Latest Post

‘शरिअत’ म्हणजे काय व शरिअत आणि ‘दीन’ मध्ये काय फरक आहे?
दीन (जीवनधर्म) व शरिअत 
इस्लाम धर्मानुसार तुम्ही अल्लाहच्या अस्तित्वावर व त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर श्रद्धा बाळगावी, तसेच पारलौकिक जीवनात या जगातील सत्कर्माबद्दल मिळणारे इनाम व दुष्कर्माबद्दल मिळणारी शिक्षा या गोष्टीवर अल्लाहच्या सच्चा प्रेषितांनी जी शिकवण दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ईमान धारण करावे. ईशग्रंथांना मान्य करून आपल्या स्वैर आवडीच्या व पसंतीच्या मार्गाचा परित्याग करावा. या ग्रंथांमध्ये जो मार्ग दाखवून देण्यात आला आहे त्या मार्गाचाच अवलंब करा. अल्लाहच्या प्रेषितांचेच अनुयायीत्व करा व इतर सर्व गोष्टी सोडून त्यांच्याच आज्ञांचे पालन करा. ‘इबादत’ (उपासना) मध्ये अल्लाहखेरीज इतर कोणाचाही समावेश करु नका. त्याच ‘ईमान’ व ‘इबादत’ चे नाव ‘दीन’ असे आहे. हे सर्व प्रेषितांच्या शिकवणीत समाविष्ट आहे.
यानंतर शरिअत (धर्मशास्त्र) म्हणजे काय हे पाहू या. शरिअत (धर्मशास्त्र) म्हणजे उपासना करण्याच्या पद्धती, सामाजिक नियम व कायदे, ‘हराम’ (निषिद्ध) व ‘हलाल’ (वैध) इ. तसेच धर्मसंमत व धर्मअसंमत यांच्या मर्यादा वगैरे. या विविध बाबींसाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने भिन्नभिन्न काळांत भिन्नभिन्न जातीवंशाच्या व जनसमूहांच्या अवस्थांनुसार आपल्या प्रेषितांकरवी वेगवेगळ्या शरिअत-पद्धती पाठविल्या होत्या, जेणेकरून प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला नीती व सभ्यतेची, संस्कृतीची वेगवेगळी शिकवण देऊन त्यांना एका विशाल कायद्याच्या पालनासाठी तयार करीत राहावे. जेव्हा हे कार्य पूर्ण झाले तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना तो विशाल कायदा देऊन पाठविले. त्या विशाल कायद्याची एकूण कलमे व तरतूदी सर्व विश्वासाठी आहेत. आता ‘दीन’ तर तोच आहे जो आधीच्या प्रेषितांनी शिकविला होता. परंतु मागील सर्व ‘शरिअत-पद्धती’ मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या ठिकाणी अशी ‘शरिअत’ प्रस्थापित केली गेली आहे ज्यामध्ये समस्त मानवजातीसाठी उपासनांच्या पद्धती, सामाजिक नियम, आपापसातील व परस्परातील संबंधाचे व व्यवहाराचे नियम, ‘हराम’ व ‘हलाल’ यांच्या मर्यादा, सर्वांना सारख्या लागू आहेत.
शरिअतच्या आज्ञा जाणून घेण्याची साधने
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शरिअतचे नियम व आदेश जाणण्यासाठी आपल्याकडे दोन साधने आहेत. पवित्र ‘कुरआन’ व ‘हदीस’ ही ती साधने होत.
पवित्र ‘कुरआन’ हा ईशग्रंथ आहे व त्यातील प्रत्येक शब्द अल्लाहकडून आहे हे तर तुम्ही जाणताच. प्रश्न उरला हदीसचा, हदीस म्हणजे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उक्ती व कृतीबद्दलची माहिती आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘कुरआन’ चे प्रत्यक्ष आचरणाने घडविलेले स्पष्टीकरण आहे. प्रेषित्वाच्या प्राप्तीनंतर सतत तेवीस वर्षांच्या कालावधीपर्यंत ते सदैव शिकवण व उपदेश, मार्गदर्शनाच्या कार्यात मग्न असत. आपल्या वाणीने व आचरणाने ते लोकांना हे दाखवून देत असत की, अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे. त्यांच्या अत्यंत प्रभावी जीवनकालात त्यांचे (सहाबी) साथीदार पुरुष व साथीदार स्त्रिया, त्यांचे आप्तेष्ट, तसेच त्यांच्या पत्नी ही सर्व मंडळी प्रेषित मुहम्मद (स.) यांची प्रत्येक उक्ती लक्ष देऊन ऐकत असत, प्रत्येक कृत्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करीत असत, तसेच त्यांना वेळोवेळी सामोऱ्या येणाऱ्या व्यावहारिक समस्यांबद्दल ते प्रेषिताकडून शरिअतच्या आदेशाची मागणी करत असत. प्रेषित मुहम्मद (स.) कधी सांगत असत की अमुक काम करु नका व जे लोक त्या वेळी हजर असत ते ही उक्ती ऐकून घेऊन स्मरणात ठेवीत असत. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद (स.) एखादे कृत्य काही विशिष्ट पद्धतीने करीत असत आणि तसे करताना त्यांना प्रत्यक्ष पाहणारे लोक ती विशिष्ठ पद्धत लक्षात ठेवीत असत. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले नाही अशा लोकांना ते तंतोतंत वर्णन करुन सांगत असत. तसेच प्रेषितांच्या समक्ष कधी एखादा मनुष्य एखादे कृत्य करी तेव्हा प्रेषित कधी स्तब्ध राहात अगर त्याबद्दल आपली पसंती वा नापसंती व्यक्त करीत असत. हे सर्व हजर असणारे लोक आपल्या स्मृतीत जतन करून ठेवीत असत. असे जे काही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सोबती व साथीदार स्त्री पुरुषांनी ऐकले, काहींनी ते पाठांतराने मुखोद्गत करुन टाकले, काहींनी लिखाण करून त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आणि ती माहिती कोणाकडून मिळाली यांचीही नोंद ठेवली, या सर्व रिवायतींना (निवेदनांना) पुढे पुढे एकत्रीकरण करुन त्यांना पुस्तकी स्वरुप देण्यात आले. अशाप्रकारे ‘हदीस’ चा एक मोठा संग्रह उपलब्ध झाला. हदीसचा संग्रह करणाऱ्यात प्रामुख्याने इमाम मालिक (रह.), इमाम बुखारी (रह.), इमाम मुस्लिम (रह.), इमाम तिरमिजी (रह.), इमाम अबू दाऊद (रह.), इमाम निसाई (रह.), इमाम इब्ने माजा (रह.) यांनी संग्रह केलेले ग्रंथ अधिक प्रमाणित मानले जातात.
‘फिकाह’ नियमावली
कुरआन व हदीस यातील सर्व आदेशांचा अभ्यास व अध्ययन करुन काही इस्लाम धर्मश्रेष्ठींनी सामान्य माणसांना सोयीस्कर होईल अशा रितीने खुलासेवार नियमावली तयार केली असून त्या नियमांना ‘‘फिकाह’’ असे म्हणतात. प्रत्येक मनुष्य कुरआनमधील सर्व बारकावे नीट समजू शकत नाही, तसे माणसाला हदीसचेही इतके ज्ञान प्राप्त नसते की त्याने स्वतःच शरिअतचे आदेश जाणून घ्यावे. म्हणून ज्या धर्मश्रेष्ठींनी वर्षानुवर्षे अध्ययन व संशोधन करून जो ‘फिकाह’ संकलित करून ठेवला आहे, त्यांच्या उपकाराचे ऋण जगातील मुस्लिम कधीही फेडू शकत नाहीत.
आज जगातील कोट्यवधी मुस्लिम कसल्याही श्रमाविना शरिअतच्या नियमाचे पालन करीत आहेत. तसेच ईश्वराचे व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश जाणणे कोणालाही अवघड वाटत नाही. हे त्या धर्मश्रेष्ठींनी घेतलेल्या खडतर परिश्रमाचेच फळ आहे.
आरंभीच्या काळात अनेक धर्मश्रेष्ठींनी ‘फिकाह’ चे संकलन आपापल्या पद्धतीने करून ठेवले होते, परंतु पुढे फक्त चार फिकाहच अखेरीस उरले व जगातील मुस्लिम सर्वाधिक त्यांचेच आज्ञापालन करीत आहेत. त्या चार ‘फिकाह’ खालीलप्रमाणे आहेत.
(१) इमाम अबू हनीफा (रह.) यांची फिकाह. या फिकाहचे संकलन करण्यात इमाम अबू युसूफ (रह.), इमाम मुहम्मद (रह.), इमाम जाफर (रह.) व तसे आणखी काही श्रेष्ठ धर्मपंडितांचा सल्ला समाविष्ट होता. याला ‘फिकाह हनफी’ असे नाव आहे.
(२) इमाम मालिक (रह.) ची फिकाह. ही फिकाह ‘मालिकी’ या नावाने प्रसिद्ध आहे.
(३) इमाम शाफई (रह.) ची फिकाह. याला ‘फिकाह शाफई’ असे म्हणतात.
(४) इमाम अहमद बिन हम्बल (रह.) ची फिकाह. याला फिकाह ‘हम्बली’ असे म्हटले जाते.
या चारही नियमावली (फिकाह चे संकलन) प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या निधनानंतर २०० वर्षांच्या कालावधीच्या आत संकलित झालेले आहेत. या चार फिकहमध्ये जे काही भेद आहेत ते अगदी स्वाभाविक फरक आहेत. एखादी घटना अथवा एखादा व्यवहार याची काही वेगवेगळे लोक जेव्हा सखोल चौकशी करतात किंवा एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या चौकशीच्या निष्कर्षात व त्यांच्या संकलित माहितीत थोडीफार तफावत अवश्य असतेच. परंतु वरील चारही धर्मश्रेष्ठी सद्हेतु धारण करणारे व मुस्लिमांचे हितचिंतक होते. म्हणून सर्व मुस्लिम या चारीही धर्मश्रेष्ठींना सत्याधिष्ठित मानतात.
अर्थातच आपल्या सर्व जीवनव्यवहारांसंबधी कोणतीही एकच फिकाह पद्धत अवलंबली जाऊ शकते. चार विविध पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकत नाही; ही गोष्ट उघड आहे. म्हणून बहुतेक इस्लामी धर्मपंडितांचे असे मत आहे की मुस्लिमांनी या चार फिकाहपैकी कोणत्याही एकाचाच अवलंब करणे अगत्याचे आहे. याशिवाय इस्लाम धर्मपंडितांचा एक समूह असा आहे ज्याच्या म्हणण्यानुसार कोणत्याही एका विशिष्ट नियमावलीचा अवलंब करणे आवश्यक नाही, ज्ञान व माहिती असणाऱ्या प्रत्येक माणसाला ‘कुरआन’ व ‘हदीस’ मधून थेट आदेश प्राप्त करुन घ्यावयास हवे. जे विद्येपासून वंचित आहेत त्यांनी ज्या धर्मपंडितावर त्यांची श्रद्धा असेल त्याचे अनुकरण करावे. त्यांना ‘‘अहले हदीस’’ असे संबोधिले जाते. वरील चार समूहाप्रमाणे हा पाचवा समूहसुद्धा सत्त्याधिष्ठित आहे.
(१) मान. इमाम अबु हनीफा (रह.) ८० हि. (इ.स. ६९९) जन्माला आले. मृत्यू १७१ हि (इ.स. ७६७) मध्ये झाला. या फिकाहचे अनुयायी तुर्कस्तान, पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, इंडोचीन रशिया इ. मध्ये आहेत.
(२) मान. इमाम मालिक अनस - जन्म ९३ हि (इ.स.७१४), मृत्यू १७१ हि (इ.स.७९८). या फिकहचे मानणारे मॉरिशस अहजेरिया, सुडान, ट्युनिशिया, कुवेत व बहरीनमध्ये आहेत.
(३) मा. इमाम इदरीस बिन शाफई (रह.) जन्म १५० हि (इ.स. ७६७), मृत्यू २४० हि (इ.स.८५४). यांचे अनुयायी पॅलेस्टाईन, लेबेनान, इजिप्त, इराक, सऊदी, अरब, यमन व इंडोनिशियामध्ये आहेत.
(४) मा. इमाम अहमद बीन हम्बल (रह.) जन्म १६४ हि (इ.स. ७८०), मृत्यू २४१ हि. (इ.स. ८५५). यांचे अनुयायी अधिकांश सऊदी अरब, लेबेनान व सीरियामध्ये आहेत.
‘तसव्वुफ’ (आत्मशुद्धी)
फिकाहचा संबंध माणसाच्या दर्शनी कृतीशी आहे. फिकाह फक्त इतकेच पाहत असते की, तुम्हाला जसा व ज्या प्रकारे आदेश दिला गेला आहे, तो तुम्ही पार पाडला आहे किंवा नाही. जर तुम्ही तो आदेश पार पाडला असेल तर तुमच्या अंतःकरणाच्या स्थितीशी फिकाहला काही कर्तव्य नाही. मनाच्या स्थितीशी संबंध असणाऱ्या गोष्टीला ‘तसव्वुफ’(१) असे नाव आहे. उदाहरणार्थ तुम्ही नमाज पढता, या उपासनेत फिकाह केवळ इतकेच पाहतो की तुम्ही वजू नीट केला आहे किंवा नाही, काबागृहाकडे तोंड करून उभे आहात की नाही, नमाजचे सर्व अनिवार्य विधी केले किंवा नाही, नमाजमध्ये ज्या सूत्राचे पठन करावे लागते ते तुम्ही केले किंवा नाही. ज्या समयी जितकी ‘रकाआत’ नमाज ठरलेली आहे अगदी त्याच वेळी तुम्ही तितकीच नमाज अदा केली आहे किंवा नाही. इतके सर्व तुम्ही पूर्ण केले तर फिकाहच्या दृष्टीने तुमची नमाज पूर्ण झाली. परंतु उपासना करताना तुमच्या अंतःकरणाची स्थिती काय होती, तुमच्या मनाची एकाग्रता ईश्वराकडे होती किंवा नाही, तुमचे मन या जगातील विचारापासून निर्मळ होते किंवा नाही. नमाजमुळे तुमच्या मनात ईशभय, ईश्वराचे सर्वज्ञानी व सर्वव्यापी असण्यावरील विश्वास व केवळ ईश प्रसन्नता प्राप्त करण्याची भावना निर्माण झाली किंवा नाही. या नमाजमुळे तुमची आत्मशुद्धी किती प्रमाणात झाली. तुमचे चारित्र्य कितपत सुधारले, नमाजने तुम्हाला किती प्रमाणात सच्चा व पक्का कृतीशील मुस्लिम बनवून सोडले, वरील सर्व बाबींचा तसव्वुफ उहापोह करतो.
१) कुरआनमध्ये यालाच ‘तझकिया’ (आत्मशुद्धी व ‘हिकमत’) असे म्हटले आहे. हदीसमध्ये याला ‘एहसान’ असे संबोधले गेले आहे व नंतरच्या लोकांत हीच गोष्ट ‘तसव्वुफ’ या नावाने सुप्रसिद्ध झाली.
नमाजच्या मूळ हेतूशी संबंध असणाऱ्या या सर्व बाबी जितक्या अधिकाधिक प्रमाणात तुमच्यात निर्माण होतील तितक्याच प्रमाणात तुमची नमाज ‘तसव्वुफ’च्या दृष्टीने अधिक परिपूर्ण होईल. या गोष्टींची जितक्या प्रमाणात तुमच्यात उणीव असेल तितक्याच प्रमाणात ‘तसव्वुफ’ तुमची नमाज दोषयुक्त ठरवील. याच तऱ्हेने ‘शरिअत’ चे जे काही आदेश ज्या स्वरुपात दिले गेले होते त्याच स्वरुपात तुम्ही त्यांचे पालन केले आहे किंवा नाही; फिकाह एवढेच पाहते. तर या आदेशांचे पालन करताना तुमच्या अंतःकरणात निष्ठा, प्रामाणिकपणा, सद्भाव व खरा आज्ञाधारकपणा किती प्रमाणात होता. या बाबींची चिकित्सा ‘तसव्वुफ’ करतो.
या दोहोंमधील फरक खालील उदाहरणावरुन अधिक स्पष्टपणे कळू सकतो. तुम्हाला जेव्हा एखादा मनुष्य भेटतो तेव्हा तुम्ही दोन दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहता. एक म्हणजे तो शारीरिकपणे सुदृढ व निकोप प्रकृतीचा आहे किंवा नाही. तो आंधळा, लंगडा, पांगळा तर नाही? देखणा आहे की कुरुप, कपडे नीटनेटके व स्वच्छ आहेत की घाणेरडा आहे. तुमचा दुसरा दृष्टिकोन असा असेल की त्याचे चारित्र्य कशा प्रकारचे आहे? त्याच्या सवयी व गुणवैशिष्ठ्ये कशी आहेत. त्याची बुद्धिमत्ता व व्यवहारी ज्ञान कसे आहे, तो विद्वान आहे की अडाणी, सदाचारी आहे की दुराचारी? वरील पहिला दृष्टिकोन फिकाहचा आहे तर दुसरा दृष्टिकोन तसव्वुफचा आहे.
मैत्रीखातर जेव्हा तुम्हाला एखादा मनुष्य निवडायचा असेल तेव्हा त्याचे व्यक्तीमत्त्व तुम्ही या दोन्ही दृष्टिकोनांतून पडताळून पाहाल. त्याचे अंतरंग तसेच बाह्यरूप चांगले असावे अशीच तुमची इच्छा असेल. त्याचप्रमाणे शरिअतच्या आदेशांचे पालन बाह्यत्कारी व दर्शनी दृष्टीनेही अचूक असावे व मानसिक दृष्टिकोनाने ते निकोप असावे. अशाच प्रकारचे जीवन इस्लाममध्येही अधिक पसंत आहे. ज्याचे बाह्यत्कारी आज्ञापालन बरोबर आहे, परंतु अंतःकरणात जर आज्ञाधारकत्व नसेल तर त्याच्या कर्माची उपमा एका देखण्या परंतु मृत माणसासारखी आहे. तसेच ज्या माणसाच्या कर्मात आंतरिक सर्व गुण आहेत, परंतु त्याची दर्शनी कृती अचूक नसेल तर त्याला एखाद्या सभ्य व सदाचारी पण अत्यंत कुरुप व दिसावयास ओंगळ अशा माणसाची उपमा देता येईल.
या उदाहरणावरून तुम्हाला ‘फिकाह’ व ‘तसव्वुफ’ यांचा परस्पर संबंधही लक्षात आला असेल. परंतु खेदाची गोष्ट अशी की नंतरच्या काळात विद्येची व चारित्र्याची अधोगती झाली. त्यात अनेक दोष निर्माण झाले. तसेच ‘तसव्वुफ’ चा निर्मळ झराही गढूळ झाला. मार्ग चुकलेल्यांकडून मुस्लिमांनी, नाना प्रकारची बिगरइस्लामी तत्त्वे शिकून व त्यांना ‘तसव्वुफ’ च्या नावाखाली इस्लाममध्ये समाविष्ट करून टाकले. अनेक प्रकारच्या चमत्कारिक व विलक्षण श्रद्धा व पद्धतींना ‘तसव्वुफ’ ची लेबले चिकटवली गेली. त्यांना ‘कुरआन’ व ‘हदीस’मध्ये कसलेही स्थान नाही. नंतर या प्रवृत्तीच्या लोकांनी हळूहळू स्वतःला शरिअतच्या बंधनातूनही विमुक्त करून घेतले. तसव्वुफच्या शरिअतशी कसलाही संबंध नाही व हा मार्गच वेगळा आहे असे ते म्हणतात. सुफी माणसाला कायदा व नियमांचे बंधन पाळण्याचे कसले कर्तव्य आहे? अशा तऱ्हेचे विचार बहुतेक अडाणी सुफींच्या तोंडून ऐकावयास मिळतात. परंतु वास्तवात हे अगदी चूक आहे. शरिअतमधील आदेशाशी कसलाही संबंध नसलेला तसव्वुफ इस्लाममध्ये असण्यास वाव नाही. नमाज, रोजे, जकात व हजच्या बंधनातून मुक्त होण्याचा कोणाही सुफीचा हक्क नाही. जे सामाजिक नियम, आर्थिक नियम, आचार व व्यवहार, हक्क व कर्तव्ये, हलाल व हराम यांच्या मर्यादा अल्लाहने व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखवून दिले आहेत त्या नियमांविरुद्ध आचरण करण्याचे कोणत्याही सुफी माणसाला हक्क प्राप्त होत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे खरेखुरे अनुयायीत्व न करणाऱ्या व त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीचे पालन न करणारा माणूस हा मुस्लिम सुफी म्हणवून घेण्यासच पात्र नाही. खरेतर तसव्वुफ हे अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावरील गाढ प्रेम व आसक्तीचेंच नाव आहे. हे गाढ प्रेम तर अशी निकडीची मागणी करते की माणसाने अल्लाहच्या व त्याच्या प्रेषिताच्या आज्ञांचे पालन करण्यात तसूभरही कसूर करता कामा नये. म्हणून शरिअतपासून वेगळी अशी इस्लामी तसव्वुफ नामक कसलीही गोष्ट नाही. उलट शरिअतचे आदेश अत्यंत निष्ठापूर्वक व सद्भावनेने पाळणे तसेच आज्ञापालनात अल्लाहचे प्रेम व अल्लाहचे भय ओतप्रोत भरून टाकणे; याचेच नाव तसव्वुफ आहे.

कुरआनमध्ये हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे.
‘‘तुम्ही ज्यांची भक्ती करता त्याच्या (अल्लाह) सह, ती सर्व नावे आहेत जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवलेली आहेत.’’
‘‘त्यांनी उत्तर दिले, काही मूर्ती आहेत ज्यांची आम्ही पूजा (भक्ती) करतो आणि त्यांच्याच सेवेत आम्ही लागलेलो असतो.’’ (कुरआन २६: ७१)
वरील कुरआन आयतींनुसार इतर कुणाची (अल्लाहला सोडून) पूजा अर्चा करणे अथवा भक्ती करणे म्हणजेच त्याची (इतरांची) उपासना करणे आहे. अनेकेश्वरवादीं आपल्या मूर्तींशी जो व्यवहार करतात त्यास पूजा (भक्ती) म्हणून येथे संबोधले आहे. म्हणूनच अनेकेश्वरवादी आणि त्यांच्या मूर्तींच्या दरम्यान जो संबंध प्रस्थापित होतो त्याला पूजा (भक्ती) असे म्हटले जाते.
‘‘जे लोक खोट्या ईश्वरांच्या (तागूत) भक्ती (पूजा) पासून अलिप्त राहिले आणि अल्लाहकडे रुजू झाले त्यांच्यासाठी खूशखबर आहे.’’ (कुरआन ३९: १७)
‘‘काय मी त्या लोकांचा निर्देश करु, ज्यांचा शेवट अल्लाहपाशी अवज्ञा करणाऱ्यांच्या शेवटापेक्षा अधिक वाईट आहे? ते अल्लाहने ज्यांचा धिक्कार केला. आणि ज्यांच्यावर त्याचा कोप कोसळला, ज्यांच्यापैकी माकड व डुक्कर बनविले गेले, ज्यांनी मूर्तींची (तागूत) ची भक्ती (पूजा) केली, त्यांचे स्थान आणखीनच वाईट आहे आणि ते सन्मार्गापासून दूरवर भरकटलेले आहेत.’’ (कुरआन ५: ६०)
कुरआनच्या या आयतींनुसार कुणा एकाला सार्वभौम मान्य करून त्याच्या आदेशांचे स्वेच्छेने आज्ञापालन करणे म्हणजेच त्याची पूजा (भक्ती) करणे होय. जे खोट्या ईश्वरांशी असा व्यवहार करतात त्याससुध्दा पूजा (भक्ती) असे संबोधले गेले आहे. वरील आयतीत ‘‘तागूत’’ या शब्दाचा प्रयोग झाला आहे. अरेबिक भाषेत तागूतचा अर्थ होतो ‘‘मर्यादांचे उल्लंघन करणारा’’ तसेच विद्रोह करणारा. तत्त्वतः तागूत म्हणजे असा समुदाय जो दुसऱ्यांना अल्लाहच्या भक्ती (पूजा) पासून दूर ठेवतो आणि विनाशाकडे ढकलतो. याच अर्थाने सैतान आणि मूर्तींना ‘तागूत’ म्हणून संबोधले गेले आहे. याचप्रमाणे ते राज्यप्रमुख, उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी मंडळी आणि धार्मिक नेते ज्यांना अल्लाहच्या कोपचे भय नाही. तसेच जे अल्लाहच्या आदेशांची पायमल्ली करतात आणि जे आपले विचार व इच्छा यांना कायद्याचा दर्जा देतात असे सर्व लोक ‘तागूत’च्या व्याख्येत मोडतात. जे लोक यांचे आज्ञापालन करतात आणि अशा तागूतांचा (द्रोहींचा) आदर सन्मान करतात, त्यांना कायदेकानू बनविणारे आणि निर्णय (न्यायनिवाडा) करणारे ठरवतात, ते सर्वजण तागूतांचे श्रध्दापूर्वक आज्ञापालन करून त्यांना ईश्वरस्थानी बसवतात. कुरआन याच कृतीला ‘‘खोट्या ईश्वरांची पूजा’’ म्हणून ठरवतो. अशा लोकांची कृती त्यांच्या खोट्या ईश्वरांची (तागूत) ची पूजा (भक्ती) च आहे. स्वेच्छेने आणि आनंदाने अशा ‘तागूतांचे’ आज्ञापालन करणे दूसरे तिसरे काहीच नसून त्यांची भक्तीच आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘परंतु त्यांनी गर्व केला आणि बडेजाव केला व म्हणू लागले, काय आम्ही आमच्याचसारख्या दोन माणसांवर श्रध्दा ठेवावी? आणि माणसेही ती ज्यांचा लोकसमूह आमचा गुलाम आहे? म्हणून त्यांनी दोघांना खोटे ठरविले आणि नष्ट होणाऱ्यांना जाऊन मिळाले.’’ (कुरआन २३ :४७)
‘‘उरले तुझे उपकार ज्यांचा ठपका तू माझ्यावर ठेवला आहेस, तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू बनी इस्राईलांना गुलाम बनविले होते.’’ (कुरआन २६: २२)
वरील कुरआनोक्तींनुसार हेच सिध्द होते की स्वेच्छेने आणि आनंदाने आज्ञाधारकता स्वीकारणेच फक्त भक्ती होत नाही तर अनेच्छेने, परंतु हेतुपुरस्सर आणि समजून-उमजूनसुध्दा ज्यांची आज्ञाधारकता स्वीकारली जाते तीसुध्दा भक्ती आहे. ज्यांची पूजा होते ते स्वतः मग सार्वभौम सत्तेत सहभागी समजत नसतील तरी ईश्वराचा दर्जा देऊन त्यांची भक्ती होते. (मग ती माणसं असोत (मृत अथवा जिवंत) की दगड-धोंडे, पशु-पक्षी, झाडे-झुडपे असोत) याचसाठी वरील कुरआनोक्तीमध्ये बनी इस्राईलांना गुलाम बनविले गेले असा उल्लेख आला आहे. कारण ते अल्लाहला सोडून इतरांची भक्ती करीत होते. ते स्वेच्छेने इतरांचे गुलाम बनले नव्हते. तात्कालीन राजकीय दबावामुळे आणि त्यांच्या कमकुवतपणामुळे त्यांना अत्याचारींच्या पुढे नतमस्तक व्हावे लागले. जो स्वतःला सार्वभौम समजतो आणि त्याची आज्ञाधारकता सरळ सरळ होत असेल तर हे कृत्यसुध्दा त्या राजाचे अथवा राज्यप्रमुखाची पूजा (भक्ती) आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आदमच्या मुलांनो, मी तुम्हाला आदेश दिला नव्हता काय की सैतानाची भक्ती करू नका, तो तुमचा उघड शत्रू आहे आणि माझीच भक्ती करा, हा सरळ मार्ग आहे?’’ (कुरआन ३६: ६९)
‘‘हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पहातही नाहीत आणि आपले कोणतेही काम पार पाडू शकत नाहीत?’’ (कुरआन १९: ४२)
‘‘बाबा, सैतानाची भक्ती करू नये.’’ (कुरआन १९: ४४)
वरील आयतींनुसार आणखी दुसऱ्या प्रकारच्या भक्तीचे स्वरूप स्पष्ट होते. म्हणजे एखाद्याची पूर्ण अनावधानाने पूर्ण आज्ञाधारकतासुध्दा भक्तीच ठरते. येथे कुरआनची ही संकेतवचनं सैतानाच्या अशा भक्तीला स्पष्ट करत आहेत की लोकांचे आचरण आणि विश्वास हा सैतानाच्या भक्तीशी तंतोतंत जुळतो. तसे पाहता त्यांच्यापैकी कोणीही सैतानापुढे नतमस्तक होत नाही अथवा सैतानाची उपासना करीत नव्हता. त्यांच्यापैकी कोणीही सैतानाला आपला पालनकर्ता किवा मार्गदर्शक म्हणून स्वीकारले नव्हते आणि सैतानाबद्दल कुणालाही आदर नव्हता. दुसऱ्या लोकांप्रमाणेच या मंडळीच्या मनात सैतानाबद्दल तिरस्कारच होता. परंतु असे असतानासुध्दा त्यांना ‘सैतानाचे पुजारी अथवा भक्त’ म्हटले गेले. वरील आयतीत त्यांना स्पष्ट आदेश दिला की ‘‘सैतानाची भक्ती करू नका.’’ कुरआननुसार अनावधानाने जरी आज्ञाधारकता होत असेल आणि त्यांचे कृत्य आणि विश्वास सैतानाच्या किवा त्याच्या चेल्यांसारखे असतील तर ती ‘चुकून झालेली आज्ञाधारकता’सुध्दा सैतानाची भक्तीच ठरते.
कुरआनच्या वरील आयतींमध्ये भक्ती या शब्दाचा वापर रूपकात्मकरित्या झालेला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. हे कुरआन, हदीस अथवा शब्दकोशाच्या अगदी विरुध्द आहे. भक्ती (उपासना) या शब्दाचा अर्थ फक्त पूजा-अर्चा असा होत नाही तर त्याचा अर्थ वरील आयतींनुसारच कुरआनमध्ये सर्वत्र आला आहे. वर नमूद केलेल्या भक्तीचे चार प्रकार हे त्याच शब्दाच्या व्यापक अर्थाचे प्रभाग आहेत. भक्ती आज्ञाधारकता आहे. जाणीवपूर्वक आणि अजाणतेने केलेली आज्ञाधारकतासुध्दा भक्ती आहे. आज्ञाधारकतेविना भक्ती काहीही नाही. कुरआननुसार आज्ञाधारकता भक्ती (पूजा, उपासना) आहे, तर याचाच अर्थ असा आहे की आज्ञाधारकतेचे इतर तीन प्रकारसुध्दा भक्ती आहे. कुरआननुसार आज्ञाधारकता त्याचा खरा अर्थ तेव्हाच प्राप्त करते जेव्हा भक्ती आणि आज्ञाधारकता हे दोन्ही शब्द एकत्र वापरले जातात. अशा प्रकारे आज्ञाधारकता हा शब्द व्यापक आहे. ज्यामध्ये भक्ती आणि आज्ञाधारकता दोन्हींचा समावेश होतो. त्याचे स्वरूप व व्याप्ती धार्मिक गरजांचे आणि इस्लामी आदेशांचे पालन आहे

इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था काय आहे आणि जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेशी तिचा काय संबंध आहे? हा प्रश्न समजावून घेण्यासाठी हे आवश्यक आहे की प्रथम आम्ही त्या फरकाला चांगल्याप्रकारे जाणून घ्यावे जो आध्यात्माची दृष्टीकोन कल्पना आणि इतर धर्माच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनामध्ये आढळून येतो. हा फरक चांगल्या प्रकारे अवगत न झाल्याने पुष्कळदा असे होते की इस्लामच्या आध्यात्मिक व्यवस्थेवर चर्चा करीत असताना माणसाच्या मनात पुष्कळशा अशा कल्पना वावरू लागतात ज्या सर्वसाधारणतः ‘आध्यात्मिकता’ या शब्दाशी संबंधित आहेत. या गोंधळात पडून माणसाला हे समजणे कठीण होते की शेवटी ही कसली आध्यात्मिक व्यवस्था आहे जी आत्म्याच्या सुपरिचित अशा क्षेत्रामधून जाऊन अस्तित्व व शरीराच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते आणि केवळ हस्तक्षेप करत नसून त्यांच्यावर अधिकार गाजवू इच्छिते.

तत्वज्ञानाच्या व धर्माच्या जगामध्ये सामान्यपणे जी कल्पना अस्तित्वात आहे ती ही की आत्मा व शरीर परस्पर विरोधी आहेत, दोघांचे विश्व वेगळे आहे, दोघांच्या गरजा केवळ वेगळ्या नसून परस्पर विरोधी आहेत. या दोहोंची प्रगती एका वेळेस होणे शक्य नाही. आत्म्यासाठी शरीर आणि जडत्वाचे विश्व हा एक तुरूंग आहे. ऐहिक जीवनाच्या गरजा व आवडीनिवडी या त्या हातकड्या व बेड्या आहेत ज्यामध्ये आत्मा जखडला जातो. जगाचे व्यवहार व कारभार ही ती दलदल आहे, ज्यामध्ये रूतून आत्म्याची झेप संपुष्टात येते. या कल्पनेचा अनिवार्य परिणाम हा आहे की आध्यात्मिकता आणि संसारिकता यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. ज्या लोकांनी संस्काराचा अंगिकार केला आहे ते पहिल्या पावलालाच निराश होतात की आध्यात्मिकतेचा अवलंब करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. या गोष्टीने त्यांना भौतिकतेमध्ये गुरफूटन टाकलेले आहे. सामाजिक व्यवहार, संस्कृती, राजकारण, अर्थकारण वगैरे जीवनाची सारी क्षेत्रे आध्यात्मिकतेपासून वंचित झाली आणि त्यांनी आत्म्याच्या उन्नतीसाठी असे मार्ग शोधून काढले जे संसारिक जीवनाच्या बाहेरूनच निघून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिक उन्नतीचा असा मार्ग तर शक्यच नाही जो संसारिक जीवनामधून जातो. त्याच्याजवळ आत्म्याच्या विकासासाठी शरीराला दुर्बल करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी अशा शारीरिक कष्टाच्या पद्धती शोधून काढल्या ज्या मनाला मारणाऱ्या आणि शरीराला अचेतन किवा निर्जीव करणाऱ्या होत्या. आत्म्याच्या प्रशिक्षणासाठी अरण्य, पर्वत आणि एकांतवासाला त्यांनी उचिततम स्थाने समजली. यासाठी संस्कृतीच्या गोंगाटाने ज्ञानध्यान साधनेमध्ये व्यत्यय न येवो, आत्म्याच्या विकासाची याशिवाय दुसरी कोणतीही पद्धत त्यांना आढळून आली नाही की जग आणि संसारापासून दूर व्हावे आणि या सर्व संबंधांना तोडून टाकावे जे तिला भौतिकतेच्या विश्वाशी निगडित ठेवतात. शरीर व आत्म्याच्या ह्या विरोधाने माणसाच्या पूर्णत्वाचे पण दोन वेगवेगळे अर्थ व उद्दिष्टे निर्माण केली. एकीकडे ऐहिक जीवनाचे पूर्णत्व, याचा अर्थ हा ठरला की माणसाने फक्त भौतिक साधनाने समृद्ध व्हावे. आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला पक्षी, एक चांगली सुसर, एक उमदा घोडा व एक यशस्वी लांडगा बनावे. दुसरीकडे आध्यात्मिक जीवनाचे पूर्णत्व, ज्याचा अर्थ हा ठरला की माणसाने काही अलौकिक शक्तींचा स्वामी बनावे आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला रेडिओ सेट, एक सामर्थ्यशाली दुर्बीण आणि एक नाजुक सूक्ष्मदर्शक यंत्र बनावे किवा त्याच्या दृष्टीने आणि त्याच्या शब्दांनी एका परिपूर्ण अशा दवाखान्याचे कार्य करावे.

इस्लामचा दृष्टिकोन याबाबतीत जगातील सर्व धार्मिक व तात्त्विक पद्धतीपासून वेगळा आहे. तो म्हणतो की मानवी आत्म्याला ईश्वराने जमिनीवर आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. त्याच्यावर काही जबाबदाऱ्या व काही कर्तव्ये सोपविली गेली आहेत आणि त्या पार पाडण्यासाठी त्याला एक उत्कृष्ट व अनुरूप असे शरीर दिलेले आहे. हे शरीर त्याला फक्त यासाठी दिले गेले आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर आणि आपल्या संबंधित सेवेचे पालन करण्यासाठी त्याचा उपयोग करावा आणि म्हणून हे शरीर आत्म्याचा तुरूंग नसून त्याचा तो कारखाना आहे आणि या आत्म्याचा काही विकास जर शक्य आहे तर तो याच पद्धतीने शक्य आहे की त्याने या कारखान्यातील उपकरणे व शक्तींचा वापर करून आपली योग्यता प्रकट करावी आणि हे जगही एखादी शापित जागा नव्हे, ज्यामध्ये मानवी आत्मा येऊन फसलेला आहे, असे नसून याउलट जग हे एक असे कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये कार्य करण्यासाठी ईश्वराने त्याला पाठविलेले आहे. येथील अगणित वस्तू त्याच्या अधिकारात दिल्या गेल्या आहेत. येथे प्रतिनिधीत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी इतर अनेक माणसेही त्याच्याबरोबर निर्माण केली गेली आहेत. येथे स्वाभाविक गरजेपोटी संस्कृती, समाज जीवन, व्यावहारिक जीवन, राजकारण आणि जीवनाची दुसरी क्षेत्रे त्याच्यासाठी अस्तित्वात आणली गेली आहेत. येथे जर आध्यात्मिक प्रगती शक्य असेल तर तिचे स्वरूप हे आहे की त्याने कार्यक्षेत्रात राहून कार्य करून आपली पात्रता सिद्ध करावी. हे जग म्हणजे त्याच्यासाठी एक परीक्षागृह आहे. जीवनाचा प्रत्येक पैलू आणि प्रत्येक क्षेत्र जणू एक प्रश्न पत्रिका आहे. घर, मोहल्ला, बाजार, मंडई, काऱ्यालय, कारखाना, शाळा, कचेरी, ठाणे, छावणी, संसद शांतिपरिषद व रणमैदान हया सर्व वेगवेगळ्या विषयावर प्रश्नपत्रिका आहेत. यापैकी एखादी जरी प्रश्नपत्रिका त्याने सोडविली नाही किवा पुष्कळशा प्रश्नपत्रिका तशाच सोडून दिल्या तर परिणाम त्याला शून्य मिळण्याखेरीज दुसरा काय होऊ शकतो? यशाची आणि प्रगतीची शक्यता जर होऊ शकते तर ती याचप्रकारे होऊ शकते की त्याने त्याला देण्यात आलेला सर्व कालावधी आणि आपले सर्व लक्ष परीक्षा देण्यासाठी वापरावे आणि जितक्या प्रश्नपत्रिका त्याला दिल्या गेल्या असतील त्यामध्ये त्याने काही ना काही करून दाखवावे.

अशाप्रकारे इस्लाम जीवनाबद्दलच्या वैराग्याच्या कल्पनेला रद्द करतो आणि माणसासाठी आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग जीवनाबाहेर नसून तो जीवनामध्येच आहे हे स्पष्ट करतो. आत्म्याचा विकास, वृद्धी कल्याण व सफलतेची खरी जागा त्याच्या दृष्टीने जीवनाच्या ऐन प्रवाहामध्ये आहे, त्याच्या किनाऱ्यावर नव्हे. आता आम्हाला हे पाहिले पाहिजे की तो आमच्या प्रगती व अधोगतीची कसोटी काय ठरवितो? या प्रश्नाचे उत्तर याच प्रतिनिधीत्वाच्या कल्पनेमध्ये सामाविलेले आहे, ज्याचा मी नुकताच उल्लेख केलेला आहे. प्रतिनिधीच्या नात्याने माणूस आपल्या जीवनातील कृतीबद्दल ईश्वरासमोर जबाबदार-उत्तरदायी आहे. त्याचे कर्तव्य हे आहे की जमिनीवर जे अधिकार आणि जी साधने त्याला दिली गेली आहेत त्याचा वापर त्याने ईश्वराच्या इच्छेनुसार करावा. ज्या निरनिराळ्या प्रकारच्या संबंधानी त्याला दुसऱ्या माणसांच्याबरोबर निगडित केले गेले आहे त्यांच्याबाबतीत त्याने अशी वर्तणूक ठेवावी जी ईश्वराला पसंत आहे आणि आपले एकूण एक प्रयत्न व श्रम या मार्गात कारणी लावावेत की ही पृथ्वी आणि त्याच्या जीवनाची व्यवस्था जितकी उत्कृष्ट व्हावी असे ईश्वर इच्छितो तितकी ती उत्कृष्ट व्हावी. या सेवेला माणूस जबाबदारी, कर्तव्यपालन, भक्ती व आज्ञापालन आणि ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करणे इ. गोष्टीसह जितक्या जाणिवेने पार पाडील त्याचप्रमाणात तो ईश्वराच्या निकट होईल आणि ईश्वराची जवळीक इस्लामच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगती आहे. याउलट तो जितका आळशी, कामचुकार व कर्तव्यविन्मुख होईल किवा तो जितका बंडखोर, द्रोही व अवज्ञाकारी होईल तितका तो ईश्वरापासून दूर होईल आणि ईश्वरापासून दूरत्वाचे नाव इस्लामी परिभाषेत आध्यात्मिक अवनती आहे.

या विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होते की इस्लामी दृष्टिकोनानुसार धार्मिक व भौतिकवादी या दोघांचे कार्यक्षेत्र एकच आहे जेथे दोघे कार्य करतील, तथापि धार्मिक माणूस भौतिकवादी माणसांपासून अधिक तन्मयतेने कार्यमग्न असेल. घराच्या चार भितीपासून आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठापर्यंत जितके म्हणून जीवनाचे प्रश्न आहेत, धार्मिक माणूस भौतिकवादी माणसाप्रमाणे इतकेच नव्हे तर त्याच्यापेक्षा काही अधिक प्रश्नाचा तो विचार करील. तथापि जी गोष्ट त्या दोघांचे मार्ग वेगवेगळे करील ती त्यांचे ईश्वरासंबंधाने स्वरूप ही आहे. धार्मिक माणूस जे काही करील ते या जाणिवेने करेल की तो ईश्वरासमोर जबाबदार आहे. या गरजेपोटी करील की त्याला ईश्वराची प्रसन्नता प्राप्त व्हावी आणि या कायद्यानुसार करील जो ईश्वराने त्याच्यासाठी ठरवलेला आहे. याउलट भौतिकवादी माणूस जे काही करील ते बेजबाबदारीने करील. ईश्वराबद्दल बेपर्वा राहून करेल आणि आपल्या मन मानेल त्या पद्धतीप्रमाणे करील. हाच फरक धार्मिक माणसाचे सारे भौतिक जीवन पूर्णपणे आध्यात्मिक जीवन बनवितो आणि भौतिकवादी माणसाचे सारे जीवन आध्यात्म्याच्या प्रकाशापासून वंचित करतो.

आता मी थोडक्यात आपणास दाखवून देईन की इस्लाम ऐहिक जीवनाच्या या बिकट मध्यप्रवाहातून माणसाच्या आध्यात्मिक उत्कर्षाचा मार्ग कसा तयार करतो.

या मार्गाचे पहिले पाऊल ईमान आहे. म्हणजे माणसाच्या मनात व डोक्यात हा विचार कायम होतो की अल्लाहच त्याचा स्वामी, शासक व ईश आहे. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे हे त्याच्या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे आणि अल्लाहचीच आज्ञा हा त्याच्या जीवनाचा कायदा आहे. हा विचार जितका दृढ व प्रभावी होईल तितकीच दृढ इस्लामी विचारसरणी बनेल आणि त्या प्रमाणात दृढनिश्चऱ्याने माणूस आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चालू शकेल.

या मार्गाचा दुसरा टप्पा आज्ञापालन हा आहे म्हणजे माणसाने जाणीवपूर्वक आपली स्वच्छंदता सोडावी, प्रत्यक्षात त्या ईश्वराची ताबेदारी पत्करावी ज्याला श्रद्धेने आपला ईश्वर मानतो. याच आज्ञापालनाचे नाव कुरआनच्या भाषेत ‘इस्लाम’ आहे.

तिसरा टप्पा - ‘तक्वा’ संयम व विवेकाचा आहे. याला सर्वसामान्य भाषेत ‘‘कर्तव्यपरायणता व जबाबदारीची जाणीव’’ म्हणून ओळखले जाऊ शकते. तक्वा हा आहे की माणसाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये हे समजून कार्य करावे की त्याला आपल्या विचारांचा, वचनाचा आणि कृतीचा ईश्वरासमोर जाब द्यावयाचा आहे. ईश्वराने मनाई केलेल्या प्रत्येक कामापासून त्याने स्वतःला रोखावे. ईश्वराने आज्ञा केलेली प्रत्येक सेवा पार पाडण्यासाठी त्याने तयार व्हावे आणि पूर्ण सावधानतेने हलाल व हराम, योग्य व अयोग्य आणि चांगले व वाईट यांच्यामध्ये भेदभाव करून तारतम्याने वागावे.

शेवटचा व सर्वात उंट टप्पा ‘एहसान’ (समर्पण) आहे. एहसानचा अर्थ हा आहे की माणसाची इच्छा ईश्वराच्या इच्छेशी एकरूप व्हावी जी काही ईश्वराची आवड आहे, दासाची पण आवड तीच व्हावी आणि जे काही ईश्वराला नापसंत आहे त्यास दासानेही मनाने नापसंत करावे. ईश्वर आपल्या जमिनीवर ज्या वाईट गोष्टींना पाहू इच्छित नाही त्यापासून दासाने स्वतः वाचावे, इतकेच नव्हे तर त्यांना जगातून मिटवून टाकण्यासाठी त्याने आपली सारी शक्ती आणि आपली सारी साधने वापरावीत आणि ज्या चांगल्या गोष्टीनी ईश्वर आपल्या जमिनीला अलंकृत पाहू इच्छितो त्या चांगल्या गोष्टीनी दासाने फक्त आपल्या स्वतःचे जीवनच अलंकृत करण्यात समाधान व मानता आपल्या प्राणाची बाजी लावून त्या चांगल्या गोष्टी जगामध्ये पसरविण्याचा व त्या प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न करावा. या स्थानावर पोहोचल्यावर दासास आपल्या ईश्वराची अगदी जवळची निकटता प्राप्त होते आणि म्हणून हे माणसाच्या आध्यात्मिक विकासाचे उच्चतम स्थान आहे.

आध्यात्मिक प्रगतीचा हा मार्ग फक्त व्यक्तीसाठी नाही. तो जातिजमातीसाठी, समाजासाठी, देशासाठी पण आहे. एका व्यक्तीप्रमाणे एक समाज देखील ‘ईमान’, ‘इताअत’ व ‘तक्वा’ या टप्प्यांवरून पुढे जाऊन ‘एहसान’ च्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत पोहचू शकतो आणि शासन देखील आपल्या संपूर्ण व्यवस्थेसह मोमीन, मुस्लिम, संयमी व मोहसीन बनू शकते. इतकेच नव्हे तर वस्तुतः इस्लामचा हेतू त्याचवेळी पूर्णपणे पुरा होऊ शकतो जेव्हा एखादा देश संपूर्णपणे या मार्गावर चालू लागेल आणि एक संयमी व समर्पित असे शासन प्रस्थापित होईल.

आता आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या व्यवस्थेवर देखील एक नजर टाका जी व्यक्ती व समाज यांना याप्रकारे तयार करण्यासाठी इस्लामने निश्चित केली आहे. या व्यवस्थेचे चार स्तंभ आहेत.

पहिला स्तंभ ‘नमाज’ आहे. ही रोज पाच वेळा माणसाच्या मनात ईश्वराची आठवण ताजी करते, त्याचे भय दाखवते, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करते, त्याचे आदेश वरचेवर समोर आणते आणि त्याच्या आज्ञापालनाचा सराव घडविते. ही नमाज केवळ वैयक्तिक नाही तर तिला जमातबरोबर अदा करणे बंधनकारक ठरविले गेले आहे. म्हणजे सारा समाज सामुहिकरीत्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास तयार होतो.

दुसरा स्तंभ ‘रोजा’ आहे. तो प्रत्येक वर्षी संपूर्ण एक महिना मुस्लिम व्यक्तीला वैयक्तिकपणे व मुस्लिम समाजाला सामुहिकरीत्या संयमाचे प्रशिक्षण घडवितो.

तिसरा स्तंभ ‘जकात’ आहे. जी मुस्लिमांमध्ये संपत्तीचा त्याग एकमेकाबद्दल सहानुभूती व सहकाऱ्याची भावना निर्माण करते. आजकल लोक चुकीने ‘जकात’ ला ‘कर’ म्हणून संबोधितात. तथापि ‘जकात’ कराहून अगदी भिन्न आहे. जकातचा अर्थ विकास व शुद्धी हा आहे. या शब्दाद्वारे इस्लाम ही वस्तुस्थिती माणसाच्या मनावर बिबवू इच्छितो की ईश्वराच्या प्रेमापोटी आपल्या बांधवाचे जे आर्थिक सहाय्य तुम्ही कराल त्याने तुमच्या आत्म्याचा विकास घडून येईल व तुमचे आचरण शुद्ध होईल.

चौथा स्तंभ ‘हज’ आहे. जे ईशभक्तीच्या केंद्रबिदूवर ईमानधारकांचा जागतिक समाज बनविते आणि असे एक आंतरराष्ट्रीय आंदोलन चालविते जे शेकडो वर्षांपासून सत्याच्या आवाहनाचा स्वीकार करण्याची तत्परता दाखवित आले आहे आणि ईश्वर इच्छिल तर शेवटपर्यंत ही तत्परता दाखवित राहील.

चारित्र्य व आचरणाच्या दृष्टीने जग आज ज्या ठिकाणी आहे तसेच ते चौदा शतकांपूर्वी याच ठिकाणी व याच स्थितीत होते. त्या वेळी इस्लामनेच त्याला खोट्या देवदेवतांपासून मुक्त केले होते. आजच्या खोट्या ईश्वरापासून इस्लामच मानवतेची सुटका करु शकतो. या ईश्वरांनी, हुकूमशाही, बादशाही, साम्राज्यशाही व भांडवलशाहीचे बुरखे घेतलेले आहेत. एकीकडे पाषाणहृदयी भांडवलदार गरीब मजुरांचे रक्त शोषण करुन आपल्या तिजोऱ्या भरीत आहेत, तर दुसरीकडे श्रमिकवर्गाच्या हुकूमशाहीच्या नावावर काही लोक आपल्या ईश्वरत्वाचा देखावा थाटून बसले आहेत. हे लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांचे स्वातंत्र्य चिरडून टाकीत आहेत. परंतु त्यांच्या तोंडी भाषा अशी असते की ते जनतेच्या इच्छेची पूर्ती करीत आहेत.

एक शंका व तिचे उत्तर

इस्लाम मानवासाठी स्वातंत्र्याचा संदेश आहे ही गोष्ट ऐकून काही लोकांच्या मनात असा प्रश्न उभा राहण्याचा संभव आहे की मग इस्लाम खुद्द मुस्लिमांनाच या जुलमी व अत्याचारी हुकूमशहांच्या पंजातून का सोडवीत नाही. ज्यांनी आज पूर्ण मुस्लिम जगाला स्वातंत्र्यापासून वंचित करुन साखळदंडाने बांधून ठेवलेले आहे आणि जे इस्लामच्या नावाखाली मुस्लिमांना हीन, दीन, नीच दर्जाचे बनवीत आहेत. या शंकेच्या उत्तरात आम्ही असे सविनय सांगू की हे खरेखुरे हुकूमशहा, जरी इस्लामच्या नावाचा वापर करीत असले तरी खरी वास्तवता अशी आहे की त्यांच्या शासनामध्ये इस्लामला कुठलेही अधिकार, स्थान प्राप्त नाही. तसेच त्यांच्या जीवनामध्ये वा आसपास इस्लामची एखादी झलकसुद्धा दृष्टीस पडत नाही हे तथाकथित मुस्लिम त्या मानवी समूहाशी संबंध बाळगतात ज्याच्यविषयी स्वतः अल्लाहची आज्ञा आहे की,

‘‘आणि जे लोक अल्लाहने दिलेल्या कायद्याप्रमाणे न्याय करणार नाहीत हे अत्याचारी होत.’’ (५:४४)

‘‘हे मुहम्मद ! तुमच्या पालनकर्त्यांची शपथ ! जोवर आपापसातील मतभेदांचा निवाडा करण्यासाठी तुम्हाला नेमत नाहीत, तोपर्यंत हे लोक ‘श्रध्दावंत’ होऊच शकत नाहीत. नंतर तुम्ही असा न्याय करा की त्यावर कोणालाही कमतरतेची जाणीव होऊ नये व त्या निवाड्याचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार करुन तो मानावा.’’ (४:६५)

ज्या इस्लामकडे आम्ही आज लोकांना बोलावितो आणि अशी इच्छा करतो की त्यांनी इस्लामला आपल्या जीवनात मार्गदर्शक बनवावे त्याचा त्या ‘इस्लाम’शी काडीचाही संबंध नाही, ज्याचा भूतकाळातील मुस्लिम शासकांनी अंगीकार केला आहे. या शासकांच्या मनात ईश्वरी कायद्याविषयी कसलाही आदर असल्याचे आढळून येत नाही. ज्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्या आदेशांना बाजूला सारुन टाकतात व मन मानेल तसे करतात व असे करताना त्यांना क्षणभरसुद्धा खंत वाटत नाही. प्रकाश व मार्गदर्शनाकरीता त्यांना आपल्या जीवनात त्याच्यापासून सहाय्य घेण्याची गरज भासत नाही. तसेच त्यांच्या निष्ठाही फक्त त्यांच्या पुरत्याच विशेष नाहीत. ते जेव्हा आपल्या पसंतीची एखादी वस्तु प्राप्त करतात तिचा ते अंगीकार करतात. मग भलेही युरोपच्या कुठल्याही देशाचे कायदे असोत अथवा शरीअतचे आदेश असोत. जी वस्तु वा जी गोष्ट त्यांच्या इच्छेविरुद्ध किवा त्यांच्या हिताविरुद्ध असते, तिला उचलून दूर फेकून देतात. हे लोक माणसाशीही निष्ठावान नाहीत, तसेच अल्लाहशीही नाहीत. ती माणसे व ईश्वर या दोहोंचे अतिरेक व अशिष्ठपणा, तसेच अमर्यादा करणारे आहेत, कारण त्यांच्या अंगीकाराची वा दूर झटकून टाकण्याची कसोटी, सत्य व न्याय यावर आधारलेली नसून त्यांची स्वतःची मते व त्यांच्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षा व स्वार्थावर आधारभूत आहेत.

आम्ही जो इस्लाम जाणतो, तो अभिमानी, अहंकारी बादशहांचे, तसेच घमंडी व जुलमी शासकांचे अस्तित्व सहन करीत नाही. सामान्यजनाप्रमाणेच तो या शासकांनाही ईश्वरी कायद्यांच्या शृंखलांनी बांधून ठेवतो. त्यासाठीच जर हे शासक राजी नसले तर त्यांना तो कायमचे नष्ट करुन टाकतो कारण,

‘‘जो (समुद्राच्या पाण्यावरील) फेस असतो तो उडून जातो व जी वस्तु माणसांना लाभप्रद आहे ती पृथ्वीवर स्थिरावते, शिल्लक राहते.’’ (१३:१७)

भक्तीचा खरा आणि व्यापक अर्थ बुध्दीविवेकाच्या भक्कम पायावर तसेच कुरआन आयतींनुसार आणि धार्मिक विद्वानांच्या संशोधनांवर आधारित आहे. परंतु भक्ती म्हणजे फक्त पूजाअर्चा आणि आराधना, उपासना आहे. हा दुसरा दृष्टिकोन आजही प्रचलित आहे. उदा. नमाज, रोजा, हज, जकात इ. आणि याव्यतिरिक्त धर्मकारण हे भक्तीत मोडत नाही. त्यांच्यानुसार धर्माच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भक्ती एक शाखा आहे. हा गैरसमज फक्त सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहिला आहे असे नाही तर विद्वान मंडळीसुध्दा या गैरसमजुतीला बळी पडली आहे. ही शुल्लक बाब आहे म्हणून त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. हा गैरसमज कसा पसरला याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. भक्तीच्या बाबतीत ही घोडचूक कशी समाजात प्रचलित झाली जेव्हा सर्वकाही स्पष्ट केले गेले होते? याच प्रश्नाद्वारे भक्तीबाबतच्या गैरसमजुतीचे खंडन करणे आवश्यक ठरते.

या गैरसमजुतीची कारणे बौध्दिक नसून मानसिक आहेत, ती खालीलप्रमाणे,

१) ही भक्तीची मर्यादित कल्पना प्रचलित धर्मात आणि इस्लाममध्ये लोकप्रिय आहे. भक्ती आणि प्रार्थना सर्व धर्मांत (इस्लामला सोडून) समानार्थी वापरले जातात. यांच्यापैकी अनेकांमध्ये अयोग्य समजले जाते. जसे भक्ती आणि श्रध्देशी संबंधित कृत्य धार्मिक हद्दीपलीकडचे पार पाडले जाणे आहे. या व्यापक संकल्पनेसाठी वर्चस्वासाठीचे गुण हवे आहेत. हे त्या मनासाठी (लोकांसाठी) आवश्यक आहे जे गैरसमजुतींना बळी पडले आहेत. इस्लामी इतिहासात अनेक अशी उदाहरणे आहेत. बौध्दिक आणि विचारवंताच्या जगात इस्लामचे वर्चस्व होते तोपर्यंत इस्लामेतर तत्त्वे त्यात घुसडली गेली नाहीत. जेव्हा ही परिस्थिती बदलून गेली तेव्हा इस्लामचे दरवाजे अनायासे इस्लामेतर (बनावटी) तत्त्वांसाठी खुले झाले. आता अशी स्थिती आहे की अनेकानेक बनावटी तत्त्वांना इस्लामी रंग दिला जात आहे. याचा अत्यंत वाईट प्रकार हा आहे की इस्लामच्या महत्त्वाच्या संकल्पना (परिभाषा) चा अर्थ यापासून अलिप्त राहू शकलेला नाही. ते शब्द आणि परिभाषा सारख्याच आहेत जशा ते अल्लाहने आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिल्या होत्या. परंतु त्यांचे मूळ अर्थ बदलून गेले आहेत. अशा परिस्थितीत ‘भक्ती’ हा शब्दप्रयोगसुध्दा या बौध्दिक दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून गेला आणि आपला मूळ अर्थ गमावून एक मर्यादित अर्थ धारण करून बसला. हा मर्यादित अर्थ बाहेरून इस्लामच्या या परिभाषेत (भक्ती) प्रवेश करीत झाला आणि मुस्लिमांनी नंतर त्याला मर्यादित अर्थात स्वीकारला.

२) इस्लामचे नमाज, रोजे आणि इतर उपासनापध्दती इतक्या आकर्षक आहेत की लोकांना इतर बाबींबद्दल विसर पडला आणि आपल्या खऱ्या स्वरूपापासून आणि खऱ्या अर्थापासून दूर भरकटत गेले. जर इस्लामी भक्तीचा व्यापक अर्थ घेतला गेला नाही तर या मर्यादित गोष्टींचाच समावेश भक्तीमध्ये कायमस्वरूपी होईल आणि इतर धार्मिक कृत्यांना आणि आदेशांना पूजा, भक्ती बाहेर कायमस्वरूपी ठेवले जाईल. हे असे व्यावहारिकपणे होतच राहील. हीच कारण आहेत भक्तीच्या गैरसमजुतीबद्दलची. याचे बौध्दिक कारण एकसुध्दा नाही.

 - नसीम गाझी फलाही
या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्राप्त होते. भिन्न धर्मिय यामुळे एकत्र येऊन सामोपचाराचे संबंध निर्माण होऊन ते खऱ्या अर्थाने मानवतेची व देशाची सेवा करतात. 
या पुस्तकात वेद या हिंदु धर्मियांच्या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यांचे हिंदु पंडितांनी केलेले भाषांतर देण्यात आले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 73    -पृष्ठे - 42    मूल्य - 16  आवृत्ती - 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/cmah8c4t39085jsxexsn6sdjwg92i0f6

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget