Latest Post

Dua
या सृष्टीचा निर्माता, पोशिंदा, स्वामी व प्रभू परम दयाळू व कृपाळू अल्लाह असून तो मानवजातीच्या कल्याणकारी मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठवितो, जे या जगाच्या पाठीवर वसणाऱ्या समस्त मानवांना योग्य मार्गदर्शन करतात, सत्य-असत्य, खरे-खोटे, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय आणि चांगल्या-वाईटाचा फरक सांगतात. सत्याची, न्यायाची आणि सदाचाराची स्थापना करतात. माणसास माणूस बनवितात.
मात्र आपण याबरोबरच हेसुद्धा पाहिले आहे की मानव हा एक स्वतंत्र आणि स्वावलंबी जीव आहे. तो इतर सजीवांप्रमाणे विवश, निष्प्रभ आणि हतबलसुद्धा नाही. चांगल्या आणि वाईट, सत्य आणि असत्य मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य त्याच्यात आहे. सत्याचा मार्ग हा पैगंबरांनी दाखविलेला मार्ग असून पैगंबरांच्या मार्गाविरूद्ध असलेला मार्ग म्हणजे असत्य, अन्याय व दुराचाराचा मार्ग होय. या जगाच्या इतिहासात लोकांनी याच दोन मार्गांपैकी एका मार्गाची निवड केली आहे. आजही याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आज आपण पाहतो की या जगामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ईशमार्गावर चालणारेही आहेत आणि ईशद्रोहीसुद्धा आहेत.
या परिस्थितीवर गंभीरपणे जर आपण विचार केला तर हा प्रश्न उभा राहतो की सरळमार्गी आणि दुष्कर्मी वा अन्यायी लोकांत साम्य आहे काय? दोघांचा परिणाम सारखाच होईल काय? मुळीच नाही. शक्यही नाही. कारण अल्लाहकडून मार्गदर्शन अथवा जीवनाचा योग्य आणि सत्यमार्ग मिळाल्यास तसेच हा सत्यमार्ग स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असूनही न स्वीकारणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात येणार नाही आणि स्वीकारणाऱ्यांना त्यांच्या आज्ञाधारकतेचा कोणताही बदला मिळणार नाही, हे तर बुद्धीला मुळीच पटणारे नाही.
अल्लाहच्या पैगंबरांनी अल्लाहचा संदेश मानवजातीला प्रदान केला व या संदेशाबरोबरच या वस्तुस्थितीबाबतही खबरदार केले आहे की वर्तमान जीवनाची ही मुदत मुळात एका परीक्षेपुरता कार्यकाळ आहे. अल्लाहने मानवास चांगले वा वाईट निवडण्याचे जे स्वातंत्र्य प्रदान केले, ते यासाठीच केले की मानवाची परीक्षा घ्यावी की कोणती व्यक्ती आपल्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आणि चांगल्या प्रकारे वापर करते, सदुपयोग करते आणि कोणती व्यक्ती याचा दुरुपयोग करते. अल्लाहने मानवजातीस मार्गदर्शन देण्याचा एक पैलू हादेखील आहे की लोकांनी हे मार्गदर्शन स्वीकारावे आणि याचा योग्य व पुरेपूर मोबदला प्राप्त करावा. त्याचप्रमाणे ज्यांनी हे मार्गदर्शन डावलले आणि आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून मनमानी केली, त्यांना याची शिक्षाही भोगावी लागणार. म्हणूनच अल्लाहच्या पैगंबरांनी मानवजातीस स्पष्ट शब्दांत खबरदार केले की हे वर्तमान जीवन कर्म करण्याचे कार्यक्षेत्र आहे. या जीवनात जी व्यक्ती अल्लाहने दाखविलेल्या मार्गदर्शनानुसार जीवनाची  वाटचाल करील, अल्लाहने दाखविलेल्या सत्यमार्गावर जीवन व्यतीत करील, नेकी आणि सदाचाराचे जीवन व्यतीत करील, त्यास याचा उत्तम मोबदला मिळेल. त्याचप्रमाणे जी व्यक्ती या मार्गाविरूद्ध जीवन व्यतीत करील, त्या व्यक्तीस कठोर शिक्षा मिळेल. त्यांनी याविषयीदेखील मानवजातीस खबरदार केले की आम्ही (पैगंबर) अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समस्त मानवांना हे दाखवू इच्छितो की हा विश्वरूपी कारखाना एके दिवशी नष्ट करण्यात येईल. समस्त मानवजातीस परत जीवित करण्यात येईल आणि प्रत्येकास प्रभु, अल्लाहसमोर आपापल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. या गोष्टीचा जाब की अल्लाहने प्रदान केलेल्या शक्ती व सामर्थ्यचा, स्वातंत्र्य व क्षमतेचा, कौशल्य व पात्रतेचा वापर कोणत्या व कशा पद्धतीने केला. अल्लाहच्या मर्जीनुसार केला की त्याच्या अवज्ञेनुसार केला. याबरोबरच अल्लाहने आपल्या पैगंबरांच्या माध्यमाने हेदेखील स्पष्ट केले की अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याचे प्रचंड बक्षीस मिळेल, अर्थात अविनाशी असलेली स्वर्गप्राप्ती होईल. याउलट अल्लाहची अवज्ञा करून इतर कुणाच्या आज्ञेनुसार वा मर्जीनुसार जीवन जगण्याचे फलित अत्यंत वाईट मिळेल, अर्थात कधीही न संपणाऱ्या नरकयातना मिळतील. यातून कधीही सुटका होणार नाही.
मृत्यूनंतर परत जीवन मिळणार की नाही, मृत्यूनंतरचे जीवन कसे असेल, याविषयीची माहिती मिळविण्याची साधने आपल्याकडे नाहीत. काहींचे मत आहे की आपले हेच वर्तमान जीवन एवढेच आहे. मृत्यूनंतर कोणतेही जीवन नाही. मृत्यूनंतर जीवनाची कल्पना करणे हे केवळ एक कपोलकल्पित बाब आहे. वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही. मात्र जर असे असते तर प्रश्नच मिटला असता. यावर विचार करण्याची गरजसुद्धा पडली नसती. कसले पुण्य आणि कसले पाप? पद्धतशीरपणे मस्तपैकी जीवन भोगायचे नि मरून जायचे, संपले! मात्र ही वस्तुस्थिती विसरण्यासारखी मुळीच नाही की आपल्या वर्तमान जीवनाशी या कल्पनाविलास वाटणाऱ्या बाबीचा दृढ संबंध आहे. विशेषत: आपल्या नैतिक जीवनाचा तर याशीच संबंध आहे. उदाहरणार्थ, आपण थोड्या वेळेसाठी असे समजू या की मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे जीवन नाही आणि आपल्या जीवनाचा वा भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार नाही, ज्या जीवनाच्या यशापयशाची मदार वर्तमान जीवनावर आहे. तर याचा परिणाम निश्चितच आपल्या वर्तमान जीवनावर असा होईल की आपल्या जीवनातून पाप-पुण्याचा कोणताही मोबदला जर मिळत नसेल आणि पापाची कोणतीही शिक्षा भोगावी लागणार नसेल तर मग चांगले आणि सदाचाराचे विनाकारण लचांड गळ्यात घालून घ्यायचेच कशाला? मग वाटेल तसे जगायचे. नैतिकता, मानवता आणि सदाचाराची बिनधास्त होळी करायची. आपले जीवन रंगवून घेण्यासाठी इतरांच्या रक्ताने बिनधास्त शिमगा खेळायचा, वाटेल त्याला खपवायचे, वाटेल ते हिसकावून घ्यायचे, साऱ्यावर आपलीच मनमानी स्थापन करायची. कारण जीवन हे एकदाच मिळालेले असते, ते वाटेल तसे भोगायचे, मौज-मजा करण्याची कोणतीही संधी चुकवायची नाही. कारण आपल्याला कोण विचारणार, आपला कोण जाब घेणार? मात्र हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. यावर गंभीरपणे विचार केल्याशिवाय मुळीच गत्यंतर नाही. आपल्याला यावर विचार करावाच लागणार आहे की मृत्यूनंतरच्या जीवनातील यशापयशाचे परिणाम आपल्या वर्तमान जीवनावर काय होतात.
आपण जर यावर खरोखरच विचार केला तर आपल्याला हे स्पष्टपणे आढळून येईल की या जगात बरेच लोक चांगले व वाईटही आहेत आणि बरेचजण सदाचारी व दुराचारीही आहेत. दुराचारी लोक अत्यंत मौज-मस्तीत जीवन व्यतीत करून जगाचा निरोप घेतात. त्यांच्या जीवनात समस्त सुखसाधने असतात. तर याउलट सदाचारी व सद्वर्तनी लोक दु:ख, समस्या, अडचणी आणि ना-ना प्रश्नांशी झुंजत असताना दिसतात. असेच समस्याग्रस्त जीवन कंठून ते या जगातून निघून जातात. या ठिकाणी विचार करण्यासारखी बाब अशी आहे की जे लोक सद्वर्तनी, सत्यनिष्ठ आणि सदाचारी असतात व याच सत्यनिष्ठतेपायी संकटमय जीवन जगत असतात, अल्लाहच्या निर्णयाचे प्रत्येक संकटमय पावलावर स्वागतच करीत असतात, मोठमोठ्या संकटांना न घाबरता आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता सत्याची कास सोडत बसतात, न्याय आणि सदाचाराकरिता अख्खे जीवन अल्लाहला सर्मिपत करतात आणि याच सत्याच्या मार्गावर जीवनाची वाटचाल करून जीवनाची सांगता करतात, त्यांच्या मनात निश्चितच ही जाणीव तीव्रपणे उचंबळून येते की जगाचा निर्माता व पोशिंदा प्रभू अल्लाह निश्चितच न्यायी आहे, तो आपल्या सत्यनिष्ठा व सदाचाराचा, आपल्या भावनांच्या बलिदानांचा, आपल्या सत्य समर्पणाचा निश्चितच उत्तम मोबदला देईल. या सदाचाराच्या बदल्यात एका अशा स्थायी, समाधानकारक, दु:खरहित आणि आनंददायी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. एका अशा जीवनाची गरज आहे जेथे निश्चितच सदाचाराचे चांगले फळ आणि दुराचाराची शिक्षा मिळावी. शिवाय ज्या माणसाला या गोष्टीवर विश्वास असेल की या विश्वाचा रचयिता, निर्माता, सृष्टा, पोशिंदा, प्रभु अल्लाह आहे आणि त्यानेच हे सारे काही आपल्या सामर्थ्यने निर्माण केले, आपले स्वामित्व गाजविले, आपल्या प्रभुत्वाने सारी सृष्टी पोसली, तोच प्रभु अल्लाह निश्चितच सहजरित्या परत ही सृष्टी निर्माण करील. यात त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याचा प्रश्नच नाही. अशा अमर्याद सामर्थ्यशाली निर्मात्या प्रभु अल्लाहसाठी प्रत्येक मानवास परत जीवन देण्यात काहीही अडचण येणार नाही. मग शेवटी अल्लाहच्या पैगंबरांनी परलोकी जीवनाची जी खबर अथवा वार्ता दिली, त्यात मुळीच शंका वाटण्याचे कारण नाही.
आणखीन एक सांगायचे झाल्यास तुम्ही कदाचित म्हणाल की माणसाला चांगल्या आणि वाईट कर्माचे फलित मिळण्यासाठी दुसऱ्या जीवनाची काय गरज आहे? हे तर या जीवनातही शक्य आहे! येथेसुद्धा दु:ख आहे, कष्ट आहे, सुख-समाधान आहे. येथेही उच्च-नीच आहे आणि या आधारावर हेदेखील जर मान्य करण्यात आले की याच जगात आपल्या पाप-पुण्याईचा मोबदला प्राप्त करण्यासाठी याच जगात वारंवार माणूस जन्म घेऊ शकतो. पुण्याईच्या बदल्यात सुखी-समाधानी जीवन प्राप्त होऊ शकते, पापकर्मांच्या मोबदल्यात दु:ख व यातनामय जीवन मिळू शकते. मात्र यावर थोडाजरी विचार केला तर तुम्हाला निश्चितच या गोष्टीवर विश्वास येईल की पाप-पुण्याच्या बदल्यात या वर्तमान जीवनात तर काहीही मिळणे शक्य नाही. जर आपण हे मान्य केले की सध्या अडीअडचणीत असलेली व्यक्ती मागच्या जन्मीच्या पापाची फळे भोगत असून सुखी-समाधानी व्यक्ती मागील जन्माच्या पुण्याची फळे चाखत आहे, तर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असा उभा राहतो की या जगात सर्वप्रथम पाऊल ज्या व्यक्तीने ठेवले होते, त्यास कोणत्या जन्माच्या पुण्य अथवा पापाचे फळ भोगण्यासाठी या जगात पाठविण्यात आलेले होते?कारण यापूर्वी तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक जीवन नव्हते. यापेक्षाही आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की आज जे लोक सुखी-समाधानी आहेत अथवा समस्या व संकटांनी ग्रस्त जीवन कंठीत आहेत, त्याच्यासंबंधी हे सांगता येणे शक्य नाही की ते पुण्यकर्माची बक्षिसे प्राप्त करताहेत की पापाची कडू फळे चाखत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या दीन-दु:खी आणि संकटग्रस्त व्यक्तीस पाहा. कदाचित तो या अवस्थेच्या स्वरूपात शिक्षा भोगत असेल. कारण मागच्या जन्मी कदाचित त्यास धन-दौलत अगर सत्ता मिळालेली असेल आणि त्याने कदाचित दुराचार वा पापकर्मे केली असतील आणि त्याच्या परिणामस्वरूपी तो या जन्मी शिक्षा भोगत असेल. याबरोबरच हेदेखील शक्य आहे की ही अवस्था मागील जन्मातील चांगल्या कर्मांचे उत्तम बक्षीस भोगण्यासाठी असावी. कारण मागच्या जन्मी तो कदाचित एखादा प्रामाणिक कुत्रा असावा आणि त्याच्या प्रामाणिकतेचे फळ म्हणून त्यास हे मानवी जीवन मिळालेले असेल. मग हे जीवन समस्या आणि संकटांनी ग्रस्त का असेना. शिवाय या अडचणींव्यतिरिक्त आणखीन एक मोठी अडचण अशी दिसते की या जन्मात माणूस पुढील जन्मासाठी काही कष्ट करून पुण्याईची कमाई करीत असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर असेही म्हणणे वावगे ठरणार नाही की या वर्तमान जीवनात माणूस पुढील जन्मासाठी काही पुण्य कमावित असेल अथवा पुढील जीवनाच्या यशापयशाची पूर्ण भिस्त या जीवनाच्या पुण्य व पापकर्मांवर असेल. मग यातदेखील आणखीन एक अडचण अशी निर्माण होते की एक माणूस एकीकडे शिक्षा भोगत आहे वा बक्षीस मिळवित आहे आणि दुसरीकडे तर हीच शिक्षा आणि बक्षीस त्याच्या पुढील जन्माकरिता यशापयशाचे कारण ठरत असेल, हे कोणत्याही पैलूने बुद्धिसंमत वाटत नाही.
या समस्त बाबींव्यतिरिक्त आणखीन एक पैलू असा की आपण जर कोणत्याही दृष्टिकोनानुसार या वारंवार जन्म घेण्यावर विचार केला तर ते शक्य वाटत नाही. या जीवात जो माणूस जेवढी कर्मे करतो, ती सर्व प्रकरणे त्याच्या जीवनाबरोबरच संपूर्ण जाणारी बाब मुळीच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या नराधमाने एखाद्या निष्पाप माणसाचा वध केला आणि जर त्या खुन्यास या अपराधास्तव फाशीची शिक्षा देण्यात आली तर हे प्रकरणदेखील इथेच संपत नाही. कारण त्याचा एक गुन्हा असा होता का त्याने एका निष्पाप माणसाला जीवातून उठविले. मात्र याबरोबरच मृताच्या परिवारास असंख्य आर्थिक, मानसिक छळ सोसावा लागला. बिचाऱ्याची मुलेबाळे रस्त्यावर आली, पत्नी विधवा व निराधार झाली. मुले अनाथ झाल्याने शिक्षणाची सोय झाली नाही आणि दर-दर भीक मागून अख्खे जीवन व्यर्थ घालवावे लागले. शिवाय नंतरच्या कित्येक पिढ्या या दुष्कृत्यामुळे वाया गेल्या अर्थात त्याच्या खून करण्याच्या अपराधाचे परिणाम फक्त मृतकासच नव्हे तर परिवार, समाज आणि न जाणो कोणाकोणास भोगावे लागले असतील. जर सत्य आणि न्यायासहित त्यास त्याच्या पापाची पूर्णपणे शिक्षा द्यायची झाल्यास केवळ फाशी दिल्याने कसे चालेल?मृतकाच्या परिवारजनांचे जे जीवन उद्ध्वस्त झाले त्याचे काय? जर फाशी होताच त्याच्या पापाची शिक्षा म्हणून त्यास कुत्रा अथवा मांजराच्या जन्मी घालण्यात आले तर ते असे ठरेल जणू एखाद्याचे खाते बंद करण्यापूर्वीच त्याचा हिशेब पूर्ण करण्याचा एखाद्याने निर्णय घ्यावा. हीच परिस्थिती पुण्यकर्मांचीदेखील आहे. माणूस बरीच कर्मे अशी करतो, ज्यांचे उत्तम परिणाम त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा मानवजातीस प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने एखादी शाळा काढली. जोपर्यंत लोक त्या शाळेत शिक्षण घेत राहतील तोपर्यंत त्यास याचे पुण्य लाभत असेल. कोण जाणे किती शतकांपर्यंत ही शाळा सुरू राहील आणि लोकांना शिक्षणासारखी अमूल्य संपत्ती प्राप्त होत राहील. अशा अवस्थेत त्याला मेल्यानंतर तात्काळ त्याच्या पुण्याचा मोबदला कसा देता येईल. कारण अद्याप त्याच्या पुण्यकर्माचे खातेच बंद झालेले नसणार.
अशाप्रकारे विचार केल्यास हीच बाब स्पष्ट होते की जर माणसाला त्याच्या पुण्य वा पापाचे योग्य फलित मिळावयास हवे असेल तर त्यास एक असे जीवन हवे जे हे जग नष्ट झाल्यानंतर सुरू व्हावे आणि ते परलोकी जीवन कायमस्वरूपी व स्थायी स्वरूपाचे असावे. ज्या ठिकाणी माणसाला पूर्ण रूपाने त्याच्या पुण्य वा पापांची फलिते मिळणे शक्य व्हावे. कारण या वर्तमान जगातील क्षणभंगूर जीवन या फलितांसाठी पुरेसे ठरू शकत नाही, मात्र निश्चित!

- अबू सलीम मुहम्मद अब्दूल 

    या पुस्तिकेत यशाचा खरा व एकमेव मार्ग सांगितला गेला आहे. यासाठी मनुष्याचे मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणे आवश्यक आहे. पूर्व ग्रहदूषित मन कोणतेही सत्य आत्मसात करू शकत नाही. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देशात त्याच्या प्रेषितांच्या माध्यमाने जो धर्म आला तो मूळात इस्लाम धर्म होता.
    परंतु कालपरत्वे लोकांनी मूळ धर्मात फेरबदल केला आणि बरेच कृत्रिम धर्म तयार झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच आहे आणि तो म्हणजे इस्लाम म्हणूनच इस्लामच्या मूलभूत शिकवणी मनुष्य अंत:करणाची साद होय, या विषयी विवेचन आहे.

आयएमपीटी अ.क्र. 201   -पृष्ठे - 16     मूल्य - 08      आवृत्ती - 1 (2012)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/0m3zmhli79vcnn4tdee2e603sskyga4b







Madina
अब्दुल्लाह यसरिबला सासुरवाडीस जात असता वाटेत मरण पावला. त्याचे वय फक्त पंचवीस वर्षांचे होते आणि त्याच्या दु:खी पत्नीने पुढे लवकरच एका मुलाला जन्म दिला. तेच आपले पैगंबर मुहम्मद (स.)! जो पुढे सर्व अनाथांचा मायबाप झाला, तो जन्मताच पितृहीन होता! इ. स. ५७१ ची तारीख. जेव्हा हा महापुरुष जन्मला. अब्राहा सैन्याच्या नाशानंतरचा तो पन्नासावा दिवस होता.
अरब चालीप्रमाणे एका खेडूत दाईने दूध पाजून महुम्मद (स.) यांस वाढविले. पुढे तिने अमीनाजवळ ते वाढलेले लेकरू आणून दिले. अमीना मोठ्या प्रेमाने व काळजीने देवाचा हा ठेवा वाढवू लागली. तिचे हृदय दु:खाने पोळलेले होते. परंतु मुहम्मद (स.) यांच्या बालमूर्तीकडे पाही व शांत राही. परंतु तीही लवकरच मरण पावली. मुहम्मद (स.) लहानपणीच पोरके झाले! मुहम्मद (स.) यांचे वय सहा वर्षांचे, आई-बापाच्या प्रेमाची पाखर जगात कुठे मिळणार? तसे वात्सल्य कोण देणार? मुहम्मद (स.) यांच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. पोरक्या मुलांना फसवू नका, त्यांना प्रेम द्या, असे कुरआनात अनेक उल्लेख आहेत. पोरक्या मुलांची कधी दीनवाणी स्थिती होत असेल, याचा त्यांना अनुभव आलेला होता. ती आठवण ते कधी विसरले नाहीत.
आजोबांनी, अब्दुल मुत्तलिब यांनी मुहम्मद (स.) यांना आपल्याजवळ घेतले. या नातवावर ते फार प्रेम करीत. देवाला बळी देऊ केलेल्या मुलाचा हा मुलगा. पुढे चालून अब्दुल मुत्तलिब आजारी झाले. आपला मुलगा अबू तालिब यास त्यांनी बोलावले व मरणशय्येवरून सांगितले, ‘‘हा तुझ्या भावाचा पोरका मुलगा तुझ्या स्वाधीन मी करत आहे. त्याला प्रेम दे.’’ आणि इ. स. ५७९ च्या अखेर अब्दुल मुत्तलिब देह सोडून गेले.
चुलते अबू तालिब यांच्या घरी मुहम्मद (स.) राहू लागले. लहानपणापासूनच मुहम्मद (स.) विचारी होते. ते नेहमी विचारमग्न असत. डोळे मोठे काळेभोर. जणू आसारांतील सार शोधायला आले होते. सत्यशोधक, जिज्ञासू डोळे. कधी हा मुलगा एकटाच टेकड्यांवर जाई व सृष्टीसौंदर्य पाहत बसे. तेथे रमे, तल्लीन होई. स्वभाव मोठा सौम्य व गोड. दुसऱ्याच्या दु:खाने लगेच दु:खी होत. गहिवरत. फार करुण, कोमल हृदय होते ते. असा भावनोत्कट मुलगा सर्वांचा लाडका झाला. चुलत्या- पुतण्यांत अपार प्रेम जडले. ‘जणू देवदूताने येऊन त्यांची हृदये उघडून आत प्रकाश भरला.’
एकदा चुलत्याबरोबर ते सीरियात व्यापारी काफिल्याबरोबर गेले. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आजोबांनीच दरवर्षी यमन व सीरियात मक्केहून काफिला पाठविण्याची पद्धत सुरू केली होती. ती अद्याप होती. या प्रवासात मुहम्मद (स.) यांनी सामाजिक दु:खे पाहिली, ऐकली. धार्मिक अध:पात सर्वत्र झालेला पाहिला. सीरियाच्या या प्रवासातच वाटेत एके ठिकाणी त्यांना एक खिश्चन साधू भेटला होता. या प्रवासात त्यांनी जे जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्याची स्मृती त्यांच्या हृदयातून कधीही गेली नाही.
मुहम्मद (स.) यांना घरचे कामधाम करावे लागे. ते उंटांना चारायला नेत. शेळ्या घेऊन जात. मुहम्मद (स.) पुढे म्हणत असत, ‘‘ईश्वराने मेंढपाळांतूनच पैगंबर पाठविले!’’ उंट व शेळ्या-मेंढ्या चारताना ते डोंगरावर बसत. सृष्टीसौंदर्य पाहत. पृथ्वीच्या व आकाशाच्या अनंत सौंदर्याची उक्ती कुरआनात पदोपदी आहे. आकाशात व धरेवर सर्वत्र पाहणाऱ्यास ईश्वराच्या खुणा आहेत, असे कुरआन पदोपदी सांगत आहे. ईशज्ञान मुहम्मद (स.) यांना विश्वव्यापक प्रभूच्या सौंदर्यानेच करून दिले असावे. कुरआनातील भव्य सृष्टीवर्णनांची बीजे या वेळेसच, शेळ्या-मेंढ्या, उंट चारतानाच-मुहम्मदांच्या हृदयभूमीत पेरली जात होती.
मुहम्मद (स.) आता तारुण्यात होते. विशी-पंचविशीचे वय. या वेळेस ते पुन्हा सीरियात काफिल्याबरोबर गेले. कुरैश घराण्यातील एक स्त्री खदीजा. तिच्या मालाचे उंट घेऊन मुहम्मद (स.) गेले. खदीजा ही दूरची नातलग होती. खदीजा श्रीमंत होती. उदार होती. मुहम्मद (स.) परत आले. त्यांची कार्यनिष्ठा व प्रामाणिकपणा यांचा खदीजेवर परिणाम झाला आणि त्यांचा विवाह झाला. खदीजेचे वय अधिक होते. ती गतविधवा होती. चाळीस वर्षांची होती. मुहम्मद (स.) पंचवीस वर्षांचे. परंतु मुहम्मद (स.) ही आनंदाने लग्नास उभे राहिले!
हे लग्न अत्यंत कल्याणप्रद व शुभमंगल असे झाले. दोघांचे एकमेकांवर फार प्रेम. खदीजेचे हृदय अत्यंत प्रेमळ होते. मुहम्मद (स.) विषयी अपार प्रेम वाटे. या लग्नाने मुहम्मद (स.) यांना शांती, विश्रांती मिळाली. ज्या महान कार्यासाठी त्यांचा जन्म होता, त्याचा विचार करायला त्यांचे मन मोकळे झाले. प्रेमळ स्त्रीहृदय त्यांना मिळाले. या अवघ्या जगात त्यांच्या पैगंबर कार्यावर तिनेच प्रथम विश्वास ठेवला. निराशेत ती त्यांना शांतकरी, आधार देई, धीर देई. ती आशेची ज्योत विझू देत नसे. जेव्हा जगाचाच नव्हे तर स्वत: मुहम्मद (स.) यांचाही स्वत:वर विश्वास बसेना तेव्हा तिने विश्वास ठेवला! ज्या वेळेस मुहम्मद (स.) यांच्या डोळ्यांसमोर सर्व जग अंधारमय होते, तेव्हा तिने श्रद्धेचा, आशेचा दीप प्रज्वलित ठेवला.
माननीय खदीजा (रजि.) पासून मुहम्मद (स.) यांना सात मुले झाली. तीन मुलगे व चार मुली. परंतु सारे मुलगे बालपणीच निधन पावले. मुहम्मद (स.) यांना मुलगा राहिला नाही. त्यांचे शत्रू त्यांचा उपहास करण्यासाठी ‘अल् - अब्तर’ म्हणजे निपुत्रिक असे त्यांना संबोधित.
लग्नानंतरची पंधरा वर्षे मक्केत आत्मचिंतनात गेली. ते फारसे बोलत नसत. परंतु जेव्हा बोलत तेव्हा जोर देऊन बोलत, ठासून बोलत, विचारपूर्वक, जाणून समजून बोलत. पैगंबर मुहम्मद (स.) जे बोलत ते ऐकणारा कधी विसरत नसे. त्यांच्या बोलण्याचा ऐकणाऱ्यांवर विलक्षण परिणाम होई. पुष्कळ वेळा ते अशांत, चिंतीत, कष्टी असे असत. परंतु एकदम कोठूनतरी त्यांना स्फूर्ती येई. उत्साह संचारे. खिन्नता अस्तंगत होई. प्रसन्नता मुखावर पसरे. ते हसू बोलू लागत.
आणि लहान मुले म्हणजे त्यांचा प्राण! ही भावी पिढी जणू ते तयार करीत होते. रस्त्यांत मुलांना थांबवतील, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतील. त्यांना लहानलहान गोष्टी सांगतील, त्यांच्याबरोबर दऱ्याखोऱ्यातून, पहाडांतून भटकतील. त्यांच्याबरोबर खेळतील. खिस्तही लहान मुलांचे असेच शौकीन होते. मुले म्हणजे देवाची प्रभा! या पंधरा वर्षांच्या काळात अंतपरीक्षण चालले होते. श्रद्धा व संशय यांची लढाई चालली होती. भावी कार्याची सिद्धता, तयारी होत होती. आध्यात्मिक ऐक्य अंतरंगी अनुभवीत होते.
मक्केत लोकांचे जीवन सुरक्षित नसे. त्यांची मालमत्ता लुटली जाई. त्यांच्या बायकामुली पळविल्या जात. पैगंबर मुहम्मद (स.) यांना हा अन्याय पाहवेना. ‘हल्फ-उल्-फझूल’ नावाची त्यांनी एक संस्था स्थापिली. प्राचीन काळी अशी एक संस्था होती. त्या प्राचीन संस्थेचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पुनरुज्जीवन केले. या संस्थेच्या दबदब्यामुळे दुबळ्यांस व गरिबांस संरक्षण मिळे. या संस्थेने जरा धमकी देताच काम होत असे. दुष्कर्मीयांच्या दुष्ट कृत्यांस आळा बसला. ही संस्था पुढे सातव्या शतकाच्या अखेरपर्यंत होती.
पैगंबर  मुहम्मद (स.) गंभीरपणे विचार करू लागले. त्यांचा आत्मा उड्डाण करू लागला. सृष्टीच्या गुढ रहस्यात त्यांचा आत्मा डोकावू लागला. अनंततेच्या दरीत पाहू लागला. सत्य काय असत्य काय? जीवन मरण काय? या विश्वाच्या गोंधळातही काही व्यवस्था आहे का? मुहम्मद (स.) शोधू पाहत होते. त्यांना तळमळ लागली आणि देवाची वाणी त्यांच्या पवित्र, उदात्त हृदयाने ऐकली व ती वाणी जगाला नवजीवन देती झाली.
‘‘ऊठ, जगाला सत्याची सूचना दे. प्रभुचे गौरवगान गा. त्याचे वैभव गा.’’
असा स्पष्ट आदेश मिळाला. अंत: शंका-संभ्रम नाही. मुहम्मद (स.) आता उभे राहिले. अचल श्रद्धेने व अपार विश्वासाने उभे राहिले. सारे छळ, यातना, हालअपेष्टा यांना न जुमानता उभे राहिले. सत्यासाठी उभा राहिलेला हा महापुरुष असत्यासमोर शेवटपर्यंत नमला नाही.
हा सारा मनाचा खेळ होता का? मुहम्मद (स.) यांना जे देखावे दिसत, जे शब्द ऐकू येत, जे देवदूत दिसत ही सारी का प्रक्षुब्ध मनाची निर्मिती होती? ही का केवळ स्वत:ची स्वप्ने? सांगता येणार नाही. मानसशास्त्राचा अभ्यास अर्वाचीन शास्त्रज्ञांना अद्याप करावयाचा आहे. इंद्रियातील अशीही एक ज्ञानप्राप्तीची शक्ती मनुष्याला आहे. ते ज्ञान खोटे असे कोण म्हणेल? ते अनुभव खोटे असे कोण म्हणेल? महापुरुष सांगतात की आम्हाला असे असे अनुभव आले. ते प्रत्यक्षाच्याच गोष्टी बोलतात, करतात. तुम्हा-आम्हाला जे प्रत्यक्ष नसते ते त्यांना असते. त्यांना ते पाहण्याचे डोळे असतात. जणू निराळीच इंद्रिये मनाला फुटतात! काही असो, ती आत्मवंचना खास नव्हती.
‘‘तो मी ईश्वराचा दूत जिब्रिल (अ.). मी तुला ईश्वराचा मंगल संदेश घेऊन आलो आहे, ऊठ ईश्वराचा महिमा गा, उत्साही हो, पवित्र हो, शुद्ध हो, प्रत्युपकाराची, फळाची अपेक्षा ठेवून उपकार करू नको, तू भले कर, सर्वांचे मंगल कर, तुझ्या मंगल कार्याला फळ येईल, वाट पाहा,  ईश्वरावर श्रद्धा ठेवून धीराने, उतावीळ न होता वाट पाहा.’’
असे शब्द त्यांना ऐकू येत. जणू समोर दिसत आणि संशय झडझडून टाकून आत्मविश्वासाने एका ईश्वराचे, त्या अद्वितीयाचे गुणगान गावयास ते उभे राहिले.

माननीय उमर (र.) निवेदन करतात,
एके दिवशी आम्ही अल्लाहच्या प्रेषितांच्या जवळ बसलो होतो. अचानक एक माणूस आमच्यासमोर आला. त्याचे कपडे पांढरेशुभ्र होते व केस काळेभोर होते. त्याच्या चेहऱ्यावर प्रवासाचा शीण नव्हता व आमच्यापैकी कुणी त्याला ओळखत नव्हते. तो पुढे होऊन प्रेषितांच्या गुडघ्याबरोबर गुडघे जुळवून त्यांच्यासमोर बसला आणि आपले हात प्रेषितांच्या मांडीवर ठेवून नम्रपणे म्हणाला,
“हे मुहम्मद (स.) ! इस्लाम काय आहे?"
प्रेषितांनी सांगितले, “इस्लाम म्हणजे अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही आणि मुहम्मद हे अल्लाहचे प्रेषित आहेत याची ग्वाही देणे, नमाज कायम करणे, जकात देणे, रमजानचे रोजे करणे आणि प्रवासाची ऐपत असल्यास बैतुल्लाहचा हज करणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले.”
आम्हाला आश्चर्य वाटले की हा माणूस प्रेषितांना प्रश्न विचारतो व त्याचे उत्तर बरोबर असल्याचे स्वत:च सांगतो. त्यानंतर त्या माणसाने विचारले, “ठीक, आता मला 'ईमान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, "ईमान'चा अर्थ हा की, अल्लाह, त्याचे फरिश्ते, त्याचे ग्रंथ, त्याचे प्रेषित, परलोक आणि चांगल्या व वाईट दैवावर श्रध्दा ठेवणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले." व पुन्हा त्याने विचारले, “मला ‘एहसान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “तुम्ही अल्लाहची उपासना अशाप्रकारे करा की, जणू तुम्ही त्याला पाहत आहात. तुम्ही जरी त्याला पाहत नसला तरी नि:संशय तो तुम्हाला पाहत आहे.”
त्याने पुन्हा विचारले, “मला त्या वेळेबद्दल (अंतिम निवाड्याचा दिवस) माहिती सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “ज्याला विचारले जात आहे, तो प्रश्नकर्त्यापेक्षा अधिक जाणत नाही."
तो माणूस म्हणाला, “ठीक, निदान मला त्या वेळेच्या काही निशाण्या तरी सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “दासी आपल्या मालकाला जन्म देईल. अनवाणी चालणारे व उघडे शरीर असणारे कंगाल व मेंढपाळ मोठमोठ्या इमारती बांधण्याच्या बाबतीत एकदुसऱ्याशी चढाओढ करतील."
नंतर तो माणूस निघून गेला आणि मी काही वेळ तेथे थांबलो.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले, “हे उमर ! हा प्रश्नकर्ता कोण होता हे तुला माहीत आहे काय?"
मी उत्तर दिले की, “अल्लाह व त्याचे प्रेषित यांनाच अधिक माहीत."
प्रेषितांनी सांगितले, “ते जिब्रईल (अ) होते. तुमच्याजवळ तुम्हाला तुमच्या दीनची शिकवण देण्यासाठी आले होते."
(मुस्लिम) अल्लाहच्या सर्व ग्रंथांवर, त्याच्या सर्व प्रेषितांवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे. अल्लाहने माणसाला निर्माण केले. त्याला लागणाऱ्या अन्न, पाणी, वस्त्र, निवारा वगैरे सर्व गोष्टींची व्यवस्था जशी अल्लाहने केलेली आहे, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या शिकवणीचीदेखील व्यवस्था केली आहे. ईश्वराने निरनिराळ्या काळात व भूभागात आपले प्रेषित पाठविले. त्यांच्यावर आपले ग्रंथ उतरविले प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत व कुरआन हा अल्लाहचा शेवटचा ग्रंथ आहे. या सर्व वस्तुस्थितीवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे.
दासी आपल्या मालकाला जन्म देईल, याचा अर्थ असा की संतती अवज्ञाकारी व विद्रोही निपजेल. मुले आई-वडिलांचा आदर राखणार नाहीत. त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणार नाहीत. आईला दासी समजून तिच्याबरोबर एखाद्या मालकाप्रमाणे वर्तणूक केली जाईल.
अपात्र लोकांच्या हाती अयोग्य मार्गाने भरमसाठ पैसा येईल व ते लोक मोठमोठ्या इमारती बांधून ईर्षा व गर्व करू लागतील आणि आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करीत राहतील.
जगात अशी परिस्थिती निर्माण झाली की जाणावें, आता जगाचा शेवट जवळ आलेली आहे.

Human
इमानवंतांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्‍यांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्नाकोटापासून प्रारंभ झाला असेल. परंतु, आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला. वस्तुत: ही काहीशी आश्‍चर्यकारक गोष्ट आहे की जगात मनुष्यच एकमात्र असा प्राणी आहे ज्याच्या संबंधाने खुद्द माणसातच वारंवार हा प्रश्‍न उत्पन्न होत राहिला आहे की, त्यांचे मौलिक अधिकार काय आहेत? मनुष्याव्यतिरिक्त दुसरी सृष्टी या विश्‍वात राहत आहे तिचे अधिकार खुद्द निसर्गाने दिले आहेत. ते आपोआप मिळत आहेत, तेही त्याच्यासाठी विचार केल्याविना मिळत आहेत. परंतु केवळ मनुष्य अशी निर्मिती आहे, ज्याच्यासंबंधी प्रश्‍न होतो की त्याचे अधिकार काय आहेत आणि याची गरज भासते की त्याचे अधिकार निश्‍चित केले जावेत. तितकीच आश्‍चर्याची गोष्ट ही सुद्धा आहे की या विश्‍वातील कोणतेही सजातीय असे नाहीत जे आपल्याच सजातीयांशी असा व्यवहार करीत आहे जसा एक मनुष्य आपल्या सजातीय व्यक्तीशी करीत आहे. एवढेच नव्हे तर आपण पाहतो की प्राणीमात्राची कोणतीही जात अशी नाही जी दुसर्‍या कोणत्या जातीच्या प्राण्यावर केवळ आनंद व मजेखातर अथवा त्यांच्यावर शासक बनण्यासाठी हल्ला चढविते.
    निसर्गाच्या नियमाने एका प्राण्याला दुसर्‍या प्राण्याचे खाद्य बनविले आहे, तर ते केवळ अन्नाच्या सीमेपर्यंतच त्यावर तो हल्ला करतो! कोणतीही हिंस्त्र पशू असा नाही जो अन्नाच्या आवश्यकतेशिवाय अथवा ती गरज पूर्ण झाल्यानंतर विनाकारण जनावरांना ठार करून त्यांची थप्पी लावत असेल, खुद्द आपल्या सजातीयांशी प्राणीमात्राचा तसा व्यवहार नाही, जसा मनुष्य आपल्या सजातीय मनुष्यप्राण्यांशी करतो. संभवत: हा परिणाम त्याच्या त्या श्रेष्ठत्वाचा आहे. जो महान अल्हाने प्रदान केलेल्या बुद्धिमत्ता व शोधक शक्तीचा हा चमत्कार आहे ! माणसाने जगात ही असामान्य वर्तणूक धारण केली हे सत्य आहे. सिंहानी अद्याप कोणतीही सेना उभी केली नाही. कोणत्याही कुत्र्याने आजपर्यंत दुसर्‍या कुत्र्यांना गुलाम बनविले नाही. कोणत्याही बेडकाने दुसर्‍या बेडकांचे तोंड बंद केले नाही. हा मनुष्यच आहे, ज्याने श्रेष्ठ अल्लाहच्या आदेशांची पर्वा न करता जेव्हा त्याने दिलेल्या शक्तींचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला तेव्हा आपल्याच सजातींवर अत्याचार करण्यास सुरवात केली. जेव्हापासून मनुष्य या पृथ्वीतलावर आहे तेव्हापासून आजतागायत सर्व पशूंनी इतक्या माणसांचे जीव घेतले नसतील जितके माणसांनी केवळ दुसर्‍या महायुद्धात इतर माणसांचे जीव घेतले. यावरून सिद्ध होते की माणसाला खरोखर दुसर्‍या माणसांच्या मौलिक हक्कांची कसलीही चाड नाही. केवळ अल्लाहच आहे ज्याने मानवजातीचे या बाबतीत मार्गदर्शन केले आहे आणि आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने मानवी अधिकारांबद्दलचे ज्ञान पुरविले आहे. वस्तुत: मानवी अधिकारांची निश्‍चिती करणारा मानवांचा सृजनकर्ताच असू शकतो. म्हणून त्या सृजनकर्त्याने मानवाचे अधिकार अत्यंत तपशीलवार सांगितले आहेत.        

- सय्यद अबुल आला मौदूदी रहे. (मानवाचे मौलिक अधिकार या पुस्तकातून)

पर्यावरण :
पर्यावरणाचा अर्थ शब्दकोषात स्थिती आणि स्वरूपाच्या अर्थासह वापरला जातो, ज्यास अरबीमध्ये ‘बाईट’ म्हणतात. पर्यावरणाचा एक अर्थ खालीलप्रमाणे आहे : जे व्यक्ती आणि समूहाभोवती असते आणि त्यास प्रभावित करते, त्याला म्हणतात नैसर्गिक पर्यावरण, सामूहिक पर्यावरण आणि राजकीय पर्यावरण.
पर्यावरण हा शब्द आसपासच्या सर्व गोष्टींचा संदर्भ देतो.डॉ. सईदुल्लाह काझी लिहितात : ‘‘पर्यावरण प्रदूषण फक्त हवा, पाणी, जमीन आणि मातीशी संबंधित नाही तर त्यात नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांचादेखील समावेश आहे.’’ आपले जीवन आणि जगण्यासाठी ज्या गोष्टी आमच्याशी संबंधित आहेत त्या सर्व गोष्टी जसे की गृहनिर्माण, अन्न, पेय, श्वासोच्छवास, वैद्यकीय उपचार आणि काम, तसेच संवाद आणि संबंध अवलंबून असलेल्या सर्व बाबी. या संपूर्ण स्थितीला पर्यावरण म्हणतात.
जर पर्यावरणात समतोल असेल तर मानवी जीवन निरोगी आणि शांत राहील आणि जर पर्यावरण बिघडले तर जीव धोक्यात येईल. जीवनाच्या इतर सर्व बाबींबद्दल, इस्लाम आपल्याला पर्यावरणाशी संबंधित सुवर्ण नियमदेखील प्रदान करतो ज्याद्वारे आपण इस्लाम धर्म आणि जगात दोन्ही ठिकाणी यश मिळवू शकतो.
याच कारणास्तव सर्वशक्तिमान अल्लाहने पर्यावरण संतुलित केले आहे. यामध्ये निर्माणकर्त्याची उच्च कारागिरी स्पष्ट नैसर्गिक पर्यावरण एका विशिष्ट मार्गाने तयार केले आहे, जोपर्यंत त्यामध्ये मानवी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत ते संतुलित राहील, कारण अल्लाहने पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असलेला जीवनाचा प्रत्येक घटक विशिष्ट गुणधर्म आणि उपयुक्ततेसह तयार केला आहे. अल्लाहने सूचना दिली आहे की,
‘‘आम्ही भूतलाचा विस्तार केला, त्यात पर्वत रोवले, त्यात प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य प्रमाणात उगविली आणि त्यात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध केली.’’ (कुरआन- १५:१९)
‘‘आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे, हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या. त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करीत असतो. या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात.’’ (कुरआन- १३:३)
कुरआनमधील या श्लोकांवरून हे स्पष्ट होते की अल्लाहने पृथ्वीवर सर्व काही संतुलित पद्धतीने तयार केले आहे. त्याने अशी वनस्पती तयार केली आहेत की एकीकडे जैविक प्रजातींचे अन्न व गरजा पूर्ण होतात आणि दुसरीकडे वनस्पतींचे प्रकार अशा तऱ्हेने तयार करण्यात आले आहेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
आपल्या सभोवती जी काही औषधी घटक आहेत त्यांना त्याच औषधी अवस्थेत ठेवण्यात यावे आणि त्यांना सर्व प्रकारच्या आण्विक आणि अवैद्यकीय विनाशांपासून सुरक्षित ठेवले जावे, याद्वारेच पर्यावरणाचे संतुलन प्रस्थापित होते, असे म्हणणे योग्य ठरेल. परंतु जर मनुष्य या नैसर्गिक घटकांचा अविरतपणे वापर करीत राहिला तर त्यांचे संतुलन राखले जाणार नाही आणि याचा परिणाम असा होईल की ते नेहमीप्रमाणे जैवविविधतेच्या गरजा पूर्ण करू शकणार नाहीत.

(भाग २) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
(मो.: ८९७६५३३४०४)

हजरत अली बिन अबु तालीब यांचा जन्म इ.स.599/600 मध्ये झाला. त्यांच्या आई हजरत फातेमा ह्या काबागृहाचा तवाफ करत असतांनाच त्यांची प्रसुती झाली व त्यांनी एका बाळाला जन्म दिला. काबागृह म्हणजे अल्लाहचे घर व अल्लाहच्या घरी जन्मलेल्या बाळाचे नाव अल्लाहची सातत्याने आठवण देणारे असावे, यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्या बाळाचे नाव अली ठेवले. ज्याचा शब्दकोशीय अर्थ उदार / उदात्त असा होतो.
    अबु तालीब हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वडील अब्दुल्लाह यांचे सख्खे भाऊ होते व अब्दुल्लाह हे प्रेषित सल्ल. यांच्या जन्माअगोदरच वारल्याने अबु तालीब यांनीच प्रेषित (सल्ल)यांचा प्रतीपाळ केला होता. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. आणि अली रजि. हे चुलतभाऊ होत. हजरत अली रजि. हे प्रेषित सल्ल. पेक्षा 30 वर्षांनी धाकटे होते. मात्र इस्लाम स्वीकारण्यामध्ये जगात त्यांचा चौथा तर मुलात पहिला क्रमांक होता. इस्लाम स्विकारतांना ते अवघे 8 वर्षांचे होते. हजरत अली हे प्रेषित सल्ल. यांचे विश्‍वासू साथीदार व जावाई होते. प्रेषित सल्ल. यांच्या कन्या फातीमा ह्या त्यांच्या सुविद्य पत्नी होत. प्रेषित सल्ल. यांचा त्यांच्यावर एवढा विश्‍वास होता की, मदीनाला हिजरत करताना आपल्या स्थानी त्यांनी अंथरूनावर हजरत अली रजि. यांना झोपविले होते.

हजरत अली रजि. यांचे शौर्य
    शौर्याच्या बाबतीत हजरत अली रजि. व हजरत खालीद इब्ने वलीद रजि. हे इस्लामी इतिहासात सुप्रसिद्ध आहेत. त्यातही हजरत अली रजि. यांचे शौर्य अतुलनीय असे होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण अशी दुधारी तलवार होती, जिचे नाव ’जुल्फेखार’ होते. त्या तलवारीपुढे भले-भले गुडघे टेकत. आजकाल प्रसिद्धीच्या झोतात असलेली तुर्की मालिका अर्तुर्गुल गाजी मधील प्रमुख पात्र असलेल्या नायकाच्या तोंडी जो संवाद आहे, त्याबाबतीत अशी अख्यायिका आहे की, ह. अली रजि. संबंधी तो संवाद जन्नतमधील फरिश्ते एकमेकांना बोलताना करत. तो संवाद म्हणजे, ’हजरत अलीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि जुल्फेखारपेक्षा चांगली तलवार कोणतीच नाही’ याच तलवारीने हजरत अली यांनी इ.स.624 मध्ये बदरच्या युद्धात कुरैशच्या 30 लोकांना कंठस्थान घातले होते. त्यांच्या या शौर्यामुळेच प्रेषित सल्ल. यांनी त्यांना ’हैदर’ (न हरनारा) ही पदवी प्रदान केली होती. मुस्लिमांच्या सोबत राहून मुस्लिमांविरूद्धच कागाळ्या करणार्‍या मदिना येथील ज्यूंच्या दोन टोळ्या बनू कैनुका यांना इ.स. 625 व बनू कुरैजा यांना 626 मध्ये मदिनाबाहेर घालविण्याची कामगिरीही हजरत अली रजि. यांचीच.
    इ.स.625 मध्ये झालेल्या ओहदच्या लढाईत जरी मुस्लिमांना यश आले नव्हते तरी एकट्या अली रजि. यांनी आपल्या झुल्फेखारने 200 कुरैशींचा खात्मा केला होता. हे ऐतिहासिक सत्य अनेक इतिहासकारांनी मान्य केलेले आहे. त्या दरम्यान त्यांच्या शरीरावर 16 जखमा झाल्या होत्या. मदिनातून पिटाळून लावलेल्या ज्यूंनी खैबरमध्ये वस्ती करून तेथील भक्कम असा किल्ला ताब्यात घेऊन मुस्लिमांविरूद्ध पुन्हा कागाळ्या सुरू केल्या होत्या. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्या किल्ल्याचा पाडाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. हजरत अबुबकर रजि. व हजरत उमर रजि. यांनासुद्धा तो किल्ला सर करण्याच्या मोहिमेवर पाठविले होते. पण त्यांनाही तो किल्ला सर करता आली नाही. उलट अनेक बिनीचे शिलेदार त्या मोहिमांमध्ये मृत्युमुखी पडले होते. शेवटी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना या मोहिमेसाठी बोलाविलेे. त्यावेळी त्यांची तब्येत ठीक नव्हती. दोन्ही डोळे सुजून लाल झाले होते. अंगात ताप होता. तशाही परिस्थितीत ते हजर झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांची स्थिती पाहून आपल्या तोंड्यातील लाळ त्यांच्या डोळ्यांत लावली आणि मोहिमेवर रवाना केले. हजरत अली रजि. यांचे डोळे बरे झाले व ते मोहिमेवर रवाना झाले. त्यांनी संपूर्ण ताकदीशी खैबरवर हल्ला चढविला. अनेक धडका देऊन खैबरचे मुख्य दारच उखडून टाकले. यात अली रजि. यांनी तीन पराक्रमी ज्यूंना आपल्या जुल्फेखारने कंठस्थान घातले. येणेप्रमाणे खैबर किंण्याची अशक्यप्राय कामगिरी त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे खैबर जवळील ’फिदक’ येथील सुपीक जमीन लढाई न करता अली रजि. यांच्या ताब्यात आली. लढाई न करता किंल्यामुळे ही जमीन शरीयतच्या नियमाप्रमाणे प्रेषित सल्ल. यांची मालमत्ता बनली.
    इ.स.630 मध्ये मक्का विजयानंतर काबागृहात ज्या 360 मुर्त्या होत्या त्या फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांची मदत घेतली होती. उंचस्थानी विराजमान मुर्त्यांना तोडण्यासाठी विशेषत: हुबल नावाची मुर्ती फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना आपल्या खांद्यावर उभे करून ती मूर्ती फोडून टाकली होती. इतिहासामध्ये प्रेषितांच्या खांद्यावर पाय ठेवण्याचे सौभाग्य फक्त दोन लोकांच्या वाट्याला आले आहे. उपरोक्त प्रसंगी हजरत अली रजि. यांच्या वाट्याला व काबागृह किंल्यानंतर काबागृहाच्या वर चढून अजान देण्यासाठी हजरत बिलाल यांना आपल्या खांद्यावर पाय ठेऊन वर चढण्याचा आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी चढून काबागृहावर उभे राहून अजान दिली होती. इ.स.631 पर्यंत अरबस्थानातील बहुतेक लोकांनी इस्लाम स्विकारलेला होता. न स्विकारणारे जे मुठभर लोक होते त्यांना त्या पवित्र भूमीतून निघून जाण्याचा आदेश कुरआनमध्ये आला होता. ते घोषणापत्र वाचण्याची जबाबदारीही हजरत अली रजि. यांनी पूर्ण केली होती.

हजरत अली रजि. व प्रेषित सल्ल. यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड
    इ.स. 632 मध्ये हज आटोपून मदिनेला परत येतांना खुम-ए-़गदीर येथे प्रेषित सल्ल. यांनी बोलताना सर्वांसमक्ष असे उद्गार काढले होते की, ”अली हे माझ्यासाठी तसे आहेत जसे हजरत हारून अलै. हे प्रेषित मुसा अलै. साठी होते. जो कोणी मला, ”मौला” (मार्गदर्शक) म्हणून स्विकारत आहे त्याने हजरत अली रजि. यांना सुद्धा, ” मौला” म्हणून स्विकारले पाहिजे. हे अल्लाह ! हजरत अलींच्या मित्राचा तू मित्र बन आणि शत्रूंचा शत्रू. ते ज्याला मदत करतील तू त्यांना मदत कर आणि जे त्यांना कमी लेखतील त्यांच्या आशा निष्फळ बनव”. प्रेषित सल्ल. यांच्या या म्हणण्यामुळे मुसलमानांमध्ये एक सामान्य विचार असा दृढ झाला होता की, हजरत अली रजि. हेच प्रेषित सल्ल. यांचे उत्तराधिकारी असतील. शिवाय ते प्रेषित सल्ल. यांचे जावाई असल्यामुळे व प्रेषितांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा दावा हा दावा नसून हक्क आहे, असाही लोकांचा समज होता. त्यातूनच प्रथम खलीफा म्हणून हजरत अबुबकर रजि. यांच्या निवडीला काही लोकांनी विरोध केला होता. नव्हे हजरत अबुबकर रजि. यांच्याविरूद्ध बंड करण्यासाठी उम्मैय्या कुळ गटातील अबु सुफियान सारख्या सरदारांनी हजरत अली रजि. यांना प्रोत्साहित केले होते. पण हजरत अली रजि. हे अत्यंत संयमी व्यक्तीमत्व होते. त्यांनी अशा सर्व सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर खलीफा पदाने तीन वेळेस हुलकावणी दिल्यावरही ते शांत राहिले. त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हजरत फातीमा रजि. यांचा ठाम विश्‍वास होता की जनता हीच त्यांना खलीफा म्हणून निवडेल. तीन्ही वेळेस खलीफा निवडताना हजरत अली रजि. यांचे नाव हे प्रामुख्याने विचारात घेतले गेले होते. तरी परंतु, खलीफा पदाने तीन्ही वेळेस त्यांना हुलकावणी दिली होती. तरी सुद्धा हजरत अली रजि. हे विचलित झालेले नव्हते. तिन्ही खलीफांनी त्यांचा उचित सन्मानसुद्धा राखला होता. पहिल्या दोन खलीफांनी तर त्यांना देशाचे प्रमुख काझी (न्यायाधिश) आणि प्रमुख सल्लागार म्हणून नेमले होते. तथापि, हजरत उस्मान रजि. यांनी त्यांचे काझी पद कायम ठेऊन सल्लागारपदी दुसर्‍याची नेमणूक केली होती.

चौथ्या खलीफा निवडीची प्रक्रिया
    हजरत उस्मान रजि. यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कुफा, बसरा आणि सिरीयाच्या दोन हजार मुस्लिमांनी मदिनामध्ये घुसून खलीफा उस्मान रजि. यांची हत्या करून मदिना शहर ताब्यात घेतले होते. मदिना मस्जिदीमधील सामुहिक प्रार्थनेचे नेतृत्वही तेच करू लागले. सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. लोक आपापल्या घरात बसून होते. त्यांचा सामना करता येत नसल्या कारणाने हजरत उस्मान रजि. यांचे नातलग उमय्यी लोक सिरीयातील अमीर मुआविया रजि. यांच्याकडे निघून गेले होते. अराजक माजल्यामुळे मदिना शहराबाहेरच्या टोळ्यांनी सुद्धा मदिनेत येऊन लुटमार करण्यास सुरूवात केली होती. त्यात पर्शियन व रोमन साम्राज्यातून आलेल्या गुलामांची संख्या मोठी होती. इस्लामी साम्राज्याला राज्यप्रमुखच उरला नव्हता. तीन दिवस झाले तरी खलीफाचे नाव जाहीर झालेले नव्हते. बंडखोरांना परत जावयाचे होते. हजरत अली रजि., हजरत तल्हा रजि. व हजरत जुबेर रजि. यांच्यापैकी एक त्यांना खलीफा म्हणून पाहिजे होता. कारण बंडखोरांमध्येही तीन गट होते. इजिप्तचे, कुफाचे आणि बसराचे तीन गट होते. कुफाच्या बंडखोरांना हजरत जुबेर रजि. तर बसराच्या बंडखोरांना हजरत तल्हा रजि. हवे होते. मात्र इजिप्तच्या बंडखोरांना हजरत अली रजि. हवे होते. चौथ्या दिवशी बंडखोरांचा नेता मलिक बिन अश्तर याने खलीफा निवडीच्या प्रक्रियेची सुत्रे आपल्या हातात घेतली. हजरत अली रजि. यांना त्याने राजकीयदृष्ट्या तुम्हीच खलीफा होणे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हजरत अली रजि. यांनी स्पष्टपणे नकार दिला. शेवटी पाचव्या दिवशी मलिक बिन अश्तर याने मदिनातील लोकांना मस्जिद-ए-नबवीमध्ये बोलावून खलीफा निवडा नसता अधिक रक्तपात होईल व त्यात तुमच्या सरदारांना उदा. हजरत अली, हजरत तल्हा, हजरत जुबेर रजि. सह अनेक प्रतिष्ठांना ठार केले जाईल, अशी धमकी दिली. तेव्हा लोकांनी मस्जिद-ए-नबवीमध्ये जमा होऊन अली रजि. यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्यांच्या नावाच्या जयघोष ऐकूण हजरत अली रजि. हे स्वत: मस्जिद-ए-नबवीमध्ये हजर राहिले. हजर लोकांपैकी सर्वांनी त्यांना खलीफा म्हणून जबाबदारी उचलण्याची गळ घातली. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”मला क्षमा करा, जर तुम्ही अन्य व्यक्तीला खलीफा म्हणून निवडले तर. एकनिष्ठ नागरिक म्हणून मी त्यांच्या आज्ञा पाळण्यास बांधिल आहे. पण जर तुम्हाला मीच हवा असेल तर मी अधीच सांगून ठेवतो की, मी कोणाचे ऐकणार नाही. अल्लाहच्या ग्रंथानुसार व माझ्या न्याय बुद्धीनुसार प्रशासन करेन. सर्वांनी ही अट मान्य केली. तेव्हा हजरत अली रजि. यांनी खलीफा बनण्यास होकार दिला.
हजरत उस्मान रजि. यांच्या हत्येनंतर सातव्या दिवशी म्हणजे 24 जून 656 रोजी हजरत अली रजि. यांनी सार्वजनिक रित्या झालेल्या एका कार्यक्रमात खलीफा म्हणून सुत्रे स्विकारली. शपथविधी पार पडल्यानंतर हजरत अली रजि. यांनी सर्वांना उद्देशून जे छोटेखानी भाषण केले ते खालीलप्रमाणे - ,” अल्लाहने आपल्याला एक असा ग्रंथ दिलेला आहे की, ज्यात लोकांना मार्गदर्शन व सर्व चांगला व वाईट गोष्टींबद्दल सांगितलेले आहे. अल्लाहने बेकायदेशीर गोष्टी कोणत्या आहेत, हे ही त्यात नमूद केलेले आहे. त्यांच्यापैकी सर्वात मोठी बेकायदेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिमांचे रक्त सांडणे ही होय. अल्लाहने मुस्लिमांना बंधू म्हणून राहण्याचा आदेश दिलेला आहे. मुस्लिम तोच होय जो की इतर मुस्लिमांना हाताने व जिभेने हानी पोहोचवत नाही. अल्लाहच्या आज्ञा पाळा. (संदर्भ : चार आदर्श खलीफा, शेषेराव मोरे, पान क्र. 485. )

- एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget