Latest Post


बंधुनो! हे ज्ञान ज्याच्या गरजेविषयी मी तुम्हाला सांगत आहे त्यावर तुमचे आणि तुमच्या संततीचे मुस्लिम असणे, मुस्लिम म्हणून राहणे अवलंबून आहे. ही काही हलकी गोष्ट नाही की त्यापासून निष्काळजी बनून राहावे. तुम्ही तुमच्या शेतीवाडीच्या कामात गाफील राहात नाही. तुमच्या शेतीला पाणी देणे आणि पिकाचे रक्षण करण्यातसुद्धा गाफील राहात नाही. जनावरांना चारा देण्यात गाफील राहात नाही. तुमच्या धंद्याच्या कामात गाफील राहात नाही; ते केवळ या कारणासाठी की त्यात गाफील राहाल तर उपाशी मराल आणि प्राणासारखी प्रिय गोष्ट व्यर्थ होईल. मग मला सांगा की ते ज्ञान प्राप्त करण्यात का गाफील राहाता ज्यावर तुमचे मुस्लिम बनणे आणि मुस्लिम राहणे अवलंबून आहे? काय यात हा धोका नाही की ईमानसारखी प्रिय गोष्टनष्ट होईल? काय ईमान जिवापेक्षा अधिक प्रिय नाही? तुम्ही प्राणाचे रक्षण करण्यासाठी जितका वेळ व जितके श्रम खर्च करता तितका वेळ व त्या श्रमाचा दहावा भागसुद्धा ईमानचे रक्षण करण्यासाठी खर्च करू शकत नाही का?

मी तुम्हाला असे सांगत नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने मौलवी (धर्मपंडित) बनावे, मोठमोठ्या ग्रंथांचे अध्ययन करावे आणि आपल्या आयुष्याची दहा-बारा वर्षे शिकण्यात खर्च करावीत. मुस्लिम बनण्यासाठी इतक्या शिक्षणाची गरज नाही. माझी केवळ इतकी अपेक्षा आहे की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने रात्र व दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ एक तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा. कमीतकमी इतके ज्ञान प्रत्येक मुस्लिम मुलाला, म्हाताऱ्याला व तरुणाला प्राप्त झाले पाहिजे की पवित्र कुरआन ज्या उद्देशासाठी व जी शिकवण घेऊन अवतरित झाले आहे त्याच्या सारांशाचेज्ञान त्याला व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) जे नष्ट करण्यासाठी व त्या जागी ज्याची स्थापना करण्यासाठी या जगात आले होते त्याविषयीची चांगली ओळख प्रत्येकाने करून घ्यावी. तसेच त्या विशिष्ट जीवनपद्धतीशी परिचित व्हावे जी अल्लाहने मुस्लिमासाठी ठरवून दिली आहे. इतक्या ज्ञानासाठी काही जास्त वेळेची गरज नाही आणि ईमान (धर्मावरील विश्वास) प्रिय असेल तर त्यासाठी दररोज एक तासाची वेळ काढणे काही कठीण नाही.



माननीय अबू   सईद खुदरी (रजि.) सांगतात,

पैगंबर मुहम्मद (स.) हे पडद्यात (बुरखा) राहणाऱ्या कुमारिकेपेक्षाही जास्त लज्जाशील होते. जेव्हा एखादी अप्रिय गोष्ट त्यांना दिसल्यास तो अप्रियभाव त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असे. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे एखादी अप्रिय व स्वभावाशी प्रतिवूâल गोष्ट पाहिल्यास लज्जाशीलतेमुळे तोंजाने जरी पैगंबर मुहम्मद (स.) काही सांगत नसत, परंतु त्या अप्रियतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत असत.

पडद्यात (बुरखा) असणाऱ्या कुमारिका अति लज्जाशील व लाजाळू असतात. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात लज्जाशीलता त्यांच्यापेक्षासुद्धा अधिक होती.

५७) माननीय अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस (रजि.) सांगतात,

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वभावात अश्लीलता नव्हती आणि कोणतेच अश्लील कृत्य ते करत नसत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)



अल्लाहने धनवान मुस्लिम पुरुष व स्त्रियांवर दरवर्षी जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरवले आहे. ज्याच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किंतीची रोख रक्कम वर्षाखेरीस शिल्लक राहिल्यास त्या रकमेतून अडीच टक्के जकात अदा करायची आहे. साडेतास तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किमतीची रक्कम म्हणजे या प्रमाणापेक्षा  जितकी संपत्ती शिल्लक राहील त्या सर्व संपत्तीवर जकात द्यावी लागेल. संपत्तीमध्ये नुसती रोख रक्कम नसून व्यापारी माल, पशुधन असल्यास ते आणि शेतजमीन असेल तर त्यातील पिकांवर सुद्धा जकात द्यावी लागेल. व्यापारी मालामध्ये दुकानात, कारखान्यात वर्षाखेरीस जेवढ्या किंमतीचा माल शिल्लक राहील त्यावरसुद्धा जकात द्यावी लागते. या अर्थासंबंधी अल्लाहने जी योजना केली आहे त्याचे उद्दिष्ट असे की “जो माल अल्लाहने आपल्या प्रेषितांना (आणि त्यांच्यानंतर) मुस्लिमांना दिलेला आहे तो नातेवाईकांसाठी, अनाथांसाठी, वंचितांसाठी आणि प्रवाशांसाठी दिला जावा. कारण धनसंपत्ती फक्त धनवान लोकांमध्येच फिरत राहू नये.” (पवित्र कुरआन) जकात व्यवस्थापन आणि तिच्या वाटपासंबंधी असे म्हटले आहे की “जकात, गोरगरीबांसाठी, निराधारांसाठी आणि त्या्चया व्यवस्थापनावर जे कर्मचारी नियुक्त केले जातात त्यांच्यासाठी आणि ज्यांची दिलजमाई करावयाची आहे अशांसाठी तसेच जे गुलामगिरीत खितपत पडलेले आहेत त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी आहे.” (पवित्र कुरआन-९:६०) जकात तर अनिवार्य कर्तव्य आहे ती द्यावीच लागेल, जशी नमाज अदा करावी लागते, उपवास करावा लागतो तसेच त्याव्यतिरिक्त इतर दानधर्मही करावे लागतात. आणि किती दानधर्म करावा त्यास मर्यादा नाही. “ते विचारतात, काय खर्च करावा? याचे उत्तर अल्लाह देतो की आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करून जे काही शिल्लक राहील ते सर्व दानधर्मात खर्च करून टाकावे.” (पवित्र कुरआन) जकात आणि दानधर्म मानवाधिकार आहेत आणि उपासना, नमाज रोजा हे अल्लाहचे अधिकार आहेत. दोन्हींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. दानधर्म इस्लामी व्यवस्थेचा मूळ गाभा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद



माणसांच्या चुकांचे दोन प्रकार आहेत. एक असे कृत्य आणि चुका ज्या अल्लाहच्या अधिकारांविरूद्ध असतात. दुसऱ्या प्रकारच्या चुका म्हणजे ज्या अल्लाहच्या निर्मिती- माणूस असो की पशू-पक्षी, त्यांच्या हक्कांविरूद्ध केल्या जातात. इतर माणसे आणि सजीव निर्मितीच्या हक्कांविरूद्ध जे कृत्य माणसे करतात त्या गुन्ह्यांना अल्लाह क्षमा करत नाही. अशा अपराधांना माफ करण्याचा अधिकार ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार केला गेला असेल त्यांना आहे. माणसाविरूद्ध आणि इतर सजीवांविरूद्ध अत्याचार करणे म्हणजे अल्लाहच्याही अधिकारांचे हनन करणे होय. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की एका माणसाला फक्त या कारणावरून नरकात टाकले जाईल की त्याने एका मांजराला बांधून ठेवले होते. आणि त्याच्या खाण्यापिण्याची सोयदेखील केली नव्हती. एकेठिकाणी प्रेषितांनी असेही सांगितले आहे की जे पशुपक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत नाहीत, प्राण्यांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेतात त्यांना भयंकर शिक्षा मिळेल. झाडांना विनाकारण तोडण्यासही प्रेषितांनी मनाई केली आहे. जर माणसाने कुणास त्रास दिला असेल तर त्याची माफी मागण्याने प्रकरण संपून जाते, मात्र जर कुण्या माणसाने इतरांच्या मालमत्तेवर कब्जा केला असेल, त्यांचे अधिकार त्यांना परत देत नसेल तर फक्त क्षमा मागणे पुरेसे नसून त्यांना त्यांची मालमत्ता परत करावी लागेल. एकमेकांवर रागावण्याचीही मनाई आहे. कुरआनात म्हटले आहे की “जे लोक टंचाईत असोत की त्यांना भरभराट लाभलेली असो, दोन्ही अपस्थांमध्ये अल्लाहच्या निर्मितीवर खर्च करतात, आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करतात, असे लोक अल्लाहला आवडतात.” (कुरआन-३:१३४) श्रद्धावंतांना संबोधून अल्लाह म्हणतो की, “अल्लाहच्या बाजूने न्यायाची साक्ष देण्यास उभे राहा. एखाद्या जनसमूहाशी शत्रुत्व तुम्हाला त्याच्यावर अन्याय करण्यास प्रवृत्त करता कामा नये. न्याय करा, हा सदाचार आहे. अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही जे काही करता अल्लाहला ते माहीत असते.” (कुरआन-५:८)

- सय्यद इफ्तिखार अहमद



आपण म्हणतो की इस्लाम स्वीकारल्यास मनुष्य मुस्लिम बनतो. प्रश्न असा आहे की इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ काय आहे?काय इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की माणसाने केवळ जिभेने सांगावे की मी मुस्लिम आहे अथवा मुस्लिम झालो आहे, तर काय तो मुस्लिम होतो? अथवा इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण पुजारी काहीही अर्थ न समजता उमजता संस्कृतच्या काही मंत्रांचे पठण करतो, तसेच एका मनुष्याने अरबी भाषेतील काही वाक्ये अर्थबोध न होता जिभेने उच्चारले आणि बस्स, तो मुस्लिम झाला? तुम्ही स्वत: सांगा की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही स्वत: म्हणाल की इस्लामचा स्वीकार करण्याचा अर्थ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जी शिकवण दिली आहे तिचा माणसाने समजून उमजून मनापासून स्वीकार करावा आणि त्यानुसार कृती करावी. जो असे करील तो मुस्लिम आहे आणि जो असे करणार नाही तो मुस्लिम नाही.

प्रथम आवश्यकता - ज्ञान

जे उत्तर तुम्ही द्याल त्यावरून आपोआपच हे स्पष्ट होते की इस्लाम प्रथमत: ज्ञानाचे नाव आहे आणि ज्ञानानंतर कर्म अथवा कृतीचे नाव आहे. एखादा मनुष्य ज्ञानाशिवायसुद्धा ब्राह्मण असू शकतो, कारण त्याचा जन्म ब्राह्मण म्हणून झाला आहे आणि तो ब्राह्मणच राहील. एखादा मनुष्य ज्ञान नसतानाही जाट असू शकतो, कारण तो जाट म्हणून जन्मला आहे आणि तो जाटच राहील. परंतु एखादा मनुष्य ज्ञानाशिवाय मुस्लिम असू शकत नाही कारण मुस्लिम जन्मत: मुस्लिम असत नाही तर तो ज्ञानाने मुस्लिम बनतो. जोपर्यंत त्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कोणती शिकवण दिली आहे हेज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तो त्यावर ईमान धारण कसे करू शकेल? आणि त्यानुसार कसे कर्म करू शकेल? आणि जर त्याने समजून उमजून ईमान धारण केले नसेल तर तो कसा मुस्लिम होऊ शकेल? म्हणून अज्ञानासह मुस्लिम असणे आणि मुस्लिम म्हणून राहणे अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य ज्याने मुस्लिमाच्या घरी जन्म घेतला आहे, ज्याचे नाव मुस्लिमासारखे आहे, जो मुस्लिमासारखे वस्त्र परिधान करतो आणि जो स्वत:ला मुस्लिम म्हणवितो, वास्तविकत: तो मुस्लिम नाही. खऱ्या अर्थाने मुस्लिम तर केवळ तो मनुष्य आहे जो इस्लामचे ज्ञान बाळगतो आणि समजून उमजून त्याला मानतो. एक अनेकेश्वरवादी व एक मुस्लिमात मौलिक अंतर नावाचे नाही. तो रामप्रसाद आहे आणि हा अब्दुल्लाह आहे, म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम. अशाप्रकारे एक अनेकेश्वरवादी व एका मुस्लिमात मौलिक फरक पोषाखाचासुद्धा नाही की तो धोतर नेसतो आणि हा विजार घालतो म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम! तर मूळ फरक या दोहोंमध्ये ज्ञानाचा आहे. तो अनेकेश्वरवादी अशासाठी आहे की त्याला माहीत नाही की अल्लाहचा त्याच्याशी व त्याचा अल्लाहशी काय संबंध आहे? त्याला माहीत नाही की सृजनकर्त्याच्या इच्छेनुसार या जगात जीवन व्यतीत करण्याचा सरळमार्ग कोणता आहे? अशीच स्थिती एखाद्या मुस्लिमाच्या मुलाचीसुद्धा असेल, तर तुम्हीच सांगा की त्याच्यात आणि एक अनेकेश्वरवाद्यामध्ये कोणत्या आधारे फरक कराल आणि म्हणाल की तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम आहे?

बंधुनो! हे मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि शांत मनाने यावर विचार करा. हे चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजे की अल्लाहची ही सर्वांत मोठी देणगी आहे ज्यावर तुम्ही आभार व कृतज्ञता व्यक्त करता ती प्राप्त होणे अथवा प्राप्त न होणे, हे ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञान नसेल तर ही देणगी त्याला प्राप्तच होऊ शकत नाही. समजा थोडी बहुत प्राप्तसुद्धा झाली तर अज्ञानामुळे सदैव ही भीती असते की ही वैभवशाली देणगी त्याच्या हातातून निसटून जाईल. केवळ अज्ञानामुळे तो स्वत:ला मुस्लिम समजत राहील, वास्तविकत: तो मुस्लिम नसेल. ज्या माणसाला ही जाणीवच नसेल की इस्लाम व अनेकेश्वरवादात काय फरक आहे आणि इस्लाम व बहुदेववादात काय अंतर आहे, त्याची स्थिती तर अगदी अशी आहे जणू एखादा मनुष्य अंधारात एखाद्या पायवाटेवरून चालत आहे. सरळ रेषेवर चालता चालता स्वत: त्याचे पाय एखाद्या अन्य मार्गाकडे वळणे शक्य आहे आणि त्याला सरळ मार्गावरून भटकल्याची कल्पनासुद्धा येत नाही. असेसुद्धा शक्य आहे की मार्गात एखादा धोकेबाज उभा असेल आणि त्याने म्हणावे की तुम्ही अंधारात मार्गावरून भटकला आहात, या मी तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत पोहचवितो. बिचारा अंधारातून प्रवास करणारा स्वत:च्या डोळ्याने पाहू शकत नाही की सरळमार्ग कोणता आहे. म्हणून तो अज्ञानाने आपला हात त्या धोकेबाजाच्या हातात देईल आणि तो त्याला मार्गभ्रष्ट करून कोठल्या कोठे घेऊन जाईल. त्या माणसाला या अडचणी तर अशासाठी येतात की त्याच्या स्वत:जवळ कोणताही प्रकाश नाही आणि तो स्वत: आपल्या मार्गावरील खुणा पाहू शकत नाही. त्याच्याजवळ प्रकाश असता तर हे स्पष्ट आहे की तो मार्गही चुकला नसता आणि त्याला दुसरा कोणी मार्गभ्रष्टही करू शकला नसता. बस्स! याच्यावरूनच कल्पना करा की मुस्लिमासाठी सर्वांत मोठा जर कोणता धोका असेल तर हाच आहे की तो स्वत: इस्लामच्या शिकवणींपासून अनभिज्ञ आहे, स्वत:ला हे माहीत नाही की पवित्र कुरआन काय शिकवितो आणि प्रेषित मुहम्मद (स.) कोणता आदेश देऊन गेले आहेत? या अज्ञानामुळेच तो स्वत:ही मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि दुसरे धोकेबाजसुद्धा त्याला मार्गभ्रष्टकरू शकतील. परंतु त्याच्यापाशी ज्ञानाचा प्रकाश असेल तर तो जीवनाच्या प्रत्येक पावलावर इस्लामचा सरळमार्ग पाहू शकेल, प्रत्येक पावलावर अनेकेश्वरवाद, बहुदेववाद, मार्गभ्रष्टता, दुष्कृत्य आणि दुराचाराचे जे वक्र-मार्ग मध्ये येतील ते ओळखून त्यांच्यापासून अलिप्त राहू शकेल, जो कोणी मार्गभ्रष्ट करणारा रस्त्यात त्याला आढळेल त्याचे ऐवूâनच तो या निष्कर्षाप्रत पोहचेल की हा मनुष्य मार्गभ्रष्ट करणारा आहे, याचे अनुयायित्व स्वीकारणे चुकीचे आहे.



माननीय अली (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

अबू जहलने पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितले, ‘‘हे मुहम्मद (स.)!आम्ही कुरैश लोक तुम्हाला खोटे ठरवित नाही. आम्ही तर त्यास खोटे ठरवित आहोत ज्यास तुम्ही घेऊन आला आहात.’’


स्पष्टीकरण

अर्थात आम्हांवर तुमचे सत्य प्रकाशमान व दिवसाच्या उजेडाइतके स्पष्ट आहे. आम्ही कधीही तुम्हाला खोटे बोलताना ऐकले नाही. लोकांत सत्यवादिता व अमानतीच्या दृष्टीने तुम्ही ओळखले जाता. आम्ही खरेतर तुमचा ग्रंथ व शरीयतला अमान्य करतो. आम्ही त्या दिव्य अवतरणाला स्वीकारत नाही ज्यास तुम्ही प्रस्तुत करीत आहात.

कदाचित! सत्यविरोधकाला हे समजले व उमजले असते की जो मनुष्य या जगाच्या मामल्यात लोकांशी खोटे बोलू शकत नाही तो धर्माच्या मामल्यात खोटे कसे बोलेल? ज्या मनुष्याची स्पष्ट विशेषता ही सत्यवादिता आहे तो ईश्वराशी एखादी खोटी गोष्ट कशी संबोधित करील?

खरेतर मक्का येथील कुरैशचे मोठमोठे सरदार ईर्षा, द्वेष, अहंकार व पूर्वग्रहदूषित होते, ज्यामुळे सत्य स्वीकारणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget