मानवाचे मौलिक अधिकार

Human
इमानवंतांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्‍यांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्नाकोटापासून प्रारंभ झाला असेल. परंतु, आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला. वस्तुत: ही काहीशी आश्‍चर्यकारक गोष्ट आहे की जगात मनुष्यच एकमात्र असा प्राणी आहे ज्याच्या संबंधाने खुद्द माणसातच वारंवार हा प्रश्‍न उत्पन्न होत राहिला आहे की, त्यांचे मौलिक अधिकार काय आहेत? मनुष्याव्यतिरिक्त दुसरी सृष्टी या विश्‍वात राहत आहे तिचे अधिकार खुद्द निसर्गाने दिले आहेत. ते आपोआप मिळत आहेत, तेही त्याच्यासाठी विचार केल्याविना मिळत आहेत. परंतु केवळ मनुष्य अशी निर्मिती आहे, ज्याच्यासंबंधी प्रश्‍न होतो की त्याचे अधिकार काय आहेत आणि याची गरज भासते की त्याचे अधिकार निश्‍चित केले जावेत. तितकीच आश्‍चर्याची गोष्ट ही सुद्धा आहे की या विश्‍वातील कोणतेही सजातीय असे नाहीत जे आपल्याच सजातीयांशी असा व्यवहार करीत आहे जसा एक मनुष्य आपल्या सजातीय व्यक्तीशी करीत आहे. एवढेच नव्हे तर आपण पाहतो की प्राणीमात्राची कोणतीही जात अशी नाही जी दुसर्‍या कोणत्या जातीच्या प्राण्यावर केवळ आनंद व मजेखातर अथवा त्यांच्यावर शासक बनण्यासाठी हल्ला चढविते.
    निसर्गाच्या नियमाने एका प्राण्याला दुसर्‍या प्राण्याचे खाद्य बनविले आहे, तर ते केवळ अन्नाच्या सीमेपर्यंतच त्यावर तो हल्ला करतो! कोणतीही हिंस्त्र पशू असा नाही जो अन्नाच्या आवश्यकतेशिवाय अथवा ती गरज पूर्ण झाल्यानंतर विनाकारण जनावरांना ठार करून त्यांची थप्पी लावत असेल, खुद्द आपल्या सजातीयांशी प्राणीमात्राचा तसा व्यवहार नाही, जसा मनुष्य आपल्या सजातीय मनुष्यप्राण्यांशी करतो. संभवत: हा परिणाम त्याच्या त्या श्रेष्ठत्वाचा आहे. जो महान अल्हाने प्रदान केलेल्या बुद्धिमत्ता व शोधक शक्तीचा हा चमत्कार आहे ! माणसाने जगात ही असामान्य वर्तणूक धारण केली हे सत्य आहे. सिंहानी अद्याप कोणतीही सेना उभी केली नाही. कोणत्याही कुत्र्याने आजपर्यंत दुसर्‍या कुत्र्यांना गुलाम बनविले नाही. कोणत्याही बेडकाने दुसर्‍या बेडकांचे तोंड बंद केले नाही. हा मनुष्यच आहे, ज्याने श्रेष्ठ अल्लाहच्या आदेशांची पर्वा न करता जेव्हा त्याने दिलेल्या शक्तींचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला तेव्हा आपल्याच सजातींवर अत्याचार करण्यास सुरवात केली. जेव्हापासून मनुष्य या पृथ्वीतलावर आहे तेव्हापासून आजतागायत सर्व पशूंनी इतक्या माणसांचे जीव घेतले नसतील जितके माणसांनी केवळ दुसर्‍या महायुद्धात इतर माणसांचे जीव घेतले. यावरून सिद्ध होते की माणसाला खरोखर दुसर्‍या माणसांच्या मौलिक हक्कांची कसलीही चाड नाही. केवळ अल्लाहच आहे ज्याने मानवजातीचे या बाबतीत मार्गदर्शन केले आहे आणि आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने मानवी अधिकारांबद्दलचे ज्ञान पुरविले आहे. वस्तुत: मानवी अधिकारांची निश्‍चिती करणारा मानवांचा सृजनकर्ताच असू शकतो. म्हणून त्या सृजनकर्त्याने मानवाचे अधिकार अत्यंत तपशीलवार सांगितले आहेत.        

- सय्यद अबुल आला मौदूदी रहे. (मानवाचे मौलिक अधिकार या पुस्तकातून)
Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget