Latest Post

ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन



इस्लामने परमेश्वराच्या एकत्वाचा मांडलेला सिध्दांत हा केवळ आधिभौतीक स्वरुपाचा नसून, सामाजिक स्वरुपाचा देखील आहे. कारण हे सर्व विेईश्व आणि सृष्टी यांना एकत्रित ठेवणारे  सुत्र आहे आणि ते म्हणजे अल्लाह होय. हे जसे खरे आहे. तसेच सर्वसृष्टीचा निर्माता एकच आहे. तेंव्हा हा मानवी समाज देखील एकत्वाच्या आणि समानतेच्या धाग्याने जोडला गेला  आहे. हे इस्लामचे तत्व आहे. म्हणून सर्व मानवी समाज हा एकच असून कालांतराने माणसांमाणसात भेद निर्माण झाले. असा इस्लामचा सिध्दांत आहे. म्हणूनच कुरआनात म्हटले आहे की, ’’प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदायी होते. नंतर त्यांनी विविध श्रद्धा व पंथ बनविले. (सुरह युनूस आयत क्र. 19)’’ म्हणजे परमेश्वराच्या एकत्वाच्या आधारे इस्लाम मानवी  एकतेचाही विचार मांडतो आणि म्हणूनच इस्लामच्या परमेश्वरविषयक चिंतनात ज्ञात आणि अज्ञात अशा सर्वच प्रेषितांचा आणि सर्व जमातींना परमेश्वरांकडून केल्या गेलेल्या  मार्गदर्शनाचा विचार केला गेला आहे. म्हणूनच इस्लामचे प्रतिपादन आहे की, अल्लाह आणि त्याचे कुरआन यांचे स्वरुप प्रादेशिक नसून सर्वसमावेशक आहे म्हणून त्या अर्थाने माणसाला  परमेश्वरासंबंधीची होणारी जाणीव ही परमेश्वराच्या आणि या विेशाच्या एकत्वाची आणि अखंडत्वाची जाणीव आहे व ती जाणीव आद्य व सनातन आहे. इस्लामच्या मते परमेश्वराची ही  सारी किमया माणसाच्या लक्षात आल्यानंतर त्याला परमेश्वराचे गुणविशेष स्पष्ट होत जातात. म्हणून माणसाच्या मनात परमेश्वरासंबधी जागृत होणारी भावना केवळ भीतीयुक्त आदराची नसून त्याच्या परमदयाळुपणाची सुद्धा असते. म्हणून दयाळू व परमकृपाळू हे परमेश्वराचे गुणविशेष दिलेले आहेत. इस्लामच्या प्रतिपादनानुसार या विेशामध्ये जे-जे सत्, सुंदर  व चिरंतन आहे. ते अल्लाहच्या रहमतचे व्यक्त रुप आहे. म्हणूनच कुरआनात ठिकठिकाणी परमेश्वराच्या कृपाप्रसादाचे वर्णन येते.
त्याचबरोबर या कृपाळू ईेशराचे संदेश ग्रहण करण्याची क्षमता माणसाकडेच असल्याने विवेकी माणसाला ते कळू शकतात. म्हणूनच कुरआनात जागोजागी मनुष्याच्या बुध्दीला आवाहन  करण्यात आले आहे. किंबहुना देवदुत जिब्राईलकडून प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना दिला गेलेला संदेश ज्ञानप्राप्तीचा होता. विचार करण्याचाच होता. म्हणजे इस्लाममध्ये केवळ  परमेश्वरविषयक श्रध्देचे तत्व नाही तर परमेश्वराचे स्वरुप ज्ञानाच्या प्रकाशातून माणसाला कळते, हा इस्लामचा सिध्दांत आहे. ‘मी सांगतो त्यासाठी विेश्वास ठेव’ असे कुरआनात  म्हटलेले नाही. उलट असे म्हटले गेले आहे की, ‘ज्यांना स्वर्ग व पृथ्वी दिवस व रात्र यांच्यामधील खुणा ओळखता येतात. त्यांना ईश्वराची जाणीव होउ शकते.’ पुढे असेही म्हटले आहे  की, ‘ परमात्मा ज्याला इच्छिल त्याला या प्रकाशाचा मार्ग दाखवितो. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना परमेश्वर प्राप्तीचा झालेला दिव्य प्रवास हा प्रकाशाचा प्रवास होता, असे म्हटले आहे. अशाप्रकारे कुरआनातून मांडलेला इस्लाम पोथीनिष्ठ आणि अंधश्रध्दावादी नव्हता आणि नाही. कुरआनातून दैवी चमत्कार किंवा नियतीचे अटळ चक्र यांची मांडणी केलेली नाही. उलट  ज्ञान, श्रध्दा आणि व्यवहार यांची सांगड घालीत असताना प्रेषित (सल्ल.) यांनी बुध्दीवादी आणि वैज्ञानिक पध्दती स्विकारलेली दिसून येते. विज्ञानाचा इतिहास लिहित असताना  प्राध्यापक जॉर्ज सार्टोन व रॉबर्ट ब्रिफॉल्ट यांनी म्हटले आहे की, प्रेषित मुहम्मद (सल्ल) यांनीच प्रथम अनुभवसिध्द ज्ञान, बुध्दीवाद आणि मानवी प्रज्ञेचा स्विकार या वैज्ञानिक कसोट्या वापरात आणल्या. प्रेषित (सल्ल.) यांनी प्राप्त झालेल्या सुरुवातीच्या संदेशातून उदा. सुरतुल-अलक (96) मध्ये लेखणीद्वारे लिहिलेल्या पुस्तकातुन आणि विेश्वनिर्मात्याने जग कसे  निर्माण केले आहे. या प्रक्रियेचा विचार करुन ज्ञान प्राप्त करुन घ्या. असे म्हटले आहे. म्हणून कुरआनात जवळजवळ 300 आयातींमधून अल्लाहच्या कृपेची उदाहणे देत असताना प्रत्येक ठिकाणी अल्लाहने केलेले निसर्गनियम समजून घेण्याचा सिध्दांत मांडला आहे. 
माणसाने आपली बुध्दी आणि श्रध्दा यांच्या माध्यमातून निसर्गाचे अवलोकन करुन विेशाचे रहस्य समजून घ्यावे असे म्हटले आहे. म्हणूनच प्रेषित (सल्ल.) हे नेहमी अशी प्रार्थना  करीत असत की, ‘हे अल्लाह मला ज्ञानी कर.’’ म्हणून कुरआन शरीफमध्ये अल्लाहचा उल्लेख करीत असताना 750 वेळा ‘ज्ञान’ या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. या प्रक्रियेतून  इस्लामच्या तत्वज्ञानातील चौथे महत्त्वाचे सुत्र स्पष्ट होते. ते म्हणजे ज्ञानाचे सुत्र होय. इस्लामच्या तत्वमिमांसेत परमेश्वराचे एकत्व, अखंडत्व आणि अलौकीकत्व हे पहिले सुत्र आहे.  दुसरे सुत्र माणसाच्या सर्व श्रेष्ठत्वाचे व समतेचे आहे. तिसरे तत्व हे माणूस रुपातील प्रेषिताचे आहे. प्रेषित, मानव आणि परमेश्वर यांना जोडणे हे माध्यम आहे. परंतु इस्लाममधील साक्षात्काराची तत्व केवळ श्रध्देवर आणि व्यक्तीगत अनुभुतीवर आधारीत नाही, तर त्यामध्ये मानवी प्रज्ञेचा विकास व ज्ञानातून सत्य व परमेश्वरासंबंधी होणारी जाणीव अभिप्रेत आहे. आणि यासर्व तात्विक आणि वैचारिक मांडणीचा मुख्य आधार ज्ञान हाच आहे. इस्लाममधून येणारा हा ज्ञानविषयक सिध्दांत गुढ प्रमेयाच्या स्वरुपात येत नाही तर अनुभवसिध्द आणि  व्यवहारिक चिंतनाच्या स्वरुपात तो व्यक्त होतो. 
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास असे दिसून येते की, कुरआनमधून इस्लामने केलेली मांडणी अत्यंत आधुनिक स्वरुपाची आहे. त्यात कुठेही पोथीनिष्ठता किंवा शब्दप्रामाण्य नाही. परंतु  ‘क्रुसेड’ नंतरच्या काळात खिस्ती आणि मुस्लीम देशात टोकाचे राजकीय संघर्ष निर्माण झाले. तसेच औद्योगिक क्रांतीनंतर प्रबळ झालेल्या युरोपीयन राष्ट्रांच्या साम्राज्यवादी प्रवृत्तीमधून  इस्लामसंबंधी केले गेलेले लिखाण हेतुपुर्वक विपर्यास करणारे होते. त्यामूळे बहुसंख्य पाश्चात्य अभ्यासकांनी इस्लाम आणि त्याच्या कुरआनच्या तत्वज्ञानाचे विकृत स्वरूप सादर केल्याचे  दिसते. एडवर्ड सैद यांनी ‘ओरिएंटॅलिझम’ या पुस्तकातून पाश्चात्यांच्या अशा मनोभुमिकेचे विश्लेषण केले आहे. भारतात इस्लामसंबंधी केले जाणारे लिखाण हे पाश्चात्यांनी लिहिलेल्या  ग्रंथांवर किंवा पोथिनिष्ठ धर्मगुरुंनी लिहिलेल्या ग्रंथावर आधारीत असते. त्यामुळे इस्लाममधील मुळची तत्तमिमांसाच वाचकांसमोर येत नाही. 

- मरहूम प्रा. फकरूद्दीन बेन्नूर
(संक्षिप्त : सरफराज अहमद)

संदर्भग्रंथ -
1) तर्जुमानुल कुरआन - भाग पहिला - मौलाना आझाद
2) रिलिजन ऑफ इस्लाम - मौलाना मोहम्मद अली.
3) मुस्लीम वर्ल्ड - प्रा. ताराचंद रस्तोगी
4) ए हिस्ट्री ऑफ मुस्लीम फिलॉसॉफी - प्रा. एम.एम. शरीफ

इस्लामी राज्य ‘मदीना’चे प्रमुख आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे लष्करी तयारीबरोबरच परिस्थितीवर नजर ठेवून अनुमान लावीत होते की, कधी काय घडेल. प्रेषितांचा दृष्टिकोन गतीहीन नव्हता की, ते शत्रूच्या हल्ल्याची केवळ वाट पाहात बसतील आणि शत्रूने हल्ला केल्यावर त्याचे प्रत्युत्तर देतील. अगदीच प्रतिरक्षणात्मक दृष्टिकोनातून जरी विचार केला, तर हेच योग्य होईल की, शत्रूने म्याना बाहेर तलवार काढताच ती तलवार नष्ट करावी. युद्ध रोखण्यापेक्षा युद्धाची तयारीच रोखलेली बरी.
ज्या क्षणी आदरणीय प्रेषितांना कुरैशच्या त्या व्यापारी काफिल्याची खबर मिळाली, त्याच क्षणी त्यांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे या काफिल्याचा सरदार ‘अबू सुफियान’ याने गुपचुपपणे सीरियाच्या मार्गाने जाण्याऐवजी मदीनाच्या सामरिक परिस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय दक्षतेने एक एक पाऊल पुढे टाकू लागला. त्यास संकटाची चाहूल लागताच त्याने लष्कर पाचारण करण्यासाठी ‘मक्का’ शहराकडे दूत पिटाळला. दूताने मक्का शहरी जाऊन जनतेला कळकळीने विनंती केली की, ‘हे मक्कावासीयांनो! आपला व्यापारी काफिला मुहम्मद(स) यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी निघा.‘तीव्र भावूक मनोदशासह एक जबरदस्त सशस्त्र फौज हा हा म्हणता निघाली. ‘अबू लहब’ वगळता सर्वच मोठमोठे सरदार या फौजेत सहभागी होते. प्रेषितांना याची गुप्त सूचना मिळाली. निर्णयाची वेळ समोर होती. जर पुरेशी शक्ती असती तर व्यापारी काफिला आणि शत्रूचे लष्कर, दोघांना लक्ष्य बनवीता आले असते. परंतु दोन्हीपैकी एकालाच लक्ष्य करण्याचा निर्णय घेणे शक्य होते.
आदरणीय प्रेषितांनी ‘जफीरान’च्या घाटीमध्ये आपल्या सोबत्यांना सल्लामसलत करण्यासाठी बोलावले. बर्याचजणांनी काफिल्यावर हल्ला चढविण्याचा सल्ला दिला. माननीय अबू बकर(र), उमर(र), मिक्दाद(र) यांनी प्रेषितांना सांगितले की, आपण जे सांगाल आणि आपली ज्या दिशेला पावले पडतील तिकडे आम्हीसुद्धा आपल्याबरोबरच असू आणि अंतिम श्वासापर्यंत लढू. आम्हाला इस्त्राईलचे वंशज (‘ज्यू’ समाज) समजू नका की, ज्यांनी त्यांचे प्रेषित माननीय मूसा(अ) यांना सांगितले होते की, ‘‘तुम्ही आणि तुमचा ईश्वर मिळून शत्रूंशी लढा. आम्हाला काय देणेघेणे!’’ आदरणीय प्रेषितांनी परत एकदा या प्रकरणी लोकांचा सल्ला मागितला की, ‘या प्रसंगी आपण काय करावे?’ प्रेषित मुहम्मद(स) यांचा हेतु असा होता की, अनसार (मदीनातील प्रेषितांचे समर्थक) समुदायाची या प्रकरणी भूमिका काय आहे. कारण ‘अकबा’च्या ठिकाणी ज्या वेळी अनसार- समुदायाने प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेतली होती त्या वेळी त्यांनी अनसारकडून अशी प्रतिज्ञा घेतली होती की, मदीनावर हल्ला झाल्यास अनसार प्रेषित मुहम्मद(स) यांची साथ देतील. अर्थातच या प्रसंगी केवळ कुरैशच्या काफिल्यास रोखण्याची योजना होती. त्यामुळे अनसार समुदायावर या लष्करी कारवाईत सामील होणे अनिवार्य नसून केवळ ऐच्छिक होते. आदरणीय प्रेषितांना उत्तर देण्यासाठी अनसार समुदायाकडून माननीय साद बिन मुआज(र) उठले आणि म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! ज्याअर्थी आम्ही तुमच्या हातावर इस्लामची दीक्षा घेऊन प्रतिज्ञा केली की आमचे प्राण, संपत्ती आणि सर्वकाही आपल्या आदेशावर अर्पण करू, तेव्हा याचा प्रश्नच उद्भवत नाही की, या लष्करी कारवाईत आम्ही आपल्यासोबत असू की नसू. आपण जर आदेश दिला की, पर्वतावर चढून जीव द्या किवा समुद्रात बुडून जीव द्या तर आम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षणी तयार आहोत. कारण आम्ही आपल्यावर श्रद्धा बाळगली आहे. आपल्या प्रेषितत्वाच्या सत्यतेस मनापासून स्वीकारले आहे. ईश्वराची शपथ की, ज्याने आपणास प्रेषित म्हणून आमच्याकडे पाठविले आहे, आमचा एकही माणूस मागे सरकणार नाही. प्रत्येकजण युद्धभूमीवर आपले प्राण पणाला लावून लढेल आणि ईश्वर आमचे हे कर्म पाहून आपल्या नयनांना शीतलता प्रदान करेल.’’
अशा प्रकारे मुहाजिरीन (स्थलांतरित मक्कावासीय मुस्लिम) प्रमाणेच अनसारजणांनी सुद्धा आदरणीय प्रेषितांवरील आपल्या अमर्याद श्रद्धा आणि आपले सर्वस्व अर्पण करण्याचा पुरावा सादर केला आणि मुहाजिरीन व अनसारच्या पूर्ण सल्लामसलतीनंतर प्रेषितांनी लढाईचा निर्णय घेतला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) रमजान महिन्याच्या बारा तारखेस हिजरी सन दोनमध्ये मदीनाहून निघाले. ईश्वराकडून रमजान व रोजे (उपवास) आनिवार्य होण्याचे हे पहिलेच वर्ष होते. या युद्धात मुस्लिम सैनिकांची संख्या केवळ तीनशे तेरा होती. ‘सफरा’ या ठिकाणी प्रेषितांनी वीस अनुयायांना याकरिता पाठविले की, कुरैशच्या व्यापारी काफिल्याची संपूर्ण माहिती मिळवावी. त्यांच्यामार्फत प्रेषितांना खबर मिळाली की, कुरैश काफिला ‘बद्र’च्या पारंपरिक मार्गावरून न जाता समुद्रतटाच्या दीर्घ मार्गाने निघाला आणि दूरवर पोहोचला.
अर्थात हा काफिला प्रेषित व त्यांच्या अनुयायांच्या तावडीतून बाहेर निघून गेल्यावर काफिल्याचा सरदार ‘अबू सुफियान’ याला वाटले की, आता मात्र संकट टळले. त्यामुळे त्याने कुरैशच्या सामरिक सरदारांना मक्का शहरी परत जाण्याचा सल्ला दिला. परंतु इस्लामचा कट्टर द्रोही असलेला अबू जहलचा पारा खूप चढलेला होता. त्याने ‘अबू सुफियान’चा सल्ला धुडकावून लावला आणि ‘नखला’वरील झालेल्या झडपेत मुस्लिमांकडून ठार झालेल्या ‘हजरमी’चा भाऊ ‘अला बिन हजरमी’ यास आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यास्तव चिथावले या चिथावणीखोर सल्ल्यामुळे ‘अला बिन हजरमी’च्या भावना भडकल्या आणि ‘अबुजहल’शी सहमत होऊन ‘कुरैश’चे संपूर्ण लष्कर ‘बद्र’च्या किनार्यावर पोहोचले.
इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या जीवाभावाच्या सवंगड्यांच्या सल्लामसलतीतून पूर्ण विचाराअंती सामरिक योजना आखली. शत्रूंची संख्या आणि प्रमुख योद्ध्यांच्या बाबतीत गुप्त अहवाल मिळविला आणि मग आपल्या लष्करास उद्देशून म्हणाले,
‘‘मक्का शहराने त्याचे सुपुत्र तुमच्या समोर टाकले आहेत.’’
अर्थात या उपद्रवीजणांचा नाश करण्याची ही अगदी सुवर्णसंधी आहे. जवळपास एक हजाराच्या संख्येत शत्रूची फौज होती. त्यात सहाशे कवचधारी सैनिक आणि शंभर स्वार होते. सोबत मोठ्या संख्येत उंट होते. मोठ्या प्रमाणात हत्यारे होती. मुबलक प्रमाणात रसद आणि सैनिकांना खूश करण्यासाठी मदीरा व गीत गाणार्या व नाचणार्या सुंदर ललना होत्या.
दुसरीकडे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांची संख्या केवळ तीनशे तेरा होती. ईशधारणेने त्यांची मने ओतप्रोत वाहात होती. लढण्यासाठी मुबलक हत्यारे नसली तरी त्यांचे श्रद्धा, ईश्वर व प्रेषितांवरील धारणा, आंदोलनकारी प्रेरणा, संयम, ईशपरायणता, पवित्र चारित्र्य आणि संगठनकौशल्य हीच त्यांची सामरिक शक्ती होती. प्रेषितांनी तयार केलेल्या मुस्लिम फौजेसमोर केवळ एक लढाई जिकण्याचे उद्दिष्ट नसून ते इस्लामी आंदोलनास यशाच्या शिखरापर्यंत नेऊ इच्छित होते. त्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्य हे ‘बद्र’च्या युद्धावर अवलंबून होते.
तिकडे शत्रुपक्षसुद्धा याच युद्धाच्या माध्यमाने प्रेषितांच्या आंदोलनास कायमस्वरूपी चिरडण्याच्या तयारीत होते. इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी ईश्वरासमोर याचनास्वरुप प्रार्थना केली, ‘‘हे ईश्वरा, हे कुरैशजण आहेत! हे गर्व आणि दंभाच्या उन्मादात येथे आलेले आहेत. त्यांचा मूळ हेतूच हा आहे की, तुझ्या दासांनी तुझी उपासना बंद करावी. तुझ्या प्रेषिताचा इन्कार करावा, जेणेकरून त्यांना त्यांची अमानवी, अन्यायी व अत्याचारी व्यवस्था चालू ठेवणे शक्य व्हावे. लोकांनी ईश्वरास सोडून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे. त्यांनी तयार केलेल्या विभूतींची पूजा करावी. म्हणून हे यशदात्या ईश्वरा! तू मला मदतीचे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण कर!! तुझी मदत पाठव!!! तू जर या प्रसंगी मदत केली नाहीस तर तुझे नाव तुझ्या जगातून नष्ट होईल. हे लष्कर जर नष्ट झाले तर तुझे नाव घेणारा या पृथ्वीतलावर कोणी राहणार नाही!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ईश्वरासमोर केलेल्या प्रार्थनेबाबत ईश्वराकडून ईशबोध झाला की, ‘‘आपली प्रार्थना स्वीकारण्यात आली आहे. पुढच्या दिवशी म्हणजेच रमजान महिन्याच्या सतरा तारखेस दोन्ही फौजा समोरासमोर आल्या. प्रेषितांनी इस्लामी फौजेस पंक्तीबद्ध केले. युद्धाची सुरुवात आवाहनाने झाली. मुस्लिम सैन्याने एकूण बावीस जणांचे प्राण ईश्वराच्या नावे अर्पन करून शत्रूसैन्याच्या सत्तर जणांना कंठस्थान घातले. या युद्धामध्ये ‘शैबा’, ‘उत्बा’, ‘अबू जहल’, ‘आस बिन हिश्शाम’ ‘उमैया बिन खल्फ’ आणि ‘अबुल बख्तरी’सारखे दिग्गज आणि क्रूर ईशद्रोही ठार झाले. शिवाय शत्रू फौजेतील सत्तरजणांना बंदी बनविण्यात आले. ‘बद्र’च्या युद्धातील काही बाबीं लक्षणीय आहेत.
  1. ‘बद्र’ची लढाई ही या गोष्टीची साक्ष आहे की, सैन्याच्या संख्येत आणि शस्त्रांच्या संख्येत श्रद्धात्मक प्रेरणाशक्ती प्रदान करते. त्याचप्रमाणे सत्य आणि असत्याची लढाई दिव्य कुरआनची ही व्याख्या सत्य असल्याचे सिद्ध करते की, ‘‘विजय तर केवळ ईश्वरातर्फेच आहे!’’(संदर्भ : दिव्य कुरआन ८:१०, ३:१२६)
  2. ही घटना या गोष्टीची मार्गदर्शक आहे की, संख्या आणि शक्तीच्या अभावाच्या जाणिवा इस्लामी मोर्चावर प्रकट असूनही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘मक्का’वरून येणार्या दोन मुस्लिम तरुणांची सेवा यासाठी नाकारली की, रस्त्यात शत्रूंनी त्यांना कैद केले व या अटीवर सोडले की, प्रेषितांच्या समर्थनार्थ युद्धात सहभागी होणार नाही. आदरणीय प्रेषितांनी त्या दोघांना बजावले की, ‘‘तुम्ही जे वचन त्यांना (शत्रूंना का असेना) दिले आहे, त्याचे पालन करणे तुमचे कर्तव्य आहे. हीच होती ती नैतिक श्रेष्ठता. हीच नैतिक श्रेष्ठता मानवांपर्यंत पोहोचविण्याचा इस्लामचा उद्देश आहे.
  3. तसेच आदरणीय प्रेषितांनी शत्रूपक्षाच्या ठार झालेल्या सैनिकांच्या शवांचा अनादर केला नाही. उलट त्यांच्यासाठी एक मोठा खड्डा तयार करून सर्वांना एकत्रित दफन केले.
  4. युद्धामध्ये पराभूत शत्रूंची संपत्ती आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ईश्वरी आदेशानुसार सर्वांना वाटप केली.
  5. जगामध्ये पराभूत पक्षाच्या कैद झालेल्या सैनिकांवर अमानुष अत्याचार करण्यात येतात. पीडादायक कष्ट देण्यात येते. त्यांचे शील नष्ट करण्यात येते. परंतु या ठिकाणी परिस्थिती मात्र खूप उलट आहे. आदरणीय प्रेषितांनी लढाईत कैदी बनविलेल्या शत्रूंचा उत्तमरीत्या पाहुणाचार केला.त्यांच्याशी मानवतेस शोभणारे वर्तन केले. त्यांच्या शील व प्रतिष्ठा जोपासल्या. ‘मदीना’च्या बर्याच घरांमध्ये त्यांना ठेवण्यात आले. प्रेषितांनी मदीनावासीयांना ताकीद केली की, त्या कैद्यांना चांगले अन्न पुरवावे. त्यांच्याकडे वस्त्र नसल्यास त्यांना वस्त्रे द्यावीत. प्रेषितांच्या आदेशाच्या पालनास्तव काही अनुयायांनी स्वतःचे पोट मीठ-मिरची व खजुरींवर भागवून कैद्यांना चांगला आहार पुरविला. त्यांना वस्त्रे दिली. मस्जिद-ए-नबवीमध्ये जे कैदी ठेवण्यात आले होते, त्यांच्या कन्हन्याच्या आवाजामुळे प्रेषितांची झोप उडाली. प्रेषितांनी आदरपूर्वक त्यांची विचारपूस केली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावरच प्रेषितांना झोप मिळाली.
  6. कैद्यांच्या सुटकेसाठी प्रेषितांनी प्रत्येकी चार हजार दिरहम (तत्कालीन नाणी) दड लावला. काही श्रीमंत कैद्यांना यापेक्षाही जास्त दंड आकारण्यात आला. या दंडाची एकूण रक्कम अडीच ते तीन लाखांच्या घरात होती. एवढा दंड लावणे म्हणजे कुरैशजणांची सामरिक शक्ती विस्कळीत करणे होय.
  7. महत्त्वाची बाब अशी आहे की, ईश्वराचे उपासक असलेल्या मुस्लिम विजेत्यांनी पहिल्याच युद्धात एवढे जबरदस्त विजय संपादन करूनसुद्धा कोणत्याच प्रकारचा जल्लोष साजरा केला नाही, तर प्रेषितांनी घडविलेले हे मुजाहिदीन (धर्मयोद्धे) आपला आनंद ईश्वराच्या स्तुतीगानाने साजरा करीत होते. शिवाय असेदेखील घडले नाही की, मुस्लिमांना विजयाचा कैफ चढला आणि ते असे समजू लागले की, ‘‘आता आपणास एखादे खूप उंच स्थान प्राप्त झाले.’’ या बाबीविरुद्ध दिव्य कुरआनने त्यांना त्यांच्यातील त्रुटी स्पष्टपणे दाखवून दिल्या आणि त्यांत सुधारणा आणण्याचे आदेश दिले.
  8. अंतिम प्रकारचे सत्य हे आहे की, ईश्वराने ‘बद्र’च्या या दिवसास ‘फुरकान’चा दिवस घोषित केले. अर्थात या लढाईतून हे स्पष्ट झाले की, सत्य कोणते आणि असत्य कोणते आहे व कोणती शक्ती विकास पावणारी व कोणती शक्ती नष्ट होणारी आहे.

त्यानुसारच त्यांची उत्पत्ती व त्यांचा क्षय होत असतो. त्यानुसारच ते जगतात व मृत्यू पावतात. खुद्द मनुष्यप्राण्याच्या अवस्थेवर चिंतन केल्यास असे आढळून येते की तोसुद्धा निसर्गनियमांच्या अधीन आहे. जो नियम त्याच्या उत्पत्तीसाठी निहित केला गेला आहे, त्यानुसारच श्वासोच्छवास करतो, अन्नपाणी, उष्णता व प्रकाश ग्रहण करतो. त्याच्या हृदयाची हालचाल, त्याचे रक्ताभिसरण, त्याच्या स्नायू व पेशी, त्याचे हात, पाय, जीभ, डोळे, कान, नाक व त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग व अवयव त्याच्यासाठी निश्चित केलेले कार्य करीत आहे आणि ते कार्य तो त्याला ठरवून दिलेल्या पद्धतीनेच करीत आहे.
मोठमोठ्या ग्रहापासून ते पृथ्वीवरील अतिसूक्ष्म अणूरेणूपर्यंत सर्वांना बद्ध करणारा हा भक्कम व अटळ नियम एका महान शासकाने निर्माण केलेला आहे. सर्व ब्रह्मांड व त्यातील प्रत्येक वस्तू त्याच शासकाच्या अधीन आहेत, कारण त्याने निर्माण केलेल्या नियमांचे ते पालन करीत आहेत. या अर्थाने सर्व चराचर सृष्टीचा धर्म ‘इस्लाम’च होय. कारण आम्ही वर दर्शविल्याप्रमाणे अल्लाहला संपूर्ण आत्मसमर्पण, त्याची संपूर्ण शरणागती पत्करून त्याचे आज्ञापालन करणे, यालाच इस्लाम असे म्हणतात. चंद्र, सूर्य व तारे हे सर्व मुस्लिम आहेत, पृथ्वीही मुस्लिम आहे. वायू, पाणी व प्रकाशही मुस्लिमच आहेत. वृक्ष, पाषाण व जनावरेसुद्धा मुस्लिम आहेत आणि जो मनुष्य ईश्वराला जाणत नाही किंवा त्याचे अस्तित्व नाकारतो, जो अल्लाहखेरीज इतरांची उपासना करतो, जो अल्लाहशी इतरांना सहभागी करतो, तोसुद्धा आपल्या प्राकृतिक व स्वाभाविक नियमानुसार मुस्लिम आहे. याचे कारण असे की त्याचा जन्म, जिवंत राहणे-मरणे सर्वकाही ईश नियमाच्या अधीन आहेत. त्याच्या शरीरातील रोमरोमाचा धर्म इस्लामच आहे, कारण ते सर्व ईशनियमानुसार निर्माण होतात, विकास पावतात. कार्यशील असतात इतकेच नव्हे तर ज्या जिभेने अज्ञानापोटी तो शिर्क (अनेकेश्वरत्व) व कुफ्र (अधर्म) संबंधी आपल्या भावना व विचार प्रकट करतो, ती जीभदेखील वस्तुतः मुस्लिम आहे. त्याचे मस्तक जे अल्लाहखेरीज इतरापुढे तो जबरदस्तीने झुकवितो ते मस्तकसुद्धा उपजत मुस्लिम आहे. अज्ञानापोटी अल्लाहखेरीज इतरांचा आदर व प्रेम ज्या हृदयात तो बाळगतो ते हृदयही स्वभावतः मुस्लिम आहे कारण या सर्व वस्तू ईशआज्ञेचे पालन करीत असतात व त्यांची प्रत्येक हालचाल ईशनियमानुसार होत असते. आता एका दुसऱ्या पैलूतून पाहा.
मनुष्याचा एक दर्जा असा आहे की, सृष्टीतील अन्य वस्तूंप्रमाणेच तोही प्रकृतीच्या प्रबल नियमांत सर्वस्वी बद्ध असून त्या नियमांचे पालन करण्यास बांधिल आहे.
त्याचा दुसरा दर्जा असा आहे की त्याला बुद्धी असते, तो विचारशक्ती आकलनशक्ती व निर्णयशक्ती बाळगतो आणि आपल्या मर्जीनुसार एका गोष्टीला पसंत करतो तर दुसरी गोष्ट नाकारतो. एका पद्धतीला पसंत करतो तर दुसरीला नापसंत करतो. जीवनव्यवहारात आपल्या इच्छेनुसार स्वतःच नियम ठरवतो, किंवा इतरांनी ठरविलेल्या नियमांचा अंगीकार करतो. अशा अवस्थेमध्ये तो इतर वस्तूंप्रमाणे कोणत्याही निहित नियमांचे पालन करण्यास बद्ध केला गेलेला नाही. उलट त्याला आपल्या विचारांची, निर्णयाची व आचारांची मोकळीक दिली गेली आहे.
माणसाच्या जीवनात या दोन अवस्था वेगवेगळ्या आढळतात.
पहिल्या अवस्थेमध्ये तो सृष्टीतील अन्य वस्तूंप्रमाणे उपजत मुस्लिम आहे आणि मुस्लिम असण्यावर विवश आहे; हे नुकतेच आपण पाहिले आहे.
दुसऱ्या अवस्थेमध्ये मुस्लिम राहणे अगर न राहणे सर्वस्वी त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे आणि याच आधारावर माणसे दोन गटांत विभागली जातात.
एक मनुष्य असा आहे जो आपल्या निर्मात्याला ओळखतो, त्याला आपला स्वामी व धनी मानतो व त्याच्या जीवनातील ऐच्छिक कार्यातसुद्धा अल्लाहच्या नियमांचे पालन करतो, तो परिपूर्णतः मुस्लिम आहे. त्याचा इस्लाम पूर्णत्वास पोहोचला आहे कारण त्याचे संपूर्ण जीवन प्रत्यक्षपणे इस्लाम आहे. ज्याचे आज्ञापालन तो न समजता करीत होता, आता समजून उमजून तो त्याचा आज्ञाधारक बनला. आता तो स्वेच्छेने त्याच अल्लाहचा आज्ञाधारक आहे ज्याचा तो अनैच्छिकपणे आज्ञाधारक होता. आता त्याचे ज्ञान सत्य आहे कारण ज्या अल्लाहने विद्या संपादन करण्याची व ज्ञानार्जनाची क्षमता प्रदान केली, त्याला त्याने जाणले आहे. आता त्याची बुद्धी व त्याची निर्णयशक्ती उचित आहे कारण ज्या अल्लाहने त्याला विचाराची, निर्णयाची व आकलनाची क्षमता प्रदान केली, त्या अल्लाहचे आज्ञापालन करण्याचा त्याने विचारपूर्वक व स्वेच्छेने निर्णय घेतला. आता त्याची जीभ सत्यावर आहे कारण ज्या अल्लाहने तिला बोलण्याची क्षमता प्रदान केली, त्याचीच ती स्वीकृती देत आहे. आता त्याचे संपूर्ण जीवन हे केवळ सत्यमय आहे कारण ऐच्छिक तसेच अनैच्छिक या दोन्ही अवस्थेत तो अल्लाहच्या नियमांचे पालन करणारा आहे. आता संपूर्ण विश्वाशी तो एकरूप झाला आहे कारण संपूर्ण चराचर सृष्टी ज्याचे दास्यत्व करीत आहे त्याचीच तोही उपासना करीत आहे. आता तो पृथ्वीतलावर अल्लाहचा प्रतिनिधी (खलीफा) आहे. संपूर्ण विश्व त्याचे आहे व तो अल्लाहचा आहे.

ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन



उत्क्रांतीच्या प्रक्रियेत इस्लामचा उदय, मानवी प्रज्ञेच्या श्रेष्ठत्वापर्यंत येउन पोहचतो. आणि म्हणूनच कुरआन शरीफ़च्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन हे शेवटचे मार्गदर्शन मानले गेले  आहे. कारण पैगंबर सल्ल. यांच्या प्रेषित्वाच्या 23 वर्षांच्या काळात प्रत्यक्ष घडणाऱ्या दैनंदिन घटनांच्या अनुषंगाने साक्षात्कार रुपाने मार्गदर्शन करण्यापर्यंत परमेश्वरी संदेश येउन पोहचल्यानंतर ईश्वरी ज्ञान व्यवहारात आणले गेले आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नवनव्या मार्गदर्शनाची पुन्हा गरज राहत नाही. आणि त्या अर्थाने कुरआन शरीफ़ हा शेवटचा ईश्वरी  ग्रंथ मानला गेला आहे.
या मांडणीमध्ये कुरआनात नसलेले स्वतःचे अर्थ घुसवून धर्मगुरुंनी म्हणजे उलेमांनी इस्लामच्या या मुलभूत तात्विक अधिष्ठानाचे विकृतीकरण केले आहे. हि सर्व उत्क्रांतीची प्रक्रीया  लक्षात न घेता, धर्मगुरुंनी त्याचा अर्थ असा लावला की, इस्लाम हा शेवटचा आणि सुधारीत धर्म असल्याने त्याच्या पुर्वी असलेले सर्व धर्म आपोआपच रद्द होतात. कुरआनात 25 प्रेषितांची नावे दिलेली असून त्यातील अनेक नावे बायबलमधील आणि जुन्या करारातील तसेच त्याबाहेरील देखील आहेत. कुरआनच्या अनुसार सर्व प्रदेशांत परमेश्वराकडून प्रेषित  पाठविले गेले. एवढेच सांगून कुरआन थांबत नाही तर मुस्लिम माणसाने या सर्वच प्रेषितांवर श्रध्दा ठेवणे आवश्यक असल्याचे बजावून सांगते. कुरआनात स्पष्टपणे म्हटले आहे की,  ‘मुस्लीमाने (साक्षात्कार रुपाने) तुला (मुहम्मद पैगंबरांना ) जे सांगितले त्याच्यावर विेशास ठेवला पाहिजे. तसेच तुझ्यापुर्वी जे साक्षात्कार झाले त्यावरही विेशास ठेवला पाहिजे. ’’ (2/4)  आणखीन पुढे म्हटले आहे की, अल्लाहकडून जे सांगितले गेले त्यावर मुहम्मद पैगंबरांनी विेशास ठेवला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अनुयायांनी देखील विेशास ठेवला आहे. ते सर्वजण  अल्लाह , त्यांचे देवदूत, त्यांचे ग्रंथ, त्यांचे प्रेषित यांच्यावर श्रध्दा ठेवतात, आम्ही प्रेषितांमध्ये भेदाभेद करीत नाहीत. (2/285) आणि जे ईश्वरांवर आणि त्यांच्या प्रेषातांवर श्रध्दा ठेवित  नाहीत. किंवा काहींवर श्रध्दा ठेवतात आणि काहींवर अविेशास दर्शवितात ते पाखंडी आहेत. (4/150,151)
कुरआनातील हे आदेश अतिशय स्पष्ट असून कुरआनच्या अवतरणापुर्वी जे प्रेषित (सल्ल.)आणि धर्मग्रंथ झाले. त्या सर्वांचे कुरआन हे केवळ ऋणच मान्य करीत नाही तर त्यांच्या  अप्रक्षिप्त मूळ तत्वज्ञानाचे पालन करण्याचा आग्रह धरतो. कुरआनाची हि सहिष्णूता पराकोटीची व्यापक, सर्वसमावेशक आणि उत्क्रांतीवादी आहे. एवढी प्रत्ययकारी सहिष्णूता, ‘सेमीटीक’  म्हणून हिणकस ठरवल्या गेलेल्या कुरआनात जेवढ्या स्पष्टपणे मांडली गेली आहे. तेवढी स्पष्टता अन्य धर्मग्रंथात कुरआनाप्रमाणे आदेशांच्या स्वरुपात आढळत नाही. म्हणून त्या  अर्थाने इस्लाम कुरआनला शेवटचा धर्मग्रंथ मानतो. कारण मानवी समाजाच्या उदयानंतर वेळोवेळी दिल्या गेलेल्या सर्व ईश्वरी ज्ञानाचे ऋण मान्य करुन त्या सर्व अप्रक्षिप्त स्वरूपातील  तत्वज्ञानाचे पालन करण्याचा दिला गेलेला आदेश आणि प्रत्यक्ष व्यवहारिक समस्यांचे निराकरण करण्याच्या निमित्ताने कुरआनरुपाने केले गेलेले मार्गदर्शन हे दोन्ही एकत्रित केले की,  सांगायचे काहीच शिल्लक राहत नाही. अमूर्त आधीभौतीक प्रमेयांपासून सुरु झालेला हा ज्ञानाचा प्रवास कुरआनात अनुभववादी आणि वर्तनवादी होतो. कुरआनातील हा अनुभववाद  विलक्षण आधुनिक आहे. अशा प्रकारची मांडणी करणारा कुरआन हा इतर धर्मग्रंथाच्या तुलनेने आधुनिक आणि शेवटचा धर्मग्रंथ आहे.
पैगंबर सल्ल. यांच्या माणूसपणाचा किंवा सर्वसामान्यत्त्वाचा ठासून मांडलेला सिध्दांत का? कारण , कुरआननुसार माणूस हि ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे . तसेच या  विेशनिर्मात्यासंबधीची आधीभौतीक जाणीव व त्या संबधीचे ज्ञान हे माणसालाच होऊ शकते. कारण कुरआनने माणसाला विवेकनिष्ठ मानलेले आहे. त्यानुसार चांगले किंवा वाईट यांचे  भान किंवा विवेक असणारा मनुष्यप्राणिच आहे. ईश्वराची अवज्ञा करण्याचीही त्याची क्षमता आहे. कुरआनातील प्रतिपादन माणसाची प्रज्ञा आणि अस्तित्वाच्या स्वायतत्तेचा सिध्दांत  मांडते. माणूस हा अल्लाह आणि ललाटाच्या हातातील कळसुत्री बाहुले नाही. आपल्या आदेशाची अवज्ञा करण्याची देखील क्षमता परमेश्वरानेच त्याल प्रदान केली असल्याने त्याचे  अस्तित्व स्वायत्त आणि विवेकनिष्ठ आहे. कारण परमेश्वरानेच त्याला चांगले काय आणि वाईट काय यांचे ज्ञान दिले आहे. म्हणून अवज्ञेला कडक शिक्षाही सांगितलेली आहे. म्हणून  मानवी जाणिवांच्या उत्क्रांतीच्या या विकसित टप्प्यात परमेश्वराने अवतार रुपाने किंवा देवदूत रुपाने ज्ञान प्रदान करणे हे माणसाच्या स्वायत्त अस्तित्वाचा किंवा मानवी प्रज्ञेच्या  प्रतिष्ठेचा अवमान करणारे ठरते. म्हणून प्रेषितत्वाचा सिध्दांत आणि प्रेषिताच्या माणूसपणाचा सिध्दांत इस्लाम आग्रहाने मांडतो.
या सर्व प्रक्रीयेतून इस्लामची ईश्वरविषयक धारणा व्यक्त होते. यासंदर्भात इस्लाममधील ईश्वरविषयक सिध्दांत प्रेषितत्व आणि साक्षात्कार विषयक सुत्रे यासंबंधाने मौलाना आझाद  आणि मौलाना मोहम्मदअली यांनी मर्मग्राही विश्लेषण केले आहे. मौलाना आझाद यांच्या मते आदीम व्यवस्थेतील माणसाला ईेशरासंबधी झालेली जाणीव केवळ माणसाची भयचकित  प्रतिक्रीया नव्हती. ती विेश, हि सृष्टी, निसर्ग आणि मानव यांच्या एकात्म स्वरुपातून त्याला उमगलेली सत्य स्वरुपाची जाणीव होती. ईश्वरासंबधीचे ज्ञान उत्क्रांती प्रक्रियेतून व्यक्त  होणारे नसून ते माणसाच्या चेतनामय जाणीवेच्या आत्मप्रकाशाच्या माध्यमातून उमगलेले सत्य असते. म्हणून इस्लाममध्ये प्रेषित आदम (अलै.) यांची निर्मिती विशेषत्वाने करण्यात  आली. जुन्या करारात म्हटल्याप्रमाणे आदम अलै. यांचे अस्तीत्व स्वर्गीय होते. त्यांनी अल्लाहने आखून दिलेल्या आचरणाच्या कक्षा ओलांडल्या. सेमिटीझमनुसार प्रथम प्रकाश म्हणजे  ज्ञान होय. अज्ञान आणि अंधकारानंतर त्याचा पाठलाग करतात. म्हणून मौलाना आझादांनी म्हटल्याप्रमाणे परमेश्वरावरील श्रध्दा हि मानवी मनाची निर्मिती कधीच नव्हती. तर  परमेश्वरासंबधीचे ज्ञान किंवा श्रध्दा माणसाच्या माणूसपणाचा एक नैसर्गिक आणि अविभाज्य भाग आहे. त्याच्या बुध्दी आकलन शक्ती किंवा परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांनी त्यात 
बदल होत नसतो. म्हणून ईश्वरविषयक संकल्पना माणसाच्या  वैचारीक उत्क्रांती प्रक्रियेचा परिपाक नसते. फ़ार तर ईश्वराच्या गुणविशेषासंबंधी त्याला होणारे आकलन हे टप्प्याटप्प्याने  वृध्दींगत होत जाणाऱ्या त्याच्या ज्ञानाचा परिणाम असते. कारण माणसाची बुध्दीमत्ता विकारांनी घेरलेली असते. म्हणून माणूस हा अमुर्त किंवा अव्यक्ताचा विचार करताना त्याला ज्ञात  असलेले गुणधर्म किंवा भावना यांचे आरोपण त्यावर करीत असतो. म्हणून ईश्वराचे संदेश किंवा मार्गदर्शनाचे त्याने आपल्या कुवतीनुसार अर्थ लावले. त्याचप्रमाणे ईश्वराच्या गुणधर्माचे  विवेचन यथामती केले. त्यामुळे ईेशरविषयक वैचारिक मांडणीत फ़रक पडलेला आहे.
या कारणामुळेच ईश्वराचे मानवीकरण करणाऱ्या सगुणवादापासून निसर्गपुजेपर्यंत किंवा नकारवादापर्यंत, अनेकेश्वरवादापासून ते एकेश्वरवादापर्यंत, भयचकितभावापासून ते  प्रेमवादापर्यंतचे विचार यासंदर्भात मांडलेले दिसून येतात. कुरआनाच्या पुर्वी ईेशरी चिंतनासंबधीची मांडणी प्रज्ञा, मूर्तीपुजेपासून ते अव्यक्ताच्या उपासनेपर्यंत आलेली होती. परंतू मानवी  प्रज्ञेतील ईश्वराचे मानवीकरण विषयक (अँथ्रॉपॉमॉफ़िक) अवशेष पुर्णपणे नाहिसे झालेले नव्हते. कुरआन शरीफ़ ने हे अवशेष काढून टाकून ईेशरी चिंतनाला पुर्ण अलौकीक वादाकडे नेले.  कुरआनातील अलौकीकवाद परमेश्वराच्या गुणविशेषाला चिकटविलेले सर्व प्रकारचे मानवी अवशेष काढून टाकतो. परंतू त्याचबरोबर पुर्ण नकारवादाकडेही (निहीनीझम) जात नाही.  कुरआणाचे उद्दीष्ट हे परमेश्वराचे अलौकीकत्व स्पष्ट करण्याचे आहे. आणि म्हणून नकारवादाकडे जाण्याचे नाही. उपनिषदांमधील ‘नेतिनेति’ चा विचार हा अत्यंत प्रगल्भ स्वरुपाचा  अलौकीकवाद आहे. यात काही शंका नाही. पंरतु प्रत्यक्ष वैदीक धर्मचिंतनात नकारवाद टाळण्यासाठी अमुर्त ब्रम्हाला देखील देवाचे रुप घ्यावे लागले होते. कुरआन या दोन्हीतुन  सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करते. कारण एका बाजुला परमेश्वराचे गुणविशेष प्रतिपादन करण्याच्या प्रक्रियेतून सगुणवाद किंवा ईश्वर मानवीकरणवाद उदयास येतो. तर दुसऱ्या  बाजुला गुणविशेष नाकारण्याची प्रक्रीया माणसास सर्वंकष नकारवादाकडे नेते. कुरआन दोन्हीतील सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी परमेश्वराच्या गुणविशेषांचाच खास विचार  करते. परमेश्वराचे अस्तीत्व जर वैशिष्ट्यपुर्ण आणि आगळे असेल तर त्याचे गुणविशेष देखील वैशिष्ट्यपुर्ण असणार त्यात मानवीकरणाचे कसलेही गुणधर्म असणार नाहीत.  त्यासंबधीची मांडणी इस्लामने कुरआनातून केल्याचे दिसते. प्रत्येक धर्माने परमेश्वराची सकारात्मक (पॉझिटिव्ह) बाजू दर्शविण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु परमेश्वराची नकारात्मक  बाजू इस्लाम दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती म्हणजे परमेश्वरासारखा म्हणजेच अल्लाहसारखा अन्य कुणीही नाही. जेंव्हा परमेश्वराला अन्य कोणीही नाही. त्याचा अर्थ असा की,  परमेश्वराचे गुणविशेष दुसऱ्या कोणालाही लागू होणारे नाहीत. आणि म्हणून परमेश्वराची कोणाशी तुलनाही करता येणार नाही. आणि बरोबरीही करता येणार नाही. कुरआनातील पहिल्या भागात सुरह फ़ातेहामधून या अनुषंगाने परमेश्वराचे तीन गुणविशेष दिलेले आहेत. रबुबीयत ( सृजन-पालन,विकासकर्ता) रहमत (कृपा) आणि अद्ल (न्याय) या तीनही गुणविशेषांच्या  माध्यमातून परमेश्वराचे आकलन सर्वांनाच होउ शकते. त्यात बुध्दीवान माणसाला होणारे आकलन आणि सर्वसाधारण माणसाचे आकलन अशी वर्गवारी होउ शकत नाही. असा  इस्लामचा सिध्दांत आहे. अशाप्रकारे इस्लाम सर्वांसाठी परमेश्वरचिंतनाची आणि उपासनेची एक आणि समान दृष्टी देतो. परमेश्वराचे एकत्व, त्याच्या ज्ञानाच्या त्याच्या आकलनाच्या  देखील एकत्वाची मांडणी करते म्हणून त्या अर्थाने ‘अल्लाह’चे एकत्व वैशिष्ट्यपुर्ण ठरते.
(क्रमशः)

- मरहूम प्रा. फ़करूद्दीन बेन्नूर
(संक्षिप्त : सरफ़राज अहमद)

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काळातील लढायांचा उल्लेख पाहून काही इतिहासपंडितांकडून होणार्या टीकांच्या आधारावर असा नेहमीच प्रश्न उभा करण्यात येतो की, नैतिकता आणि शांतीचा संदेश देणार्या धर्मात तलवारीची आणि युद्धाची काय गरज आहे? मस्जिदीसह रणभूमीतील कार्याची जोड कशासाठी? कारण धर्म, नीतिमत्ता, पूजापाठ, समाजकार्य वगैरे सर्व काही मस्जिदीमधून होऊ शकते. ‘रणभूमी’चा या बाबीशी काय संबंध आहे?
या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर स्वयं कुरआनने दिले आहे. प्रथम असे की, इस्लामी राज्याचे अस्तित्व व अधिकार, तेथील निवासी आणि संपत्तीचे संरक्षण करणे हे रणभूमी गाजविल्याशिवाय शक्य नाही.
दुसरे असे की, मानवाची श्रद्धा, लक्ष्य, जीवनव्यवस्था आणि सांस्कृतिक रुपरेखा अबाधित ठेवण्यासाठी इस्लामी राज्याचे गठन व्हावे.
तिसरे असे की, ईशदासत्वावर आधारित आणि मानवकल्याण आंदोलनविरोधी असलेल्या विध्वंसक शक्तींचा विनाश व्हावा.
चौथे असे की, जर एखाद्या अत्याचारी आणि जुलमी शक्तीद्वारे दीनदलित मानव, अबला स्त्रिया आणि आबालवृद्ध सतत अत्याचार व अन्यायाच्या भट्टीत होरपळत असतील, त्यांना सुधारणा, विकास, सफलता व समृद्धीपासून हेतुपुरस्पर रोखण्यात येत असेल, तेव्हा अशा विध्वंसकारी शक्तींना मुळासकट उपटून काढण्यात यावे.
‘जिहाद’च्या या पवित्र धारणात्मक क्षेत्रात प्रतिरक्षात्मक युद्धदेखील आलेच. परंतु हे विसरता कामा नये की आंदोलन आणि सभ्यतांची प्रत्येक लढाई ही एकप्रकारे प्रतिरक्षात्मक लढाई असते आणि दुसर्याप्रकारे अक्रामक, मात्र त्याचबरोबर ती सुधारात्मक आणि रचनात्मकसुद्धा असते.
जिहादच्या या धारणेनुसार आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायाचे त्यांच्या विरोधकांशी असे वर्तन होते की, जणू एखाद्या पडीक शेतीस तयार करून त्यात बगीचा लावू इच्छीतात. परंतु काही जंगली पशु, त्यांनी तयार केलेली शेती वारंवार खराब करतात आणि मग जेव्हा त्या बगीच्यात सुंदर फुले लागतात तेव्हा एक एक फूलझाड उपटून नष्ट करतात. मग या जंगली पशुंना कोणत्या नियम आणि नैतिक आधारानुसार स्वैराचार करण्यासाठी मोकळे रान सोडण्यात यावे? यासाठी कोणत्या नैतिक नियमांचा आधार घ्यावा? ‘अरब’मध्ये दोन शक्ती समोरासमोर होत्या. एकीकडे विधिवृत सुव्यवस्थित राज्य होते. या राज्यात स्वच्छ आणि शालीन समाज वावरत होता. हे राज्य संपूर्ण जगासाठी एक सफल संदेशाचा ध्वजधारी होता. दुसरीकडे अनेकेश्वरवादाच्या विवेकहीन आणि अमानवी धारणा व श्रद्धा होत्या. प्रत्येक कबिल्याची वेगळी विचारधारा आणि स्वरुप होते. नैतिक स्तर पतनग्रस्त होत्या. एक जुनाट गंजलेली सभ्यता आणि संस्कृती होती. या संस्कृतीत कोणताही प्रवाह नसून जमलेल्या पाण्याप्रमाणे ती सडत होती.
मक्का आणि मदीना दरम्यानचे युद्ध हे गृहयुद्ध स्वरुपाचे होते. हे युद्धक्रांती घडवून आणणार्या शक्तीविरुद्ध क्रांतीविरोधी शक्तींनी सुरु केले होते.
बद्रच्या पहिल्या युद्धाची पृष्ठभूमी अशी होती की, ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याविरुद्ध कुरैशजणांनी त्यांच्या हत्येचे भ्याड षडयंत्र रचले होते आणि ‘हिजरत’ च्या रात्री मक्काच्या गल्लोगल्ली तलवारी म्यानाच्या बाहेर आल्या होत्या. ‘अकबा’च्या ठिकाणी मदीनावासी ज्या वेळी प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेत होते, तेव्हाच त्यांना हे सत्य कळून चुकले होते की, प्रेषितांना मदीनास येण्याचे निमंत्रण देणे म्हणजेच मक्काच्या क्रूर सरदारांचे वैर घेणे आणि युद्धास सामोरे जाणे होय. मक्कावासीयांनी तर अब्दुल्लाह बिन उबईच्या मार्फत मदीनावासीयांना गुपित पत्रसुद्धा दिले होते की, ‘‘तुम्ही स्वतः प्रेषित मुहम्मद(स) यांना शहराबाहेर काढून टाका, अन्यथा आम्ही तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला ठार करून आणि तुमच्या पत्नी आणि मुली व बहिणींना आपल्या भोगविलासाचे साधन बनवू.’’ मग प्रत्यक्षात आणखीन एक संदेश मुस्लिमांना पाठविण्यात आला की, ‘‘असे समजू नका की, मक्का शहरातून सुरक्षित निसटल्याने आम्ही तुम्हास सोडून दिले. मदीना पोहोचून आम्ही नक्कीच तुमचा समाचार घेऊ.’’
त्याच काळात माननीय साद बिन मआज(र) यांना ‘अबुजहल’ या ईशद्रोह्याने प्रवेश करू दिला नाही आणि म्हणाला, ‘‘तुम्ही लोकांचा काबागृहात प्रवेश करणे आम्हाला मुळीच खपत नाही.’’ यावर माननीय साद बिन मआज(र) यांनीदेखील त्यास खडसावले की, ‘‘ठीक आहे, तुम्ही आम्हास काबागृहांचा मार्ग बंद केला तर आम्ही तुमचा व्यापारिक राजमार्ग बंद करू!’’
या सर्व घटनांच्या कड्या जोडून पाहिल्यास ही गोष्ट स्पष्ट होते की, मक्कावासीयांकडूनच सुरुवातीस युद्धाची घोषणा करण्यात आली. कुरैशजणांना आपली तलवार म्यानाबाहेर काढण्यासाठी काही कारणास्तव उशीर झाला खरा, अन्यथा हे कुकर्म त्यांनी खूप अगोदरच केले असते. त्यांच्यासमोर एक मोठी अडचन ही ‘किनाना’ परिवाराची होती. किनाना परिवार मक्का आणि मदीनाच्या मध्यात होता. किनाना परिवाराचे कुरैश परिवाराशी जुने हाडवैर होते. मदीनावर चढाई करण्यासाठी ‘किनाना’ प्रदेशातूनच जाणे भाग होते. कारण हाच एकमेव मार्ग मदीनास जाण्यासाठी होता. जुने वैर असल्याने कुरैशजणांना या मार्गावर किनानाजणांकडून अडविले जाण्याची भीती वाटत होती. त्याचबरोबर असा धोका संभावण्याचीदेखील भीती होती की, कुरैशजणांनी मदीनावर चढाई केली तर किनाना परिवाराचे लोक मागून येऊन मक्का शहरावर चढाई करतील किवा कुरैशजणांचा मक्का शहराशी असलेला मार्ग बंद करतील. ‘सुराका बिन मालिक’ हा किनाना परीवाराचा सरदार होता. त्याला जेव्हा परिस्थितीची जाणीव झाली, तेव्हा तो स्वतः मक्का शहरी गेला आणि तेथील इस्लामद्रोही सरदारांना सहाय्य करण्याचे अश्वासन दिले.
मक्कावासीयांची दुसरी समस्या ही योद्ध्यांना संघटित करण्याची होती. यासाठी हे ठरविण्यात आले की, हे प्रकरण ‘अहाबिश’च्या स्वाधीन करावे. कारण ते अत्यंत शूर आणि रागीट व संतापी स्वभावाचा होता. सुपारी घेऊन युद्ध करण्याचादेखील त्याचा व्यवसायच होता. त्यांनी मक्काच्या जवळ असलेल्या ‘अल अहाबिश’ नावाच्या खाडी प्रदेशात मक्कावासीयांबरोबर मैत्रीचादेखील करार केला होता.
तिसरी समस्या ही आर्थिक समस्या होती. म्हणून जो व्यावसायिक काफिला या वर्षी ‘सीरिया’ देशी चालला होता, त्यास मक्कावासीयांनी जास्तीतजास्त भांडवल गोळा करून दिले होते, जेणेकरून या व्यवसायातून मिळणार्या भरघोस नफ्याचा प्रचंड पैसा मदीनावर हल्ला चढविण्यासाठी कामी येईल.
खर्या अर्थाने विचार केल्यास हा काफिला व्यवसायिक नसून त्यातून कमाविलेल्या नफ्याचे प्रत्येक नाणे हे मुस्लिमांचे रक्त सांडण्यासाठी भाल्याचा फाळ आणि तलवारीची तीक्ष्ण धार होती. जगाच्या पाठीवरील कोणतेही राज्य आजही आपल्या प्रभावसीमांमध्ये अशा प्रकारच्या कारवायांची उघड सूट कोणत्याही शत्रूक्तीस देत नाही. इस्लामद्वेष्ट्या कुरैशच्या व्यावसायिक काफिल्याविरुद्ध मुस्लिमांकडून जी कार्यवाही सुरु करण्यात आली होती तिचा उद्देश हा होता की, ‘कुरैश’ परिवाराची व्यापाराच्या आडची युद्धाची मोहीम अशसस्वी व्हावी.
या ठिकाणी थांबून आपण मागे घडलेल्या एका घटनेचा अढावा घेऊ या. ‘नखला’कडे प्रेषितांनी पाठविलेल्या एका तुकडीची कुरैश कबिल्याच्या काहीजणांशी झडप झाली आणि त्यात कुरैशांचा एक माणूस ठार झाला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या घटनेचे दुःख झाले. कारण इस्लामी शासनाकडून अद्याप अशा कार्यवाहीचा आदेश जारी झालेला नव्हता. प्रेषितांनी ठार झालेल्या माणसाच्या हत्येचा मोबदला कुरैशपरिवारास पाठवून घडलेल्या दुःखद घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. प्रेषितांनी हत्येचा मोबदला देऊनसुद्धा मक्का शहरात प्रेषितविरोधी भावना उफाळल्या आणि ही संधी साधून मक्कावाल्यांनी संपूर्ण मक्का शहराचे वातावरण गढूळ केले. संयोगाची बाब ही की मुस्लिम लष्कर तुकडीस ही गोष्ट माहीत नव्हती की, याच दिवसापासून माहे ‘हराम’ (शांतीमास) सुरु होत आहे. या महिन्यात कोणावरही चढाई वा हल्ला करणे संपूर्ण अरबच्या परंपरेविरुद्ध होते, ही गोष्टसुद्धा विरोधकांच्या प्रचाराचे साधन बनली आणि याच घटनेस कुरैशजणांनी लढाईसाठी पाऊल उचलण्याचे निमित्त बनविले.
परिस्थिती विचित्र होती. पवित्र रमजानचा पहिला महिना होता आणि रोजे (महिनाभराचे उपवास) आनिवार्य झाले होते. याच महिन्यात सत्य आणि असत्याची पहिली लढाई झाली आणि सत्यास विजय मिळाला. असत्य पराभूत झाले.
कुरआन अवतरित झालेल्या या महिन्यास ईश्वराने ईशपरायणता आणि प्रशिक्षणाचे साधन बनविले. या ईशपरायणता आणि प्रशिक्षणाशिवाय इस्लामी जिहादच्या बाबतीत कल्पना करणेच शक्य नाही.
प्रशिक्षणाचा हा महिना श्रद्धावंतांसाठी एक मोठी परीक्षाच असते. रमजान महिना हा या गोष्टीची कसोटी असतो की, जगामध्ये सत्य प्रस्थापना करणारे आणि असत्याचे निर्मूलन करणारे वीर क्रांतिकारी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पुढे येताहेत की नाही. त्यांचा आपल्या मनोकामना आणि अभिलाषांवर ताबा आहे की तेच आपल्या मनोकामना आणि अभिलाषांचे दास व गुलाम आहेत? जर त्यांचा ताबा नसेल तर उत्तुंग हेतु आणि उद्देशांचे केवळ नारे तर कोणीही लावू शकतो, परंतु निर्णायक बाब अशी की, त्याग आणि संकटे झेलण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे काय? ‘रमजान’हा पवित्र महिना ईश्वरी सैन्यास असा जिहाद करणार्यांना तयार करण्याची कसोटी आहे, जे भूक, तहान सहन करून आणि इतरांची निदानालस्तीसारख्या दुष्कृत्यापासून दूर राहून ईश्वरी आदेशाचे पालन करावे. नसता एखादा माणूस खाण्यापिण्यावरील काही तासांचे बंधन सहन करु शकत नाही. दांपत्यिक सुख काही काळापुरते त्यागू शकत नाही आणि मग तो जर इस्लामची सेवा, इस्लामी क्रांती आणि इस्लामी स्वरुपाच्या गप्पा मारत असेल, तर या निव्वळ गप्पाच असतील. यामुळे कोणाचे आणि स्वतःचेही भले होणार नाही. जगावर अशा लोकांनाच विजय मिळविता येतो, जे दुसर्यांशी लढण्यापूर्वी स्वतःशी लढून स्वतःवर विजय प्राप्त करतात.
पवित्र आणि मंगलमय रमजान महिन्यात मुस्लिम मुजाहिदीन (धर्मयोद्धे) प्रथमच प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नेतृत्वात जिहादच्या मार्गावर पाऊल टाकतात.

ह. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘एखाद्यासंबंधी वाईट गुमान करण्यापासून दूर रहा. कारण वाईट गुमान सर्वाधिक अशी खोटी गोष्ट  आहे. एखाद्यासंबंधी बरे-वाईट जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्यासंबंधी जासूसी करू नका, आपापसात ईर्ष्या करू नका. आपापसात द्वेष करू नका, एखाद्याशी नाते-संबंध तोडू  नका. ईश्वराचे भक्त आहात तर बंधु म्हणून रहा.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण-
आमच्या हृदयात आणि विचारात पवित्रता नसेल तर स्पष्ट समजून घ्या, वाईटपणा (बुराई) आमच्या व्यक्तिमत्वाला सुरक्षित राहू दिले नाही, आणि ही अत्यंत चिन्ताजनक बाब आहे. ह. अब्दुल्लाह बिन अम्र कथन करतात की, अल्लाहचे अंतीम प्रेषित यांनी फर्माविले आहे, ‘‘तुमच्यामधील सर्वात श्रेष्ठ ते लोक आहेत, जे नैतिकतेच दृष्टीने तुमच्यात सर्वात उच्च आहेत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लीम)
श्रेष्ठत्व हे रंग, रूप, वर्ण, भाषा, देश, जातीवर अवलंबून नाही तर, व्यक्तीमधील नैतीकतेवर अवलंबून असते. जीवनमूल्ये निश्चित करण्यामध्ये नैतीकता हीच निर्णायक बाब आहे.  नैतिकता वस्तुत: स्वाभाविक भान आणि अनुभूतीचे दुसरे नाव आहे. व्यक्तीच्या विविध कृतीद्वारे ती प्रकट होत असते. मानवाच्या व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनाचा कुठलाही अंश  नैतीकतेपासून स्वतंत्र वा वेगळा नाही. 

श्रद्धावंतांची कसोटी (परीक्षा)
माननिय अबु हुरेरा (रजी.) कथन करतात की, ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘इमानधारक (श्रद्धावंत) पुरुषांची आणि स्त्रीयांची वेळोवेळी अल्लाहतर्फे कसोटी घेतली जात राहते. कधी त्यांच्यावर संकट येते तर कधी त्यांच्या संततीवर. कधी त्याची धनसंपत्ती नष्ट होते. या सर्व संकटांमध्ये जो धैर्य, संयम राखतो त्याच्या हृदयाची स्वच्छता, शुद्धता होत राहते आणि तो दुराचारापासून दूर होत राहतो. येथपावेतो की जेव्हा तो अल्लाहशी भेट घेतो, तर अशा अवस्थेत भेटतो की त्याच्या कर्म लेखात कोणताही गुन्हा राहत नाही. हदीस :  तिर्मिजी
वरील हदीस आणि कुरआनी आयातीद्वारे असा बोध होतो की, संकटे ही श्रद्धावंतांवर येत असतात. पण संकटांना घाबरून, श्रद्धावंतांनी सत्यनिष्ठताचा त्याग करू नये; संकटाला पाठ  दाखविण्याऐवजी संयमाने, धिराने त्याला सामोरे जावे. निराश होवून आत्महत्या सारख्या पापमार्ग स्विकारू नये. धैर्य व संयमानेच संकटांना सामोरे गेल्यास निश्चितच त्याला  ईश्वराकडून या भौतीक जगात, तसेच मृत्यूपश्चात पारलौकीक जगात ईश्वराकडून पुरेपूर मोबदला मिळू शकतो.
तिबरानी या हदीस संकलकांनी माननिय मुआज बिन जबल (रजी.) यांच्याद्वारे एक कथन उल्लेखिले आहे ज्यात हा मजकूर सांगीतला गेला आहे की, ‘‘जेव्हा जीवनधर्माच्या राजकीय
व्यवस्थेत बिघाड होईल, तेव्हा मुस्लीमांवर असे शासक येतील, जे समाजाला चुकीच्या दिशेने नेतील. जर त्यांचे म्हणणे मान्य केले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे म्हणणे  कोणी मान्य केले नाही तर ते त्याला ठार मारतील. तेव्हा यावर लोकांनी विचारले, ‘‘अशा परिस्थितीत आम्हाला आपण (स.) कोणते मार्गदर्शन करता’’? तेव्हा प्रेषित (स.) यांनी  सांगितले, ‘‘तुम्हाला तेच काही त्या काळात करावे लागेल जे मरियम पूत्र ह. इसा (अ.स.स.) यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यांना करवतीने चिरले गेले, आणि सुळावर चढविले गेले. परंतु  असत्यापूढे त्यांनी शरणागती पत्करली नाही. अल्लाहच्या आज्ञापालनात मरणे, त्या जीवनापेक्षा अधीक चांगले आहे, जे अल्लाहच्या अवज्ञेत व्यतीत व्हावे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget