्तनी व सालसपणाचा मार्ग अंगीकार करणारा असतो तो कधीही चुकीची गोष्ट उच्चारत नाही, कसलेही दुष्कर्म करीत नाही आणि सतत चांगुलपणा व सत्यनिष्ठेची शिकवण देत असतो. इतरांना तो जे काही सांगतो त्यावर स्वतः आचरण करून दाखवितो. त्याच्या जीवनात असे एकही उदाहरण आढळून येत नाही की त्याच्या उक्तीविरुद्ध त्याची कृती आहे. त्याच्या कथनात व कृतीत कसलेही स्वहित आढळत नाही. तो इतरांच्या भल्यासाठी स्वतः हानी पत्करतो आणि स्वतःच्या भल्यासाठी इतरांचे नुकसान कदापिही करीत नाही. त्याचे संपूर्ण जीवन सचोटी, सभ्यपणा, पावित्र्य, उच्च व उदात्त विचारसरणी तसेच पराकोटीच्या उच्च माणुसकीचा एक आदर्श असतो. त्यामध्ये शोधूनही कसला दोष आढळत नाही. हे सर्व माहीत झाल्यानेच स्पष्टपणे ओळखता येते की हा मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे.

माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चार गुणवैशिष्ट्ये ज्या मनुष्यात असतील तो पक्का धर्मद्रोही असेल आणि ज्या मनुष्यात त्यापैकी कोणतेही एक गुणवैशिष्ट्य असेल तर त्याच्यात शत्रुत्वाचे एक गुणवैशिष्ट्य असेल, तर ते त्याने सोडून द्यावे. ती चार गुणवैशिष्ट्ये अशी आहेत- जेव्हा त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली तर त्यात अफरातफर करणे, खोटे बोलणे, वचन दिले तर ते न पाळणे आणि जेव्हा त्याचे कुणाशी भांडण झाले तर शिवीगाळ करणे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)


माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत मोठा खोटारडेपणा म्हणजे मनुष्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना ती गोष्ट दाखवावी जी त्या दोन्ही डोळ्यांनी पाहिली नसेल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : म्हणजे त्याने कसलेही स्वप्न पाहिले नाही परंतु जागा झाल्यानंतर अतिशय मजेदार व चांगल्या गोष्टी सांगतो, म्हणतो की हे मी स्वप्नात पाहिले आहे, असे करणे म्हणजे आपल्या डोळ्यांद्वारे खोटे बोलविणे होय.
 माननीय असमा बिन्ते उमैस (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका पत्नीला घेऊन त्यांच्या घरी गेलो. जेव्हा आम्ही पैगंबरांच्या घरी पोहोचलो तेव्हा पैगंबरांनी दुधाचा एक ग्लास काढून आणला, मग त्यांनी आपल्या इच्छेनुसार प्यायले आणि त्यानंतर आपल्या पत्नीला दिला. त्या म्हणाल्या, ‘‘मला इच्छा नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही भूक व खोटारडेपणाला एकत्र करू नका.’’ पैगंबरांना जाणवले की आपल्या पत्नीला भूक लागलेली असूनदेखील त्या औपचारिकपणा दाखवित आहेत, म्हणून पैगंबरांनी खोट्या औपचारिकपणा दाखविण्यास मनाई केली आहे. (हदीस : मुअजम सगीर तिबरानी)
 माननीय सुफियान बिन असीद ह़जरमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आपल्या बंधुला एखादी गोष्ट सांगितली आणि त्याने तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, मात्र तुम्ही जी गोष्ट त्याला सांगितली ती खोटी होती, हा फार मोठा अप्रामाणिकपणा आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
 माननीय अब्दुल्लाह बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) आमच्या घरी आले होते तेव्हा माझ्या आईने मला बोलविले, ‘‘इकडे ये! मी तुला एक वस्तू देईन.’’ तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘तुम्ही त्यांना काय देऊ इच्छिता?’’ आई म्हणाली, ‘‘त्याला खजूर देऊ इच्छिते.’’ पैगंबरांनी आईला म्हटले, ‘‘जर तुम्ही देण्यासाठी बोलविले आणि दिले नाही तर तुमच्या कर्मपत्रात हा खोटारडेपणा लिहिला जाईल.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : सर्वसामान्यपणे आई-वडील आपल्या मुलांशी असे वागतात की काही देण्याच्या बहाण्याने बोलवितात, मात्र देण्याची इच्छा नसते, तेव्हा हा अल्लाहपाशी खोटारडेपणा ठरेल. कर्मपत्रात हा खोटारडेपणाच्या यादीत लिहिला जाईल.
 माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) सांगतात, खोटे बोलणे कोणत्याही स्थितीत वैध नाही, न गंभीरपणे आणि न गंमत म्हणून. आणि हेदेखील वैध नाही की तुमच्यापैकी कोणी आपल्या मुलाला एखादी वस्तू देण्याचे वचन द्यावे आणि ते पूर्ण न करावे. (हदीस : अल अदबुल मु़फरद, पृष्ठ ५८)
 माननीय बह़ज बिन हकीम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्दशा व दुर्दैव आहे त्या मनुष्याकरिता जो लोकांना हसविण्यासाठी खोटे बोलतो, दुर्दशा आहे त्याच्याकरिता, दुर्दशा आहे त्याच्याकरिता.’’ (हदीस: तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये त्या लोकांना सावध करण्यात आले आहे जे बोलताना काही खोट्या गोष्टींचा समावेश करून तीखट-मीठ लावून मजेदार बनवितात आणि त्यापासून आनंद घेतात.
 माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सत्यावर दृढ असणाNया मनुष्याने धर्माच्या बाबतीत वादविवाद न घातल्यास मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या कोपNयांत एका घराची जबाबदारी घेतो, आणि जो खोटे बोलणार नाही, मग ते हसण्याच्या स्वरूपात का असेना; मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या मधोमध एका घराची जबाबदारी घेतो आणि जो आपल्या नीतीमत्तेत सुधारणा घडवील, मी त्याच्यासाठी स्वर्गातील सर्वांत वरच्या भागातील घराची जबाबदारी घेतो.’’ (हदीस : अबू दाऊद)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget