Latest Post

बंधुंनो, मी आज सांगतो ते ऐका. कारण आणखी एखादे वर्ष मला लाभेल असे वाटत नाही. या जागी मी पुन्हा तुमच्यात दिसेन, वावरेन, बोलेन असे वाटत नाही. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणे सर्वांचे जीवन मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याचि वेळ येईपर्यंत असे प्रेमाने बंधुभावाने वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करू. एके दिवशी ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहे, हे कधी विसरू नका. त्या दिवसाची नेहमी आठवण ठेवा. तेथे सर्व कृत्यांचा झाडा द्यावा लागेल. मित्रांनो, पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत, तसेच पत्नीचेही पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमाने सहानुभूतीने वागवा. कठोर नका होऊ. दयाळू रहा. तुम्ही ईश्वराच्या जामीनकीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. खरे ना? परमेश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.
"तसेच तुमच्यावर कोणीही विश्वास टाकला तर विश्वासघात करू नका. दिला शब्द पाळा. सावकारी निषिद्ध आहे, व्याजबट्टा वर्ज्य आहे, हे ध्यानात धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे. व्याज देऊ नये. मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळीपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेच घेतील."
आणी तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेच त्यांनाही खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनी केला तरच त्यांना सोडा. लक्षात ठेवा की, कसेहि झाले तरी तेही खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेने नाही वागवता कामा. मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत हे कधीही विसरू नका. तुमचे सर्वांचे एक जणू भ्रातृमंडळ, एक तुमचा महान भ्रातृसंघ. जे दुसऱ्याचे आहे ते त्याने स्वेच्छेने, खुशीने दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर रहा, सावध रहा.

प्रेषित परंपरेचा मानवजातीत कसा प्रारंभ झाला व विकसित व उन्नत होत होत एका शेवटच्या महान प्रेषितावर तिचा कसा शेवट झाला; हे आपण पाहू या.
आपण हे ऐकलेच असेल की ईश्वराने सर्वाआधी एका मानवाला निर्माण केले. नंतर त्या माणसापासून त्याचे युगल बनविले व त्यापासून पुढे मानवी वंशवृद्धी केली आणि अगणित शतकानुशतकांपासून ती संपूर्ण भूमीवर पसरलेली आहे. जगात जितकी माणसे जन्मली ते सर्व त्या प्राथमिक युगलचीच संतान होत. सर्व जातीधर्माचा धार्मिक व ऐतिहासिक उल्लेख या गोष्टीशी सहमत आहे की मानवजातीचा आरंभ एकाच मनुष्यापासून झाला आहे. विज्ञानाच्या संशोधनाद्वाराही हे सिद्ध झालेले नाही की भूमंडलावर निरनिराळया भागांत वेगवेगळी माणसे निर्माण केली गेली. उलट अधिकतर वैज्ञानिक विद्वानांचे असे अनुमान व मत आहे की सर्वाआधी एकच मनुष्य निर्माण झाला असेल. जेथे मानववंश आढळतो, तो त्याच एका पहिल्या मानवाची1संतान आहे.
१) हे वास्तव की संपूर्ण मानवजात एकाच माता पित्याची संतान आहे, जात पात, उच्चनीचसंबंधी भेदभावाचे समूळ उच्चाटन करते आणि सर्व एक दुसऱ्यांचे बंधु आहेत, हे सिद्ध होते. जातीयतेमुळे मानवसमाजात बिघाड निर्माण झाला आहे आणि त्याने रौद्ररूप धारण केले आहे या समस्येचे निराकरण मानवी विश्व-व्यापकतेत आहे.
आपल्या वंशजांना इस्लामी जीवनपद्धतीचे शिक्षण द्यावे. अर्थात त्यांना हे दाखवावे की तुमचा व संपूर्ण विश्वाचा निर्माता एकच ईश्वर आहे. त्याचीच तुम्ही उपासना करा. त्याच्या समोर आपले मस्तक टेका. त्याच्याशीच सहाय्याची करूणा भाका आणि त्याच्या इच्छेनुसार जगात सदाचरणाने व न्यायाने आपले जीवन व्यतीत करा. तुम्ही अशा प्रकारे आचरण केले तर तुम्हाला योग्य ईनाम (मोबदला) मिळेल. जर तुम्ही त्याची अवज्ञा कराल तर कठोर शिक्षा मिळेल.
आदरणीय आदम (अ.) यांच्या संततीपैकी जे लोक भले होते ते आपल्या पित्यांनी दाखविलेल्या सरळ मार्गाने चालत राहिले. परंतु जे लोक दुष्ट व वाईट होते त्यांनी तो मार्ग सोडून दिला. हळूहळू हरप्रकारची दुष्कृत्ये व कुश्रद्धा पसरत गेली. कोणी चंद्र, सूर्य, तारे कोणी वृक्षाची, पशूची व नद्यांची उपासना सुरू केली. काहींनी असा विचार केला की, वायू, जल, अग्नि, रोगराई तसेच आरोग्य व निसर्गाच्या इतर सत्तेचे व सामर्थ्यांचे ईश्वर वेगवेगळे आहेत. त्यापैकी प्रत्येकाची उपासना करावयास हवी ज्यायोगे ते सर्व प्रसन्न होऊन आमच्याशी दयाळू होतील. अशा तऱ्हेने अज्ञानापोटी ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजेची अनेक रूपे प्रकटली आणि त्यापासून अनेक धर्म निर्माण झाले. हा तो काळ होता जेव्हा आदरणीय आदम (अ.) यांची वंशवेल जगाच्या विभिन्न भागांत पसरली होती. भिन्नभिन्न जाती बनल्या होत्या. प्रत्येक जातीने आपला एक नवीन धर्म बनविला होता आणि प्रत्येकाच्या रूढी-परंपरा वेगळ्या होत्या. ईश्वराच्या विस्मरणाबरोबरच लोकांना त्या नियमांचेही विस्मरण झाले जे आदरणीय आदम (अ.) यांनी आपल्या संततीला शिकविले होते. लोकांनी केवळ आपल्या तुच्छ इच्छावासनांचेच पालन आरंभिले. हर प्रकारच्या वाईट रूढी व प्रथा निर्माण झाल्या. सर्व प्रकारच्या अज्ञानपूर्ण विचारांचा प्रसार झाला. चांगले व वाईट जाणण्यासाठी चुका करण्यात आल्या. अनेक वाईट गोष्टींना चांगले मानण्यात आले व कित्येक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या गेल्या.2
आता ईश्वराने प्रत्येक जातीत व वंशात, प्रेषित पाठविण्यास आरंभ केला आणि ते लोकांना त्याच इस्लामची शिकवण देऊ लागले जी शिकवण आदरणीय आदम (अ.) यांनी सर्वप्रथम माणसांना दिली होती. या प्रेषितांनी आपापल्या जातीवंशांना विसर पडलेल्या शिकवणीची आठवण करून दिली. एकाच ईश्वराची उपासना करण्याची त्यांना शिकवण दिली. ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजा करण्यापासून लोकांना परावृत्त केले. अज्ञानापोटी आलेल्या रूढींचे उच्चाटन केले. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत दाखविली. उचित नियम व आदेश दाखवून देऊन त्यांचे पालन करण्याचा आदेश दिला. भारत, चीन, इराण, इराक, इजिप्त, आफ्रिका, युरोप थोडक्यात असे की जगात कोणताही देश असा नाही जेथे ईश्वराकडून त्याचे सच्चे प्रेषितांचे आगमन झाले नाही. त्या सर्वांचा धर्म एकच होता तो हाच धर्म होता ज्याला ‘इस्लाम’ असे म्हणतात.(२) इतके जरूर होते की त्यांच्या शिकवणीची पद्धत व जीवनाचे नियम व कायदे थोडेसे भिन्न होते. ज्या तऱ्हेचे अज्ञान प्रत्येक जातीत पसरले होते, तेच दूर करण्यावर अधिक भर दिला गेला. ज्या प्रकारचे असत्य विचार प्रचलित होते त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावरच अधिक भर दिला गेला. संस्कृती, सभ्यता, ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने सर्व जाती प्राथमिक अवस्थेतच होत्या म्हणून त्यांना सरळ व सोपी शिकवण व साधे धर्म-नियम व विधान दिले गेले. जसजशी प्रगती व उन्नती होत गेली तसतसे शिकवणीला व धर्म विधानांनाही विकसित रूप दिले गेले. परंतु हा फरक केवळ बाह्यात्कारीच होता. सर्वांचा आत्मा एकच होता. श्रद्धेत ‘तौहीद’ (एकेश्वरत्व), व्यवहारात भलेपणा व सदाचार आणि आखिरत (पारलौकिक जीवन) च्या शिक्षा व मोबदल्यावर सर्वांची श्रद्धा व दृढ विश्वास होता.
प्रेषितांशी माणसांनी विचित्र असा दुर्व्यवहार केला. पहिल्यांदा त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार देण्यात आला. काहींना आपल्या मायभूमीतून हुसकून लावण्यात आले. काहींचा वध करण्यात आला. काहींना आयुष्यभर शिकवण व उपदेश करूनसुद्धा मोठ्या मुष्किलीने केवळ दहापाच अनुयायी प्राप्त होऊ
२) सर्वसाधारणपणे लोकांचा एक मोठा असा गैरसमज आहे की, इस्लामचा उदय आदरणीय मुहम्मद (स.) कडून झाला आहे. हा गैरसमज येथपर्यंत झालेला आहे की, आदरणीय मुहम्मद (स.) यांना इस्लामचे संस्थापक मानण्यात येते. वास्तविकपणे ही एक अत्यंत मोठी चूक असून प्रत्येक अभ्यासकाच्या मनातून ती पूर्णपणे दूर केली गेली पाहिजे. प्रत्येक अभ्यासकाने ही गोष्ट चांगली समजून घेतली पाहिजे की, अगदी आरंभापासून मानवजातीचा इस्लाम हाच एकमेव व खराखुरा धर्म आहे. पृथ्वीवर ज्या काळी व ज्या स्थळी ईश्वराकडून प्रेषित आले, त्या सर्वांनी याच एका धर्माची लोकांना शिकवण दिली. परंतु ईश्वराचे हे निवडक दास आपले कर्तव्य ठामपणे करीत राहिले. शेवटी त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम घडला. मोठमोठे जाती-वंशाचे समूह त्यांचे अनुयायी बनले. त्यानंतर मार्गभ्रष्टतेने वेगळे रूप धारण केले. जगातून प्रेषितांचे प्रयाण होताच त्यांच्या अनुयायांनी त्यांना मिळालेल्या शिकवणुकीत हळूहळू बदल केला. त्यांच्यावर अवतरलेल्या ईशग्रंथात आपले विचार व मत मिसळले. उपासनांच्या निरनिराळ्या प्रकारांचा अंगीकार केला.
काहींनी तर खुद्द प्रेषितांचीच उपासना व आराधना सुरू केली. कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा अवतारच मानले (म्हणजे खुद्द ईश्वरच मानवी रूपात प्रकटला होता) कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा पुत्र मानले तर आणखी कोणी आपल्या प्रेषिताला ईशत्वाचा सहभागी मानले. अशा रितीने माणसांनी एक अद्भूत आत्मवंचनेचे कृत्य सुरू केले. ज्या व्यक्तींनी एकेश्वरत्वाची शिकवण दिली होती आणि मूर्तीपूजेचे खंडन केले होते, मनुष्याने त्यांच्याच मूर्ती बनवून त्यांचीच उपासना सुरू केली. या प्रेषितांनी जे काही नियम व आचारसंहिता आपल्या अनुयायांना दिले होते तेही तऱ्हेतऱ्हेने विकृत करण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रकारच्या अज्ञानयुक्त व अडाणीपणाच्या रूढींचा समावेश करण्यात आला. मानवनिर्मित नियमांची त्यामध्ये सरमिसळ करण्यात आली, ती इतकी की कांही शतके लोटल्यानंतर हे जाणून घेण्याचे कसलेही साधनच शिल्लक उरले नाही की प्रेषितांनी दिलेली खरी शिकवण व खरी आचारसंहिता कोणती आहे व नंतर लोकांनी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची मिसळ व भेसळ केली.3
खुद्द प्रेषितांची जीवनचरित्रेसुद्धा आख्यायिका व दंतकथामध्ये अशा रितीने मिश्रित झालेली आहेत की, त्या बाबतीत कोणतीही गोष्ट विश्वासार्ह उरली नाही. तरीसुद्धा प्रेषितांनी केलेले प्रयत्न अगदीच व्यर्थ व वाया गेले नाहीत. मिसळ व भेसळ झाली असूनही काहीतरी मूळ सत्य अनेक धर्मात अल्पशा प्रमाणात शिल्लक उरले आहे. ईश्वराची जाणीव व पारलौकिक जीवनाची जाणीव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्व धर्मांत आढळते. चांगुलपणा, सदाचार यांची काही तत्त्वे सर्व जगात मान्य केली गेली.
सर्व जातीवंशाच्या प्रेषितांनी वेगवेगळ्या तऱ्हेने अनेक जातीवंशाला इतपत तयार करून सोडले की, जगात अशा एका धर्माची शिकवण प्रसारित केली जावी की जो धर्म निस्संशयपणे व एकमुखाने सर्व मानवजातीचा धर्म असेल.
आम्ही वर म्हटल्याप्रमाणे आरंभी प्रत्येक जातीवंशात वेगवेगळे प्रेषित येत असत आणि त्यांची शिकवण त्यांच्या जातीवंशापर्यंतच मर्यादित असे. याचे कारण असे की, त्याकाळी सर्वच जाती-वंश एकमेकापासून वेगळे होते. एकमेकांत मिसळत नसत. जणू काय प्रत्येक जात व वंश आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत मर्यादित होती. अशा काळी कोणतीही सर्वसाधारण व एकत्रित शिक्षण, शिकवण यांचा सर्व जाती-वंशात प्रसार करणे अत्यंत कठीण होते. शिवाय भिन्न भिन्न जाती-वंशाची अवस्था एकमेकापासून खूपच वेगळी होती. अज्ञानरुपी अंधकार चहुकडे मोठ्या प्रमाणात होता. अशा अज्ञानापोटी, श्रद्धा व आचार यात जी विकृती निर्माण झाली होती, ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुपात आढळत असे. म्हणूनच ईश्वराच्या प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला वेगळी शिकवण व उपदेश दिला. असत्य विचारांचे हळूहळू उच्चाटन करून उच्चप्रतीच्या नियम व विधानाचे पालन करण्याची शिकवण दिली जाई. अशा तऱ्हेने या जातीवंशाला शिकवण देण्यात किती हजार वर्षे लोटली ते ईश्वरालाच ठाऊक. प्रगती करता करता अखेरीस ती वेळ आली जेव्हा मानवजात बाल्यावस्थेतून निघून तारुण्यावस्थेत पोहोचू लागली होती. व्यापार, कला कौशल्य यांच्या प्रगतीबरोबरच जातीजातीत परस्पर संबंध निर्माण झाले. चीन व जपानपासून ते युरोप व आफ्रिकेतील दूरवरच्या देशांमध्ये जलमार्गाने तसेच खुष्कीच्या मार्गाने दळणवळण सुरू झाले. बहुतेक जातीवंशांत लेखन कलेचा प्रसार व प्रचार सुरु झाला. विद्या व कला यांचा प्रसार झाला. विभिन्न जातीवंशात ज्ञानाची देवाणघेवाण होऊ लागली. मोठमोठ्या राज्यांची स्थापना करून अनेक देशांना तसेच अनेक जातीवंशांना एकाच राजनैतिक व्यवस्थेमध्ये जोडून टाकले.
अशा रीतीने त्यापूर्वी मानवजातीत आढळून येणारा दुरावा व परकेपणा हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळे इस्लामची एक शिकवण व एक धर्मविधान संपूर्ण जगासाठी पाठविणे शक्य झाले. आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वी मानवाची अवस्था इतकी प्रगत झाली होती की जणू तो स्वतःच एका सामान्य धर्माची मागणी करु लागला होता. बौद्धमत हा काही परिपूर्ण धर्म झालेला नव्हता व त्यात केवळ काही नैतिक नियमच होते. परंतु तो भारताबाहेर जपान व मंगोलियापर्यंत व दुसरीकडे अफगाणिस्तान व बुखारापर्यंत पसरला. त्याचे प्रचारक दूरदूरच्या देशापर्यंत जाऊन पोचले. याच्या काही शतकानंतरच ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. आदरणीय ईसा (त्यांचेवर ईश्वराची कृपा असो) इस्लामचीच शिकवण घेऊन आले होते, परंतु त्यांच्या पश्चात ख्रिश्चन धर्माच्या नावाने एक अपूर्ण व दोषयुक्त धर्म रचण्यात आला. ख्रिश्चनांनी या धर्माचा प्रसार इराणपासून आफ्रिका व युरोपमधील दूरदूरच्या देशांत केला. या घटना आम्हाला हे दर्शवितात की, जग त्याकाळी एक सामान्य मानवी धर्माची मागणी करीत होते. तसे करण्यात त्याची इतकी तयारी झाली होती की, जेव्हा एक परिपूर्ण व सत्यधर्म त्याला मिळाला नाही तेव्हा त्याने अपक्व आणि अपूर्ण धर्माचाच मानवजातीत प्रसार करण्यास प्रारंभ केला.

पूर्णपणे प्रेषितांना आज्ञांकित होणे हे अनुयायीसाठी अत्यावश्यक आहे. ही सर्वप्रथम गरज आहे श्रध्दावंत होण्याची. धर्मासाठी आणि दैवी नियमांसाठी हे आवश्यक आहे की प्रेषित जे काही सांगतील त्यास अनुयायींनी कुचराई न करता अंगीकारले पाहिजे. प्रेषित जे काही सांगतील अनुयायींना समजो अथवा न समजो, त्यांनी ते त्वरीत खरे आणि चांगले म्हणून स्वीकार केला पाहिजे. हा प्रेषितांचा दर्जा स्वतः अल्लाहनेच ठरवून दिलेला आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘यांना सांगा की आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे. याकरिताच पाठविला की अल्लाहच्या आदेशांचा आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी, जर यांनी ही पध्दत अंगीकारली असती की जेव्हा हे स्वतःवर अत्याचार करून बसले होते तेव्हा तुमच्यापाशी आले असते आणि अल्लाजवळ क्षमायाचना केली असती, तर निःसंशय अल्लाह यांना क्षमा करणारा व कृपा करणारा आढळला असता.’’ (कुरआन ४: ६४)
ही आज्ञाधारकता आणि शरणागती फक्त मौखिक स्वरूपाचीच नसावी तर ती प्रेषिताच्या आज्ञेला गांभीर्यपूर्वक आणि मनाने स्वीकार करणारी असावी. अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांच्या आज्ञांकित राहण्याबद्दल कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘हे मुहम्मद (स)! तुमच्या पालनकर्त्याची शपथ, हे कधीही श्रध्दावंत होऊ शकत नाहीत. जोपर्यंत आपल्या वादग्रस्त प्रश्नात हे तुम्हाला निर्णय देणारा मान्य करीत नाहीत. मग जो काही निर्णय तुम्ही द्याल त्यावर आपल्या मनातदेखील काही संकोच वाटू नये तर पूर्णतः मान्य करावे.’’ (कुरआन ४: ६५)
हे स्वभाविकतः अत्यावश्यक आहे. वरील संकेतवचनात नमूद केलेली प्रेषिताची संकल्पना व्यतिरिक्त दुसरी अस्वाभाविक ठरेल. मनुष्य हा निर्माण केला गेला आहे मुळात अल्लाहची शरणागती आणि आज्ञाधारकतेसाठीच फक्त! प्रेषित हे माध्यम आहे अल्लाहचे आदेश आणि संदेश जाणून घेण्यासाठी. म्हणून प्रेषितांचे पूर्णतः आणि गांभीर्यपूर्वक अनुकरण अनिवार्य आहे. हे खरे आहे की एखादी व्यक्ती रस्ता चालूनच एखाद्या ठिकाणी पोहचू शकते किंवा एखादा हवाई प्रवाशी विमानाने प्रवास करूनच हवाई प्रवास करू शकतो. त्याचप्रमाणे व्यक्ती अल्लाहचे मार्गदर्शन तोपर्यंत प्राप्त करूच शकत नाही. जोपर्यंत ती व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स) यांचा सच्चा अनुयायी बनत नाही. कुरआन स्पष्ट करीत आहे की जेव्हा जेव्हा प्रेषितांनी त्यांच्या प्रेषित्वांची घोषणा केली, तेव्हा त्यांनी लोकांपासून अपेक्षा ठेवली की,
‘‘म्हणून तुम्ही अल्लाहच्या रोषचे भय बाळगा आणि माझे (प्रेषित) आज्ञांकित राहा.’’ (कुरआन २६: १२६)
खरे तर हे संकेतवचन स्पष्ट करीत आहे की अल्लाहची शरणागती आणि आज्ञाधारकता यांना प्राप्त तेव्हाच करून घेता येईल जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांचे पूर्ण अनुकरण केले जाईल. प्रेषितच फक्त सांगू शकतात की अल्लाहचे आदेश काय आहेत आणि आपण त्यांना कसे आचरणात आणावेत. म्हणून तर अल्लाहने फक्त त्याचीच शरणागती पत्करण्यास सांगितले नाही तर त्याबरोबर प्रेषितांची आज्ञाधारकता स्वीकारण्याचासुध्दा आदेश दिलेला आहे.
वस्तुतः प्रेषितांनी धर्माच्या बाबतीत जे काही सांगितले आहे ते सर्व अल्लाहकडून आहे, प्रेषितांची ही स्थिती त्यांच्या कार्याला आणखी जास्त महत्त्व प्रदान करते. म्हणून त्यांचे आज्ञांकित होणे (प्रेषितांची आज्ञा पाळणे) म्हणजे अल्लाहची आज्ञा पाळण्यासारखे कृत्य आहे.
‘‘हे मुहम्मद (स), आम्ही तुम्हाला लोकांसाठी पैगम्बर बनवून पाठविले आहे आणि यासाठी अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. ज्याने पैगम्बराची आज्ञा पाळली त्याने खरे म्हणजे अल्लाहचे आज्ञापालन केले आणि जो पराडः मुख झाला तर आम्ही तुम्हाला या लोकांवर पहारेकरी म्हणून तर पाठविले नाही.’’ (कुरआन ४: ७९-८०)
थोडक्यात, प्रेषित्वांवर श्रध्दा ठेवणे ही अत्यावश्यक अट आहे. प्रेषितांचे पूर्ण आज्ञापालन करण्यासाठी प्रेषितांचे अनुयायी वर वर आणि दिखाऊ आज्ञाधारकता दाखविणारे मुळीच नसतात. प्रेषितांवरील श्रध्देत थोडीसुध्दा चलबिचल ही श्रध्देच्या मुळावर घाव घालणारी ठरते. असे करणे हे दुसरे तिसरे काहीच नसून प्रेषितांच्या महान कार्याबद्दलचे घोर अज्ञान आहे. असा मनुष्य अज्ञानाच्या घोर अंधारात चाचपडत असतो.

कुरआनोक्ती आहे,
‘‘तो आपल्या इच्छेने बोलत नाही, हा तर एक दिव्यबोध आहे जो त्याच्यावर अवतरला जातो. त्याला जबरदस्त बलशालीने शिकविले आहे.’’ (कुरआन ५३: ३-५)
जेव्हा असे म्हटले जाते की प्रेषित जे काही शिकवतात ते सर्व अल्लाहकडून असते. हे म्हणण्याला विस्तृत अर्थ आहे.
ही शिकवण दोन प्रकारची आहे.
१) अल्लाह प्रत्यक्ष अथवा दूताकरवी प्रेषितांना देतो.
२) प्रेषित दिव्य प्रकटनानुसार अथवा दिव्यबोधनुसार काही नीतिनियम तयार करीत असत.
पहिल्या प्रकारची शिकवण मूळ स्वरुपाची आणि अल्लाहने प्रत्यक्ष अवतरित केलेली आहे तर दुसरी अप्रत्यक्ष आणि प्रेषितांनी दिव्यबोधच्या प्रकाशात तयार केलेली आहे. परंतु हेतु आणि पावित्र्यात दोन्ही शिकवणी सारख्या आहेत.
निष्पापपणा आणि प्रेषित
प्रेषित निष्पाप आहेत. त्यांच्या हातून धार्मिक-प्रकारची चूक न होणे अटळ आहे. त्यांची इच्छा, आकांक्षा, वागणूक, विचार, आचार हे सर्वप्रकारच्या वाईटांच्या विरोधातील पुरावेच होत. ते धर्मबाह्य बाबतीत चूक करणे शक्य आहे, परंतु याचा त्यांच्या प्रेषित्वावर काहीच परिणाम होत नाही. त्यांचा निष्पापपणा दर्शवितो की दिव्य प्रकटनाचा अर्थबोध घेताना त्यांच्याकडून चूक होणे अशक्य आहे. तसेच दिव्यबोधाच्या प्रकाशात नीतिनियम तयार करताना अथवा ईशादेश आचरणात आणताना त्यांच्याकडून हलगर्जीपणा अथवा एखादी चूक अजिबात होणार नव्हती. म्हणून त्यांच्या इतर बाबींसाठी (धर्मबाह्य) त्यांच्या निष्पापपणावर काहीच परिणाम होणार नव्हता.
प्रेषित हे विचार करीत नाहीत अथवा चूक करीत नाहीत म्हणून निष्पाप होते असे मुळीच नाही तर वस्तुस्थिती वेगळी आहे. इतर मानवांसारखेच प्रेषितांच्या हातून चूक होणे सहाजिक आहे. परंतु प्रेषितांची ही चूक करण्याची पात्रता कधीच घडून येत नसे, कारण त्यांचे विचार आणि दृष्टी त्यांच्या नैतिकतेइतकीच परिपूर्ण अशी होती. एकीकडे प्रेषित मुहम्मद (स) दिव्य प्रकटनाचा उद्देश जाणून होते आणि त्या प्रकाशात ते नीतिनियम बनवित असत. दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांच्या ‘स्व’वर पूर्ण नियंत्रण होते. त्यांचे नैतिक अधिष्ठान, अल्लाहचे भय आणि परलोकाविषयीचे ज्ञान अतिउच्च दर्ज्याचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या हातून पापकर्मे घडतील अशी कधीच भीती नव्हती. हे त्यांच्या निष्पापपणाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते.
पण हे फक्त एकमेव वैशिष्ट्य प्रेषित मुहम्मद (स) यांच्या निष्पापपणाचे नाही. त्यांना निष्पापपणाचा उच्च दर्जा प्राप्त होण्यास दिव्यबोध आणि त्यांचे आत्मिक निरीक्षण हेसुध्दा कारणीभूत आहे. खरे तर हे दिव्य निरीक्षणच त्यांना बौध्दिक आणि नैतिक चुकांपासून दूर ठेवत होते. प्रेषितांच्या हातून चूक अशी होतच नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यांच्या हातून चुका घडत होत्या, परंतु जेव्हा असे घडत तेव्हा त्यांना अल्लाहकडून सावधानतेचा इशारा त्वरित मिळत असे. दुसऱ्यापर्यंत ही चूक पोहचण्याअगोदर त्यास दिव्यबोधाद्वारे अगदी दुरूस्त केले जात असे. जेव्हा त्यांना काही विपरीत (चूक) आपल्या हातून घडावे असे मनोमन वाटे तेव्हा त्यांची अतिउच्च दर्ज्याची नैतिकशक्ती त्या अइच्छेला गाडून टाकत असे. कुविचार आणि अनाचाराबरोबर दोन हात करताना त्यांची उच्च दर्ज्याची नैतिक शक्तीच फक्त मुकाबला करीत नसे, तर त्याबरोबर दिव्यबोधसुध्दा लढाईत सामील होत असे आणि त्या कुविचाराचा तथा दुष्टकर्माचा कायमचाच नाश करीत असत.
प्रेषितांचा निष्पापपणा हा प्रेषितशृंखलेच्या महान कार्यासाठी अत्यावश्यक होता. प्रेषित जर खोटे बोलत असतील. पूर्वग्रहदूषितता आणि दिव्यप्रकटनाचे चुकीचे अर्थ लावत असतील तर त्यांच्यावर कोण वेडा विश्वास ठेवणार होता? लोक अशा व्यक्तीवर विश्वास तरी कसा ठेवणार की तो अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत ढवळाढवळ करून पोहोचवित आहे? असा मनुष्य मानवी चारित्र्याचा अनुकरणीय असा आदर्श जगापुढे ठेऊ शकत नाही कारण त्याचे स्वतःचेच चारित्र्य हे हीन दर्जाचे आणि दुसऱ्याला उपदेश करण्यालायक नसते. प्रेषित्व पूर्णतः असफल ठरते जर ते प्रेषित या महान कार्यासाठी दिव्यप्रकटनापुढे पूर्णपणे आज्ञाकित होण्याचे उदाहरण जगापुढे ठेवण्यास असमर्थ ठरणार होते.
प्रेषित हे निष्पाप होते म्हणजे ते व्यक्ती म्हणूनसुध्दा निष्पाप होते. बौध्दिक आणि शारीरिक भ्रष्ट आचारांचा (भ्रष्टाचार) तिटकारा त्यांना होता. हे अशामुळे की ते अल्लाहचे खास उफत केलेले दास होते. दुसऱ्या कोणाला हा दर्जा प्राप्त होऊच शकत नाही. भले तो कितीही धार्मिक, नैतिक का असेना. मनुष्याचे विचार आणि आचार हे निष्पापपणाला पोहचू शकतील, पण हे अशक्य आहे की त्याची नैतिकता चूक करण्यापलीकडील आणि विचाराने दैवी बोधाचा अचूकपणे अर्थ काढण्याचे बौध्दिक सामर्थ्य प्राप्त करणारी आहे, हे अशक्य कोटीचे आहे. म्हणून हा शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत व्यक्ती हे जाणून घेत नाही की प्रेषित मुहम्मद (स) हेच फक्त निष्पाप आहेत आणि हे सत्य त्या व्यक्तीच्या हृदयात खोलवर जाऊन पोहोचत नाही, तोपर्यंत ही व्यक्ती प्रेषितांवर मनापासून प्रेम करूच शकत नाही आणि त्यांचा खरा अनुयायी आणि अज्ञांकित बनून राहू शकत नाही. अशा स्थितीत प्रेषितांबरोबर कोणी भागीदार ठरविण्याचे पाप त्या व्यक्तीकडून अनायासे घडून जाते.

अल्लाहने नेहमीच मानवाच्या मार्गदर्शनासाठी मानवाचीच नियुक्ती केलेली आहे. हे प्रेषित दूत नव्हते की जिन्न (पवित्रयोनि) नव्हते. असेही कधी घडले नाही की या कार्यासाठी अल्लाहने मानवी रूप धारण केले अथवा इतर रूप धारण केले. जेव्हा जेव्हा या भूतलावर प्रेषित पाठविले गेले ते सर्व मानव होते. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे,
‘‘हे पैगम्बर (स) तुमच्या अगोदर आम्ही जे प्रेषित पाठविले होते, ते सर्व देखील माणसेच होते, आणि जे याच वस्त्यांच्या निर्वासितांपैकी होते आणि त्यांच्याकडे आम्ही दिव्य-प्रकटन पाठवित राहिलो होतो.’’ (कुरआन १२: १०९)
कुरआन धर्मांच्या आणि राष्ट्रांच्या घटनांचा उल्लेख करून स्पष्ट करतो की अल्लाहच्या प्रेषितांवर त्यांच्या विरोधकांनी अविश्वास ठेवला होता तो यामुळे की ते (प्रेषित) त्यांच्यासारखे होते. ते प्रश्न विचारीत की आमच्यासारखा मनुष्य प्रेषित कसा बरे बनू शकेल? कुरआनोक्ती आहे,
‘‘त्यांच्या पैगम्बरांनी त्यांना सांगितले, ‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्या सारखे मानव.’’ परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला उफत करतो, आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादे प्रमाण आणून द्यावे.’’ (कुरआन १४: ११-१२)
म्हणून हे खरे आहे की प्रेषित मानवातूनच अल्लाहने वेळोवेळी नियुक्त केले आहेत. आपल्यासारखे त्यांना शरीर होते, मने होती, इच्छा आकांक्षा होत्या. त्यांना बायका आणि मुले होती. त्यांचा जन्म आपणासारखाच झाला आणि संगोपण नैसर्गिकरित्या झाले. ते खात आणि पित होते. झोपत आणि जागे होत असत. हसत आणि रडत असत. आपल्यासारखेच सुखी आणि दुःखी बनत असत. त्यांना मृत्यू आपल्यासारखाच येत असे. थोडक्यात ते सर्व प्रेषित मानव होते आणि त्यांच्यात मानवाची ती सर्व गुणवैशिष्ट्ये होती. या सत्यतेला कुरआन स्पष्ट करीत आहे,
‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्या सारखे’’ (कुरआन १४ :११)
इतर अनेक ठिकाणी कुरआन या सत्यतेला स्पष्ट करीत आहे,
‘‘हे पैगम्बर (स) तुमच्यापूर्वीजे कोणतेही पैगम्बर आम्ही पाठविले होते, ते सर्व ही अन्न खाणारे आणि बाजारात हिडणारे, फिरणारे लोकच होते.’’ (कुरआन २५: २०)
एके ठिकाणी कुरआन या सत्यतेला आणखी स्पष्ट करून देत आहे,
‘‘तुमच्या पूर्वीदेखील आम्ही अनेक पैगंबर पाठविले आहेत आणि त्यांना आम्ही पत्नी व मुलेबाळे असलेलेच बनविले होते. आणि कोणत्याही पैगंबराचे हे सामर्थ्य नव्हते की अल्लाहच्या आज्ञेशिवाय एखादा संकेत त्याने स्वतःच आणून दाखविला असता.’’ (कुरआन १३: ३८)
अल्लाहने मानवालाच प्रेषित म्हणून का नियुक्त केले, याचे सविस्तर कारण आणि खुलासा कुरआन देत आहे. जे लोक आदरणीय मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वास विरोध करीत होते ते लोक आपल्या विरोधाच्या समर्थनार्थ सांगत की अल्लाहला जर प्रेषित आमच्यासाठी पाठवायचा होता तर त्याने दूत पाठविला असता, आमच्यासारखा मनुष्य पाठविला नसता. या लोकांच्या विरोधाला खोडून काढताना कुरआन स्पष्ट करतो,
‘‘यांना सांगा, जर पृथ्वीवर ईशदूत समाधानाने वावरू लागले असते, तर जरूर आम्ही आकाशातून एखाद्या ईशदूतालाच त्यांच्यासाठी पैगंबर बनवून पाठविले असते.’’ (कुरआन १७: ९५)
वरील संकेतवचन प्रेषित्वाच्या दैवी आदेशित नियमांना प्रदर्शित करीत आहे. म्हणजे प्रेषित हा ज्यांच्यासाठी पाठविला गेला तो त्यांच्यापैकीच (सजातीय) असतो. हे अगदी साधे वाक्य आहे, परंतु विद्वतापूर्ण आहे. ही विद्वता सत्यता पटवून देत आहे. प्रेषितांची नियुक्ती मनुष्यातून केली गेली नसती तर प्रेषित्वाच्या उद्देशालाच तडा गेला असता. हे निर्विवादित सत्य आहे की समस्त मानवांसाठी प्रेषित हे अल्लाहचे संदेशवाहक होते. परंतु याचा असा मुळीच अर्थ नाही की ते पोस्टमनसारखे होते ज्याचे काम फक्त संदेश पोहचविणे आहे. प्रेषित संदेशवाहक होते परंतु ते प्रचारक, शिक्षक, मार्गदर्शक आणि समजविणारे होते, सावध करणारे होते. त्यांनी समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न, काबाडकष्ट केले. त्यांनी ईशसंदेश आपल्या जीवनव्यवहारात आत्मसात करून लोकांपुढे आदर्श ठेवला आहे. प्रेषित हा प्रथम मानव आहे, ज्याने दिव्य प्रकटनाद्वारे मिळालेले आदेश आणि मार्गदर्शनानुसार आपले जीवन कंठीले जे अनुकरणीय आहे. प्रेषिताच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे की, त्याने सर्वांसाठी आदर्श बनावे. जोपर्यंत तो आपले सर्व जीवनकार्य तडीस नेत नाही तोपर्यत प्रेषितांची ही शृंखला परिपूर्ण होतच नाही. प्रेषिताव्यतिरिक्त इतरांना हे मदतकार्य पार पाडणे शक्य आहे का? निश्चितच उत्तर नकारार्थीच आहे. एखाद्याला अंशतः हे महतकार्य पार पाडणे शक्य होईल, परंतु प्रेषितकार्य पूर्णपणे कोणी इतर पार पाडूच शकत नाही. आपण दूतांचे उदाहरण घेऊ या. ते सर्वप्रथम या कामासाठी आपण अपेक्षित धरू या. दूतांना मानवांमध्ये प्रेषित म्हणून पाठविले असते तर स्थिती काय असती? दूतांनी अल्लाहचे संदेश (दिव्य प्रकटन) मनुष्यापर्यंत जरूर पोहचवले असते. परंतु दूत म्हणून त्यांनी इच्छा-आकांक्षा, भावना इ.बद्दलचे ईशादेश कसे पाळले असते? माणसाच्या विशिष्ट प्रश्नाबद्दलचे आदेश दूतांनी कसे व्यवहारात आणले असते? दूत दिव्य प्रकटनाचा बहुतांश भाग जर अंगिकारात नसेल तर त्यांच्याकरवी अनुकरणीय असे आदर्श स्थापित होऊच शकत नाही. दूतांना मनुष्याच्या इच्छा आणि भावनांबद्दल अज्ञान असल्याने ते मानवांना मार्गदर्शन करुच शकत नाहीत. मानवांच्या समस्या सोडविणे दूतांच्या कक्षेबाहेरील कार्य आहे. दूत मनुष्यापुढे आदर्श दैवी जीवनप्रणाली ठेवू शकतच नाही. मनुषत्वाबद्दलचे अज्ञान त्यांना त्यांच्या प्रेषितकार्यात मोठा अडथळा असल्याने मनुष्याचे चारित्र्य घडणकार्य अशक्य आहे.
दिव्य कुरआननुसार प्रत्येक प्रेषित हा त्या त्या लोक समुदायांमधून नियुक्त केला गेला होता. त्याचप्रमाणे दिव्य प्रकटनसुध्दा त्याच स्थानिक भाषेत अवतरित होत होते.
कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आम्ही आपला संदेश देण्यासाठी जेव्हा कधी एखादा प्रेषित पाठविला आहे, त्याने आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्याने त्यांना चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे मांडावे. मग अल्लाह ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो, तो प्रभुत्वसंपन्न व बुध्दिमान आहे.’’ (कुरआन १४: ४)
दिव्य प्रकटन अशा प्रकारे स्थानिक भाषेत अवतरित करून त्यांना (लोकांना) स्पष्ट करून सांगण्याची गरज मनुष्यच भागवू शकतो, दूत नाही.
‘‘त्याने (प्रेषिताने) त्यांना (लोकांना) चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे (दिव्यप्रकटन) मांडावेत.’’ (कुरआन १४: ४)
वरील कुरआन संकेत स्पष्ट आहे की प्रेषितकार्यासाठी मानवातूनच एक मनुष्य नियुक्त करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे ईशसंदेश अगदी स्पष्टपणे त्यांच्याच भाषेत मांडला जाण्यासाठी अल्लाहने परिपूर्ण अशी व्यवस्था केली होती. ईशसंदेश समजण्यासाठीचे जे अडथळे होते त्यांना दूर करण्यासाठी अतिमहत्त्व देण्यात आले होते. म्हणून प्रेषित ज्या ठिकाणी नियुक्त केला अल्लाहने त्या लोकातूनच नियुक्त केला. म्हणूनच प्रेषित हे मनुष्यच असणे अत्यावश्यक होते हे वरील विवेचनावरून अगदी स्पष्ट होते.
प्रेषित्वाचे स्वरूप: प्रेषित्व हे काही असे काम नव्हे की ते मेहनतीने प्राप्त केले जावे. प्रेषितांची नियुक्ती अल्लाह करत असे आणि प्रेषित्व ही अल्लाहची खास कृपा आहे. अल्लाह प्रेषित त्यांनाच नियुक्त करीत ज्यांना तो या कार्यासाठी निवडत असे. मनुष्याची इच्छा अथवा त्याचे परिश्रम या कामी म्हणजे प्रेषित्व प्राप्तीसाठी कुचकामी आहेत. अल्लाह स्वतः या महान कार्यासाठी एखाद्याची नियुक्ती करीत असे. कुरआनच्या पारिभाषिक शब्दावलीत यास ‘‘इस्तफा’’ असे संबोधले गेले आहे. म्हणजे अनेकातून एक उत्तम माणसाची निवड करणे होय. या शब्दाने अभिप्रेत अशी व्यक्ती ज्यास प्रेषित म्हणून निवडले गेले ती व्यक्ती या दिव्य कामासाठी अतियोग्य आहे. प्रेषित नियुक्त करण्याची ही पध्दत तार्किकदृष्ट्यासुध्दा योग्य आहे आणि महत्त्वाची आहे. कुरआन यास अनेक वेळा स्पष्ट करून सांगत आहे. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वावर आक्षेप घेण्यात आले आणि इतरांनीसुध्दा तसा दावा केला तेव्हा अल्लाहने स्पष्ट केले,
‘‘अल्लाह उत्तम प्रकारे जाणून आहे की दिव्य प्रकटन कोणावर अवतरित करावे.’’ (कुरआन ६: १२५)
प्रेषित्व हे शिकून आणि कष्ट करून आत्मसात करता येणे अशक्य आहे किबहुना त्याचे खरे महत्त्व आपल्या दृष्टीपलीकडील गोष्ट आहे.
कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात सांगा, ‘‘हा आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना अल्पज्ञान मिळाले आहे.’’ आणि हे पैगंबर (स) आम्ही इच्छिले तर ते सर्वकाही तुमच्याकडून हिरावून घेऊ जे आम्ही तुम्हाला दिव्य प्रकटनाद्वारे प्रदान केले आहे. मग आमच्याविरुध्द तुम्हाला कोणी समर्थक मिळणार नाही, जे ते परत मिळवून देऊ शकेल. हे तर जे काही तुम्हाला प्राप्त झाले आहे तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने मिळाले आहे, वस्तुस्थिती अशी आहे की त्याची कृपा तुम्हावर फार मोठी आहे. सांगून टाका की मानव आणि जिन्न (अदृश्य निर्मिती) सर्वच्या सर्वजनांनी मिळून जरी या कुरआनसारखी एखादी वस्तू आणण्याचा प्रयत्न केला तरी आणू शकणार नाही, मग ते सर्व एकदुसऱ्याचे सहायक का असेनात.’’ (कुरआन १७: ८५-८८)
मनुष्याची बुध्दी आणि आकलनशक्ती अगदी मर्यादित आहे. मनुष्य आत्मा आणि त्याचे स्वरुप जाणून घेण्यास असमर्थ आहे. आत्मा जाणून घेण्याची असमर्थता हीच खरी प्रेषित्वाला जाणून घेण्याची असमर्थता आहे. खरे तर प्रेषित्वाचा हा गाभा आहे ज्याला ते प्राप्त झाले तोच प्रेषित होतो.
प्रेषित्वाचे वैश्विक स्वरूप
प्रेषित प्रत्येक लोकसमूहात पाठविले गेले आहेत. याविषयी कुरआन सविस्तरपणे माहिती करून देत आहे,
‘‘परंतु (हे पैगंबर (स)), तुम्ही लोकांना ऐकवू शकत नाही जे कबरीत दफन आहेत. तुम्ही तर केवळ एक सावध करणारे आहात. आम्ही तुम्हाला सत्यानिशी पाठविले आहे. शुभवार्ता देणारा व सावधान करणारा बनवून. आणि कोणताही लोकसमुदाय असा होऊन गेला नाही ज्यात सावध करणारा आला नाही. आता जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवित असतील, तर यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीदेखील खोटे लेखले आहे. त्यांच्या पाशी त्यांचे पैगंबर, स्पष्ट प्रमाण, संदेश आणि उज्वल आदेश करणारा ग्रंथ घेऊन आले होते. मग ज्या लोकांनी मान्य केले नाही. त्यांना मी पकडले आणि पाहून घ्या माझी शिक्षा किती कठोर होती.’’ (कुरआन ३५: २३-२६)
कोणताही लोक समुदाय (राष्ट्र) या पृथ्वीवर असा नाही जिथे लोकांना सावध करणारा आला नाही. याचे एकमेव कारण हे आहे की पृथ्वीवरील सगळी माणसे एकसारखी आहेत. ते सर्व एका हेतुपोटी निर्माण केले गेले. अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारणे हा प्रत्येकाचा उद्देश आहे. परलोकात याविषयी प्रत्येकाला विचारणा होणारच आहे. अशी जर परिस्थिती आहे, तर मग अल्लाहने काहींना जबाबदाऱ्यांचे स्मरण करून द्यावे आणि इतरांना दुर्लक्षित करावे हे कसे शक्य आहे? काहींना अल्लाहने आपले मार्गदर्शन द्यावे आणि इतरांना त्यापासून वंचित ठेवावे हे कसे शक्य आहे? हे अशक्य आहे. कारण अल्लाह सर्वांचा आणि या सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, मालक आणि शासक आहे. त्याची दया सर्वांसाठी सारखी आहे आणि त्याचा न्याय खरा न्याय आहे.
येथे हे स्पष्ट लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा असे म्हटले जाते की प्रेषित प्रत्येक लोक समुहात-राष्ट्रात पाठविले गेले आहेत, याचा अर्थ ते (प्रेषित) राष्ट्राच्या एका विशिष्ट पिढीदरम्यान पाठविले गेले होते.

प्रेषित्वाची गरज: इस्लामचे तिसरे मूलतत्त्व प्रेषित्व आहे. अरेबिक भाषेत यासाठी ‘रिसालत’ हा शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ प्रेषित्व आहे. पारिभाषिक व्याख्येत अल्लाहने मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी पाठविलेले प्रेषित असा अर्थ आहे. अरेबिक भाषेत दुसरा शब्द ‘नबूवत’ हा वापरला जातो. प्रेषितांची एक साखळी ईश्वराने का निर्माण केली? याची गरज का भासली होती आणि प्रेषित्वावर श्रध्दा ठेवणे आवश्यक का आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपणास थोडे सविस्तर चितन करावे लागेल. प्रथमतः आपल्याला पाहावे लागले की मनुष्याच्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी कोणती कार्यप्रणाली आहे?
मनुष्य निर्मितीचा उद्देश आणि त्याची जबाबदारी इस्लाम नुसार ही आहे की त्याने अल्लाहची उपासना करावी आणि अल्लाहला शरण जावून अल्लाहच्या आज्ञांकित राहावे. मनुष्याचे पारलौकिक जीवनातील यश हे जीवनउद्देश प्राप्त करण्यातच आहे. अल्लाहची उपासना आणि त्याचे आज्ञांकित होणे म्हणजे त्याच्या आदेशांचे पालन जीवनव्यवहारात करणे आणि त्याद्वारे अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून घेणे होय. आज्ञाधारकता दिव्य प्रकटनासाठी आहे. दिव्य प्रकटनाशिवाय आपण अल्लाहबद्दल विचारसुध्दा करू शकत नाही. जेव्हा मनुष्य अल्लाहचा आज्ञाधारक सेवक बनून जीवन कंठण्याचे ठरवितो तेव्हा तो आपल्या स्वामीच्या दिव्य प्रकटनाला जाणून घेण्यास आतूर होतो आणि जीवनात अल्लाहचा आज्ञांकित बनून राहातो. तो हे जाणून घेण्यास आतूर होतो की अल्लाहची प्रसन्नता कशात आहे आणि अप्रसन्नता कशात! तो तत्परतेने हे जाणून घेण्यास तयार होतो की त्याने काय करावे की जेणेकरून तो अल्लाहचा विश्वासु सेवक गणला जाईल आणि कोणत्या कृत्यापासून त्याने आपला बचाव करून घ्यावा जेणेकरून अल्लाहची अप्रसन्नता आणि शिक्षेपासून दूर राहता येईल. अल्लाहची आज्ञा न पाळल्यास अल्लाहचा क्रोध आणि कोप होतो याची जाण त्याला सतत असते. हे न जाणता तो अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या मार्गात एक पाऊलसुध्दा पुढे जाऊ शकत नाही.
प्रश्न स्वाभाविकतः निर्माण होतो की आपण कसे जाणून घ्यावे की अल्लाहची इच्छा आणि आदेश काय आहेत? अल्लाहने कोणते कार्य करण्याचे आणि कोणते कार्य न करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे आपण कसे जाणून घ्यावे? एक मार्ग आहे तो आपल्या बुध्दीने त्याची खात्री करून घ्यावी. पण हे पर्याप्त नाही. मानवी बुध्दीच्या पलीकडील हे कार्य आहे. कोणीही आपल्या बुध्दीविवेकानेच फक्त आपले आणि या सृष्टीचे सत्य ओळखू शकत नाही. त्याच्या निर्मात्याचे आणि पालनकर्त्याची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेणे अशक्य आहे. मनुष्यावर या गुणवैशिष्ट्यांचा कोणता परिणाम होतो? त्याचे कोणते आदेश आहेत? मर्यादित बुध्दी या सत्याला जाणून घेण्यास अपात्र ठरते.
दुसरा मार्ग आहे स्वतःच्या अंतर्ज्ञानाचा आणि इच्छाशक्तीचा! परंतु दुसरा मार्गसुध्दा तसा पहिल्यामार्गाप्रमाणेच अपुरा आहे. स्वअस्तित्वाला संपविण्याचे हे अविरत प्रयत्न या उद्देशाला प्राप्त करू शकत नाहीत. अंतर्ज्ञान याने पवित्र जरूर होईल, परंतु असा मनुष्य दिव्य प्रकटन आणि ईश्वरेच्छेला पाहू अथवा अनुभवू शकत नाही. आरशाला जर एखाद्याला प्रतिबिंबित करावयाचे असेल तर आरसा फक्त शुभ्र आणि स्वच्छ असून चालत नाही, हेसुध्दा आवश्यक आहे की ज्याला प्रतिबिबित करावयाचे आहे ते आरशासमोर जवळ असणे आवश्यक आहे. जोपर्यंत अल्लाह दिव्य प्रकटन निश्चित करून त्याला एखाद्याच्या हृदयावर अवतरित करीत नाही तोपर्यंत, अल्लाहचा संदेश परिवर्तीत होणार नाही. परंतु आजपर्यंत हा दावा कोणी केलेला नाही की अल्लाहने दिव्य प्रकटन अंतर्ज्ञानाने आयोजित केले आहे. म्हणून हा दुसरा प्रकारसुध्दा दिव्य प्रकटन जाणून घेण्यासाठी असमर्थ ठरतो.
तिसरा मार्ग अल्लाहचे दिव्य प्रकटन आणि प्रसन्नता प्राप्त करण्याचा सामुदायिक चितन मनन हा आहे. व्यक्तिगत चितनच्या विरोधात जसा आंधळा मनुष्य म्हणजेच दृष्टीहीन मनुष्य दृष्टीवान मनुष्याची बरोबरी करू शकत नाही, तसेच माणसांची गर्दी दिव्य प्रकटन जाणून घेण्यास असमर्थ आहे. ही गर्दी अशा माणसांची असते जे व्यक्तिगतरित्या दिव्य प्रकटन आपल्या बुध्दीनुसार जाणून घेण्याससुध्दा असमर्थ ठरतात. म्हणून हा मार्गसुध्दा वरील दोन्ही मार्गांप्रमाणे अपूर्ण आणि अपर्याप्त असा आहे. म्हणून असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही की वरील तिन्ही मार्ग मनुष्याची ही निकड पूरी करण्यास असमर्थ आहेत.
आपण हे सत्य नाकारू शकत नाही की आपण स्वतः अनेक बाबतीत वाईटापासून चांगले ओळखू शकतो. अशा प्रसंगी आपली बुध्दी, अंतरात्मा, दिव्य मार्गदर्शन आणि आपला विवेक आपणास साहय्य करीत असतात. हे दुसरे तिसरे काही नसून चांगले आणि वाईट यांची पारख करणे होय. पण असा अनुमान काढणे हे योग्य होणार नाही की मनुष्य जर लहानातील लहान बाबींना वेगळे करू शकतो अथवा ओळखू शकतो तर तो दिव्य प्रकटनाला जाणून घेण्याससुध्दा पात्र आहे. काही बाबींचे ज्ञान असणे म्हणजे सर्व बाबींचे ज्ञान आहे असे समजणे चुकीचे आहे. आपण जर धावता दृष्टीक्षेप जगाकडे टाकला तर कळून येते की येथे जीवनमूल्यांबद्दल एकवाक्यता नाही. अनेक बाबींना वाईट किवा चांगले म्हणून सर्वमान्यता अद्याप मिळालेली नाही. अशा अनेक बाबींची लांबलचक यादीसुध्दा सौम्य दृष्टीने साकार होणे अशक्य आहे? अतिसूक्ष्म पडताळणी केल्यास ही यादी आणखी निराशाजनक दिसेल. स्वाभाविकपणे आपण हा दावा करूच शकत नाही की हा पुरावा तकलादू आहे. जर मानवाने ठरविले की लहान वस्तूंचा गट आपणास कशाचीच खात्री देऊ शकत नाही की ते चांगल्या आणि वाईटाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. पणती प्रकाशमान आहे परंतु ती सूर्यांची जागा घेऊ शकत नाही, जो समस्त सृष्टीला प्रकाशमान करतो.
म्हणून मनुष्याची असमर्थता याबाबतीत मान्य करणे स्वाभाविक आहे. बुध्दी किवा अंतर्ज्ञानसुध्दा याला आवाहन देऊ शकत नाही. अशा परिस्थितीला दिव्य मार्गदर्शनाचीच गरज भासते. एकीकडे मनुष्याची बुध्दी आणि आंतर्ज्ञान दिव्य प्रकटन जाणून घेण्यास असमर्थ आहेत. तर दुसरीकडे दिव्यप्रकटनाची गरज ही अन्न आणि पाण्यासारखी निकडीची आहे. अशा परिस्थितीत दुसरा पर्यायच शिल्लक राहत नाही आणि तो म्हणजे अल्लाहने बाह्य रूपाने एखादी व्यवस्था दिव्य प्रकटनासाठी करावी.
म्हणून एका बाजूला माणसाची असमर्थता आणि दिव्य प्रकटनाची तीव्र आणि मौलिक निकड, तसेच दुसऱ्या बाजूला अल्लाहचे प्रभुत्व, कृपाळु, दयाळु आणि सर्वज्ञ न्यायप्रियता, या सर्व ईशगुणांच्या परिणामामुळे मनुष्याला अंधारात चाचपडत ठेवणे हे अशक्यप्राय आहे. मानवाला अशा वेळी मदतीची गरज होती आणि दिव्य मार्गदर्शनाची निकड होती, ज्यामुळे त्याला सरळ मार्गक्रमण व आज्ञाधारकता आपल्या जीवनात अंगीकारता आली. हे कसे शक्य आहे की सर्व विश्वांचा स्वामी अल्लाह हा आपल्या निर्मिती (मानवतेसाठी) मार्गदर्शनाची बाह्य व्यवस्था करून दिव्य संदेश मानवांपर्यंत पोहोच करणार नाही? अल्लाहने यासाठी एक दिवसाचासुध्दा उशीर केलेला नाही. अल्लाह एकीकडे मानवासाठी भौतिक गरजा भागविण्यासाठी विस्तीर्ण अशी व्यवस्था करून ठेवतो आणि दुसरीकडे मानवासाठी त्याच्या नैतिक आणि धार्मिक गरजांची व्यवस्था करून ठेवणार नाही, असे होणे नाही! अल्लाहने मनुष्यावर ही जबाबदारी टाकली आहे की त्याने सत्यमार्गावर आपले जीवन कंठावे, अल्लाहच्या कृपेच्या आणि न्यायप्रियतेच्या विरोधात असते जर मानवाच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहने आवश्यक ती व्यवस्था केले नसती. अल्लाहने तशी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेला पारिभाषिक शब्दात ‘‘प्रेषित्व’’ असे म्हणतात. ज्या मनुष्याद्वारे दिव्य मार्गदर्शनाची ही व्यवस्था केली जाते त्यांना ‘प्रेषित’ असे म्हणतात.
हे अगदी स्पष्ट आहे की मनुष्य दिव्य प्रकटनाबद्दल प्रेषिताशिवाय जाणू शकत नाही. हेसुध्दा तितकेच स्पष्ट आहे की प्रेषित्वावरील श्रध्दा (ईमान) मुस्लिमासाठी अत्यावश्यक आहे. हे इतके गरजेचे आहे जसे स्पष्ट पाहण्यासाठी दोन डोळ्यांची आवश्यकता आहे. जर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एकच मार्ग असेल तर त्या मार्गालाच त्या ठिकाणी पोहचण्यासाठी स्वीकारावे लागते.
ही बाब येथे संपत नाही तर प्रेषित्वाचे व्यावहारिक महत्त्व यापेक्षा अधिक स्पष्ट आहे. प्रेषित्वाविना अल्लाहला व पारलौकिक जीवनास समजणे उमजणे अशक्य आहे. मग दिव्य प्रकटनाबद्दल तर विचारू नका! प्रेषित्व हे एक माध्यम आहे, ज्याद्वारे आपणास अल्लाह आणि पारलौकिक जीवनाचे ज्ञान मिळते. स्पष्टपणे सांगायचे तर प्रेषित्वामध्ये श्रध्दा ठेवण्याशिवाय अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर श्रध्दा ठेवणे शक्य नाही. म्हणून प्रेषितांवरील श्रध्दा ही इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी एक आहे. श्रध्देचे हे एक मौलिक अंग आहे.

ईश्वराने मानवाला जे आचार-विचारांचे स्वातंत्र दिले आहे, त्याचा गैरवापर करुन मानव ईश्वराची अवज्ञा करुन बंडाचा मार्ग अनुसरु शकतो. परंतु मानवाकरिता योग्य, वैध, नैतिक आणि इहलोक व परलोक जीवनामध्ये यशाचा व चांगल्या साफल्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ईश्वराला प्रसन्न करणे, त्याची भक्ती करणे आणि त्याच्याच कायदे-कानून व आदेशपालनाचा मार्ग स्वीकारणे होय.
सर्व विश्व, सृष्टी फक्त ईश्वराची भक्ती आणि त्याच्याच आदेशाच्या पालनाकरिता आहे. ईश्वराचा भक्त, उपास्य, गुलाम म्हणजेच विश्वमानवसुद्धा ईशनिर्मितीचे एक अंग असल्यामुळे त्यानेदेखील ईश्वराच्या कायद्याचे आणि आदेशाचे पालन केले पाहिजे. याच अवस्थेत तो विश्वाशी, सृष्टीशी एकरूप होऊन सफलतेच्या मार्गावर जाऊ शकतो. ईश्वराशी बंड, त्याची अवज्ञा म्हणजे लोक-परलोक या दोन्ही जीवनांमध्ये अयशस्वी होऊन आपले जीवन बरबाद करण्याचा मार्ग आहे. आणखी दुसऱ्या दृष्टीकोनातून विचार केला तर माणसाची सर्वांत मोठी गरज आहे की, त्याला समजले पाहिजे की, ईश्वराने त्याला जीवन बहाल केलेले आहे. त्याने दिलेल्या कर्तृत्वाचा आणि सामर्थ्याचा वापर अशा प्रकारे करावा की, लोक व परलोक या दोन्ही जीवनांमध्ये यशस्वी व्हावे. त्याचा मालक, पालनकर्ता आणि बुद्धिमान असा ईश्वर त्याच्यावर संतुष्ट व प्रसन्न व्हावा. ही फक्त व्यक्तिगत बाब नसून ती सर्व जाती, समाज आणि संपूर्ण मानवतेशी संबंधित आहे. मानवाला एका अशा कायद्याची नितांत आहे, ज्यामध्ये काळे-गोरे, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, कामगार-भांडवलदार, पौर्वात्य-पाश्चिमात्य सर्वांना समान न्याय मिळेल! सर्वांना कायमस्वरुपी समान संधी असेल. सर्व मानवजातीच्या समस्यांचे एकमेव आणि समाधानकारक निराकरण असेल अशा प्रकारचे कायदे-कानून मनुष्य आजपर्यंत बनवू शकला नाही किंवा तो कधीही बनवू शकत नाही. त्याच्याजवळ ते ज्ञान, समज, बुद्धी, दृष्टी आणि ते कतृत्वच नाही जे नैतिक धर्म व शाश्वत कायदे-कानून बनविण्याकरिता जरुरीचे आहे. अशा प्रकारचे धर्म, जीवनपद्धती आणि कायदा फक्त ईश्वरच बनवू शकतो, जो सर्वज्ञानी असून सर्व मानवजात आणि निसर्गाचा निर्माता आहे. व्यक्तीचे नशीब, उत्कर्ष व अवकर्ष, यश व अपयश यांच्या कारणांचा माहीतगार आहे. अज्ञानापासून पवित्र, ज्ञान आणि विद्वत्तेचा उगम, अन्याय आणि जबाबदारीच्या प्रत्येक भागाबद्दल ज्ञानी आणि न्यायी आहे. त्याच्या दृष्टीत सर्व मानव एकसारखे, एकरुप व समान आहेत. सर्व त्याचीच निर्मिती, सेवक व भक्त आहेत. तो सर्वांकरिता कृपाळू व दयाळू आहे. त्याने मानवाच्या सर्व लहान-मोठ्या गरजांच्या पूर्ततेची व्यवस्था केली आहे. तोच संपूर्ण मानवजातीच्या सर्वांत मोठ्या आणि मूलभूत गरजांची पूर्तता करु शकतो. विचारांती ईश्वराशिवाय कोण ठामपणे सांगू शकतो की, त्याची मर्जी, आशा-आकांक्षा, इच्छा काय आहे ? ईश्वराशिवाय ईश्वरी कायदा-व्यवस्था कोण प्रदान करू शकतो? परलोकाची कायमस्वरुपी मुक्ती, सफलता आणि यशाचा मार्ग कोण दाखवू शकतो ? आणि म्हणूनच अशा न्यायी दयाळू, कृपाळू, ज्ञानी ईश्वरावर पूर्णतः श्रद्धा ठेवली पाहिजे. त्याने मानवाच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण गरजांच्या पूर्ततेकरिता व्यवस्था केलीच असेल आणि त्यांची पूर्तता तो आणि फक्त तोच ईश्वर करू शकतो.
आम्ही पाहतो की, वस्तुतः ईश्वराने मानवाच्या सर्वांत मोठ्या गरजेच्या पूर्ततेची व्यवस्था केली आहे. त्याने प्रत्येक काळामध्ये निरनिराळ्या समाजांमधून, जातींमधून अशा व्यक्ती निवडल्या आहेत की, ज्या उत्तमोत्तम बुद्धिमत्ता, सदाचारी आणि सन्मार्गी होत्या. त्या व्यक्तींना आपल्या देवदुतांमार्फत आपल्या मर्जीप्रमाणे आपला धर्म आणि कायदे-कानून याविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांना या गोष्टींची जवाबदारी दिली की, हा ईशधर्म सर्वसामान्य, अज्ञानी, मार्गभ्रष्ट, अन्यायी, कुकर्मी, सामान्य माणसांपर्यंत पोहचवावा. त्यांना सुधारण्याचे अथक प्रयत्न त्यांनी (अर्थात प्रेषितांनी) करावे. या ईशधर्मामध्ये ईश्वराने सरळ स्पष्ट केले होते की, ईश्वराचे सेवक, भक्त, दास यांनी कोणत्या रीतीने ईश्वराची भक्ती करावी, कोणते कर्म ईश्वराच्या दृष्टीने चांगले आहे ते त्यांनी करावे, कोणते कर्म ईश्वराच्या दृष्टीने वाईट आहे की ज्यापासून त्यांनी दूर राहावे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या मार्गाने ते कार्यरत राहतील ज्यामुळे सर्वांचा मालक व शासक ईश्वर प्रसन्न होईल. ईशधर्माने अशा कायद्यांची देणगी दिली, ज्यांमध्ये सर्व मानवजातीकरिता न्याय, जीवनातील सर्व बाबी, व्यवस्था, कर्तव्य, सदाचार, सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी घडामोडींमध्ये सार्वजनिक समस्यांचे समाधान आहे. त्यांच्या इहलोक जीवनाची सफलता आणि कायमस्वरुपी विकास व यशाची हमी, त्याचबरोबर परलोकाची कायमस्वरुपी मुक्ती आणि यशाची खात्री व हमी दिलेली आहे.
ईश्वराने निवडलेले प्रेषित हे ईश्वर नाहीत किंवा ईश्वराचे अपत्य, अवतार नसून ते ईश्वराच्या सृष्टीमध्ये, ईशरत्वामध्ये कणभर सुद्धा ढवळाढवळ करीत नाहीत. तेही मानवच आहेत. ईश्वराचे सेवक, भक्त व दास आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, क्षेत्रामध्ये सामान्य मानवाप्रमाणेच लाचार आहेत. तेदेखील ईश्वरीय कोपापासून, अवज्ञापासून स्वतःचा बचाव करतात आणि ईश्वर त्यांना पापांपासून वाचवीत असतो. त्यांचे जीवन म्हणजे पवित्र जीवन असते. ते ईश्वराचे उत्तम दास, उपासक व भक्त असतात. ते ईश्वरीय धर्माचा, जीवनपद्धत्तीचा प्रचारक आणि सदाचाराचा एक आदर्श नमुना असतात. प्रेषितांचे शुद्ध जीवन म्हणजे उत्तम जीवनाचा एक आदर्श नमुना आहे.
अल्लाहचे हे निवडक दास ईश्वरीय कायदे-कानून, नीती-नियम सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवीत असतात. मार्गभ्रष्ट झालेले मानव त्यांचा (प्रेषितांना) विरोध करत, त्यांना शिवीगाळ करत आणि त्यांची थट्टामस्करी करत असत व त्यांच्यावर दगडफेकही करीत असत. त्यांच्यावर अन्यायाचे डोंगर कोसळत असत व त्यांना देशांतर करण्यास भाग पाडण्याच्या किंवा ठार मारण्याच्या योजना बनवत असत. परंतु ते मनुष्याला किंवा संकटास भिऊन स्वार्थापोटी आपल्या ईश्वरीय धर्म आणि जीवनपद्धतीमध्ये कणभरही बदल करीत नसत. उलट तेच विरोधकांना क्षमा करून त्यांचीसुद्धा स्वच्छ मनाने सेवा करत असत आणि ईश्वराकडून त्यांना (विरोधकांना) सन्मार्ग मिळावा यासाठी प्रार्थना करावयाचे. त्यांना प्रसिद्धीची किंवा ऐहिक फायद्यांची लालसा नव्हती. त्यांच्या जीवनाचा उद्देश व जीवनकार्य एकच असे की, ईश्वरीय धर्म, जीवनपद्धती सतत व निःस्वार्थपणे आचरणे, त्यांचा प्रचार करुन ईश्वराच्या दासांमध्ये सुधारणा घडवून आणणे, ईश्वरीय नियम, कायदे व ईशवाणी त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि ईश्वराच्या भूमीवर त्यास प्रस्थापित करणे, या उद्देशाकरिता, मिशनकरिता प्रेषित आणि त्यांचे खरे अनुयायी प्रचारक आपले संपूर्ण जीवन आणि आपले कर्तव्य पणास लावतात. प्रत्येक प्रकारची संकटे सहन करून आपल्या प्राणांची, संपत्तीची आहुती देऊन आपल्या ईश्वराला जाऊन भेटतात.
इस्लामी दृष्टीकोनातून प्रथममानव माननीय आदम (अ.) यांच्यापासून प्रेषितत्वाचा उगम होतो आणि शेवटचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापर्यंत येऊन पूर्ण होतो. हे सर्व प्रेषित एकाच समुहाशी संबंधित आहेत. ईश्वराचे सर्व प्रेषित आणि त्यांच्यावर अवतरित ईशग्रंथ यांवर विश्वास, श्रद्धा ठेवणे हे मुक्तीकरिता जरुरीचे आहे. एखाद्या प्रेषिताला नाकारणे म्हणजे सर्व प्रेषितांना नाकारण्यासारखे आहे. तसेच कोणताही ईश्वरीय ग्रंथ नाकारणे म्हणजे सर्व ईशग्रंथांना नाकारण्यासारखे आहे.
ईश्वराचे हे प्रेषित निरनिराळ्या काळांमध्ये, युगांमध्ये समाजांमध्ये, जातींमध्ये, परिस्थितींमध्ये झाले. या फरकामुळे व विविधतेमुळे त्यांनी आणलेल्या नियमांच्या, कायद्यांच्या तपशीलामध्ये स्थानपरत्वे, काळपरत्वे काही फरकसुद्धा दिसून येतो. परंतु सर्वांचे मूलभूत तत्त्व एकच होते. सर्व प्रेषितांचा मूलभूत संदेश एकच होता की,
‘‘ईश्वराचीच-अल्लाहचीच भक्ती, आराधना, पूजा-अर्चा करा. अल्लाहशिवाय भक्ती व उपासनेयोग्य दुसरा कोणी नाही.’’
अल्लाहच्या (ईश्वराच्या) भक्तीशिवाय इतर दुसरा कोणताच मार्ग नाही की ज्यानुसार ईशधर्माचे, जीवनपद्धतीचे अनुसरण व पालन करता येईल. दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल की, प्रेषितांच्या आज्ञेचे पालन केले जावे. कारण प्रेषितांचे आज्ञापालन हे ईश्वराचे आज्ञापालन आहे आणि ईश्वराचे आज्ञापालन म्हणजे ऐहिक व पारलौकिक जीवनामध्ये सफलतेचे, यशाचे मानचिन्ह आणि प्रतीक आहे. प्रेषितांची अवज्ञा म्हणजे ईश्वर (अल्लाह) आणि त्याच्या आदेशांची, कायद्यांची अवज्ञा आहे आणि ईश्वराची अवज्ञा करणे म्हणजे ऐहिक व पारलौकिक जीवनामध्ये अयशस्वी होणे आणि विनाशाला कवटाळण्यासारखे आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) पृथ्वीतलावर अवतरले तेव्हा अनेक ईश्वरीय ग्रंथ उदा. तौरात, जबुर व बायबलमध्ये लोकांनी बदल करुन टाकले होते. आजसुद्धा हीच परिस्थिती आहे. पवित्र कुरआनशिवाय कोणताच ईश्वरीय ग्रंथ खऱ्या स्वरुपात आणि सुरक्षित अवस्थेत अस्तित्वात नाही. मानवी फेरफार व बदल यामुळे सत्य व असत्य यांत संभ्रम निर्माण होतात. ईश्वरीय आदेश व कायदे- व्यवस्था यामध्ये मानवी कायदेव्यवस्थाची भेसळ झाली होती. ऐहिक व भौतिक यशाचा मार्ग ऐहिक मायाजालामध्ये जोखडून गेला होता. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआन अवतरले. कुरआनची शिकवण काही नवी नाही. कुरआनने प्रेषितांच्या शिकवणींमधील मानवी फेरबदलाला वेगळे केले, असत्यापासून सत्याला उजेडात आणले, ईश्वराशी नाते आणि मुक्तीच्या खऱ्या मार्गाची ओळख निर्माण केली, ईश्वरीय कायदे-कानून, नियम यांचे खऱ्या व ठोस पद्धतीने स्पष्टीकरण केले, सर्व मानवांच्या व जगाच्या अंतापर्यंत एक सन्मार्ग आणि मार्गदर्शनामध्ये कायमस्वरुपी आधुनिकता निर्माण केली. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) जरी अरब देशातील मक्का शहरामध्ये जन्मले किंवा जगाच्या इतर कोणत्याही ठिकाणी जन्मले असते तरी इस्लामचा संदेश आणि इस्लामी संविधान संपूर्ण मानवजाती, सर्व देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाकरिता प्रलयकाळापर्यंत लागू झाले असते. प्रेषित मुहम्मद (स.) समस्त मानवांकरिता ईश्वराचे अंतिम प्रेषित आहेत.
आता आपण प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांचा ईशधर्म म्हणजेच (जीवन-व्यवस्थेला) आजच्या युगामध्ये किती महत्त्व आहे हे समजण्याचा प्रयत्न करू या.
ही गोष्ट बायबल, कुरआन आणि धर्मांच्या इतिहासामध्ये अगदी स्पष्ट आहे की, पूर्वीचे प्रेषित (मुहम्मद पैगंबराच्या आधीचे) हे संपूर्ण मानवजाती आणि प्रलयकाळापर्यंतच्या सर्व मानवांच्या मार्गदर्शनाकरिता आलेले नव्हते, तर ते ठराविक अशा विशिष्ट समूह, जातीकरिता, विशिष्ट अशा देशासाठी, राष्ट्रासाठी पाठविण्यात आले होते. याउलट पवित्र कुरआनबद्दल ईश्वराने प्रत्येक वेळी स्पष्ट शब्दांमध्ये जाहीर केले आहे की, ते संपूर्ण विश्वाच्या आणि अंतिम दिवसापर्यंतच्या सर्व मानवांकरिता, सर्व युगांमध्ये, सर्व काळांमध्ये मार्गदर्शनासाठी अवतरले आहे. आपण पाहतो की, आज देशाला, मानवतेला ठराविक कालखंडामध्येच मार्गदर्शनाची गरज नाही तर विश्वाला, मानवतेला सर्व युगांमध्ये, सर्वकाळ मार्गदर्शनाची गरज आहे आणि ती फक्त प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या शिकवणीद्वारेच आपणाला प्राप्त झाली आहे.
दुसरी गोष्ट आपण पाहतो की, ईश्वरीय ग्रंथांमध्ये पवित्र कुरआन कोणताही बदल न होता मूळ स्वरुपात, स्थितीत सुरक्षित आहे. इतर ईश्वरीय ग्रंथ सुरक्षित स्थितीत नाहीत. म्हणूनच ईश्वरीय मार्ग प्राप्त करण्याकरिता पवित्र कुरआनाकडेच निर्देश करावा लागतो आणि (आम्हाला) दुसऱ्या कोणामार्फत हे ईश्वरीय मार्गदर्शन मिळू शकत नाही.
तिसरी गोष्ट ही आहे की, पवित्र कुरआनविषयी जो तपशील प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिला आणि त्यांनी संपूर्ण जीवनभर स्वतः त्याप्रमाणे आचरण केले. हे हदीस (प्रेषिताचरण) आणि मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रामध्ये तपशीलवार नमूद केलेले आहे. जगातल्या कोणत्याही महात्म्याचा, महान नेत्याच्या जीवनाचा तपशील प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाप्रमाणे सुरक्षित नाही. हेच एकमेव असे कृतीशील आणि व्यावहारिक उदाहरण आहे, जे सर्व मानवतेच्या मार्गदर्शनाकरिता उपलब्ध आहे.
चौथी गोष्ट ही आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून अरबांच्या अत्यंत बिघडलेल्या समाजाचे एका उत्तम सजग समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. या परिवर्तनाचा व समाजसुधारणेचा हा एकमेव प्रयत्न आणि या एकमेव आदर्श नमुना बनलेल्या समाजाचा तपशील इतिहासामध्ये एक आदर्श उदाहरण आहे. सामाजिक सुधारणा आणि रचनात्मक समाजकार्याकरिता आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो.
पाचवी बाब लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वरीय धर्म (इस्लाम) प्रस्थापित करण्यासाठी एक महान क्रांती घडवून आणली आणि एका आदर्श राष्ट्राची व राज्याची स्थापना केली. त्यांच्या पश्चात खलीफांनी आणि त्यांचे सहकारी व अनुयायी यांनी त्यास विशाल करुन त्यामध्ये दृढता आणली. या एकमेव आंतरराष्ट्रीय, मानवतेचा दृष्टीकोन असणारे धार्मिक, सदाचारी आणि आदर्श राज्याच्या प्रस्थापनेचा तपशील इतिहासात सुरक्षित आहे. आपण निरंतर क्रांतिकारक देश आणि नमुनेदार आदर्श राज्याची प्रस्थापना करण्यासाठी याची मदत घेऊ शकतो.
सहावी गोष्ट ही आहे की, संपूर्ण मानवता आज महान समस्यामध्ये गुरफटलेली आहे. त्या समस्या सोडविण्यास हल्लीचे सर्व धर्म आणि ‘इझम’ (वाद) अपयशी ठरले आहेत. परंतु इस्लाम धर्मामध्ये या सर्व समस्यांचे कायमस्वरुपी उत्तर व मार्ग अस्तित्वात आहेत. दुसरा कोणताही धर्म आणि व्यवस्था अशी नाही की, सर्व मानवतेच्या समस्यांचे निराकरण करु शकेल. हाच खरा चमत्कार व महत्त्व प्रेषित मुहम्मद (स.) आणि इस्लामचे आजच्या युगामध्ये आहे!

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget